व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दिलेलं वचन नेहमी पाळा

दिलेलं वचन नेहमी पाळा

“आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर.”—मत्त. ५:३३.

गीत क्रमांक: १८, 

१. (क) इफ्ताह आणि हन्ना यांच्यात कोणतं साम्य होतं? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

इफ्ताह हा एक धाडसी पुढारी आणि शूर योद्धा होता. तर, हन्ना आपल्या पतीची आणि घराची चांगली काळजी घेणारी एक नम्र स्त्री होती. हे दोघेही यहोवाचे उपासक होते. पण, यासोबतच आणखी एका बाबतीत त्यांच्यात साम्य होतं. ते म्हणजे, त्या दोघांनीही देवाला वचन दिलं होतं, आणि दिलेलं वचन त्यांनी विश्वासूपणे पूर्णही केलं. आज जे यहोवाला वचन देण्याची निवड करतात त्यांच्यासाठी इफ्ताह आणि हन्ना यांनी एक अप्रतिम उदाहरण मांडलं आहे. या लेखात आपण तीन प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत: (१) वचन किंवा नवस म्हणजे काय? (२) देवाला वचन देणं ही किती गंभीर गोष्ट आहे? आणि, (३) इफ्ताह व हन्नाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

२, ३. (क) वचन किंवा नवस म्हणजे काय? (ख) देवाला वचन देण्याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

बायबल सांगतं की वचन देणं किंवा नवस करणं, म्हणजे देवाला आपला शब्द देणं. आणि ही एक खूप गंभीर गोष्ट आहे. एखादी व्यक्ती कदाचित यहोवा देवाला वचन देईल, की ती एखादी विशिष्ट गोष्ट करेल किंवा काही भेट देईल, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या सेवेत सहभागी होईल किंवा काही गोष्टी करण्यापासून दूर राहील. वचन द्यायचं की नाही हे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने ठरवते. पण जेव्हा एखादी व्यक्ती वचन देते, तेव्हा तिने ते महत्त्वपूर्ण लेखलं पाहिजे आणि त्याला पूर्ण केलं पाहिजे. कारण, यहोवाच्या नजरेत त्या व्यक्तीने दिलेलं वचन एक प्रतिज्ञा असते आणि यहोवा देव या गोष्टीला खूप गांभीर्याने घेतो. बायबल सांगतं की वचन देणं, हे शपथ घेण्याइतकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शपथ घेते तेव्हा ती एकतर काही गोष्टी करण्याची किंवा न करण्याची प्रतिज्ञाच करत असते. (उत्प. १४:२२, २३; इब्री ६:१६, १७) देवाला दिलेलं वचन आपण किती गंभीरतेने घेतलं पाहिजे याबद्दल बायबल काय म्हणतं?

मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलं आहे की जर एखाद्याने यहोवाला वचन दिलं असेल, तर त्याने ते मोडू नये. आणि “जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे.” (गण. ३०:२) नंतर, शलमोनने असं लिहिलं: “तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.” (उप. ५:४) येशूने म्हटलं: “खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे.” (मत्त. ५:३३) या ठिकाणी येशूही खरंतर देवाला वचन देणं ही किती गंभीर गोष्ट आहे, यावर जोर देत होता.

४. (क) देवाला वचन देणं किती गंभीर गोष्ट आहे? (ख) इफ्ताह आणि हन्नाबद्दल आपण कोणती गोष्ट पाहणार आहोत?

यावरून हे स्पष्टच आहे की यहोवाला दिलेल्या आपल्या वचनांना आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण, आपण त्यांना गांभीर्याने घेतो की नाही या गोष्टीचा यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर परिणाम होतो. दावीदनेही ही गोष्ट स्पष्ट केली. त्याने म्हटलं: “परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो.” (स्तो. २४:३, ४) आता आपण पाहू या की इफ्ताहने आणि हन्नाने कोणतं वचन दिलं होतं, आणि ते पूर्ण करणं त्यांच्यासाठी सोपं होतं का?

त्यांनी देवाला दिलेलं वचन पाळलं

५. इफ्ताहने कोणतं वचन दिलं आणि त्याचा काय परिणाम झाला?

इफ्ताहने अम्मोनी लोकांसोबत लढाई करण्याआधी यहोवाला एक वचन दिलं. देवाच्या लोकांच्या या शत्रूंविरुद्ध असलेल्या लढाईत विजय मिळावा म्हणून त्याने यहोवाकडे कळकळून विनंती केली. (शास्ते १०:७-९) त्याने वचन दिलं: “मी अम्मोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो प्राणी मला सामोरा येईल तो परमेश्वराचा” होईल. यहोवाने इफ्ताहच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्याला युद्धात विजय मिळवून दिला. इफ्ताह जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला भेटण्यासाठी सर्वात आधी जी व्यक्ती आली ती त्याची मुलगी होती. त्याला प्रिय असलेली त्याची मुलगी आता ‘परमेश्वराची होणार’ होती. (शास्ते ११:३०-३४) याचा तिच्या जीवनावर कसा परिणाम होणार होता?

६. (क) देवाला दिलेलं वचन पाळणं इफ्ताह आणि त्याच्या मुलीसाठी सोपं का नव्हतं? (ख) अनुवाद २३:२१, २३ आणि स्तोत्र १५:४ यातून देवाला दिलेल्या वचनाबद्दल आपण काय शिकतो?

इफ्ताहने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी त्याच्या मुलीला आयुष्यभर देवाच्या निवासमंडपात जाऊन पूर्णवेळ सेवा करावी लागणार होती. पण, इफ्ताहने मागचा-पुढचा कोणताही विचार न करता हे वचन दिलं होतं का? नाही. खरंतर, त्याला कदाचित या गोष्टीची कल्पना असावी, की त्याला भेटण्यासाठी सर्वात आधी त्याची मुलगी येईल. पण, त्याला ही गोष्ट माहीत असो अथवा नसो, एक गोष्ट मात्र खरी की यहोवाला दिलेलं वचन पूर्ण करणं त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलीसाठी मुळीच सोपं नव्हतं. म्हणूनच जेव्हा इफ्ताहने त्याच्या मुलीला पाहिलं, तेव्हा तो म्हणाला की त्याचं मन खचून गेलं आहे. तसंच, आयुष्यभर कुमारी म्हणूनच राहावं लागेल यासाठी त्याच्या मुलीनेही शोक केला. पण, त्यांना इतकं दुःख का झालं होतं? कारण इफ्ताहला मुलगा नव्हता आणि त्याची एकुलती एक मुलगीही आता लग्न करू शकणार नव्हती. तसंच तिला मुलं असणार नव्हती. त्यामुळे मग इफ्ताहच्या कुळाचं नाव पुढे चालवणारा कोणीही उरणार नव्हतं. पण, असं असलं तरी इफ्ताह आणि त्याच्या मुलीला याची जाणीव होती की त्यांच्या भावनांपेक्षाही महत्त्वपूर्ण अशी दुसरी एक गोष्ट आहे. इफ्ताहने म्हटलं: “परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.” तसंच, त्याच्या मुलीने त्याला म्हटलं: “परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा.” (शास्ते ११:३५-३९) इफ्ताह आणि त्याची मुलगी हे देवाला विश्वासू होते आणि त्याला दिलेलं वचन मोडण्याचा ते कधी विचारही करू शकत नव्हते; मग ते पूर्ण करणं त्यांच्यासाठी कितीही कठीण असलं तरीही.—अनुवाद २३:२१, २३; स्तोत्र १५:४ वाचा.

७. (क) हन्नाने देवाला कोणतं वचन दिलं होतं, आणि का? (ख) यहोवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं? (ग) हन्नाने देवाला जे वचन दिलं होतं त्याचा शमुवेलच्या जीवनावर कसा परिणाम होणार होता? (तळटीप पाहा.)

हन्नानेदेखील तिच्या जीवनातील कठीण काळादरम्यान यहोवाला एक वचन दिलं. ती खूप दुःखी होती कारण तिला एकही मूल होत नव्हतं. शिवाय, यामुळे तिला चिडवलंही जायचं आणि टोमणेही मारले जायचे. (१ शमु. १:४-७, १०, १६) अशा परिस्थितीत असल्यामुळे तिने आपल्या मनातील भावना यहोवापुढे व्यक्त केल्या आणि त्याला एक वचन दिलं. ती म्हणाली “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा एतदर्थ [याकरता] मी त्यास समर्पण करेन; त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही; असा तिने नवस केला.” * (१ शमु. १:११) यहोवाने हन्नाची प्रार्थना ऐकली आणि एका वर्षानंतर तिला मुलगा झाला. तिने त्याचं नाव शमुवेल ठेवलं. हन्ना खूप आनंदी होती पण त्याच वेळी यहोवाला दिलेलं वचनही ती विसरली नाही. जेव्हा तिच्या या मुलाचा जन्म झाला तेव्हा ती म्हणाली होती, की तिने त्याला परमेश्वराकडून मागून घेतलं आहे.—१ शमु. १:२०.

८. (क) देवाला दिलेलं वचन पूर्ण करणं हन्नासाठी कठीण का होतं? (ख) स्तोत्र ६१ मधून हन्नाच्या चांगल्या उदाहरणाची आपल्याला आठवण कशी होते?

शमुवेल जेव्हा जवळजवळ तीन वर्षांचा झाला, तेव्हा हन्नाने यहोवाला दिलेल्या तिच्या वचनानुसार केलं. ती शिलो इथं असलेल्या देवाच्या निवासमंडपात शमुवेलला घेऊन गेली. तिथं तिने शमुवेलला मुख्य याजक एली याच्याकडे नेलं आणि म्हणाली: “याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. तसेच मीही या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वरास आमरण दिला आहे.” (१ शमु. १:२४-२८) तेव्हापासून शमुवेल निवासमंडपात राहू लागला. बायबल म्हणतं की “शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला.” (१ शमु. २:२१) देवाला दिलेलं वचन पूर्ण करणं हन्नासाठी सोपं नव्हतं. कारण, प्रिय असलेल्या आपल्या मुलासोबत ती वेळ घालवू शकणार नव्हती. तसंच, त्याला लहानाचा मोठा होत असतानाही ती पाहू शकणार नव्हती. पण, असं असूनही हन्नाने यहोवाला दिलेलं वचन गांभीर्याने घेतलं. देवाला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी ती कोणताही त्याग करण्यास तयार होती. अगदी प्रिय असलेली गोष्टही ती देवाला देण्यासाठी तयार होती.—१ शमु. २:१, २; स्तोत्र ६१:१, ५,  वाचा.

तुम्ही यहोवाला दिलेलं वचन पाळत आहात का?

९. आता आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

आतापर्यंत आपण पाहिलं की यहोवाला वचन देणं, ही किती गंभीर गोष्ट आहे. आता आपण पुढील काही प्रश्नांवर चर्चा करू या: ख्रिस्ती या नात्याने आपण कदाचित कोणती वचनं देऊ? आणि दिलेलं वचन पूर्ण करण्याचा आपला निर्धार कसा असला पाहिजे?

तुमचं समर्पणाचं वचन

समर्पणाचं वचन (परिच्छेद १० पाहा)

१०. एक ख्रिस्ती व्यक्ती तिच्या जीवनात कोणतं सर्वात महत्त्वाचं वचन देऊ शकते, आणि यात काय समाविष्ट आहे?

१० यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्याचं वचन एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी जीवनातील सर्वात महत्त्वाचं वचन आहे. ती व्यक्ती आपल्या व्यक्तिगत प्रार्थनेत देवाला वचन देते, की काहीही झालं तरी ती संपूर्ण आयुष्य यहोवाची सेवा करत राहील. येशूने म्हटलं की जेव्हा आपण समर्पण करतो, तेव्हा आपण स्वतःचा “त्याग” करतो. याचा अर्थ आपण स्वतःला नाही तर यहोवाला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवण्याचं वचन देतो. (मत्त. १६:२४) त्या दिवसापासून आपण यहोवाचे बनतो. (रोम. १४:८) आपण आपल्या समर्पणाला खूप गांभीर्याने घेतो. आपल्याही भावना स्तोत्रकर्त्यासारख्या आहेत. त्याने लिहिलं: “परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ? परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडेन.”—स्तो. ११६:१२, १४.

११. तुम्ही बाप्तिस्मा घेतला तेव्हा तुम्ही काय दाखवून दिलं?

११ तुम्हीही आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे का? आणि पाण्यात बाप्तिस्मा घेण्याद्वारे आपलं समर्पण सर्वांसमोर जाहीर केलं आहे का? तुम्ही असं केलं असेल तर ही खरंच खूप प्रशंसनीय गोष्ट आहे. तुमच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी भाषण देणाऱ्या बांधवाने तुम्हाला जो प्रश्न विचारला होता तो कदाचित तुम्हाला आठवत असेल. बांधवाने तुम्हाला विचारलं होतं, की तुम्ही आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे का आणि ‘समर्पणानंतर व बाप्तिस्म्यानंतर तुम्ही, यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाल, याची तुम्हाला जाणीव आहे का?’ या प्रश्‍नाला तुम्ही जेव्हा होकारार्थी उत्तर दिलं, तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना हे समजलं की तुम्ही आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे, आणि यहोवाचे नियुक्त सेवक या नात्याने बाप्तिस्मा घेण्यास तुम्ही पात्र आहात. त्या दिवशी यहोवाचं मन खरंच खूप आनंदित झालं असेल.

१२. (क) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजे? (ख) पेत्रने आपल्याला कोणते गुण विकसित करण्याचं प्रोत्साहन दिलं?

१२ तुम्ही बाप्तिस्मा घेतला तेव्हा संपूर्ण आयुष्य यहोवाची सेवा करण्याचं आणि बायबल तत्त्वांनुसार जीवन जगण्याचं वचन दिलं होतं. पण, खरंतर बाप्तिस्मा ही फक्त एक सुरवात आहे. त्यामुळे वेळेसोबत आपण स्वतःचं परीक्षण करत राहिलं पाहिजे. यासाठी आपण स्वतःला विचारू शकतो: ‘बाप्तिस्म्यानंतर यहोवासोबत असलेला माझा नातेसंबंध आणखी मजबूत झाला आहे का? मी अजूनही पूर्ण हृदयाने त्याची सेवा करत आहे का? (कलस्सै. ३:२३) नियमित रीत्या मी प्रार्थना करतो का? दररोज बायबलचं वाचन करतो का? सभांना नियमित रीत्या उपस्थित राहतो का? जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्हा-तेव्हा मी प्राचारकार्यासाठी जातो का? की, या सर्व गोष्टी करण्याचा माझा आवेश आता कमी होत चालला आहे?’ आपल्याला वेळोवेळी स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण यहोवाच्या सेवेत आपण थंड पडण्याचा धोका आहे, अशी ताकीद प्रेषित पेत्रने दिली. पण, आपण जर मेहनत घेऊन विश्वासात, ज्ञानात, धीर दाखवण्यात आणि सुभक्तीची कार्यं करण्यात वाढत गेलो, तर हा धोका आपण टाळू शकतो.—२ पेत्र १:५-८ वाचा.

१३. एका समर्पित आणि बाप्तिस्माप्राप्त ख्रिश्चनाला कोणत्या गोष्टीची जाणीव असणं गरजेचं आहे?

१३ आपण यहोवाला वचन देतो, तेव्हा दिलेला तो आपला शब्द आपण पुन्हा मागं घेऊ शकत नाही. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला यहोवाची सेवा करण्यात आवड उरली नसेल, किंवा मग ख्रिस्ती या नात्यानं जीवन जगण्याची तिची इच्छा उरली नसेल, तरी ती व्यक्ती असा दावा करू शकत नाही की तिने कधीही मनापासून समर्पण केलं नव्हतं किंवा तिने घेतलेला बाप्तिस्मा हा योग्य नव्हता. * जर यहोवाला समर्पित असलेल्या एका व्यक्तीने गंभीर पाप केलं, तर तिला यहोवाला आणि मंडळीला जाब द्यावा लागेल. (रोम. १४:१२) आपल्याला अशा लोकांपैकी होण्याची मुळीच इच्छा नाही ज्यांच्याविषयी येशूने म्हटलं: “तू आपली पहिली प्रीती सोडली” आहेस. याउलट, “तुझी कृत्ये, आणि तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत; आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत,” असं येशूने आपल्याविषयी म्हणावं अशी आपली इच्छा आहे. (प्रकटी. २:४, १९) आवेशाने यहोवाची सेवा करून आणि समर्पणाच्या वचनानुसार जगून, यहोवाचं मन आनंदित करण्याची आपली इच्छा आहे.

विवाहात घेतलेल्या शपथा

विवाहात घेतलेल्या शपथा (परिच्छेद १४ पाहा)

१४. एक व्यक्ती तिच्या जीवनात दुसरं सर्वात महत्त्वाचं कोणतं वचन देते, आणि हे वचन इतकं महत्त्वाचं का आहे?

१४ एक व्यक्ती तिच्या जीवनात दुसरं सर्वात महत्त्वाचं कोणतं वचन देत असेल, तर ते म्हणजे विवाहाच्या वेळी आपल्या जोडीदाराला दिलेलं वचन. विवाह एक पवित्र बंधन आहे. विवाहात वर आणि वधूने घेतलेल्या शपथांना यहोवा गंभीर रीतीने घेतो. ही दोघे जेव्हा विवाहाच्या शपथा घेतात, तेव्हा ते यहोवासमोर आणि उपस्थित असलेल्या सर्वांसमोर एकमेकांना वचन देत असतात. ते एकमेकांना असं वचन देतात, की देवाच्या विवाह व्यवस्थेप्रमाणे ते दोघेही पृथ्वीवर एकत्र राहतील तोपर्यंत एकमेकांवर प्रेम करतील, एकमेकांची काळजी घेतील आणि एकमेकांना आदर देतील. इतर जण कदाचित विवाहाच्या शपथा घेताना याच शब्दांचा वापर करतील असं नाही. पण तरी विवाहाची शपथ घेताना ते देवापुढे वचन देत असतात. जेव्हा ते या शपथा घेतात, तेव्हा ते पती व पत्नी बनतात. विवाह हे आयुष्यभराचं नातं आहे. (उत्प. २:२४; १ करिंथ. ७:३९) येशूने म्हटलं: “देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.” जे विवाह करण्याचा निर्णय घेतात त्यांनी असा विचार कधीही करू नये, की जर त्यांच्या विवाहात काही समस्या आल्या तर ते केव्हाही घटस्फोट घेऊ शकतात.—मार्क १०:९.

१५. विवाहाबद्दल ख्रिश्चनांचा दृष्टिकोन जगातील लोकांसारखा का असू नये?

१५ मानव परिपूर्ण नसल्यामुळे कोणताही विवाह परिपूर्ण नाही. याच कारणामुळे बायबलमध्ये म्हटलं आहे की जे विवाह करतील त्यांना “हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथ. ७:२८) आज जगात बहुतेक लोक विवाहाच्या बंधनाला क्षुल्लक लेखतात. त्यांना वाटतं की विवाहात काही समस्या आल्या, तर ते सहज त्यांचा विवाह मोडू शकतात. पण, खऱ्या ख्रिश्चनांचा विवाहाबद्दल तसा दृष्टिकोन नाही. त्यांना याची जाणीव असते की त्यांनी देवापुढे विवाहाच्या शपथा घेतल्या आहेत. तसंच, त्यांनी जर आपलं दिलेलं वचन पाळलं नाही, तर ते देवासोबत खोटं बोलल्यासारखं होईल. आणि देव खोटं बोलणाऱ्यांचा द्वेष करतो याचीही त्यांना जाणीव असते. (लेवी. १९:१२; नीति. ६:१६-१९) प्रेषित पौलने जे म्हटलं ते विवाहित जोडप्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याने म्हटलं: “तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नको.” (१ करिंथ. ७:२७) कपटीपणाने घटस्फोट घेणाऱ्या व्यक्तीचा यहोवाला वीट आहे, हे पौलला माहीत असल्यामुळे त्याने ख्रिश्चनांना हा सल्ला दिला.—मला. २:१३-१६.

१६. बायबलमध्ये घटस्फोट आणि विभक्त होण्याबद्दल काय सांगितलं आहे?

१६ येशूने सांगितलं की घटस्फोट घेण्यासाठी फक्त एकच शास्त्र आधारित कारण आहे. विवाह जोडीदारापैकी एखादी व्यक्ती जेव्हा व्यभिचार करते आणि निर्दोष असलेली व्यक्ती तिला क्षमा न करण्याचं निवडते, तेव्हाच शास्त्र आधारित घटस्फोट घेतला जाऊ शकतो. (मत्त. १९:९; इब्री १३:४) पण, मग विवाह जोडीदारापासून विभक्त होण्याबद्दल काय? याबद्दलही बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. (१ करिंथकर ७:१०, ११ वाचा.) विवाह जोडीदारापासून विभक्त होण्यासाठी शास्त्र आधारित कोणतंही कारण नाही. पण, कधीकधी अशी परिस्थिती उद्‌भवू शकते ज्यामुळे एका ख्रिस्ती व्यक्तीला तिच्या जोडीदारापासून विभक्त होणं अगदीच गरजेचं वाटेल. उदाहरणार्थ, काहींना याची खात्री असते की जर ते त्यांच्या जोडीदारासोबत राहिले तर त्यांच्या जिवाला किंवा यहोवासोबत असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाला खूप धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत ते कदाचित छळ करणाऱ्या किंवा धर्मत्यागी असलेल्या आपल्या जोडीदारापासून विभक्त होण्याचा विचार करतील. *

१७. वैवाहिक जीवन आणखी मजबूत करण्यासाठी ख्रिस्ती जोडपी काय करू शकतात?

१७ जेव्हा ख्रिस्ती जोडपी मंडळीतील वडिलांकडे त्यांच्या वैवाहिक नात्याला मजबूत करण्यासाठी सल्ला मागतात, तेव्हा मंडळीतील वडील काय करू शकतात? ते जोडप्यांना विचारू शकतात, की त्यांनी वॉट इज ट्रू लव्ह? हा व्हिडिओ आणि तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते या माहितीपत्रकाचं परीक्षण केलं आहे का? या प्रकाशनांमध्ये विवाहाला मजबूत बनवण्यासाठी मदत करतील अशी बायबलमधील काही तत्त्वं देण्यात आली आहेत. एका जोडप्याने असं म्हटलं: “आम्ही जेव्हापासून या माहितीपत्रकाचा अभ्यास करू लागलो, तेव्हापासून आमचं नातं आणखी आनंदी बनलं आहे.” विवाहाला २२ वर्षं झालेल्या आपल्या एका बहिणीला असं वाटत होतं, की तिचा विवाह मोडण्याच्या मार्गावर आहे. मग तिने वॉट इज ट्रू लव्ह? हा व्हिडिओ पाहिला. ती म्हणते: “आमच्या दोघांचाही बाप्तिस्मा झाला होता. पण, भावनिक रीत्या आम्ही एकमेकांपासून दुरावत चाललो होतो. अशा वेळी हा व्हिडिओ अगदी वेळेवर मिळालेली मदत ठरला. आता आमचं नातं आधीपेक्षा जवळचं झालं आहे.” या उदाहरणांवरून हे दिसून येतं की जेव्हा पती आणि पत्नी यहोवाच्या तत्त्वांना त्यांच्या वैवाहिक जीवनात लागू करतात, तेव्हा त्यांचं नातं आणखी आनंदी आणि मजबूत बनतं.

खास पूर्णवेळेची सेवा करणाऱ्यांनी दिलेलं वचन

१८, १९. (क) अनेक ख्रिस्ती पालकांनी काय केलं आहे? (ख) खास पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्यांबद्दल काय म्हणता येईल?

१८ या लेखात आपण इफ्ताह आणि हन्ना यांनी देवाला जे वचन दिलं होतं त्याबद्दल चर्चा केली होती. त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी इफ्ताहच्या मुलीने, तसंच हन्नाच्या मुलाने यहोवाची एका खास मार्गाने सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. आजदेखील अनेक ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना पूर्णवेळेची सेवा करण्याचं आणि देवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवण्याचं प्रोत्साहन देतात. आपणही अशा तरुण बंधुभगिनींना त्यांच्या सेवेत टिकून राहण्याचं प्रोत्साहन देऊ शकतो.—शास्ते ११:४०; स्तो. ११०:३.

खास पूर्णवेळेची सेवा करणाऱ्यांनी दिलेलं वचन (परिच्छेद १९ पाहा)

१९ आज जगभरात जवळजवळ ६७,००० बंधुभगिनी खास पूर्णवेळेची सेवा करत आहेत. यांपैकी काही बेथेल गृहात, काही बांधकाम विभागात तर काही विभागीय कार्यात सेवा करत आहेत. तर काही असेही आहेत जे प्रशालांचे प्रशिक्षक, खास पायनियर, मिशनरी, संमेलन गृहांची देखरेख करणारे किंवा बायबल प्रशाला गृहांची देखरेख करणारे या नात्याने खूप मेहनत घेतात. या सर्वांनी ‘आज्ञाधारक राहण्याचं आणि साधं जीवन जगण्याचं’ एक खास वचन दिलं आहे. यहोवाच्या सेवेत मिळणारी प्रत्येक नेमणूक मेहनत घेऊन पूर्ण करणं, एक साधं जीवन जगणं आणि खास वेळेची सेवा करताना, परवानगी असल्याशिवाय नोकरी किंवा इतर काम न करणं या गोष्टींचा या वचनात समावेश आहे. या बंधुभगिनींना खास पूर्णवेळेचे सेवक असं म्हटलं जातं. पण असं असलं, तरी ही सेवा करत असलेल्या व्यक्तींना नाही, तर त्यांच्या सेवेला खास लेखलं जातं. हे बंधुभगिनी नम्र आहेत आणि जोपर्यंत ते या खास पूर्णवेळेच्या सेवेत आहेत, तोपर्यंत त्यांनी दिलेलं वचन पाळण्याचा त्यांचा निर्धार पक्का आहे.

२०. आपण देवाला दिलेल्या वचनाला कोणत्या दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे, आणि का?

२० या लेखात आपण देवाला देऊ शकतो अशा तीन वचनांवर चर्चा केली. कदाचित तुम्हीही यांपैकी काही वचनं दिली असतील. आपल्याला माहीत आहे की दिलेलं वचन आपण गंभीरतेनं घेतलं पाहिजे आणि ते पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २०:२५) आपण यहोवाला दिलेलं वचन जर पाळलं नाही, तर त्याचे खूप गंभीर परिणाम होतील. (उप. ५:६) त्यामुळे आपण सर्व जण स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे करू. त्याने म्हटलं: “तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन.”—स्तो. ६१:८.

^ परि. 7 हन्नाने यहोवाला वचन दिलं होतं, की जर तिला मुलगा झाला तर तो संपूर्ण आयुष्य देवाचा नाजीर राहील. याचा अर्थ तिचा मुलगा यहोवाच्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहणार होता.—गण. ६:२, ५, ८.

^ परि. 13 एक व्यक्ती बाप्तिस्मा घेण्यास पात्र होण्याआधी मंडळीतील वडील त्या व्यक्तीसोबत बरीच चर्चा करतात आणि बऱ्याच गोष्टी विचारात घेतात. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा योग्य नव्हता असं फार क्वचितच घडण्याची शक्यता आहे.

^ परि. 16 देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील पृष्ठे २५१ ते २५३ पाहा.