व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची अगाध कृपा मिळालेले

यहोवाची अगाध कृपा मिळालेले

“आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.”—योहा. १:१६.

गीत क्रमांक: १, १३

१, २. (क) द्राक्षमळ्याच्या मालकाबद्दल येशूने दिलेला दाखला थोडक्यात सांगा. (ख) या दाखल्यावरून उदारता आणि अगाध कृपा हे गुण कसे दिसून येतात?

द्राक्षमळ्यात काम करण्यासाठी कामगार मिळावेत म्हणून द्राक्षमळ्याचा मालक मोठ्या पहाटेस उठून बाजारपेठेत जातो. मजुरी म्हणून तो त्यांना काही रक्कम देण्याचं ठरवतो आणि तेही त्याला मान्य होतात. नंतर काम करण्यासाठी त्याला आणखी काही कामगारांची गरज पडते. म्हणून तो दिवसातून बऱ्याच वेळा कामगारांना आणायला बाजारपेठेत जातो. त्यांच्या कामाचा त्यांना योग्य मोबदला मिळेल असं तो त्यांना सांगतो. दिवसाच्या शेवटी मालक सगळ्या कामगारांना बोलावतो आणि त्यांना त्यांची मजुरी देतो. मालक सगळ्यांना एकसारखीच मजुरी देतो, मग त्यांनी पूर्ण दिवस काम केलेलं असो अथवा फक्त एकच तास. हे पाहून ज्या लोकांनी सकाळपासून काम केलेलं असतं ते कुरकूर करू लागतात. तेव्हा मालक त्यांना म्हणतो: “तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? . . . जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय?”—मत्त. २०:१-१५.

येशूने दिलेल्या या दाखल्यावरून आपल्याला यहोवाच्या एका महान गुणाची ओळख होते. तो गुण म्हणजे त्याची ‘अगाध कृपा.’ (२ करिंथकर ६:१ वाचा.) पाहायला गेलं तर ज्या कामगारांनी फक्त एकाच तासासाठी काम केलं होतं, ते पूर्ण दिवसाची मजुरी मिळवण्यास पात्र नव्हते. पण तरी, द्राक्षमळ्याच्या मालकाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कृपा केली. बायबलमधील ‘अगाध कृपा’ या शब्दाच्या अर्थाबद्दल एका तज्ञानं असं म्हटलं: “एखाद्या व्यक्तीनं कमावलेलं नसतानाही किंवा ती त्यासाठी पात्र नसतानाही तिला एखादी गोष्ट भेट म्हणून देणं.”

यहोवाने उदारतेनं दिलेली एक मोठी देणगी

३, ४. यहोवाने कशा प्रकारे सर्व मानवांप्रती अगाध कृपा दाखवली आणि का?

बायबलमध्ये देवाच्या अगाध कृपेला “दान” म्हणण्यात आलं आहे. (इफिस. ३:७) असं का? कारण, अपरिपूर्ण असल्यामुळे यहोवाला पूर्णपणे आज्ञाधारक राहणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे यहोवाकडून कोणत्याही प्रकारची कृपा प्राप्त करण्यास खरंतर आपण पात्र नाही. पाहायला गेलं तर आपण मृत्युदंडास पात्र आहोत. शलमोन राजाने असं लिहिलं: “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.” (उप. ७:२०) नंतर, प्रेषित पौलानेही असं म्हटलं: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत” आणि “पापाचे वेतन मरण आहे.”—रोम. ३:२३; ६:२३अ.

यहोवाचं मानवांवर खूप प्रेम असल्यामुळे त्यांच्यासाठी त्याने आपला “एकुलता एक पुत्र दिला.” हा त्याच्या अगाध कृपेचा सर्वात मोठा पुरावा होता. (योहा. ३:१६) पौलाने म्हटलं की “देवाने त्याला गौरवाने व सन्मानाने मुकुटमंडित केले आहे, कारण त्याने आपल्यासाठी मरण सोसले. होय, देवाच्या महान कृपेमुळे सर्व जगातील प्रत्येकासाठी येशूने मरणाचा अनुभव घेतला.” (इब्री २:९, सुबोधभाषांतर) खरंच, “देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोम. ६:२३ब.

५, ६. (क) पापाच्या दास्यात असल्यामुळे कोणते परिणाम घडून येतात? (ख) अगाध कृपेमुळे कोणते परिणाम घडून येतात?

तर मग आपण पाप आणि मृत्यूच्या दास्यात कसे आलो? बायबल म्हणतं की “एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले.” आदामाचे वंशज असल्यामुळे आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपला मृत्यू होतो. (रोम. ५:१२, १४, १७) असं असलं तरी पापाला आपल्यावर राज्य किंवा नियंत्रण करण्यापासून आपण रोखू शकतो. हे कसं शक्य आहे? जेव्हा आपण ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्वास दाखवतो तेव्हा आपल्याला यहोवाच्या अगाध कृपेचा फायदा मिळवणं शक्य होतं. बायबल म्हणतं: “जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या द्वारे राज्य करावे.”—रोम. ५:२०, २१.

आपण आजही पापी आहोत. पण, याचा अर्थ असा होत नाही की पापाला आपण स्वतःवर नियंत्रण करू द्यावं. जेव्हा आपल्या हातून एखादी चूक होते किंवा पाप घडतं, तेव्हा आपण यहोवाकडे क्षमा मागितली पाहिजे. पौलाने आपल्याला अगदी स्पष्ट ताकीद दिली: “तुमच्यावर पुनरपि पापाची मालकी असू नये. कारण आता ज्यामुळे तुम्ही पापाचे दास होता, त्या नियमशास्त्राच्या स्वाधीन तुम्ही नाही, तर तुम्ही देवाच्या कृपेमुळे व दयेमुळे स्वतंत्र असे आहात.” (रोम. ६:१४, सुबोधभाषांतर) मग, देवाच्या या अगाध कृपेचा आपण कसा फायदा मिळवू शकतो? पौलाने म्हटलं: “सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे; तो आपल्याला असे शिकवतो की, . . . आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्तीने वागावे.”तीत २:११-१३.

वेगवेगळ्या मार्गांनी दाखवण्यात आलेली अगाध कृपा

७, ८. यहोवाची कृपा ‘अनेक प्रकारे’ दाखवण्यात येते, याचा काय अर्थ होतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

प्रेषित पेत्राने लिहिलं: “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या अनेक प्रकारच्या कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या सेवेस लावा.” (१ पेत्र ४:१०, पं.र.भा.) यहोवाची अगाध कृपा ‘अनेक प्रकारे’ दाखवण्यात येते, याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होतो की, आपल्या जीवनात कोणत्याही समस्या आल्या तरी त्यांचा सामना करण्यास यहोवा आपल्याला मदत करेल. (१ पेत्र १:६) त्या समस्यांचा सामना करण्यासाठी ज्याची गरज आहे अगदी तेच यहोवा आपल्याला देईल.

प्रेषित योहानाने लिहिलं: “त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.” (योहा. १:१६) यहोवा वेगवेगळ्या मार्गांनी कृपा दाखवत असल्यामुळे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. त्यांपैकी काही आशीर्वाद कोणते आहेत?

९. यहोवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला कसा फायदा होतो, आणि त्याबद्दल आपण कृतज्ञता कशी दाखवू शकतो?

यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो. यहोवा त्याच्या अगाध कृपेमुळेच आपल्या पापांची क्षमा करतो. पण, तो आपल्याला तेव्हाच क्षमा करतो जेव्हा आपण पश्‍चात्ताप दाखवतो आणि आपल्या पापी इच्छांविरुद्ध लढा देतो. (१ योहान १:८, ९ वाचा.) यहोवा पापांची क्षमा कशी करतो हे पौलाने त्याच्या काळातील अभिषिक्त ख्रिश्चनांना समजावून सांगितलं. त्याने म्हटलं: “[देवाने] आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले; त्या पुत्राच्या ठायी, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.” (कलस्सै. १:१३, १४) देवाच्या या दयेसाठी आपण खरंच खूप कृतज्ञ आहोत. आणि हीच कृतज्ञता आपल्याला त्याची स्तुती करण्यास प्रेरित करते. यहोवा आपल्या पापांची क्षमा करत असल्यामुळे इतरही अनेक आशीर्वाद प्राप्त करणं आपल्याला शक्य होतं.

१०. देवाच्या अगाध कृपेमुळे कोणती गोष्ट शक्य होते?

१० देवासोबत शांतीपूर्ण नातेसंबंध जोडणं आपल्याला शक्य होतं. आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे जन्मापासूनच आपण देवाचे शत्रू आहोत. पण तरी पौलाने असं म्हटलं: “आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला.” (रोम. ५:१०) येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर देवासोबत समेट करणं आपल्याला शक्य झालं. याचाच अर्थ आपण देवासोबत शांतीपूर्ण नातं जोडून त्याचे मित्र होऊ शकतो. अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिताना पौलाने या गोष्टीचा अगाध कृपेशी कसा संबंध आहे, याविषयी स्पष्ट केलं. त्याने म्हटलं: “आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहो म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो, त्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे.” (रोम. ५:१, २) खरंच यहोवासोबत शांतीपूर्ण नातेसंबंध जोडणं आपल्यासाठी किती बहुमानाची गोष्ट आहे!

सुवार्ता ऐकण्याचा सुहक्क (परिच्छेद ११ पाहा)

११. ‘दुसऱ्या मेंढरांतील’ सदस्यांना देवाच्या नजरेत नीतिमान ठरण्यासाठी अभिषिक्त जन कशी मदत करतात?

११ आपण यहोवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकतो. दानीएल संदेष्ट्याने लिहिलं “जे सुज्ञ असतील ते” अर्थात अभिषिक्त ख्रिस्ती, शेवटल्या काळी “पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे” वळवतील. (दानीएल १२:३ वाचा.) अभिषिक्त जन हे कशा प्रकारे करतात? ते सुवार्ता घोषित करतात आणि ‘दुसऱ्या मेंढरांपैकी’ असलेल्या लाखो लोकांना यहोवाचे नियम शिकवतात. (योहा. १०:१६) ते त्यांना देवाच्या नजरेत नीतिमान ठरण्यास मदत करतात. आणि हे केवळ यहोवाच्या अगाध कृपेमुळेच शक्य आहे. पौलाने म्हटलं: “देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.”—रोम. ३:२३, २४.

प्रार्थना करण्याचा बहुमान (परिच्छेद १२ पाहा)

१२. प्रार्थनेचा देवाच्या अगाध कृपेशी काय संबंध आहे?

१२ आपण प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ जाऊ शकतो. यहोवाची आपल्यावर अगाध कृपा असल्यामुळे आपण त्याला प्रार्थना करू शकतो. पौल यहोवाच्या राजासनाला ‘कृपेचं राजासन’ म्हणतो. आणि “आपण धैर्याने” म्हणजे जराही संकोच न बाळगता त्याच्याजवळ जावं असं तो आपल्याला आर्जवतो. (इब्री ४:१६ब) आपण येशूद्वारे यहोवाला केव्हाही प्रार्थना करू शकतो. हा खरंच किती मोठा बहुमान आहे! पौलाने म्हटलं: “प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत.”—इफिस. ३:१२.

योग्य वेळी मिळणारी मदत (परिच्छेद १३ पाहा)

१३. यहोवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला “योग्य वेळी साहाय्य” कसं मिळतं?

१३ आपल्याला योग्य वेळी मदत मिळते. “आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी साहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी” म्हणून जेव्हा गरज असते तेव्हा आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे असं उत्तेजन पौलाने आपल्याला दिलं. (इब्री ४:१६, पं.र.भा.) आपल्या जीवनात संकटं किंवा परीक्षा येतात तेव्हा आपण यहोवाकडे मदत मागू शकतो. खरंतर त्याच्याकडून मदत मिळवण्यास आपण पात्र नाही. पण तरी तो आपल्या प्रार्थनांची उत्तरं देतो. तो सहसा आपल्या बंधुभगिनींद्वारे आपल्याला मदत पुरवतो. यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देत असल्यामुळेच “आपण धैर्याने म्हणतो प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”—इब्री १३:६.

१४. यहोवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला आणखी कशा प्रकारे फायदा होतो?

१४ आपल्याला सांत्वन मिळतं. आपण जेव्हा खूप दुःखी असतो किंवा मानसिक तणावाचा सामना करत असतो, तेव्हा यहोवा आपल्याला सांत्वन देतो. हा खरंतर एक मोठा आशीर्वादच आहे. (स्तो. ५१:१७) थेस्सलनीकातील ख्रिश्चन जेव्हा छळाचा सामना करत होते, तेव्हा पौलाने त्यांना लिहिलं: “आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हास स्थिर करो.” (२ थेस्सलनी. २:१६, १७) यहोवा त्याच्या अगाध कृपेमुळे आपल्यावर प्रेम करतो आणि आपली काळजी घेतो, ही जाणीव किती सांत्वन देणारी आहे!

१५. यहोवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला कोणती आशा मिळाली आहे?

१५ आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळते. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे खरंतर आपल्याला कोणतीही आशा नव्हती. (स्तोत्र ४९:७, ८ वाचा.) पण यहोवाने आपल्याला एका सुंदर भविष्याची आशा दिली आहे. येशूने म्हटलं: “माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ६:४०) सदासर्वकाळ जगण्याची आशा ही यहोवाने त्याच्या अगाध कृपेमुळे आपल्याला दिलेली एक अमूल्य भेट आहे. पौलाने म्हटलं: “सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे.”—तीत २:११.

यहोवाच्या अगाध कृपेचा गैरफायदा घेऊ नका

१६. सुरवातीच्या काही ख्रिश्चनांच्या वागणुकीतून त्यांनी देवाच्या अगाध कृपेचा चुकीचा अर्थ काढला आहे हे कसं दिसून येतं?

१६ यहोवाच्या अगाध कृपेमुळे आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. पण, त्याच वेळी त्याच्या कृपेचा गैरफायदा घेण्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणजे यहोवा आपल्यावर कृपा करतो म्हणून आपण पाप करत राहू नये. सुरवातीच्या काही ख्रिश्चनांनी “देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप” आणले. (यहू. ४) या वचनावरून देवाला विश्वासू नसलेल्या ख्रिश्चनांची चुकीची विचारसरणी दिसून येते. आपण पाप करतच राहिलो तरी यहोवा आपल्याला नेहमी क्षमा करेल असा विचार ते करायचे. त्यांनी इतर बांधवांवरही आपल्या या चुकीच्या विचारांचा प्रभाव पाडला. आजही जर एखाद्याची अशी विचारसरणी असेल आणि तो पाप करत असेल तर तो “कृपेच्या आत्म्याचा अपमान” करतो.—इब्री १०:२९.

१७. पेत्राने कोणती ताकीद दिली?

१७ आजदेखील सैतानाने काही ख्रिश्चनांना असा चुकीचा विचार करायला लावला आहे, की ते पाप करत राहिले तरी यहोवा त्यांना नेहमी क्षमा करत राहील. हे खरं आहे की यहोवा पश्‍चात्तापी व्यक्तीला क्षमा करण्यास तयार असतो. पण, त्या व्यक्तीने स्वतःच्या पापी इच्छांशी लढा द्यावा अशी अपेक्षाही तो करतो. यहोवाच्या प्रेरणेनं पेत्राने असं लिहिलं: “प्रियजनहो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहांत सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा; आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालापर्यंत गौरव असो.”—२ पेत्र ३:१७, १८.

यहोवाच्या अगाध कृपेसोबतच जाबाबदारीही येते

१८. यहोवाच्या अगाध कृपेमुळे आपल्यावर कोणती जबाबदारी येते?

१८ यहोवाच्या अगाध कृपेबद्दल आपण सर्वच खूप कृतज्ञ आहोत. यहोवाच्या कृपेची जी वेगवेगळी दानं आपल्याला मिळाली आहेत, त्यांचा वापर आपण त्याच्या नावाला गौरव देण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी केला पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? पौलाने म्हटलं: “आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा, सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे . . . दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी.” (रोम. १२:६-८) म्हणून, यहोवाच्या अगाध कृपेमुळे मेहनतीने सेवाकार्य करण्याची, इतरांना बायबल शिकवण्याची, बांधवांना उत्तेजन देण्याची आणि जे आपलं मन दुखावतात त्यांना क्षमा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

१९. पुढच्या लेखात आपल्या कोणत्या जबाबदारीबद्दल चर्चा करण्यात आली आहे?

१९ आपल्याला यहोवाच्या अगाध कृपेचं दान मिळालं आहे. त्यामुळे आपण होता होईल तितकी मेहनत घेऊन “देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची” गरज आहे. (प्रे. कृत्ये २०:२४) आपल्याला ही जबाबदारी कशी पार पाडता येईल याबद्दल पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे.