व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खोट्या धर्मापासून त्यांनी स्वतःला मुक्त करून घेतलं

खोट्या धर्मापासून त्यांनी स्वतःला मुक्त करून घेतलं

“माझ्या लोकांनो . . . तिच्यामधून निघा.”—प्रकटी. १८:४.

गीत क्रमांक: १०, ४५

१. (क) देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सुटणार होते, हे आपण कशावरून म्हणू शकतो? (ख) आपण कोणत्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत?

मागील लेखात आपण पाहिलं की विश्वासू ख्रिश्चन मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले. पण चांगली गोष्ट म्हणजे ते नेहमीसाठीच या बंदिवासात राहणार नव्हते. हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये याविषयी आधीच सांगण्यात आलं होतं. “तिच्यामधून निघा” अर्थात मोठ्या बाबेलमधून निघा, अशी आज्ञा देवाने त्याच्या लोकांना दिली होती. (प्रकटीकरण १८:४ वाचा) यावरून हे स्पष्ट होतं की, खरे ख्रिस्ती मोठ्या बाबेलमधून मुक्त होणार होते. हे नेमकं कधी झालं, हे जाणून घेण्यासाठी आपण सर्व आतुर आहोत. पण त्याआधी आपल्यासाठी पुढील काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जसं की: १९१४ सालाच्या आधीच मोठ्या बाबेलसंबंधी बायबल विद्यार्थ्यांनी काय भूमिका घेतली होती? पहिल्या महायुद्धादरम्यान आपले बांधव प्रचारकार्यात किती आवेशी होते? आणि त्या काळादरम्यान काही गोष्टींमध्ये त्यांना सुधारणा करण्याची गरज होती, याचा अर्थ ते अजूनही मोठ्या बाबेलच्या बंदिवासात होते, असा होतो का?

“मोठी बाबेल पडली”

२. पहिल्या महायुद्धाच्याही बऱ्याच वर्षांआधी बायबल विद्यार्थ्यांनी काय करण्याचा निर्णय घेतला होता?

पहिल्या महायुद्धाच्याही (१९१४-१९१८) बऱ्याच वर्षांआधी चार्ल्स टेझ रस्सल आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर बायबल विद्यार्थ्यांना समजलं की, ख्रिस्ती धर्मजगताची शिकवण ही बायबलच्या शिकवणींनुसार नाही. त्यामुळे ख्रिस्ती धर्मजगतासोबत कोणत्याही प्रकारचा संबंध त्यांना ठेवायचा नव्हता. १८७९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या झायन्स वॉच टॉवरमध्ये म्हटलं होतं: “प्रत्येक चर्च जे ख्रिस्ताची एकनिष्ठ वधू होण्याचा दावा करतं, पण मानवी सरकारांना आपला पाठिंबा देतं, ते खरंतर मोठ्या बाबेलचाच भाग आहे. त्याला बायबलमध्ये ‘मोठी कलावंतीण’ किंवा ‘वेश्या’ म्हणण्यात आलं आहे.”—प्रकटीकरण १७:१, २ वाचा.

३. आपण खोट्या धर्माचे भाग नाहीत हे दाखवण्यासाठी बायबल विद्यार्थ्यांनी काय केलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

विश्वासू ख्रिश्चनांना हे माहीत होतं की, जर ते खोट्या धर्माला आपला पाठिंबा देत राहिले तर देवाची मर्जी गमावून बसतील. त्यामुळे त्यातील अनेकांनी चर्चला पत्र पाठवून सांगितलं की त्यांना चर्चचे सदस्य म्हणून राहण्याची मुळीच इच्छा नाही. यातील काहींनी तर अशी पत्रं चर्चमध्ये मोठ्याने वाचूनही दाखवली. ज्या चर्चमध्ये अशा प्रकारची पत्रं स्वीकारली जात नव्हती, तिथं या विश्वासू ख्रिश्चनांनी चर्चच्या प्रत्येक सभासदाला पत्र पाठवून आपल्या निश्चयाबद्दल सांगितलं. अशा प्रकारे बायबल विद्यार्थ्यांनी हे दाखवून दिलं की त्यांना खोट्या धर्माशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचा नाही. काही वर्षांआधी एखाद्याने अशा प्रकारची भूमिका घेतली असती तर त्याला ठार मारण्यात आलं असतं. पण १८७० च्या दरम्यान अनेक देशांतील सरकारांनी चर्चला पूर्वीप्रमाणे पाठिंबा देणं बंद केलं होतं. त्यामुळे आता लोक मोकळेपणाने बायबलविषयी बोलू शकत होते आणि चर्चच्या शिकवणींना नाकारूही शकत होते.

४. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान बायबल विद्यार्थ्यांनी खोट्या धर्माला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं? आणि यावरून काय स्पष्ट होतं?

आपण आता खोट्या धर्माला कोणत्याही प्रकारे पाठिंबा देणार नाहीत हे फक्त आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि चर्चच्या सभासदांना सांगणंच पुरेसं नाही, हे बायबल विद्यार्थ्यांनी ओळखलं. खोटा धर्म हा बायबलमध्ये सांगितलेली मोठी बाबेल आणि मोठी कलावंतीण आहे, हे संपूर्ण जगाला समजावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे डिसेंबर १९१७ पासून १९१८ सालाच्या सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये हजारो आवेशी बायबल विद्यार्थ्यांनी १ कोटी पत्रिकांचं वाटप केलं. या पत्रिकेत “मोठी बाबेल पडली” असं शीर्षक असलेला एक लेखही होता. या पत्रिकेनं ख्रिस्ती धर्मजगतातील खोटेपणा सर्वांसमोर उघडकीस आणला. त्यामुळे साहजिकच चर्चचे पुढारी संतापून उठले. पण बायबल विद्यार्थ्यांनी मात्र आपलं कार्य थांबवलं नाही. प्रचारकार्य सुरू ठेवण्याचा आणि “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा” मानण्याचा त्यांचा निश्चय दृढ होता. (प्रे. कृत्ये ५:२९) यावरून काय स्पष्ट होतं? यावरून हेच स्पष्ट होतं की पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान हे विश्वासू ख्रिस्ती बंधुभगिनी मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले नव्हते; उलट ते स्वतःला खोट्या धर्माच्या बंदिवासातून मुक्त करून घेत होते. शिवाय ते इतरांनाही या बंदिवासातून मुक्त होण्यास मदत करत होते.

पहिल्या महायुद्धादरम्यान बांधवांचा आवेश

५. पहिल्या महायुद्धाच्या काळात बांधव प्रचारकार्यात आवेशी होते असं आपण का म्हणू शकतो?

याआधी आपल्याला असं वाटत होतं की, पहिल्या महायुद्धादरम्यान बांधवांनी प्रचारकार्य आवेशानं न केल्यामुळे यहोवाची मर्जी गमावली. आणि याच कारणामुळे यहोवाने त्यांना थोड्या काळासाठी मोठ्या बाबेलच्या बंदिवासात जाऊ दिलं. पण १९१४ ते १९१८ दरम्यान यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेल्या बंधुभगिनींनी नंतर हे सांगितलं की, एक समूह या नात्यानं प्रचारकार्य करण्यासाठी त्यांना जे काही शक्य होतं ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं. त्या काळात बायबल विद्यार्थांनी काय केलं आणि त्यांच्यासोबत काय झालं, हे समजून घेतल्यास बायबलमधील काही अहवाल आणखी स्पष्टपणे समजण्यास आपल्याला मदत होते.

६, ७. (क) पहिल्या महायुद्धादरम्यान बायबल विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? (ख) बायबल विद्यार्थी आवेशानं प्रचारकार्य करत होते हे कोणत्या गोष्टीवरून स्पष्ट होतं?

खरंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात बायबल विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रचारकार्य करत होते. पण यासोबतच त्यांना अनेक समस्यांचाही सामना करावा लागत होता. त्यातील फक्त दोन समस्यांबद्दल आपण पाहू. पहिली म्हणजे, बायबल विद्यार्थी बायबलचा वापर करून प्रचार करण्याचं शिकले नव्हते. इतरांपर्यंत सत्य पोहचवण्यासाठी ते फक्त पुस्तकांचं वाटप करत होते. त्यामुळे १९१८ च्या सुरवातीला जेव्हा द फिनिश्ड मिस्ट्री या पुस्तकावर सरकारने बंदी घातली, तेव्हा अनेकांसाठी प्रचारकार्य करणं अवघड झालं. दुसरी समस्या त्याच वर्षी सुरू झाली, ती म्हणजे स्पॅनिश फ्लूची सुरवात. हा रोग फार संसर्गजन्य व भयानक होता. यामुळे प्रवास करणं आणि प्रचारकार्य करणं बांधवांसाठी फार अवघड झालं. या आणि अशा इतर समस्यांचा सामना करत असतानाही, प्रचारकार्य करण्यासाठी होता होईल ते प्रयत्न बायबल विद्यार्थ्यांनी केले.

बायबल विद्यार्थी सेवाकार्यात फार आवेशी होते (परिच्छेद ६, ७ पाहा)

सन १९१४ मध्ये बायबल विद्यार्थ्यांच्या छोट्या गटाने “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा बायबलवर आधारित चित्रपट तयार केला. यात आवाज आणि संगीतासोबत काचेच्या रंगीत स्लाईड्‌सचा आणि छोट्या-छोट्या चलचित्रांचा उपयोग करण्यात आला होता. त्या काळात असं काही करणं नवीनच होतं. हा फोटो ड्रामा म्हणजे आदामाच्या निर्मितीपासून, ख्रिस्त या पृथ्वीवर हजार वर्षं राज्य करेल तोपर्यंतच्या काळाबद्दल असलेला चित्रपट. पहिल्याच वर्षात ९० लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला. म्हणजे आज जगभरात जेवढे यहोवाचे साक्षीदार आहेत त्याहूनही अधिक! इतर काही अहवालांवरून हे स्पष्ट होतं की, अमेरिकेत १९१६ मध्ये ८ लाख ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी साक्षीदारांच्या जाहीर सभांना हजेरी लावली. आणि १९१८ मध्ये तर हा आकडा ९ लाख ५० हजारांच्या जवळपास पोहचला. खरंच त्या काळातील बायबल विद्यार्थी खूप आवेशानं प्रचारकार्य करत होते!

८. पुढाकार घेणाऱ्या बांधवांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं?

पहिल्या महायुद्धाच्या काळात बायबल विद्यार्थ्यांपर्यंत प्रकाशनं पोहचवण्यासाठी आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बांधवांनी खूप मेहनत घेतली. यामुळे बंधुभगिनींना प्रचारकार्य करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. त्या काळातील आवेशी प्रचारक रिचर्ड एच. बारबर म्हणतात: “काही प्रवासी पर्यवेक्षकांना त्यांच्या नेमणुकीमध्ये टिकवून ठेवण्यात आणि द वॉच टॉवर सर्वांपर्यंत पोहचवण्यात आम्ही यशस्वी झालो. तसंच कॅनडामध्ये जिथं या प्रकाशनावर बंदी होती, तिथंदेखील आम्ही ते पोहचवलं.” ते पुढं म्हणतात: “माझ्या काही मित्रांच्या द फिनिश्ड मिस्ट्री या पुस्तकाच्या प्रती सरकारने जप्त केल्या. त्यामुळे या पुस्तकाच्या काही लहान प्रती (पॉकेट साईझ) या मित्रांना पाठवण्याचा बहुमानही मला मिळाला. पश्‍चिम अमेरिकेतील काही शहरांमध्ये अधिवेशनं भरवून तिथल्या मित्रांना भाषणांद्वारे उत्तेजन देण्यासाठी काही बांधवांना पाठवण्याची व्यवस्था करण्याची विनंती बंधू रदरफर्ड यांनी आम्हाला केली.”

काही सुधारणा करण्याची गरज

९. (क) १९१४ ते १९१९ च्या काळादरम्यान बायबल विद्यार्थ्यांना काही सुधारणा करण्याची गरज का होती? (ख) असं असलं तरी कोणता निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल?

बायबल विद्यार्थ्यांना अजूनही काही सुधारणा करण्याची गरज होती. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा सरकारच्या अधीन राहणं म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ अजूनही त्यांना पूर्णपणे समजला नव्हता. (रोम. १३:१) त्यामुळेच त्यांनी महायुद्धाच्या काळात एक समूह या नात्यानं आपली ख्रिस्ती तटस्थता पूर्णपणे टिकवून ठेवली नाही. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ३० मे १९१८ रोजी सर्व लोकांना शांतीसाठी प्रार्थना करण्यास आर्जवलं. त्या वेळी बायबल विद्यार्थ्यांनीही राष्ट्राध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे शांततेसाठी प्रार्थना करावी, असं द वॉच टॉवरमध्ये सांगण्यात आलं. तसंच काही बांधवांनी आर्थिक रीत्या युद्धाला साहाय्य केलं, तर काही बांधव सैनिक बनले आणि युद्धात सामील झाले. बायबल विद्यार्थ्यांना त्या काळी काही सुधारणा करण्याची गरज होती हे खरं आहे. पण या कारणामुळे ते मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले, असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. खरंतर पहिल्या महायुद्धाच्या वेळी बायबल विद्यार्थ्यांनी स्वतःला खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यापासून जवळजवळ पूर्णपणे मुक्त करून घेतलं होतं.—लूक १२:४७, ४८ वाचा.

१०. बायबल विद्यार्थ्यांनी जीवनाप्रती आदर कसा दाखवला?

१० हे खरं आहे की ख्रिस्ती तटस्थता म्हणजे काय, हे बायबल विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजलेलं नव्हतं. पण तरी एखाद्याला जिवे मारणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. त्यामुळे जरी काही बांधवांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात शसत्रं हाती घेतली असली, तरी त्यांचा वापर कोणाचाही जीव घेण्यासाठी करण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. सैनिक बनलेल्या ज्या बांधवांनी एखाद्याला जिवे मारण्यासाठी शस्त्राचा वापर करण्यास नकार दिला, अशा काही बांधवांचा युद्धात मृत्यू व्हावा म्हणून त्यांना युद्धाच्या तोंडाशी पाठवण्यात आलं.

११. बायबल विद्यार्थ्यांनी जेव्हा युद्धात लढण्यासाठी नकार दिला तेव्हा सरकारची काय प्रतिक्रिया होती?

११ यहोवाप्रती असलेल्या बांधवांच्या एकनिष्ठेमुळे साहजिकच सैतान फार चिडला. याचा परिणाम म्हणजे त्याने त्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला. (स्तो. ९४:२०) अमेरिकेचे लष्कर प्रमुख जेम्स फ्रँकलिन बेल, यांनी बंधू रदरफर्ड आणि वॅन ऍम्बर्घ यांना सांगितलं की जी व्यक्ती युद्धात भाग घेण्यास नकार देईल तिला मृत्युदंडाची शिक्षा मिळावी, यासाठी नवीन कायदा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांचा रोख खरंतर बायबल विद्यार्थ्यांकडे होता. लष्कर प्रमुख फार रागात होते. ते बंधू रदरफर्ड यांना म्हणाला की हा नवीन कायदा अस्तित्वात आला नाही कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या कायद्याला परवानगी दिली नाही. त्यानंतर ते म्हणाले: “पण तुमच्यापर्यंत कसं पोहचायचं ते आम्हाला चांगलं माहीत आहे. आणि आम्ही ते करूनच दाखवू.”

१२, १३. (क) आठ बांधवांना तुरुंगात का टाकण्यात आलं? (ख) तुरुंगात असतानाही यहोवाची आज्ञा पाळण्याचा बांधवांचा निश्चय दृढ होता हे कशावरून दिसून येतं?

१२ सरकारला बायबल विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडण्याचा मार्ग शेवटी सापडलाच. त्यांनी बंधू रदरफर्ड, वॅन ऍम्बर्घ आणि वॉच टॉवर सोसायटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणखी सहा बांधवांना अटक केली. त्यांच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाने म्हटलं: ‘जर्मन सैनिकांच्या एका तुकडीपेक्षाही हे बांधव जास्त धोकादायक आहेत.’ न्यायाधीशाने पुढे म्हटलं: ‘या बांधवांनी सरकार, लष्कर आणि चर्च यांचा अवमान केला आहे’. (फेथ ऑन द मार्च, ए. एच. मॅकमिलन, पृष्ठ ९९) या आठ बायबल विद्यार्थ्यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आणि अॅटलँटा जॉर्जिया येथील तुरुंगात पाठवण्यात आलं. परंतु महायुद्ध संपल्यानंतर मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द करण्यात आले आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

१३ हे बांधव जेव्हा तुरुंगात होते, तेव्हादेखील माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळण्याचा त्यांचा निश्चय खूप दृढ होता. असं आपण का म्हणू शकतो? कारण तुरुंगात असताना त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना सुटकेसाठी एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं की, कोणाचाही जीव घेण्याची अनुमती बायबल आपल्याला देत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीने स्वतःचं जीवन देवाला समर्पित केलं आहे आणि जी जाणूनबुजून त्याच्या आज्ञा मोडते, ती व्यक्ती देवाची मर्जी गमावते आणि नाशास पात्र ठरते. त्यांनी त्या पत्रात हे स्पष्ट केलं की, याच कारणामुळे ते कोणालाही जिवे मारू शकत नाहीत, आणि मारणारही नाहीत. अशा प्रकारे स्वतःची बाजू राष्ट्राध्यक्षांपुढे मांडणं हे फार धाडसाचं काम होतं. हे बांधव यहोवाची आज्ञा नेहमी पाळत राहणार होते, यात काहीच शंका नव्हती.

देवाचे लोक शेवटी मोठ्या बाबेलमधून मुक्त झाले

१४. मलाखी ३:१-३ या वचनांच्या आधारे १९१४ ते १९१९ च्या दरम्यान काय झालं ते समजावून सांगा.

१४ सन १९१४ ते १९१९ च्या सुरवातीला बायबल विद्यार्थ्यांसोबत काय घडलं याबद्दल आपल्याला मलाखीच्या पुस्तकात वाचायला मिळतं. (मलाखी ३:१-३ वाचा.) ‘प्रभू’ म्हणजे यहोवा देव आणि ‘करार घेऊन येणारा निरोप्या’ म्हणजे येशू ख्रिस्त ही दोघे, अभिषिक्तांना सूचित करत असलेल्या ‘लेवीच्या वंशजांची’ पाहणी करण्यास आले. यहोवाने त्यांच्यात सुधारणा केल्यानंतर आणि त्यांना शुद्ध केल्यानंतर, आता ते एका नवीन नेमणुकीसाठी तयार झाले. १९१९ मध्ये येशूने “विश्वासू व बुद्धिमान” दासाला नियुक्त केलं. या दासावर देवाच्या सेवकांना सूचना आणि मार्गदर्शन देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. (मत्त. २४:४५) देवाच्या लोकांची शेवटी मोठ्या बाबेलमधून सुटका झाली. तेव्हापासून ते देवाची इच्छा काय आहे हे शिकून घेत आहेत. तसंच यहोवासाठी असलेलं त्यांचं प्रेम आणखी वाढलं आहे. खरंच यहोवा देत असलेल्या आशीर्वादांसाठी ते त्याचे खूप आभारी आहेत. [1]

१५. मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून यहोवाने आपल्याला मुक्त केलं आहे, यासाठी आपण आपली कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?

१५ मोठ्या बाबेलमधून आपली सुटका झाली यासाठी आपण फार आनंदी आहोत. सैतानाचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. तो खरी उपासना थांबवू शकलेला नाही. यहोवाने मोठ्या बाबेलमधून आपली सुटका का केली त्यामागचं कारण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व माणसांचं तारण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. (२ करिंथ. ६:१) पण आजही असे लाखो लोक आहेत जे या मोठ्या बाबेलच्या बंदिवासात आहेत, आणि त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. त्यांना या बंदिवासातून मुक्त करण्यासाठी आपल्या विश्वासू बांधवांप्रमाणेच, आपणही आपल्याला शक्य ते करण्याचा प्रयत्न करत राहू.

^ [१] (परिच्छेद १४) यहुदी लोकांना बाबेलमध्ये बंदी बनवून नेलं त्यामध्ये आणि प्रेषितांनंतर धर्मत्यागाला सुरवात झाली त्यानंतर खऱ्या ख्रिश्चनांसोबत जे झालं त्यामध्ये बरंच साम्य आढळून येतं. असं असलं तरी, यहुद्यांचा बाबेलमधील बंदिवास हा अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत घडलेल्या घटनांना सूचित करतो असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून बाबेलच्या बंदिवासात यहुदी लोकांसोबत ज्या घटना घडल्या त्यातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींमध्ये भविष्यसूचक अर्थ शोधण्याचा प्रयत्न आपण करू नये. कारण या दोन्ही गोष्टींमध्ये बरंच साम्य असण्यासोबतच त्यात काही फरकदेखील आढळतो. उदाहरणार्थ, यहुदी लोक फक्त ७० वर्षांसाठी बंदिवासात होते, पण खरे ख्रिस्ती मात्र यापेक्षाही जास्त काळासाठी बंदिवासात होते.