व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सरकारी अधिकाऱ्यांसोबत वागताना ख्रिश्चनांनी त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकाचा वापर केला पाहिजे

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

सरकारी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू किंवा टिप देणं योग्य आहे की नाही, हे ठरवण्यासाठी कोणती गोष्ट ख्रिश्चनांना मदत करू शकते?

यासाठी एका ख्रिस्ती व्यक्तीला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. उदाहरणार्थ, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं प्रामाणिक असलं पाहिजे. तसंच, जोपर्यंत स्थानिक कायदे यहोवाच्या स्तरांविरुद्ध जात नाहीत, तोपर्यंत त्यांचं पालन करण्याची जबाबदारीदेखील तिच्यावर असते. (मत्त. २२:२१; रोम. १३:१, २; इब्री १३:१८) आणखी एक गोष्ट म्हणजे एक ख्रिस्ती व्यक्ती स्थानिक रीतिरिवाजांचा आदर करण्याचा आणि त्याबाबतीत समजूतदारपणा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. आणि यासोबतच, ‘आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती’ करण्याच्या आज्ञेचंदेखील पालन करण्याचा ती प्रयत्न करत असते. (मत्त. २२:३९; रोम. १२:१७, १८; १ थेस्सलनी. ४:११, १२) जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे ख्रिस्ती या तत्त्वांना ज्या प्रकारे लागू करतात, त्याचा त्यांच्या दृष्टिकोनावर परिणाम होत असतो.

बऱ्याच देशांमध्ये, स्थानिक नागरिकाला आपल्या अधिकारात असलेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी, तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतीही रक्कम देण्याची गरज पडत नाही. कारण सरकार या कर्मचाऱ्यांना देत असलेल्या पगाराच्या बदल्यात ते लोकांचं काम करत असतात. तसंच त्यांच्या कामासाठी मिळत असलेल्या पगाराशिवाय ते इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाहीत किंवा इतर कोणतीही गोष्ट स्वीकारत नाहीत. यासोबतच इतर काही देशांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यानं, त्याच्या कामाकरता कोणत्याही मार्गानं रक्कम स्वीकारणं बेकायदेशीर आहे. मग तो करत असलेलं काम अगदी कायदेशीर असलं तरी अशा प्रकारे त्यानं घेतलेली रक्कम बेकायदेशीर ठरते. शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे दिलेल्या रकमेचा कोणताही अपेक्षित परिणाम नसला, तरी ती लाच म्हणूनच गृहीत धरली जाते. ज्या देशात असा कायदा आहे, त्या ठिकाणी एका ख्रिस्ती व्यक्तीनं कर्मचाऱ्यांना भेटवस्तू अथवा टिप देणं मुळातच अयोग्य असेल.

पण, काही देशांमध्ये याबाबतीत विशिष्ट कायदे-नियम नाहीत किंवा असे नियम असले तरी ते कडकपणे पाळले जात नाहीत. त्यामुळे अशा देशांमधील कर्मचाऱ्यांना भेट किंवा टिप म्हणून पैसे घेण्यात काहीच गैर वाटत नाही. याउलट, काही देशांमध्ये सरकारी अधिकारी त्यांच्या हुद्द्‌याचा गैरफायदा घेऊन, लोकांकडून पैसे लुबाडण्याचा किंवा या ना त्या मार्गानं त्यांच्याकडून फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर मोबदला मिळाल्याशिवाय ते काम करण्यासही तयार होत नाहीत. उदाहरणार्थ, विवाहाची नोंदणी करताना, कराची योग्य रक्कम भरताना आणि बांधकामाचा परवाना मंजूर करून घेताना काही अधिकारी ठरावीक रकमेची मागणी करतात. आणि जेव्हा अशी रक्कम मिळण्याची शक्यता कमी असते, तेव्हा हे अधिकारी आपल्या कामात मुद्दाम टंगळमंगळ करण्याचा किंवा काही ना काही अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. एका देशामध्ये तर असंही पाहण्यात आलं आहे, की आणीबाणीच्या परिस्थितीत जबाबदार असलेले अग्निशामक दलाचे कर्मचारीदेखील पैसे घेतल्याशिवाय आग विझवण्यास तयार होत नाहीत.

आपल्या अधिकारात असणाऱ्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी छोटी भेट देणं काही परिस्थितीत चुकीचं ठरणार नाही

वर सांगण्यात आलेली परिस्थिती बऱ्याच ठिकाणी अगदी सामान्य बनली आहे. त्यामुळे काही वेळा टिप देण्याचं टाळणं अशक्य आहे, असं काही जणांना वाटतं. अशा परिस्थितीत एक ख्रिस्ती व्यक्ती अशा रकमेला एखादी शासकीय सेवा प्राप्त करण्यासाठी दिली जाणारी अतिरिक्त किंमत म्हणून पाहू शकते. पण भ्रष्टाचार अगदी सर्रासपणे चालतो, अशा ठिकाणी एका ख्रिस्ती व्यक्तीनं खूप सावध असलं पाहिजे. कारण अशा वेळी देवाच्या दृष्टिकोनात योग्य आणि अयोग्य असणाऱ्या गोष्टींना वेगळं करणारी रेष अगदी पुसट होऊन जाते. ज्यावर आपला अधिकार आहे, अशी एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता टिप देणं आणि एखादी बेकायदेशीर गोष्ट मिळवण्याकरता टिप देणं यात नक्कीच फरक आहे. भ्रष्टाचारानं फोफावलेल्या या जगात काही जण, ज्यावर आपला अधिकार नाही अशी एखादी गोष्ट मिळवण्याकरता अधिकाऱ्यांना टिप देतात किंवा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे होणारा दंड चुकवण्यासाठी ते पोलिसांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना “टिप” देतात. ज्या प्रकारे अयोग्यपणे “टिप” घेऊन भ्रष्टाचाराला दुजोरा देणं चुकीचं आहे, अगदी त्याच प्रकारे एखाद्याला अयोग्य गोष्टींसाठी “टिप” देऊन भ्रष्ट करणंदेखील चुकीचं आहे. या दोन्ही गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनात नक्कीच चुकीच्या आहेत.—निर्ग. २३:८; अनु. १६:१९; नीति. १७:२३.

आपल्या बऱ्याच प्रौढ ख्रिस्ती बंधुभगिनींना, त्यांच्या बायबल प्रशिक्षित विवेकामुळे अशा अतिरिक्त रकमेची मागणी करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना टिप देणं योग्य वाटत नाही. कारण असं केल्यामुळे ते भ्रष्टाचाराला सूट देत आहेत किंवा भ्रष्टाचाराचं समर्थन करत आहेत असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना अशी भेट किंवा टिप देण्याचं नाकारतात.

अयोग्यपणे एखाद्याची मर्जी प्राप्त करण्यासाठी भेट किंवा टिप देणं एखाद्याला लाच देण्यासारखंच असू शकतं, याची प्रौढ ख्रिश्चनांना जाणीव असते. पण शासकीय तरतुदींचा लाभ मिळावा किंवा कामकाजात विनाकारण विलंब होऊ नये म्हणून काही ख्रिस्ती स्थानिक परिस्थितीनुसार समंजसपणा दाखवतात आणि मिळणाऱ्या सहकार्याची कदर व्यक्त करण्याकरता काही रक्कम भेट म्हणून देतात. काही वेळा ख्रिस्ती सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या मोफत वैद्यकिय उपचारासाठी तिथल्या डॉक्टरांना आणि नर्सेसना आपली कदर व्यक्त करण्यासाठी भेट देतात. शिवाय, उपचाराकरता काहीतरी सवलत मिळावी किंवा कोणाची तरी पसंती मिळावी म्हणून लाच दिली जात आहे, असा गैरसमज टाळण्याकरता अशा भेटी ते उपचाराआधी देण्याऐवजी उपचारानंतर देतात.

याठिकाणी वेगवेगळ्या देशांतल्या प्रत्येक परिस्थितीला लक्षात घेणं शक्य नसलं, तरी निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं असा निर्णय घेतला पाहिजे ज्यामुळे तिला शुद्ध विवेक बाळगता येईल. (रोम. १४:१-६) कायद्याचं उल्लंघन होईल अशा कोणत्याही गोष्टींपासून तिनं लांब राहिलं पाहिजे. (रोम. १३:१-७) यासोबतच, यहोवाच्या नावाला कलंक लागेल किंवा इतर बंधुभगिनींचा विश्वास कमकुवत होईल अशी कोणतीही गोष्ट करण्याचं तिनं टाळलं पाहिजे. (मत्त. ६:९; १ करिंथ. १०:३२) शिवाय, ती जो निर्णय घेईल, त्याद्वारे शेजाऱ्यावरील तिचं प्रेम दिसून आलं पाहिजे.—मार्क १२:३१.

बहिष्कृत झालेल्या व्यक्तीला मंडळीत पुन्हा घेतलं जातं तेव्हा मंडळीतील इतर जण त्यांचा आनंद कसा व्यक्त करू शकतात?

लूक याच्या १५ व्या अध्यायात आपल्याला येशूनं दिलेल्या एका प्रभावशाली दाखल्याबद्दल वाचायला मिळतं. या दाखल्यात अशा एका माणसाबद्दल सांगण्यात आलं आहे ज्याच्याजवळ १०० मेंढरं असतात. जेव्हा त्यांपैकी एक मेंढरू हरवतं तेव्हा तो आपल्या ९९ मेंढरांना रानात सोडून ‘ते हरवलेलं मेंढरू सापडेपर्यंत’ त्याचा शोध घेतो. येशूनं पुढं म्हटलं, की “ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो; आणि घरी येऊन मित्रांस व शेजाऱ्यांस एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.” या दाखल्याच्या शेवटी येशूनं म्हटलं: “ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्‍चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.”—लूक १५:४-७.

या दाखल्याचा मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेतल्यास आपल्याला हे दिसून येतं की, या ठिकाणी येशू परूशी आणि शास्त्री लोकांशी बोलत होता. जकाददारांसोबत आणि पापी लोकांसोबत येशूची मैत्री असल्यामुळे ते त्याची टीका करायचे. खरंतर, या दाखल्याद्वारे येशू त्यांच्या या चुकीच्या विचारसरणीला सुधारण्याचा प्रयत्न करत होता. (लूक १५:१-३) येशूनं या गोष्टीवर जोर दिला, की एक पापी व्यक्ती जेव्हा पश्‍चात्ताप करते तेव्हा तिच्याबद्दल स्वर्गात आनंद केला जातो. तर मग प्रश्न येतो, की ‘जर एका पश्‍चात्तापी व्यक्तीसाठी स्वर्गात आनंद केला जातो, तर मग जेव्हा एक पापी व्यक्ती पश्‍चात्ताप करून योग्य मार्गावर पुन्हा चालू लागते, तेव्हा पृथ्वीवरही तिच्याबद्दल आनंद व्यक्त का करू नये?’—इब्री १२:१३.

बहिष्कृत झालेल्या व्यक्तीला मंडळीत परत घेतलं जातं, तेव्हा तिच्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे सबळ कारण आहे. हे खरं आहे की त्या व्यक्तीला आपली एकनिष्ठता टिकवून ठेवावी लागेल. पण, ज्या अर्थी त्याला मंडळीत परत घेण्यात आलं आहे त्याअर्थी त्यानं खरा पश्‍चात्ताप दाखवला आहे. आणि या कारणामुळे आपल्याला मनापासून आनंद होतो. तर मग, बहिष्कृत व्यक्तीला पुन्हा मंडळीत घेण्यात आल्याची घोषणा केली जाते, तेव्हा टाळ्या वाजवून तिच्याबद्दल आनंद व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही.

यरुशलेममधील बेथेस्दा तळ्यातील पाणी कशामुळे ‘उसळायचं’?

येशूच्या काळात येरुशलेममध्ये राहणाऱ्या काही लोकांची अशी धारणा होती, की बेथेस्दा तळ्यातील पाणी ‘उसळताना’ एखादा रोगी त्यात गेला तर त्याचे रोग चमत्कारिक रीत्या बरे होतील. (योहा. ५:१-७) याच कारणामुळे, बरे होण्याची आशा घेऊन अनेक रोगी त्या तळ्याभोवती जमायचे.

बेथेस्दा तळ्यातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी, त्यालाच लागून असलेल्या दुसऱ्या एका तळ्यातून त्यात पाणी सोडलं जायचं. या भागात अधिक संशोधन केल्यानंतर असं पाहण्यात आलं आहे, की या दोन्ही तळ्यांना दुभागणारा एक दगडी बंधारा आहे. आणि या बंधाऱ्याच्या आत, पाणी पहिल्या तळ्यातून बेथेस्दा तळ्याच्या अगदी तळाशी वाहून नेण्यासाठी एक बोगदा आहे. या बोगद्याला असलेला दरवाजा उघडून पाणी बेथेस्दा तळ्याच्या अगदी तळाशी सोडलं जायचं. पाण्याच्या या जोरदार प्रवाहामुळे साहजिकच तळ्यातलं पाणी उसळायचं.

योहान ५:४ यात म्हटलं आहे की एक देवदूत तळ्याचं पाणी हलवायचा. पण, खरंतर प्राचीन ग्रीक हस्तलिखितांमध्ये, जसं की चौथ्या शतकातील कोडेक्स सायनायटिकस यात अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, बेथेस्दा इथं येशूनं केलेल्या एका चमत्काराबद्दल आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. या तळ्याजवळ त्यानं ३८ वर्षांपासून आजारी असलेल्या एका माणसाला काही क्षणातच बरं केलं. तळ्यात न जाता हा माणूस बरा झाला.