व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

व्यावहारिक ज्ञान मिळवा आणि सांभाळून ठेवा

व्यावहारिक ज्ञान मिळवा आणि सांभाळून ठेवा

ही गोष्ट तुम्ही नक्कीच ऐकली असेल–एका दूरच्या गावात एक गरीब मुलगा राहात होता. सर्व लोक त्याला मूर्ख समजायचे आणि त्याच्यावर हसायचे. बाहेरगावावरून आलेल्या आपल्या मित्रांसमोर त्याची थट्टा करायचे. ते त्याच्यासमोर दोन नाणी धरायचे, चांदीचं एक मोठ्‌ठं नाणं आणि त्याच्या दुप्पट किमतीचं सोन्याचं लहानसं नाणं. “तुला जे नाणं हवं ते तू निवड,” असं त्याला म्हणायचे. पण मुलगा, चांदीचं नाणं घेऊन निघून जायचा . . .

एकदा एका माणसाने त्या लहान मुलाला विचारलं, “सोन्याचं लहान नाणं हे चांदीच्या त्या मोठ्या नाण्यापेक्षा दुपटीनं मौल्यवान आहे, हे तुला माहीत नाही का?” त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर उमटली. तो म्हणाला, “हो मला माहीत आहे.” त्या माणसाने पुन्हा त्याला विचारलं “मग तू नेहमी चांदीचंच नाणं का घेतोस? तू सोन्याचं नाणं घेतलंस तर त्याचे दुप्पट पैसे येतील.” त्यावर मुलगा म्हणाला, “ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं घेईल, त्या दिवशी हे लोक हा खेळ थांबवतील. आणि तुम्हाला माहीत आहे का, आत्तापर्यंत माझ्याकडे किती चांदीची नाणी साठली आहेत ते!” या गोष्टीतल्या या लहान मुलाने एक असा गुण दाखवला आहे ज्याचा फायदा मोठ्यांनादेखील होऊ शकतो. तो गुण म्हणजे–व्यावहारिक ज्ञान.

बायबल आपल्याला आर्जवतं: “तू चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव. तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही.” (नीति. ३:२१, २३) त्यामुळे “चातुर्य” किंवा व्यावहारिक ज्ञान म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो, हे शिकल्यामुळे आपलं संरक्षणच होईल. यामुळे आपल्या “पायाला ठोकर” लागणार नाही आणि आध्यात्मिक रीत्या अडखळण्यापासून आपण बचावू.

व्यावहारिक ज्ञान काय आहे?

व्यावहारिक ज्ञान हे एखाद्या विषयाची फक्त माहिती आणि समज असणं यापेक्षा वेगळं आहे. एखादी माहीतगार व्यक्ती विषयाची फक्त माहिती मिळवते आणि वस्तुस्थिती जाणून घेते. आणि ज्या व्यक्तीला विषयाची खोल समज आहे, ती त्या गोष्टी एकमेकांशी कशा निगडित आहेत व त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे स्पष्टपणे समजते. पण ज्या व्यक्तीला व्यावहारिक ज्ञान आहे ती व्यक्ती या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ घालते. ती माहितीचा आणि समंजसपणाचा उपयोग करून कार्य करते.

उदाहरणार्थ, एखादा बायबल विद्यार्थी कदाचित कमी वेळेत बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक वाचेल आणि समजून घेईल. आणि बायबल अभ्यासाच्या वेळी तो सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं देईल. तो कदाचित सभांना हजर राहू लागेल आणि सभेमध्ये चांगली उत्तरंदेखील देईल. या सर्व गोष्टी दाखवतात की तो आध्यात्मिक रीत्या प्रगती करत आहे. पण याचा अर्थ असा होतो का, की त्याला ज्ञान प्राप्त झालं आहे? असं गरजेचं नाही. कारण कदाचित तो अशा व्यक्तींपैकी असेल जी एखादी गोष्ट लवकर शिकते आणि समजून घेते. पण, जेव्हा तो विद्यार्थी शिकलेल्या गोष्टींविषयीची माहिती जीवनात लागू करतो आणि समंजसपणाने चालतो, तेव्हा त्याने खऱ्या अर्थाने ज्ञान मिळवलं आहे असं म्हणता येईल. तो आपल्या आयुष्यात विचारपूर्वक निर्णय घेईल आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, तेव्हा हे स्पष्ट होईल की त्याने व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग केला आहे.

मत्तय ७:२४-२७ मध्ये, घर बांधणाऱ्या दोन मनुष्यांचा दाखला आपल्याला वाचायला मिळतो. त्यातील एकाचा येशूने “सुज्ञ” म्हणून उल्लेख केला. भविष्यात काय होऊ शकतं याचा विचार करून त्याने आपलं घर खडकावर बांधलं. तो दूरदृष्टी राखणारा आणि व्यावहारिक विचार करणारा होता. वाळूवर घर बांधल्याने ते आपल्याला स्वस्तात पडेल आणि घरही लवकर बांधून संपेल, असा विचार त्याने केला नाही. तर, समंजसपणाने आपल्या कृत्यांचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार त्याने केला. त्यामुळे जेव्हा पूर आला व वाराही सुटला तेव्हा त्याचं घर कोसळलं नाही. मग आता प्रश्न येतो की, फार मौल्यवान असलेलं हे व्यावहारिक ज्ञान आपण कसं मिळवू शकतो आणि ते कसं टिकवून ठेवू शकतो?

मला ते कसं मिळू शकतं?

पहिली गोष्ट, बायबलमध्ये म्हटलं आहे, “तुझ्या [देवाच्या] नामाचे भय धरणे म्हणजे संपूर्ण ज्ञान होय.” (मीखा ६:९, मराठी कॉमन लँग्वेज) देवाच्या नावाचे भय धरणे यांत देवाचा आदर करणंदेखील समाविष्ट आहे. यात त्याच्या नावाला आणि त्याने ठरवलेल्या स्तरांना योग्य आदर देणं सामील आहे. एखाद्या व्यक्तीचा आदर करण्यासाठी तुम्हाला प्रथम त्या व्यक्तीची ओळख हवी, ती कशा प्रकारे विचार करते हे माहीत हवं. तेव्हाच तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू शकता, तिच्याकडून शिकू शकता आणि तिच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करू शकता. यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर आपल्या कृत्यांचा काय परिणाम होऊ शकतो त्याचा विचार केल्यास, तसंच बायबल तत्त्वांवर आधारित निर्णय घेतल्यास तुम्हाला व्यावहारिक ज्ञान मिळवणं शक्य होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे, नीतिसूत्रे १८:१ मध्ये म्हटलं आहे: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” आपण जर खबरदारी घेतली नाही, तर यहोवा देव आणि त्याच्या लोकांपासून दूर जाऊ. एकटं पडण्यापासून बचावण्यासाठी आपण यहोवाच्या नावाचं भय धरणाऱ्यांबरोबर आणि त्याच्या स्तरांनुसार चालणाऱ्यांबरोबर वेळ घालवला पाहिजे. शक्य असेल तितकं आपण सभांना गेलं पाहिजे आणि ख्रिस्ती मंडळीसोबत संगती ठेवली पाहिजे. तसंच, सभेमध्ये आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. यामुळे देवाचं वचन ग्रहण करण्यासाठी आणि त्याला आपल्या जीवनात कार्य करू देण्यासाठी आपल्याला मदत होईल.

याशिवाय, जेव्हा प्रार्थनेमध्ये आपण आपलं अंतःकरण यहोवासमोर मोकळं करतो, तेव्हा आपण त्याच्या आणखी जवळ जातो. (नीति. ३:५, ६) तसंच जेव्हा आपण बायबल आणि संघटनेकडून मिळणारी प्रकाशनं वाचतो आणि त्यातील तत्त्वं व माहिती मनापासून ग्रहण करतो, तेव्हा आपल्या कृत्यांचा दूरगामी होणारा परिणाम आपल्याला समजतो आणि योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते. यासोबतच प्रौढ ख्रिस्ती बांधवांकडून मिळणारा सल्ला स्वीकारण्यासाठी आपण मनापासून तयार असलं पाहिजे. (नीति. १९:२०) असं केल्यास आपल्याला “सुज्ञतेचा” म्हणजे व्यवहार उपयोगी ज्ञानाचा ‘संताप’ येणार नाही, तर आपण त्याला धरून राहू.

याचा माझ्या कुटुंबाला कसा फायदा होईल?

व्यावहारिक ज्ञानामुळे कुटुंबं सुरक्षित राहू शकतात. ते कसं? एक उदाहरण घ्या. बायबल सांगतं, “पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी,” म्हणजेच त्याचा आदर करावा. (इफिस. ५:३३) पती आपल्या पत्नीकडून आदर कसा मिळवू शकतो? जर त्याने जबरदस्तीने किंवा कठोरतेनं वागून आपल्या पत्नीकडून आदर मिळवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम फार काळ टिकणार नाहीत. कदाचित वादविवाद टाळण्यासाठी त्याची पत्नी तो घरात असताना त्याला आदर दाखवेल. पण जेव्हा तो समोर नसेल तेव्हाही त्याचा आदर करणं तिला शक्य होईल का? साहजिकच असं करणं तिला अवघड जाईल. यामुळे आपला आदर करणं आपल्या पत्नीला नेहमी सोपं जावं यासाठी आपण काय करू शकतो, याचा पतीने विचार केला पाहिजे. जर त्याने आत्म्याच्या फळात सामील असलेले गुण दाखवले आणि तिच्याशी प्रेमानं आणि दयेनं वागला, तर तो आपल्या पत्नीचा आदर कमावू शकतो. पण हेदेखील तितकंच खरं आहे की, पती आदरास पात्र असला किंवा नसला तरी एका ख्रिस्ती पत्नीने त्याला नेहमी आदर दाखवायला हवा.—गलती. ५:२२, २३.

बायबल हेदेखील सांगतं की पतीने आपल्या पत्नीवर प्रेम केलं पाहिजे. (इफिस. ५:२८, ३३) पतीने आपल्यावर प्रेम करत राहावं यासाठी त्याची पत्नी त्याला न आवडणाऱ्या गोष्टी कदाचित त्याच्यापासून लपवून ठेवेल; त्याला सांगणार नाही. पण ज्या गोष्टी जाणून घेण्याचा पतीला हक्क आहे, त्या त्याला न सांगणं सुज्ञपणाचं ठरेल का? आणि जेव्हा ती गोष्ट उघडकीस येईल त्या वेळी त्याचे परिणाम काय होतील? त्यानंतर त्याला आपल्या पत्नीवर प्रेम करत राहणं सोपं जाईल का? कदाचित तसं करणं त्याला अवघड जाईल. पण याउलट जर पत्नीने योग्य वेळ पाहून पतीला आवडत नसलेल्या गोष्टी शांतपणे समजावून सांगितल्या, तर पत्नीने दाखवलेल्या प्रामाणिकपणाची पती कदर करेल. आणि तिच्याविषयीचं त्याचं प्रेम आणखी वाढेल.

तुम्ही आपल्या मुलांना ज्या प्रकारे शिस्त लावता त्याचा, भविष्यात तुमच्यामध्ये आणि मुलांमध्ये असलेल्या नातेसंबंधांवर परिणाम होतो

मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेत राहणं आणि त्यांना यहोवाच्या भयात वाढवणं गरजेचं आहे. (इफिस. ६:१, ४) याचा अर्थ असा आहे का, की मुलांनी काय करावं आणि काय करू नये याची एक यादीच पालकांनी त्यांना द्यावी? नाही. मुलांना फक्त एवढंच माहीत असणं पुरेसं नाही की, पालक आपल्याकडून कोणत्या अपेक्षा करतात आणि त्या न पाळल्यास आपल्याला कोणती शिक्षा होऊ शकते. मुलांना वळण लावण्यात खरंतर यापेक्षाही काही जास्त सामील आहे. सुज्ञ पालक आपल्या मुलांना हेदेखील समजण्यास मदत करतात की एखादी आज्ञा पाळणं मुलांसाठी का गरजेची आहे.

उदाहरणार्थ, जर एखादा मुलगा आपल्या आईशी किंवा वडिलांशी उद्धटपणे बोलला तर काय? अशा वेळी त्याच्याशी कठोरतेनं वागल्यास किंवा रागाच्या भरात त्याला शिक्षा केल्यास त्या मुलाला वाईट वाटेल आणि तो अगदी शांत होईल. शिवाय, त्याच्या मनात कदाचित राग उत्पन्न होईल आणि तो भावनिक दृष्ट्या आपल्या आईवडिलांपासून दूर जाईल.

जे पालक व्यावहारिक ज्ञानाने चालतात ते या गोष्टीचा आधी विचार करतात की, आपण केलेल्या शिक्षेचा आणि सुधारणेचा आपल्या मुलांवर व त्यांच्या भविष्यावर कसा परिणाम होईल. एखाद्या परिस्थितीत मुलांमुळे पालकांना इतरांसमोर आपली मान खाली घालावी लागल्यास, त्यांनी लगेच त्यावर तीव्र प्रतिक्रिया देऊन मुलांवर रागावू नये. याउलट ते मुलांना एकांतात शांतपणे व प्रेमळपणे समजावून सांगू शकतात. ते त्यांच्यासोबत तर्क करू शकतात आणि त्यांना सांगू शकतात की, मुलांनी आईवडिलांचं ऐकावं अशी यहोवा देव त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि असं केल्यास तो त्यांना सार्वकालिक जीवनाचे आशीर्वादही देईल. अशा प्रकारे समजावून सांगितल्यास मुलांना हे जाणवेल की आईवडिलांचा आदर केल्याने यहोवा देवाचा आदर होतो. (इफिस. ६:२, ३) प्रेमळपणे समजावून सांगितल्याने ती गोष्ट मुलांच्या हृदयात घर करून राहील. आपले आईवडील आपल्यावर प्रेम करतात आणि आपली मनापासून काळजी करतात, ही गोष्ट मुलांना जाणवेल आणि आईवडिलांविषयी त्यांचा आदर वाढेल. यामुळे मुलांचा आपल्या आईवडिलांसोबत असलेला नातेसंबंधही दृढ होईल, आणि जीवनात पुढे येणाऱ्या मोठ्या गोष्टींविषयी मुलं आपल्या पालकांसोबत मनमोकळेपणाने बोलतील.

काही आईवडिलांना या गोष्टीची चिंता वाटते की त्यांनी आपल्या मुलांची चूक सुधारल्यास किंवा त्यांना शिक्षा केल्यास त्यांच्या मुलांचं मन दुखावलं जाईल. त्यामुळे ते मुलांची चूक सुधारण्याचंच टाळतात. पण असं करणं खरंच योग्य ठरेल का? जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा काय? ते यहोवाचं भय धरतील का? देवाच्या स्तरांनुसार जीवन जगल्याने फायदा होतो याची त्यांना जाणीव राहील का? ते आपलं अंतःकरण यहोवासमोर मोकळं करतील का? की ते स्वतःला यहोवापासून आणि त्याच्या संघटनेपासून दूर करतील?—नीति. १३:१; २९:२१.

एक चांगला मूर्तिकार मूर्ती बनवण्याआधी योजना करतो. तो उगाचच काहीतरी करून एका चांगल्या आकाराची मूर्ती तयार होईल अशी अपेक्षा करत नाही. तर आपण कोणता आकार देणार आहोत हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं. सुज्ञ व व्यावहारिक ज्ञान असणारे पालक यहोवाविषयी शिकण्यास आणि शिकलेल्या गोष्टी स्वतःच्या जीवनात लागू करण्यास बराच वेळ खर्च करतात. याद्वारे ते हे दाखवून देतात की ते देवाच्या नावाचं भय बाळगत आहेत. यहोवा देवाशी आणि त्याच्या संघटनेशी जडून राहून ते व्यावहारिक ज्ञान मिळवतात, आणि स्वतःच्या कुटुंबाचा पाया मजबूत खडकावर बांधतात.

दररोज आपल्याला असे अनेक निर्णय घ्यावे लागतात ज्यांचा आपल्या भविष्यावरही मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे भावनात्मक होऊन किंवा अविचाराने निर्णय घेण्यापेक्षा, थोडं थांबून भविष्यात त्याचे काय परिणाम होतील याचा चांगला विचार करून निर्णय घेणं सुज्ञतेचं ठरणार नाही का? निर्णय घेण्यापूर्वी यहोवाकडे मार्गदर्शन मागा आणि त्याच्याकडून मिळणारं ज्ञान जीवनात लागू करा. यामुळे आपल्याकडे असलेलं व्यावहारिक ज्ञान आपण सांभाळून ठेवू, आणि ते आपल्यासाठी जीवन असं होईल.—नीति. ३:२१, २२.