व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक धनावर आपलं लक्ष केंद्रित करा

आध्यात्मिक धनावर आपलं लक्ष केंद्रित करा

“जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.”—लूक १२:३४.

गीत क्रमांक: १६, 

१, २. (क) यहोवाने आपल्याला कोणते तीन मौल्यवान मोती दिले आहेत? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या विश्वात, सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणी असेल तर ती म्हणजे यहोवा देव. कारण सर्व काही त्याचंच आहे. (१ इति. २९:११, १२) असं असलं, तरी यहोवा अतिशय उदार आहे. त्याने आपल्या सर्वांना जो अनमोल आध्यात्मिक खजिना दिला आहे, त्यासाठी आपण खरंच त्याचे किती आभारी आहोत! या आध्यात्मिक खजिन्यातले काही मौल्यवान मोती म्हणजे: (१) देवाचं राज्य, (२) आपलं सेवाकार्य आणि (३) बायबलमधली मौल्यवान सत्यं. पण आपण जर काळजी घेतली नाही, तर हे आध्यात्मिक धन किती मौल्यवान आहे याचा हळूहळू आपल्याला विसर पडू शकतो. त्यामुळे या आध्यात्मिक धनावरचं आपलं प्रेम वाढवण्याची आणि ते किती मौल्यवान आहे याची वारंवार स्वतःला आठवण करून देण्याची गरज आहे. कारण येशूने म्हटलं: “जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.”—लूक १२:३४.

त्यामुळे आता आपण पाहू या की देवाचं राज्य, आपलं सेवाकार्य आणि बायबलमधली सत्यं यांबद्दल असलेलं आपलं प्रेम आणि कृतज्ञता आपण कशी टिकवून ठेवू शकतो. आणि असं करत असताना, आपण वैयक्तिक रीत्या आध्यात्मिक धनावर असलेलं आपलं प्रेम आणखी कसं वाढवू शकतो यावरही मनन करू या.

देवाचं राज्य—एका मौल्यवान मोत्याप्रमाणे

३. येशूने सांगितलेल्या उदाहरणामध्ये, मौल्यवान मोती मिळवण्यासाठी व्यापारी काय करण्यास तयार होता? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

मत्तय १३:४५, ४६ वाचा. येशूने मोत्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं. एक दिवस, त्या व्यापाऱ्याला एक असा मोती सापडला, जो त्याने पूर्वी पाहिलेल्या सर्व मोत्यांपेक्षा जास्त मौल्यवान होता. त्याला तो मोती इतका हवा होता, की तो मिळवण्यासाठी त्याने त्याच्याकडे असलेलं सर्वकाही विकलं. यावरून, त्या व्यापाऱ्यासाठी तो मोती किती मौल्यवान होता याची तुम्ही कल्पना करू शकता का?

४. देवाच्या राज्यावर आपलं प्रेम असेल तर आपण काय करण्यास तयार असू?

येशूने सांगितलेल्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? हेच की, देवाच्या राज्याविषयीचं सत्य त्या मौल्यवान मोत्याप्रमाणेच आहे. त्या व्यापाऱ्यासाठी तो मोती फार अनमोल होता. त्याचप्रमाणे आपल्यासाठीही जर देवाचं राज्य अनमोल असेल आणि त्याच्यावर आपलं प्रेम असेल, तर आपणही देवाच्या राज्याचे भाग होण्यासाठी आणि त्यात टिकून राहण्यासाठी सर्वकाही त्याग करण्यास तयार असू. (मार्क १०:२८-३० वाचा.) आता आपण अशा दोन व्यक्तींची उदाहरणं पाहू, ज्यांनी जीवनात असेच मोठे त्याग केले होते.

५. देवाच्या राज्यासाठी जक्कय काय करण्यास तयार झाला?

जक्कय हा एक जकातदार होता. लोकांकडून पैसे लुबाडून तो खूप श्रीमंत झाला होता. (लूक १९:१-९) एक दिवस जेव्हा येशू देवाच्या राज्याविषयी लोकांना संदेश सांगत होता, तेव्हा तो त्याने ऐकला. येशूचा संदेश त्याला इतका आवडला, की स्वतःमध्ये पूर्णपणे बदल करण्याची त्याची इच्छा झाली. तो म्हणाला: “प्रभू, पाहा! मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देत आहे. आणि ज्या कोणाकडून मी काही लुबाडले असेल, त्याला मी चौपट परत करत आहे.” लोकांकडून लुबाडलेले पैसै जक्कयने परत केले आणि पुढे त्याने लोभीपणा सोडून दिला.

६. एका स्त्रीने तिच्या जीवनात कोणते मोठमोठे बदल केले, आणि का?

काही वर्षांपूर्वी एका स्त्रीने देवाच्या राज्याविषयीचा आनंदाचा संदेश ऐकला. त्या वेळी ती एक समलैंगिक संबंध ठेवणारी (लेसबियन) स्त्री होती. एवढंच नाही, तर समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका संघटनेची ती अध्यक्षदेखील होती. पण जसजसा ती बायबलचा अभ्यास करू लागली, तसतसं देवाचं राज्य किती मौल्यवान आहे हे तिला कळालं. तसंच, तिला याचीही जाणीव झाली की तिला तिच्या जीवनात फार मोठे बदल करावे लागतील. (१ करिंथ. ६:९, १०) यहोवा देवावर असलेल्या प्रेमामुळे तिने समलैंगिक संबंध तोडले आणि ती संघटनाही सोडली. तिने २००९ मध्ये बाप्तिस्मा घेतला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी पायनियर सेवा सुरू केली. या स्त्रीचं, तिच्या चुकीच्या इच्छांपेक्षा यहोवावर अधिक प्रेम असल्यामुळे ती आपल्या जीवनात मोठमोठे बदल करू शकली.—मार्क १२:२९, ३०.

७. देवाच्या राज्यासाठी असलेलं आपलं प्रेम आपण कसं टिकवून ठेवू शकतो?

देवाच्या राज्याचा भाग होण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी स्वतःच्या जीवनात मोठे बदल केले आहेत. (रोम. १२:२) पण, आपली लढाई एवढ्यावरच संपलेली नाही. देवाच्या राज्यावर असलेल्या प्रेमाला आपण कोणत्याही गोष्टीमुळे किंवा कारणामुळे कमी होऊ देऊ नये; जसं की, भौतिक गोष्टींमुळे किंवा अनैतिक लैंगिक इच्छांमुळे. (नीति. ४:२३; मत्त. ५:२७-२९) देवाच्या राज्यावर असलेलं आपलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी यहोवा देवाने आपल्याला आणखी एक मदत पुरवली आहे; दुसऱ्या शब्दांत, त्याने आणखी एक मौल्यवान मोती दिला आहे.

इतरांचा जीव वाचवणारं सेवाकार्य

८. (क) आनंदाचा संदेश सांगण्याची जबाबदारी ही मातीच्या भांड्यात असलेली संपत्ती आहे, असं पौल का म्हणाला? (ख) आनंदाच्या संदेशावर प्रेम असल्याचं पौलने कसं दाखवलं?

येशूने आपल्यावर राज्याचा संदेश सांगण्याची आणि त्याविषयी शिकवण्याची जबाबदारी सोपवली आहे. (मत्त. २८:१९, २०) याविषयी बोलताना प्रेषित पौल म्हणाला, की हे सेवाकार्य मातीच्या भांड्यात असलेली संपत्तीच आहे. (२ करिंथ. ४:७; १ तीम. १:१२) अपरिपूर्ण असल्यामुळे आपण त्या मातीच्या भांड्याप्रमाणे आहोत. आणि आपण राज्याविषयी सांगत असलेला संदेश त्या संपत्तीप्रमाणे आहे. कारण, या संदेशामुळे ऐकणाऱ्याला आणि आपल्याला अशा दोघांनाही सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं. यामुळेच पौल म्हणाला: “आनंदाच्या संदेशासाठी मी सर्वकाही करतो, जेणेकरून मला तो इतरांना सांगता यावा.” (१ करिंथ. ९:२३) इतरांना देवाच्या राज्याचा संदेश सांगण्यासाठी पौलने फार मेहनत घेतली. (रोमकर १:१४, १५; २ तीमथ्य ४:२ वाचा.) आनंदाच्या संदेशावर असलेल्या प्रेमामुळेच, तीव्र विरोध होत असतानाही पौल संदेश घोषित करू शकला. (१ थेस्सलनी. २:२) आपण सेवाकार्यावर असलेल्या पौलच्या प्रेमाचं कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?

९. सेवाकार्यावर आपलं प्रेम आहे हे आपण कोणत्या काही मार्गांनी दाखवू शकतो?

पौलचं आपल्या सेवाकार्यावर प्रेम होतं हे त्याने अनेक मार्गांनी दाखवून दिलं. त्यातलाच एक मार्ग म्हणजे, त्याने आनंदाचा संदेश सांगण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग केला. पौल आणि पहिल्या शतकातले ख्रिश्चन यांच्याप्रमाणेच आपणही घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी, तसंच जिथे कुठे लोक भेटतील तिथे त्यांना संदेश सांगतो. (प्रे. कार्ये ५:४२; २०:२०) जास्तीत जास्त लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहचवण्याचे मार्ग आपण शोधतो. आपण शक्य तेव्हा साहाय्यक पायनियर किंवा पायनियर या नात्याने सेवा करू शकतो. तसंच, आपण एखादी नवीन भाषा शिकू शकतो किंवा प्रचारासाठी दुसऱ्या एखाद्या शहरात, प्रांतात किंवा देशात जाऊ शकतो.—प्रे. कार्ये १६:९, १०.

१०. सेवाकार्य करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे आइरीन या बहिणीला कोणते काही चांगले अनुभव आले आहेत?

१० अमेरिकेतील आइरीन या एका अविवाहित बहिणीचं उदाहरण घ्या. तिला रशियन भाषा बोलणाऱ्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याची इच्छा होती. त्यामुळे मग १९९३ मध्ये ती न्यूयॉर्क या शहरात असलेल्या रशियन भाषेतील गटाच्या सभांना उपस्थित राहू लागली. त्या वेळी त्या गटात फक्त २० प्रचारक होते. वीस वर्षांनंतर आइरीन म्हणते: “मला आजही रशियन भाषा इतकी चांगली बोलता येत नाही.” पण तरीही, यहोवाने तिला आणि आणखी एका प्रचारकाला रशियन भाषेत संदेश सांगण्यासाठी मदत केली. याचा परिणाम म्हणजे, आज न्यूयॉर्क शहरात रशियन भाषेच्या ६ मंडळ्या आहेत. आइरीनने अनेक लोकांचा बायबल अभ्यास घेतला आणि त्यातल्या १५ जणांचा बाप्तिस्मा झाला. त्यापैकी काही जण आज बेथेलमध्ये सेवा करत आहेत, तर काही पायनियर आणि वडील या नात्याने मंडळीत सेवा करत आहेत. आइरीन म्हणते, की ती जर दुसऱ्या एखाद्या ध्येयाच्या मागे लागली असती, तर आता तिला जितका आनंद मिळतो तितका आनंद कधीच मिळाला नसता. आइरीनसाठी सेवाकार्य खरोखरच खूप मौल्यवान आहे!

तुम्ही तुमच्या सेवाकार्याला मौल्यवान लेखता का? आणि त्यासाठी आठवड्याच्या दिवसांमध्येही वेळ काढता का? (परिच्छेद ११, १२ पाहा)

११. छळ होत असतानाही सेवाकार्य करत राहिल्यामुळे कोणते चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत?

११ आपल्यासाठी आपलं सेवाकार्य मौल्यवान असेल, तर आपणही पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करू. आणि विरोध होत असतानाही सेवाकार्य करत राहू. (प्रे. कार्ये १४:१९-२२) उदाहरणार्थ, १९३० ते १९४४ या काळादरम्यान अमेरिकेतल्या आपल्या बांधवांना तीव्र छळाचा सामना करावा लागला. पण अशा परिस्थितीतही त्यांनी आनंदाच्या संदेशाची घोषणा करण्याचं थांबवलं नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना सेवाकार्य करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि बरेच खटले जिंकले. १९४३ मध्ये बंधू नॉर यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात साक्षीदारांनी जिंकलेल्या एका खटल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, जर बांधवांनी प्रचार करण्याचं थांबवलं असतं, तर त्या न्यायालयात दाखल करण्यासाठी कोणताही खटला पुढे आला नसता. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, की जगभरातले आपले बांधव प्रचार करत राहिले आणि त्यावरून त्यांनी दाखवून दिलं की कोणत्याही प्रकारचा छळ आपलं सेवाकार्य रोखू शकत नाही. जगभरात इतर देशांतल्या बांधवांनाही अशाच प्रकारे अनेक न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळालं आहे. खरंच, सेवाकार्यावर आपलं प्रेम असल्यामुळेच कोणत्याही प्रकारचा छळ आपल्याला सेवाकार्य करण्यापासून थांबवू शकत नाही.

१२. सेवाकार्याच्या बाबतीत तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१२ आपल्यासाठी सेवाकार्य मौल्यवान असेल, तर महिन्याच्या शेवटी आपण प्रचाराचे किती तास रिपोर्टवर भरणार आहोत याचाच फक्त विचार करणार नाही. तर, “आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न करू. (प्रे. कार्ये २०:२४; २ तीम. ४:५) पण संदेश सांगत असताना आपण लोकांना काय शिकवतो? यासाठी, देवाकडून मिळालेल्या आणखी एका मौल्यवान मोत्याकडे लक्ष द्या.

आपण शिकलेली बायबलमधली मौल्यवान सत्यं

१३, १४. (क) मत्तय १३:५२ मध्ये येशूने ज्या ‘भांडाराचा’ उल्लेख केला ते भांडार काय आहे? (ख) आणि आपण ते भांडार कसं भरू शकतो?

१३ यहोवाकडून मिळालेला तिसरा मौल्यवान मोती म्हणजे, आपण बायबलमधून शिकलेली सत्यं. यहोवा देव हा सत्याचा उगम आहे. (२ शमु. ७:२८; स्तो. ३१:५) आणि एक उदार पिता या नात्याने ही सत्यं आपल्यालाही मिळावीत अशी त्याची इच्छा आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या मार्गांनी ही सत्यं शिकलो. जसं की, बायबल आणि बायबलवर आधारित प्रकाशनं वाचण्याद्वारे. तसंच अधिवेशनं, संमेलनं आणि मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याद्वारेही आपण बायबलमधील सत्यं शिकलो. बायबलमधील ही मौल्यवान सत्यं आपण जितकी अधिक गोळा करू, तितकं अधिक येशूने सांगितल्याप्रमाणे आपलं भांडार “नव्या व जुन्या” सत्यांनी भरेल. (मत्तय १३:५२ वाचा.) बायबलमधील सत्यांचा एखाद्या गुप्त धनाप्रमाणे शोध केल्यास, यहोवा आपलं ‘भांडार’ सत्याच्या मौल्यवान मोत्यांनी भरण्यासाठी आपल्याला मदत करेल. (नीतिसूत्रे २:४-७ वाचा.) हे आपण कसं करू शकतो?

१४ त्यासाठी आपण बायबलचा आणि आपल्या प्रकाशनांचा नियमितपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्यांवर नीट संशोधन केलं पाहिजे. असं केल्यास, तुम्हाला पूर्वी माहीत नसलेली सत्य समजतील. (यहो. १:८, ९; स्तो. १:२, ३) टेहळणी बुरूज मासिकाच्या पहिल्या आवृत्तीची छपाई जुलै १८७९ मध्ये करण्यात आली होती. त्यात सत्याची तुलना जंगली गवताच्या आड लपलेल्या फुलाशी केली होती. पुढे त्यात म्हटलं होतं: ‘असं एखादं फूल मिळवण्यासाठी एका व्यक्तीला त्याचा नीट शोध घ्यावा लागतो. आणि जेव्हा त्याला ते फूल सापडतं, तेव्हा त्याने त्या एकाच फुलावर समाधान न मानता आणखीही फुलांचा शोध घेत राहिला पाहिजे.’ अगदी त्याच प्रकारे, आपल्यालादेखील जेव्हा एखादा आध्यात्मिक मोती सापडतो, तेव्हा आपण त्यावरच समाधान न मानता आणखी आध्यात्मिक मोती शोधत राहण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे.

१५. काही सत्यांना आपण ‘जुनी’ सत्यं का म्हणू शकतो? आणि सुरवातीला शिकलेल्या सत्यांपैकी कोणतं सत्य तुमच्यासाठी अनमोल आहे?

१५ आपण साक्षीदारांसोबत जेव्हा बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली, तेव्हा आपण काही अनमोल सत्यं शिकलो होतो. आपण त्यांना ‘जुनी’ सत्यं म्हणू या, कारण आपण ती सुरवातीला शिकलो होतो. यांपैकी काही सत्यं कोणती आहेत? आपण शिकलो, की यहोवा देव हाच या विश्वाचा निर्माणकर्ता आहे आणि मानवजातीसाठी त्याचा एक उद्देश आहे. आपण हेदेखील शिकलो, की आपल्याला पाप आणि मृत्यू यांपासून सोडवण्यासाठी देवाने त्याच्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवलं आणि खंडणी बलिदान म्हणून दिलं. यासोबतच आपण हेही शिकलो, की देवाचं राज्य सगळ्या दुःखांचा अंत करेल आणि या पृथ्वीवर आपण एक आनंदी व शांतीपूर्ण जीवन जगू शकतो.—योहा. ३:१६; प्रकटी. ४:११; २१:३, ४.

१६. एखाद्या विषयाबद्दल सुधारित समज दिली जाते, तेव्हा आपल्याला काय करण्याची गरज आहे?

१६ काही वेळा, काही शास्त्रवचनं आणि भविष्यवाण्या यांबद्दलची आपली समज सुधारली जाते. अशा वेळी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांवर मनन करण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. (प्रे. कार्ये १७:११; १ तीम. ४:१५) एखाद्या विषयावरील आपली पूर्वीची समज आणि आताची नवीन समज यात कोणता बदल करण्यात आला आहे, एवढंच जाणून घेणं पुरेसं नाही. तर, त्यातले बारीकसारीक तपशील जाणून घेणंही अत्यंत गरजेचं आहे. काळजीपूर्वक केलेल्या अशा अभ्यासामुळे ही नवीन सत्यं आपल्या आध्यात्मिक खजिन्याचा एक भाग बनतील. पण अशा प्रकारे काळजीपूर्वक अभ्यास करणं आपल्या फायद्याचं का आहे?

१७, १८. देवाचा पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करतो?

१७ येशूने म्हटलं, की शिकलेल्या गोष्टी पुन्हा आठवणीत आणण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. (योहा. १४:२५, २६) यामुळे, इतरांना आनंदाचा संदेश सांगताना आपल्याला कशी मदत होते? पीटर नावाच्या आपल्या एका बांधवाचा अनुभव लक्षात घ्या. १९७० मध्ये १९ वर्षांचे असताना त्यांनी ब्रिटनमधल्या शाखा कार्यालयात सेवा करण्यास सुरवात केली. एकदा घरोघरचं प्रचारकार्य करत असताना, दाढी असलेल्या एका मध्यमवयीन माणसाला ते भेटले. त्यांनी त्या माणसाला विचारलं, की त्याला बायबलविषयी शिकायला आवडेल का? तो मनुष्य खरंतर एक यहुदी धर्मगुरू होता. त्यामुळे पीटरसारखा तरुण मुलगा आपल्याला बायबल शिकवायला आला आहे, हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्या यहुदी धर्मगुरूने पीटरची परीक्षा पाहण्यासाठी त्याला विचारलं: “मुला, आधी मला सांग, बायबलमधलं दानीएलचं पुस्तक कोणत्या भाषेत लिहिलं गेलं होतं?” त्यावर पीटर यांनी लगेच उत्तर दिलं: “दानीएल पुस्तकाचा काही भाग अरामी भाषेत लिहिण्यात आला होता.” आपल्या अनुभवाविषयी सांगताना पीटर पुढे म्हणतात: “मी अचूक उत्तर दिलं, हे पाहून तो यहुदी धर्मगुरू तर चकित झालाच; पण, त्याच्यापेक्षा जास्त मी चकित झालो. मी अचूक उत्तर कसं काय देऊ शकलो हे जाणून घेण्यासाठी, घरी आल्यावर मी गेल्या काही महिन्यांची टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही मासिकं काढली. त्यांत, मला दानीएलचं पुस्तक अरामी भाषेत लिहिण्यात आलं होतं याविषयीचा एक लेख सापडला.” (दानी. २:४) या अनुभवावरून दिसून येतं, की आपण पूर्वी वाचलेल्या आणि आध्यात्मिक भांडारात जतन करून ठेवलेल्या गोष्टी आठवणीत आणून देण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्याला साहाय्य करतो.—लूक १२:११, १२; २१:१३-१५.

१८ यहोवाकडून शिकलेल्या सत्यांबद्दल जर आपल्याला प्रेम आणि कदर वाटत असेल, तर आपल्या आध्यात्मिक भांडारात त्यांची अधिक भर पाडावी अशीच आपली इच्छा असेल. आणि जितकं जास्त आपण आपलं भांडार सत्याच्या मौल्यवान मोत्यांनी भरू, तितकं जास्त आपण इतरांना बायबलचं सत्य शिकवण्यासाठी तयार असू.

तुमचं आध्यात्मिक धन जतन करून ठेवा

१९. आपण आपलं आध्यात्मिक धन का जतन करून ठेवलं पाहिजे?

१९ आपलं आध्यात्मिक धन आपण मौल्यवान का लेखलं पाहिजे, याविषयी आपण या लेखात पाहिलं. पण यासोबतच आपण याचीही काळजी घेतली पाहिजे, की सैतानामुळे आणि त्याच्या दुष्ट जगामुळे आध्यात्मिक धनावर असलेलं आपलं प्रेम कमी होणार नाही. आपण जर काळजी घेतली नाही, तर काही गोष्टींमुळे आपलं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. जसं की, जास्त पगाराची नोकरी, ऐशआरामाचं जीवन जगण्याची इच्छा, किंवा मग आपल्या धनसंपत्तीचा दिखावा. प्रेषित योहानने आपल्याला इशारा दिला, की हे जग आणि त्यातलं सर्वकाही लवकरच नाश होणार आहे. (१ योहा. २:१५-१७) त्यामुळेच आपल्याला मिळालेल्या आध्यात्मिक धनाची आपण कदर बाळगली पाहिजे आणि ते जतन केलं पाहिजे.

२०. तुमचं आध्यात्मिक धन जतन करून ठेवण्यासाठी तुम्ही काय करण्याचा निश्चय केला आहे?

२० देवाच्या राज्यावर असलेलं आपलं प्रेम ज्या गोष्टीमुळे कमी होईल अशा कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यास तयार राहा आणि आवेशानं प्रचार करण्याचा दृढनिश्चय करा. सेवाकार्यावरचं तुमचं प्रेम टिकवून ठेवा. बायबलमधील मौल्यवान सत्यं शोधत राहा. असं केल्याने, तुम्ही स्वर्गात अशी संपत्ती साठवाल, “जी कधीच संपणार नाही, जिथे चोर पोचू शकणार नाही किंवा जिथे तिला कसर लागणार नाही. कारण जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.”—लूक १२:३३, ३४.