व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून तुम्ही बोध घेणार का?

बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींमधून तुम्ही बोध घेणार का?

“या गोष्टी उदाहरणादाखल . . . जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी . . . लिहिल्या आहेत.”—१ करिंथ. १०:११.

गीत क्रमांक: ११, २९

१, २. यहूदामधील ज्या चार राजांच्या हातून चुका झाल्या त्यांचं आपण परीक्षण का करणार आहोत?

समजा, रस्त्यावरून जाताना तुमच्या पुढे चालणारी एखादी व्यक्ती घसरुण पडली, तर तिथून जाताना तुम्ही सांभाळून चालणार नाही का? नक्कीच तुम्ही तिथून सांभाळून चालाल. त्याच प्रकारे इतरांनी त्यांच्या जीवनात ज्या चुका केल्या आहेत त्यांचं परीक्षण केल्यामुळे, आपल्या हातूनही त्याच चुका होण्यापासून आपण बचावू शकतो. उदाहरणार्थ, बायबलमध्ये काही लोकांच्या हातून घडलेल्या ज्या चुकांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यांपासून आपण धडा शिकू शकतो.

आपण मागील लेखात यहूदातील ज्या चार राजांबद्दल चर्चा केली, त्यांनी ‘पूर्ण हृदयाने’ यहोवाची सेवा केली होती. पण, असं असलं तरी त्यांनीही काही गंभीर चुका केल्या. त्यांच्या उदाहरणांवर आपण मनन करावं आणि त्यांतून महत्त्वपूर्ण धडे शिकावेत, म्हणून बायबलमध्ये या सर्व गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. मग, यहूदातील या राजांसोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपल्या हातून घडू नयेत, म्हणून आपण सावधगिरी कशी बाळगू शकतो?—रोमकर १५:४ वाचा.

मानवी बुद्धीवर अवलंबून राहिल्याने भयंकर परिणाम घडून येतात

३-५. (क) आसा पूर्ण मनाने यहोवाला समर्पित होता तरीसुद्धा त्याने कोणती चूक केली? (ख) बाशा राजाविरुद्ध लढताना आसा राजा मानवांवर का अवलंबून राहिला असावा?

सर्वात आधी आपण आसा राजाच्या उदाहरणावर चर्चा करू. जेव्हा दहा लाख कूशी सैनिकांनी यहूदावर हल्ला केला, तेव्हा आसा राजा यहोवावर अवलंबून राहिला होता. पण, नंतर जेव्हा तो इस्राएलचा राजा बाशा याच्याशी लढला, तेव्हा मात्र यहोवावर अवलंबून राहिला नाही. बाशा हा रामा नगराची मजबुती करत होता. इस्राएलमधील रामा हे नगर, यहूदा राज्याच्या सीमेजवळ असलेलं अत्यंत महत्त्वपूर्ण नगर होतं. बाशा राजाला हे काम करण्यापासून थांबवण्याची आसाची इच्छा होती. (२ इति. १६:१-३) त्यामुळे त्याने आरामाच्या राजाला धनसंपत्ती देऊन त्याच्याकडून मदत घेण्याचं ठरवलं. जेव्हा अरामी लोकांनी इस्राएलच्या शहरांवर हल्ला केला, तेव्हा “रामा शहराची मजबुती करण्याचे सोडून बाशाने ते काम तसेच टाकले.” (२ इति. १६:५) आपण जो निर्णय घेतला तो योग्यच होता असं कदाचित आसाला सुरवातीला वाटलं असावं.

पण, आसाने जे केलं त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं? आसा आपल्यावर अवलंबून राहिला नाही, त्यामुळे यहोवाला दुःख झालं. म्हणून मग आसाला त्याचा दोष दाखवण्यासाठी यहोवाने संदेष्टा हनानी याला त्याच्याकडे पाठवलं. (२ इतिहास १६:७-९ वाचा.) हनानी संदेष्ट्याने आसाला स्पष्ट शब्दांत सुनावलं: “यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.” आसा राजाने रामा नगरावर तर नियंत्रण मिळवलं, पण पुढे संपूर्ण आयुष्य त्याला आणि त्याच्या लोकांना अनेक लढाया लढाव्या लागल्या.

मागील लेखात आपण पाहिलं होतं, की यहोवा हा आसा राजावर खूश होता. अपरिपूर्ण असूनही आसा यहोवाला पूर्ण मनाने समर्पित होता ही गोष्ट यहोवाने पाहिली. (१ राजे १५:१४) असं असलं तरी आसाने जो चुकीचा निर्णय घेतला होता, त्याच्या वाईट परिणामांना त्याला तोंड द्यावं लागलं. पण, यहोवावर अवलंबून राहण्याऐवजी तो स्वतःवर आणि दुसऱ्या मानवांवर का अवलंबून राहिला? आपण युद्धनीतीच्या डावपेचांचा वापर करून ही लढाई जिंकू शकतो, असं कदाचित आसाला वाटलं असावं. किंवा मग त्याने इतरांकडून मिळणाऱ्या चुकीच्या सल्ल्यांकडे लक्ष दिलं असावं.

६. आसाने जी चूक केली त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? उदाहरण द्या.

आसाने जी चूक केली त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? आपण हेच शिकतो की आपण सर्व प्रसंगांत स्वतःच्या बुद्धीवर नाही, तर यहोवावर अवलंबून राहिलं पाहिजे. आपल्यासमोर जेव्हा काही मोठ्या समस्या येतात, तेव्हा आपण यहोवावर अवलंबून राहावं या गोष्टीची जाणीव कदाचित आपल्याला असते. पण, जेव्हा आपल्यासमोर दैनंदिन जीवनातील काही लहानसहान समस्या येतात, तेव्हा काय? अशा वेळी आपण यहोवावर अवलंबून राहण्याऐवजी, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून, जो मार्ग आपल्याला योग्य वाटतो त्यानुसार समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो का? की कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी बायबल त्याबद्दल काय म्हणतं ते आपण तपासून पाहतो, आणि मग त्यातील माहितीचा उपयोग करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो? उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला सभेला किंवा संमेलनाला जाण्यापासून कदाचित रोखत असतील. अशा वेळी काय करावं हे समजण्यासाठी तुम्ही यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करणार का? किंवा मग, बऱ्याच काळापासून तुम्ही बेरोजगार आहात. आणि मग जेव्हा तुम्हाला कोणी कामावर ठेऊन घ्यायला तयार होतो, तेव्हा सभेला जाण्यासाठी लवकर सुट्टी मिळावी याबद्दल सांगून, तुम्ही मिळत असलेली नोकरी धोक्यात घालण्यास तयार व्हाल का? समस्या कोणतीही असली तरीही स्तोत्रकर्त्याने जे लिहिलं ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याने असा सल्ला दिला: “आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल.”—स्तो. ३७:५.

वाईट संगत धरल्याने कोणते परिणाम होऊ शकतात?

७, ८. यहोशाफाटाने कोणत्या चुका केल्या आणि त्यामुळे काय परिणाम झाला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्रं पाहा.)

आता आपण आसाचा मुलगा यहोशाफाट याच्या उदाहरणाकडे लक्ष देऊ. यहोशाफाट राजामध्ये असे बरेच चांगले गुण होते ज्यांमुळे यहोवाचं मन आनंदित झालं. जेव्हा तो यहोवावर निर्भर राहिला तेव्हा त्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या. पण, त्याने आपल्या जीवनात काही चुकीचे निर्णयदेखील घेतले. उदाहरणार्थ, त्याने आपल्या मुलाचं लग्न अहाब या दुष्ट राजाच्या मुलीशी लावून दिलं. तसंच, तो अहाब राजासोबत मिळून अरामी लोकांविरुद्ध लढण्यास गेला. खरंतर, यहोवाचा संदेष्टा मीखाया याने त्याला युद्धात न जाण्याविषयी ताकीद दिली होती. पण, यहोशाफाटाने त्याचं ऐकलं नाही. जेव्हा तो युद्धात गेला तेव्हा अरामी लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. (२ इति. १८:१-३२) नंतर जेव्हा तो यरुशलेमेत पोचला, तेव्हा येहू संदेष्ट्याने त्याला विचारलं: “तू दुष्टांचे साहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यांवर प्रीती करावी काय?”—२ इतिहास १९:१-३ वाचा.

यहोशाफाटाला जी ताकीद मिळाली आणि त्याच्यासोबत जे घडलं, त्यावरून तो काही शिकला का? नाही. हे खरं आहे की त्याचं यहोवावर प्रेम होतं आणि त्याला यहोवाचं मन आनंदित करायचं होतं. पण, तरी यहोशाफाटाने पुन्हा एकदा अशा एका राजाशी मैत्री केली, जो यहोवाचा उपासक नव्हता. तो राजा म्हणजे अहाबाचा मुलगा, राजा अहज्या. यहोशाफाटाने अहज्या राजासोबत मिळून काही जहाजंदेखील बांधली. पण, या जहाजांचा वापर करण्याआधीच ती सर्व जहाजं फुटून गेली.—२ इति. २०:३५-३७.

९. आपण जर चुकीच्या लोकांसोबत मैत्री केली तर काय होऊ शकतं?

यहोशाफाट राजासोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? यहोशाफाट राजाने जीवनात अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याने पूर्ण मनाने यहोवाचा शोध केला. (२ इति. २२:९) पण, असं असलं तरी त्याने काही चुकीचे निर्णयदेखील घेतले. त्याने अशा लोकांसोबत आपला वेळ घालवण्याची निवड केली ज्यांचं यहोवावर प्रेम नव्हतं. यामुळे त्याला जीवनात खूप गंभीर समस्यांना सामोरं जावं लागलं. एकदा तर तो मरता-मरता वाचला. बायबलमधील नीतिसूत्राच्या पुस्तकात जे लिहिलं आहे ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यात म्हटलं आहे: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीति. १३:२०) हे खरं आहे की आपल्याला यहोवाबद्दल इतरांना शिकवायचं आहे. पण, तरी जे यहोवाची सेवा करत नाहीत त्यांच्यासोबत जवळची मैत्री करणं धोकादायक ठरू शकतं.

१०. (क) तुम्ही लग्न करण्याच्या विचारात असाल, तर यहोशाफाटाच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता? (ख) आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१० एक उदाहरण घ्या. समजा तुम्ही लग्न करण्याच्या विचारात असाल, तर यहोशाफाटाच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता? कदाचित आपल्याला अशी एखादी व्यक्ती आवडू लागेल जी यहोवाची उपासक नाही. आणि देवाच्या लोकांमध्ये मला जोडीदार मिळणं अवघड आहे, असा विचार कदाचित आपण करू. किंवा मग आपलं वय होत असल्यामुळे आपले नातेवाईक आपल्यावर लग्न करण्याचा दबाव टाकत असतील. हे खरं आहे, की आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी असावं आणि आपणही कोणावर तरी प्रेम करावं, असं आपल्या सर्वांनाच वाटतं. आपल्या मनात अशा भावना येणं साहजिक आहे. कारण, यहोवाने आपल्याला याच प्रकारे निर्माण केलं आहे. पण आपल्याला योग्य जोडीदार मिळत नसेल, तर आपण काय करण्याची गरज आहे? अशा वेळी यहोशाफाटाच्या उदाहरणावर मनन केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. यहोशाफाट सहसा यहोवाकडे मार्गदर्शन मागायचा. (२ इति. १८:४-६) पण, जेव्हा यहोवावर प्रेम न करणाऱ्या अहाब राजासोबत त्याने मैत्री केली, तेव्हा त्याने यहोवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केलं. यहोशाफाट राजाने हे लक्षात ठेवण्याची गरज होती, की “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने [“पूर्ण हृदयाने,” NW] त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.” (२ इति. १६:९) यहोवाची आपल्यालाही मदत करण्याची इच्छा आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो आपली परिस्थिती व भावना चांगल्या प्रकारे जाणतो. तसंच, तो आपल्यावर खूप प्रेमही करतो. एक प्रेमळ जोडीदार असण्याची तुमची गरज यहोवा नक्कीच पूर्ण करेल यावर तुम्हाला भरवसा आहे का? यहोवा योग्य वेळी ही गरज नक्की पूर्ण करेल याची खात्री बाळगा.

जे यहोवाचे उपासक नाहीत अशा व्यक्तींसोबत संबंध जोडू नका (परिच्छेद १० पाहा)

गर्विष्ठ वृत्तीपासून आपल्या हृदयाचं रक्षण करा

११, १२. (क) हिज्कीयाच्या मनात काय आहे हे कशावरून दिसून आलं? (ख) यहोवाने हिज्कीयाला माफ का केलं?

११ हिज्कीया राजापासून आपण काय शिकू शकतो? हिज्कीयाच्या मनात खरोखर काय आहे हे समजून घेण्यासाठी यहोवाने त्याला मदत केली. (२ इतिहास ३२:३१ वाचा.) हिज्कीया राजा खूप आजारी पडला होता, तेव्हा देवाने त्याला सांगितलं की तो आजारातून बरा होईल. त्याची खात्री पटवण्यासाठी यहोवाने त्याला एक चिन्हदेखील दिलं. यहोवाने पायऱ्यांवर पडलेली छाया दहा पायऱ्या पुन्हा मागं नेली. नंतर, कदाचित बाबेलच्या राजकुमाराला या चिन्हाबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे त्याने काही लोकांना हिज्कीयाकडे त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी पाठवलं. (२ राजे २०:८-१३; २ इति. ३२:२४) बाबेलमधून आलेल्या या लोकांसोबत कसा व्यवहार करावा हे यहोवाने हिज्कीयाला सांगितलं नाही. बायबल म्हणतं की हिज्कीयाच्या “मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्यास सोडले.” हिज्कीयाने बाबेलवरून आलेल्या त्या लोकांना आपली सर्व धनसंपत्ती दाखवली. यावरून हिज्कीयाच्या मनात खरोखर काय आहे हेच दिसून आलं.

१२ दुःखाची गोष्ट म्हणजे हिज्कीया राजा गर्विष्ठ बनला. याचा परिणाम म्हणजे त्याच्यावर झालेल्या उपकारांची त्याने जाणीव बाळगली नाही. त्याच्या मनोवृत्तीत बदल का झाला हे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं नाही. कदाचित अश्शूरी लोकांवर मिळालेल्या विजयामुळे तो गर्विष्ठ बनला असावा, किंवा यहोवाने त्याला आजारातून बरं केलं त्यामुळे त्याच्यात गर्व आला असावा. किंवा मग फार धनसंपत्ती मिळाल्यामुळे, किंवा कदाचित प्रसिद्धी मिळाल्यामुळे तो गर्विष्ठ बनला असावा. हे खरं आहे, की हिज्कीयाने पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा केली होती. पण, काही काळासाठी तोही गर्विष्ठ बनला होता आणि यामुळे यहोवा त्याच्यावर नाराज झाला. पण, नंतर मात्र हिज्कीया देवासमोर नम्र झाला आणि देवाने त्याला माफ केलं.—२ इति. ३२:२५-२७; स्तो. १३८:६.

१३, १४. (क) आपल्या मनात काय आहे हे कोणत्या परिस्थितीत दिसून येतं? (ख) इतर जण जेव्हा आपली प्रशंसा करतात तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

१३ हिज्कीयाने जी चूक केली त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? हिज्कीयाच्या मनात गर्विष्ठ वृत्ती केव्हा आली हे लक्षात घ्या. यहोवाने हिज्कीयाला अश्शूरी लोकांवर विजय मिळवण्यास मदत केली आणि आजारातून बरं केलं त्यानंतर लगेचच तो गर्विष्ठ बनला होता. त्यामुळे आपणही स्वतःला विचारलं पाहिजे: ‘जेव्हा माझ्यासोबत काही चांगल्या गोष्टी होतात किंवा मग इतर जण जेव्हा माझी प्रशंसा करतात, तेव्हा मी कशी प्रतिक्रिया दाखवतो?’ आपण ज्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवतो त्यावरून आपल्या मनात काय आहे ते दिसून येतं. उदाहरणार्थ, कदाचित तुम्ही एक बांधव असाल आणि अनेक लोकांसमोर भाषण देण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेऊन तयारी केली असेल. मग भाषण दिल्यानंतर जेव्हा बरेच बंधुभगिनी तुमची प्रशंसा करतात, तेव्हा तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता?

१४ येशूने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.” (लूक १७:१०) हे लक्षात असू द्या, की गर्विष्ठ वृत्तीमुळे हिज्कीया राजा यहोवाकडून मिळालेल्या मदतीप्रती कदर दाखवण्यास चुकला होता. इतर जण जेव्हा आपल्या भाषणासाठी आपली प्रशंसा करतात, तेव्हा नम्र राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? यहोवाने आपल्यासाठी काय केलं आहे त्यावर आपण मनन करू शकतो. तसंच, यहोवाबद्दल आणि त्याने आपल्याला कशा प्रकारे मदत केली त्याबद्दल इतरांसोबत आपण बोलू शकतो. कारण, खरंतर त्यानेच आपल्याला बायबल दिलं आहे आणि भाषण देता यावं यासाठी तो आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याची मदत पुरवतो.

निर्णय घेताना नेहमी यहोवावर अवलंबून रहा

१५, १६. योशीयाने काय केलं ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला?

१५ योशीया राजाकडून आपण काय शिकू शकतो? योशीया हा एक चांगला राजा होता. तरी त्याने एक अशी चूक केली ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. (२ इतिहास ३५:२०-२२ वाचा.) त्याने कोणती चूक केली? योशीया राजा इजिप्तचा राजा नखो याच्यासोबत युद्ध लढण्यास गेला. मुळात तसं करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. खरंतर, नखो राजाने स्वतः योशीयाला सांगितलं होतं, की त्याला त्याच्याविरुद्ध लढण्याची इच्छा नाही. बायबल म्हणतं की नखो राजाने जे सांगितलं होतं ते खरंतर देवाकडून होतं. पण, तरी योशीया राजा नखोविरुद्ध युद्ध लढण्यासाठी गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. योशीया राजाने नखो राजासोबत युद्ध का लढलं, याबद्दल बायबल काही सांगत नाही.

१६ नखो राजा जे बोलला ते खरोखर यहोवाकडून आहे किंवा नाही, हे योशीयाने आधी तपासून पाहायला हवं होतं. हे तो कसं करू शकत होता? त्याने यहोवाचा संदेष्टा यिर्मया याला विचारायला हवं होतं. (२ इति. ३५:२३, २५) तसंच, योशीयाने परिस्थितीदेखील तपासून पाहायला हवी होती. कारण, खरंतर नखो हा यरुशलेम नगराविरुद्ध नाही तर कर्कमीश नगराविरुद्ध लढण्यासाठी निघाला होता. तसंच, नखो राजाने यहोवाची किंवा त्याच्या लोकांची निंदाही केली नव्हती. योशीयाने निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टींवर काळजीपूर्वक विचार केला नाही. यापासून आपण कोणता धडा शिकू शकतो? आपल्यासमोर जेव्हा एखादी समस्या येते आणि आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा अशा परिस्थितीत आपण काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे हे आधी आपण तपासून पाहिलं पाहिजे.

१७. आपल्यासमोर जेव्हा समस्या येतात, तेव्हा योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला कशी मदत होऊ शकते?

१७ आपल्याला जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा तो निर्णय घेण्यासाठी आपल्याला कोणत्या बायबल तत्त्वांमुळे मदत होईल हे आपण पाहिलं पाहिजे. तसंच, ती तत्त्वं आपण कशी लागू करू शकतो याबद्दलही आपण आधी विचार करणं गरजेचं आहे. काही वेळा आपल्याला आपल्या प्रकाशनांमध्ये थोडं अधिक संशोधन करण्याची किंवा मंडळीच्या एखाद्या वडिलांकडे सल्ला मागण्याची गरज पडू शकते. ते आपल्याला इतर बायबल तत्त्वांचा विचार करण्यास मदत करू शकतात. पुढील परिस्थितीची कल्पना करा: समजा एका ख्रिस्ती बहिणीचा पती सत्यामध्ये नाही. ही बहीण एका विशिष्ट दिवशी सेवाकार्याला जाण्याचं नियोजन करते. (प्रे. कृत्ये ४:२०) पण, त्या दिवशी आपल्या पत्नीने सेवाकार्यासाठी जाऊ नये अशी तिच्या पतीची इच्छा आहे. तो तिला म्हणतो की बऱ्याच दिवसांपासून त्यांनी सोबत मिळून वेळ घालवलेला नाही. आणि म्हणून सोबत चांगला वेळ घालवता यावा यासाठी तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाण्याची त्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून, बहीण बायबलमधील काही वचनांवर विचार करते. तिला या गोष्टीची जाणीव आहे, की तिने यहोवाची आज्ञा पाळली पाहिजे, आणि येशूने ख्रिश्चनांना शिष्य बनवण्याची आज्ञा दिली आहे. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये ५:२९) पण, त्याच वेळी ती हेदेखील लक्षात ठेवते, की पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहिलं पाहिजे आणि देवाची सेवक या नात्यानं तिनं समंजसपणा दाखवणंदेखील गरजेचं आहे. (इफिस. ५:२२-२४; फिलिप्पै. ४:५) तिच्या पतीला असं वाटतं का की तिने कधीही सेवाकार्याला जाऊ नये? की, त्याला फक्त त्या विशिष्ट दिवशी तिच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे? यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला समंजसपणा दाखवून असे निर्णय घ्यायचे आहेत, ज्यांमुळे आपण यहोवाचं मन आनंदित करू शकतो.

“पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करत राहा आणि खरा आनंद मिळवा

१८. यहूदामधील चार राजांच्या उदाहरणांवर मनन केल्याने तुम्हाला कोणते धडे शिकायला मिळू शकतात?

१८ यहूदामधील या चार राजांच्या हातून ज्या चुका झाल्या, त्यांतील एखादी चूक कदाचित आपल्या हातूनही घडू शकते. या राजांप्रमाणे आपण कदाचित (१) स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू, (२) वाईट संगत धरू, (३) गर्विष्ठ वृत्ती बाळगू, किंवा (४) यहोवाची काय इच्छा आहे हे आधी तपासून न पाहता निर्णय घेऊ. आपल्या हातून जर अशी एखादी चूक घडली, तर आपण कधीही यहोवाचं मन आनंदित करू शकत नाही असा विचार करू नका. कारण, यहोवा आपल्यातील चांगल्या गोष्टी पाहतो. यहूदातील त्या चार राजांमध्येही त्याने चांगल्या गोष्टी पाहिल्या होत्या. आपलं यहोवावर प्रेम आहे आणि त्याची सेवा करण्याची आपली खरोखर इच्छा आहे हेदेखील तो पाहतो. आपल्या हातून अशा गंभीर चुका घडू नयेत म्हणून बायबलमध्ये त्याने ही उदाहरणं दिली आहेत. तेव्हा, या अहवालांवर आपण मनन करू या, आणि यासाठी नेहमी यहोवाप्रती कृतज्ञता बाळगू या.