व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू नेमका कसा दिसायचा?

येशू नेमका कसा दिसायचा?

आज कोणाजवळही येशूचा खरा फोटो नाही. तसंच, येशूने कधीही स्वतःचं चित्रं किंवा पुतळा बनवून घेतला नाही. तरीही, अनेक शतकांपासून कितीतरी कलाकारांनी आपल्या कलाकृतींत येशूला चित्रित केलं आहे.

येशू नेमका कसा दिसायचा, याची त्या कलाकारांना कल्पना नाही. त्यामुळे प्रचलित संस्कृतींच्या, धार्मिक विश्‍वासांच्या आणि ज्यांना कलाकृती तयार करून हवी आहे, त्यांच्या इच्छांच्या आधारावर सहसा येशूचं चित्र किंवा पुतळा तयार केला जातो. असं असलं तरी, या कलाकृतींमुळे येशूबद्दल आणि त्याच्या शिकवणींबद्दल लोकांना अस्पष्ट माहिती मिळू शकते किंवा त्यांच्या दृष्टिकोनावर प्रभाव पडू शकतो.

काही कलाकार येशूला, लांब केस आणि थोडी दाढी असल्याचं दाखवतात. ते त्याला अगदी कमजोर आणि दुःखी व्यक्‍ती असल्याचं चित्रित करतात. तर इतर काही जण येशूच्या भोवती तेजोवलय दाखवून त्याला अद्‌भुत असल्याचं चित्रित करतात. तसंच, ते त्याला इतरांपेक्षा खूप वेगळं असल्याचं दाखवतात. पण, या कलाकृतींतून येशूचं खरं व्यक्‍तिमत्त्व दिसून येतं का? त्याचं खरं व्यक्‍तिमत्त्व आपण कसं जाणून घेऊ शकतो? याचा एक मार्ग म्हणजे, बायबलचं परीक्षण करणं. त्यातल्या वचनांतून येशू कसा दिसत असावा हे समजून घ्यायला आपल्याला थोडी मदत होऊ शकते. यासोबतच, येशूबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगायलाही आपल्याला मदत होऊ शकते.

“तू माझ्यासाठी एक शरीर तयार केले”

बाप्तिस्म्याच्या वेळी येशूने केलेल्या प्रार्थनेतले हे शब्द आहेत. (इब्री लोकांना १०:५; मत्तय ३:१३-१७) येशूचं शरीर कसं होतं? तो कसा दिसत असावा? येशूच्या बाप्तिस्म्याच्या जवळजवळ ३० वर्षांआधी गब्रीएल देवदूताने मरीयाला सांगितलं: “तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील . . . त्याला . . . देवाचा पुत्र असं म्हटलं जाईल.” (लूक १:३१, ३५) यावरून आपल्याला कळतं, की देवाचा पुत्र आदाम याची निर्मिती झाली तेव्हा तो परिपूर्ण होता, तसाच येशूही परिपूर्ण होता. (लूक ३:३८; १ करिंथकर १५:४५) येशू नक्कीच धडधाकट पुरुष असावा आणि कदाचित तो त्याची यहुदी आई मरीया हिच्यासारखा दिसत असावा.

येशू दाढी ठेवायचा. आपण असं का म्हणू शकतो? कारण त्या काळात रोमी लोक दाढी ठेवत नसले, तरी यहुदी लोकांमध्ये दाढी ठेवण्याची रीत होती. यहुदी लोकांमध्ये दाढीला आदर आणि सन्मानाचं प्रतिक मानलं जायचं. पण, ती खूप वाढलेली नसायची तर नीटनेटकी असायची. येशूचे केस कापलेले असायचे आणि त्याची दाढीसुद्धा नीटनेटकी असायची, यात काहीच शंका नाही. त्या काळात फक्‍त नाजीर लोक आपले केस वाढवायचे. बायबलच्या काळात नाजीर लोकांना, त्यांचे केस कापण्याची परवानगी नव्हती आणि शमशोन त्यांच्यापैकी एक होता.—गणना ६:५; शास्ते १३:५.

तीस वर्षांचा होईपर्यंत येशूने कितीतरी वर्षं सुतारकाम केलं. त्या काळात सुतारकामाची आधुनिक साधनं नव्हती. (मार्क ६:३) यावरून आपल्याला कळतं, की तो नक्कीच मजबूत अंगकाठीचा असावा. तसंच, सेवाकार्याच्या सुरुवातीला एकदा त्याने एकट्यानेच सगळ्या व्यापाऱ्‍यांना “त्यांच्या गुराढोरांसहित मंदिरातून हाकलून लावले, पैसे बदलून देणाऱ्‍यांची नाणी जमिनीवर टाकून दिली व त्यांचे मेज उलटून टाकले.” (योहान २:१४-१७) एका शक्‍तिशाली पुरुषालाच असं काम करणं शक्य होतं. देवाने येशूवर जी जबाबदारी सोपवली होती ती येशूने पूर्ण केली. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, ‘देवाने तयार केलेल्या शरीराचा’ येशूने वापर केला. त्याबद्दल येशूने म्हटलं: “मला इतर शहरांतही देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला पाहिजे, कारण मला यासाठीच पाठवण्यात आलं आहे.” (लूक ४:४३) राज्याचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी येशूने संपूर्ण पॅलेस्टाईनमध्ये पायी प्रवास केला. यासाठीही नक्कीच खूप जास्त ताकदीची गरज होती.

“माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन”

येशूच्या चेहऱ्‍यावरचे प्रेमळ भाव आणि त्याच्या प्रेमळ व्यक्‍तिमत्त्वामुळे, त्याचं हे निमंत्रण “कष्ट करणाऱ्‍या व ओझ्याने दबलेल्या” लोकांना खूप सांत्वन देणारं वाटलं असेल. (मत्तय ११:२८-३०) पण त्याच्या दयाळू स्वभावामुळे त्याच्याकडून शिकण्याची इच्छा असलेल्यांवर, विश्रांती देण्याच्या अभिवचनाचा जास्त प्रभाव पडला. इतकंच काय, तर लहान मुलांनाही त्याच्याजवळ यायला आवडायचं. बायबल म्हणतं: “[येशूने] लहान मुलांना आपल्याजवळ घेतले.”—मार्क १०:१३-१६.

येशूने त्याच्या मृत्यूआधी खूप वेदना सहन केल्या. असं असलं तरी, तो मुळात एक दुःखी व्यक्‍ती नव्हता. उदाहरणार्थ, काना या ठिकाणी एका लग्नाच्या समारंभात त्याने चमत्कार करून पाण्याचा द्राक्षारस बनवला. (योहान २:१-११) तसंच, इतरही अनेक प्रसंगी त्याने लोकांसोबत वेळ घालवला आणि त्यांना अशा गोष्टी शिकवल्या ज्या त्यांना नेहमी लक्षात राहिल्या.—मत्तय ९:९-१३; योहान १२:१-८.

पण या सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशूने लोकांना अशा प्रकारे शिकवलं, ज्यामुळे त्या सर्वांना सदासर्वकाळ जगण्याची आनंद देणारी आशा बाळगणं शक्य झालं. (योहान ११:२५, २६; १७:३) एका प्रसंगी जेव्हा त्याच्या ७० शिष्यांनी त्याला प्रचारातले अनुभव सांगितले, तेव्हा तो “अतिशय आनंदित” झाला. त्याने त्यांना म्हटलं: “स्वर्गात तुमची नावं लिहिण्यात आली आहेत यामुळे आनंदी व्हा.”—लूक १०:२०, २१.

“तुमच्यामध्ये असं असू नये”

येशूच्या काळातले धार्मिक पुढारी वेगवेगळ्या मार्गांनी, लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधायचे. त्यांच्या अधिकाराला जास्त महत्त्व मिळावं हा त्यांचा उद्देश असायचा. (गणना १५:३८-४०; मत्तय २३:५-७) पण, येशू त्यांच्या अगदी उलट होता. येशूने त्याच्या प्रेषितांना सांगितलं, की त्यांनी इतरांवर सत्ता चालवू नये. (लूक २२:२५, २६) खरंतर, येशूने त्यांना असा इशारा दिला: “शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणं, बाजारांत लोकांकडून नमस्कार घेणं” आवडतं.—मार्क १२:३८.

पण, येशूच्या बाबतीत असं नव्हतं. काही प्रसंगी तर लोकांनी त्याला ओळखलंही नाही. कारण, येशू लोकांपेक्षा वेगळा दिसण्याचा प्रयत्न करायचा नाही. (योहान ७:१०, ११) इतकंच काय, तर त्याच्या ११ विश्‍वासू प्रेषितांमध्येही तो वेगळा दिसायचा नाही. यामुळेच, त्याचा विश्‍वासघात करणाऱ्‍या यहुदाने लोकांच्या जमावाला येशूची ओळख करून देण्यासाठी एक “खूण” दिली. तो त्यांना म्हणाला होता, की तो ज्याचं चुंबन घेईल तोच येशू असेल.—मार्क १४:४४, ४५.

येशू कसा दिसायचा याबद्दल बारीकसारीक माहिती उपलब्ध नसली, तरी ही गोष्ट स्पष्ट आहे की येशूला सहसा जसं दाखवलं जातं तसा तो दिसायचा नाही. पण येशू नेमका कसा दिसायचा हे महत्त्वाचं नाही, तर आज आपल्या मनात त्याच्याबद्दल कसं चित्र उभं राहतं ते जास्त महत्त्वाचं आहे.

“थोडाच वेळ आहे; मग जग मला पुन्हा कधी पाहणार नाही”

येशूने हे शब्द म्हटले, त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला आणि त्याला पुरण्यात आलं. (योहान १४:१९) येशूने “अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून” दिलं. (मत्तय २०:२८) तिसऱ्‍या दिवशी देवाने त्याला “आत्म्यात जिवंत” केलं आणि त्याच्या काही शिष्यांसमोर त्याला “प्रकट होऊ दिले.” (१ पेत्र ३:१८; प्रेषितांची कार्ये १०:४०) जेव्हा येशू त्याच्या शिष्यांसमोर प्रकट झाला तेव्हा तो कसा दिसत होता? तो नक्कीच आधी जसा दिसायचा त्यापेक्षा वेगळा दिसत असेल. असं आपण का म्हणू शकतो? कारण, त्याच्या अगदी जवळच्या शिष्यांनीही त्याला लगेच ओळखलं नाही. मग्दालीया मरीयाला वाटलं, की तो माळी आहे आणि अम्माऊस या ठिकाणी जात असताना त्याच्या दोन शिष्यांनीही त्याला ओळखलं नाही.—लूक २४:१३-१८; योहान २०:१, १४, १५.

तर मग आज आपल्या मनात येशूचं कसं चित्र उभं राहिलं पाहिजे? येशूच्या मृत्यूच्या ६० पेक्षा जास्त वर्षांनंतर त्याच्या जवळच्या प्रेषिताने म्हणजे योहानने येशूबद्दल काही दृष्टान्त पाहिले. येशूचा एका क्रुसावर मृत्यू होत आहे, असं योहानने पाहिलं नाही. तर त्याने, “राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू” येशू याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून पाहिलं. तो लवकरच देवाच्या शत्रूंवर, मग ते दुरात्मे असो किंवा मानव, सर्वांवर विजय मिळवेल आणि त्याच्याद्वारे मानवजातीला सदासर्वकाळाचे आशीर्वाद मिळतील.—प्रकटीकरण १९:१६; २१:३, ४. ▪