व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करतो

यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करतो

“परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल.”—यश. ५८:११.

गीत क्रमांक: २३, २२

१, २. (क) यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आणि इतर धर्मांमध्ये कोणता फरक दिसून येतो? (ख) या आणि पुढील लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

“तुमचा पुढारी कोण आहे?” असा प्रश्न सहसा लोक यहोवाच्या साक्षीदारांना विचारतात. याचं कारण म्हणजे आज जगातील बहुतेक धर्मांमध्ये त्यांचं नेतृत्व करणारा एखादा पुरुष किंवा स्त्री असते. पण, आपल्या बाबतीत तसं नाही. आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे की आपलं नेतृत्व करणारा कोणी अपरिपूर्ण मानव नाही. आपलं नेतृत्व करणारा येशू ख्रिस्त आहे आणि तो स्वतःदेखील आपल्या पित्याचं, यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारतो.—मत्त. २३:१०.

यासोबतच यहोवा देवाने या पृथ्वीवर “विश्वासू व बुद्धिमान दासाला” निवडलं आहे. विश्वासू पुरुषांनी बनलेला हा गट आज देवाच्या लोकांमध्ये पुढाकार घेत आहे. (मत्त. २४:४५) पण, मग आपण हे कशावरून म्हणू शकतो की खरंतर यहोवा त्याच्या पुत्राद्वारे आपलं नेतृत्व करत आहे? या गोष्टीची खात्री होण्यासाठी आपण या लेखात आणि पुढील लेखात तीन कारणांवर चर्चा करणार आहोत. यावरून आपल्याला हेदेखील कळेल की जरी यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी मानवांचा वापर करत आला असला, तरी खऱ्या अर्थानं तोच त्यांचं नेतृत्व करत होता आणि आजही करत आहे.—यश. ५८:११.

पवित्र आत्म्याद्वारे त्यांना मदत मिळाली

३. इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्यासाठी मोशेला मदत कुठून मिळाली?

पवित्र आत्म्याने देवाच्या प्रतिनिधींना बळ पुरवलं. देवाने मोशेला इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्यासाठी निवडलं. मग ही महत्त्वपूर्ण जबाबदारी योग्य रीतीने हाताळण्यासाठी मोशेला कशामुळे मदत मिळाली? यासाठी यहोवाने मोशेला “आपला पवित्रतेचा आत्मा” दिला. (यशया ६३:११-१४ वाचा.) इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा मोशेला मदत करत होता. यामुळे खरं पाहता यहोवाच त्याच्या लोकांचं नेतृत्व करत होता.

४. मोशेला देवाचा आत्मा मिळाला आहे हे कशावरून दिसून आलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

मोशेला देवाचा पवित्र आत्मा मदत करत आहे हे लोकांनादेखील समजलं का? हो. कारण, यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळे मोशेला चमत्कार करण्याची क्षमता मिळाली होती आणि इजिप्तचा शक्तिशाली शासक फारो याला यहोवा कोण आहे हे दाखवून देण्यास मदत झाली होती. (निर्ग. ७:१-३) लोकांचं नेतृत्व करताना पवित्र आत्म्याने मोशेला प्रेमळपणा आणि सहनशीलता दाखवण्यास देखील मदत पुरवली. त्या काळी असलेल्या इतर देशांतील स्वार्थी आणि कठोर पुढाऱ्यांपेक्षा तो खूप वेगळा होता. (निर्ग. ५:२, ६-९) यावरून हे स्पष्ट होतं की यहोवाने त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी मोशेला निवडलं होतं.

५. यहोवाने त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी आणखी कोणाला त्याचा पवित्र आत्मा दिला?

यहोवाने त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी आणखी कोणाला आपला पवित्र आत्मा दिला होता? बायबल सांगतं: “नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता.” (अनु. ३४:९) “परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला.” (शास्ते ६:३४) तसंच, “परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचारू लागला.” (१ शमु. १६:१३) हे सर्व पुरुष देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीवर निर्भर राहिले. देवाच्या पवित्र आत्म्यामुळे ते अशी कार्यं करू शकले जी ते स्वतःच्या बळावर कधीही करू शकले नसते. (यहो. ११:१६, १७; शास्ते ७:७, २२; १ शमु. १७:३७, ५०) खरोखरच, अशी मोठमोठी कार्यं करण्यासाठी त्यांना शक्ती देणारा यहोवाच होता. त्यामुळे सर्व श्रेय त्यालाच दिलं पाहिजे आणि त्याचीच स्तुती केली गेली पाहिजे.

६. इस्राएलमध्ये नेतृत्व करणाऱ्यांप्रती लोकांनी आदर दाखवावा अशी अपेक्षा यहोवा का करत होता?

देवाचा पवित्र आत्मा मोशे, यहोशवा, गिदोन आणि दावीद यांना मदत करत आहे हे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी काय करण्याची गरज होती? त्यांनी या पुरुषांना आदर दाखवण्याची गरज होती. पण, जेव्हा लोक मोशेविरुद्ध कुरकूर करू लागले, तेव्हा यहोवाने त्याला विचारलं: “कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार?” (गण. १४:२, ११) आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवानेच या पुरुषांना निवडलं होतं हे यावरून स्पष्टच होतं. जेव्हा लोक त्यांच्या आज्ञेत राहिले तेव्हा ते खरंतर यहोवाचं नेतृत्व स्वीकारत होते.

देवदूतांनी त्यांना मदत केली

७. देवदूतांनी मोशेला मदत कशी पुरवली?

देवाच्या प्रतिनिधींना देवदूतांनी मदत केली. (इब्री लोकांस १:७, १४ वाचा.) देवाने मोशेला मार्गदर्शन पुरवण्यासाठी देवदूतांचा वापर केला. सर्वात प्रथम एका देवदूताने मोशेला “झुडपात दर्शन” दिलं आणि इस्राएली लोकांना मुक्त करून त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. (प्रे. कृत्ये ७:३५) मग, देवदूतांचा वापर करून देवाने मोशेला नियम दिले. त्याच्या मदतीनं तो इस्राएली लोकांना मार्गदर्शन देणार होता. (गलती. ३:१९) तसंच, यहोवाने त्याला सांगितलं: “ज्या स्थलाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. पाहा, माझा दूत तुझ्यापुढे चालेल.” (निर्ग. ३२:३४) पण, देवदूत या सर्व गोष्ट करत असल्याचं इस्राएली लोकांनी स्वतः पाहिलं असं बायबलमध्ये सांगितलेलं नाही. पण, मोशे ज्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन आणि सल्ला पुरवत होता त्यावरून देवदूतांकडून त्याला मदत मिळत होती हे स्पष्टच आहे.

८. देवदूतांनी यहोशवा आणि हिज्कीयाला कशी मदत पुरवली?

देवदूतांनी आणखी कोणाला मदत पुरवली? बायबल सांगतं, की “परमेश्वराचा सेनापती” असलेल्या एका देवदूताने यहोशवाला कनानी लोकांविरुद्ध असलेल्या लढाईत विजयी होण्यास मदत पुरवली. (यहो. ५:१३-१५; ६:२, २१) नंतर, जेव्हा राजा हिज्कीया देवाच्या लोकांचं नेतृत्व करत होता, तेव्हा अश्शूरच्या मोठ्या सैन्याने यरुशलेमेचा नाश करण्याची धमकी दिली. त्या वेळी एका रात्रीत “परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले.”—२ राजे १९:३५.

९. देवाचे प्रतिनिधी अपरिपूर्ण असले तरी लोकांनी काय करण्याची गरज होती?

देवदूत हे परिपूर्ण आहेत. पण, ज्या पुरुषांना त्यांनी मदत केली ते अपरिपूर्ण होते. उदाहरणार्थ, मोशे एकदा यहोवाला आदर दाखवण्यास चुकला. (गण. २०:१२) तसंच, जेव्हा गिबोनी लोक करार करण्यासाठी आले तेव्हा यहोशवाने देवाकडे सल्ला मागितला नाही. (यहो. ९:१४, १५) एका प्रसंगी, हिज्कीया राजा हा गर्विष्ठ बनला. (२ इति. ३२:२५, २६) हे सर्व पुरुष अपरिपूर्ण असले तरी इस्राएली लोकांनी त्यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करणं गरजेचं होतं. या पुरुषांना साहाय्य करण्यासाठी यहोवा स्वर्गदूतांचा वापर करत होता. खरंच, यहोवाच त्यांचं नेतृत्व करत होता.

देवाच्या वचनाने त्यांना मार्गदर्शन दिलं

१०. देवाच्या नियमशास्त्रातून मोशेला मार्गदर्शन कसं मिळालं?

१० देवाच्या वचनाने त्याच्या प्रतिनिधींना मार्गदर्शित केलं. इस्राएली लोकांना देण्यात आलेल्या नियमशास्त्राला बायबल ‘मोशेचं नियमशास्त्र’ असं म्हणतं. (१ राजे २:३) पण बायबलमध्ये हेदेखील स्पष्टपणे सांगितलं आहे, की हे नियम देणारा स्वतः यहोवा देव होता आणि मोशेलासुद्धा त्यांचं पालन करण्याची गरज होती. (२ इति. ३४:१४) उदाहरणार्थ, निवासमंडप कसं तयार करायचा याबद्दल यहोवाने मोशेला काही सूचना दिल्या. आणि बायबल सांगतं की मोशेने “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे . . . केले.”—निर्ग. ४०:१-१६.

११, १२. (क) यहोशवा आणि देवाच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या इतर राजांना काय करण्याची गरज होती? (ख) नेतृत्व करणाऱ्यांना देवाच्या वचनाने कशा प्रकारे मार्गदर्शित केलं?

११ यहोशवा जेव्हा नेतृत्व करू लागला तेव्हा त्याच्याजवळ देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ होता. आणि यहोवाने त्याला सांगितलं, की या नियमशास्त्रात “जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर.” (यहो. १:८) त्यानंतरही ज्या राजांनी देवाच्या लोकांचं नेतृत्व केलं त्यांना दररोज नियमशास्त्र वाचण्याची आणि त्याची एक प्रत लिहून तयार करण्याची गरज होती. तसंच, त्यांना नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व विधी पाळण्याचीही गरज होती.—अनुवाद १७:१८-२० वाचा.

१२ ज्या पुरुषांनी नेतृत्व केलं त्यांना देवाच्या वचनाने कशा प्रकारे मार्गदर्शित केलं? योशीया राजाच्या उदाहरणाचा विचार करा. मोशेचं नियमशास्त्र सापडलं, तेव्हा योशीयाचा सचिव त्याला ते वाचून दाखवू लागला. * “त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली.” देवाच्या वचनाने नंतर योशीया राजाला त्या देशातील सर्व मूर्तींचा नाश करण्यासाठी प्रेरित केलं. तसंच, कधीही झाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणावर वल्हांडणाचा सन साजरा करण्यासाठी प्रेरित केलं. (२ राजे २२:११; २३:१-२३) योशीया आणि देवाच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या इतर विश्वासू जणांनी देवाच्या वचनाचं मार्गदर्शन स्वीकारलं. त्यामुळे, ज्या सूचना त्यांनी दिल्या होत्या त्यांतदेखील फेरबदल करण्यास ते तयार झाले. या फेरबदलांमुळे देवाच्या आज्ञेत राहण्यास लोकांना मदत मिळाली.

१३. देवाच्या लोकांचं नेतृत्व करणारे इतर देशांतील नेत्यांपेक्षा वेगळे कसे होते?

१३ दुसऱ्या देशांमध्ये नेतृत्व करणारे मर्यादित मानवी बुद्धीवर अवलंबून होते. उदाहरणार्थ, कनानचं नेतृत्व करणारे आणि इतर कनानी लोक फार घृणास्पद कृत्यं करत होते. या कृत्यांत अगदी जवळच्या नातेवाइकासोबत लैंगिक संबंध ठेवणं, समलैंगिकता, पशूगमन, मुलांचा बळी देणं आणि मूर्तिपूजा करणं अशा घोर कृत्यांचा समावेश होता. (लेवी. १८:६, २१-२५) तसंच, स्वच्छतेविषयीच्या नियमांबद्दल देवाच्या लोकांना जी माहिती होती ती बाबेलच्या आणि इजिप्तच्या नेत्यांकडे नव्हती. (गण. १९:१३) पण याच्या अगदी उलट देवाच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या विश्वासू सेवकांनी लोकांना आपली उपासना शुद्ध ठेवण्यास, शारीरिक स्वच्छता बाळगण्यास आणि नैतिक शुद्धता राखण्यास नेहमी प्रोत्साहन दिलं. यावरून हेच दिसून येतं की खरोखर यहोवाच त्याच्या लोकांचं नेतृत्व करत होता.

१४. यहोवाने त्याच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या काहींना ताडन का दिलं?

१४ पण, प्राचीन काळात देवाच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या सर्वच राजांनी देवाच्या मार्गदर्शनाचं पालन केलं असं नाही. ज्यांनी देवाच्या आज्ञेत राहण्याचं टाळलं त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे, देवदूतांद्वारे आणि त्याच्या वचनाद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं पालन करण्याचं नाकारलं. काही वेळा यहोवाने त्यांचं ताडन केलं, तर काहींकडून त्यांची जबाबदारी काढून घेतली आणि दुसऱ्यांना त्यांच्या जागी नियुक्त केलं. (१ शमु. १३:१३, १४) पुढे, यहोवाने त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी एका परिपूर्ण व्यक्तीला नियुक्त केलं.

यहोवा एका परिपूर्ण व्यक्तीला नेतृत्व करण्यासाठी निवडतो

१५. (क) यहोवा एका परिपूर्ण नेतृत्व करणाऱ्याला नियुक्त करेल हे संदेष्ट्यांनी कसं दाखवून दिलं? (ख) परिपूर्ण नेतृत्व करणारा कोण होता?

१५ शेकडो वर्षांआधी यहोवाने अभिवचन दिलं होतं, की तो त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी एका परिपूर्ण व्यक्तीला नियुक्त करेल. उदाहरणार्थ, मोशेने इस्राएली लोकांना सांगितलं: “तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करेल, त्याचे तुम्ही ऐका.” (अनु. १८:१५) यशयाने म्हटलं की तो “नेता व शास्ता” बनेल. (यश. ५५:४) आणि दानीएलाने मसीहाबद्दल लिहिलं की तो “अधिपती” होईल. (दानी. ९:२५) शेवटी, येशू ख्रिस्ताने स्वतःची ओळख देवाच्या लोकांचा प्रमूख म्हणून केली. (मत्तय २३:१० वाचा.) येशूचे शिष्य स्वेच्छेने त्याच्यासोबत चालत राहिले आणि त्याला यहोवानेच निवडलं आहे यावर त्यांचा विश्वास होता. (योहा. ६:६८, ६९) पण, यहोवा त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी ज्याला निवडेल तो येशू ख्रिस्तच आहे असा विश्वास त्यांना का होता?

१६. येशूला पवित्र आत्म्याकडून बळ मिळालं होतं हे कशावरून दिसून येतं?

१६ पवित्र आत्म्याने त्याला बळ पुरवलं. जेव्हा येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला तेव्हा योहानाने पाहिलं की “आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर [येशूवर] उतरत आहे.” त्यानंतर, “आत्म्याने त्याला [येशूला] लागलेच अरण्यात घालवले.” (मार्क १:१०-१२) देवाच्या पवित्र आत्म्याने येशूला त्याच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान शिकवण्यासाठी आणि चमत्कार करण्यासाठीही बळ दिलं. (प्रे. कृत्ये १०:३८) तसंच, पवित्र आत्म्याने येशूला प्रेम, आनंद आणि भक्कम विश्वास यांसारखे गुण दाखवण्यास मदत केली. (योहा. १५:९; इब्री १२:२) देवाच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने इतक्या मोठ्या प्रमाणावर देवाच्या पवित्र आत्म्याचा पाठिंबा असल्याचा पुरावा दिला नव्हता. खरोखर, यहोवानेच येशूला नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केलं आहे.

येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर देवदूतांनी त्याला मदत कशी केली? (परिच्छेद १७ पाहा)

१७. येशूला मदत करण्यासाठी देवदूतांनी काय केलं?

१७ देवदूतांनी येशूला मदत पुरवली. येशूचा बाप्तिस्मा झाला त्यानंतर काही काळाने “देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.” (मत्त. ४:११) तसंच, बायबल सांगतं की त्याच्या मृत्यूच्या काही तासांआधी “स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला.” (लूक २२:४३) येशूला याची खात्री होती की गरज पडल्यास, त्याला मदत पुरवण्यासाठी यहोवा त्याच्या दूतांना नक्की पाठवेल.—मत्त. २६:५३.

१८, १९. देवाच्या वचनाने येशूला त्याच्या जीवनात आणि सेवाकार्यात कसं मार्गदर्शित केलं?

१८ देवाच्या वचनाने येशूचं मार्गदर्शन केलं. येशूने सेवाकार्याची सुरवात केली तेव्हापासून वधस्तंभावर त्याचा मृत्यू झाला अगदी तोपर्यंत येशूने देवाच्या वचनांचं मार्गदर्शन स्वीकारलं. त्याचा मृत्यू होतानाही त्याने मसीहाबद्दल असलेल्या भविष्यवाण्यांचा उल्लेख केला. (मत्त. ४:४; २७:४६; लूक २३:४६) पण, त्या काळातील धर्मपुढारी येशूपेक्षा खूप वेगळे होते. देवाचं वचन जेव्हा त्यांच्या स्वतःच्या शिकवणींशी सुसंगत नसायचं, तेव्हा ते जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यांच्याबद्दल बोलताना येशूने देवाच्या वचनाचा संदर्भ दिला आणि म्हटलं की, “हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.” (मत्त. १५:७-९) जे लोक देवाच्या वचनाचं पालन करत नाहीत, अशांना यहोवा कधीच त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी निवडत नाही.

१९ येशूने इतरांना शिकवतानादेखील देवाच्या वचनांचा वापर केला. जेव्हा धर्मपुढाऱ्यांनी त्याला प्रश्न विचारले तेव्हा त्याने स्वतःच्या बुद्धीचा किंवा जीवनातील अनुभवांचा वापर करून त्यांना उत्तर दिलं नाही. त्याने नेहमी शास्त्राच्या आधारावर लोकांना शिकवलं. (मत्त. २२:३३-४०) तसंच, येशू स्वर्गातील त्याच्या जीवनाबद्दल किंवा विश्वाच्या निर्मितीबद्दल त्याच्याजवळ असलेल्या माहितीचा वापर करून लोकांवर छाप पाडू शकत होता. पण त्याने तसं केलं नाही, तर देवाच्या वचनावर प्रेम असल्यामुळे तो त्याबद्दल इतरांना सांगण्यास उत्सुक असायचा. यासोबतच “त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले.”—लूक २४:३२, ४५.

२०. (क) येशूने यहोवाचा गौरव कसा केला? (ख) येशू आणि हेरोद अग्रिप्पा पहिला हे कशा प्रकारे वेगळे होते?

२० येशू ज्या प्रकारे लोकांना शिकवायचा ते पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. पण असं असलं तरी येशूने यासाठी नेहमी त्याचा शिक्षक यहोवा याला श्रेय दिलं. (लूक ४:२२) जेव्हा एका धनवान मनुष्याने येशूला “उत्तम गुरूजी” असं म्हटलं, तेव्हा येशू नम्रपणे त्याला म्हणाला: “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही.” (मार्क १०:१७, १८) याच्या जवळपास आठ वर्षांनंतर हेरोद अग्रिप्पा पहिला हा यहुदाचं नेतृत्व करू लागला. त्याची मनोवृत्ती येशू ख्रिस्तापेक्षा खूप वेगळी होती. एक दिवशी एका खास सभेसाठी हेरोदाने खूप महागडे राजवसत्रं परिधान केले. जेव्हा लोकांनी त्याला पाहिलं आणि बोलताना ऐकलं, तेव्हा ते म्हणू लागले: “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” लोकांकडून मिळणारी ही प्रशंसा हेरोदाला आवडली आणि “त्याने देवाला गौरव दिले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.” (प्रे. कृत्ये १२:२१-२३) यावरून स्पष्ट होतं की लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने हेरोदाला निवडलेलं नव्हतं. याच्या अगदी उलट, येशूने हे दाखवून दिलं की तो देवाचा निवडलेला आहे. तसंच, त्याने यहोवाला त्याच्या लोकांचं नेतृत्व करणारा सर्वोच्च अधिकारी या नात्याने नेहमी गौरव दिला.

२१. पुढच्या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

२१ येशूने फक्त काही वर्षांसाठीच नेतृत्व करावं अशी यहोवाची इच्छा नव्हती. येशूने त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांना सांगितलं: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.” तो पुढे म्हणाला: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:१८-२०) पण, येशू तर स्वर्गात आहे आणि आपण त्याला पाहू शकत नाही. मग तो पृथ्वीवर असलेल्या देवाच्या लोकांचं नेतृत्व कसं करत आहे? पृथ्वीवर येशूच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून यहोवा कोणाला निवडणार होता? आणि देवाचे हे प्रतिनिधी कोण आहेत हे ख्रिस्ती कशावरून ओळखू शकणार होते? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या लेखात देण्यात आली आहेत.

^ परि. 12 या कदाचित मोशेने लिहिलेल्या नियमांच्या मूळ प्रती असाव्यात.