व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो”

“भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो”

कल्पना करा, एका काळोख्या रात्री तुम्ही रस्त्यावरून चालत जात आहात. अचानक तुम्हाला जाणवतं की कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा ती व्यक्तीदेखील थांबते, आणि जेव्हा तुम्ही भराभर चालू लागता तेव्हा तीदेखील तसंच करते. घाबरलेल्या अवस्थेत मग तुम्ही जवळच असलेल्या तुमच्या मित्राच्या घराकडे धाव घेता. जेव्हा तुमचा मित्र दार उघडतो आणि तुम्हाला घरात घेतो, तेव्हा कुठे तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकता.

कदाचित असा अनुभव तुम्हाला आलेला नसेल. पण, जीवनातील इतर काही चिंतांमुळे तुम्हाला काळजी वाटत असेल. उदाहरणार्थ, एखाद्या कमतरतेवर तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करत असाल. पण तसं करणं तुम्हाला फार कठीण जात असेल. किंवा तुम्ही बऱ्याच काळापासून बेरोजगार असाल आणि अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल. कदाचित तुमच्या वाढत्या वयामुळे आणि त्यामुळे उद्‌भवणाऱ्या आजारांचा विचार करून तुम्हाला काळजी वाटत असेल. किंवा मग, अशाच इतर काही गोष्टी असतील ज्यांमुळे तुम्ही काळजी व चिंता करत असाल.

समस्या किंवा काळजी कोणतीही असली, तरी अशा वेळी आपलं ऐकून घेणारा व आपली मदत करणारा एखादा जवळचा मित्र असला, तर आपल्याला अगदी बरं वाटतं, नाही का? मग तुमचाही असा कोणी जवळचा मित्र आहे का? हो नक्कीच आहे, यहोवा! यशया ४१:८-१३ मधून आपल्याला कळतं की यहोवा आणि विश्वासू पुरुष अब्राहाम यांची मैत्री होती. याच अध्यायातील वचन १० आणि १३ मध्ये तो आपल्या प्रत्येकाला असं अभिवचन देतो: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो.”

“मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो”

यहोवाचं हे अभिवचन खरोखरच किती सांत्वनदायी आहे! या वचनांत नेमकं काय म्हटलं आहे त्याकडे थोडं लक्ष द्या. वचनांत असं म्हटलेलं नाही, की तुम्ही यहोवाचा हात धरून त्याच्या सोबत चालत आहात. जर तसं असतं तर यहोवाच्या उजव्या हातात तुमचा डावा हात असता. याउलट, यहोवाने “धार्मिकतेच्या उजव्या हाताने” तुमचा “उजवा हात” धरला आहे. एका अर्थी त्याने आपल्याला आपल्या समस्येतून बाहेर ओढून काढण्यासाठी त्याचा उजवा हात दिला आहे. आणि असं करताना आपल्याला धीर देण्यासाठी तो म्हणतो, “भिऊ नको, मी तुला साहाय्य करतो.”

तुम्ही यहोवाला तुमचा प्रेमळ पिता आणि मित्र समजता का? जेव्हा तुम्ही संकटात किंवा समस्येत असता तेव्हा तो तुमच्या मदतीकरता धावून येईल, असा विश्वास तुम्ही बाळगता का? यहोवाला तुमची खरोखर काळजी आहे आणि तुम्हाला मदत करण्याची त्याची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही संकटातून किंवा परीक्षेतून जात असता, तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटावं अशी त्याची इच्छा आहे. कारण त्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. “तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.”—स्तो. ४६:१.

जेव्हा भूतकाळातील चुकांबद्दल आपल्यात दोषीपणाची भावना असते

भूतकाळात केलेल्या चुकांना काही जण विसरत नाहीत. देवाने आपल्याला खरोखर क्षमा केली असेल का, असा प्रश्न त्यांना पडतो. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर विश्वासू ईयोबाचं उदाहरण लक्षात घ्या. तरुण असताना आपण पाप केलं आहे, हे त्याने कबूल केलं. (ईयो. १३:२६) स्तोत्रकर्ता दाविदाच्याही भावना काहीशा अशाच होत्या. यहोवाकडे त्याने अशी विनवणी केली की, “माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नको.” (स्तो. २५:७) अपरिपूर्ण असल्यामुळे “सर्वांनी पाप केले आहे” आणि त्यामुळे आपण “देवाच्या गौरवाला उणे” पडलो आहोत.—रोम. ३:२३.

यशया अध्याय ४१ मधील वचनं इस्राएली लोकांसाठी लिहिली गेली होती. त्यांनी केलेलं पाप इतकं गंभीर होतं की त्याबद्दल त्यांना दंड दिला जाईल आणि त्यांना बॅबिलोनच्या बंदिवासात जावं लागेल असं यहोवाने सांगितलं. (यश. ३९:६, ७) पण त्याच वेळी यहोवाने हेदेखील अभिवचन दिलं की जे पश्‍चात्ताप करतील आणि त्याच्याकडे पुन्हा येतील, त्यांना तो त्या बंदिवासातून मुक्त करेल. (यश. ४१:८, ९; ४९:८) आजही जे खरा पश्‍चात्ताप दाखवतात आणि यहोवाचं मन आनंदित करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर यहोवा दया दाखवतो आणि प्रेम करतो.—स्तो. ५१:१.

मारसेल या आपल्या बांधवाचा अनुभव लक्षात घ्या. * त्याला पोर्नोग्राफी पाहण्याची आणि हस्तमैथूनाची सवय जडली होती. बराच प्रयत्न करूनसुद्धा त्याला या सवयीवर पूर्णपणे मात करणं कठीण गेलं. याबद्दल त्याच्या भावना व्यक्त करताना तो म्हणतो: “मी कोणत्याही योग्यतेचा नाही असं मला वाटायचं. पण जेव्हा-केव्हा मी प्रार्थनेमध्ये यहोवाकडे कळकळीने विनवणी केली, तेव्हा त्याने मला माझ्या त्या पडलेल्या अवस्थेतून सावरलं.” यहोवाने मारसेलला कशा प्रकारे मदत केली? मारसेलच्या मंडळीतील वडिलांनी त्याला सांगितलं की जेव्हा-जेव्हा तो स्वतःला या गोष्टींमध्ये पुन्हा अडकवेल, तेव्हा त्याने त्यांना फोन करावा. मारसेल म्हणतो: “अशा वेळी त्यांना फोन करणं फार अवघड होतं, पण जेव्हा-केव्हा मी त्यांना फोन केला, तेव्हा मला धैर्य व शक्ती मिळाली.” त्यानंतर मंडळीतील वडिलांनी विभागीय पर्यवेक्षकांसोबत त्याची भेट निश्‍चित केली. विभागीय पर्यवेक्षक त्याला म्हणाले: “मी इथं आलो हा योगायोग नाही. मी इथं आलो कारण वडिलांची इच्छा होती की मी तुला येऊन भेट द्यावी. तुला शेपर्डिंग विझिट मिळावी अशी त्यांची इच्छा होती.” मारसेल म्हणतो: “मी पाप करत होतो, तरीदेखील यहोवाने मंडळीतील वडिलांमार्फत मला मदत पुरवली.” कालांतराने, मारसेलच्या या वाईट सवयी सुटल्या आणि तो पायनियर सेवा करू लागला. आणि आता तो बेथेलमध्ये पूर्ण वेळेची सेवा करत आहे. यहोवाने ज्या प्रकारे या बांधवाला मदत केली, त्याच प्रकारे जेव्हा आपण चुकतो तेव्हा तो आपल्याला मदत करायला तयार असतो.

जेव्हा आपण नोकरीबद्दल चिंता करतो

बेरोजगारी ही अनेकांसाठी चिंतेचं कारण ठरते. काही जण त्यांची नोकरी गमावतात आणि दुसरी नोकरी त्यांना सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे ‘आपली काहीच किंमत नाही’ किंवा ‘मी कोणत्याही योग्यतेचा नाही’ अशा भावना त्यांच्या मनात येतात. मग अशा परिस्थितीत यहोवा कशी मदत पुरवतो? तो कदाचित तुम्हाला हवी तशी नोकरी लगेच मिळवून देणार नाही, पण दाविदाने जे लिहिलं ते लक्षात ठेवण्यास तो तुम्हाला नक्कीच साहाय्य करेल. दाविदाने म्हटलं: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तो. ३७:२५) यहोवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात, आणि तो त्याच्या “धार्मिकतेच्या उजव्या हाताने” तुम्हाला नक्कीच सावरेल. त्याची सेवा करत राहण्यासाठी ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे, त्या सर्व तो तुम्हाला पुरवेल.

जेव्हा तुम्ही नोकरी गमावता तेव्हा यहोवा तुम्हाला कशा प्रकारे मदत पुरवतो?

कोलंबियात राहणाऱ्या साराने यहोवाच्या मदतीचा हात कसा अनुभवला हे लक्षात घ्या. ती एका प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या पगारावर काम करत होती. पण तिला यहोवाची अधिक सेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने तिची नोकरी सोडली आणि पायनियर सेवा करू लागली. पण तिला हवी असलेली अर्धवेळेची नोकरी मिळाली नाही. म्हणून मग तिने आईस्क्रिमचं एक लहानसं दुकान टाकलं. पण यातही तिला नफा झाला नाही व हळूहळू तिचा सर्व पैसाही संपला. आणि तिला ते दुकान बंद करावं लागलं. ती म्हणते, “अशीच तीन वर्षं संपली, पण मी यहोवाला धन्यवाद देते की त्याने मला सहन करण्याची ताकद दिली.” उद्याची चिंता उद्यावर टाकण्यास आणि आपल्याला नक्की कोणत्या गोष्टींची गरज आहे हे समजून घेण्यास ती शिकली. (मत्त. ६:३३, ३४) कालांतरानं, तिच्या जुन्या कंपनीच्या मालकानं तिला फोन केला आणि ती आधी करत असलेलं काम पुन्हा करेल का, असं विचारलं. पण तिने त्या मालकाला सांगितलं की जर हे काम अर्धवेळेचं असेल आणि सभेसाठी, संमेलनासाठी व अधिवेशनांसाठी तिला सुटी मिळत असेल, तरच ती ते काम स्वीकारेल. आज सारा पूर्वीप्रमाणे फार पैसे कमवत नाही, पण ती पायनियर सेवा करू शकते. ती म्हणते, त्या कठीण काळातही यहोवाने त्याच्या प्रेमळ हाताने तिला कसं साहाय्य केलं हे तिने अनुभवलं.

वाढत्या वयामुळे वाटणारी चिंता

वाढतं वय हेदेखील अनेकांसाठी एक चिंतेचं कारण ठरतं. लवकरच आपण सेवानिवृत्त होऊ आणि मग त्यानंतरचं आपलं जीवन कसं असेल, आपल्याजवळ पुरेसा पैसा राहील की नाही याविषयी ते विचार करतात. वाढत्या वयाबरोबरच होणाऱ्या आजारांविषयी देखील ते चिंता करतात. स्तोत्रकर्त्याने जो कदाचित दावीद असावा, यहोवाकडे अशी विनंती केली की, “उतारवयात माझा त्याग करू नको; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नको.”—स्तो. ७१:९, १८.

मग, उतारवयातही यहोवा आपली काळजी घेईल असा भरवसा यहोवाचे सेवक कसा बाळगू शकतात? यासाठी त्यांना त्यांचा विश्वास मजबूत ठेवण्याची गरज आहे. तसंच, आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व यहोवा नक्की पुरवेल ही खात्री बाळगण्याची गरज आहे. पण काही जण पूर्वी कदाचित ऐशआरामाचं जीवन जगले असतील. म्हणून मग आता त्यांना साधं जीवन जगण्याचं आणि आहे त्यात समाधानी राहण्याचं कदाचित शिकावं लागेल. “पोसलेल्या बैलाची मेजवानी” यापेक्षा “भाजीभाकरी” ही त्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे, हेदेखील त्यांना कदाचित जाणवेल. (नीति. १५:१७) जर तुम्ही यहोवाच्या सेवेवर तुमचं लक्ष केंद्रित केलं, तर उतारवयातही तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व तो नक्की पुरवेल.

जोसे आणि रोझ, टोनी आणि वेंडी या जोडप्यासोबत

जोसे आणि रोझ या जोडप्यानं ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्णवेळेची सेवा केली आहे, त्यांचा अनुभव पाहा. या पासष्ट वर्षांच्या काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. जोसेच्या वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्याचे वडील शारीरिक रीत्या सर्वस्वी इतरांवर अवलंबून असल्यामुळे २४ तास त्यांना मदतीची गरज होती. तसंच जोसेला देखील कॅन्सर होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि त्याला किमोथेरपी सहन करावी लागायची. मग या विश्वासू जोडप्याला यहोवाने त्याच्या मदतीचा ‘उजवा हात’ कसा दिला? यासाठी यहोवाने टोनी आणि वेंडी या आणखी एका ख्रिस्ती जोडप्याचा उपयोग केला. या जोडप्याची अशी इच्छा होती की, त्यांच्याकडे असलेलं आणखी एक घर त्यांनी कोणा पूर्णवेळ पायनियर सेवा करणाऱ्याला कोणताही मोबदला घेतल्याशिवाय द्यावं. टोनीला आठवतं की जेव्हा तो शाळेत होता, तेव्हा तो नेहमी जोसे आणि रोझला प्रचारकार्यात आवेशाने सहभाग घेताना पाहायचा. त्यांचा सेवाकार्यासाठीचा आवेश त्याला आवडायचा, आणि या गोष्टीने त्याच्या मनावर मोठी छाप पाडली. जोसे आणि रोझ या जोडप्यानं आपलं संपूर्ण आयुष्य यहोवाच्या सेवेत घालवलं, म्हणून आपलं ते घर त्यांना देण्याचं टोनी आणि वेंडीने ठरवलं. जोसे आणि रोझ आता जवळपास ८५ वर्षांचे आहेत, आणि गेली १५ वर्षं टोनी आणि वेंडी त्यांची मदत करत आहेत. टोनी आणि वेंडी ही यहोवाकडून मिळालेली एक प्रेमळ भेटच आहे असं जोसे आणि रोझला वाटतं.

यहोवा तुम्हालाही अभिवचन देत आहे: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे.” तो त्याचा ‘धार्मिकतेचा उजव्या हात’ तुम्हालाही देऊ करत आहे. मग तुम्हीही तुमचा हात पुढे कराल का?

^ परि. 11 काही नावं बदलण्यात आली आहेत.