व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भौतिक गोष्टींसाठी नाही, तर राज्यासाठी झटा

भौतिक गोष्टींसाठी नाही, तर राज्यासाठी झटा

“तुम्ही त्याचे [देवाचे] राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर याही गोष्टी तुम्हास मिळतील.”—लूक १२:३१.

गीत क्रमांक: ४०, ४४

१. आपली गरज आणि आपली इच्छा यांमध्ये काय फरक आहे?

जीवन जगण्यासाठी आपल्याला फार कमी गोष्टींची, म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज असते. पण आपल्या इच्छांच्या बाबतीत तसं नाही. आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टींना काही सीमा नाही. आणि बऱ्याच लोकांना त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या गरजा यांमध्ये फरक करता येत नाही.

२. लोकांना कोणत्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात?

एखाद्या गरीब देशात राहणाऱ्या व्यक्तीला ज्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात, त्या एखाद्या श्रीमंत देशातील व्यक्तीला हव्या असणाऱ्या गोष्टींपासून खूप वेगळ्या असू शकतात. काही गरीब देशांतील लोकांना मोबाईल फोन, गाडी किंवा थोडीफार जमीन बाळगण्याची इच्छा असते. तर इतर काही देशांतील लोकांना वाटतं की त्यांच्याकडे महागडे कपडे, मोठा बंगला किंवा मग एखादी महागडी गाडी असावी. आपण जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असलो किंवा आपल्याजवळ पैसा असला किंवा नसला तरीही आणखी गोष्टी मिळवण्याची आपल्याला इच्छा असू शकते. अशा गोष्टी ज्यांची खरं पाहिलं तर आपल्याला गरजसुद्धा नसते किंवा ज्या घेण्याची आपली ऐपतसुद्धा नसते.

भौतिकवादाचा आपल्यावरही परिणाम होऊ शकतो

३. भौतिकवाद म्हणजे काय?

भौतिकवाद म्हणजे काय? भौतिकवाद एक अशी मनोवृत्ती आहे जिच्यामुळे एक व्यक्ती देवासोबतच्या आपल्या नात्यापेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्त्व देते. अशी मनोवृत्ती बाळगणारी व्यक्ती फक्त गरजेच्या गोष्टी मिळाल्यानं समाधानी नसते, तर तिला जीवनात नेहमी आणखी गोष्टी हव्या असतात. जे श्रीमंत नाहीत किंवा ज्यांना महागड्या गोष्टी विकत घेण्याची सवय नाही, तेसुद्धा भौतिकवादी बनू शकतात. देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याऐवजी ते इतर गोष्टींना आपल्या जीवनात प्राधान्य देऊ शकतात.—इब्री १३:५.

४. सैतान आपल्याला भुलवण्यासाठी ‘डोळ्यांच्या वासनांचा’ उपयोग कसा करतो?

आपल्याकडे भरपूर गोष्टी असल्या तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो, असा चुकीचा विचार सैतान आपल्याला करायला लावतो. तो जग आणि “डोळ्यांची वासना” यांचा उपयोग करून आपल्याला आणखी गोष्टी घेण्याचा मोह घालतो. (१ योहा. २:१५-१७; उत्प. ३:६; नीति. २७:२०) नवनवीन गोष्टी घेण्यासाठी आपल्यावर सतत जाहिरातींचा भडिमार होत असतो. दुकानात एखादी चांगली वस्तू दिसल्यामुळे किंवा मग एखादी जाहिरात पाहिल्यामुळे सहसा लोक काही वस्तू विकत घेतात. पण नंतर त्यांना जाणवतं की खरंतर त्यांना या गोष्टींची गरजच नव्हती. तुमच्या बाबतीतही कधी असं झालं आहे का? अनावश्यक गोष्टींमुळे आपलं जीवन अधिकच गुंतागुंतीचं होऊ शकतं. शिवाय, या गोष्टी आपल्याला यहोवाची सेवा करण्यापासूनही दूर नेऊ शकतात. उदाहरणार्थ, आपल्याजवळ कदाचित बायबल अभ्यास करण्यासाठी, सभेची तयारी करण्यासाठी, सभांना जाण्यासाठी आणि नियमितपणे प्रचारकार्यात जाण्यासाठी वेळ उरणार नाही. प्रेषित योहानाने जे म्हटलं ते नेहमी लक्षात असू द्या. त्याने म्हटलं: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत.”

५. जे लोक आपला बहुतेक वेळ आणि शक्ती भौतिक गोष्टी मिळवण्यात घालवतात त्यांच्या बाबतीत काय घडू शकतं?

सैतानाची इच्छा आहे की आपण आपल्या शक्तीचा उपयोग यहोवाच्या सेवेत नाही, तर भरपूर पैसा आणि भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी करावा. (मत्त. ६:२४) पण आपण जर फक्त भौतिक गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलो, तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. आणि आपण जीवनात निराश होऊ शकतो किंवा मग आर्थिक समस्यांमध्ये सापडू शकतो. त्याहूनही वाईट म्हणजे, यहोवा आणि त्याच्या राज्यावर आपला विश्वास कमी होऊ शकतो. (१ तीम. ६:९, १०; प्रकटी. ३:१७) येशूने म्हटलं होतं की “इतर गोष्टींचा लोभ” हा काट्यांप्रमाणे आहे, त्यामुळे झाडाची वाढ होत नाही आणि त्याला फळंदेखील येत नाहीत.—मार्क ४:१४, १८, १९.

६. आपण बारूखच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

यिर्मया संदेष्ट्याचा सचिव बारूख याच्या बाबतीत काय घडलं ते लक्षात घ्या. बारूख आपल्यासाठी “मोठाल्या गोष्टींची” इच्छा बाळगत होता, तेव्हा यहोवाने त्याला आठवण करून दिली की तो लवकरच यरुशलेमचा नाश करणार आहे. पण यासोबतच यहोवाने त्याला हेदेखील सांगितलं की तो त्याचा जीव वाचवेल. (यिर्म. ४५:१-५) खरंतर बारूखने यापेक्षा आणखी कशाचीही अपेक्षा करणं चुकीचं होतं. कारण शहराचा नाश करताना यहोवा लोकांची मालमत्ता वाचवणार नव्हता. (यिर्म. २०:५) सैतानाच्या जगाचा अंतदेखील अगदी जवळ आला आहे. त्यामुळे स्वतःसाठी भौतिक गोष्टी गोळा करण्याची ही वेळ नाही. आणि सध्या आपल्याजवळ असलेल्या गोष्टी, मग त्या आपल्यासाठी कितीही मौल्यवान असल्या तरी, मोठ्या संकटानंतरही आपल्याजवळ राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल.—नीति. ११:४; मत्त. २४:२१, २२; लूक १२:१५.

७. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत, आणि का?

तर मग, आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं लक्ष जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर केंद्रित कसं ठेवू शकतो? आपण भौतिकवादी मनोवृत्ती कशी टाळू शकतो? आणि आपल्या गरजांसाठी वाजवीपेक्षा जास्त चिंता करण्याचं आपण कसं टाळू शकतो? याबद्दल येशूने त्याच्या डोंगरावरील प्रवचनात सांगितलं. (मत्त. ६:१९-२१) आता आपण मत्तय ६:२५-३४ या वचनांवर चर्चा करू या. यामुळे भौतिक गोष्टींसाठी नाही, तर राज्याच्या कामासाठी झटणं हेच आपल्या फायद्याचं आहे याची खात्री आपल्याला पटेल.—लूक १२:३१.

यहोवा आपल्या गरजा पुरवतो

८, ९. (क) आपण आपल्या गरजांबद्दल वाजवीपेक्षा जास्त चिंता का करू नये? (ख) येशूला लोकांबद्दल आणि त्यांच्या गरजांबद्दल कोणती गोष्ट माहीत होती?

मत्तय ६:२५ वाचा. आपले शिष्य अन्न, वस्त्र आणि निवारा यांबद्दल काळजी करत आहेत हे येशूला माहीत होतं. त्यामुळे त्याने डोंगरावरील प्रवचनात त्यांना सांगितलं: “चिंता करत बसू नका.” या गोष्टींबद्दल त्यांनी चिंता का करू नये याचं कारण त्यांनी समजून घ्यावं अशी येशूची इच्छा होती. येशूला माहीत होतं की त्यांनी खूप जास्त चिंता केली, तर जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपासून त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं; मग या चिंता त्यांच्या रोजच्या गरजांबद्दल का असेनात. येशूला आपल्या शिष्यांची खूप काळजी होती. म्हणून त्याने डोंगरावरील प्रवचनात आपल्या शिष्यांना हाच इशारा आणखी चार वेळा दिला.—मत्त. ६:२७, २८, ३१, ३४.

आपण काय खावं, काय प्यावं आणि काय पांघरावं यांबद्दल चिंता करू नये असं येशूने का सांगितलं? अन्न आणि कपडे ही तर आपली मूलभूत गरज आहे. आणि या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याजवळ पुरेसे पैसे नसतील, तर साहजिकच आपल्याला काळजी वाटेल. लोकांच्या गरजा काय आहेत हे येशूला माहीत होतं. आणि “शेवटल्या काळी” त्याच्या शिष्यांना आपल्या गरजा भागवणं खूप कठीण जाणार आहे, हेदेखील त्याला माहीत होतं. (२ तीम. ३:१) आज जगाची परिस्थिती पाहिली तर नोकरी मिळणं खूप कठीण झालं आहे आणि महागाई तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बऱ्याच ठिकाणी लोकांची आर्थिक स्थिती खूप बिकट आहे आणि दोन वेळचं जेवण मिळवणंही त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. या सगळ्या गोष्टींची कल्पना येशूला होती, पण त्यासोबतच त्याला हेदेखील माहीत होतं की “अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर” हे जास्त महत्त्वाचं आहे.

१०. आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवताना येशूने कोणत्या गोष्टीला जीवनात सर्वात महत्त्वाच्या स्थानी ठेवण्यास सांगितलं?

१० येशूने आपल्या शिष्यांना आधी शिकवलं होतं की त्यांनी आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपल्या गरजांसाठी प्रार्थना केली पाहिजे. येशूने त्यांना प्रार्थनेत पुढील विनंती करण्यास सांगितलं: “आमची रोजची भाकर आज आम्हास दे.” (मत्त. ६:११) आणखी एका प्रसंगी त्याने असं शिकवलं: “आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे.” (लूक ११:३) येशूने जेव्हा रोजची भाकर असं म्हटलं तेव्हा तो आपल्या मूलभूत गरजांबद्दल बोलत होता. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सतत त्या गरजांबद्दलच विचार करावा. येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं की आपल्या रोजच्या गरजांसाठी प्रार्थना करण्यापेक्षा देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करणं जास्त महत्त्वाचं आहे. (मत्त. ६:१०; लूक ११:२) आपल्या शिष्यांनी चिंता करत बसू नये म्हणून यहोवा आपल्या सृष्टीची कशी काळजी घेतो, याबद्दल सांगून येशूने त्यांना धीर दिला.

११, १२. यहोवा आकाशातील पाखरांची जशी काळजी घेतो त्यावरून आपण काय शिकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

११ मत्तय ६:२६ वाचा. आपण “आकाशातील पाखरांकडे निरखून” पाहिलं पाहिजे. पक्षी आकाराने जरी लहान असले तरी त्यांना भरपूर अन्न लागतं. ते आपल्याइतके मोठे असते तर आपण सहसा जितकं जेवतो त्याच्यापेक्षा जास्त अन्न त्यांना लागलं असतं. पक्षी फळं, बिया, किटक आणि अळ्या खातात. पण त्यांना बी पेरण्याची किंवा कापणी करण्याची गरज नाही. यहोवा त्यांच्या गरजा पुरवतो. (स्तो. १४७:९) पण अन्न मिळवण्यासाठी त्यांना मेहनत करावी लागते, त्यांना ते शोधावं लागतं.

१२ येशूला पूर्ण खात्री होती की जर यहोवा पक्ष्यांची इतकी काळजी घेतो, तर मग तो मानवांची सुद्धा नक्कीच काळजी घेईल. (१ पेत्र ५:६, ७) हे खरं आहे की अन्न मिळवण्यासाठी आपल्याला शेती करावी लागते किंवा ते विकत घेण्यासाठी पैसा कमवावा लागतो. पण आपण जी मेहनत घेतो त्यावर यहोवा नक्की आशीर्वाद देईल. आपल्याजवळ पुरेसं अन्न किंवा पैसा नसला तरी वेगवेगळ्या मार्गांनी तो आपली काळजी घेऊ शकतो. जसं की, तो आपल्या गरजा पुरवण्यासाठी इतरांना प्रेरीत करू शकतो. यहोवाने पक्ष्यांच्या राहण्याचीदेखील व्यवस्था केली आहे. आपलं घरटं स्वतः बांधण्याची क्षमता त्याने पक्ष्यांना दिली आहे. आणि ते बांधण्यासाठी लागणारं साहित्यही त्याने पक्ष्यांना उपलब्ध करून दिलं आहे. अशाच प्रकारे यहोवा आपल्यालाही आपल्या कुटुंबासाठी राहण्याचं ठिकाण शोधण्यास मदत करू शकतो.

१३. आपण आकाशातील पाखरांपेक्षा जास्त मौल्यवान आहोत हे कशावरून दिसून येतं?

१३ यहोवा पक्ष्यांना अन्न पुरवतो याची आठवण करून दिल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारलं: “तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही?” (लूक १२:६, ७ पडताळून पाहा.) येशूने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा कदाचित त्याच्या मनात, लवकरच तो जे बलिदान देणार होता त्याचा विचार आला असेल. नेहमी लक्षात असू द्या, येशूने आकाशातील पाखरांसाठी किंवा जनावरांसाठी नाही, तर आपल्यासाठी प्राण दिला. आणि आपल्याला सदासर्वकाळचं जीवन मिळावं म्हणून त्याने हे केलं.—मत्त. २०:२८.

१४. चिंता केल्याने आपण काय करू शकत नाही?

१४ मत्तय ६:२७ वाचा. आपण चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभरही वाढवू शकत नाही, या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो? आपल्या गरजांबद्दल चिंता करत राहिल्याने आपण आपलं आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाही, असं येशूला सांगायचं होतं. सतत चिंता केल्याने आपल्या जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे आपण आजारी पडू शकतो आणि आपला मृत्यूदेखील होऊ शकतो.

१५, १६. (क) रानातील फुलांची यहोवा ज्या प्रकारे काळजी घेतो त्यातून आपण काय शिकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत आणि का?

१५ मत्तय ६:२८-३० वाचा. आपल्याकडे चांगले कपडे असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. खासकरून प्रचारात, सभेला आणि अधिवेशनाला जाताना चांगले कपडे घालण्याची आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते. पण यासाठी आपण चिंता करत बसावं का? नक्कीच नाही. यहोवा आपल्या सृष्टीची कशी काळजी घेतो याची येशूने पुन्हा एकदा आपल्या शिष्यांना आठवण करून दिली. येशूने ‘रानातील फुलांचं’ उदाहरण दिलं. ही फुलं खूप सुंदर दिसतात, जणू यहोवा त्यांना रंगीबेरंगी कपडे घालतो. पण त्यांना स्वतः यासाठी काहीही करण्याची गरज पडत नाही. या फुलांच्या सुंदरतेबद्दल बोलताना येशूने म्हटलं की “शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता.”

१६ यानंतर येशूने जे म्हटलं त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं की जर रानातल्या गवताला “देव असा पोषाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषकरून तुम्हाला पोषाख घालणार नाही काय?” तो नक्कीच घालेल. येशूच्या शिष्यांना त्यांचा विश्वास वाढवण्याची गरज होती. (मत्त. ८:२६; १४:३१; १६:८; १७:२०) आपली काळजी घेण्याची यहोवाची इच्छा आहे आणि तो आपली काळजी नक्की घेईल, या गोष्टीवर त्यांना भरवसा ठेवण्याची गरज होती. आपल्या बाबतीत काय? यहोवा आपलीदेखील काळजी घेईल यावर आपला भरवसा आहे का?

१७. कोणत्या गोष्टीमुळे आपला यहोवासोबतचा नातेसंबंध बिघडू शकतो?

१७ मत्तय ६:३१, ३२ वाचा. ज्या लोकांना यहोवाची ओळख नाही ते आपल्या जीवनात पैसा आणि इतर गोष्टी मिळवण्याच्याच मागे असतात. पण आपणदेखील त्यांच्यासारखंच वागलो तर यहोवासोबतचा आपला नातेसंबंध बिघडू शकतो. यहोवा आपला पिता आहे आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो, याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे. तसंच, आपल्याला याची खात्री आहे की जर आपण त्याचं ऐकलं आणि जीवनात राज्याच्या कामांना प्राधान्य दिलं, तर तो आपल्या गरजा नक्की पुरवेल. पण फक्त गरजाच नाही तर यहोवा त्याहूनही अधिक देतो हे आपण अनुभवलेलंच आहे, नाही का? यहोवासोबत चांगला नातेसंबंध टिकवून ठेवल्यामुळे आपण जीवनात आनंदी राहू हे आपल्याला माहीत आहे. यामुळे “अन्नवस्त्र” असल्यास तितक्यातच समाधान मानण्यास आपल्याला मदत मिळते.—१ तीम. ६:६-८.

तुम्ही देवाच्या राज्याला आपल्या जीवनात पहिलं स्थान देता का?

१८. आपल्याबद्दल यहोवाला काय माहीत आहे आणि तो आपल्यासाठी काय करेल?

१८ मत्तय ६:३३ वाचा. आपण जीवनात देवाच्या राज्याला प्रथम स्थान दिलं तर यहोवा आपल्या गरजा नक्की पुरवेल. याची आपण खात्री का बाळगू शकतो हे येशूने स्पष्ट केलं. त्याने म्हटलं: “तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” पुढे आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज पडेल हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, पण यहोवाला ते माहीत आहे. (फिलिप्पै. ४:१९) आपल्याला कपड्यांची, अन्नाची आणि राहण्यासाठी घराची गरज आहे, हेदेखील त्याला माहीत आहे. आपली प्रत्येक मूलभूत गरज पूर्ण होईल याकडे यहोवा लक्ष देतो.

१९. भविष्याबद्दल आपण चिंता का करू नये?

१९ मत्तय ६:३४ वाचा. येशूने पुन्हा एकदा आपल्या शिष्यांना आठवण करून दिली: “चिंता करू नका.” आपली रोजची गरज यहोवा नक्की पुरवेल. त्यामुळे भविष्यात काय होईल याबद्दल आपण खूप जास्त विचार करू नये. आपण असं केलं तर कदाचित यहोवावर भरवसा ठेवण्याऐवजी स्वतःवर जास्त भरवसा करायला लागू. यामुळे आपला त्याच्यासोबतचा नातेसंबंध बिघडू शकतो. याऐवजी आपण पूर्णपणे त्याच्यावर भरवसा ठेवला पाहिजे.—नीति. ३:५, ६; फिलिप्पै. ४:६, ७.

आधी राज्यासाठी झटा, मग यहोवा तुमची नक्की काळजी घेईल

राज्याच्या कामांमध्ये जास्त वेळ देता यावा म्हणून तुम्ही तुमचं जीवन साधं बनवू शकता का? (परिच्छेद २० पाहा)

२०. (क) यहोवाच्या सेवेत तुम्ही कोणतं ध्येय ठेवू शकता? (ख) आपलं जीवन साधं बनवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

२० आपण भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी आपली सर्व शक्ती खर्च केली, तर यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्याजवळ काहीच शक्ती उरणार नाही. ही खरंच किती दुःखाची गोष्ट ठरेल. असं करण्याऐवजी आपण यहोवाला आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, प्रचारकांची जिथं जास्त गरज आहे अशा मंडळीला तुम्ही मदत करू शकता का? तुम्ही पायनियर बनू शकता का? जर तुम्ही पायनियर असाल, तर मग सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाण्याचा तुम्ही विचार करू शकता का? तुम्ही आठवड्यातील काही दिवस बेथेल गृहात किंवा भाषांतर कार्यालयात (आर.टी.ओ) मदत करू शकता का? किंवा मग तुम्ही स्थानिक बांधकाम प्रकल्पांवर स्वयंसेवक या नात्यानं, राज्य सभागृहाच्या बांधकामात काही वेळ देऊ शकता का? राज्याच्या कामात तुम्हाला जास्त वेळ आणि शक्ती खर्च करता येईल यासाठी तुम्ही तुमचं जीवन साधं कसं बनवू शकता याबद्दल विचार करा. “ आपलं जीवन साधं कसं बनवावं” या चौकटीत काही व्यावहारिक सल्ले देण्यात आले आहेत. तुम्हाला कोणते बदल करण्याची गरज आहे त्याबद्दल यहोवाला प्रार्थनेत मदत मागा. आणि मग लगेच जीवनात ते बदल करण्याचा प्रयत्न करा.

२१. यहोवासोबतचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ करण्यास आपल्याला कशामुळे मदत होईल?

२१ येशूने आपल्याला राज्यासाठी झटण्यास शिकवलं. आपण राज्याच्या कामांना जीवनात प्राधान्य दिलं तर आपल्या गरजांबद्दल वाजवीपेक्षा जास्त चिंता करण्याचं आपण टाळू शकतो. यहोवा आपल्या गरजा पुरवेल हा भरवसा बाळगल्यामुळे आपला त्याच्यासोबतचा नातेसंबंध आणखी घनिष्ठ होतो. यामुळे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट किंवा जाहिरातींद्वारे जग आपल्याला जे देऊ करतं ती प्रत्येक गोष्ट, विकत घेण्याचा मोह आपण टाळू शकतो. मग ती विकत घेण्याची आपली ऐपत असली तरीसुद्धा. आपलं जीवन साधं बनवण्याचा जर आपण आजच प्रयत्न केला, तर आपल्याला यहोवाला विश्वासू राहण्यास आणि अभिवचन दिलेले “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास” मदत मिळेल.—१ तीम. ६:१९.

[१] (परिच्छेद १२) कधीकधी यहोवाच्या काही उपासकांना उपाशी का राहावं लागतं, हे समजण्यासाठी टेहळणी बुरूज १५ सप्टेंबर २०१४, या अंकातील पृष्ठ २२ वरील “वाचकांचे प्रश्न” पाहा.