व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या संग्रहातून

“ब्रिटनमधील राज्य प्रचारकांनो—जागे व्हा!”

“ब्रिटनमधील राज्य प्रचारकांनो—जागे व्हा!”

“ब्रिटनमधील राज्य प्रचारकांनो—जागे व्हा!” इन्फॉर्मंटमधून  * करण्यात आलेला हा आर्जव, एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी जसं युद्ध पातळीवर तयार होण्यासाठी आर्जव केला जातो त्याप्रमाणेच भासला. (इन्फॉर्मंट, डिसेंबर १९३७, लंडन आवृत्ती) त्यामध्ये विचार करण्यास भाग पाडेल असं एक उपशीर्षक होतं: “मागील दहा वर्षांत कोणतीही लक्षणीय वाढ नाही.” आणि त्याच्या पहिल्या पानावरील १९२८ ते १९३७ सालाचा क्षेत्रसेवेचा अहवालही या गोष्टीला दुजोरा देत होता.

पायनियरांची संख्या गरजेपेक्षा जास्त!

ब्रिटनमध्ये क्षेत्रसेवेतील वाढीचा वेग मंदावण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरली होती? ब्रिटनमधील मंडळ्यांनी फार वर्षांपूर्वी जी मंद गती पकडली होती, त्याच गतीने त्या आजही चालत होत्या. आणि त्यातल्या त्यात शाखा कार्यालयाने असं ठरवलं की, दूरवरच्या क्षेत्रात जाऊन प्रचार करणाऱ्यांपैकी फक्त २०० पायनियरांची आता गरज आहे. कारण त्यांना वाटलं की तेवढंच क्षेत्र आता ब्रिटनमध्ये उरलं आहे. म्हणून शाखा कार्यालयाने पायनियरिंग करण्याची इच्छा असलेल्या बंधुभगिनींना कळवलं की त्यांनी युरोपच्या इतर देशांमध्ये जाऊन पायनियर सेवा करावी. त्यामुळे बरेच पायनियर फ्रान्ससारख्या दुसऱ्या देशात जाऊन सेवा करू लागले. जे पायनियर ब्रिटन सोडून जाऊ लागले त्यांचं कौतुकच करावं लागेल. कारण ते अशा देशांत जाऊन सेवा करण्यास तयार होते, जिथल्या भाषेबद्दल त्यांना अगदी थोडं किंवा काहीच माहीत नव्हतं.

“ही वेग वाढवण्याची वेळ आहे”

१९३७ साली इन्फॉर्मंटमध्ये एक लेख छापला गेला. त्यात १९३८ सालासाठी एक आव्हानात्मक ध्येय ठेवण्यात आलं. ते म्हणजे: १९३८ साली प्रचारकार्यासाठी १० लाख तास देणं! हे ध्येय गाठणं तसं सहज शक्य होतं. पण यासाठी प्रत्येक प्रचारकाला दर महिन्याला १५ तास आणि प्रत्येक पायनियराला ११० तास क्षेत्रसेवेत खर्च करण्याची गरज होती. या लेखात काही फायदेशीर सूचनाही देण्यात आल्या होत्या. जसं की क्षेत्रसेवेचे गट आयोजित करून दररोज ५ तासांसाठी प्रचारकार्याला जाणं, आणि पुनर्भेटींवर जोर देणं; खासकरून आठवड्यातील दिवसांच्या संध्याकाळी.

आवेशी पायनियरांनी प्रचारकार्यावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं

सेवाकार्यात अनेकांना नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटलं. हिल्डा पॅडगेट  * आपल्या आठवणींना उजाळा देत म्हणते: “मुख्यालयातून आम्हाला पुन्हा जोमाने कामाला लागण्यास सांगण्यात आलं होतं. आमच्यापैकी बरेच जण याचीच वाट पाहत होते, आणि लवकरच याचे चांगले परिणामदेखील आम्हाला पाहायला मिळाले.” इ. एफ. वालीस ही बहीण सांगते: “दररोज ५ तास प्रचार करण्याची कल्पना फारच छान होती. संपूर्ण दिवस देवाच्या सेवेसाठी देण्यात जो आनंद आहे, त्यापेक्षा आणखी मोठा आनंद कोणता असू शकतो? . . .  आम्ही दिवसाच्या शेवटी फार थकून जायचो, पण यासोबतच फार आनंदीही असायचो!” तरुण असलेल्या स्टीवन मिलरने काळाची गरज ओळखली आणि मुख्यालयाने केलेल्या आर्जवाला त्यानेही प्रतिसाद दिला. प्रचारकार्याची मिळालेली ही संधी त्याला सोडायची नव्हती. सायकलवर क्षेत्रसेवेसाठी जाणारे गट त्याला आजही आठवतात. हे गट दिवसभर प्रचारकार्य करायचे आणि उन्हाळ्याच्या दिवसांत रेकॉर्ड केलेली भाषणं संध्याकाळी ऐकवायचे. ते गळ्यात प्लॅकार्ड अडकवून पदयात्रा (इन्फर्मेशन मार्च) करायचे आणि मासिकांचा वापर करून रस्त्यावरील साक्षकार्य करायचे.

इन्फॉर्मंटमधून बंधुभगिनींना आणखी एक अपील केलं गेलं: “१,००० पायनियरांची गरज.” क्षेत्रसेवेसाठी आलेल्या नवीन सूचनांनुसार आता पायनियर, मंडळी सोडून दूसरीकडे कार्य करणार नव्हते. तर ते मंडळीसोबतच कार्य करून तिला आध्यात्मिक रीत्या मजबूत करण्यासाठी मदत करणार होते. जॉइस अॅलिस (ने बारबर) ही बहीण सांगते: “अनेक बंधुभगिनींना हे जाणवू लागलं, की त्यांनीदेखील पायनियरिंग सुरू करायला हवी.” ही बहीण पुढे म्हणते, “मी त्या वेळी फक्त १३ वर्षांची होते, पण मलाही पायनियरिंग करायची होती.” जुलै १९४० मध्ये, म्हणजे १५ वर्षांची असताना तिला तिचं ध्येय गाठता आलं. पीटरही—ज्याने नंतर जॉइस अॅलिसशी लग्न केलं—इन्फॉर्मंटमधून करण्यात आलेल्या आर्जवामुळे प्रभावित झाला, आणि पायनियरिंग करण्याबद्दल विचार करू लागला. जून १९४० मध्ये, १७ वर्षांचा असताना त्याने आपली पायनियरिंग सेवा सुरू केली. आपली पायनियर सेवा सुरू करण्यासाठी स्कारबोरो या ठिकाणी तो १०५ किलोमीटर सायकल चालवून गेला.

सिरिल आणि केटी जॉनसन हे अशा पायनियरांपैकी होते जे सेवाकार्यासाठी कोणताही त्याग करायला तयार होते. त्यांनी आपलं घर आणि घरातील वस्तू विकण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांना जे पैसे मिळणार होते त्यामुळे त्यांना पूर्णवेळेचं सेवाकार्य करण्यास मदत होणार होती. सिरिलने त्याची नोकरी सोडली आणि एका महिन्याच्या आतच हे जोडपं पायनियरिंग करण्यासाठी तयार होतं. सिरिल म्हणतो: “आम्ही हे करू शकतो याची आम्हाला खात्री होती, आणि आम्ही हे स्वखुशीनं व आनंदानं केलं.”

‘पायनियर होम’ सुरू केले गेले

पायनियरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. आणि या बंधुभगिनींना मदत व्हावी यासाठी बांधव काही व्यावहारिक मार्गांचा विचार करू लागले. १९३८ मध्ये झोन सर्व्हंट (विभागीय पर्यवेक्षक) म्हणून काम करणारे बांधव जीम कार यांनी शहरांमध्ये पायनियर होम सुरू करण्याची सूचना अमलात आणली. खर्च कमी करण्यासाठी पायनियरांच्या गटांनी एकत्र मिळून राहावं आणि काम करावं असं उत्तेजन त्यांना देण्यात येत होतं. शेफील्ड या शहरात पायनियर होमसाठी एक मोठं घर भाड्याने घेतलं गेलं. आणि एका जबाबदार बांधवाला तिथली व्यवस्था पाहण्यासाठी नेमण्यात आलं. स्थानिक मंडळीने यासाठी लागणारा पैसा आणि फर्निचर पुरवलं. जीम हे बांधव सांगतात: “ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी फार मेहनत घेतली.” या ठिकाणी दहा पायनियर राहू लागले, ते मेहनती होते आणि आध्यात्मिक गोष्टींचा त्यांनी चांगला नित्यक्रम ठेवला होता. जीम पुढे सांगतात: “प्रत्येक सकाळची सुरवात दैनिक वचनाने केली जात होती, आणि शहरातील ठरवलेल्या क्षेत्रात पायनियर दररोज जात होते.”

ब्रिटनमध्ये नवीन पायनियरांची क्षेत्र सेवेत जणू मोठी लाटच आली

प्रचारकांनी आणि पायनियरांनी संघटनेकडून केल्या गेलेल्या आर्जवाला चांगला प्रतिसाद दिला. आणि १९३८ सालासाठी १० लाख तासांचं जे ध्येय ठेवण्यात आलं होतं ते पूर्ण केलं. खरंतर अहवालांवरून, क्षेत्रसेवेच्या सर्वच पैलूंमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. फक्त पाच वर्षांच्या काळात ब्रिटनमधील प्रचारकांची संख्या जवळजवळ तीन पटींनी वाढली. क्षेत्रसेवेच्या कामात आलेल्या या नवं चैतन्यामुळे, पुढे येणाऱ्या युद्धाच्या कठीण काळाला यशस्वी रीत्या तोंड देण्यासाठी यहोवाच्या सेवकांना मोठी मदत झाली.

आज, हर्मगिदोनाच्या लढाईची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी ब्रिटनमधील पायनियरांची संख्याही वाढत चालली आहे. मागील दहा वर्षांत पायनियरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०१५ साली ब्रिटनमध्ये १३,२२४ पायनियर सेवा करत होते. पूर्णवेळेची सेवा हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे याची जाणीव या सर्व पायनियरांना आहे, यात कोणतीही शंका नाही.

^ परि. 3 याला नंतर आपली राज्य सेवा असं नाव देण्यात आलं.

^ परि. 8 हिल्डा पॅडगेट या बहिणीचा अनुभव टेहळणी बुरूजच्या १ ऑक्टोबर १९९५ या अंकात पृ. १९-२४ वर देण्यात आला आहे.