व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मतभेद मिटवून तुम्ही शांती प्रस्थापित कराल का?

मतभेद मिटवून तुम्ही शांती प्रस्थापित कराल का?

आपल्या सेवकांनी शांतीचा आनंद घ्यावा अशी यहोवा देवाची इच्छा आहे. तसंच, त्यांनी एकमेकांसोबत शांतीने राहावं अशीही तो अपेक्षा करतो. यहोवाचे सेवक जेव्हा असं करतात, तेव्हा ख्रिस्ती मंडळीत शांती टिकून राहण्यासाठी मदत होते. तसंच, यामुळे अनेक जण मंडळीकडे आकर्षित होतात.

उदाहरणार्थ, मादागास्करमध्ये राहणाऱ्या आणि मंत्रातंत्राच्या साहाय्याने लोकांना बरं करणाऱ्या एका मनुष्याने यहोवाच्या लोकांमध्ये असलेली शांती पाहिली. त्याने विचार केला, ‘मी जर कधी कोणत्या धर्माचा अनुयायी झालो, तर तो हाच धर्म असेल.’ कालांतराने त्याने दुरात्म्यांची उपासना करण्याचं थांबवलं, स्वतःच्या वैवाहिक जीवनात आवश्यक ते बदल केले आणि शांतीचा देव यहोवा, याची तो उपासना करू लागला.

या मनुष्याप्रमाणेच दर वर्षी हजारो लोक ख्रिस्ती मंडळीचा भाग बनत आहेत, आणि त्यांना मनापासून हवी असलेली शांती अनुभवत आहेत. असं असलं, तरी बायबलमध्ये आपण वाचतो, की “तीव्र ईर्ष्या आणि द्वेष” यांमुळे मंडळीमध्ये एकमेकांसोबत असलेले आपले मैत्रिपूर्ण संबंध तुटू शकतात आणि समस्या निर्माण होऊ शकतात. (याको. ३:१४-१६) पण, या गोष्टी आपण कशा टाळू शकतो आणि आपल्या बंधुभगिनींसोबत असलेले आपले शांतीपूर्ण नातेसंबंध कसे मजबूत करू शकतो, याविषयी बायबलमध्ये काही चांगले सल्लेही दिले आहेत. हे सल्ले जीवनात उद्‌भवणाऱ्या काही परिस्थितींमध्ये कसे उपयोगी ठरले, याबद्दल आता आपण पाहू.

समस्या आणि त्यांवर उपाय

“माझ्याबरोबर काम करणाऱ्या एका बांधवासोबत माझं जमत नव्हतं. एकदा जेव्हा आम्ही एकमेकांवर ओरडत होतो, तेव्हा दोन जणांनी आम्हाला पाहिलं.”—क्रिस.

“ज्या बहिणीसोबत सहसा मी प्रचाराला जायचे, तिने अचानक माझ्यासोबत प्रचाराला येणं थांबवलं; तिने माझ्याशी बोलणंही थांबवलं. मला कळलंच नाही तिने असं का केलं?”—जेनेट.

“मी आणि आणखी दोघे जण कॉन्फरंस-कॉलद्वारे फोनवर बोलत होतो. त्यातल्या एकाने गुडबाय म्हटलं. मला वाटलं तो आता लाईनवर नाहीये. म्हणून मग मी त्याच्याविषयी दुसऱ्या व्यक्तीला बरंवाईट सांगू लागलो. पण खरंतर त्या पहिल्या व्यक्तीने फोन कट केलाच नव्हता; त्याने आमचं सगळं बोलणं ऐकलं.”—मायकल.

“आमच्या मंडळीतल्या दोन पायनियर बहिणींचे एकमेकींसोबत मतभेद झाले आणि त्या भांडायला लागल्या. ही गोष्ट मंडळीतल्या इतरांसाठी खूप निराशाजनक होती.”—गॅरी.

वर सांगितलेल्या परिस्थिती कदाचित इतक्या गंभीर वाटणार नाहीत. पण, यांमुळे त्यांत सामील असलेल्या लोकांना कदाचित भावनिक रीत्या फार मोठा त्रास सहन करावा लागला असता. तसंच, त्यांमुळे मंडळीतली शांतीही धोक्यात आली असती. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, या बंधुभगिनींनी बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्यांचं पालन केलं आणि गमावलेली शांती पुन्हा मिळवली. त्यांना बायबलमधील कोणत्या काही तत्त्वांमुळे मदत मिळाली?

“सांभाळा, वाटेने भांडू नका.” (उत्प. ४५:२४) योसेफचे भाऊ आपल्या वडिलांकडे परत जात होते, तेव्हा त्याने त्याच्या भांवांना हा सुज्ञ सल्ला दिला. एखादी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवत नाही आणि लगेच नाराज होते, तेव्हा परिस्थिती आणखीनच चिघळू शकते. तसंच, इतरांनाही राग येऊ शकतो. क्रिसला जाणवलं की नम्रता दाखवणं आणि दिलेल्या सूचनांचं पालन करणं कधीकधी त्याला फार अवघड जातं. त्याला स्वतःमध्ये बदल करायची इच्छा होती. त्यामुळे ज्या बांधवासोबत त्याचं भांडण झालं होतं त्याची त्याने माफी मागितली. त्यानंतरही क्रिस त्याच्या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी मेहनत करत राहिला. तो घेत असलेली मेहनत जेव्हा त्या दुसऱ्या बांधवाने पाहिली, तेव्हा तोही तसंच करण्यास प्रवृत्त झाला. आता ते दोघं आनंदाने मिळून यहोवाची सेवा करतात.

“मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” (नीति. १५:२२) जेनेटच्या मैत्रिणीने तिच्याशी बोलणं थांबवलं, तेव्हा जेनेटने वर दिलेल्या वचनातील तत्त्व लागू करण्याचं ठरवलं. मसलत मिळवण्यासाठी, म्हणजेच त्या बहिणीशी बोलण्यासाठी ती तिच्याकडे गेली. जेनेटने तिला विचारलं, ‘माझं काही चुकलं का?’ एकमेकींशी बोलताना सुरुवातीला त्या दोघींनाही थोडं अवघडल्यासारखं वाटलं. पण त्या शांतपणे बोलत राहिल्यामुळे त्यांना अधिक मोकळं वाटू लागलं. दुखावल्या गेलेल्या बहिणीला समजलं, की काही काळापूर्वी झालेल्या घटनेबद्दल तिचा थोडा गैरसमज झाला होता आणि जेनेटने खरंतर तिला दुखावण्यासारखं काहीही केलं नव्हतं. त्या बहिणीने जेनेटची माफी मागितली. आता त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत आणि मिळून यहोवाची सेवा करत आहेत.

“तू आपलं अर्पण वेदीजवळ आणत असताना, तुझ्या भावाला तुझ्याविरुद्ध काही तक्रार आहे हे तुला आठवलं, तर तुझं ते अर्पण तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जा. आधी आपल्या भावाशी समेट कर.” (मत्त. ५:२३, २४) डोंगरावरील उपदेशात येशूने हा सल्ला दिला होता. फोनवर बोलताना मायकल ज्या बांधवाबद्दल वाईट गोष्टी बोलला होता, त्याबद्दल त्याला नंतर पस्तावा झाला. ही परिस्थिती सुधारण्यासाठी जे काही करणं शक्य आहे, ते करण्याचं त्याने ठरवलं. मायकल त्या बांधवाकडे गेला आणि आपण जे बोललो त्याबद्दल आपल्याला वाईट वाटत असल्याचं त्याने त्याला सांगितलं. मग याचा परिणाम काय झाला? मायकल म्हणतो: “माझ्या बांधवाने मला मनापासून माफ केलं.” मायकल आणि तो बांधव पुन्हा चांगले मित्र बनले.

“कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” (कलस्सै. ३:१२-१४) ज्या दोन पायनियर बहिणी मंडळीमध्ये एकमेकींशी भांडल्या होत्या त्यांच्याबाबतीत काय झालं? मंडळीतल्या एका वडिलांनी प्रेमळपणे त्या दोघींना हे समजण्यास मदत केली, की त्यांच्या भांडणाचा इतरांवर वाईट परिणाम होत आहे. त्यांनी एकमेकींशी धीरानं वागलं पाहिजे याची त्या वडिलांनी त्यांना आठवण करून दिली. तसंच, त्यांनी मंडळीत शांती टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावावा, असंही वडिलांनी सांगितलं. वडिलांनी दिलेला सल्ला त्या बहिणींनी स्वीकारला आणि त्याचं पालन केलं. आता त्या सोबत प्रचार कार्याला जातात आणि एकमेकींसोबत चांगल्या प्रकारे वागतात.

कलस्सैकर ३:१२-१४ या वचनांमध्ये दिलेला सल्ला आपल्यालाही नम्र राहण्यास मदत करतो. तसंच, ज्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं आहे तिला क्षमा करण्यास व झालेल्या गोष्टींवर विचार न करत राहण्यासही ही वचनं आपल्याला मदत करतात. पण समजा, बरेच प्रयत्न करूनही आपण त्या व्यक्तीला क्षमा करू शकत नसलो, तर काय? अशा वेळी, मत्तय १८:१५ मध्ये सांगितलेल्या तत्त्वामुळे आपल्याला मदत होऊ शकते. या वचनात येशू जरी प्रामुख्याने गंभीर स्वरूपाच्या पापाबद्दल बोलत असला, तरी यात जे तत्त्व सांगितलं आहे त्याचं पालन आपण मतभेद होतात तेव्हा करू शकतो. ज्या व्यक्तीसोबत आपले मतभेद झाले आहेत तिच्याशी आपण नम्रपणे आणि प्रेमळपणे बोलून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो.

बायबलमध्ये आपल्याला आणखीनही बरेच व्यावहारिक सल्ले मिळतात. त्यांचा आपल्याला फायदा व्हावा यासाठी आपण स्वतःमध्ये पवित्र आत्म्याचं फळ विकसित करण्याची गरज आहे. “आत्म्याचे फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता, आत्मसंयम.” (गलती. ५:२२, २३) पुढील गोष्टीवर विचार करा. एखाद्या मशीनमध्ये जेव्हा ऑइल घातलं जातं, तेव्हा ती चांगल्या रीतीने काम करते. अगदी त्याच प्रकारे, जेव्हा आपण हे गुण दाखवतो, तेव्हा मतभेद सोडवण्यासाठी आणि इतरांसोबत चांगले नातेसंबंध ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते.

वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांमुळे मंडळीची सुंदरता वाढते

प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. प्रत्येकाचे गुण, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भावना व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असते. यांमुळे एकमेकांसोबत असलेले आपले नातेसंबंध अधिक आनंददायी आणि रोचक होतात. पण यासोबतच, वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं असल्यामुळे आपल्यामध्ये मतभेद, गैरसमज आणि भांडणंदेखील होऊ शकतात. हे कसं घडू शकतं, याबद्दल एक उदाहरण देताना मंडळीतील एक अनुभवी वडील सांगतात: “लाजाळू स्वभाव असलेल्या व्यक्तीला दिलखुलास आणि अतिउत्साही व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीसोबत जुळवून घेणं थोडं कठीण जाऊ शकतं. दोघांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये असलेला हा फरक स्वाभाविक वाटू शकतो. पण, त्यामुळे त्या दोघांमध्ये मोठ्या समस्याही निर्माण होऊ शकतात.” मग, दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती कधीही एकमेकांचे चांगले मित्र बनू शकत नाहीत, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्‍नाचं उत्तर देण्याआधी, दोन प्रेषितांच्या उदाहरणांवर विचार करा. प्रेषित पेत्र हे नाव जेव्हा आपल्या समोर येतं, तेव्हा कदाचित आपल्या डोळ्यांसमोर एक अशी व्यक्ती येते, जी नेहमी तिच्या मनात काय आहे हे पटकन बोलून दाखवते. याउलट, जेव्हा आपण प्रेषित योहानचा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर अशा एका व्यक्तीचं चित्र येतं, जी प्रेमळ आहे आणि कोणतीही गोष्ट बोलण्याआधी किंवा करण्याआधी सहसा त्यावर विचार करते. पण बायबल आपल्याला सांगतं, की त्या दोघांनी सोबत मिळून यहोवाची सेवा केली. (प्रे. कार्ये ८:१४; गलती. २:९) आज आपल्याबाबतीतही ही गोष्ट खरी ठरू शकते. अगदी भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या दोन ख्रिस्ती व्यक्तींनाही सोबत मिळून काम करणं शक्य आहे.

पण समजा, एखाद्या बांधवाने किंवा बहिणीने तुम्हाला राग किंवा चीड येईल अशी एखादी गोष्ट केली, तर काय? अशा वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, ती म्हणजे ज्या प्रकारे ख्रिस्ताने तुमच्यासाठी बलिदान दिलं आहे, त्याच प्रकारे त्याने त्या बांधवासाठी किंवा बहिणीसाठीही बलिदान दिलं आहे. आणि त्या बांधवाला किंवा बहिणीला आपण ख्रिस्ती प्रेम दाखवावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (योहा. १३:३४, ३५; रोम. ५:६-८) त्या व्यक्तीसोबत असलेली मैत्री तोडण्याऐवजी आणि तिला टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, स्वतःला पुढील प्रश्न विचारा: ‘त्या बांधवाने किंवा बहिणीने यहोवाच्या नियमांविरुद्ध काही केलं आहे का? त्याने किंवा तिने मुद्दामहून मला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे का, की ही गोष्ट फक्त आमच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांमुळे निर्माण झाली आहे? आणि त्या व्यक्तीमध्ये असे काही चांगले गुण आहेत का, जे माझ्यामध्येही असावेत असं मला वाटतं?’

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला खूप बोलायला आवडत असेल, पण तुम्हाला मात्र शांत बसायला आवडत असेल. मग अशा व्यक्तीसोबत प्रचाराला जाऊन तिच्याकडून काय शिकता येईल, हे तुम्ही पाहू शकता का? किंवा जर ती व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक उदार मनाची असेल, तर वयस्कर लोकांना, आजाऱ्यांना किंवा गरजू लोकांना मदत केल्यामुळे मिळणारा आनंद तुम्ही तिच्या चेहऱ्यावर पाहिला आहे का? उदार मनोवृत्ती दाखवण्याच्या बाबतीत तुम्ही त्या व्यक्तीकडून काही शिकू शकता का? ही उदाहरणं देण्यामागचा मुद्दा हा आहे, की तुमचं आणि इतर बंधुभगिनींचं व्यक्तिमत्त्व जरी वेगवेगळं असलं, तरी तुम्ही त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करू शकता. ते कदाचित तुमचे सर्वांत चांगले मित्र बनणार नाहीत, पण त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्यातले नातेसंबंध अधिक जवळचे होतील यात शंका नाही. आणि यामुळे तुम्हाला आणि मंडळीलाही शांती मिळेल.

पहिल्या शतकातील युवदीया आणि सुंतुखे या दोन बहिणींचं उदाहरण घ्या. त्या दोघींचीही व्यक्तिमत्त्वं फार वेगळी होती असं दिसतं. पण प्रेषित पौलने त्यांना उत्तेजन दिलं, की “प्रभूमध्ये एक मनाचे असा.” (फिलिप्पै. ४:२) बंधुभगिनींसोबत मिळून यहोवाची सेवा करण्याची आणि मंडळीत शांती प्रस्थापित करण्याची आपलीही इच्छा असली पाहिजे.

मतभेद लवकरात लवकर मिटवा

इतरांबद्दल असलेले नकारात्मक विचार मनातून लवकरात लवकर काढून टाकणं का गरजेचं आहे? नकारात्मक विचारांची तुलना आपण सुंदर फुलांच्या बागेतल्या जंगली गवताशी करू शकतो. गवत उपटून टाकलं नाही, तर लवकरच ते संपूर्ण बागेमध्ये पसरून जाईल व बागेला खराब करेल. त्याचप्रमाणे, इतरांबद्दल असलेले नकारात्मक विचार आपल्या मनात मुळावले, तर संपूर्ण मंडळीच्या शांतीवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. पण, यहोवा देवावर आणि आपल्या बंधुभगिनींवर जर आपलं प्रेम असेल, तर मंडळीतली शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण होताहोईल तितके प्रयत्न करू.

आपण इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे किती उत्तम परिणाम घडून येतात, हे पाहून कदाचित आपल्यालाच आश्चर्य वाटेल

आपण जेव्हा इतरांसोबत शांती राखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे किती उत्तम परिणाम घडून येतात, हे पाहून कदाचित आपल्यालाच आश्चर्य वाटेल. एका साक्षीदार बहिणीला जो अनुभव आला, त्याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “मंडळीतली एक बहीण माझ्याशी अशी वागत होती जशी काय मी लहान मूलच आहे. मला ते बिलकूल आवडत नव्हतं आणि मला त्या गोष्टीची चीडही यायची. माझी चीड वाढत गेली, तसं माझं तिच्याशी बोलणंही कमी होत गेलं. मी तिच्याशी फक्त गरजेपुरतंच बोलायचे. मी विचार केला, ‘ती माझा आदर करत नाही, म्हणून मीही तिचा आदर करणार नाही.’”

पण नंतर या बहिणीने स्वतःच्या वागण्याचं परीक्षण केलं. ती म्हणते: “मला स्वतःमध्ये असलेल्या अनेक चुका दिसू लागल्या आणि त्यामुळे मी निराश झाले. मला जाणवलं की मला स्वतःच्या विचारांमध्ये बदल करण्याची गरज आहे. मग मी यहोवाकडे प्रार्थना केली. तसंच मी त्या बहिणीसाठी एक लहानसं गिफ्ट आणलं आणि तिची क्षमा मागण्यासाठी मी तिला एक कार्डही दिलं. आम्ही एकमेकींना मिठी मारली आणि झालेला प्रकार विसरण्याचं ठरवलं. त्यानंतर आजवर आमच्यामध्ये कधीही मतभेद झाले नाहीत.”

जीवनात सर्वांनाच शांती हवी असते. पण, असुरक्षिततेच्या भावनेमुळे किंवा गर्विष्टपणामुळे लोक अशा रीतीने वागतात ज्यामुळे शांतता भंग होते. जगामध्ये अशा प्रकारची मनोवृत्ती सर्रास पाहायला मिळते. पण यहोवा त्याच्या सेवकांकडून एका वेगळ्या मनोवृत्तीची अपेक्षा करतो. आपल्या सेवकांनी शांतीने आणि ऐक्याने राहावं अशी तो अपेक्षा करतो. यहोवाने पौलला असं लिहिण्यास प्रेरीत केलं, की “तुम्हाला बोलावण्यात आले असल्यामुळे, देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असे चाला.” ख्रिश्चनांना प्रोत्साहन देताना पौल पुढे म्हणाला: “नेहमी नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून प्रेमाने एकमेकांचे सहन करा. तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात, पवित्र आत्म्यामुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा.” (इफिस. ४:१-३) आज यहोवाच्या लोकांमध्ये जी “एकता” पाहायला मिळते ती खूप मौल्यवान आहे. म्हणूनच, आपसातील मतभेद मिटवून आपली एकता वाढवण्यासाठी आपण प्रत्येक जण होता होईल ते प्रयत्न करू या.