व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही धीराने वाट पाहण्यास तयार आहात का?

तुम्ही धीराने वाट पाहण्यास तयार आहात का?

“तुम्हीसुद्धा धीर धरा.”—याको. ५:८.

गीत क्रमांक: ३५, 

१, २. (क) “कोठवर?” असा प्रश्न आपल्याला का पडू शकतो? (ख) प्राचीन काळातल्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणांमुळे आपल्याला प्रोत्साहन कसं मिळतं?

“कोठवर?” असा प्रश्न यशया आणि हबक्कूक या देवाच्या विश्वासू संदेष्ट्यांनी विचारला. (यश. ६:११; हब. १:२) हाच प्रश्न, राजा दावीदने स्तोत्र १३ मध्ये चार वेळा विचारला. (स्तो. १३:१, २) आणि अविश्वासू लोक जेव्हा येशूच्या अवतीभोवती होते, तेव्हा येशूनेही असं विचारलं: “कुठवर?” (मत्त. १७:१७) आज कदाचित आपल्यालाही असाच प्रश्न पडू शकतो.

पण, कोणत्या कारणांमुळे आपल्याला असा प्रश्न पडू शकतो? कदाचित अन्याय, आजारपण, वाढतं वय आणि ‘शेवटच्या दिवसांतील’ ताणतणाव यांमुळे; किंवा मग, आसपासच्या लोकांची चुकीची प्रवृत्ती पाहून निराश झाल्यामुळे आपल्याला असा प्रश्न पडू शकतो. (२ तीम. ३:१) अर्थात, “कोठवर?” असा प्रश्न विचारण्यामागचं कारण कोणतंही असो; एका गोष्टीमुळे मात्र आपल्याला दिलासा मिळतो. ती म्हणजे, असा प्रश्न विचारल्यामुळे यहोवा कधीही प्राचीन काळातल्या त्याच्या सेवकांवर रागावला नाही.

३. कठीण परिस्थितीत कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळू शकते?

कठीण परिस्थितीचा सामना करत असताना कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळू शकते? येशूचा भाऊ याकोब याने देवाच्या प्रेरणेने असं लिहिलं: “माझ्या बांधवांनो, प्रभूच्या उपस्थितीपर्यंत धीर धरा.” (याको. ५:७) त्यामुळे आपल्या सर्वांनाच धीर किंवा सहनशीलता दाखवण्याची गरज आहे. पण, धीर दाखवणं म्हणजे काय? आणि हा सुरेख गुण आपण कसा दाखवू शकतो?

धीर म्हणजे काय?

४, ५. (क) धीर म्हणजे काय, आणि आपण तो कसा दाखवू शकतो? (ख) याकोबने धीर या गुणाबद्दल कसं समजावून सांगितलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

बायबल आपल्याला सांगतं, की “सहनशीलता” किंवा धीर हा गुण देवाच्या पवित्र आत्म्यामुळे उत्पन्न होतो. देवाच्या मदतीशिवाय अपरिपूर्ण मानवांना कठीण परिस्थितीत धीर दाखवणं फार अवघड जाऊ शकतं. धीर ही देवाकडून मिळालेली एक देणगी आहे. आणि आपण जेव्हा हा सुरेख गुण दाखवतो, तेव्हा खरंतर यहोवावर आणि इतरांवर प्रेम असल्याचं दाखवतो. पण याउलट, आपण धीर दाखवत नाही तेव्हा आपसात असलेलं आपलं प्रेम कमी होतं. (१ करिंथ. १३:४; गलती. ५:२२) धीर दाखवण्यात काय सामील आहे? यामध्ये कठीण परिस्थितीचा सामना करत असतानाही सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं सामील आहे. (कलस्सै. १:११; याको. १:३, ४) धीरामुळे आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करताना यहोवाला विश्वासू राहण्यास मदत होते. तसंच, कोणी आपल्याशी वाईट वागलं, तरी जशास तशी वागणूक न देण्यासही या गुणामुळे आपल्याला मदत होते. बायबल म्हणतं की आपण वाट पाहण्याची तयारी दाखवली पाहिजे. हा महत्त्वपूर्ण धडा आपल्याला याकोब ५:७, ८ (वाचा.) या वचनांतून शिकायला मिळतो.

यहोवा त्याची अभिवचनं पूर्ण करेपर्यंत वाट पाहण्याची तयारी दाखवणं का गरजेचं आहे? याकोबने आपली तुलना एका शेतकऱ्याशी केली. शेतकरी बी पेरण्यासाठी खूप मेहनत घेतो. पण हवामान किंवा रोपांची वाढ यांवर तो नियंत्रण ठेवू शकत नाही. शेतकऱ्याला “शेतातील मौल्यवान पिकाची” धीराने वाट पाहावी लागते. आपणही यहोवाची अभिवचनं पूर्ण होण्याची वाट पाहत आहोत. पण असं करत असताना अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. (मार्क १३:३२, ३३; प्रे. कार्ये १:७) त्यामुळे, शेतकऱ्याप्रमाणेच आपल्यालाही धीराने वाट पाहण्याची गरज आहे.

६. मीखा संदेष्ट्याकडून आपल्याला काय शिकायला मिळतं?

आपल्याप्रमाणेच मीखा संदेष्ट्यालाही कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. तो आहाज राजाच्या काळात जगत होता. आहाज हा फार दुष्ट राजा होता. त्यामुळे संपूर्ण देशात खूप भ्रष्टाचार माजला होता. परिस्थिती इतकी वाईट होती, की बायबल म्हणतं लोक “दुष्कर्म जोराने” किंवा सराईतपणे करत होते. (मीखा ७:१-३ वाचा.) मीखा संदेष्ट्याला माहीत होतं की तो ही परिस्थिती बदलू शकत नाही. मग त्याने काय केलं? तो म्हणाला: “मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करेन. मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.” (मीखा ७:७) मीखाप्रमाणेच आज आपल्यालाही परमेश्वराची प्रतीक्षा करण्याची गरज आहे.

७. यहोवा त्याची अभिवचनं पूर्ण करेपर्यंत आपण कशा प्रकारे वाट पाहिली पाहिजे? समजावून सांगा.

आपला विश्वास मीखा संदेष्ट्याप्रमाणे असेल, तर आपणही यहोवाची वाट पाहण्यास तयार असू. आपली स्थिती, मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या कैद्यासारखी नाही. शिक्षेच्या त्या दिवसाची तो उत्सुकतेने वाट पाहत नाही; त्याला ती पाहावी लागते. पण आपल्याबाबतीत मात्र गोष्ट वेगळी आहे. आपण यहोवाची वाट पाहण्यास उत्सुक आहोत. कारण आपल्याला खात्री आहे, की आपल्याला सर्वकाळाचं जीवन देण्यासाठी तो अगदी योग्य वेळी आपलं अभिवचन पूर्ण करेल. त्यामुळे आपण “आनंदाने धीर धरावा.” (कलस्सै. १:११, १२) पण वाट पाहत असताना, यहोवा त्याची अभिवचनं पूर्ण करण्यासाठी लवकर कार्य करत नाही अशी तक्रार आपण करणार नाही. आपण जर असं केलं तर यहोवा नक्कीच खूश होणार नाही.—कलस्सै. ३:१२.

धीर दाखवलेल्या विश्वासू सेवकांची उदाहरणं

८. प्राचीन काळातल्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

यहोवाने प्राचीन काळातल्या विश्वासू सेवाकांना दिलेली अभिवचनं पूर्ण होईपर्यंत, त्या सेवकांनी धीराने वाट पाहिली. त्यांच्या उदाहरणावर मनन केल्यास वाट पाहण्यास आपण अधिक तयार असू. (रोम. १५:४) मनन करत असताना, पुढे दिलेल्या गोष्टींवर विचार करणंही चांगलं ठरेल: त्या विश्वासू सेवकांना किती काळ वाट पाहावी लागली? वाट पाहण्यास ते तयार का होते? आणि धीराने वाट पाहिल्यामुळे यहोवाने त्यांना कोणते आशीर्वाद दिले?

एसाव आणि याकोब या आपल्या नातवंडांचा जन्म होईपर्यंत अब्राहामला बरीच वर्षं वाट पाहावी लागली (परिच्छेद ९, १० पाहा)

९, १०. यहोवाने दिलेलं अभिवचन पूर्ण होण्यासाठी अब्राहाम आणि सारा यांना किती काळ वाट पाहावी लागली?

अब्राहाम आणि सारा यांचं उदाहरण विचारात घ्या. ते “विश्वासाद्वारे आणि धीर धरण्याद्वारे . . . अभिवचनांचे वारसदार” बनले. बायबल आपल्याला सांगतं: “अब्राहामने धीर धरल्यानंतर” यहोवाने त्याला अभिवचन दिलं, की तो आशीर्वादित होईल आणि एका मोठ्या राष्ट्राचा पिता होईल. (इब्री ६:१२, १५) पण, अब्राहामला धीराने वाट पाहण्याची गरज का होती? कारण, देवाने त्याला दिलेलं अभिवचन पूर्ण होण्यासाठी बराच काळ लागणार होता. खरंतर, इ.स.पू. १९४३ निसान १४ याच दिवशी अब्राहाम, सारा आणि त्यांच्या घराण्यातले सर्व लोक फरात नदी पार करून प्रतिज्ञा केलेल्या देशात पोचले. पण त्यानंतरही अब्राहामला, इसहाकचा जन्म होण्यासाठी २५ वर्षं, तर एसाव आणि याकोब या त्याच्या नातवंडांचा जन्म होण्यासाठी आणखी ६० वर्षं वाट पाहावी लागली.—इब्री ११:९.

१० प्रतिज्ञा केलेल्या देशातला किती भाग अब्राहामला मिळाला? बायबल सांगतं: यहोवाने “या देशात त्याला पाऊल ठेवण्याइतकीही जमीन दिली नाही; तर, त्याने हा देश त्याला, आणि त्याच्या वंशजांना देण्याचं वचन दिलं. खरंतर, अजून त्याला मूलबाळ झालेलं नव्हतं.” (प्रे. कार्ये ७:५) अब्राहामने फरात नदी पार केली त्याच्या ४३० वर्षांनंतर त्याचे वंशज एक राष्ट्र बनले; आणि हे वंशज या प्रतिज्ञा केलेल्या देशात राहणार होते.—निर्ग. १२:४०-४२; गलती. ३:१७.

११. अब्राहाम वाट पाहण्यास तयार का होता? आणि यामुळे त्याला कोणते आशीर्वाद मिळाले?

११ अब्राहाम वाट पाहण्यास तयार होता, कारण यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करेल याची त्याला पक्की खात्री होती. यहोवावर त्याचा पूर्ण विश्वास होता. (इब्री लोकांना ११:८-१२ वाचा.) देवाने दिलेली सर्व अभिवचनं अब्राहामने त्याच्या जीवनकाळात पूर्ण होताना पाहिली नाहीत; तरीसुद्धा त्याने आनंदाने वाट पाहिली. नंदनवनात जेव्हा अब्राहामचं पुनरुत्थान होईल तेव्हा त्याला किती आनंद होईल याची कल्पना करा. आपली आणि आपल्या कुटुंबाची जीवनकथा बायबलच्या बऱ्याच भागांत लिहिलेली पाहून त्याला आश्चर्य वाटेल. * तसंच, प्रतिज्ञा केलेल्या मसीहासंबंधी यहोवाच्या संकल्पात आपण महत्त्वाची भूमिका बजावली हेसुद्धा जाणून त्याला किती आनंद होईल! हे सर्व आशीर्वाद विचारात घेता वाट पाहणं योग्य होतं, असं त्याला नक्कीच वाटेल.

१२, १३. योसेफला धीर दाखवण्याची गरज का होती? आणि कशा प्रकारे त्याने सकारात्मक मनोवृत्ती दाखवली?

१२ अब्राहामचा पणतू योसेफसुद्धा धीराने वाट पाहण्यास तयार होता. योसेफवर मोठा अन्याय झाला होता. तो सुमारे १७ वर्षांचा असताना त्याच्याच भावांनी त्याला गुलाम म्हणून विकलं. त्यानंतर, त्याच्यावर असा खोटा आरोप लावण्यात आला, की त्याने मालकाच्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला; त्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं. (उत्प. ३९:११-२०; स्तो. १०५:१७, १८) योसेफ हा देवाचा विश्वासू सेवक होता; तरी असं वाटत होतं, जणू आशीर्वादांऐवजी त्याला शिक्षाच मिळत आहे. पण, १३ वर्षांनंतर मात्र सगळं चित्रच पालटलं. योसेफला तुरुंगातून मुक्त करण्यात आलं आणि तो इजिप्तमध्ये दुसरा सर्वांत मोठा अधिकारी बनला.—उत्प. ४१:१४, ३७-४३; प्रे. कार्ये ७:९, १०.

१३ योसेफवर झालेल्या अन्यायामुळे त्याचं मन कटू झालं का? किंवा, यहोवाने आपल्याला सोडलं आहे असं त्याला वाटलं का? नाही. योसेफने धीराने वाट पाहिली. यासाठी त्याला कशामुळे मदत झाली? यहोवावर असलेल्या त्याच्या विश्वासामुळे त्याला मदत झाली. सर्व परिस्थिती यहोवाच्या नियंत्रणात आहे हे त्याला माहीत होतं. कशावरून आपण असं म्हणू शकतो? तो आपल्या भावांना जे काही म्हणाला त्यावरून. तो त्यांना म्हणाला: “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते.” (उत्प. ५०:१९, २०) खरोखर, यहोवाच्या आशीर्वादांसाठी वाट पाहण्याची तयारी दाखवणं योग्यच आहे हे योसेफने ओळखलं होतं.

१४, १५. (क) दावीदने जो धीर दाखवला तो उल्लेखनीय का होता? (ख) धीराने वाट पाहण्यासाठी दावीदला कशामुळे मदत झाली?

१४ दावीद राजानेही अनेक अन्यायांना तोंड दिलं. दावीद तरुण होता तेव्हा यहोवाने त्याला इस्राएलचा राजा म्हणून निवडलं होतं. पण, स्वतःच्या कुळाचा राजा बनण्यासाठीसुद्धा त्याला १५ वर्षं थांबावं लागलं. (२ शमु. २:३, ४) यादरम्यान काही काळ, शौल राजापासून आपला प्राण वाचवण्यासाठी त्याला पळून जावं लागलं आणि लपावं लागलं. * यामुळे या काळात त्याचं स्वतःचं असं घर नव्हतं. त्याला परक्या देशात किंवा ओसाड प्रदेशातल्या गुहांमध्ये राहावं लागलं. कालांतराने शौलचा एका युद्धात मृत्यू झाला. पण त्यानंतरही दावीदला संपूर्ण इस्राएल राष्ट्राचा राजा बनण्यासाठी जवळजवळ सात वर्षं थांबावं लागलं.—२ शमु. ५:४, ५.

१५ दावीद धीराने वाट पाहण्यास का तयार होता? याचं उत्तर तो आपल्याला त्याच स्तोत्रामध्ये देतो, ज्यामध्ये त्याने चार वेळा “कोठवर?” असा प्रश्न विचारला. या स्तोत्रात दावीद म्हणतो: “मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन.” (स्तो. १३:५, ६) दावीदला माहीत होतं, की यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे आणि तो नेहमी त्याला एकनिष्ठ राहील. यहोवाने गतकाळात आपल्याला कशा प्रकारे मदत केली यावर दावीदने मनन केलं. तसंच, यहोवा त्याच्या समस्यांचा अंत करेल त्या काळाची त्याने आतुरतेनं वाट पाहिली. दावीदला माहीत होतं, की यहोवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांसाठी वाट पाहणं योग्यच आहे.

यहोवा कधीही आपल्याला असं काही करायला सांगत नाही, जे तो स्वतः करायला तयार नाही

१६, १७. धीराने वाट पाहण्याच्या बाबतीत यहोवा आणि येशू यांनी उत्तम उदाहरण कसं मांडलं आहे?

१६ यहोवा कधीही आपल्याला असं काही करायला सांगत नाही, जे तो स्वतः करायला तयार नाही. धीराने वाट पाहण्याच्या बाबतीत त्याने आपल्यासमोर सर्वोत्तम उदाहरण मांडलं आहे. (२ पेत्र ३:९ वाचा.) उदाहरणार्थ, हजारो वर्षांपूर्वी एदेन बागेत सैतानाने यहोवावर अन्यायी असल्याचा खोटा आरोप लावला. यहोवा त्या दिवसाची ‘वाट पाहत’ आहे जेव्हा त्याच्या नावावर लावण्यात आलेला कलंक पूर्णपणे नाहीसा होईल. मग, “जे सर्व त्याची वाट पाहतात” त्यांना अनेक आशीर्वाद मिळतील.—यश. ३०:१८, पं.र.भा.

१७ येशूनेसुद्धा धीराने वाट पाहण्याची तयारी दाखवली. पृथ्वीवर असताना तो मरेपर्यंत यहोवाला विश्वासू राहिला. मग सा.यु ३३ मध्ये त्याने आपल्या बलिदानाचं मोल स्वर्गात यहोवाला सादर केलं. पण त्यानंतरही राज्य सुरू करण्यासाठी त्याला १९१४ पर्यंत थांबावं लागलं. (प्रे. कार्ये २:३३-३५; इब्री १०:१२, १३) आणि पुढे त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होण्यासाठी त्याला त्याच्या हजार वर्षांच्या शासनकाळाच्या शेवटपर्यंत वाट पाहावी लागेल. (१ करिंथ. १५:२५) हा फार मोठा काळ वाटत असला, तरी त्यानंतर मिळणाऱ्या आशीर्वादांसाठी वाट पाहणं चांगलंच ठरेल.

धीराने वाट पाहण्यास कशामुळे मदत होईल?

१८, १९. धीराने वाट पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळेल?

१८ स्पष्टच आहे, की आपण धीर धरावा आणि वाट पाहण्यास तयार असावं अशी यहोवाची अपेक्षा आहे. पण, कोणती गोष्ट धीराने वाट पाहण्यास आपल्याला मदत करेल? त्यासाठी देवाचा पवित्र आत्मा मिळावा म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. लक्षात असू द्या, धीर हा गुण देवाच्या पवित्र आत्म्यामुळे उत्पन्न होतो. (इफिस. ३:१६; ६:१८; १ थेस्सलनी. ५:१७-१९) त्यामुळे यहोवाने आपल्याला धीराने वाट पाहण्यास मदत करावी म्हणून त्याला याचना करा.

१९ यासोबतच, अब्राहाम, योसेफ आणि दावीद यांना यहोवाच्या अभिवचनांची धीराने वाट पाहण्यास कशामुळे मदत झाली हेदेखील लक्षात असू द्या. त्यांना त्यांच्या विश्वासामुळे आणि यहोवावर असलेल्या भरवशामुळे मदत मिळाली. त्यांनी फक्त स्वतःचाच किंवा आपल्याला काय हवं आहे याचा विचार केला नाही. या विश्वासू सेवकांनी दाखवलेल्या धीरामुळे त्यांना जे आशीर्वाद मिळाले त्यांवर मनन केल्याने आपल्यालाही धीराने वाट पाहण्याची प्रेरणा मिळेल.

२०. आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

२० आज आपल्याला समस्यांचा आणि कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत असला, तरी ‘वाट पाहण्याचा’ आपला निर्धार पक्का आहे. काही वेळा आपल्यालाही असा प्रश्न पडेल: ‘हे यहोवा असे कोठवर?’ (यश. ६:११) पण, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने आपणसुद्धा यिर्मया संदेष्ट्याप्रमाणे म्हणू शकतो: “यहोवा माझा वतनभाग आहे” आणि “म्हणून मी त्याची वाट पाहीन.”—विलाप. ३:२१, २४, NW.

^ परि. 11 उत्पत्तिच्या जवळजवळ १५ अध्यायांत आपल्याला अब्राहामच्या जीवनाविषयीचा अहवाल आढळतो. आणि, ग्रीक शास्त्रवचनांचं लिखाण करणाऱ्या लेखकांनी ७० पेक्षा जास्त वेळा अब्राहामचा उल्लेख केला.

^ परि. 14 शौलने जवळजवळ दोन वर्षांपेक्षा थोडा अधिक काळ राज्य केल्यानंतर यहोवाने त्याला नाकारलं. पण, त्याने आणखी ३८ वर्षं, म्हणजे त्याच्या मृत्यू होईपर्यंत राज्य केलं.—१ शमु. १३:१; प्रे. कार्ये १३:२१.