व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?

यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?

“जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथ. १०:३१.

गीत क्रमांक: ३४, २९

१, २. पेहरावाच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांचे उच्च स्तर का आहेत? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

चर्चचे पुढारी त्यांच्या सभांसाठी कशा प्रकारचे कपडे घालतात याबद्दल हॉलंड देशातील एका वृत्तपत्रात असं सांगण्यात आलं: “बऱ्याच पुढाऱ्यांचे कपडे कार्यक्रमाला शोभतील असे नसतात, खासकरून खूप उष्णता असते तेव्हा.” पण त्याच वृत्तपत्रात, यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या अधिवेशनासाठी कशा प्रकारचे कपडे घातले होते याबद्दलही सांगण्यात आलं. त्यात त्यांनी सांगितलं की मुलं व पुरुष यांनी कोट आणि टाय घातला होता. तसंच मुली आणि स्त्रिया यांनी जे स्कर्ट्‌स घातले होते तेही शालीन होते. यहोवाचे साक्षीदार ज्या प्रकारचा पेहराव करतात त्यासाठी सहसा त्यांची स्तुती केली जाते. प्रेषित पौलाने सांगितलं की ख्रिश्चनांनी नेहमी “भिडस्तपणाने व मर्यादेने” पेहराव केला पाहिजे. कारण असा पेहराव देवाच्या सेवकांसाठी योग्य आहे. (१ तीम. २:९, १०) या वचनांत पौल जरी स्त्रियांच्या पेहरावाबद्दल बोलत असला, तरी त्यांतील तत्त्वं बांधवांनाही लागू होतात.

यहोवाचे सेवक या नात्याने पेहरावाच्या बाबतीत उच्च स्तर बाळगणं महत्त्वाचं आहे. आणि यहोवा देवही या स्तरांना महत्त्वाचं लेखतो. (उत्प. ३:२१) बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की पेहरावाबद्दल विश्वाचा सर्वोच्च अधिकारी यहोवा, याने स्तर ठरवून दिले आहेत. आणि त्याच्या सेवकांनी ते पाळावेत अशी त्याची इच्छा आहे. यामुळे आपण कोणते कपडे घालणार हे निवडताना आपल्याला काय चांगलं वाटतं हे महत्त्वाचं नाही, तर यहोवा देवाला ते मान्य आहे की नाही हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे.

३. यहोवाने इस्राएली लोकांना पेहरावाबद्दल जो नियम दिला त्यावरून आपण काय शिकतो?

इस्राएली लोकांचं इतर राष्ट्रांच्या अनैतिक जीवनशैलीपासून संरक्षण व्हावं म्हणून, नियमशास्त्रात काही नियम देण्यात आले होते. स्त्री आणि पुरुष यांमधला फरक ओळखू येणार नाही अशा पेहरावाप्रती यहोवाला वाटणारा तिरस्कार नियमशास्त्रातून स्पष्टपणे दिसून येतो. (अनुवाद २२:५ वाचा.) आज फॅशनच्या नावाखाली लोक अशा काही प्रकारचा पेहराव करतात ज्यामुळे स्त्री आणि पुरुष यांमधला फरक ओळखू येत नाही. जगात याला ‘युनिसेक्स फॅशन’ असं म्हटलं जातं. यहोवाने दिलेल्या नियमांवरून आपल्याला कळतं की त्याला असा पेहराव मुळीच पसंत नाही. तसंच, जे पुरुष स्त्रियांसारखा पेहराव करतात किंवा ज्या स्त्रिया पुरुषांसारखा पेहराव करतात तेदेखील यहोवाला मुळीच पसंत नाही.

४. योग्य प्रकारचे कपडे निवडण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

देवाच्या वचनांत आपल्याला अशी बरीच तत्त्वं सापडतात ज्यांवर मनन केल्यास आपल्याला योग्य प्रकारचा पेहराव निवडण्यास मदत होऊ शकते. आपण कोणत्याही देशात राहत असलो किंवा तिथलं हवामान आणि संस्कृती कशीही असली, तरी ही तत्त्वं आपल्याला लागू होतात. कोणत्या प्रकारचे कपडे आपल्यासाठी योग्य आहेत आणि कोणते नाहीत, यासाठी आपल्याजवळ एक मोठी यादी असण्याची गरज नाही. तर आपल्याला बायबलमधील तत्त्वांनुसार याबाबतीत निवड करण्याची गरज आहे. आणि या तत्त्वांचं पालन करूनही आपण आपल्याला आवडणारे कपडे घालू शकतो. आता आपण काही बायबल तत्त्वांवर चर्चा करू या ज्यांमुळे आपल्याला “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे” हे ओळखून पेहराव निवडता येईल.—रोम. १२:१, २.

देवाचे सेवक म्हणून आपण आपली ओळख करून देतो

५, ६. आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्याचा इतरांवर कसा प्रभाव पडला पाहिजे?

देवाने प्रेषित पौलाला २ करिंथकर ६:४ (वाचा.) या वचनात एक महत्त्वाचं तत्त्व लिहिण्यास प्रेरीत केलं. आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यावरून आपण कशा प्रकारची व्यक्ती आहोत हे दिसून येतं. आणि लोक सहसा आपला पेहराव पाहूनच आपल्याबद्दल मत बनवत असतात. (१ शमु. १६:७) आपण देवाचे सेवक आहोत. त्यामुळे कपड्यांच्या बाबतीत आपल्याला काय आवडतं किंवा आपल्याला काय आरामदायी वाटतं, फक्त इतकाच विचार करणं पुरेसं नाही; तर आपण नेहमी बायबल तत्त्वांना लागू केलं पाहिजे. तसं केल्यास आपण अशा प्रकारचे कपडे घालणार नाही जे अंगाला अगदी चिकटून असतील, किंवा ज्यामुळे शरीर झाकलं जाणार नाही किंवा जे उत्तेजक असतील. याचा अर्थ की आपण असे कोणतेही कपडे घालायचं टाळू ज्यांमुळे आपल्या शरीरातील एखादा भाग उभारून दिसेल किंवा ज्यामुळे अंगप्रदर्शन होईल आणि इतरांच्या मनात चुकीच्या भावना उत्पन्न होतील. आपण कधीही असे कपडे घालू नयेत, ज्यांमुळे इतरांना आपल्याशी बोलताना अवघडल्यासारखं वाटेल किंवा ते आपल्याशी बोलण्याचं टाळतील.

आपले कपडे जर स्वच्छ, नीटनेटके आणि सभ्य असतील, तर यहोवाचे सेवक या नात्याने लोक आपला जास्त आदर करतील. आणि आपण यहोवा देवाची उपासना का करतो हे जाणून घेण्यासाठी त्यांची आस्था वाढेल. तसंच, आपल्या संघटनेबद्दल त्यांच्या मनात कदर वाढेल आणि सुवार्ता ऐकून घेण्यासही ते तयार होतील.

७, ८. आपण खासकरून कोणत्या वेळी योग्य प्रकारचे कपडे घालणं गरजेचं आहे?

पेहरावाची निवड करताना आपण आपल्या पवित्र देवाचा, बंधुभगिनींचा आणि क्षेत्रातील इतर लोकांचाही विचार केला पाहिजे. यहोवा देवाचा आणि आपण जो संदेश सांगतो त्याचा आदर होईल अशा प्रकारचेच कपडे आपण घातले पाहिजेत. (रोम. १३:८-१०) खासकरून सभांना आणि प्रचारात जाताना आपण ज्या प्रकारचा पेहराव करतो त्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. देवाची उपासना करणाऱ्या लोकांना शोभेल असा पेहराव करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. (१ तीम. २:१०) हे खरं आहे की जो पेहराव एका ठिकाणी मान्य असेल, तो कदाचित दुसऱ्या ठिकाणी मान्य नसणार. त्यामुळे आपण यहोवाचे साक्षीदार या नात्यानं कधीही असा पेहराव करू नये ज्यामुळे इतर लोक आपल्याला नावं ठेवतील, मग आपण कोणत्याही प्रदेशात राहत असलो तरी.

तुमचा पेहराव पाहून लोक यहोवाच्या नावाला गौरव देतात का? (परिच्छेद ७, ८ पाहा)

पहिले करिंथकर १०:३१ वाचा. आपण संमेलनांना आणि अधिवेशनांना जातो तेव्हा आपला पेहराव प्रसंगाला शोभेल असा आणि शालीन असला पाहिजे. आज जगात फॅशनच्या नावाखाली लोक अगदीच असभ्य पेहराव करतात. पण आपण असा असभ्य पेहराव करू नये. त्यासोबतच अधिवेशनादरम्यान हॉटेलमध्ये राहताना, संध्याकाळी बाहेर जाताना आपले कपडे नेहमी सभ्य व शालीन असले पाहिजेत. असं केल्यास यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळख करून देण्यास आपल्याला संकोच वाटणार नाही. तसंच, साक्ष देण्याची संधी मिळालीच तर आपण त्यासाठीही नेहमी तयार असू.

९, १०. कपड्यांची निवड करताना फिलिप्पैकर २:४ या वचनातील सल्ला लक्षात ठेवणं का गरजेचं आहे?

फिलिप्पैकर २:४ वाचा. कपड्यांची निवड करताना आपण आपल्या बंधुभगिनींचाही विचार करणं गरजेचं आहे. याचं एक कारण आपल्याला पुढील वचनांत मिळतं: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना . . . हे जिवे मारा.” (कलस्सै. ३:२, ५) देवाचे सेवक हा सल्ला लागू करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आपल्यापैकी काही बंधुभगिनी सत्यात येण्याआधी कदाचित अनैतिक जीवन जगत असतील. आणि सत्यात येण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेऊन या वाईट सवयी सोडल्या असतील. पण कदाचित ते अजूनही त्या चुकीच्या इच्छांशी झगडत असतील. आपण जर योग्य प्रकारचे कपडे घातले नाहीत, तर कदाचित आपण अशा बंधुभगिनींसाठी त्या वाईट इच्छांशी झगडणं आणखी कठीण करू शकतो. (१ करिंथ. ६:९, १०) आपल्यामुळे अशा बंधुभगिनींना बायबल तत्त्वांचं पालन करणं कठीण जावं, अशी आपली मुळीच इच्छा नाही.

१० जगातील लोक अनैतिकतेला बढावा देतात. पण आपण जेव्हा आपल्या बंधुभगिनींसोबत असतो तेव्हा या अनैतिक वातावरणापासून दूर असतो. शिवाय आपल्या सभ्य पेहरावामुळे या चांगल्या आध्यात्मिक वातावरणाला शुद्ध ठेवण्यास मदत झाली पाहिजे; मग आपण सभांमध्ये असो की दुसऱ्या एखाद्या ठिकाणी. हे खरं आहे की कशा प्रकारचे कपडे घालावे हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे आणि आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्यही आहे. पण यासोबतच आपल्यावर एक जबाबदारीदेखील आहे. ती म्हणजे आपले कपडे नेहमी असे असले पाहिजेत ज्यांमुळे इतरांना त्यांचे विचार, बोलणं आणि वागणूक देवाच्या नजरेत शुद्ध ठेवण्यास मदत होईल. (१ पेत्र १:१५, १६) खरी प्रीती कधीच “गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथ. १३:४, ५.

वेळ आणि ठिकाणाला शोभेल असा पेहराव

११, १२. उपदेशक ३:१, १७ ही वचनं आपल्याला निवड करताना योग्य दृष्टिकोन बाळगण्यास कशी मदत करतात?

११ कपड्यांची निवड करताना यहोवाचे सेवक या नात्याने आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की “हरएक गोष्टीचा व हरएक कामाचा नेमलेला समय आहे.” (उप. ३:१, १७) आपण ज्या ठिकाणी राहतो तिथलं हवामान, ऋतू, आपलं राहणीमान आणि परिस्थिती या सर्वांचा आपण कशा प्रकारचे कपडे निवडतो यावर परिणाम होतो. पण याबाबतीत असलेले यहोवाचे तत्त्वं हे मात्र सर्वांसाठी सारखेच आहेत.—मला. ३:६.

१२ ज्या ठिकाणी खूप उष्णता असते अशा ठिकाणी कदाचित आपला पेहराव सभ्य ठेवणं काहींना कठीण जाऊ शकतं. अशा वेळेस आपण जर अंगाला चिकटतील असे, किंवा मग इतके ढिले कपडे घातले ज्यामुळे आपलं अंग पूर्णपणे झाकलं जात नाही, तर ते योग्य ठरणार नाही. याबाबतीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. (ईयो. ३१:१) यासोबतच आपण समुद्र किनाऱ्यावर किंवा स्विमींग पूलमध्ये असतो तेव्हाही आपण जे कपडे घालतो ते योग्य असले पाहिजेत. (नीति. ११:२, २०) आज जगात बरेच लोक समुद्र किनाऱ्यावर किंवा स्विमींग पूलमध्ये असताना असे कपडे घालतात ज्यामुळे अंगप्रदर्शन होतं. पण आपण नेहमी हा विचार करायला पाहिजे की आपल्या कपड्यांमुळे आपला पवित्र देव, यहोवा याच्या नावाला कलंक लागणार नाही.

१३. पेहरावाची निवड करताना १ करिंथकर १०:३२, ३३ मधील सल्ल्याचं पालन करणं गरजेचं का आहे?

१३ कपड्यांची निवड करताना आपण आणखी एक महत्त्वाचं तत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या पेहरावामुळे आपण इतरांसाठी एक अडखळण तर ठरत नाही ना, याची खबरदारी आपण बाळगायला हवी. आपण इतरांच्या विवेकाचा विचार करायला पाहिजे. (१ करिंथकर १०:३२, ३३ वाचा.) आपल्या बंधुभगिनींना आणि जे लोक यहोवाची उपासना करत नाहीत, अशांनाही आपला पेहराव खटकू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रेषित पौलाने म्हटलं: “आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.” (रोम. १५:२, ३) येशूप्रमाणेच आपल्या जीवनातही देवाच्या इच्छेला आणि इतरांना मदत करण्याला प्राधान्य असलं पाहिजे; आपल्या वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्याला नाही. यामुळे मग आपण अशा प्रकारचे कपडे घालण्याचं टाळू जे आपल्याला तर आवडतात, पण ज्यामुळे इतरांना आपला संदेश ऐकून घेण्यास कदाचित संकोच वाटेल.

१४. आपल्या पेहरावामुळे देवाचा गौरव व्हावा यासाठी आईवडील मुलांना कसं प्रशिक्षण देऊ शकतात?

१४ मुलांना बायबलमधील तत्त्वं लागू करण्यास मदत करण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे. त्यांनी आपल्या आणि आपल्या मुलांच्या पेहरावामुळे यहोवा देवाचं मन आनंदित होत आहे की नाही, याकडे लक्ष दिलं पाहिजे. (नीति. २२:६; २७:११) आपला पवित्र देव, यहोवा याच्या स्तरांचं पालन करण्याचं प्रशिक्षण आईवडील आपल्या मुलांना कसं देऊ शकतात? आईवडिलांनी याबाबतीत आधी स्वतः एक चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. आणि ख्रिश्चनांना शोभतील असे कपडे निवडण्यास त्यांनी मुलांना प्रेमळपणे मदत केली पाहिजे. कपड्यांची निवड करताना ‘मला काय आवडतं’ फक्त इतकाच विचार मुलांनी करू नये. तर यहोवाच्या नावाला गौरव मिळेल असे कपडे निवडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण मुलंदेखील यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जातात.

निवड करण्याचं स्वातंत्र्य योग्यपणे वापरा

१५. पेहराव निवडताना कोणती गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे?

१५ यहोवा देवाचा आदर होईल असे निर्णय घेण्यास बायबल आपल्याला व्यावहारिक सल्ले देतं. असं असलं तरी, आपण कशा प्रकारचे कपडे घालतो हा वैयक्तिक निर्णय आहे. कपड्यांच्या बाबतीत प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. तसंच, प्रत्येक जन आपआपल्या ऐपतीनुसार कपडे घेतो. पण आपण जे कपडे घालतो ते नेहमी स्वच्छ, नीटनेटके, शालीन आणि प्रसंगाला शोभतील असे असले पाहिजेत. तसंच, स्थानिक परिस्थितीनुसार ते इतरांना मान्यदेखील असले पाहिजेत.

१६. सभ्य पेहराव निवडण्यासाठी आपण वेळ आणि मेहनत घेतली तर त्याचा काय परिणाम होईल?

१६ आजच्या काळात शालीन आणि सभ्य कपडे सहसा मिळत नाहीत. जी फॅशन जगात प्रचलित आहे तसेच कपडे आज बऱ्याच दुकानांमध्ये मिळतात. त्यामुळे खरेदी करताना सभ्य आणि शालीन असलेले स्कर्ट्‌स, ड्रेस किंवा कोट आणि पॅन्ट्स शोधण्यासाठी तुम्हाला कदाचित जास्त वेळ द्यावा लागेल. सभ्य कपडे घातल्यामुळे आपल्या बंधुभगिनींच्या मनात असलेली आपली कदर वाढेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे आपल्या प्रेमळ पित्याचा गौरव होत आहे याचं समाधानही आपल्याला असेल. या समाधानाच्या तुलनेत आपण केलेला कोणताही त्याग कमीच असेल, नाही का?

१७. दाढी ठेवायची की नाही हे ठरवताना एका बांधवाने कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे?

१७ बांधवांनी दाढी ठेवणं योग्य आहे का? मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात पुरुषांना दाढी ठेवण्यासाठी सांगितलं गेलं होतं. पण आज आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्यामुळे आपल्याला त्यातील नियमांचं पालन करण्याची गरज नाही. (लेवी. १९:२७; २१:५; गलती. ३:२४, २५) काही संस्कृतींमध्ये व्यवस्थित रीत्या ठेवलेली दाढी सर्वमान्य असते. लोक अशा व्यक्तीचा आदर करतात आणि कदाचित सुवार्ता सांगताना लोकांचं लक्ष त्यामुळे विचलितदेखील होत नाही. संघटनेमध्ये असे काही जबाबदार बांधव आहेत ज्यांनी दाढी ठेवली आहे. पण काही बांधव कदाचित दाढी न ठेवण्याचंच ठरवतील. (१ करिंथ. ८:९, १३; १०:३२) इतर काही संस्कृतींमध्ये किंवा काही देशांत लोक सहसा दाढी ठेवत नाहीत. आणि त्यामुळे साक्षीदार बांधवांनी जर दाढी ठेवली असेल तर ते इतरांना खटकू शकतं. अशा ठिकाणी एका बांधवाने जर दाढी ठेवली तर तो देवाला गौरव देत नसणार आणि तो मंडळीत “अदूष्य” म्हणजेच निर्दोष ठरणार नाही.—१ तीम. ३:२, ७; रोम. १५:१-३.

१८, १९. मीखा ६:८ हे वचन आपल्याला कसं मदत करतं?

१८ पेहराव आणि इतर गोष्टींबद्दल योग्य काय आणि अयोग्य काय, अशी कोणतीही यादी यहोवाने आपल्याला दिलेली नाही. यावरून कळतं की यहोवा आपल्यावर कोणतीही गोष्ट लादत नाही. त्याने आपल्याला बायबल तत्त्वांच्या आधारावर वैयक्तिक निर्णय घेण्याची मोकळीक दिली आहे. म्हणून मग पेहराव आणि इतर गोष्टींच्या बाबतीत आपण नेहमी सभ्यता व मर्यादा राखून देवाची सेवा केली पाहिजे.—मीखा ६:८.

१९ यहोवा शुद्ध व पवित्र आहे आणि त्याचे स्तर आपल्या भल्यासाठीच आहेत, याची पूर्ण जाणीव आपल्या सर्वांना आहे. आपण नेहमी यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगलो तर त्यावरून दिसून येईल की आपण नम्र आहोत आणि आपण आपल्या मर्यादा ओळखतो. तसंच मर्यादेने वागल्याने हेदेखील दिसून येईल की आपल्याला इतरांच्या भावनांची व मतांची कदर आहे.

२०. आपल्या पेहरावामुळे इतरांवर कोणता परिणाम झाला पाहिजे?

२० आपल्या पेहरावावरून इतरांना हे स्पष्टपणे जाणवायला हवं की आपण यहोवाचे साक्षीदार आहोत. यहोवाचे स्तर उच्च आहेत आणि आपण त्यांचं आनंदाने पालन करतो. बऱ्याच बंधुभगिनींनी पेहराव आणि वागणुकीच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं आहे, आणि त्यासाठी आम्ही त्यांची प्रशंसा करतो. त्यांचा सभ्य पेहराव व चांगली वागणूक पाहून बरेच लोक सुवार्तेकडे आकर्षित होतात. यामुळे यहोवा देवाचा गौरव होतो आणि त्याचं मन आनंदित होतं. म्हणून पेहरावाबद्दल नेहमी योग्य निवड करण्याद्वारे, “मान व महिमा यांनी मंडित” असलेल्या यहोवाच्या नावाला आपण महिमा देत राहू या.—स्तो. १०४:१, २.