व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘धन्य तुझा समंजसपणा!’

‘धन्य तुझा समंजसपणा!’

वरील शब्द, प्राचीन इस्राएलच्या काळातील दावीदने त्याला भेटलेल्या एका स्त्रीची स्तुती करण्यासाठी उद्‌गारले होते. त्या स्त्रीचं नाव होतं अबीगईल. कोणत्या कारणामुळे दावीदने तिची स्तुती केली, आणि अबीगईलच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

दावीद आपला जीव वाचवण्यासाठी शौल राजापासून पळ काढत असताना त्याला ही स्त्री भेटली होती. तिचा विवाह नाबाल नावाच्या एका श्रीमंत पुरुषाशी झाला होता. यहुदाच्या दक्षिण भागातील डोंगराळ प्रदेशात त्याचे अनेक मोठे कळप होते. तिथे दावीद आणि त्याच्या माणसांनी नाबालच्या मेंढपाळांचं आणि कळपांचं एका “तटबंदीसारखे” रक्षण केलं होतं. पुढे दावीदने आपल्या माणसांना नाबालकडं पाठवलं आणि अन्नसामग्री म्हणून जमेल ते देण्याची त्याला विनंती केली. (१ शमु. २५:८, १५, १६) दावीद आणि त्याच्या माणसांनी नाबालसाठी जे काही केलं होतं ते विचारत घेता, दावीदने केलेली ही मागणी फार मोठी नव्हती.

नाबाल या नावाचा अर्थ “अक्कलशून्य” किंवा “मूर्ख” असा आहे आणि नाबाल अगदी आपल्या नावासारखाच होता. त्याने उद्धट आणि अपमानास्पद रीतीने दावीदची विनंती धुडकावून लावली. नाबालच्या या दुष्टपणामुळे आणि अविचारी प्रतिक्रियेमुळे, दावीद त्याच्यावर हल्ला करायला निघाला. नाबालच्या मूर्खपणाची, त्याला आणि त्याच्या घराण्याला मोठी किंमत मोजावी लागणार होती.—१ शमु. २५:२-१३, २१, २२.

दावीद रागाच्या भरात जे काही करायला निघाला होता, त्याचे किती भयंकर परिणाम होतील हे ओळखून अबीगईल धैर्याने मधे पडली. यहोवासोबत असलेल्या दावीदच्या नातेसंबंधाच्या आधारावर तिने आदरपूर्वक त्याला विनवणी केली. इस्राएलचा भावी राजा दावीद आणि त्याच्या माणसांना तिने भरपूर अन्नसामग्री पुरवली. आणि दावीदनेही हे मान्य केलं, की यहोवाने अबीगईलचा उपयोग करून आपल्याला मोठा रक्तपात करण्यापासून आणि त्याच्यासमोर अपराधी ठरण्यापासून वाचवलं होतं. दावीद अबीगईलला म्हणाला: “धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! [“समंजसपणाची,” NW] तू स्वतः धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहे.”—१ शमु. २५:१८, १९, २३-३५.

या अहवालावरून आपल्याला हे दिसून येतं, की आपण कृतज्ञता न दाखवणाऱ्या नाबालसारखं कधीही होऊ नये. याउलट, आपल्यासाठी कोणी काही चांगलं केलं तर आपण त्याची कदर केली पाहिजे. तसंच, काहीतरी चुकीचं घडणार असल्याचं आपल्या लक्षात येतं, तेव्हा समजबुद्धी दाखवून ते टाळण्यासाठी आपण योग्य पाऊल उचललं पाहिजे. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपणसुद्धा देवाला विनवणी करू शकतो: “विवेक [“समंजसपणा,” NW] व ज्ञान मला दे.”—स्तो. ११९:६६.

कदाचित आपण आपल्या कार्यांतून दाखवत असलेली बुद्धी किंवा समंजसपणा इतरांच्या लक्षात येईल. ते ही गोष्ट बोलून दाखवोत अगर न दाखवोत, पण त्यांनाही दावीदप्रमाणे नक्कीच वाटेल, जो म्हणाला: ‘धन्य तुझा समंजसपणा!’