व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल तुमच्या जीवनात आजही कार्य करत आहे का?

बायबल तुमच्या जीवनात आजही कार्य करत आहे का?

“आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोम. १२:२.

गीत क्रमांक: २९, ५२

१-३. (क) बाप्तिस्मा झाल्यानंतरही कोणते बदल करणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं? (ख) आपल्या कमतरतांबद्दल आपल्या मनात कोणते प्रश्न येऊ शकतात? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

केविनला बऱ्याच वर्षांपासून जुगार खेळण्याची, सिगारेट ओढण्याची, दारू आणि ड्रग्स घेण्याची सवय जडली होती. [1] पण जेव्हा तो यहोवाविषयी शिकू लागला तेव्हा त्याच्याशी एक जवळचा नातेसंबंध जोडावा असं त्याला वाटू लागलं. असं करण्यासाठी त्याला जीवनात बरेच मोठमोठे बदल करावे लागणार होते. यहोवाच्या आणि त्याच्या वचनाच्या मदतीनं केविन आपल्या जीवनात बदल करू शकला.—इब्री ४:१२.

केविनचा बाप्तिस्मा झाल्यानंतरही त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल करत राहण्याची गरज होती. एक प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी हे गरजेचं होतं. (इफिस. ४:३१, ३२) उदाहरणार्थ, त्याला लगेच राग यायचा. रागावर नियंत्रण मिळवणं किती कठीण आहे हे जेव्हा त्याला जाणवलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. केविन म्हणतो की रागावर नियंत्रण करणं, बाप्तिस्मा घेण्याआधी त्याला असलेल्या वाईट सवयींवर मात करण्यापेक्षाही कठीण होतं. पण यहोवाला याचना केल्यामुळे आणि बायबलचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल करणं शक्य झालं.

बाप्तिस्मा घेण्याआधी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जीवनात अनेक मोठे बदल केले आहेत. कारण बायबलच्या स्तरांनुसार जीवन जगण्यासाठी हे गरजेचं होतं. पण यहोवाचं आणि ख्रिस्ताचं जवळून अनुकरण करण्यासाठी आपल्याला आजही आपल्या जीवनात काही लहानसहान बदल करत राहण्याची गरज आहे. (इफिस. ५:१, २; १ पेत्र २:२१) उदाहरणार्थ, कदाचित आपल्याला जाणवेल की आपण इतरांविरुद्ध कुरकुर करतो किंवा मग इतरांच्या खासगी जीवनाबद्दल बोलतो आणि कधीकधी तर त्यांच्याबद्दल वाईटसुद्धा बोलतो. किंवा मग, इतर जण काय विचार करतील, काय बोलतील या भीतीनं आपण योग्य ते पाऊल उचलत नाही. या बाबतीत सुधारणा करण्याचा बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करूनही आपल्याला पाहिजे तसं यश मिळालं नसेल. यामुळे आपल्या मनात कदाचित असे प्रश्न येतील: ‘हे छोटे बदल करणं मला इतकं कठीण का जातं? बायबलचा सल्ला लागू करून माझ्या व्यक्तिमत्त्वात बदल करत राहणं मला कसं शक्य होईल?’

तुम्ही यहोवाचं मन आनंदित करू शकता

४. आपल्याला प्रत्येक प्रसंगी यहोवाचं मन आनंदित करणं शक्य का होत नाही?

आपल्या सर्वांचंच यहोवावर खूप प्रेम आहे आणि त्याला खूश करण्याची आपली मनापासून इच्छा आहे. पण आपण अपरिपूर्ण असल्यामुळे प्रत्येक प्रसंगी यहोवाला खूश करणं आपल्याला जमत नाही. आपल्यालाही बऱ्याच वेळा पौलासारखं वाटतं. त्यानं लिहिलं: “इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.”रोम. ७:१८; याको. ३:२.

५. बाप्तिस्मा घेण्याआधी आपण कोणत्या वाईट गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत, पण कोणत्या कमतरता आपल्यामध्ये आजही असू शकतात?

मंडळीचा भाग बनण्याआधी, यहोवा ज्या गोष्टींचा तिरस्कार करतो त्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागल्या होत्या. (१ करिंथ. ६:९, १०) पण आपण अपरिपूर्ण आहोत. (कलस्सै. ३:९, १०) त्यामुळे बाप्तिस्मा होऊन बरीच वर्षं झाली असली, तरी आजही आपल्या हातून चुका होतात. कधीकधी आपल्या मनात चुकीच्या भावना आणि इच्छा येऊ शकतात, किंवा मग आपल्या व्यक्तिमत्त्वातील एखाद्या कमतरतेवर मात करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. काही वेळा तर आपल्याला या कमतरतांशी बरीच वर्षं झगडावं लागू शकतं.

६, ७. (क) अपरिपूर्ण असूनही यहोवासोबत मैत्री करणं आपल्याला कशामुळे शक्य आहे? (ख) खंडणी बलिदानाच्या तरतुदीचा फायदा मिळवण्यास आपण का कचरू नये?

आपण अपरिपूर्ण असलो तरीही आपण यहोवासोबत मैत्री करू शकतो आणि त्याची सेवा करू शकतो. आपण यहोवाचे मित्र कसे बनलो या गोष्टीची नेहमी आठवण असू द्या. यहोवानं आपल्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पाहिल्या आणि आपण त्याची ओळख करून घ्यावी अशी त्याची इच्छा होती. (योहा. ६:४४) आपल्यात कमतरता आहेत आणि आपण चुका करत राहू हे त्याला माहीत होतं. तरीही यहोवानं आपल्याला त्याच्याशी मैत्री करू दिली.

यहोवानं आपल्यावर इतकं प्रेम केलं की त्यानं आपल्याला एक बहुमूल्य भेट दिली. आपल्या पापांबद्दल खंडणी देण्यासाठी त्यानं आपल्या पुत्राला, येशूला आपलं जीवन अर्पण करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं. (योहा. ३:१६) आपण जेव्हा एखादी चूक करतो तेव्हा यहोवाकडे क्षमा मागू शकतो. आणि येशूनं दिलेल्या खंडणीच्या आधारावर तो आपल्याला क्षमा करेल आणि त्याच्यासोबतची आपली मैत्री टिकून राहील याची खात्री आपण बाळगू शकतो. (रोम. ७:२४, २५; १ योहा. २:१, २) येशूनं पश्‍चात्ताप करणाऱ्या पापी लोकांसाठीच आपलं जीवन दिलं आहे, हे नेहमी लक्षात असू द्या. म्हणून आपण पापी आहोत असं जरी आपल्याला वाटत असलं, तरी यहोवाला प्रार्थनेत क्षमा मागण्याचं आपण कधीही सोडू नये. आपण जर यहोवाला क्षमा मागितलीच नाही तर, ते जणू आपले घाण झालेले हात स्वच्छ धुण्यास नकार देण्यासारखं होईल. आपण अपरिपूर्ण असलो तरीही यहोवानं त्याचे मित्र बनण्याकरता जी तरतूद केली, त्याबद्दल आपण खरंच किती कृतज्ञ आहोत!—१ तीमथ्य १:१५ वाचा.

८. आपल्या कमतरतांवर मात करण्याचा आपण नेहमी प्रयत्न का केला पाहिजे?

पण अपरिपूर्ण असण्याचा असा अर्थ होत नाही, की आपण आपल्या कमतरतांकडे दुर्लक्ष करावं किंवा त्यांच्यासाठी कारणं द्यावीत. यहोवा कशा प्रकारच्या लोकांना आपले मित्र होण्यासाठी निवडतो हे त्यानं आधीच सांगितलं आहे. (स्तो. १५:१-५) म्हणून आपल्याला जर त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडायचा असेल, तर आपल्याला त्याचं आणि त्याच्या पुत्राचं अनुकरण करत राहण्याची गरज आहे. तसंच, चुकीच्या इच्छांवर नियंत्रण करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यास कदाचित काही कमतरतांवर आपल्याला पूर्णपणे मातदेखील करता येईल. आपला बाप्तिस्मा होऊन कितीही वर्षं झाली असली, तरीही आपण नेहमी आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा करत राहिलं पाहिजे.—२ करिंथ. १३:११.

९. नवं मनुष्यत्व धारण करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतील असं आपण का म्हणू शकतो?

प्रेषित पौलानं ख्रिश्चनांना लिहिलं: “तुमच्या पूर्वीच्या जीवनक्रमात असलेल्या जुन्या माणसाचा त्याग करा, कारण तो फसव्या कुवासनांनी भ्रष्ट झाला आहे. आणि तुमच्या मनोवृत्तीत दररोज नूतनीकरण होऊ द्या. नीतिमत्तेसाठी आणि सत्शीलासाठी देवाने निर्माण केलेला नवमानव स्वीकारा.” (इफिस. ४:२२-२४, मराठी कॉमन लँग्वेज) या वचनातून दिसून येतं की स्वतःमध्ये बदल करून “नवमानव” किंवा ‘नवं मनुष्यत्व’ धारण करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहिलं पाहिजे. म्हणून आपण बऱ्याच काळापासून यहोवाची सेवा करत असलो, तरी त्याच्या गुणांबद्दल आणखी शिकून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करून यहोवाचं अनुकरण करण्यासाठी बायबल आपल्याला मदत करू शकतं.

बदल करणं इतकं कठीण का जातं?

१०. बायबलच्या मदतीनं बदल करत राहण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आणि या बाबतीत कोणते प्रश्न उद्‌भवू शकतात?

१० बायबलच्या वचनाचं पालन करण्याची आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. बदल करत राहण्यासाठी आपल्याला परिश्रम घेण्याची गरज आहे. पण मग, आपल्याला परिश्रम का घ्यावे लागतात? यहोवा असा काही मार्ग का काढत नाही ज्यामुळे आपल्या कमतरतांवर मात करून योग्य ते करणं आपल्याला अगदी सोपं जाईल?

११-१३. अशी कोणती काही कारणं आहेत ज्यांमुळे यहोवा आपल्यासाठी चुकीच्या इच्छांवर मात करणं सोपं करत नाही?

११ आपण जेव्हा विश्व आणि त्यातील सर्व सृष्टी बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं की यहोवाकडे अफाट सामर्थ्य आहे आणि त्याला काहीही करणं अशक्य नाही. उदाहरणार्थ, त्यानं निर्माण केलेला सूर्य खूप शक्तिशाली आहे. प्रत्येक क्षणाला तो मोठ्या प्रमाणात उर्जा व प्रकाश देतो. पण, खरंतर त्याच्या थोड्याफार उर्जेनंच संपूर्ण पृथ्वीवरील जीवन चालू शकतं. (स्तो. ७४:१६; यश. ४०:२६) शिवाय, यहोवा आपल्या सेवकांनाही गरजेच्या वेळी सामर्थ्य देतो. (यश. ४०:२९) या सर्व गोष्टींवरून हे स्पष्टच आहे की जर यहोवाची इच्छा असेल तर मानवांच्या मनात येणाऱ्या चुकीच्या इच्छांना तो पूर्णपणे थांबवू शकतो. तसंच, आपल्या कमतरतांवर मात करणं तो आपल्यासाठी सोपं करू शकतो. मग तो असं का करत नाही?

१२ कारणं यहोवानं आपल्याला इच्छास्वातंत्र्य दिलं आहे. त्याच्या आज्ञा पाळायच्या की नाहीत, हे तो आपल्याला ठरवू देतो. आपण जेव्हा त्याची आज्ञा पाळतो आणि त्याच्या इच्छेनुसार वागण्यास मेहनत घेतो तेव्हा त्याच्यावरचं आपलं प्रेम दिसून येतं. तसंच, त्याचं मन आनंदित करण्याची आपली इच्छा आहे हेदेखील आपण दाखवतो. सैतान असा दावा करतो की यहोवाला राज्य करण्याचा अधिकार नाही. पण जेव्हा आपण यहोवाची आज्ञा पाळतो, तेव्हा आपण दाखवतो की यहोवाच आपला राजा आहे. शिवाय, आपण जे काही प्रयत्न करतो त्याची आपला प्रेमळ पिता मनापासून कदर करतो याची खात्री आपण बाळगू शकतो. (ईयो. २:३-५; नीति. २७:११) सोपं नसतानाही आपण जेव्हा आपल्या कमतरतांवर मात करण्यासाठी मेहनत घेतो, तेव्हा आपण यहोवाला विश्वासू आहोत हे दिसून येतं. आणि त्यालाच आपल्यावर राज्य करण्याचा अधिकार आहे हेदेखील आपण दाखवतो.

१३ यहोवा आपल्याला आर्जवतो की आपण त्याच्या गुणांचं अनुकरण करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. (कलस्सै. ३:१२; २ पेत्र १:५-७ वाचा.) तसंच, आपल्या विचारांवर आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण स्वतः मेहनत घ्यावी अशीदेखील तो अपेक्षा करतो. (रोम. ८:५; १२:९) आपल्या व्यक्तिमत्त्वात एखादा बदल करण्यासाठी आपण मेहनत घेतो आणि आपल्याला यश मिळतं, तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

देवाच्या वचनाला तुमचं जीवन बदलू द्या

१४, १५. यहोवाला आवडतील असे गुण विकसित करण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करू शकतो? (“ बायबल आणि प्रार्थनेमुळे त्यांना बदल करण्यास मदत झाली” ही चौकट पाहा.)

१४ यहोवाला आवडणारे गुण विकसित करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपल्यात कोणते बदल करायचे आहेत हे स्वतः ठरवण्याऐवजी, आपण देवाचं मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे. रोमकर १२:२ असं म्हणतं: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” यहोवाची इच्छा काय आहे ते जाणून घेण्यासाठी तो पुरवत असलेल्या मदतीवर आपण अवलंबून असलं पाहिजे. त्यासाठी आपण बायबलचं दररोज वाचन करून त्यावर मनन केलं पाहिजे आणि यहोवाला पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. (लूक ११:१३; गलती. ५:२२, २३) या मार्गांचा उपयोग करून यहोवा त्याची इच्छा काय आहे हे आपल्याला कळवतो आणि त्यामुळे त्याच्या स्तरांनुसार विचार करणं आपल्याला शक्य होतं. असं केल्यामुळे आपले विचार, आपलं बोलणं आणि आपल्या कृती अशा असतील ज्यामुळे यहोवाचं मन आणखी आनंदित होईल. तसंच, आपल्या कमतरतांवर ताबा मिळवण्यासही आपल्याला शिकता येईल. असं असलं तरी आपल्या कमतरतांवर मात करण्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्न करत राहावे लागतील.—नीति. ४:२३.

आपल्या कमतरतांवर मात करण्यासाठी मदत करतील अशी वचनं किंवा लेख आपण वेगळे काढून ठेवू शकतो आणि वेळोवेळी त्यांचं वाचन करू शकतो (परिच्छेद १५ पाहा)

१५ बायबलचं दररोज वाचन करण्यासोबतच, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांसारख्या प्रकाशनांच्या मदतीनं आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे. या मासिकांमधील बरेच लेख आपल्याला यहोवाच्या गुणांचं अनुकरण करण्यास आणि आपल्या कमतरतांवर मात करण्यास मदत करू शकतात. या मासिकांमधील एखादा लेख किंवा काही वचनं कदाचित आपल्या परिस्थितीशी अनुरूप असतील. अशी वचनं आणि लेख आपण वेगळे काढून ठेवू शकतो आणि वेळोवेळी त्यांचं वाचन करू शकतो.

१६. बदल करण्यास आपल्याला बराच वेळ लागत असेल तरी आपण धीर का सोडू नये?

१६ यहोवाच्या गुणांचं जवळून अनुकरण करण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणून, बरेच प्रयत्न करूनही पुरेसे बदल करणं तुम्हाला जमत नसेल तर धीर सोडू नका. सुरवातीला कदाचित तुम्हाला बायबलनुसार वागण्यास स्वतःला शिस्त लावावी लागेल. पण तुम्ही जितकं जास्त यहोवाच्या इच्छेनुसार विचार कराल व वागाल, तितकंच तुम्हाला योग्य ते करणं सोपं जाईल.—स्तो. ३७:३१; नीति. २३:१२; गलती. ५:१६, १७.

आपल्या उज्ज्वल भविष्याचा विचार करा

१७. आपण यहोवाला विश्वासू राहिलो तर आपल्याला कशा प्रकारचं भवितव्य अनुभवायला मिळेल?

१७ परिपूर्ण अवस्थेत यहोवाची अनंतकाळ सेवा करणं शक्य असेल, अशा काळाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत. त्या वेळी आपल्याला कोणत्याही कमतरतांवर मात करण्याची गरज पडणार नाही. आणि यहोवाचं अनुकरण करणं आजच्या तुलनेत आपल्याला खूप सोपं जाईल. पण यहोवानं आपल्याला खंडणी बलिदानाची भेट दिल्यामुळे आपण आजही त्याची उपासना करू शकतो. अपरिपूर्ण असूनही जर आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करत राहिलो आणि बायबलच्या सल्ल्यांचं पालन करत राहिलो, तर यहोवाचं मन आनंदित करणं आपल्याला शक्य होईल.

१८, १९. बायबल आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतं या गोष्टीची खात्री आपल्याला कधी असेल?

१८ लेखाच्या सुरवातीला उल्लेख करण्यात आलेल्या केविननं आपल्या रागावर ताबा मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यानं बायबलमधील वचनांवर मनन केलं आणि त्यानुसार जीवनात बदल करण्यास बरीच मेहनत घेतली. तसंच, मंडळीतील बांधवांकडून मिळणारा सल्लादेखील त्यानं लागू केला. केविनला आपल्या कमतरतांवर ताबा मिळवायला काही वर्षं लागली हे खरं आहे, पण नंतर तो एक साहाय्यक सेवक म्हणून सेवा करू शकला. आणि मागील २० वर्षांपासून तो मंडळीत एक वडील या नात्यानं सेवा करत आहे. पण आपल्या कमतरतांशी आपल्याला नेहमी झगडावं लागेल याची जाणीव त्याला आहे.

१९ केविनसारखंच आपणही आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करत राहू शकतो. आपण जर असं केलं तर आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ. (स्तो. २५:१४) बदल करण्यास जेव्हा आपण होईल तितके प्रयत्न करू, तेव्हा यहोवा आपल्याला यशस्वी होण्यास मदत करेल. आणि मग बायबल आपल्या जीवनात बदल करत आहे या गोष्टीची खात्री आपल्याला असेल.—स्तो. ३४:८.

^ [१] (परिच्छेद १) नाव बदलण्यात आलं आहे.