व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवा

देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवा

“विश्वास हा . . . न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.”—इब्री ११:१.

गीत क्रमांक: ५४, ४३

१. आपल्या विश्वासाबद्दल आपण यहोवाचे आभार का मानले पाहिजेत?

विश्वास हा एक असा गुण आहे जो सगळ्यांमध्ये असेलच असं नाही. (२ थेस्सलनी. ३:२) पण यहोवा त्याची उपासना करणाऱ्यांना विश्वास ठेवण्यास मदत पुरवतो. (रोम. १२:३; गलती. ५:२२) विश्वास ठेवण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करतो, यासाठी आपण खरंच त्याचे खूप आभारी आहोत.

२, ३. (क) विश्वासामुळे आपल्याला काय फायदा होतो? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

यहोवाने मानवांसाठी आपल्या प्रिय पुत्राचं म्हणजे येशूचं बलिदान दिलं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळवणं शक्य होतं. तसंच यहोवाचा मित्र बनणं आणि सार्वकालिक जीवन मिळवणंही त्याला शक्य होतं. (योहा. ६:४४, ६५; रोम. ६:२३) आपण पापी व मरणास पात्र असतानादेखील, आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी करण्याची क्षमता आहे हे यहोवाने पाहिलं. (स्तो. १०३:१०) यहोवा खरोखर किती प्रेमळ आणि दयाळू परमेश्वर आहे! त्याने आपल्याला येशूविषयीची सुवार्ता आणि खंडणी बलिदान यांविषयी शिकण्यास मदत पुरवली. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवला आणि त्याचे शिष्य बनलो, तेव्हा सार्वकालिक जीवन मिळवणं आपल्याला शक्य झालं.—१ योहान ४:९, १० वाचा.

पण विश्वास म्हणजे काय? देवाने आपल्यासाठी काय केलं आहे आणि भविष्यात तो आपल्यासाठी काय करणार आहे, याची फक्त माहिती असणं म्हणजे विश्वास का? पाहूयात की याबाबतीत आपल्याला आणखी काय करण्याची गरज आहे.

आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवा

४. विश्वासामुळे आपण काय करण्यास प्रेरित होतो?

यहोवा आणि येशूवर विश्वास ठेवल्यामुळे त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे आणि पुढे काय करणार आहेत एवढंच आपण माहीत करून घेत नाही. तर, त्यांनी आपल्याला शिकवल्याप्रमाणे जीवन जगण्याची आपली इच्छादेखील प्रबळ असते. तसंच इतरांनीही त्यांच्याविषयी जाणून घ्यावं यासाठी आपण त्यांना मदत करण्यासही नेहमी तयार असतो. प्रेषित पौलाने म्हटलं: “येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल; कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.”—रोम. १०:९, १०; २ करिंथ. ४:१३.

५. विश्वास असणं महत्त्वाचं का आहे, आणि तो मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे? उदाहरण द्या.

हे स्पष्टच आहे की, देवाच्या नवीन जगामध्ये सार्वकालिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला विश्वासाची गरज आहे. आणि आपण आपला विश्वास मजबूत ठेवला पाहिजे. विश्वासाची तुलना एखाद्या रोपट्याशी करता येईल. रोपट्याला वाढण्यासाठी आणि मजबूत राहण्यासाठी नेहमी पाणी घालत राहण्याची गरज पडते. पण जर आपण त्याला पुरेसं पाणी घातलं नाही तर ते रोपटं मरून जाईल. अगदी त्याच प्रकारे विश्वासात “दृढ” राहण्यासाठी आणि “वाढत” जाण्यासाठी आपल्याला त्याकडे लक्ष पुरवण्याची गरज आहे.—तीत २:२; २ थेस्सलनी. १:३; लूक २२:३२; इब्री ३:१२.

‘विश्वास म्हणजे काय’ हे बायबल आपल्याला सांगतं

६. विश्वासाच्या बाबतीत इब्री ११:१ मध्ये कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत?

विश्वास म्हणजे काय हे आपल्याला इब्री लोकांस ११:१ (वाचा.) या वचनात वाचायला मिळतं. यात दोन गोष्टी सांगितल्या आहेत: (१) विश्वास म्हणजे “आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा.” या “आशा धरलेल्या” गोष्टींमध्ये भविष्यासाठी देवाने दिलेल्या अभिवचनांचादेखील समावेश होतो. उदाहरणार्थ, आपला विश्वास आहे की पृथ्वीवरून वाइटाचा नाश होईल आणि एक नवीन जग अस्तित्वात येईल. (२) विश्वास म्हणजे “न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी.” आपण यहोवा देव, येशू ख्रिस्त, देवदूत आणि देवाचं राज्य पाहू शकत नसलो, तरी ते अस्तित्वात आहेत हे आपल्याला माहीत आहे. (इब्री ११:३) देवाच्या अभिवचनांवर आणि ‘न दिसणाऱ्या गोष्टींवर’ आपला विश्वास आहे, हे आपण कसं दाखवू शकतो? आपण ज्या प्रकारे वागतो-बोलतो, ज्या प्रकारे जीवन जगतो त्यावरून आपण हे दाखवून देऊ शकतो.

७. विश्वास ठेवणं म्हणजे काय, हे नोहाच्या उदाहरणावरून आपल्याला कसं कळतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

विश्वासाच्या बाबतीत आपण नोहाकडून काय शिकू शकतो? प्रेषित पौलाने नोहाविषयी म्हटलं, “जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले.” (इब्री ११:७) यहोवाने नोहाला जे सांगितलं त्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता, म्हणूनच त्याने मोठं तारू बांधलं. तारू बांधताना कदाचित त्याच्या शेजार-पाजारच्या लोकांनी त्याबद्दल चौकशी केली असेल. तेव्हा नोहा नक्कीच गप्प बसला नसेल याची आपण खात्री बाळगू शकतो. कारण, बायबलमध्ये नोहाला “नीतिमत्त्वाचा उपदेशक” असं म्हणण्यात आलं आहे. (२ पेत्र २:५) देव लवकरच मोठा जलप्रलय आणून दुष्टांचा नाश करणार आहे, असा इशारा त्याने लोकांना दिला. कदाचित यहोवा देवाने त्याला जे सांगितलं होतं ते अगदी तंतोतंत त्याने लोकांना सांगितलं असावं. यहोवाने त्याला सांगितलं होतं: “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनांत आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे.” आणि “ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल.” यानंतर या जलप्रलयातून बचावण्यासाठी लोकांना तारवात जाण्याची गरज आहे, हे नोहाने त्यांना समजावून सांगितलं असावं. कारण यहोवाने अशी आज्ञा दिली होती की तू “तारवात जा.”—उत्प. ६:१३, १७, १८.

८. विश्वासाबद्दल याकोबाने काय म्हटलं?

पौलाने इब्री लोकांना पत्र लिहिण्याच्या काही काळातच याकोबानेदेखील विश्वासाच्या बाबतीत लिहिलं. त्याने म्हटलं: “क्रियांवांचून तू आपला विश्वास मला दाखव, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन.” (याको. २:१८) या वचनांत याकोबाने समजावून सांगितलं की विश्वास ठेवण्यामध्ये आणखीही काही गोष्टींचा समावेश आहे. देव आहे, हे दुरात्मेदेखील कबूल करतात पण त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही. याऐवजी ते त्याचा तीव्र विरोध करतात. (याको. २:१९, २०) याच्या अगदी उलट जो देवावर विश्वास ठेवतो तो त्याला आनंदी करण्यासाठी चांगली कामं करतो. आब्राहामानेही अगदी हेच केलं. याविषयी याकोब लिहितो: “आपला बाप अब्राहाम याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पिले यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते.” विश्वास हा कृतींशिवाय निरर्थक आहे, या गोष्टीवर जोर देण्यासाठी याकोब पुढे म्हणतो: “जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.”—याको. २:२१-२३, २६.

९, १०. पुत्रावर विश्वास ठेवणं म्हणजे काय?

याच्या ३० पेक्षा जास्त वर्षांनंतर, योहानाने शुभवर्तमान आणि इतर तीन पत्रं लिहिली. बायबलच्या इतर लेखकांप्रमाणेच विश्वास म्हणजे काय हे योहानाला समजलं होतं. अनेकवेळा आपल्या लिखाणांमध्ये याबाबतीत लिहिताना योहानाने ग्रीक भाषेतील जे क्रियापद वापरलं त्याचं भाषांतर ‘विश्वास दाखवणं’ किंवा ‘प्रकट करणं’ असंही करता येईल.

१० उदाहरणार्थ, योहानाने म्हटलं: “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (योहा. ३:३६) पुत्रावर विश्वास ठेवण्यासाठी, म्हणजेच ‘विश्वास दाखवण्यासाठी’ आपण येशूच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. योहानाच्या लिखाणांमधून हे स्पष्ट होतं की, येशूनेही यावर जोर दिला की जर आपल्याला सार्वकालिक जीवन हवं असेल, तर आपण त्याच्यावर आणि त्याच्या स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवला पाहिजे.—योहा. ३:१६; ६:२९, ४०; ११:२५, २६; १४:१, १२.

११. यहोवाप्रती आपण आपली कदर कशी व्यक्त करू शकतो?

११ यहोवा आणि येशू यांच्याविषयी सत्य समजण्यासाठी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी, यहोवा देवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मदत केली आहे. (लूक १०:२१ वाचा.) खरंच यासाठी आपण त्याचे किती आभार मानायला हवेत! यहोवाने आपल्यासाठी जे काही केलं आहे, त्यासाठी आपण आपली कदर कशी व्यक्त करू शकतो? “विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा” येशू ख्रिस्त याच्याद्वारे यहोवाने आपल्याला त्याच्यासोबत नातेसंबंध जोडण्यासाठी जी संधी दिली, त्याबद्दल आपण नेहमी त्याचे आभार मानले पाहिजेत. (इब्री १२:२) यासोबतच आपला विश्वास मजबूत करत राहण्यासाठी आपण यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि त्याच्या वचनांचा अभ्यास केला पाहिजे.—इफिस. ६:१८; १ पेत्र २:२.

प्रत्येक संधीचा फायदा उचलून इतरांना राज्याची सुवार्ता सांगण्याद्वारे आपला विश्वास प्रकट करा (परिच्छेद १२ पाहा)

१२. आपल्यामध्ये विश्वास असल्यास आपण काय करण्यास प्रेरित होतो?

१२ यहोवाच्या अभिवचनांवरचा आपला विश्वास अगदी मजबूत आहे, हे आपण आपल्या कार्यांद्वारे दाखवत राहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, लोकांना आपण देवाच्या राज्याबद्दल सुवार्ता सांगत राहिली पाहिजे आणि त्यांना येशूचे शिष्य बनण्यास मदत करत राहिली पाहिजे. यासोबतच “आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे” करण्याचं कधीही सोडू नये. (गलती. ६:१०) आपण “जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून” टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीमुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत व्हावा अशी आपली इच्छा नाही.—कलस्सै. ३:५, ८-१०.

खऱ्या ख्रिश्चनांचा जो पाया आहे, त्यातील एक पैलू म्हणजे देवावरील विश्वास

१३. (क) “देवावरचा विश्वास” गरजेचा का आहे? (ख) बायबलमध्ये त्याची तुलना कशासोबत करण्यात आली आहे आणि का?

१३ बायबल आपल्याला सांगतं: “विश्वासावाचून त्याला [देवाला] संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री ११:६) बायबल आपल्याला हेदेखील सांगत की खरे ख्रिस्ती बनण्यासाठी आणि त्यात टिकून राहण्यासाठी आपला जो “पाया” आहे त्यातीलच एक पैलू म्हणजे “देवावरचा विश्वास.” (इब्री ६:१, २) पण विश्वासासोबतच देवाबरोबर मैत्रीपूर्ण नातेसंबंध जोडण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला इतरही काही महत्त्वपूर्ण गुणांची गरज आहे.—२ पेत्र १:५-७ वाचा; यहू. २०, २१.

१४, १५. प्रेमाच्या तुलनेत विश्वास असणं किती गरजेचं आहे?

१४ बायबल लेखकांनी सर्वात जास्त ‘विश्वास’ या गुणाचा उल्लेख केला. मग याचा अर्थ असा आहे का, की विश्वास हा इतर कोणत्याही गुणापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे?

१५ पौलाने विश्वासाची तुलना प्रेमाशी केली. त्याने लिहिलं: “डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.” (१ करिंथ. १३:२) येशूनेही म्हटलं की, देवावर प्रीती करणं ही नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा आहे. (मत्त. २२:३५-४०) प्रेमामुळे आपल्याला इतरही असे अनेक गुण विकसित करता येतात ज्यांमुळे यहोवाचं मन आनंदित होतं. एक उदाहरण घ्या, बायबल म्हणतं प्रीती “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते.” याचा अर्थ बायबलमध्ये देवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर विश्वास आणि भरवसा ठेवण्यास प्रेमामुळे आपल्याला मदत होते.—१ करिंथ. १३:४, ७.

१६, १७. (क) विश्वास आणि प्रेमाविषयी बायबल आपल्याला काय सांगतं? (ख) यांपैकी कोणता गुण श्रेष्ठ आहे आणि का?

१६ विश्वास आणि प्रेम हे दोन्हीही गुण महत्त्वाचे आहेत. बायबल लेखकांनी अनेकदा या दोन्ही गुणांचा सोबत उल्लेख केला. पौलाने त्याच्या काळातील ख्रिस्ती बांधवांना उत्तेजन दिलं की त्यांनी “विश्वास प्रीती हे उरस्त्राण” धारण करावं. (१ थेस्सलनी. ५:८) पेत्राने येशूविषयी लिहिलं: “त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता.” (१ पेत्र १:८) याकोबानेदेखील त्याच्या काळातील अभिषिक्त बांधवांना म्हटलं: “लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?” (याको. २:५) योहानाने लिहिलं की देवाची अशी आज्ञा आहे की “त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी.”—१ योहा. ३:२३.

१७ पौलाने पुढे लिहिलं: “विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.” (१ करिंथ. १३:१३) येणाऱ्या भविष्यात आपल्याला देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवण्याची गरज नसणार, कारण देवाच्या नवीन जगाबद्दलची सर्व अभिवचनं पूर्ण झालेली असतील. बायबल ज्या सुंदर जीवनाबद्दल सांगतं ते जीवन आपण त्या नवीन जगामध्ये अनुभवत असू. पण तिथेसुद्धा आपल्याला देवावर आणि लोकांवर प्रेम करत राहणं गरजेचं असेल. खरंतर, त्यांच्यावरचं आपलं प्रेम हे सदासर्वकाळ वाढतच जाईल.

देवावरील विश्वासाचे चांगले परिणाम

१८, १९. देवाच्या लोकांचा त्याच्यावर विश्वास असल्यामुळे आज कोणते चांगले परिणाम दिसून येतात? आणि यासाठी कोण स्तुतीस पात्र आहे?

१८ यहोवाच्या सेवकांचा त्याच्या राज्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते त्याला आपला पूर्ण पाठिंबा देतात. तसंच त्यांचं आपल्या बंधुभगिनींवरदेखील प्रेम आहे. याचं कारण म्हणजे ते देवाच्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात कार्य करू देतात, आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न करतात. (गलती. ५:२२, २३) याचा परिणाम म्हणजे, जगभरातील मंडळ्यांमध्ये ८० लाखांपेक्षा जास्त बंधुभगिनी शांतीनं आणि एकतेनं राहतात. या सर्व गोष्टींवरून हे स्पष्टच आहे की, खऱ्या ख्रिश्चनांसाठी विश्वास आणि प्रेम हे दोन्हीही गुण फार महत्त्वाचे आहेत.

१९ देवाच्या लोकांमध्ये असलेली एकता ही देवाच्या मदतीमुळेच शक्य झाली आहे. आणि यासाठी यहोवा देव आपल्या स्तुतीस आणि महिमेस पात्र आहे. (यश. ५५:१३) त्याने आपलं “विश्वासाच्या द्वारे . . . तारण” शक्य केलं आहे, यासाठी आपण खरंच त्याचे खूप आभारी आहोत. (इफिस. २:८) यहोवा इतर अनेकांना त्याच्यावर विश्वास ठेवण्यास मदत करत राहील. मग शेवटी संपूर्ण पृथ्वी परिपूर्ण, नीतिमान आणि आनंदी लोकांनी भरून जाईल, जे सदासर्वकाळ यहोवाचा गौरव करत राहतील.