व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?

तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?

“योहानच्या मुला शिमोन, तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”—योहा. २१:१५.

गीत क्रमांक: ३२, ४५

१, २. रात्रभर मासे धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पेत्रला कोणता अनुभव आला?

येशूच्या शिष्यांपैकी सात जणांनी रात्रभर गालील समुद्रावर मासे धरण्याचा प्रयत्न केला होता. पण, एकसुद्धा मासा त्यांच्या हाती लागला नव्हता. आता सकाळ झाली होती; आणि पुनरुत्थान झालेला येशू समुद्रकिनाऱ्यावर उभा राहून त्यांना पाहत होता. मग, तो त्यांना म्हणाला: “नावेच्या उजवीकडे जाळे टाका म्हणजे तुम्हाला मासे मिळतील.” शिष्यांनी जाळे टाकले तेव्हा जाळ्यात इतके मासे आले, की त्यांना ते ओढता येईना.—योहा. २१:१-६.

आपल्या शिष्यांना नाश्ता दिल्यावर येशूने शिमोन पेत्रकडे वळून त्याला विचारलं: “योहानच्या मुला शिमोन, तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” पेत्रला त्याचा मासेमारीचा व्यवसाय किती आवडायचा हे येशूला माहीत होतं. पण इथं येशू कदाचित हे विचारात असावा, की पेत्रचं मासेमारीच्या व्यवसायापेक्षा त्याच्यावर आणि त्याने शिकवलेल्या गोष्टींवर जास्त प्रेम आहे का. पेत्र येशूला म्हणाला: “प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.” (योहा. २१:१५) त्या दिवसापासून, पेत्र आयुष्यभर आपल्या या शब्दांना जागला. स्वतःला प्रचाराच्या कार्यात झोकून देऊन त्याने ख्रिस्तावरील आपलं प्रेम दाखवून दिलं; आणि तो ख्रिस्ती मंडळीचा एक जबाबदार सदस्यही बनला.

३. ख्रिश्चनांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?

येशूने पेत्रला जो प्रश्न विचारला त्यावरून आज आपण काय शिकू शकतो? हेच की, ख्रिस्तावरील आपलं प्रेम कधीही कमी होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. या जगातील आपलं जीवन तणावपूर्ण असेल; तसंच, आपल्याला अनेक चिंतांचा आणि समस्यांचा सामना करावा लागेल हे येशूला माहीत होतं. त्याने बी पेरणाऱ्याचं जे उदाहरण दिलं त्यात म्हटलं, की काही लोक मोठ्या आनंदाने “राज्याचं वचन” स्वीकारतील आणि सुरुवातीला खूप आवेश दाखवतील. पण, नंतर “जगाच्या व्यवस्थेच्या चिंता आणि पैशाची फसवी ताकद” त्यांच्या मनात पेरलेल्या वचनाची वाढ खुंटवेल आणि ते आपला आवेश गमावून बसतील. (मत्त. १३:१९-२२; मार्क ४:१९) म्हणूनच, येशूने आपल्या शिष्यांना असा इशारा दिला: “अतिप्रमाणात खाणे व पिणे आणि जीवनाच्या चिंता यांमुळे तुमची मने भारावून जाऊ नयेत . . . म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.” (लूक २१:३४). आज आपणही काळजी घेतली नाही, तर जीवनातील चिंता आपल्या आध्यात्मिक गोष्टींच्या आड येण्याची शक्यता आहे.

४. ख्रिस्तावरील आपलं प्रेम टिकून आहे हे तपासून पाहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

पेत्रप्रमाणेच आपणसुद्धा प्रचाराच्या कार्याला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊन, ख्रिस्तावरील आपलं प्रेम दाखवू शकतो. पण, ख्रिस्तावरील आपलं प्रेम कायम टिकून राहील याची आपण खातरी कशी करू शकतो? त्यासाठी आपण वेळोवेळी स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: “माझं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे? जीवनात मला सगळ्यात जास्त आनंद कशातून मिळतो, यहोवाच्या सेवेतून, की इतर गोष्टींमधून?’ या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण तीन गोष्टी विचारात घेऊ. या गोष्टींना आपण जीवनात योग्य स्थानी ठेवलं नाही, तर ख्रिस्तावरील आपलं प्रेम कमी होण्याची शक्यता आहे. त्या तीन गोष्टी म्हणजे: नोकरीव्यवसाय, मनोरंजन व करमणूक, आणि भौतिक गोष्टी.

नोकरीव्यवसायाला योग्य स्थानी ठेवा

५. कुटुंबप्रमुखांवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे?

पेत्र केवळ एक छंद म्हणून नाही, तर आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मासेमारीचा व्यवसाय करत होता. आजसुद्धा, यहोवाने कुटुंबप्रमुखांवर त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. (१ तीम. ५:८) त्यामुळे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्यांना कष्ट करणं गरजेचं आहे. पण, या शेवटल्या दिवसांत, नोकरीव्यवसायामुळे आपल्याला बऱ्याच ताणतणावांचा सामना करावा लागू शकतो.

६. आजकाल नोकरीच्या ठिकाणी काय पाहायला मिळतं?

आज नोकरीच्या संधी कमी आणि नोकरीची गरज असलेले जास्त, असं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे, नोकरीधंदा मिळवण्यासाठी लोकांना खूप धडपड करावी लागते. बऱ्याच जणांना तर कमी पगारावर जास्त काम आणि ओव्हरटाईम करावा लागतो. हल्ली बऱ्याच ठिकाणी कमीतकमी कामगारांचा उपयोग करून, जास्तीत जास्त माल तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे साहजिकच कामगारांवर ताण येतो, त्यांची दमछाक होते आणि काही वेळा तर ते आजारीही पडतात. आपण बॉसच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आपली नोकरी जाईल अशी अनेकांना भीतीही वाटते.

७, ८. (क) आपण सगळ्यात जास्त कोणाला एकनिष्ठ असलं पाहिजे? (ख) थायलँडमध्ये राहणाऱ्या बांधवाला कामाच्या बाबतीत कोणता महत्त्वपूर्ण धडा शिकायला मिळाला?

ख्रिस्ती या नात्याने कोणत्याही व्यक्तीपेक्षा, म्हणजे अगदी आपल्या बॉसपेक्षाही जास्त आपण यहोवाला एकनिष्ठ असलं पाहिजे. (लूक १०:२७) नोकरीव्यवसाय हे आपल्या गरजा पूर्ण करण्याचं केवळ एक माध्यम आहे; त्याद्वारे आपण आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो आणि सेवाकार्य करण्यासाठीही आपल्याला मदत होते. पण, आपण जर सावध राहिलो नाही, तर कामाच्या जबाबदाऱ्या आपल्या उपासनेच्या आड येण्याची शक्यता आहे. थायलँडमधील एका बांधवाचं उदाहरण घ्या; त्याच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. त्याने म्हटलं: “पूर्वी मी कॉम्प्युटर रिपेरिंगचं काम करायचो; माझी नोकरी खूप छान होती. पण, मला फार उशिरापर्यंत काम करावं लागायचं. त्यामुळे, आध्यात्मिक गोष्टींसाठी जवळपास वेळच उरायचा नाही. शेवटी मला जाणीव झाली, की मला जर देवाच्या राज्याला जीवनात प्रथम स्थान द्यायचं असेल, तर मला काहीतरी वेगळं काम किंवा नोकरी करावी लागेल.” मग, या बांधवाने काय केलं?

तो पुढे म्हणतो: “या बाबतीत काय आणि कसं करावं यावर एक वर्षभर विचार केल्यानंतर, मी शेवटी एक आइस्क्रीम विक्रेता म्हणून काम करण्याचं ठरवलं. सुरुवातीला माझी बरीच आर्थिक ओढाताण झाली आणि कधीकधी मी निराशही व्हायचो. मी पूर्वी जिथं नोकरी करायचो तिथले सोबती जेव्हा मला भेटायचे, तेव्हा ते माझी खूप टिंगल करायचे. ‘एअरकंडिशन्ड ऑफिसमध्ये बसून काम करण्याऐवजी असं रस्त्यावर आइस्क्रीम विकण्याची कल्पना मला कशी काय सुचली,’ असं ते थट्टेच्या सुरात विचारायचे. मी यहोवाला प्रार्थना केली आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी व आध्यात्मिक गोष्टींना जास्त वेळ देण्याचं माझं ध्येय गाठण्यासाठी, मला मदत करावी अशी विनवणी केली. काही काळातच चित्र बदलू लागलं. मला माझ्या गिऱ्हाइकांच्या आवडीनिवडी समजू लागल्या आणि आइस्क्रीम बनवण्यातही मी खूप कुशल बनलो. काही दिवसांतच, माझा सगळा माल रोजच्या रोज संपू लागला. खरं सांगायचं तर, मी आधी नोकरी करत होतो त्यापेक्षा आता माझी आर्थिक परिस्थिती जास्त चांगली आहे. आधी होता तसा कोणताही ताण किंवा चिंता मला नाही. त्यामुळे, मी पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवासोबतचं माझं नातं आणखी मजबूत झालं आहे.”—मत्तय ५:३,  वाचा.

९. नोकरीव्यवसायाबद्दल नेहमी योग्य दृष्टिकोन बाळगण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

मेहनती वृत्तीची यहोवा नक्कीच कदर करतो आणि त्याचं प्रतिफळही देतो. (नीति. १२:१४) पण, आपण आपल्या नोकरीला यहोवाच्या सेवेपेक्षा जास्त महत्त्व तर देत नाही ना, हे सतत तपासून पाहण्याची गरज आहे. मूलभूत गरजांविषयी बोलताना येशू म्हणाला: “आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा, म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील.” (मत्त. ६:३३) मग, आपल्या नोकरीव्यवसायाबद्दल आपण योग्य दृष्टिकोन बाळगतो का, याची खातरी आपल्याला कशी करता येईल? त्यासाठी आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘यहोवाच्या सेवेपेक्षा मला माझं कामच जास्त आनंददायी आणि चांगलं वाटतं का?’ या प्रश्‍नावर विचार केल्यास कोणत्या गोष्टीवर आपलं खरं प्रेम आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल.

१०. येशूने कोणता महत्त्वपूर्ण धडा शिकवला?

१० आपण जीवनात कोणत्या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे, हे येशूने आपल्याला शिकवलं. एकदा तो मरीया आणि मार्था या बहिणींच्या घरी गेला. मार्था लगेच येशूसाठी जेवण तयार करू लागली, पण मरीया मात्र तो शिकवत असलेल्या गोष्टी ऐकत बसली. मरीया कामात आपल्याला मदत करत नाही, म्हणून मार्थाने तक्रार केली. तेव्हा येशू तिला म्हणाला: “मरीयाने जे अधिक चांगलं ते निवडलं आहे आणि ते तिच्याकडून काढून घेतलं जाणार नाही.” (लूक १०:३८-४२) यातून येशूने एक अतिशय महत्त्वपूर्ण धडा शिकवला. तो धडा म्हणजे, स्वतःच्या गरजांमुळे आपलं लक्ष विचलित न होऊ देण्यासाठी आणि ख्रिस्तावरील आपलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, आपण जे “अधिक चांगलं” आहे ते निवडलं पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, सांगायचं तर आपल्यासाठी यहोवासोबतचा नातेसंबंध हा जीवनातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असला पाहिजे.

मनोरंजन व करमणूक यांबद्दल असलेला दृष्टिकोन

११. विश्रांती आणि विरंगुळा यांबद्दल बायबल काय म्हणतं?

११ आपलं जीवन अतिशय धकाधकीचं असल्यामुळे, आपल्याला अधूनमधून विश्रांतीची व विरंगुळ्याची गरज असते. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही.” (उप. २:२४) आपल्या शिष्यांना विश्रांतीची किती गरज आहे हे येशूनेसुद्धा ओळखलं. उदाहरणार्थ, शिष्यांनी प्रचाराच्या कार्यात बरीच मेहनत केल्यानंतर तो त्यांना म्हणाला: “एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.”—मार्क ६:३१, ३२.

१२. मनोरंजन आणि करमणूक यांबाबतीत आपण काळजी का घेतली पाहिजे? याचं एक उदाहरण द्या.

१२ मनोरंजन आणि करमणूक यांमुळे मनाला थोडाफार विसावा व विरंगुळा मिळतो यात काही शंका नाही. पण, मौजमजा करण्याला आपण जीवनात वाजवीपेक्षा जास्त महत्त्व तर देत नाही ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पहिल्या शतकात अनेकांची मनोवृत्ती, “चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचं आहे” अशी होती. (१ करिंथ. १५:३२) आजही आपल्याला हीच मनोवृत्ती सर्रासपणे पाहायला मिळते. पश्‍चिम युरोपमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं उदाहरण विचारात घ्या. तो नुकताच ख्रिस्ती सभांना येऊ लागला होता. पण, मनोरंजनाचं त्याला इतकं वेड होतं की साक्षीदारांच्या सभांना येण्याचं त्याने बंद केलं. नंतर त्याच्या लक्षात आलं, की मनोरंजनाला नको तितकं महत्त्व दिल्यामुळे त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून, त्याने साक्षीदारांसोबत पुन्हा बायबल अभ्यास करायला सुरुवात केली आणि काही काळानंतर तो प्रचाराच्या कार्यातसुद्धा सहभाग घेऊ लागला. पुढे त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तो म्हणाला: “या जगातील मनोरंजनात स्वतःला बुडवून घेण्यापेक्षा, यहोवाची सेवा केल्याने जो आनंद मिळतो तो कितीतरी पटींनी अधिक आहे. दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे, की ही गोष्ट मला फार उशिरा कळली आणि तोपर्यंत माझा बराच वेळ वाया गेला होता.”

१३. (क) मनोरंजन व करमणूक यांसाठी वाजवीपेक्षा जास्त वेळ देणं चांगलं नाही, हे एक उदाहरण देऊन सांगा. (ख) मनोरंजन किंवा करमणूक यांबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१३ मनोरंजन व करमणूक यांमुळे आपल्या मनाला विरंगुळा मिळाला पाहिजे. तसंच, आपल्याला ताजंतवानं व उत्साहीदेखील वाटलं पाहिजे. पण, यासाठी आपण खरोखर किती वेळ द्यायला हवा? ते जाणून घेण्याकरता एक उदाहरण विचारात घ्या. आपल्यापैकी अनेकांना केक किंवा गोड पदार्थ खायला फार आवडतात. पण आपण जर फक्त हेच पदार्थ खाल्ले, तर आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. निरोगी राहण्यासाठी आपण असेही पदार्थ खाल्ले पाहिजेत जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतील. त्याचप्रमाणे, जर आपण आपला बहुतेक वेळ मनोरंजन व करमणूक यातच खर्च केला, तर यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मनोरंजन किंवा करमणूक यांबाबत आपण संतुलित दृष्टिकोन बाळगतो का, हे तपासून पाहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता: एका आठवड्यात यहोवाच्या सेवेसाठी, म्हणजे ख्रिस्ती सभांसाठी, प्रचार कार्यासाठी आणि बायबल अभ्यासासाठी तुम्ही किती वेळ देता हे लिहून काढा. मग, त्याच आठवड्यात मनोरंजन व करमणूक यांसाठी, म्हणजे खेळ, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम्स यांसाठी तुम्ही किती वेळ खर्च केला तेही लिहून काढा. नंतर या दोन्ही गोष्टींची तुलना करा. तुलना केल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं? तुम्हाला काही सुधारणा करण्याची गरज आहे का?—इफिसकर ५:१५, १६ वाचा.

१४. मनोरंजन व करमणूक यांबाबत योग्य निवड करण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१४ मनोरंजन व करमणूक यांबाबत निवड करण्याची मोकळीक यहोवाने आपल्याला दिली आहे, आणि या बाबतीत कुटुंबप्रमुखसुद्धा आपल्या कुटुंबासाठी निवड करू शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल यहोवाची विचारसरणी काय आहे हे बायबलमधील तत्त्वांवरून आपल्याला समजतं. ही तत्त्वं आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतात. * चांगलं मनोरंजन व करमणूक ही “देवाची देणगी” आहे. (उप. ३:१२, १३) हे खरं आहे, की मनोरंजनाच्या बाबतीत प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. (गलती. ६:४, ५) असं असलं तरी, मनोरंजन किंवा करमणूक यांबाबत निवड करताना आपण काळजी घेतली पाहिजे. येशूने म्हटलं: “जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.” (मत्त. ६:२१) आपला राजा, येशू याच्यावर आपलं प्रेम असेल, तर आपल्या वागण्या-बोलण्यातून तसंच आपल्या विचारांतूनसुद्धा आपण हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करू, की देवाचं राज्य हे आपल्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.—फिलिप्पै. १:९, १०.

भौतिकवादाविरुद्ध आपली लढाई

१५, १६. (क) भौतिकवाद हा आपल्यासाठी एक पाश कसा ठरू शकतो? (ख) आणि याबद्दल येशूने कोणता मोलाचा सल्ला दिला?

१५ आज अनेकांना असं वाटतं, की आपल्याकडे अत्याधुनिक मोबाईल फोन, कॉम्प्युटर, नवनवीन स्टाईलचे कपडे वगैरे गोष्टी असल्याच पाहिजेत. एका अर्थी, त्यांना भौतिकवाद जडलेला असतो. भौतिकवाद म्हणजे अशी जीवनशैली ज्यात भौतिक गोष्टींना आणि पैशाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. पण, ख्रिस्ती या नात्याने तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? स्वतःला विचारा: ‘मंडळीच्या सभांची तयारी करण्यासाठी मी जितका वेळ देतो, त्यापेक्षा जास्त वेळ बाजारात नव्याने आलेल्या कारबद्दल किंवा फॅशनबद्दल विचार करण्यात खर्च करतो का? रोजच्या कामकाजात मी इतका व्यस्त झालो आहे का, की प्रार्थना करण्यासाठी किंवा बायबल वाचण्यासाठीसुद्धा मला पुरेसा वेळ मिळत नाही?’ आपण जर सावध राहिलो नाही, तर ख्रिस्तावरील प्रेमापेक्षा भौतिक गोष्टींवरील आपलं प्रेम वाढू लागेल. तेव्हा, येशूने जो इशारा दिला तो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. तो म्हणाला: “सर्व प्रकारच्या लोभापासून सांभाळा.”—लूक १२:१५.

१६ येशूने म्हटलं, की “कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही.” त्याने पुढं असंही म्हटलं: “तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” आपलं संपूर्ण लक्ष भौतिक गोष्टींवर केंद्रित असेल, तर यहोवाच्या सेवेत सर्वोत्तम देणं आपल्याला शक्य होणार नाही. कारण, येशूने म्हटल्याप्रमाणे आपण “एकतर एका मालकाचा द्वेष” करू आणि “दुसऱ्यावर प्रेम” करू; किंवा मग, “एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्याला तुच्छ” लेखू. (मत्त. ६:२४) अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला सतत आपल्या शरीराच्या इच्छांविरुद्ध लढा द्यावा लागतो, आणि यात भौतिकवादसुद्धा आलाच.—इफिस. २:३.

१७. (क) काहींना भौतिक गोष्टींच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन बाळगणं अवघड का जातं? (ख) भौतिकवादाचा प्रतिकार करण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१७ काही जण स्वतःच्याच इच्छा-अभिलाषा तृप्त करण्यात इतके गुंतलेले असतात, की भौतिक गोष्टींबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगणं त्यांना अवघड जातं. (१ करिंथकर २:१४ वाचा.) हे लोक सरळ विचार करत नसल्यामुळे, चांगलं काय आणि वाईट काय यात त्यांना फरक करता येत नाही. (इब्री ५:११-१४) भौतिक गोष्टींबद्दलची त्यांची इच्छा अधिकाधिक वाढत जाते आणि ते कधीही तृप्त होत नाहीत. (उप. ५:१०) पण, अशा प्रकारच्या विचारसरणीवर मात करण्यासाठी आपण मात्र एक गोष्ट नक्कीच करू शकतो. ती म्हणजे, देवाच्या वचनाचं नियमितपणे वाचन करणं. त्यामुळे भौतिकवादाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला मिळतं. (१ पेत्र २:२) येशूने देवाच्या वचनातील सत्यांवर मनन केलं आणि त्यामुळे त्याला सैतानाच्या प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास मदत मिळाली. (मत्त. ४:८-१०) आज आपल्यालाही भौतिकवादाचा प्रतिकार करायचा असेल, तर आपण बायबलची तत्त्वं आपल्या जीवनात लागू केली पाहिजेत. त्यावरून येशूला हे दिसून येईल, की भौतिक गोष्टींपेक्षा आपलं त्याच्यावर जास्त प्रेम आहे.

जीवनात तुम्ही कोणत्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देता? (परिच्छेद १८ पाहा)

१८. तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१८ येशूने जेव्हा पेत्रला विचारलं, की “तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?”, तेव्हा खरंतर तो त्याला हेच शिकवत होता, की पेत्रने यहोवाच्या सेवेला त्याच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. पेत्रच्या नावाचा अर्थ “खडक” असा होतो आणि त्याच्या चांगल्या गुणांची तुलना एखाद्या खडकाशी केली जाऊ शकते. (प्रे. कार्ये ४:५-२०) आज, आपलंसुद्धा ख्रिस्तावरील प्रेम एखाद्या खडकाप्रमाणे अढळ असलं पाहिजे. त्यामुळे नोकरीव्यवसाय, मनोरंजन व करमणूक, तसंच भौतिक गोष्टी यांना आपण जीवनात योग्य स्थानी ठेवलं पाहिजे. असं केल्यास, पेत्रप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येक जण येशूला म्हणू शकेल: “प्रभू, माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहीत आहे.”