व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवानं केलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींतून पुरेपूर लाभ मिळवा

यहोवानं केलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींतून पुरेपूर लाभ मिळवा

“तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो.”—यश. ४८:१७.

गीत क्रमांक: २०, ३७

१, २. (क) बायबलबद्दल यहोवाच्या साक्षीदारांच्या काय भावना आहेत? (ख) बायबलचा कोणता भाग तुम्हाला जास्त आवडतो?

यहोवाचे साक्षीदार या नात्यानं आपल्यापैकी प्रत्येकाला बायबल खूप प्रिय आहे. त्यातून आपल्याला सांत्वन आणि आशा मिळते. शिवाय, आपल्याला भरवशालायक मार्गदर्शनसुद्धा मिळतं. (रोम. १५:४) बायबल हे मानवी विचारांचं पुस्तक नसून “देवाचे वचन” आहे.—१ थेस्सलनी. २:१३.

सहसा असं पाहायला मिळतं, की प्रत्येकालाच बायबलचा कोणता ना कोणता भाग किंवा अहवाल आवडत असतो. काहींना शुभवर्तमानांची पुस्तकं वाचायला आवडतात. कारण, त्यात येशूबद्दल दिलेल्या माहितीमुळे यहोवाच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळते. (योहा. १४:९) काहींना प्रकटीकरण यासारख्या भविष्यवाण्यांच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडतं. अशा पुस्तकांतून “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या” समजण्यास मदत होते. (प्रकटी. १:१) काहींना स्तोत्रसंहिता वाचल्यामुळे सांत्वन मिळतं, तर काहींना नीतिसूत्रे यात दिलेल्या उपयुक्त सल्ल्यांतून फायदा मिळतो. यावरून हे स्पष्ट होतं की बायबल हे सर्व लोकांसाठी असलेलं एक पुस्तक आहे.

३, ४. (क) आपल्या प्रकाशनांबद्दल आपल्याला कसं वाटतं? (ख) विशिष्ट लोकांसाठी कोणत्या प्रकारची प्रकाशनं तयार केली जातात?

आपली सर्व प्रकाशनं बायबलवर आधारित असतात. आणि बायबल आपल्याला प्रिय असल्यामुळे ही प्रकाशनंदेखील आपल्याला प्रिय वाटतात. आपल्याला मिळणारी सर्व पुस्तकं, माहितीपत्रकं, नियतकालिकं आणि इतर प्रकाशनं ही यहोवानं केलेली एक आध्यात्मिक तरतूद आहे. यहोवानं केलेल्या या तरतुदीमुळे आपल्याला त्याच्या जवळ जाण्यास आणि आपला विश्वास आणखी मजबूत करण्यास मदत होते.—तीत २:२.

आपली बरीच प्रकाशनं यहोवाच्या साक्षीदारांसाठी लिहिलेली असतात. पण, यांपैकी काही प्रकाशनं विशिष्ट लोकांसाठी, जसं की तरुणांसाठी किंवा पालकांसाठी लिहिण्यात येतात. आपल्या वेबसाईटवरील बहुतेक लेख आणि व्हिडिओ खासकरून यहोवाचे साक्षीदार नसलेल्या लोकांसाठी तयार करण्यात येतात. आपल्याला मिळत असलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीवरून काय दिसून येतं? हेच की यहोवानं मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन पुरवण्याचं जे अभिवचन आपल्याला दिलं होतं, ते तो आज पूर्ण करत आहे.—यश. २५:६.

५. आपण कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो?

बायबल आणि इतर सर्व प्रकाशनं वाचण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा वेळ अपुरा पडतो. ही प्रकाशनं वाचण्यासाठी आणखी जास्त वेळ मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं. आपण जेव्हा वेळेचा सुज्ञपणे वापर करून या प्रकाशनांचं वाचन आणि अभ्यास करतो, तेव्हा आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो की यहोवाला यामुळे नक्कीच आनंद होतो. (इफिस. ५:१५, १६) सहसा असं होतं की आपण प्रत्येक प्रकाशनाचा अभ्यास करण्यासाठी सारखाच वेळ खर्च करत नाही. पण, यामध्ये एक धोका आहे जो आपण टाळला पाहिजे. तो धोका कोणता आहे?

६. कोणत्या कारणामुळे यहोवानं केलेल्या काही तरतुदींचा फायदा मिळवण्यास आपण चुकू?

आपण जर सावध राहिलो नाही, तर कदाचित आपल्याला वाटेल की बायबलमधील काही विशिष्ट भाग किंवा काही प्रकाशनं आपल्यासाठी नाहीत. उदाहरणार्थ, बायबलमधील एखादा भाग आपल्या परिस्थितीला अनुरूप नाही असं आपल्याला वाटत असेल तेव्हा काय? किंवा, मग एखादं प्रकाशन अशा लोकांसाठी लिहिण्यात आलेलं असेल ज्यामध्ये आपला समावेश होत नाही, तेव्हा काय? अशा प्रकारची माहिती आपण फक्त वरवर वाचतो का, किंवा मग ती वाचण्याचंच टाळतो? आपण जर असं केलं तर त्या प्रकाशनांतील मौल्यवान माहितीचा आपण फायदा घेऊ शकणार नाही. मग, आपण हा धोका कसा टाळू शकतो? आपल्याला मिळत असलेली माहिती ही यहोवाकडून आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बायबल म्हणतं: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो.” (यश. ४८:१७) या लेखात आपण अशा तीन मार्गांचं परीक्षण करणार आहोत ज्यांमुळे यहोवा करत असलेल्या सर्व आध्यात्मिक तरतुदींचा फायदा उचलण्यास आपल्याला मदत होईल.

बायबल अभ्यासातून फायदा मिळवण्यासाठी काही उपयुक्त सल्ले

७. आपण पूर्वग्रह न बाळगता बायबलचं वाचन का केलं पाहिजे?

पूर्वग्रह न बाळगता वाचन करा. हे खरं आहे की बायबलमधील काही भाग विशिष्ट व्यक्तीला किंवा लोकांच्या विशिष्ट गटाला उद्देशून लिहिण्यात आले होते. असं असलं, तरी बायबल स्पष्टपणे म्हणतं की प्रत्येक शास्त्रवचन “परमेश्वरप्रेरित” आणि उपयोगी आहे. (२ तीम. ३:१६) याच कारणामुळे बायबलच्या एखाद्या भागाचं वाचन करताना कोणताही पूर्वग्रह बाळगणं चुकीचं ठरेल. म्हणजेच असा विचार करणं की एखादा भाग आपल्याला लागू होत नाही किंवा आपल्याला त्यातून शिकण्यासारखं काहीच नाही. एका बांधवाचं उदाहरण घ्या. तो हे नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो की एकाच अहवालातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळू शकतं. यामुळे, जे लगेच लक्षात येत नाहीत असे मुद्देदेखील समजून घेण्यास त्याला मदत होते. आपणदेखील बायबल वाचण्याआधी यहोवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. तसंच, यहोवा आपल्याला जे शिकवू इच्छितो ते कोणताही पूर्वग्रह न बाळगता समजून घेता यावं म्हणून आपण त्याच्याकडे मदत मागितली पाहिजे.—एज्रा ७:१०; याकोब १:५ वाचा.

बायबल वाचनातून पुरेपूर फायदा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? (परिच्छेद ७ पाहा)

८, ९. (क) बायबल वाचन करताना आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो? (ख) मंडळीतील वडिलांकरता बायबलमध्ये दिलेल्या पात्रतेवरून आपल्याला यहोवाबद्दल काय समजतं?

प्रश्न विचारा. तुम्ही जेव्हा बायबल वाचता तेव्हा थोडं थांबून स्वतःला विचारा: ‘यावरून यहोवाबद्दल मला काय शिकायला मिळतं? या माहितीचा मी माझ्या जीवनात कसा उपयोग करू शकतो? इतरांना मदत करण्यासाठी मी या माहितीचा वापर कसा करू शकतो?’ या प्रश्नांवर मनन केल्यास बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवणं आपल्याला शक्य होईल. आपण एका उदाहरणावर लक्ष देऊ या. ख्रिस्ती वडिलांसाठी बायबलमध्ये काही पात्रता देण्यात आल्या आहेत. (१ तीमथ्य ३:२-७ वाचा.) पण, आपल्यापैकी बरेच जण मंडळीत वडील नाहीत. यामुळे कदाचित आपण असा विचार करू, की ही माहिती आपल्याला कोणत्याही प्रकारे उपयोगी ठरणार नाही. पण, वर उल्लेखण्यात आलेल्या तीन प्रश्नांचा वापर करून बायबलच्या या भागातून सर्वांनाच कसा फायदा होऊ शकतो हे आता आपण पाहू या.

यावरून यहोवाबद्दल मला काय शिकायला मिळतं? मंडळीत वडील बनण्याकरता कोणत्या पात्रतेची गरज आहे, याबद्दल यहोवानं आपल्याला सांगितलं आहे. मंडळीची काळजी घेण्यासाठी तो अशाच बांधवांची निवड करतो जे त्याचे उच्च नैतिक दर्जे राखतात. यावरून दिसून येतं की यहोवाचं मंडळीवर खूप प्रेम आहे. बायबल म्हणतं की “आपल्या मुलाच्या रक्ताने” त्यानं ती विकत घेतली आहे. (प्रे. कृत्ये २०:२८, NW) त्यामुळे, यहोवा वडिलांकडून अपेक्षा करतो की त्यांनी मंडळीपुढे चांगलं उदाहरण मांडावं. तसंच, वडील ज्या प्रकारे मंडळीतील लोकांशी व्यवहार करतात त्याबद्दल त्यांना यहोवाला जाब द्यावा लागेल. वडिलांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सुरक्षित वाटावं अशी यहोवाची इच्छा आहे. (यश. ३२:१, २) तर मग, आपण जेव्हा वडिलांकरता असलेल्या या पात्रतांविषयी वाचतो तेव्हा यहोवाला आपली खरंच खूप काळजी आहे हेच दिसून येत नाही का?

१०, ११. (क) वडिलांसाठी दिलेल्या पात्रतांचा आपण आपल्या जीवनात कसा उपयोग करू शकतो? (ख) इतरांना मदत करण्यासाठी या माहितीचा आपण कसा वापर करू शकतो?

१० या माहितीचा मी माझ्या जीवनात कसा उपयोग करू शकतो? जर तुम्ही एक बांधव आहात आणि मंडळीत वडील म्हणून सेवा करण्याची तुमची इच्छा असेल, तर या पात्रता पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा. (१ तीम. ३:१) पण, समजा तुम्ही आधीपासूनच मंडळीत वडील म्हणून सेवा करत असाल तर काय? असं असलं तरी तुम्ही या पात्रतांवर नेहमी मनन करू शकता आणि स्वतःमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकता. खरं पाहता ख्रिस्ती या नात्यानं आपण सर्वच या पात्रतांवरून शिकू शकतो. उदाहरणार्थ, यहोवा अशी अपेक्षा करतो की आपण समंजस असलं पाहिजे आणि मर्यादेनं राहिलं पाहिजे. (नीति. २४:३; १ पेत्र ४:७) वडील जेव्हा मंडळीपुढे एक चांगलं उदाहरण मांडतात, तेव्हा आपण त्यांच्याकडून बरंच काही शिकू शकतो आणि “त्यांच्या विश्वासाचे अनुकरण” करू शकतो.—१ पेत्र ५:३; इब्री १३:७.

११ इतरांना मदत करण्यासाठी मी या माहितीचा वापर कसा करू शकतो? या पात्रतांविषयी बायबलमध्ये जे सांगण्यात आलं आहे त्याचा वापर करून, इतर धार्मिक पुढाऱ्यांपेक्षा ख्रिस्ती वडील कशा प्रकारे वेगळे आहेत हे आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला आणि इतर आस्थेवाईक लोकांना समजण्यास मदत करू शकतो. तसंच, या माहितीमुळे मंडळीत वडील जे परिश्रम घेतात त्याचीदेखील आपल्याला जाणीव होते आणि त्यांचा आदर करण्यास आपण प्रवृत्त होतो. (१ थेस्सलनी. ५:१२) आपण त्यांची मनापासून कदर केल्यास आनंदानं सेवा करत राहण्याचं उत्तेजन त्यांना मिळेल.—इब्री १३:१७.

१२, १३. (क) आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आपण कशा प्रकारे संशोधन करू शकतो? (ख) संशोधन केल्यास जे मुद्दे लगेच लक्षात येत नाहीत ते समजण्यास आपल्याला कशी मदत होते, हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१२ संशोधन करा. बायबलचा अभ्यास करताना आपण पुढील प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो:

  • बायबलचा हा भाग कोणी लिहिला?

  • हा भाग कुठे आणि केव्हा लिहिण्यात आला?

  • बायबलमधील हे पुस्तक लिहिलं जात असताना कोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या?

अशा प्रकारच्या माहितीमुळे सहज लक्षात येत नाहीत असे मुद्देदेखील समजण्यास आपल्याला मदत होईल.

१३ उदाहरणार्थ, यहेज्केल १४:१३, १४ यात सांगितलं आहे: “एखाद्या देशाने विश्वासघात करून मजविरुद्ध पातक केल्यास मी त्यावर आपला हात चालवेन, त्याच्या अन्नाचा आधार तोडेन, देशात दुष्काळ पाडेन, आणि त्यातून मनुष्य व पशू यांचा उच्छेद करेन; तेव्हा त्यात नोहा, दानीएल व ईयोब हे तिघे असले तरी फार झाले; ते आपल्या धार्मिकतेमुळे आपला तेवढा जीव बचावतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो.” थोडं संशोधन केल्यास आपल्याला हे दिसून येतं की यहेज्केलनं हे पुस्तक इ.स.पू ६१२ मध्ये लिहिलं होतं. हे पुस्तक लिहिण्याच्या शेकडो वर्षांआधीच नोहा आणि ईयोब यांचा मृत्यू झाला होता. पण, यहोवाला आताही त्यांच्या विश्वासूपणाची आठवण होती. हे पुस्तक लिहिलं जात असताना दानीएल जिवंत होता. यहोवानं जेव्हा म्हटलं की तो नोहा आणि ईयोब यांच्याप्रमाणे नीतिमान आहे, तेव्हा तो कदाचित २० वर्षांचा असावा. यावरून आपण काय शिकतो? हेच की यहोवा आपल्या प्रत्येक विश्वासू सेवकावर लक्ष देतो आणि त्यांची कदर करतो, अगदी तरुणांचीसुद्धा.—स्तो. १४८:१२-१४.

वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशनांतून लाभ मिळवा

१४. तरुणांसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीचा त्यांना आणि इतरांनाही कसा फायदा होतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१४ तरुणांसाठी असलेली प्रकाशनं. आपण हे पाहिलं की बायबलच्या प्रत्येक भागातून आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याच प्रकारे, आपल्या सर्वच प्रकाशनांतून आपल्याला फायदा होतो. काही उदाहरणांकडे लक्ष द्या. अलीकडील वर्षांत तरुणांसाठी बरीच माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. [1] या माहितीमुळे त्यांना शाळेत येणाऱ्या दबावांचा आणि मोठे होत असताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यास मदत होते. पण जे तरुण नाहीत अशांनाही या लेखांचा किंवा पुस्तकांचा काही फायदा होऊ शकतो का? हो नक्कीच. आपण जेव्हा ही माहिती वाचतो तेव्हा तरुणांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे समजण्यास आपल्याला मदत होते. यामुळे, त्यांना मदत करणं आणि प्रोत्साहन देणं आपल्याला शक्य होतं.

१५. मोठ्यांनीही तरुणांसाठी असलेल्या माहितीचं परीक्षण करणं गरजेचं का आहे?

१५ तरुणांसाठी असलेली प्रकाशनं आपल्यासाठी नाहीत असा विचार मोठ्यांनी करू नये. कारण, यांत चर्चा करण्यात येणाऱ्या बहुतेक समस्यांचा सर्वच ख्रिश्चनांना सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, सर्वच ख्रिश्चनांना आपल्या विश्वासाचं समर्थन करावं लागतं, भावनांवर नियंत्रण ठेवावं लागतं, सोबत्यांच्या दबावाचा सामना करावा लागतो आणि योग्य संगत व मनोरंजन निवडण्यासाठी सावध राहावं लागतं. तेव्हा, ही प्रकाशनं जरी तरुणांसाठी लिहिण्यात आली असली तरी त्यांतील माहिती बायबलवर आधारित असते आणि तिचा सर्वच ख्रिश्चनांना फायदा होतो.

१६. आपल्या प्रकाशनांमुळे तरुणांना आणखी काय करण्यास मदत होते?

१६ तरुणांना त्यांच्यासाठी असलेल्या प्रकाशनांमुळे यहोवासोबतची त्यांची मैत्री आणखी घनिष्ट करण्यासही मदत होते. (उपदेशक १२:१, १३ वाचा.) या माहितीमुळे मोठ्यांनाही फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, जुलै २००९ च्या सजग होइए! यात “नौजवान पूछते हैं . . . मैं अपनी बाइबल पढ़ाई मज़ेदार कैसे बनाऊँ?” हा लेख प्रकाशित करण्यात आला होता. यात बरेच उपयुक्त सल्ले देण्यात आले होते. शिवाय कात्रण कापून स्वतःकडे ठेवता येईल आणि अभ्यास करताना वापर करता येईल अशी एक चौकटदेखील यात देण्यात आली होती. मग, या लेखातून मोठ्यांनाही फायदा झाला का? एक आई म्हणते की बायबल वाचन करणं तिला नेहमीच कठीण गेलं आहे. पण, या लेखातील सल्ल्यांचा वापर केल्यामुळे आता तिला बायबल वाचन करण्यात खूप आनंद मिळतो. बायबलमधील वेगवेगळ्या पुस्तकांचा एकमेकांशी कसा संबंध आहे आणि त्यातून बायबलचा मुख्य विषय कसा दिसून येतो, हे पाहणं तिला शक्य झालं. ती म्हणते: “आता मी पूर्वी कधी नव्हे इतक्या उत्सुकतेनं बायबल वाचते.”

१७, १८. साक्षीदार नसलेल्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या माहितीमुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१७ साक्षीदार नसलेल्यांसाठी प्रकाशनं. २००८ पासून टेहळणी बुरूजची अभ्यास आवृत्ती तयार करण्यास सुरवात झाली. ही आवृत्ती खासकरून यहोवाच्या साक्षीदारांसाठी तयार करण्यात येते. पण, त्यासोबतच जे साक्षीदार नाहीत त्यांच्यासाठीही मासिकं तयार करण्यात येतात. या मासिकांतून देखील आपण कसा फायदा मिळवू शकतो? हे समजण्यासाठी एका उदाहरणाकडे लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीला सभेचं आमंत्रण दिल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती सभेला येते तेव्हा तुम्हाला नक्कीच खूप आनंद होतो. भाषण सुरू असताना तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करता. ती जे ऐकत आहे त्याबद्दल तिला कसं वाटत असेल आणि त्या माहितीचा तिच्या जीवनावर कसा प्रभाव पडेल याचा तुम्ही विचार करता. असा विचार करताना एका अर्थानं तुम्ही स्वतःला त्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवून भाषण ऐकत असता. याचा परिणाम असा होतो की त्या विषयाबद्दलची तुमची कदर आणखी वाढते.

१८ साक्षीदार नसलेल्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या मासिकांचं वाचन केल्यासही आपल्याला असंच वाटेल. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूजच्या सार्वजनिक आवृत्तीत आणि jw.org या आपल्या वेबसाईटवर साध्या सोप्या शब्दांत बायबलचं स्पष्टीकरण दिलं जातं. आपण जेव्हा ही माहिती वाचतो, तेव्हा बायबलमधील सत्यांबद्दलची आपली समज आणखी वाढते आणि ते आपल्याला आणखी प्रिय वाटू लागतात. तसंच, सेवाकार्यात आपल्या विश्वासाबद्दल वेगवेगळ्या मार्गांनी कसं सांगता येईल, हेदेखील आपल्याला शिकायला मिळतं. त्याच प्रकारे सावध राहा! या मासिकामुळे निर्माणकर्त्यावरील आपला विश्वास आणखी वाढतो. तसंच, आपल्या विश्वासाचं समर्थन करण्यासही आपल्याला मदत होते.—१ पेत्र ३:१५ वाचा.

१९. यहोवा आपल्यासाठी करत असलेल्या आध्यात्मिक तरतुदींची आपल्याला कदर असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

१९ हे स्पष्टच आहे की यहोवानं आपल्या फायद्यासाठी भरपूर प्रमाणावर मार्गदर्शन आणि सल्ले पुरवले आहेत. (मत्त. ५:६) त्यानं आपल्याला जी माहिती पुरवली आहे त्या सर्व माहितीतून फायदा मिळवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करू या. असं करण्याद्वारे यहोवा करत असलेल्या आध्यात्मिक तरतुदींची आपण कदर करतो हे दिसून येईल.—यश. ४८:१७.

^ [१] (परिच्छेद १४) या माहितीत यंग पीपल आस्क—अॅन्सर्स दॅट वर्क, वॉल्यूम १ आणि , तसंच “यंग पीपल आस्क” या ऑनलाइन लेखमालेचाही समावेश होतो.