व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?

येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?

“एका माणसाच्या [आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”—रोमकर ५:१२

“तुम्हाला सदासर्वकाळ जिवंत राहायला आवडेल का?” असं तुम्हाला कुणी विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? पुष्कळ लोक ‘हो’ असंच उत्तर देतील. पण, हे शक्य नाही असं त्यांना वाटतं. ‘मरण अटळ आहे; जीवन आहे तर मरणही आहेच,’ असं ते म्हणतात.

पण आता वरील प्रश्न जरा वेगळ्या प्रकारे विचारला, म्हणजे “तुम्हाला मरायला आवडेल का?” असं विचारलं तर तुम्ही त्याचं काय उत्तर द्याल? बहुतेक लोक याचं ‘नाही’ असंच उत्तर देतील. का बरं? कारण, आपल्याला कितीही संकटं किंवा त्रास सहन करावा लागला तरी आपल्याला जिवंत राहण्याची इच्छा असते. ही आपली स्वाभाविक इच्छा आहे. बायबलमध्ये म्हटलं आहे, की देवाने “मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे.” म्हणजेच मानवांना निर्माण केलं तेव्हा त्यानेच त्यांच्या मनात कायम जिवंत राहण्याची इच्छा घातली.—उपदेशक ३:११.

पण मग देवाने आपल्या मनात सदासर्वकाळ जगण्याची इच्छा घातली आहे, तर आपण कायम जिवंत का राहत नाही, आपण का मरतो? आणि मानवांनी मरू नये तर सर्वकाळ जिवंत राहावं यासाठी देवाने काही व्यवस्था केली आहे का? बायबलमध्ये या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली आहेत. आणि या उत्तरांचा, ‘येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?’ या प्रश्‍नाशी थेट संबंध आहे.

आपण कायम जिवंत का राहत नाही?

बायबलच्या पहिल्या पुस्तकाचं नाव ‘उत्पत्ति’ आहे. या पुस्तकाच्या पहिल्या तीन अध्यायांत आपण वाचतो, की देवाने पहिलं मानवी जोडपं आदाम व हव्वा यांना कायम जिवंत राहण्यासाठी बनवलं होतं. आणि यासाठी त्यांना देवाच्या आज्ञेचं पालन करावं लागणार होतं. पण या दोघांनी देवाची आज्ञा पाळली नाही आणि कायम जिवंत राहण्याची संधी गमावली. हा अहवाल इतक्या सोप्या भाषेत व थोडक्यात सांगितलेला आहे, की काही लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं, की तो अहवाल असाच कुठल्यातरी दंतकथेप्रमाणे आहे. पण शुभवर्तमानांप्रमाणेच उत्पत्तिच्या पुस्तकातील माहितीसुद्धा खरी व ऐतिहासिक रीत्या अचूक आहे. *

आदामाने देवाची आज्ञा न पाळल्याचा काय परिणाम झाला? बायबलमध्ये त्याचं उत्तर असं आहे: “[आदामाच्या] द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) देवाची आज्ञा मोडून आदाम पापी बनला. कायम जिवंत राहण्याची संधी गमावून तो कालांतरानं मरण पावला. आपल्या आईवडिलांचे काही विशिष्ट गुण किंवा आजार जसं आपल्यालाही मिळतात, तसंच आदाम आणि हव्वा यांची आपण मुलं असल्यामुळे आपल्यालाही वारशानं पाप मिळालं. त्यामुळे आपणही म्हातारे होतो व मरतो. पण या परिस्थितीतून आपली सुटका करण्यासाठी देवाने काही व्यवस्था केली आहे का?

देवाने काय व्यवस्था केली?

“पापाचे वेतन मरण आहे,” असं रोमकर ६:२३ या बायबलमधील वचनात म्हटलं आहे. म्हणजे, पापामुळे मरण आलं. आदामाने पाप केल्यामुळे तो मरण पावला. आपली चूक नसताना आपल्याला वारशानं पाप मिळालं. त्यामुळे आपल्याला पापाचे वेतन मरण, भोगावे लागते.

म्हणून, आदामाने गमावलेलं जीवन त्याच्या मुलांना पुन्हा देऊ करण्यासाठी देवाने एक व्यवस्था केली. देवाने त्याचा पुत्र येशू याला आपल्या सर्वांना पापाच्या वेतनापासून मुक्त करण्यासाठी पाठवलं. ही व्यवस्था करून देवाने खरंतर मानवाजातीवर त्याचे किती प्रेम आहे ते दाखवून दिलं. ही व्यवस्था योग्य ठरली असं का म्हणता येईल?

येशूच्या मृत्यूमुळे आनंदी व सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला झाला

एका मनुष्यानं म्हणजे परिपूर्ण असलेल्या आदामाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे आपल्यावर पाप व मरण आलं. तर पाप आणि मृत्यूच्या ओझ्यापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी, अशा एका परिपूर्ण मनुष्याची गरज होती जो शेवटच्या श्वासापर्यंत देवाच्या आज्ञेत राहील. बायबलमधील या वचनात याचं स्पष्टीकरण दिलं आहे: “जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.” (रोमकर ५:१९) येशू हाच तो परिपूर्ण मनुष्य होता. तो आधी स्वर्गात होता. मग तो पृथ्वीवर परिपूर्ण मानव म्हणून जन्माला आला. * तो आपल्या सर्वांच्या वतीनं मरण पावला. त्यामुळे आपण देवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकतो आणि कायम जिवंत राहण्याची आशा मिळवू शकतो.

येशूला यातना सहन करून मरण का सोसावं लागलं?

पण मग हे सर्व साध्य करण्यासाठी येशूला मरण का सोसावं लागलं? ‘आदामाची मुलं सदासर्वकाळ जिवंत राहोत,’ असा साधासा हुकूम सर्वसमर्थ देव देऊ शकला नसता का? हो, देऊ शकला असता कारण त्याच्याकडे तसं करण्याचा अधिकार आहे. पण त्याने जर असा हुकूम दिला असता, तर पापाचे वेतन मरण आहे, या त्यानेच आधी दिलेल्या नियमाकडे तो दुर्लक्ष करत आहे, असा त्याचा अर्थ झाला असता. हा नियम साधा-सुधा नियम नव्हता, जो स्वतःच्या सोयीसाठी केव्हाही बदलला जाऊ शकत होता. तर तो खरा न्याय मिळण्यासाठी गरजेचा होता.—स्तोत्र ३७:२८.

या बाबतीत देवाने जर या नियमाशी तडजोड केली असती तर बाकीच्या बाबतीतही तो तसंच करेल, असा लोकांचा समज झाला असता. उदाहरणार्थ, आदामाच्या मुलांपैकी कोण सदासर्वकाळचं जीवन मिळण्यास पात्र आहे आणि कोण नाही, हे ठरवण्याचा अधिकार मग त्याला असता का? तो दिलेली वचनं पाळणारा देव आहे, असा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकलो असतो का? पाप आणि मृत्यूपासून आपली सुटका करण्यासाठी देवाने जो मार्ग निवडला तो न्यायी आहे. आणि यामुळे आपल्याला ही खातरी मिळते, की तो पुढंही जे काही करेल ते योग्यच असेल.

येशूच्या बलिदानरूपी मृत्यूमुळे देवाने मानवांसाठी पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जिवंत राहण्याची संधी खुली केली. योहान ३:१६ या वचनातील येशूच्या शब्दांकडे लक्ष द्या: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” त्यामुळे येशूच्या मृत्यूच्या व्यवस्थेवरून देवाचा ‘न्याय’ हा गुण तर दिसतोच, पण मानवांवर त्याचं किती ‘प्रेम’ आहे, हेही आणखी ठळकपणे दिसून येतं.

पण मग, शुभवर्तमानात वर्णन केल्याप्रमाणे येशूला मरतेवेळी यातना का सहन कराव्या लागल्या? येशूने कठीण परीक्षेत विश्वासू राहून, सैतानानं केलेला दावा खोटा असल्याचं पूर्णपणे सिद्ध केलं. जीवनात परीक्षा येतात तेव्हा मानव देवाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत, असा सैतानानं दावा केला होता. (ईयोब २:४, ५) परिपूर्ण आदामाला सैतानानं पाप करण्यास प्रवृत्त केलं तेव्हा त्याचा दावा खरा होता, असं वाटलं असावं. पण, आदामासारखाच परिपूर्ण असलेला येशू मात्र, पुष्कळ यातना सहन करत देवाच्या आज्ञेत राहिला. (१ करिंथकर १५:४५) त्याने सिद्ध करून दाखवलं की, आदामही देवाच्या आज्ञेत राहण्याची निवड करू शकला असता. परीक्षेत टिकून राहून येशूने आपल्या सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण मांडलं. (१ पेत्र २:२१) एवढ्या कठीण परीक्षेतही येशू देवाच्या आज्ञेत राहिल्यामुळे देवाने त्याला स्वर्गात अमर जीवन बहाल केलं.

याचा आपल्याला कसा फायदा होतो?

येशूचा मृत्यू खरोखरच झाला होता. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी सदासर्वकाळ जिवंत राहण्याचा मार्ग खुला झाला. तुम्हाला सदासर्वकाळ जिवंत राहायला आवडेल का? यासाठी काय करण्याची गरज आहे हे सांगताना येशूने म्हटलं: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

या नियतकालिकेचे प्रकाशक तुम्हाला, खरा देव यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल शिकण्यास आमंत्रित करत आहेत. तुमच्या परिसरातील यहोवाच्या साक्षीदारांना, तुम्हाला याविषयी मदत करण्यास आनंद होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही www.pr418.com/mr ही वेबसाईट पाहू शकता. ▪ (w16-E No.2)

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स यांत, “जेनेसिस, बुक ऑफ” या सदराखाली “द हिस्टॉरिकल कॅरेक्टर ऑफ जेनेसिस,” ही माहिती वाचा. हे पुस्तक तुम्हाला www.pr418.com या वेबसाईटवर मिळेल. PUBLICATIONS > ONLINE LIBRARY या टॅबखाली पाहा.

^ परि. 13 देवाने त्याच्या पुत्राचं जीवन, पृथ्वीवर असलेल्या मरीयेच्या गर्भाशयात स्थलांतरित केलं. मरीया अपरिपूर्ण होती. आणि तिच्याकडून कुठल्याही प्रकारची अपरिपूर्णता येशूमध्ये येऊ नये म्हणून, देवाच्या पवित्र आत्म्यानं गर्भात असलेल्या येशूच्या जिवाचं रक्षण केलं.—लूक १:३१, ३५.