व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेमाच्या आधारावर मतभेद सोडवा

प्रेमाच्या आधारावर मतभेद सोडवा

“एकमेकांबरोबर शांतीने राहा.”—मार्क ९:५०.

गीत क्रमांक: ३९, ३५

१, २. उत्पत्तिच्या पुस्तकात कोणत्या मतभेदांबद्दल सांगण्यात आलं आहे, आणि आपण त्यांचं परीक्षण का केलं पाहिजे?

बायबलमध्ये ज्या मतभेदांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांचा तुम्ही कधी विचार केला आहे का? उत्पत्तिच्या सुरवातीच्याच काही अध्यायांत आपल्याला पुढील गोष्टी वाचायला मिळतात: काईन हाबेलाची हत्या करतो. (उत्प. ४:३-८) लामेखावर एक तरुण हल्ला करतो आणि त्यामुळे तो त्याला मारून टाकतो. (उत्प. ४:२३) अब्राहामाच्या मेंढपाळांचा लोटाच्या मेंढपाळांसोबत वाद होतो. (उत्प. १३:५-७) हागार स्वतःला सारेपेक्षा श्रेष्ठ समजत असल्यामुळे सारा अब्राहामावर रागावते. (उत्प. १६:३-६) इश्माएल इतर सर्वांचा वैरी होतो आणि ते सर्व त्याच्याविरुद्ध होतात.—उत्प. १६:१२

या सर्व मतभेदांचा बायबलमध्ये उल्लेख का करण्यात आला आहे? कारण आपल्यासारखेच अपरिपूर्ण असलेल्या या लोकांच्या जीवनात ज्या समस्या आल्या त्यापासून आपल्याला शिकता यावं म्हणून. आपल्या जीवनातही जेव्हा अशा समस्या येतात तेव्हा बायबलमधील चांगल्या उदाहरणांतून आपण शिकू शकतो. तसंच, वाईट उदाहरणांपासून आपण धडा घेऊ शकतो. (रोम. १५:४) यामुळे, इतरांसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल.

३. आपण या लेखात कोणत्या गोष्टी शिकणार आहोत?

मतभेद किंवा वाद सोडवणं गरजेचं का आहे आणि आपण ते कसे सोडवू शकतो, हे या लेखात आपण शिकणार आहोत. त्यासोबतच समस्या सोडवण्यासाठी आणि यहोवासोबत व इतरांसोबत चांगला नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी काही बायबल तत्त्वांवर देखील आपण चर्चा करणार आहोत.

देवाच्या उपासकांनी मतभेद सोडवणं गरजेचं का आहे?

४. आज जगात कोणत्या प्रकारची मनोवृत्ती पाहायला मिळते, आणि त्याचा काय परिणाम झाला आहे?

आज लोकांमध्ये होणाऱ्या मतभेदांचं मुख्य कारण सैतान आहे. असं आपण का म्हणू शकतो? एदेन बागेत सैतानानं म्हटलं की योग्य काय आणि अयोग्य काय हे मानव स्वतः ठरवू शकतात आणि त्यांनी तसं केलं पाहिजे. यासाठी त्यांना देवाचं मत जाणून घेण्याची गरज नाही. (उत्प. ३:१-५) पण आज आपण जगामध्ये पाहिलं तर दिसून येतं की या मनोवृत्तीमुळे मानवांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आज बऱ्याच लोकांना वाटतं की योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याचा हक्क त्यांना स्वतःला आहे. ते गर्विष्ठ, स्वार्थी आणि स्पर्धात्मक वृत्ती बाळगतात आणि त्यांच्या निर्णयांमुळे इतरांचं मन दुखावणार असलं तरी ते त्याची फिकीर करत नाहीत. अशी मनोवृत्ती बाळगल्यामुळे लोकांना राग येतो आणि त्यांच्यात बरेच मतभेद होतात. बायबल आपल्याला ताकीद देतं की आपल्याला लगेच राग येत असले, तर इतरांसोबत आपले बरेच मतभेद होतील आणि आपल्या हातून पापदेखील घडेल.—नीति. २९:२२.

५. मतभेद टाळण्यासाठी येशूनं कोणता सल्ला दिला?

डोंगरावरील प्रवचन देताना येशूनं आपल्या शिष्यांना मतभेद टाळण्यासाठी आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी शिकवलं. असं केल्यामुळे आपलं नुकसान होईल असं वाटत असलं, तरीही त्यांनी ते करावं असं येशूनं सांगितलं. उदाहरणार्थ, आपण इतरांशी दयेनं वागावं, शांती टिकवून ठेवावी, मनातून राग आणि द्वेष अशा भावना काढून टाकाव्यात असं त्यानं शिकवलं. तसंच, आपण लगेच मतभेद सोडवावेत आणि आपल्या शत्रूंवरही प्रेम करावं हेदेखील त्यानं शिकवलं.—मत्त. ५:५, ९, २२, २५, ४४.

६, ७. (क) वैयक्तिक मतभेद लगेच सोडवणं गरजेचं का आहे? (ख) आपण सर्वांनी कोणत्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे?

आज आपण प्रार्थना करण्याद्वारे, प्रचाराला आणि सभेला जाण्याद्वारे यहोवाची उपासना करतो. आपण जर आपल्या बांधवांसोबत असलेले मतभेद लगेच सोडवले नाहीत, तर यहोवा आपली उपासना स्वीकारणार नाही. (मार्क ११:२५) यहोवाचे मित्र बनण्यासाठी नेहमी इतरांना क्षमा करणं खूप गरजेचं आहे.—लूक ११:४; इफिसकर ४:३२ वाचा.

यहोवाची इच्छा आहे की त्याच्या सर्व सेवकांनी क्षमाशील असावं आणि एकमेकांसोबत शांतीपूर्ण नातेसंबंध टिकवून ठेवावा. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी बंधुभगिनींना लगेच क्षमा करायला तयार असतो का? मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतं का?’ या प्रश्नांवर विचार केल्यावर तुम्हाला जर जाणवलं की तुम्हाला या बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे, तर यहोवाला प्रार्थनेत मदत मागा. आपला स्वर्गीय पिता मदतीसाठी केलेल्या आपल्या प्रार्थनांचं नक्कीच उत्तर देईल.—१ योहा. ५:१४, १५.

तुम्ही इतरांच्या लहानसहान चुका माफ करू शकता का?

८, ९. एखाद्यानं आपलं मन दुखावलं असेल तर आपण काय केलं पाहिजे?

आपल्यापैकी कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे इतरांच्या वागण्याबोलण्यातून कधी ना कधी आपलं मन दुखावेल हे साहजिकच आहे. (उप. ७:२०; मत्त. १८:७) कोणी तुमचं मन दुखावलं तर तुम्ही काय कराल? पुढील अनुभवावरून आपण एक मोलाचा धडा शिकू शकतो: एका कार्यक्रमात आपली एक बहीण दोन बांधवांना भेटली. अभिवादन करताना ती ज्या प्रकारे त्यांच्याशी बोलली त्याचं त्यातील एका बांधवाला खूप वाईट वाटलं. नंतर जेव्हा हे दोन्ही बांधव एकांतात होते तेव्हा तो त्या बहिणीची तक्रार करू लागला. पण दुसऱ्या बांधवानं त्याला आठवण करून दिली की ती बहीण मागील ४० वर्षांपासून यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहे. तिच्या जीवनात बऱ्याच समस्या आल्या तरीसुद्धा ती यहोवाला अजूनही विश्वासू आहे. त्याचं मन दुखावण्याचा तिचा हेतू नक्कीच नसेल असं त्यानं त्याला सांगितलं. हे ऐकून त्या बांधवाला कसं वाटलं? तो म्हणाला, “तुझं बरोबर आहे.” आणि त्या गोष्टीला तिथंच विसरून जाण्याचं त्यानं ठरवलं.

या अनुभवावरून आपण काय शिकतो? एखादी व्यक्ती आपलं मन दुखावते तेव्हा त्याबद्दल कशी प्रतिक्रिया द्यायची हे आपल्या हातात असतं. एक प्रेमळ व्यक्ती क्षमाशील असते. (नीतिसूत्रे १०:१२; १ पेत्र ४:८ वाचा.) एखादी व्यक्ती जेव्हा इतरांनी केलेल्या चुका विसरून जाते तेव्हा यहोवा त्या व्यक्तीची कदर करतो. (नीति. १९:११; उप. ७:९) त्यामुळे पुढच्या वेळी जर कोणाच्या बोलण्यातून किंवा कृतीतून तुमचं मन दुखावलं तर स्वतःला विचारा: ‘मी या चुकीकडे दुर्लक्ष करू शकतो का? ही गोष्ट खरंच इतकी मोठी आहे का की मी तिच्यावर इतका विचार करावा?’

१०. (क) इतरांचं नकारात्मक बोलणं ऐकून एका बहिणीनं सुरवातीला कशी प्रतिक्रिया दाखवली? (ख) बायबलमधील कोणत्या वचनांमुळे तिला आपला आनंद टिकवून ठेवण्यास मदत मिळाली?

१० इतर जण जेव्हा आपल्याबद्दल काही वाईट बोलतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणं कठीण जाऊ शकतं. एका पायनियर बहिणीच्या बाबतीत काय घडलं त्यावर विचार करा. मंडळीतील काही बंधुभगिनी एकदा तिच्या सेवाकार्याबद्दल आणि ती ज्या प्रकारे आपला वेळ घालवते त्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलले. तिला जेव्हा हे कळलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तिनं मंडळीतील काही प्रौढ बांधवांकडे सल्ला मागितला. याचा काय परिणाम झाला? ती सांगते की या बांधवांनी बायबलचा उपयोग करून तिची मदत केली. तिनं इतरांच्या नकारात्मक बोलण्यावर विचार करण्याऐवजी यहोवाबद्दल जास्त विचार करावा असं उत्तेजन त्यांनी तिला दिलं. मत्तय ६:१-४ (वाचा.) ही वचनं वाचून तिला खूप उत्तेजन मिळालं. या वचनांतून तिला जाणीव झाली की यहोवाचं मन आनंदित करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून तिनं इतरांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं. आज तिच्या सेवाकार्याबद्दल इतर जण नकारात्मक बोलले, तरी तिला या गोष्टीची खात्री आहे की यहोवाचं मन आनंदित करण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत आहे. आणि यामुळे ती आनंदी आहे.

चुकांकडे दुर्लक्ष करणं शक्य नसतं तेव्हा

११, १२. (क) एखाद्यानं आपलं मन दुखावलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण काय केलं पाहिजे? (ख) अब्राहामानं ज्या प्रकारे वाद सोडवला त्यातून आपण काय शिकू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

११ “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो.” (याको. ३:२) त्यामुळे, समजा तुम्हाला जाणवलं की तुमच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून तुम्ही एखाद्या बांधवाचं मन दुखावलं आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे? येशूनं म्हटलं होतं की, “तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” (मत्त. ५:२३, २४) तेव्हा, ज्याचं मन दुखावलं गेलं आहे त्या बांधवाशी किंवा बहिणीशी बोला. पण तुमचंच बोलणं खरं आहे किंवा त्यांचं काहीतरी चुकलं आहे, हे सिद्ध करण्याच्या हेतूनं त्यांच्याशी बोलू नका. याउलट स्वतःची चूक कबूल करून पुन्हा एकदा शांतीपूर्ण नातेसंबंध जोडण्याच्या हेतूनं त्यांच्याशी बोला. कारण आपल्या बंधुभगिनींसोबत शांती टिकवून ठेवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

१२ मतभेद होतात तेव्हा देवाच्या सेवकांनी ते कसे सोडवले पाहिजेत याबद्दल बायबल आपल्याला सल्ला देतं. उदाहरणार्थ, अब्राहाम आणि त्याचा पुतण्या लोट यांच्याकडे बरीच जनावरं होती. या जनावरांना चरण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे या दोघांकडे काम करणाऱ्या मेंढपाळांमध्ये वाद होऊ लागले. अब्राहामाला शांती टिकवून ठेवायची होती. त्यामुळे त्यानं लोटाला चांगली जागा निवडण्यासाठी पहिली संधी दिली. (उत्प. १३:१, २, ५-९) खरंच अब्राहामानं आपल्या सर्वांसाठी किती उत्तम उदाहरण मांडलं! पण उदारता दाखवल्यामुळे त्याला कायमचं नुकसान सोसावं लागलं का? मुळीच नाही. उलट या घटनेनंतर लगेच यहोवानं अब्राहामाला अभिवचन दिलं की तो त्याला अनेक आशीर्वाद देईल. त्यानं जे गमावलं त्याच्या तुलनेत हे आशीर्वाद खूप जास्त होते. (उत्प. १३:१४-१७) यावरून आपण काय शिकतो? हेच की काही प्रमाणात आपलं नुकसान झालं, तरी आपण प्रेमाच्या आधारावर वाद सोडवले तर यहोवा आपल्याला नक्कीच आशीर्वादित करेल. [1]

१३. एका पर्यवेक्षकानं दुसऱ्या बांधवाच्या नकारात्मक बोलण्यावर कशी प्रतिक्रिया दाखवली, आणि आपण या अनुभवावरून काय शिकू शकतो?

१३ आजच्या काळातील एका उदाहरणावर विचार करा. अधिवेशनातील एका विभागाचा पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी एका बांधवाला नेमण्यात आलं. त्यानं या विभागात आपल्यासोबत काम करण्यासाठी एका बांधवाला फोन केला. पण फोनवर तो बांधव रागाच्या भरात बऱ्याच नकारात्मक गोष्टी बोलला आणि त्यानं फोन ठेवून दिला. याच विभागात काम करणाऱ्या पूर्वीच्या पर्यवेक्षकाबद्दल त्याच्या मनात अजूनही राग होता. हे सर्व त्या नवीन पर्यवेक्षकानं शांतपणे ऐकून घेतलं. पण तो या गोष्टीकडे दुर्लक्षदेखील करू शकत नव्हता. म्हणून तासाभरानंतर त्यानं पुन्हा त्या बांधवाला फोन केला आणि त्याला भेटण्याची योजना केली. पुढच्या आठवड्यात ते दोघे राज्य सभागृहात भेटले आणि यहोवाला प्रार्थना केल्यावर ते तासभर बोलले. फोनवर रागात बोललेल्या बांधवानं आपलं मन मोकळं केलं, आणि पूर्वीच्या पर्यवेक्षकावर तो का चिडला होता त्याचं कारण सांगितलं. या नवीन पर्यवेक्षकानं शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि काही अनुरूप शास्त्रवचनांवर चर्चा केली. यामुळे त्यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले आणि अधिवेशनात त्यांनी मिळून काम केलं. हा नवीन पर्यवेक्षक त्याच्याशी प्रेमानं आणि सौम्यतेनं वागला म्हणून हा बांधव खूप आभारी आहे.

वडिलांची मदत केव्हा घ्यावी?

१४, १५. (क) मत्तय १८:१५-१७ या वचनांतील सल्ला तुम्ही कोणत्या परिस्थितींमध्ये लागू करू शकता? (ख) येशूनं कोणती तीन पावलं उचलण्यास आपल्याला सांगितलं, आणि त्यामागचा आपला उद्देश काय असला पाहिजे?

१४ बंधुभगिनींमध्ये होणाऱ्या बऱ्याच समस्या ते आपसातच सोडवू शकतात. खरंतर त्यांनी त्या आपसातच सोडवायला हव्यात. पण कधीकधी असं करणं शक्य नसतं. मत्तय १८:१५-१७ (वाचा.) या वचनांनुसार काही परिस्थितींमध्ये इतरांच्या मदतीची गरज पडू शकते. येशूनं या वचनांत “अपराध” असा जो शब्द वापरला तो बांधवांमधील लहानसहान मतभेदांना सूचित करत नव्हता. आपण असं का म्हणू शकतो? कारण येशूनं म्हटलं की पाप करणाऱ्या व्यक्तीसोबत बांधवानं, साक्षीदारांनी आणि जबाबदार बांधवांनी बोलल्यानंतरही जर ती पश्‍चात्ताप दाखवत नसेल, तर मग तिच्यासोबत “परराष्ट्रीय किंवा जकातदार यांच्यासारखा” व्यवहार करावा. आजच्या काळात अशा व्यक्तीला मंडळीतून बहिष्कृत करण्यात येईल. “अपराध” यात कदाचित इतरांची फसवणूक किंवा इतरांचं नाव खराब करण्यासाठी केलेली निंदा यांसारख्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो. पण यात व्यभिचार, समलैंगिकता, धर्मत्याग किंवा मूर्तिपूजा यांसारख्या गंभीर पापांचा समावेश होत नाही. असे पाप करणाऱ्यांशी मंडळीतील वडिलांनीच बोललं पाहिजे.

शांतीपूर्ण नातेसंबंध पुन्हा जोडण्यासाठी बांधवासोबत बऱ्याच वेळा बोलण्याची गरज पडू शकते (परिच्छेद १५ पाहा)

१५ आपल्या बांधवांवर आपलं प्रेम आहे. त्यामुळे त्यांना आपण कशी मदत करू शकतो हे सांगण्यासाठी येशूनं आपल्याला हा सल्ला दिला. (मत्त. १८:१२-१४) आपण या सल्ल्याचं पालन कसं करू शकतो? (१) इतरांना मध्ये न आणता आपण आपसातच मतभेद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या बांधवाने आपलं मन दुखावलं त्याच्याशी कदाचित आपल्याला बऱ्याच वेळा बोलावं लागेल. पण प्रयत्न करूनही समस्या सुटत नसेल तर? (२) आपण आपल्यासोबत एका अशा बांधवाला घेऊन जाऊ शकतो ज्याला घडलेल्या गोष्टी माहीत आहेत किंवा जो समोरच्याचं खरंच काही चुकलं आहे की नाही, हे ओळखून आपल्याला मदत करू शकेल. यामुळे जर समस्या सुटली तर तुम्ही तुमच्या भावाला परत मिळवाल. पण बऱ्याच वेळा त्याच्याशी बोलल्यानंतरही जर तो त्याची चूक मान्य करत नसेल तर? (३) अशा वेळेस तुम्ही मंडळीतील वडिलांना सांगू शकता.

१६. येशूनं सांगितलेली पावलं उचलून समस्या सोडवणं हा परिणामकारक आणि प्रेमळ मार्ग आहे, असं आपण का म्हणू शकतो?

१६ असं पाहण्यात आलं आहे की बऱ्याच वेळा मत्तय १८:१५-१७ या वचनांत सांगितलेली तिन्ही पावलं उचलण्याची सहसा गरज पडत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण बऱ्याच वेळा चूक करणाऱ्या बांधवाला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती सुधारण्यासाठी तो प्रयत्न करतो. यामुळे मग त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्याची गरज पडत नाही. ज्या बांधवाचं मन दुखावलं गेलं तोदेखील शांती टिकवून ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला माफ करतो. येशूच्या सल्ल्यावरून हे अगदी स्पष्टच आहे की एखाद्या बांधवानं आपलं मन दुखावल्यावर आपल्याला लगेच मंडळीतील वडिलांकडे जाण्याची गरज नाही. आपण वडिलांकडे तेव्हाच गेलं पाहिजे जेव्हा येशूनं सांगितलेली पहिली दोन पावलं आपण उचलली असतील आणि समोरचा बांधव खरंच चुकला आहे याचे सबळ पुरावे आपल्याजवळ असतील.

१७. बंधुभगिनींसोबत शांती टिकवून ठेवण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१७ आपण जोपर्यंत अपरिपूर्ण आहोत तोपर्यंत आपण सर्वच कधी ना कधी इतरांचं मन दुखावणार. याकोबानं म्हटलं: “कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यांत ठेवण्यास समर्थ आहे.” (याको. ३:२) मतभेद सोडवण्यासाठी आपण नेहमी “शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न” करत राहिलं पाहिजे. (स्तो. ३४:१४) आपण नेहमी शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर बंधुभगिनींसोबत आपले संबंध मैत्रीपूर्ण राहतील आणि आपल्यात नेहमी एकता टिकून राहील. (स्तो. १३३:१-३) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, “शांतीचा देव” यहोवा याच्यासोबत आपला नातेसंबंध जवळचा राहील. (रोम. १५:३३) पण हे सर्व आशीर्वाद आपल्याला तेव्हाच अनुभवता येतील, जेव्हा आपण प्रेमाच्या आधारावर मतभेद सोडवू.

^ [१] (परिच्छेद १२) पुढील लोकांनीदेखील शांतीपूर्ण पद्धतीनं वाद सोडवले: याकोब आणि एसाव (उत्प. २७:४१-४५; ३३:१-११); योसेफ आणि त्याचे भाऊ (उत्प. ४५:१-१५); गिदोन आणि एफ्राइमी लोक (शास्ते ८:१-३). बायबलमधील इतर उदाहरणांवर देखील तुम्ही विचार करू शकता.