व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या बंदिवासात केव्हापासून होते?

याची सुरवात साधारणतः इ.स. १०० नंतर झाली आणि इ.स. १९१९ मध्ये हा बंदिवासाचा कालावधी संपुष्टात आला. पण आपली जी आधीची समज होती, त्यात हा बदल करण्याची काय गरज होती?

आतापर्यंतचे सगळे पुरावे हेच दाखवतात, की सन १९१९ मध्ये अभिषिक्त ख्रिश्चनांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सुटका मिळाली आणि शुद्ध केलेल्या मंडळीत त्यांना एकत्रित करण्यात आलं. ही गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे, की १९१४ मध्ये जेव्हा देवाच्या राज्यानं स्वर्गात राज्य करण्यास सुरवात केली, तेव्हा देवाच्या लोकांची पारख करण्यात आली आणि मग हळूहळू त्यांना खोट्या उपासनेपासून शुद्ध करण्यात आलं. * (मला. ३:१-४) यानंतर सन १९१९ मध्ये, आपल्या शुद्ध केलेल्या लोकांना “यथाकाळी खावयास देण्यासाठी” येशूनं एका “विश्वासू व बुद्धिमान दासाला” नेमलं. (मत्त. २४:४५-४७) आणि याच वर्षी, देवाच्या लोकांना मोठ्या बाबेलच्या लाक्षणिक बंदिवासातून सुटका मिळाली. (प्रकटी. १८:४) पण देवाच्या लोकांना बंदिवासात केव्हा जावं लागलं?

याआधी आम्ही असं स्पष्टीकरण दिलं होतं, की देवाच्या लोकांना १९१८ पासून सुरू होणाऱ्या एका छोट्या कालावधीसाठी, लाक्षणिक अर्थानं मोठ्या बाबेलच्या बंदिवासात जावं लागलं. १५ मार्च १९९२ च्या टेहळणी बुरूज अंकात असं सांगण्यात आलं होतं, की ज्याप्रमाणे इस्राएलांना बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं, त्याचप्रमाणे १९१८ मध्ये यहोवाच्या सेवकांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासात जावं लागलं. पण या गोष्टीवर जास्त संशोधन केल्यानंतर असं दिसतं, की १९१८ च्या अनेक वर्षांआधीपासूनच देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या बंदिवासात होते.

यहेज्केल ३७:१-१४ मध्ये देण्यात आलेल्या भविष्यवाणीनुसार देवाच्या लोकांना बंदिवासात नेण्यात येणार होतं आणि नंतर त्यांना पुन्हा सोडण्यात येणार होतं. या वचनांत सांगितल्यानुसार, यहेज्केलला एका दृष्टांतात मानवी अस्थींनी भरलेल्या एका दरीत नेण्यात आलं. आणि यहोवानं त्याला म्हटलं: “या अस्थी म्हणजे सारे इस्राएल घराणे होय.” हे शब्द इस्राएल राष्ट्राला आणि त्यानंतर अभिषिक्तांनी बनलेल्या ‘देवाच्या इस्राएललाही’ लागू होतात. (गलती. ६:१६; प्रे. कृत्ये ३:२१) या दृष्टांतात असलेल्या मानवी अस्थी जिवंत होतात आणि त्यांचं एक मोठं सैन्य तयार होतं. यावरून १९१९ मध्ये देवाच्या लोकांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून कशा प्रकारे सुटका मिळणार होती, ते कळतं. पण, त्यांना जास्त काळापर्यंत बंदिवासात राहावं लागणार होतं, हेदेखील या भविष्यवाणीतून कसं कळून येतं?

पहिली गोष्ट म्हणजे, यहेज्केलनं पाहिल्याप्रमाणे या अस्थी किंवा ही हाडे अतिशय “शुष्क” किंवा कोरडी झाली होती. (यहे. ३७:२, ११) याचा अर्थ, ती हाडे ज्या लोकांची होती त्यांना मरून खूप मोठा काळ लोटला होता. दुसरी गोष्ट म्हणजे यहेज्केलनं त्यांना हळूहळू जिवंत होताना पाहिलं. ते अचानक किंवा एकदम जिवंत झाले नाहीत. त्यानं एक “आवाज” झाल्याचं ऐकलं आणि त्यानंतर ती हाडं एकत्र जोडली जात असल्याचं त्याला दिसलं. नंतर या हाडांवर स्नायू व मांस चढल्याचं त्याला दिसलं. आणि मांसावर नंतर त्वचाही आली. मग शेवटी तयार झालेल्या त्या सर्व शरीरांमध्ये श्वास येऊन ते सर्व सजीव झाले. अशा प्रकारे ते सर्व मृत लोक जिवंत झाल्यावर यहोवानं त्यांना राहण्यासाठी त्यांचा देश दिला. यावरून हे कळतं की यहेज्केलनं पाहिलेल्या या सर्व गोष्टी घडण्याकरता नक्कीच काही काळ जावा लागणार होता.—यहे. ३७:७-१०, १४.

या भविष्यवाणीत सांगितल्यानुसार, इस्राएल लोक फार मोठ्या काळापर्यंत बंदिवासात होते. इ.स.पू. ७४० मध्ये जेव्हा इस्राएलांच्या दहा गोत्रांनी बनलेल्या उत्तरेकडील राज्याची त्यांच्या वतनातून हकालपट्टी करण्यात आली तेव्हा त्यांच्या बंदिवासाचा काळ सुरू झाला. यानंतर इ.स.पू. ६०७ मध्ये, बॅबिलोनी सत्तेनं जेरूसलेमचा नाश केला आणि इतर दोन गोत्रांनी बनलेल्या दक्षिणेकडील यहूदा राज्यालाही आपलं राज्य सोडण्यास भाग पाडलं. हे सर्व घडल्यानंतर इ.स.पू. ५३७ मध्ये यहूदी लोक पुन्हा यरूशलेमला परतले. आणि जेव्हा मंदिराची पुनर्बांधणी करून यहोवाची शुद्ध उपासना करण्यास त्यांनी सुरवात केली, तेव्हा हा काळ संपुष्टात आला.

या सर्व बारीकसारीक गोष्टी दाखवून देतात, की अभिषिक्त ख्रिस्ती केवळ १९१८ ते १९१९ च्या काळादरम्यान नव्हे, तर त्याहून जास्त काळाकरता मोठ्या बाबेलच्या बंदिवासात होते. येशूनं जेव्हा म्हटलं, की निदण म्हणजे खोटे ख्रिस्ती, गव्हासोबत म्हणजे ‘राज्याच्या पुत्रांसोबत’ वाढतील तेव्हा तो याच दीर्घ पल्ल्याच्या काळाला सूचित करत होतं. (मत्त. १३:३६-४३) या काळादरम्यान, खऱ्या ख्रिश्चनांची संख्या फारच कमी होती आणि जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवत होते, ते खोट्या शिकवणींना आपलंसं करून धर्मत्यागी बनले होते. या कारणामुळेच त्या वेळची ख्रिस्ती मंडळी मोठ्या बाबेलच्या बंदिवासात होती, असं आपण म्हणू शकतो. बंदिवासाचा हा काळ इ.स. १०० नंतरच्या काही काळापासून शेवटच्या काळात, देवाच्या आध्यात्मिक मंदिराचं शुद्धीकरण होईपर्यंत सुरू होता.—प्रे. कृत्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनी. २:३, ६; १ योहा. २:१८, १९.

यादरम्यान असणाऱ्या शेकडो वर्षांच्या काळात, लोकांवर आपलं वर्चस्व राहावं अशी ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक पुढाऱ्यांची आणि राजकीय पुढाऱ्यांची इच्छा होती. उदाहरणार्थ, त्या वेळी लोकांना बायबलची प्रत बाळगण्याची परवानगी नव्हती आणि स्वतःला समजेल अशा भाषेतलं बायबल वाचनंही त्या वेळी गुन्हा होता. शिवाय ज्यांनी असं करण्याचा प्रयत्न केला त्यांना खांबाला बांधून जिवंत जाळण्यात आलं. यासोबतच जे लोक चर्चच्या धार्मिक पुढाऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करायचे, त्यांना खूप वाईट शिक्षेला तोंड द्यावं लागायचं. एकंदरीत बायबलच्या सत्याबद्दल शिकणं किंवा इतरांना त्याबद्दल सांगणं जवळपास अशक्य गोष्ट बनली होती.

यहेज्केलला मिळालेल्या दृष्टांतातून आपल्याला हेदेखील समजतं, की नंतर देवाच्या लोकांना जिवंत करण्यात येतं आणि हळूहळू खोट्या धर्मापासून त्यांची सुटका करण्यात येते. मग हे केव्हा आणि कसं घडलं? या दृष्टांतात गडगडाट झाल्यासारखा एक “आवाज” झाल्याचं म्हटलं आहे. ही घटना शेवट होण्याच्या काही शेकडो वर्षांआधी सुरू झाली. या वर्षांदरम्यान, काही विश्वासू जणांनी सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि खोट्या शिकवणींच्या विळख्यात असूनही देवाची सेवा केली. त्यांनी बायबलचा अभ्यास केला आणि ते जे काही शिकत होते ते इतरांना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शिवाय इतर असेही काही जण होते ज्यांनी लोकांना समजेल अशा भाषेत बायबलचं भाषांतर करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

यानंतर, १९ व्या शतकाच्या समाप्तीच्या काळात बंधू चार्ल्स टेझ रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी बायबल सत्यांचा शोध घेण्यासाठी आणि यहोवाच्या उपासनेसाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी इतरांनाही सत्य समजून घेण्यास मदत व्हावी म्हणून झायन्स वॉच टावर आणि इतर साहित्यांचा वापर केला. नंतर, १९१४ साली “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” या चित्रपटामुळे आणि १९१७ साली द फिनिश्ड मिस्ट्री या पुस्तकामुळे यहोवाच्या लोकांना आपल्या विश्वासाला आणखी बळकट करण्यास मदत झाली. या सर्व गोष्टी जणू अस्थींवर स्नायू व मांस चढत असल्यासारख्याच होत्या. शेवटी, १९१९ साली देवाच्या लोकांना जणू एका नवीन देशात नवीन जीवन मिळालं होतं. तेव्हापासून, पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असलेले लोक अभिषिक्तांना येऊन मिळत आहेत. ते सर्व एकत्र मिळून यहोवाची उपासना करत आहेत आणि त्या सर्वांचे मिळून एक “मोठे सैन्य” बनले आहे.—यहे. ३७:१०; जख. ८:२०-२३. *

यावरून हे स्पष्ट होतं, की इ.स. १०० नंतर देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले. हा एक असा काळ होता, जेव्हा कित्येक लोकांनी सत्याला नाकारून खोट्या धार्मिक शिकवणींना स्वीकारलं आणि ते धर्मत्यागी बनले. त्यानंतर बंदिवासात असणाऱ्या इस्राएलांप्रमाणेच, बऱ्याच वर्षांपर्यंत यहोवाची सेवा करणं खूप कठीण बनलं होतं. पण आज सत्य प्रत्येकापर्यंत पोचवलं जात आहे. आज आपण अशा काळात जगत आहोत, जेव्हा “जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील.” या शब्दांची पूर्णता पाहता येणं आपल्यासाठी खरंच किती आनंदाची गोष्ट आहे! आज पुष्कळ लोक स्वतःला “शुद्ध” आणि “स्वच्छ” करून खऱ्या उपासनेला स्वीकारू शकतात.—दानी. १२:३, १०.

सैतानानं येशूची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं खरंच येशूला मंदिराकडे नेलं होतं का, की केवळ दृष्टांतात येशूला मंदिर दाखवलं होतं?

सैतानानं येशूला खरंच मंदिराकडे नेलं होतं की केवळ दृष्टांत दाखवला होता, हे आपण खात्रीनं सांगू शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत आपल्या प्रकाशनांमध्ये या दोन्ही गोष्टींविषयी सांगण्यात आलं आहे.

मत्तय आणि लूक या दोन्ही बायबल लेखकांनी या घटनेविषयी लिहिलं आहे. मत्तयनं असं लिहिलं, की सैतानानं येशूला यरुशलेममध्ये नेऊन मंदिराच्या “शिरोभागी” किंवा सर्वात उंच ठिकाणी उभं केलं. (मत्त. ४:५) तसंच लूकनंही असं म्हटलं, की सैतानानं “त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले.”लूक ४:९.

आधी आपल्या प्रकाशनांमध्ये असं सांगण्यात आलं होतं, की येशूची परीक्षा घेण्यासाठी सैतान त्याला प्रत्यक्ष मंदिराकडे घेऊन गेला नसावा. १ मार्च १९६१ च्या टेहळणी बुरूज मासिकात या घटनेची तुलना, सैतानानं त्याला एका उंच डोंगरावरून जगातली सर्व राज्ये दाखवून मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, त्या घटनेशी केली होती. या मासिकात असं म्हटलं होतं की जगात एकही असा डोंगर नाही जिथून एखाद्या व्यक्तीला सर्व राज्य दिसतील. त्यामुळे, सैतान कदाचित येशूला प्रत्यक्षात मंदिराकडे घेऊन गेला नसावा. पण, टेहळणी बुरूजच्या पुढच्या लेखांत असं सांगण्यात आलं होतं की येशूनं जर मंदिरावरून खरंच उडी मारली असती तर कदाचित त्याचा जीव गेला असता.

काही जण म्हणतात की लेवी नसल्यामुळे येशूला मंदिराच्या मुख्य इमारतीच्या उंच ठिकाणी उभं राहण्याची परवानगी नव्हती. म्हणून ते असा तर्क मांडतात की सैतानानं कदाचित दृष्टांत दाखवून येशूची परीक्षा घेतली असावी. शेकडो वर्षांआधीसुद्धा, यहेज्केल संदेष्ट्यालाही दृष्टांतात मंदिराकडे नेण्यात आलं होतं.—यहे. ८:३, ७-१०; ११:१, २४; ३७:१, २.

पण जर येशूला फक्त दृष्टांतात मंदिराकडे नेण्यात आलं असेल, तर मग काहींच्या मनात असे प्रश्न येऊ शकतात:

  • जर तो फक्त दृष्टांत असता, तर येशूला खरंच उडी मारण्याचा मोह झाला असता का?

  • इतर काही प्रसंगीदेखील सैतानानं येशूची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानं येशूला प्रत्यक्ष दगडाची भाकर करण्यास सांगितली होती. तसंच, आणखी एकदा त्यानं येशूला नमन करण्यास म्हणजे उपासनेची प्रत्यक्ष कृती करण्यास सांगितलं होतं. मग या प्रसंगीसुद्धा सैतान येशूला खरोखरच मंदिरावरून उडी मारण्यास सांगत होता का?

पण जर सैतानानं दृष्टांताचा वापर न करता येशूला प्रत्यक्ष मंदिराकडे नेलं असेल, तर कदाचित काही जण अशीही शंका व्यक्त करतील:

  • मंदिराच्या उंच ठिकाणी उभं राहिल्यामुळे येशूनं मोशेचा नियम मोडला का?

  • येशू अरण्यातून यरुशलेममधील मंदिराकडे कसा पोचला?

या दोन प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणखी थोडी माहिती आता विचारात घेऊ या.

प्राध्यापक डी. ए. कार्सन यांनी असं लिहिलं, की मत्तय आणि लूक या पुस्तकांत “मंदिर” या शब्दासाठी वापरण्यात आलेला ग्रीक शब्द, फक्त मंदिराच्या मुख्य इमारतीलाच नव्हे तर त्याभोवती असणाऱ्या संपूर्ण परिसराला उद्देशून होता. आणि या ठिकाणी केवळ लेवीच नव्हे तर इतर लोकही जाऊ शकत होते. मंदिराच्या दक्षिण-पूर्वेला एक सपाट छत होतं. हे छत मंदिराच्या सर्वात उंच भागावर होतं. येशूला कदाचित याच छतावर नेण्यात आलं असावं. या छतापासून किद्रोन दरी जवळपास ४५० फूट (१४० मी.) खोल होती. इतक्या उंचीवरून एखाद्यानं खाली पाहिलं तर त्याला सहजच “चक्कर” येईल, असं इतिहासकार जोसिफस म्हणतात. येशू एक लेवी नसला तरी या ठिकाणी तो उभं राहू शकत होता आणि त्याबद्दल त्याच्यावर कोणीच आक्षेप घेतला नसता.

पण येशू अरण्यातून यरुशलेममधील मंदिराकडे कसा पोचला? याबद्दल आपण खात्रीनं काही सांगू शकत नाही. कारण येशू यरुशलेमपासून किती लांब होता किंवा सैतानानं किती काळापर्यंत त्याची परीक्षा घेतली, याविषयी बायबल काहीच सांगत नाही. उलट येशूला यरुशलेममध्ये नेण्यात आलं, इतकंच त्यामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे येशू यरुशलेमला चालत गेला असावा आणि त्यासाठी त्याला बराच वेळ लागला असावा, याची शक्यता नाकारता येत नाही.

येशूला या “जगातील सर्व राज्ये” दाखवण्यासाठी सैतानानं कदाचित दृष्टांताचा वापर केला असावा. कारण पृथ्वीवरील एकाच डोंगरावरून जगातली सर्व राज्यं दाखवणं शक्य नाही. हे जणू चित्रपट पाहण्याच्या पडद्यावर पृथ्वीच्या दुसऱ्या भागांची चित्र दाखवण्यासारखं होतं. या ठिकाणी सैतानानं कदाचित दृष्टांताचा वापर केला असावा, पण तरी येशूनं त्याला खरोखर नमन करून त्याची उपासना करावी, अशी त्याची इच्छा होती. (मत्त. ४:८, ९) त्यामुळे या वेळीसुद्धा जेव्हा सैतानानं येशूला मंदिराकडे नेलं, तेव्हादेखील येशूनं खरोखर उडी मारून स्वतःचा जीव धोक्यात घालावा, अशी त्याची इच्छा असावी. पण येशूनं त्याचा प्रतिकार केला. मग, अशा प्रकारच्या परीक्षेचा केवळ दृष्टांताऐवजी प्रत्यक्षात सामना करणं एक गंभीर गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत नाही का?

त्यामुळे, येशू यरुशलेममध्ये खरंच गेला असावा आणि मंदिराच्या उंच भागावर उभा राहिला असावा, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पण लेखाच्या सुरवातीलाच स्पष्ट केल्याप्रमाणे, याविषयी आपल्याला खात्रीनं काही सांगता येणार नाही. हे मात्र खरं आहे, की येशूनं चुकीचं पाऊल उचलावं म्हणून सैतान सतत प्रयत्न करत होता. पण येशूनं मात्र प्रत्येक वेळी ठामपणे त्याचा प्रतिकार केला.

^ परि. 1 हे खरं आहे, की यहेज्केल ३७:१-१४ आणि प्रकटीकरण ११:७-१२ या वचनांमध्ये १९१९ मध्ये झालेल्या घटनांबद्दल सांगण्यात आलं आहे. पण यहेज्केल ३७:१-१४ मधील भविष्यवाणीत १९१९ मध्ये दीर्घ काळच्या बंदिवासानंतर खऱ्या उपासनेकडे परतणाऱ्या देवाच्या लोकांबद्दल सांगण्यात आलं आहे. तर प्रकटीकरण ११:७-१२ मध्ये, देवाच्या लोकांमध्ये नेतृत्व करणाऱ्या अभिषिक्त बांधवांच्या लहान गटाला १९१९ मध्ये कशा प्रकारे पुन्हा सक्रिय करण्यात आलं; त्याबद्दल सांगण्यात आलं आहे. या बांधवांना काही काळापर्यंत जबरदस्तीनं आध्यात्मिक रीत्या निष्क्रिय करण्यात आलं होतं.