व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो”

“तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो”

“परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.”—स्तो. ३७:४.

गीत क्रमांक: ११, ४४

१. तरुणांनी काय करणं गरजेचं आहे? आणि असं करताना भीती वाटू नये म्हणून कोणती गोष्ट त्यांना मदत करेल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

तरुणांनो, तुम्ही नक्कीच या गोष्टीशी सहमत व्हाल, की कोणताही प्रवास सुरू करण्याआधी कुठं जायचं हे ठरवणं सुज्ञपणाचं आहे. जीवनसुद्धा एक प्रवासच आहे; आणि जीवनाच्या या प्रवासात आपल्याला कुठं जायचं आहे याची तरुण असतानाच योजना करणं गरजेचं आहे. अर्थात, असं करणं सोपं नाही. हेथर नावाची एक बहीण म्हणते: “पुढचं संपूर्ण आयुष्य आपण काय करणार आहोत हे ठरवताना खूप भीती वाटते.” तुम्हालाही जर या बहिणीसारखंच वाटत असेल, तर यहोवा तुम्हाला काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो: “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.”—यश. ४१:१०.

२. आनंदी भविष्यासाठी तुम्ही सुज्ञपणे योजना करावी असं यहोवाला वाटतं हे कशावरून म्हणता येईल?

यहोवा तुम्हाला भविष्यासाठी सुज्ञपणे योजना करण्याचं उत्तेजन देतो. (उप. १२:१; मत्त. ६:२०) तुम्ही आनंदी राहावं असं त्याला वाटतं. यहोवाने जे काही निर्माण केलं आहे ते आपण पाहतो, ऐकतो आणि अनुभवतो त्यावरून हे स्पष्ट होतं. पण, यहोवा इतर मार्गांनीही आपली काळजी घेतो. तो आपल्याला सल्ला देतो आणि जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं हे शिकवतो. त्यामुळे, लोक जेव्हा त्याचा सल्ला नाकारतात तेव्हा त्याला वाईट वाटतं. त्याचं मार्गदर्शन नाकारणाऱ्या लोकांना तो म्हणतो: “जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले. . . . पाहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजित व्हाल; पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील.” (यश. ६५:१२-१४) खरंच, जीवनात आपण सुज्ञ निर्णय घेतो तेव्हा यहोवाच्या नावाचा गौरव होतो.—नीति. २७:११.

तुम्हाला आनंद मिळेल अशा योजना करा

३. यहोवा तुम्हाला कशा प्रकारच्या योजना करण्याचं उत्तेजन देतो?

यहोवा तुम्हाला कशा प्रकारच्या योजना करण्याचं उत्तेजन देतो? यहोवाने आपल्या सर्वांना अशा प्रकारे निर्माण केलं आहे, की त्याला ओळखण्याद्वारे आणि त्याची सेवा करण्याद्वारे आपल्याला आनंद मिळेल. (स्तो. १२८:१; मत्त. ५:३) प्राण्यांचा विचार करा. ते फक्त खातात, पितात आणि संततीला जन्म देतात. पण, तुमचं जीवन आनंदी आणि उद्देशपूर्ण असावं असं यहोवाला वाटतं. आणि यासाठी तुम्ही योजना करावी अशी त्याची इच्छा आहे. तुमचा निर्माणकर्ता यहोवा, हा एक ‘प्रेमळ’ व “आनंदी” देव आहे. त्याने मनुष्याला त्याच्या ‘प्रतिरूपात’ निर्माण केलं आहे. (२ करिंथ. १३:११; १ तीम. १:११; उत्प. १:२७) त्यामुळे तुम्ही जर यहोवाचं अनुकरण केलं तर आनंदी व्हाल. बायबल सांगतं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्ये २०:३५) हे तुम्हीसुद्धा अनुभवलं असेलच, नाही का? खरंतर, जीवनातलं हे मूलभूत सत्य आहे. याचाच अर्थ, तुम्ही यहोवावर आणि इतरांवर असलेल्या तुमच्या प्रेमाच्या आधारावर जीवनासाठी योजना करावी असं यहोवाला वाटतं.—मत्तय २२:३६-३९ वाचा.

४, ५. येशूला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळाला?

येशू ख्रिस्ताने तुम्हा तरुणांसाठी एक अप्रतिम उदाहरण मांडलं आहे. देवाचं वचन म्हणतं, की “हसण्याचा समय” व “नृत्य करण्याचा समय असतो.” (उप. ३:४) लहान असताना येशू आपल्या मित्रांसोबत खेळला असेल आणि त्यांच्यासोबत त्याने मजा केली असेल यात शंका नाही. पण यासोबतच, शास्त्रवचनांचा अभ्यास करण्याद्वारे त्याने यहोवासोबत आपला नातेसंबंधही मजबूत केला. येशू फक्त १२ वर्षांचा होता तेव्हा मंदिरातले गुरूजन “त्याच्या समजबुद्धीमुळे आणि त्याच्या उत्तरांमुळे अगदी थक्क” झाले होते.—लूक २:४२, ४६, ४७.

मोठा झाल्यावर येशूने यहोवाच्या इच्छेनुसार कार्य केलं आणि या गोष्टीतून त्याला आनंद मिळाला. उदाहरणार्थ, येशूने “गरिबांना आनंदाचा संदेश” सांगावा आणि “अंधांची दृष्टी” परत आणावी अशी यहोवाची इच्छा होती. (लूक ४:१८) स्तोत्र ४०:८ मध्ये येशूच्या भावनांचं वर्णन केलं आहे. त्यात म्हटलं आहे: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.” आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल इतरांना शिकवण्यात येशूला आनंद वाटला. (लूक १०:२१ वाचा.) एकदा एका स्त्रीला खऱ्या उपासनेबद्दल सांगितल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेनुसार करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे.” (योहा. ४:३१-३४) येशू आनंदी होता कारण त्याचं देवावर आणि इतरांवर प्रेम होतं. येशूचं अनुकरण केल्यास तुम्हीही आनंदी व्हाल.

६. भविष्यासाठी केलेल्या योजनांबद्दल इतरांशी बोलणं का फायद्याचं आहे?

अनेक ख्रिश्चनांनी तरुण वयातच पायनियर सेवा सुरू केली आहे आणि त्यामुळे ते फार आनंदी आहेत. तेव्हा, भविष्यासाठी केलेल्या योजनांबद्दल तुम्ही या ख्रिश्चनांसोबत बोलू शकता का? नीतिसूत्रे १५:२२ मध्ये म्हटलं आहे: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत [योजना] निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.” तरुण वयात पायनियर सेवा सुरू केलेले हे ख्रिस्ती बंधुभगिनी तुम्हाला कदाचित सांगतील, की पायनियर सेवेतून तुम्ही जे काही शिकाल ते तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. स्वर्गात असताना येशूला आपल्या पित्याकडून खूप काही शिकायला मिळालं. त्यानंतर या पृथ्वीवर सेवाकार्य करत असतानाही तो शिकत राहिला. उदाहरणार्थ, इतरांना राज्याचा संदेश सांगितल्यामुळे, तसंच कठीण परिस्थितींत एकनिष्ठ राहिल्यामुळे आनंद मिळतो हे तो शिकला. (यशया ५०:४ वाचा; इब्री ५:८; १२:२) तुम्हालाही पूर्ण वेळेच्या सेवेमुळे आनंद का मिळू शकतो ते आता आपण पाहू या.

शिष्य बनवण्याचं कार्य हे सर्वात चांगलं कार्य का आहे?

७. अनेक तरुणांना शिष्य बनवण्याच्या कार्यात आनंद का मिळतो?

येशूने आपल्याला आज्ञा दिली, की “लोकांना शिष्य करा” आणि त्यांना शिकवा. (मत्त. २८:१९, २०) त्याने सोपवून दिलेलं हे कार्य तुम्ही तुमचं करियर म्हणून निवडलं, तर तुम्ही एक असं जीवन जगू शकाल ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल आणि देवाच्या नावाचा गौरव होईल. इतर कोणत्याही करियरप्रमाणेच या कार्यातही कुशल होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. तीमोथी नावाच्या आपल्या एका बांधवाने १९ वर्षांचा असताना पायनियर सेवा सुरू केली होती. तो म्हणतो: “मला यहोवाची पूर्णवेळ सेवा करायला आवडतं. कारण त्याच्यावर माझं प्रेम आहे हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. सुरुवातीला माझ्याकडे एकही बायबल अभ्यास नव्हता. पण नंतर जेव्हा मी दुसऱ्या एका क्षेत्रात सेवा करायला गेलो, तेव्हा मला एका महिन्याच्या आत अनेक बायबल अभ्यास मिळाले. त्यातला एक बायबल विद्यार्थी तर सभांनाही हजर राहू लागला. पुढे मी दोन महिन्यांसाठी, अविवाहित बांधवांकरता असलेल्या बायबल प्रशालेला उपस्थित राहिलो. * त्यानंतर मला नवीन नेमणूक मिळाली. तिथेही मला चार बायबल अभ्यास मिळाले. लोकांना बायबल शिकवायला मला खूप आवडतं. कारण, जीवनात बदल करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना कशी मदत करत आहे, हे मला प्रत्यक्ष पाहायला मिळतं.”—१ थेस्सलनी. २:१९.

८. जास्तीत जास्त लोकांना प्रचार करता यावा यासाठी काही तरुणांनी काय केलं आहे?

काही तरुणांनी नवीन भाषा शिकून घेतली आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेत राहणारा जेकब म्हणतो: “मी सात वर्षांचा असताना माझ्या वर्गात व्हियेतनामची अनेक मुलं होती. त्यांना यहोवाबद्दल सांगण्याची माझी खूप इच्छा होती. म्हणून मग, काही काळाने मी त्यांची भाषा शिकण्याचं ठरवलं. बहुतेक वेळा, इंग्रजी आणि व्हियेतनामी टेहळणी बुरूज आवृत्त्यांची तुलना करून मी ही भाषा शिकलो. तसंच, जवळच असलेल्या व्हियेतनामी भाषेच्या मंडळीमध्येही मी काही मित्र बनवले. मग, १८ वर्षांचा असताना मी पायनियर सेवा सुरू केली. पुढे, मी अविवाहित बांधवांसाठी असलेल्या बायबल प्रशालेला उपस्थित राहिलो. यामुळे मला माझ्या आताच्या पायनियर नेमणुकीत खूप मदत झाली आहे. कारण सध्या, एका व्हियेतनामी भाषेच्या गटात मी एकटाच वडील म्हणून सेवा करत आहे. मी व्हियेतनामी भाषा शिकलो हे पाहून अनेक व्हियेतनामी लोकांना फार आश्चर्य वाटतं. ते मला त्यांच्या घरात बोलावतात, आणि बऱ्याच वेळा मी त्यांच्यासोबत बायबल अभ्यासही सुरू करतो. त्यातल्या काही जणांनी एवढी प्रगती केली आहे की लवकरच त्यांचा बाप्तिस्मासुद्धा होईल.”—प्रे. कार्ये २:७, ८ पडताळून पाहा.

९. शिष्य बनवण्याच्या कार्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी शिकायला मिळतात?

शिष्य बनवण्याचं कार्य हे एक चांगलं शिक्षण आहे. उदाहरणार्थ, यामुळे तुम्हाला कामाच्या चांगल्या सवयी लागतात, इतरांशी चांगल्या प्रकारे संवाद कसा साधावा हे कळतं, आणि आत्मविश्वासाने, पण त्याच वेळी विचारपूर्वक कसं वागावं हेही कळतं. (नीति. २१:५; २ तीम. २:२४) पण आपल्याला विशेष आनंद देणारी गोष्ट म्हणजे, समोरच्याला आपला विश्वास शास्त्रवाचनांच्या आधारावर पटवून कसा द्यायचा हे आपण शिकतो. तसंच, आपण यहोवासोबत काम करायलाही शिकतो.—१ करिंथ. ३:९.

१०. आस्था दाखवणारे लोक कमी भेटत असले, तरी तुम्ही शिष्य बनवण्याच्या कार्यात आनंद कसा मिळवू शकता?

१० तुमच्या क्षेत्रात अगदी कमी लोक बायबल अभ्यास घेण्यात आस्था दाखवत असले, तरीसुद्धा शिष्य बनवण्याच्या कार्यात तुम्ही आनंद मिळवू शकता. कारण, या कार्यात खरंतर संपूर्ण मंडळी एकत्र मिळून कार्य करत असते. कधीकधी क्षेत्रात फक्त एका बांधवाला किंवा बहिणीला अशी एखादी व्यक्ती भेटते, जी पुढे जाऊन येशूची शिष्य बनते. पण यामुळे आपल्या सगळ्यांनाच आनंद होतो; कारण या कार्यात आपण सर्वांनीच सहभाग घेतलेला असतो. उदाहरणार्थ, ब्रॅन्डेन या आपल्या बांधवाने नऊ वर्षं अशा एका क्षेत्रात कार्य केलं, जिथे फार कमी लोक बायबल अभ्यासाबद्दल उत्सुकता दाखवायचे. ब्रॅन्डेन म्हणतो: “मला प्रचार करायला आवडतं, कारण हे कार्य आपल्याला यहोवाने करायला सांगितलं आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी लगेचच पायनियर सेवा सुरू केली. मला मंडळीतल्या तरुण बांधवांना प्रोत्साहन द्यायला आणि ते करत असलेली आध्यात्मिक प्रगती पाहायला आवडतं. पुढे अविवाहित बांधवांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहिल्यानंतर, मला पायनियर सेवा करण्याची नवीन नेमणूक मिळाली. नवीन ठिकाणी, मला असा एकही बायबल अभ्यास मिळाला नाही ज्याने बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती केली. पण इतर बांधवांकडे असे बायबल अभ्यास होते. आणि या बांधवांसोबत शिष्य बनवण्याच्या कार्यात मी पूर्णपणे सहभाग घेतला या गोष्टीचा मला आनंद आहे.”—उप. ११:६.

योजना केल्यामुळे पुढे कोणते फायदे होऊ शकतात?

११. यहोवाची सेवा करण्याच्या कोणत्या संधीचा अनेक तरुणांनी अनुभव घेतला आहे?

११ यहोवाची सेवा करण्याच्या खूप संधी आपल्यासमोर आहेत. उदाहरणार्थ, अनेक तरुण बांधकाम प्रकल्पांवर इतर बंधुभगिनींसोबत काम करतात. आज शेकडो नवीन राज्य सभागृहांची गरज आहे. आपली राज्य सभागृहं यहोवाच्या नावाला गौरव देतात. त्यामुळे, राज्य सभागृहांच्या कामात सहभाग घेतल्याने, तसंच बंधुभगिनींसोबत मिळून काम केल्यानेही तुम्हाला आनंद मिळू शकतो. यासोबतच, सुरक्षितपणे उत्तम काम कसं करावं आणि देखरेख करणाऱ्या बांधवांना सहकार्य कसं करावं अशा अनेक गोष्टीही तुम्ही शिकू शकता.

पूर्णवेळेची सेवा करणाऱ्यांना भरपूर आशीर्वाद मिळतात (परिच्छेद ११-१३ पाहा)

१२. पायनियर सेवा केल्याने सेवेच्या कोणत्या नवीन संधी खुल्या होतात?

१२ केविन नावाचा आपला एक बांधव म्हणतो: “लहानपणापासूनच मला यहोवाची पूर्णवेळ सेवा करायची होती. मग, १९ वर्षांचा असताना मी पायनियर सेवा सुरू केली. स्वतःचा खर्च उचलण्यासाठी, मी बांधकामाचा व्यवसाय असलेल्या एका बांधवाकडे अर्धवेळची नोकरी करायचो. तिथं मी खिडक्या, छत आणि दरवाजे बसवायला शिकलो. नंतर, वादळग्रस्त भागांना मदत करणाऱ्या एका टिमसोबत मी काम केलं. त्यांच्यासोबत मी राज्य सभागृह आणि बांधवांची घरं पुन्हा बांधून देण्याच्या कामात मदत केली. नंतर जेव्हा मला समजलं, की दक्षिण आफ्रिकेत बांधकामात मदत करणाऱ्यांची गरज आहे, तेव्हा त्यासाठी मी अर्ज केला आणि मला तिथं बोलावण्यात आलं. इथं आफ्रिकेत, राज्य सभागृहं बांधकामासाठी मी दर काही आठवड्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. बांधकाम प्रकल्पावर असलेले बंधुभगिनी एका कुटुंबाप्रमाणेच आहेत. आम्ही एकत्र राहतो, एकत्र बायबलचा अभ्यास करतो आणि एकत्र काम करतो. नवीन ठिकाणी स्थानिक बांधवांसोबत मिळून प्रचाराला जायला मला आवडतं. लहान असताना मी ज्या योजना केल्या होत्या त्यांमुळे मी आता खरोखर आनंदी आहे; या आनंदाची मी कधी कल्पनाही केली नव्हती.”

१३. बेथेलमध्ये काम करणारे अनेक तरुण आनंदी का आहेत?

१३ पायनियर सेवा केलेले काही जण आज बेथेलमध्ये सेवा करत आहेत. बेथेल सेवा ही फार आनंद देणारी सेवा आहे, कारण इथं आपण जे काही काम करतो ते यहोवासाठी करतो. बायबल व बायबलवर आधारित प्रकाशनं इतरांपर्यंत पोचवण्यास बेथेल कुटुंब मदत करतं. ही प्रकाशनं इतरांना सत्य शिकण्यासाठी मदत करतात. बेथेलगृहात काम करणारा डस्टीन म्हणतो: “मी नऊ वर्षांचा होतो तेव्हाच मी ठरवलं होतं की मी पूर्णवेळेची सेवा करेन. मग शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पायनियर सेवा सुरू केली. याच्या दीड वर्षांनंतर मला बेथेलमध्ये सेवा करायला बोलवण्यात आलं. तिथं मी प्रिंटिंग प्रेस चालवायला आणि नंतर कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग करायला शिकलो. शिष्य बनवण्याच्या कार्यात जगभरात किती वाढ झाली आहे ते बेथेलमध्ये सांगितलं जातं. आणि ते ऐकून खूप आनंद होतो. बेथेलमध्ये आम्ही जे काम करतो त्यामुळे लोकांना यहोवाच्या जवळ यायला मदत होते. त्यामुळे इथं सेवा करायला मला खूप आवडतं.”

भविष्यासाठी तुम्ही कोणत्या योजना कराल?

१४. पूर्णवेळेच्या सेवेसाठी तुम्ही स्वतःला कसं तयार कराल?

१४ पूर्णवेळेच्या सेवेसाठी तुम्ही स्वतःला कसं तयार करू शकता? यहोवाची उत्तम प्रकारे सेवा करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये ख्रिस्ती गुण विकसित करणं गरजेचं आहे. त्यासाठी नियमितपणे बायबलचं वाचन करा, त्यावर खोलवर मनन करा आणि ख्रिस्ती सभांमध्ये स्वतःच्या शब्दांत उत्तर द्या. शालेय शिक्षण घेत असतानाच इतरांना आनंदाचा संदेश सांगण्याद्वारे तुम्ही तुमचं संवादकौशल्य सुधारू शकता. इतरांना विचारपूर्वक प्रश्न विचारण्याद्वारे आणि मग त्यांचं ऐकून घेण्याद्वारे तुम्ही लोकांमध्ये आस्था असल्याचं दाखवू शकता. तसंच, मंडळीमध्येही तुम्ही काही कामं करण्यासाठी पुढे येऊ शकता; जसं की, राज्य सभागृह स्वच्छ करण्यासाठी किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी. जे लोक नम्र आहेत आणि ज्यांना मेहनत करण्याची इच्छा आहे, अशांना आपल्या सेवेत उपयोग करण्यात यहोवाला आनंद होतो. (स्तोत्र ११०:३ वाचा; प्रे. कार्ये ६:१-३) प्रेषित पौलने तीमथ्यला आपल्यासोबत एक मिशनरी म्हणून सेवा करण्यासाठी बोलावलं, कारण “बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे.”—प्रे. कार्ये १६:१-५.

१५. पायनियर सेवा करताना आपल्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१५ पूर्णवेळ सेवा करणाऱ्यांपैकी बऱ्याच बंधुभगिनींना आपल्या गरजा भागवण्यासाठी काम करण्याची गरज असते. (प्रे. कार्ये १८:२, ३) त्यामुळे तुम्ही असा एखादा छोटा-मोठा कोर्स करू शकता, ज्यामुळे तुम्हाला अर्धवेळची नोकरी मिळणं शक्य होईल. या बाबतीत तुम्ही ज्या काही योजना कराल त्यांबद्दल विभागीय पर्यवेक्षकांसोबत किंवा इतर पायनियर बंधुभगिनींसोबत बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. मग, बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ‘तुमची सर्व कार्ये परमेश्वरावर सोपवा म्हणजे तुमचे बेत [योजना] सिद्धीस जातील.’—नीति. १६:३; २०:१८.

१६. पूर्णवेळेची सेवा तुम्हाला भविष्यातल्या इतर जबाबदाऱ्यांसाठी कसं तयार करते?

१६ तुम्ही खातरी बाळगू शकता, की तुम्हाला आनंदी भविष्य मिळावे व ते “घट्ट धरून ठेवता यावे” अशी यहोवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य ६:१८, १९ वाचा.) पूर्णवेळेची सेवा केल्याने आणि अशी सेवा करणाऱ्या बंधुभगिनींसोबत मिळून काम केल्याने, तुम्हाला एक प्रौढ ख्रिस्ती बनण्यास मदत मिळते. तसंच, काही बंधुभगिनींच्या हे लक्षात आलं आहे, की तरुण असतानाच पूर्णवेळेची सेवा केल्यामुळे पुढे त्यांच्या वैवाहिक जीवनातही त्यांना फायदा झाला आहे. सहसा, लग्नाआधी जे बंधुभगिनी पायनियर सेवा करतात ते लग्नानंतरही आपल्या जोडीदारासोबत मिळून पायनियर सेवा सुरू ठेवतात.—रोम. १६:३, ४.

१७, १८. तुम्ही ज्या योजना करता त्यांत तुमचं हृदय कसं गोवलं आहे?

१७ स्तोत्र २०:४ (सुबोधभाषांतर) यहोवाविषयी असं म्हणतं: “तुझ्या हृदयातील इच्छेप्रमाणे तो तुला देवो आणि तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो.” तेव्हा, भविष्यासाठी योजना करताना जीवनात तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा चांगला विचार करा. आज यहोवा काय करत आहे व तुम्ही त्याच्या सेवेत काय करू शकता हे विचारात घ्या, आणि मग यहोवाला आनंद होईल अशा योजना करा.

१८ यहोवाची सेवा करण्यासाठी आणि त्याच्या नावाचा गौरव करण्यासाठी तुम्ही आपलं सर्वोत्तम देता, तेव्हा जीवनात तुम्हाला खरं समाधान आणि आनंद मिळेल. खरोखर, ‘परमेश्वराच्या ठायी तुम्हाला आनंद होईल; तो तुमचे मनोरथ पूर्ण करेल.’—स्तो. ३७:४.

^ परि. 7 आता ही प्रशाला भरवली जात नाही. त्याऐवजी सुवार्तिकांसाठी प्रशाला सुरू करण्यात आली आहे.