व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | तुम्हाला सांत्वन कुठून मिळू शकतं?

आपल्या सर्वांनाच सांत्वनाची गरज असते

आपल्या सर्वांनाच सांत्वनाची गरज असते

तुम्ही लहान असताना तुम्हाला कुठे पडल्याचं आठवतं का? कदाचित तुमच्या हाताला किंवा पायाला मार लागून खरचटलं असेल. त्या वेळी तुमच्या आईने सांत्वन देऊन तुम्हाला कसं शांत केलं हे आठवतं का? कदाचित तिने आधी तुमच्या जखमांना साफ केलं असावं आणि मग त्यावर मलमपट्टी केली असावी. तुम्ही रडत असताना, तिचे प्रेमळ सांत्वनदायक शब्द ऐकून आणि तिच्या कुशीत जाऊन तुम्हाला लगेच बरं वाटलं असेल. खरंच, लहान असताना सांत्वन अगदी सहज मिळायचं.

पण मोठं झाल्यावर आपलं जीवन अधिक गुंतागुंतीचं होत जातं. समस्या मोठ्या होत जातात आणि सांत्वन मिळणं मात्र अधिक कठीण होत जातं. दुःखाची गोष्ट म्हणजे, मोठ्यांच्या समस्या नुसत्या मलमपट्टी करून किंवा आईने कुशीत घेतल्याने सुटत नाहीत. आपण याची काही उदाहरणं पाहूयात.

  • तुमची नोकरी सुटल्यामुळे तुम्हाला कधी नैराश्याचा सामना करावा लागला आहे का? जूलियन म्हणतो त्याला जेव्हा कळलं, की त्याची नोकरी सुटली तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याला प्रश्न पडला, ‘आता माझ्या कुटुंबाला मी कसं सांभाळणार? ज्या कंपनीमध्ये मी इतकी वर्षं मेहनत केली, त्यांना आता मी काहीच कामाचा नाही असं का वाटावं?’

  • कदाचित तुमच्या विवाहसोबत्याने तुम्हाला सोडल्यामुळे जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत असेल? “माझ्या पतीने जेव्हा दीड वर्षांपूर्वी मला सोडलं तेव्हा माझ्या पायाखालून जमीन सरकल्यासारखं मला वाटलं. माझ्या काळजाचे जणू दोन तुकडे झाले. ते दुःख फक्त शारीरिक नव्हे तर भावनिकसुद्धा होतं. आता पुढे कसं होणार याची मला फार भीती वाटत होती.” असं रॅक्वेल म्हणते.

  • तुम्हाला कदाचित एखादा गंभीर आजार झाला असेल, जो काही केल्या बरा होत नाही. अशा वेळी तुम्हाला बायबलमध्ये उल्लेख केलेल्या ईयोब नावाच्या व्यक्तीसारखं वाटत असेल. ज्याने दुःखी होऊन म्हटलं, “मला आपल्या जिवाचा वीट आला आहे; सर्वकाळ जगणे मला नको.” (ईयोब ७:१६) किंवा ८० वर्षांच्या लुईस यांच्यासारख्या भावना तुमच्या मनात येतील जे म्हणतात, “कधीकधी मला वाटतं, आता मी फक्त मरणाची वाट बघत आहे.”

  • तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे कदाचित तुम्ही दुःखात पार बुडून गेला असाल आणि सांत्वनासाठी आसुसलेले असाल. रॉबर्ट म्हणतात, “माझ्या मुलाचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे असं जेव्हा मी ऐकलं, तेव्हा सुरुवातीला त्यावर आमचा विश्वासच बसला नाही. त्याला गमावण्याचं दुःख हे बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे जणू जिवातून एखादी लांब तलवार भोसकावी असं होतं.”—लूक २:३५.

पण अशा दुःखाच्या परिस्थितीतदेखील रॉबर्ट, लुईस, रॅक्वेल आणि जूलियन यांना सांत्वन मिळालं. हे सांत्वन त्यांना सर्वात योग्य व्यक्तीकडून म्हणजेच सर्वशक्तिमान देवाकडून मिळालं. पण तो हे सांत्वन कसं देतो? तुम्हालादेखील हवं असलेलं सांत्वन तो देईल का? (wp16-E No. 5)