व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर”

“यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर”

“यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर . . . सत्यतेला अनुसर.”—स्तो. ३७:३, पं.र.भा.

गीत क्रमांक: ४९, १८

१. यहोवाने मानवांना कोणत्या विशेष क्षमता दिल्या आहेत?

यहोवाने मानवांना विशेष अशा क्षमता देऊन निर्माण केलं आहे. त्याने मानवांना विचार करण्याची क्षमता दिली आहे. त्यामुळे आपण समस्यांना सोडवू शकतो आणि भविष्यासाठी काही योजनाही करू शकतो. (नीति. २:११) त्याने आपल्याला कार्य करण्याची क्षमता दिली आहे. यामुळे, केलेल्या योजनांना आपण प्रत्यक्षात उतरवू शकतो आणि आपली ध्येयं साध्य करू शकतो. (फिलिप्पै. २:१३) त्याने आपल्याला विवेकदेखील दिला आहे. म्हणजेच आपल्यामध्ये असलेली चांगलं आणि वाईट ओळखण्याची क्षमता. या क्षमतेमुळे आपण पाप करण्यापासून बचावू शकतो आणि केलेल्या चुका सुधारण्यासही आपल्याला यामुळे मदत होते.—रोम. २:१५.

२. आपण आपल्या क्षमतांचा कशा प्रकारे उपयोग करावा अशी यहोवा अपेक्षा करतो?

या क्षमतांचा आपण योग्य प्रकारे उपयोग करावा, अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. असं का? कारण, त्याचं आपल्यावर प्रेम आहे, आणि दिलेल्या क्षमतांचा चांगला वापर केल्याने आपण आनंदी राहू हेही त्याला माहीत आहे. उदाहरणार्थ, इब्री शास्त्रवचनांत आपण वाचतो: “उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात,” आणि “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर.” (नीति. २१:५; उप. ९:१०) तसंच, ग्रीक शास्त्रवचनांमध्ये आपण वाचतो: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे . . . बरे करावे,” आणि “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे . . . ते एकमेकांच्या कारणी [इतरांच्या सेवेसाठी] लावा.” (गलती. ६:१०; १ पेत्र ४:१०) खरोखरच, या वचनांवरून आपल्याला समजतं की आपण इतरांच्या आणि स्वतःच्या भल्यासाठी होईल तितके प्रयत्न करावेत अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो.

३. मानवांच्या कोणत्या काही मर्यादा आहेत?

आपण आपल्या क्षमतांचा योग्य प्रकारे उपयोग करावा अशी अपेक्षा ठेवण्यासोबतच, यहोवाला हेदेखील माहीत आहे की आपल्या काही मर्यादाही आहेत. उदाहरणार्थ, आपण आपल्यातील अपरिपूर्णता, पाप आणि मरण काढून टाकू शकत नाही. यासोबतच, आपण दुसऱ्या व्यक्तीने काय करावं आणि कसं वागावं यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण, प्रत्येकाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. (१ राजे ८:४६) आणि आणखी एक गोष्ट म्हणजे, आपण कितीही अनुभव व ज्ञान मिळवलं तरी यहोवाला असलेल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या तुलनेत ते नेहमी कमीच पडेल.—यश. ५५:९.

समस्यांचा सामना करताना ‘यहोवावर भरवसा ठेवा आणि चांगलं ते करा’

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

या कारणांमुळे आपण नेहमी यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे. आणि हा भरवसा बाळगला पाहिजे की, ज्या गोष्टी आपण स्वतःच्या बळावर करू शकत नाहीत त्या करण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करेल. पण यासोबतच समस्यांना सोडवण्यासाठी आपण स्वतः विचार करावा आणि इतरांना मदत करावी, अशीही अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (स्तोत्र ३७:३ वाचा.  *) खरंतर आपल्याला दोन्ही गोष्टी करण्याची गरज आहे. यहोवावर “भरवसा” ठेवण्याची आणि “चांगले ते” करण्याची. तसंच आपल्याला “सत्यतेला” अनुसरण्याचीही गरज आहे. आपण हे कसं करू शकतो? यासाठी यहोवावर अवलंबून राहिलेल्या नोहा, दावीद आणि इतर काही विश्वासू सेवकांच्या उदाहरणांमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. या उदाहरणांवर चर्चा करताना आपण पाहूयात की, काही गोष्टी करणं हे देवाच्या या विश्वासू सेवकांच्या हातात नव्हतं. पण तरी, त्यांनी अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं ज्या करणं त्यांना शक्य होतं.

दुष्टतेने भरलेल्या जगात राहताना

५. नोहा कशा परिस्थितीत राहत होता?

देवाचा विश्वासू सेवक नोहा हा अशा एका काळात राहत होता, जेव्हा पृथ्वी “जाचजुलमांनी” आणि मोठ्या अनैतिकतेने भरलेली होती. (उत्प. ६:४, ९-१३) नोहाला हे चांगल्या प्रकारे माहीत होतं की, यहोवा देव लवकरच त्या दुष्ट जगाचा नाश करणार आहे. पण, लोक करत असलेली वाईट कृत्यं पाहून तो नक्कीच निराशही झाला असावा. अशा परिस्थितीमध्ये नोहाला हे समजलं असावं की काही गोष्टी करणं त्याच्या हातात नाहीत. पण यासोबतच त्याला या गोष्टीचीही जाणीव झाली असेल की, अशाही काही गोष्टी आहेत ज्या करणं त्याला शक्य आहे.

आपल्या प्रचारकार्याला होणारा विरोध (परिच्छेद ६-९ पाहा)

६, ७. (क) काय करणं नोहाच्या हातात नव्हतं? (ख) आज आपलीही परिस्थिती नोहाच्या परिस्थितीप्रमाणेच आहे, असं आपण का म्हणू शकतो?

काय करणं नोहाच्या हातात नव्हतं: नोहाने मोठ्या विश्वासाने यहोवाकडून मिळालेला इशारेवजा संदेश घोषित केला. पण हा संदेश स्वीकारण्यास तो लोकांवर बळजबरी मात्र करू शकत नव्हता. तसंच जलप्रलय ठरलेल्या वेळेच्या आधी आणणंही त्याला शक्य नव्हतं. दुष्ट जगाचा नाश करण्याचं जे वचन यहोवाने दिलं होतं, त्यावर नोहाला पूर्ण विश्वास दाखवण्याची गरज होती. तसंच यहोवा त्याच्या ठरलेल्या वेळी जलप्रलय आणेल याची खात्रीही बाळगण्याची त्याला गरज होती.—उत्प. ६:१७.

आज आपणही अशा एका जगामध्ये राहत आहोत जे दुष्टतेनं भरलेलं आहे. यहोवा या दुष्ट व्यवस्थेचाही लवकरच नाश करेल, हे आपल्याला माहीत आहे. (१ योहा. २:१७) पण आपण लोकांना ‘राज्याची सुवार्ता’ स्वीकारण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. किंवा “मोठे संकट” ठरलेल्या वेळेआधी आणू शकत नाही. (मत्त. २४:१४, २१) नोहाप्रमाणे आपल्यालाही आपला विश्वास मजबूत ठेवण्याची गरज आहे, आणि या दुष्ट व्यवस्थेचा यहोवा लवकरच अंत करेल याची खात्री बाळगण्याची गरज आहे. (स्तो. ३७:१०, ११) आपल्याला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की, नेमून दिलेल्या वेळेपेक्षा एक दिवसही जास्त ही दुष्ट व्यवस्था यहोवा देव राहू देणार नाही.—हब. २:३.

८. नोहाने कोणत्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

कोणत्या गोष्टी करणं नोहाला शक्य होतं: काही गोष्टी करणं आपल्याला शक्य नाही, म्हणून नोहा थांबला नाही. तर ज्या गोष्टी करणं त्याला शक्य आहे त्यांवर त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं. यहोवाकडून मिळालेला इशारेवजा संदेश त्याने विश्वासाने घोषित केला. (२ पेत्र २:५) या कार्यामुळे स्वतःचा विश्वास आणखी मजबूत करण्यासाठी त्याला नक्कीच मदत झाली असेल. संदेश घोषित करण्यासोबतच त्याने तारू बनवण्यासाठी यहोवाकडून मिळालेल्या सुचनांचंही पालन केलं.—इब्री लोकांस ११:७ वाचा.

९. आपण नोहाच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

नोहाप्रमाणे आज आपणही “प्रभूच्या कामात” व्यस्त आहोत. (१ करिंथ. १५:५८) उदाहरणार्थ, आपण कदाचित राज्य सभागृह आणि संमेलन गृह बांधकाम व त्यांची देखभाल करण्याच्या कामात मदत करत असू, किंवा संमेलन आणि अधिवेशनांमध्ये स्वयंसेवक या नात्यानं काम करत असू, किंवा मग शाखा कार्यालयात किंवा भाषांतर कार्यालयात मदत करत असू. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण राज्याची सुवार्ता सांगण्याच्या कार्यात व्यस्त आहोत. एक असं कार्य ज्यामुळे भविष्याविषयी असलेल्या आशेवर आपला विश्वास आणखी मजबूत होतो. एक बहीण म्हणते: “जेव्हा आपण इतरांना देवाच्या राज्यामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल सांगतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की लोकांना कोणतीही आशा नाही आणि त्यांच्या समस्या कधीही सुटणार नाहीत असं ते मानतात.” पण प्रचारकार्यात भाग घेतल्याने भविष्याबद्दल असलेला आपला सकारात्मक दृष्टिकोन आणखी मजबूत होतो, आणि जीवनाच्या शर्यतीत टिकून राहण्याचा आपला निश्चयही दृढ होतो.—१ करिंथ. ९:२४.

आपल्या हातून पाप घडतं तेव्हा

१०. दाविदाच्या परिस्थितीचं वर्णन करा.

१० राजा दावीद हा एक विश्वासू पुरुष होता, आणि यहोवाचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. (प्रे. कृत्ये १३:२२) असं असलं तरी, एक वेळ अशी आली जेव्हा दाविदाने एक गंभीर पाप केलं. त्याने बथशेबेशी व्यभिचार केला. इतकंच नाही तर त्याने बथशेबेच्या पतीला, उरीयाला युद्धात ठार मारलं जावं याची योजनाही केली. दाविदाने उरीयाच्याच हातून त्याच्या मृत्यूचं पत्र पाठवलं होतं! (२ शमु. ११:१-२१) पण नंतर, काही काळाने मात्र दाविदाने केलेलं पाप उघडकीस आलं. (मार्क ४:२२) मग तेव्हा दाविदाने कशी वृत्ती दाखवली?

भूतकाळातील चुका (परिच्छेद ११-१४ पाहा)

११, १२. (क) पाप केल्यानंतर काय करणं दाविदाच्या हातात नव्हतं? (ख) आपण खरा पश्‍चात्ताप दाखवला तर यहोवा काय करेल?

११ काय करणं दाविदाच्या हातात नव्हतं: दाविदाकडून जे घडलं होतं ते तो बदलू शकत नव्हता. खरंतर, त्याच्याकडून झालेल्या पापाचे काही परिणाम त्याला जीवनभर भोगावे लागणार होते. (२ शमु. १२:१०-१२, १४) त्यामुळे त्याला विश्वासाची गरज होती. त्याला हा भरवसा बाळगण्याची गरज होती की, जेव्हा तो त्याचं पाप कबूल करून खरा पश्‍चात्ताप दाखवेल तेव्हा यहोवा त्याला क्षमा करेल. आणि सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठीही मदत पुरवेल.

१२ अपरिपूर्ण असल्याकारणाने आपण सर्वच जण पाप करतो. पण काही चुका या जास्त गंभीर स्वरूपाच्या असतात आणि काही वेळा आपण झालेल्या चुकांना सुधारूही शकत नाही. आपल्यालासुद्धा आपल्या कृत्यांच्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. (गलती. ६:७) पण आपल्याला देवाने दिलेल्या वचनावर पूर्ण खात्री आहे. ती म्हणजे जर आपण खरा पश्‍चात्ताप दाखवला तर यहोवा देव आपल्याला त्या कठीण काळात मदत करेल; जरी आपल्या स्वतःच्या चुकांमुळे ती परिस्थिती निर्माण झाली असली तरीही.—यशया १:१८, १९; प्रेषितांची कृत्ये ३:१९ वाचा.

१३. दाविदाने यहोवासोबत असलेला त्याचा नातेसंबंध पुन्हा मजबूत कसा केला?

१३ काय करणं दाविदाला शक्य होतं: दाविदाला यहोवासोबत असलेला त्याचा नातेसंबंध पुन्हा मजबूत करण्याची इच्छा होती. हे त्याने कसं केलं? दाविदाने यहोवाकडून मिळणारी मदत स्वीकारली. उदाहरणार्थ, त्याने यहोवाचा संदेष्टा नाथान याच्याकडून मिळणारं ताडन स्वीकारलं. (२ शमु. १२:१३) दाविदाने यहोवाकडे प्रार्थनाही केली आणि झालेलं पाप कबूल केलं. याद्वारे दाविदाने दाखवून दिलं की त्याला यहोवाची मर्जी पुन्हा मिळवण्याची इच्छा आहे. (स्तो. ५१:१-१७) स्वतःकडून झालेल्या पापांच्या ओझ्याखाली दबून न जाता, दाविदाने त्यातून धडा घेतला. त्याने अशा गंभीर चुका पुन्हा कधीही केल्या नाहीत. कालांतराने दावीद जेव्हा मरण पावला तेव्हा तो देवाचा एक विश्वासू सेवक म्हणून मरण पावला, आणि आजही दावीद यहोवाच्या स्मरणात एक विश्वासू सेवक म्हणूनच आहे.—इब्री ११:३२-३४.

१४. दाविदाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१४ दाविदाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? जेव्हा आपल्या हातून एखादं गंभीर पाप घडतं तेव्हा आपण खरा पश्‍चात्ताप दाखवला पाहिजे, यहोवाकडे आपलं पाप कबूल केलं पाहिजे आणि त्याच्याकडे क्षमा मागितली पाहिजे. (१ योहा. १:९) आपण मंडळीतील वडिलांशीही याबाबतीत बोललं पाहिजे. कारण ते यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध पुन्हा मजबूत करण्यास आपल्याला मदत करू शकतात. (याकोब ५:१४-१६ वाचा.) जेव्हा आपण यहोवाकडून मिळणारी मदत स्वीकारतो तेव्हा आपण हे दाखवून देतो की, क्षमा करण्याविषयी त्याने आपल्याला दिलेल्या वचनावर आपला पूर्ण भरवसा आहे. यासोबतच, झालेल्या चुकांमधून आपल्याला शिकण्याची आणि यहोवाची पुन्हा एकदा आवेशाने सेवा करत राहण्याची गरज आहे.—इब्री १२:१२, १३.

इतर परिस्थितींमध्ये

आजारपण (परिच्छेद १५ पाहा)

१५. हन्नाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१५ देवाचे इतरही काही सेवक असे आहेत ज्यांनी देवावर आपला पूर्ण भरवसा ठेवला, आणि कठीण परिस्थितींमध्ये त्यांना जे करणं शक्य होतं ते त्यांनी केलं. या विश्वासू जणांच्या उदाहरणावरूनही आपण बरंच काही शिकू शकतो. हन्नाचंच उदाहरण घ्या. अशी एक वेळ होती जेव्हा हन्नाला मूल नव्हतं आणि ही परिस्थिती ती बदलू शकत नव्हती. पण यहोवा आपल्याला सांत्वन देईल यावर तिने पूर्ण भरवसा ठेवला. त्यामुळे निवासमंडपात ती उपासना करत राहिली आणि आपल्या भावना प्रार्थनेद्वारे तिने देवासमोर व्यक्त केल्या. (१ शमु. १:९-११) खरंच हन्नाने आपल्यासमोर एक अप्रतिम उदाहरण मांडलं आहे! जेव्हा आपण अशा एखाद्या कठीण प्रसंगाचा किंवा आजाराचा सामना करतो जे बदलणं आपल्या हातात नसतं, तेव्हा आपणही आपली सगळी चिंता यहोवावर टाकली पाहिजे. असं करण्याद्वारे आपण दाखवून देऊ की यहोवा आपली काळजी घेतो यावर आपला पूर्ण भरवसा आहे. (१ पेत्र ५:६, ७) यासोबतच देवाची संघटना, ख्रिस्ती सभांद्वारे आणि इतर आध्यात्मिक तरतुदींद्वारे जे मार्गदर्शन पुरवते, त्यांपासून फायदा मिळवण्यासाठी जे करणं आपल्याला शक्य आहे ते आपण करत राहू.—इब्री १०:२४, २५.

सत्याबाहेर गेलेली मुलं (परिच्छेद १६ पाहा)

१६. शमुवेलाच्या उदाहरणावरून पालक काय शिकू शकतात?

१६ अशा विश्वासू पालकांबद्दल काय ज्यांच्या मुलांनी यहोवाची सेवा करणं सोडून दिलं आहे? शमुवेल संदेष्ट्याच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. प्रौढ झालेल्या आपल्या मुलांना यहोवाशी एकनिष्ठ राहण्यास तो बळजबरी करू शकत नव्हता. (१ शमु. ८:१-३) त्याला सर्वकाही यहोवावर सोपवून द्यायचं होतं. पण असं असलं तरी, यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आणि त्याला आनंदी करण्यासाठी जे करणं शक्य होतं ते मात्र शमुवेलाने केलं. (नीति. २७:११) आज असे अनेक ख्रिस्ती पालक आहेत ज्यांची परिस्थिती शमुवेलासारखीच आहे. ते या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतात की त्यांचा स्वर्गीय पिता यहोवा, हा येशूने सांगितलेल्या उधळ्या पुत्राच्या दाखल्यातील प्रेमळ पित्याप्रमाणे आहे. जे खरा पश्‍चात्ताप दाखवतात त्यांना क्षमा करण्यास आणि पुन्हा जवळ घेण्यास यहोवा नेहमी तयार असतो. (लूक १५:२०) पण यादरम्यान, पालक यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध मजबूत करण्याकडे लक्ष लावू शकतात. कदाचित त्यांनी मांडलेल्या चांगल्या उदाहरणामुळे त्यांचं मूल पुन्हा यहोवाकडे परत येईल.

बेताची परिस्थिती (परिच्छेद १७ पाहा)

१७. गरीब विधवेचं उदाहरण आपल्यासाठी प्रोत्साहनदायक का आहे?

१७ आणखी एक चांगलं उदाहरण म्हणजे, येशूच्या काळातील गरीब विधवेचं. (लूक २१:१-४ वाचा.) मंदिरात चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी ती काहीही करू शकत नव्हती. तसंच तिची गरीबीदेखील ती काढून टाकू शकत नव्हती. (मत्त. २१:१२, १३) पण यहोवावर असलेल्या तिच्या विश्वासाने तिला खऱ्या उपासनेला हातभार लावण्यासाठी प्रेरित केलं. तिने उदारतेनं तिच्याजवळ असलेले सर्व पैसे, म्हणजे दोन नाणी दान म्हणून दिले. त्या विश्वासू स्त्रीने यहोवावर आपला पूर्ण भरवसा दाखवला. तिला या गोष्टीची जाणीव होती की जर तिने यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवलं तर यहोवा तिच्या गरजा नक्की पूर्ण करेल. या गरीब विधवेप्रमाणेच, आपल्यालाही ही खात्री आहे की जर आपण यहोवाच्या राज्याला जीवनात प्रथम स्थानी ठेवलं, तर तो आपल्या सर्व गरजा नक्कीच भागवेल.—मत्त. ६:३३.

१८. मॅल्कम या बांधवाने कशा प्रकारे एक उत्तम उदाहरण मांडलं?

१८ आज आपले असे अनेक बंधुभगिनी आहेत जे देवाच्या या विश्वासू सेवकांप्रमाणेच मनोवृत्ती दाखवतात. ज्या गोष्टी करणं शक्य आहेत त्यांवरच ते आपलं लक्ष केंद्रित करतात. मॅल्कम या बांधवाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. ते आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे २०१५ सालापर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहिले. यहोवाच्या सेवेत घालवलेल्या अनेक वर्षांदरम्यान त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या जीवनात अनेक चांगल्या आणि वाईट परिस्थिती आल्या. ते म्हणतात: “कधीकधी आपल्या जीवनात अशा काही गोष्टी घडतात ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो आणि त्या वेळी निर्णय घेणं खूप कठीण वाटतं. पण जे स्वतःच्या बुद्धीवर विसंबून राहण्याऐवजी यहोवावर विसंबून राहतात त्यांना तो आशीर्वाद देतो.” पुढे मॅल्कम सल्ला देतात: “यहोवाच्या सेवेत होताहोईल तितकं फलदायी आणि आवेशी बनण्यासाठी प्रार्थना करा. तुम्हाला जी गोष्ट करता येत नाही तिच्यावर नव्हे, तर जी करता येते तिच्यावर लक्ष लावा.” *

१९. (क) २०१७ सालासाठी असलेलं वार्षिक वचन हे योग्य निवड ठरतं, असं का म्हणता येईल? (ख) या सालासाठी असलेलं वार्षिक वचन तुम्ही तुमच्या जीवनात कशा प्रकारे लागू कराल?

१९ आजचं जग हे अधिकाधिक वाईट होत चाललं आहे. त्यामुळे आपल्याला आणखी कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. (२ तीम. ३:१, १३) पण आपल्यासमोर येणाऱ्या या कठीण प्रसंगांमुळे आपण खचून न जाता यहोवावर पूर्ण विश्वास दाखवण्याची हीच वेळ आहे. यासोबतच ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्य आहे, त्यांवर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यामुळेच या वर्षासाठी असलेलं वार्षिक वचन हे योग्य निवड ठरतं: “यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर.”—स्तो. ३७:३, पं.र.भा.

२०१७ सालासाठी आपलं वार्षिक वचन: “यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर.”—स्तो. ३७:३, पं.र.भा

^ परि. 4 स्तोत्र ३७:३ (पंडिता रमाबाई भाषांतर): “यहोवावर भरवसा ठेव आणि चांगले ते कर; देशात वस्ती कर आणि सत्यतेला अनुसर.”