व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विदेशी लोकांच्या’ मुलांना मदत कशी करावी?

विदेशी लोकांच्या’ मुलांना मदत कशी करावी?

“माझी मुले सत्याच्या मार्गात चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही.”—३ योहा. ४.

गीत क्रमांक: ४१, ५३

१, २. (क) स्थलांतर केलेल्या पालकांच्या मुलांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो? (ख) या लेखात कोणत्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल?

जोशूआ नावाचा एक बांधव म्हणतो: “माझ्या आईवडिलांनी त्यांचा मायदेश सोडून स्थलांतर केलं होतं. त्यामुळे, अगदी लहानपणापासूनच घरात आणि मंडळीत मी माझ्या आईवडिलांची भाषा बोलायचो. पण, शाळेला जाऊ लागल्यानंतर मात्र मी स्थानिक भाषा वापरू लागलो. पुढे काही वर्षांनी तर मी फक्त तीच भाषा बोलायचो. त्यामुळे साहजिकच, ख्रिस्ती सभांमधलं काहीएक मला कळत नव्हतं; आणि आईवडिलांची संस्कृतीही मला अगदी परकी वाटायला लागली.” अर्थात, जोशूआसारखा अनुभव असलेले आणखीही बरेच जण आहेत.

आपला मायदेश सोडून परक्या देशात राहणाऱ्यांची संख्या आज २४ कोटींच्या घरात आहे. पालकांनो, तुम्हीही स्थलांतर केलं असेल, तर तुमच्या मुलांना यहोवावर प्रेम करण्यास आणि “सत्याच्या मार्गात चालत” राहण्यास तुम्ही उत्तम प्रकारे कशी मदत करू शकता? (३ योहा. ४) तसंच, इतर जणही या कामात तुम्हाला कशी मदत करू शकतात?

पालकांनो, मुलांसमोर चांगलं उदाहरण ठेवा

३, ४. (क) आईवडील मुलांसमोर चांगलं उदाहरण कसं ठेवू शकतात? (ख) आईवडिलांनी कोणता चुकीचा दृष्टिकोन बाळगू नये?

तुमच्या मुलांनी यहोवासोबत वैयक्तिक नातेसंबंध जोडावा आणि सदासर्वकाळ जगावं अशी तुमची इच्छा असल्यास, त्यांच्यासमोर तुमचं चांगलं उदाहरण असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची मुलं जेव्हा पाहतात, की तुम्ही “आधी देवाचं राज्य” मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, तेव्हा तेही आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यहोवावर विसंबून राहायला शिकतात. (मत्त. ६:३३, ३४) त्यामुळे, भौतिक गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी, यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्राधान्य द्या. साधं जीवन जगण्याचा आणि कर्जाच्या पाशात न अडकण्याचा प्रयत्न करा. पैसा किंवा माणसांची “प्रशंसा” मिळवण्याऐवजी “स्वर्गात संपत्ती” साठवण्याचा, म्हणजेच यहोवाची पसंती मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.—मार्क १०:२१, २२ वाचा; योहा. १२:४३.

जीवनात इतके व्यस्त होऊ नका, की मुलांसाठी तुमच्याजवळ वेळच उरणार नाही. तुमची मुलं स्वतःसाठी किंवा तुमच्यासाठी मोठं नाव व भरपूर पैसा कमावण्यापेक्षा यहोवाच्या सेवेला जास्त महत्त्व देतात, तेव्हा तुम्हाला त्यांचा अभिमान वाटत आहे याची त्यांना जाणीव करून द्या. मुलांनी आईवडिलांना ऐशआरामाचं जीवन दिलं पाहिजे, हा चुकीचा दृष्टिकोन बाळगू नका. लक्षात असू द्या, “मुलांनी आईवडिलांसाठी नाही, तर आईवडिलांनी मुलांसाठी पैसा साठवून ठेवावा, अशी अपेक्षा केली जाते.”—२ करिंथ. १२:१४.

पालकांनो, भाषेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करा

५. आईवडिलांनी मुलांसोबत वारंवार यहोवाबद्दल का बोलत राहिलं पाहिजे?

बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे, आज निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक सर्व राष्ट्रांतून यहोवाच्या संघटनेत येत आहेत. (जख. ८:२३) पण, जर तुमच्या मुलांना तुमची भाषाच नीट समजत नसेल, तर त्यांना सत्य शिकवणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. लक्षात असू द्या, की तुमची मुलं हीच तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे बायबल विद्यार्थी आहेत. शिवाय, यहोवाची ओळख करून घेण्यावरच त्यांचं सर्वकाळाचं जीवन अवलंबून आहे. (योहा. १७:३) तेव्हा, तुमच्या मुलांना यहोवा देवाचं शिक्षण देण्यासाठी वारंवार त्यांच्याशी त्याच्याबद्दल “बोलत जा.”—अनुवाद ६:६, ७ वाचा.

६. एखादी नवीन भाषा शिकून घेतल्याने तुमच्या मुलांना कोणते फायदे होऊ शकतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

तुमची मुलं बहुधा शाळेतून किंवा इतरांकडून स्थानिक भाषा शिकतील. पण, तुमची भाषा ते तेव्हाच शिकतील जेव्हा तुम्ही त्यांच्याशी नेहमी बोलत राहाल. तुमची भाषा शिकल्यामुळे त्यांना तुमच्याशी संवाद साधणं आणि तुमच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करणं सोपं जाईल. पण, याचे आणखीनही बरेच फायदे आहेत. मुलं जेव्हा एकापेक्षा जास्त भाषा बोलतात, तेव्हा त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते. तसंच, इतरांचा दृष्टिकोन समजण्यासही त्यांना मदत मिळते. याशिवाय, सेवाकार्य वाढवण्याच्या अनेक संधी त्यांना मिळतात. कॅरोलीना नावाच्या बहिणीचंच उदाहरण घ्या. तिच्या आईवडिलांनी स्थलांतर केलं होतं. ती म्हणते: “एका वेगळ्या भाषेच्या मंडळीत जाऊन सेवा करण्याचा आतापर्यंतचा माझा अनुभव खूप मस्त आहे. शिवाय, प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणंही आनंददायी आहे.”

७. तुमच्या कुटुंबात भाषेमुळे समस्या निर्माण झाली असेल, तर तुम्ही काय करू शकता?

स्थलांतरित पालकांच्या काही मुलांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं, की जसजशी ती स्थानिक संस्कृती व भाषा शिकू लागतात तसतशी त्यांची आपल्या पालकांच्या भाषेबद्दलची गोडी कमी होते, आणि त्या भाषेत संवाद करणंही त्यांना अशक्य होतं. पालकांनो, तुमच्या मुलांच्या बाबतीत असं घडत असेल, तर तुम्ही थोडीफार स्थानिक भाषा शिकून घेऊ शकता का? कारण, तुम्हाला जर तुमच्या मुलांचं बोलणं, मनोरंजन किंवा शाळेचा अभ्यास या गोष्टी समजल्या आणि त्यांच्या शिक्षकांशी थेट बोलता आलं, तर ख्रिस्ती या नात्याने त्यांच्यावर संस्कार करणं तुम्हाला अधिक सोपं जाईल. एखादी नवीन भाषा शिकून घेण्यासाठी नम्रतेची, वेळेची आणि मेहनतीची गरज असली, तरी तसं करणं नक्कीच फायद्याचं आहे. उदाहरणार्थ, काही कारणांमुळे मुलाला बहिरेपणा आला, तर त्याच्याशी संवाद साधता यावा म्हणून त्याचे आईवडील संकेत भाषा शिकून घेणार नाहीत का? अगदी त्याच प्रकारे, तुमचे मूल दुसऱ्या एखाद्या भाषेत जास्त चांगला संवाद साधू शकत असेल, तर तुम्हीही ती भाषा शिकून घेणार नाही का? *

८. तुम्हाला जर स्थानिक भाषा नीट येत नसेल, तर तुम्ही तुमच्या मुलांना कशी मदत करू शकता?

खरं पाहता, आपल्या मुलांची भाषा चांगल्या प्रकारे शिकून घेणं कदाचित काही स्थलांतरित पालकांसाठी खूप अवघड असू शकतं. त्यामुळे साहजिकच मुलांना “पवित्र लिखाणांचे ज्ञान” देणं त्यांना अतिशय कठीण जाऊ शकतं. (२ तीम. ३:१५) तुमचीही परिस्थिती अशीच असली, तरी तुम्ही तुमच्या मुलांना यहोवाला ओळखून घेण्यास आणि त्याच्यावर प्रेम करण्यास नक्कीच मदत करू शकता. शॉन नावाचे एक ख्रिस्ती वडील म्हणतात: “आमच्या आईनं एकटीनंच आम्हा मुलांचं संगोपन केलं. तिला आमची भाषा नीटशी येत नव्हती आणि आम्हा भावंडांना तिची भाषा चांगल्या प्रकारे समजत नव्हती. पण, आईला आम्ही नेहमी बायबलचा अभ्यास करताना, प्रार्थना करताना आणि कौटुंबिक उपासना चालवण्याचा होईल तितका प्रयत्न करताना पाहायचो. त्यामुळे, यहोवाला ओळखणं किती महत्त्वाचं आहे, हे आमच्या लक्षात आलं.”

९. ज्या मुलांना बायबलचा आणि बायबलवर आधारित साहित्यांचा दोन भाषांमध्ये अभ्यास करावा लागतो, त्यांना पालक कशा प्रकारे मदत करू शकतात?

काही मुलांना कदाचित त्यांना येत असलेल्या दोन्ही भाषांमध्ये यहोवाबद्दल शिकण्याची गरज असू शकते. कारण, मुलं शाळेत एक भाषा बोलतात आणि घरी दुसरी भाषा. त्यामुळे, मुलांना शिकवण्यासाठी काही पालक दोन्ही भाषांतील साहित्यांचा, ऑडिओ रेकॉर्डिंगचा आणि व्हिडिओंचा उपयोग करतात. यावरून दिसून येतं, की मुलांना यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत करण्यासाठी, स्थलांतरित पालकांना खूप मेहनत घेण्याची गरज आहे.

तुम्ही कोणत्या भाषेच्या मंडळीत असलं पाहिजे?

१०. (क) कोणत्या भाषेतील मंडळीत जावं हे कोणी ठरवावं? (ख) आणि या बाबतीत योग्य निर्णय घेण्याआधी काय करणं गरजेचं आहे?

१० स्थलांतरित लोक त्यांची भाषा बोलणाऱ्या मंडळीपासून दूर असतात, तेव्हा त्यांना त्यांच्या राहत्या क्षेत्रातील वेगळ्या भाषेच्या मंडळीत जावं लागतं. (स्तो. १४६:९) पण, त्यांच्या मातृभाषेतील एखादी मंडळी त्यांच्या परिसरात असेल, तर कोणत्या भाषेच्या मंडळीत जाणं आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात चांगलं राहील, हे कुटुंबप्रमुखाने ठरवलं पाहिजे. अर्थात, या बाबतीत कोणताही निर्णय घेण्याआधी कुटुंबप्रमुख या गोष्टीचा काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करेल. तसंच, याबद्दल तो आपल्या पत्नीशी व मुलांशीही बोलेल. (१ करिंथ. ११:३) पण, निर्णय घेण्याआधी तो कोणकोणत्या गोष्टी विचारात घेईल? आणि बायबलची कोणती तत्त्वं त्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतील?

११, १२. (क) मुलं सभांमधून जे शिकतात त्यांवर भाषेचा कितपत परिणाम होत असतो? (ख) काही मुलांना आपल्या पालकांची भाषा का शिकून घ्यावीशी वाटत नाही?

११ आपल्या मुलांची नेमकी गरज काय आहे, हे पालकांनी विचारात घेतलं पाहिजे. हे खरं आहे, की बायबलच्या शिकवणी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी दर आठवडी सभांमध्ये केवळ काही तास बायबलचं शिक्षण घेणं मुलांसाठी पुरेसं नाही. पण, या गोष्टीचाही विचार करा: चांगल्या प्रकारे समजत असलेल्या भाषेतील सभांना केवळ उपस्थित राहिल्यामुळेही मुलांना फायदा होऊ शकतो. काही वेळा तर पालकांनी विचारही केला नसेल, इतका फायदा होऊ शकतो. पण, हाच फायदा नीट समजत नसलेल्या भाषेतून मुलांना होणार नाही. (१ करिंथकर १४:९, ११ वाचा.) शिवाय, मुलांची मातृभाषा ही कायम त्यांच्या मनाची व हृदयाची भाषा राहीलच असं नाही. खरंतर, काही मुलं आपल्या पालकांच्या भाषेत सभांमध्ये उत्तरं देतात, भाषणं देतात आणि एखादं सादरीकरणही करतात; पण, त्यांत त्यांचे विचार आणि भावना गोवलेल्या नसतात.

१२ याशिवाय, मुलांच्या विचारांवर आणि भावनांवर केवळ भाषेचाच परिणाम होतो असं नाही. ही गोष्ट सुरुवातीला उल्लेख केलेल्या जोशूआच्या बाबतीत घडली. त्याची बहीण एस्तेर म्हणते: “लहान मुलांच्या विचारांवर व भावनांवर त्यांच्या आईवडिलांच्या भाषेचा, संस्कृतीचा आणि धर्माचा एकाच वेळी परिणाम होत असतो.” मुलांना जोपर्यंत आपल्या पालकांची संस्कृती आपलीशी वाटत नाही, तोपर्यंत त्यांना पालकांची भाषा व धर्म शिकून घ्यावासा वाटणार नाही. अशा वेळी, स्थलांतरित पालकांनी काय करण्याची गरज आहे?

१३, १४. (क) एका स्थलांतरित जोडप्याने आपल्या कुटुंबाला स्थानिक भाषेतील सभांना घेऊन जाण्याचं का ठरवलं? (ख) त्यांनी स्वतःची आध्यात्मिकता कशी टिकवून ठेवली?

१३ मुलांच्या आध्यात्मिक गरजांसाठी ख्रिस्ती पालक स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारतात. (१ करिंथ. १०:२४) जोशूआ आणि एस्तेर यांचे वडील सॅम्यूएल म्हणतात: “आमची मुलं कोणत्या भाषेमुळे आध्यात्मिक प्रगती करत आहेत, यावर आमचं बारीक लक्ष होतं. यासोबतच आम्ही प्रार्थनाही करायचो. त्यानंतर जे आमच्या लक्षात आलं, ते आमच्या स्वतःसाठी सोयीस्कर मुळीच नव्हतं. पण, आमच्या भाषेतील मंडळीच्या सभांमधून मुलांना फारसा फायदा होत नाही हे जाणवल्यावर, आम्ही स्थानिक भाषेतील मंडळीच्या सभांना जाण्याचं ठरवलं. आम्ही संपूर्ण कुटुंब मिळून सभांना आणि सेवाकार्याला जायचो. तसंच, अधूनमधून स्थानिक मित्रांना आमच्याकडे जेवायला किंवा फेरफटका मारायला बोलवायचो. या सगळ्याचा परिणाम असा झाला, की मुलांना बांधवांची चांगली ओळख झाली. तसंच, यहोवा केवळ एक देव नाही, तर आपला पिता आणि आपला मित्र आहे हे समजून घेण्यासही त्यांना खूप मदत झाली. मुलांनी आमची भाषा चांगल्या प्रकारे शिकून घ्यावी, यापेक्षा ही गोष्ट आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची होती.”

१४ सॅम्यूएल पुढं म्हणतात: “पण, त्याच वेळी स्वतःची आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी मी आणि माझी पत्नी आमच्या भाषेतील सभांनाही जायचो. आम्ही अतिशय व्यस्त असायचो आणि थकूनही जायचो. पण, आम्ही घेत असलेल्या मेहनतीमुळे आणि केलेल्या त्यागांमुळे यहोवाने आम्हाला आशीर्वादित केलं. आज आमची तिन्ही मुलं पूर्णवेळेची सेवा करत आहेत.”

तरुण काय करू शकतात?

१५. आपण स्थानिक भाषा बोलणाऱ्या मंडळीत जाऊन जास्त सेवा करू शकतो, असं ख्रिस्टीनाला का वाटलं?

१५ मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना कदाचित असं वाटू शकतं, की त्यांना चांगल्या प्रकारे समजत असलेल्या भाषेच्या मंडळीत ते यहोवाची जास्त सेवा करू शकतात. तसं झाल्यास, मुलं आपल्यापासून दूर जात आहेत असं पालकांनी वाटून घेऊ नये. ख्रिस्टीना नावाची एक बहीण म्हणते: “मला माझ्या आईवडिलांची भाषा थोडीफार येत होती. पण, सभांमध्ये बोलली जाणारी भाषा मला मुळीच समजत नव्हती. १२ वर्षांची असताना, मी शाळेत शिकत असलेल्या भाषेतील अधिवेशनाला उपस्थित राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं, की मी जे काही ऐकत आहे तेच सत्य आहे. माझ्या आयुष्याला दिशा देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, मी माझ्या शाळेच्या भाषेत प्रार्थना करू लागले. यहोवाजवळ मी अगदी माझ्या मनातलं बोलू शकत होते!” (प्रे. कार्ये २:११, ४१) ख्रिस्टीना १८ वर्षांची झाली तेव्हा तिने स्थानिक भाषेतील एका मंडळीत जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल ती आपल्या आईवडिलांशी देखील बोलली. ती म्हणते: “माझ्या शाळेच्या भाषेत यहोवाबद्दल शिकल्यामुळेच मला पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली.” त्यानंतर, काही काळातच ख्रिस्टीनाने पायनियर सेवा सुरू केली आणि आजही ती आनंदाने सेवा करत आहे.

१६. नाडियाने एका परकीय भाषेच्या मंडळीत राहून सेवा केली याचा तिला आनंद का होतो?

१६ तरुणांनो, एखाद्या स्थानिक भाषेच्या मंडळीत जाऊन सेवा करणं आपल्यासाठी जास्त चांगलं राहील असं तुम्हाला वाटत असल्यास, स्वतःला विचारा: ‘मला स्थानिक भाषेतील मंडळीत जाण्याची इच्छा का आहे? यहोवासोबतचा माझा नातेसंबंध आणखी घनिष्ठ व्हावा म्हणून, की आईवडिलांनी माझ्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवू नये किंवा मला अधिक प्रयत्न करावे लागू नयेत, म्हणून मला दुसऱ्या मंडळीत जायची इच्छा आहे?’ (याको. ४:८) बेथेलमध्ये सेवा करणारी नाडिया म्हणते: “किशोरवयात असताना आम्हा भावंडांना स्थानिक भाषेतील मंडळीत जाऊन सेवा करायची खूप इच्छा होती.” पण, नाडियाच्या आईवडिलांच्या लक्षात आलं, की यामुळे त्यांची मुलं फारशी आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाहीत. याविषयी नाडिया म्हणते: “आमच्या आईवडिलांनी आम्हाला त्यांची भाषा शिकवण्यासाठी फार परिश्रम घेतले आणि आम्हाला परकीय भाषेच्या मंडळीतच राहून सेवा करायला सांगितलं. याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. कारण त्यामुळे आम्ही आध्यात्मिक रीत्या अधिक समृद्ध झालो आणि वेगवेगळ्या लोकांना यहोवाबद्दल शिकवण्याच्या अनेक संधीही आम्हाला मिळाल्या.”

इतर जण कशी मदत करू शकतात?

१७. (क) मुलांना वाढवण्याची जबाबदारी यहोवाने कोणावर सोपवली आहे? (ख) मुलांना सत्य शिकवण्यासाठी पालकांना मदत कशी मिळू शकते?

१७ मुलांना सत्य शिकवण्याची जबाबदारी यहोवाने त्यांच्या पालकांवर सोपवली आहे; त्यांच्या आजी-आजोबांवर किंवा इतरांवर नाही. (नीतिसूत्रे १:८; ३१:१०, २७, २८ वाचा.) पण, ज्या पालकांना स्थानिक भाषा येत नाही त्यांना आपल्या मुलांच्या मनात सत्य रुजवण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज पडू शकते. त्यामुळे, जर आईवडील मदत मागत असतील, तर ते आपल्या मुलांना वाढवण्याची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत असा निष्कर्ष काढू नये. उलट, मुलांना “यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवत” राहण्याचाच तो एक भाग असू शकतो. (इफिस. ६:४) उदाहरणार्थ, कौटुंबिक उपासना कशी करावी याविषयी ते मंडळीतील वडिलांचा सल्ला घेऊ शकतात किंवा त्यांच्या मुलांना चांगली संगती मिळावी यासाठी त्यांची मदत घेऊ शकतात.

बंधुभगिनींच्या सहवासात राहिल्यामुळे पालक आणि मुले या दोघांनाही फायदा होतो (परिच्छेद १८, १९ पाहा)

१८, १९. (क) इतर जण तरुणांना कशी मदत करू शकतात? (ख) पालकांनी काय करत राहणं गरजेचं आहे?

१८ मुलांना मदत करण्यासाठी आईवडील अधूनमधून मंडळीतील इतर कुटुंबांना त्यांच्या कौटुंबिक उपासनेत सहभागी करू शकतात. तसंच, अनेक तरुण जेव्हा इतर ख्रिश्चनांसोबत प्रचार कार्य करतात आणि मनोरंजनासाठी चांगल्या गोष्टी करतात, तेव्हा त्यांच्याकडून त्यांना बरंच काही शिकायला मिळतं. (नीति. २७:१७) याआधी उल्लेख केलेला शॉन म्हणतो: “बांधवांनी कशा प्रकारे मला त्यांच्या पंखांखाली घेतलं, हे मला चांगलं आठवतं. सभांमधील विद्यार्थी भाषणांची तयारी करण्यास ते मला मदत करायचे, तेव्हा मला नेहमीच त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळालं. शिवाय, एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र यायचो तेही मला खूप आवडायचं.”

१९ आपल्या मुलांना मदत करण्यासाठी पालक ज्यांची मदत घेतात, त्यांनी नेहमी मुलांना त्यांच्या आईवडिलांचा आदर करण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते हे कसं करू शकतात? पालकांबद्दल नेहमी सकारात्मक बोलण्याद्वारे आणि मुलांना वाढवण्याची जबाबदारी पूर्णपणे स्वतःकडे न घेण्याद्वारे ते असं करू शकतात. तसंच, मुलांना मदत करणाऱ्यांनी कधीही असं वागू नये ज्यामुळे मंडळीतल्या किंवा बाहेरच्या लोकांना काही चुकीचं घडत आहे असं वाटेल. (१ पेत्र २:१२) मुलांना मदत करण्यासाठी पालक इतरांची मदत घेत असले, तरी मुलांना सत्य शिकवण्याची जबाबदारी ही सर्वस्वी पालकांचीच आहे. त्यामुळे, इतर जण आपल्या मुलांना कशी मदत करत आहेत हे त्यांनी वेळोवेळी तपासून पाहिलं पाहिजे.

२०. पालक आपल्या मुलांना यहोवाचे विश्वासू सेवक बनण्यास कशी मदत करू शकतात?

२० पालकांनो, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मदत करता यावी म्हणून यहोवाला प्रार्थना करत राहा आणि त्यासोबतच शक्य तितके प्रयत्नही करत राहा. (२ इतिहास १५:७ वाचा.) स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा यहोवासोबत असलेल्या तुमच्या मुलांच्या नातेसंबंधाला जास्त महत्त्व द्या. देवाचं वचन तुमच्या मुलांच्या हृदयापर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला जे काही शक्य असेल ते सर्व करा. तुमची मुलं यहोवाचे चांगले सेवक बनतील, ही आशा कधीही गमावू नका. मुलं देवाच्या वचनाचं पालन करतील आणि तुमच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करतील, तेव्हा तुम्हाला अगदी प्रेषित योहानसारखं वाटेल. आपल्या लाक्षणिक मुलांबद्दल बोलताना तो म्हणाला: “माझी मुले सत्याच्या मार्गात चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही.”—३ योहा. ४.

^ परि. 7 एप्रिल २००७ च्या सावध राहा! अंकातील पृष्ठे १२-१४ वरील, “तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता!” हा लेख पाहा.