व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”

“सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”

“सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” तुमच्या मनाचे रक्षण करेल.—फिलिप्पै. ४:७.

गीत क्रमांक: ३९, ४७

१, २. फिलिप्पैमध्ये पौल आणि सीला यांच्यासोबत काय घडलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

मध्यरात्रीची वेळ होती. पौल आणि सीला हे दोन मिशनरी, फिलिप्पै शहरातल्या तुरुंगात सर्वात आतल्या आणि मिट्ट काळोख असलेल्या खोलीत बंदिस्त होते. त्यांचे पाय खोड्यांत अडकवले असल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती; आणि काही वेळापूर्वी पाठीवर सोट्यांनी फटके मारण्यात आल्यामुळे त्यांना फार वेदनाही होत होत्या. (प्रे. कार्ये १६:२३, २४) तुरुंगात येण्याआधी त्या दिवशी पौल आणि सीला यांना जमावाने बाजारपेठेत फरफटत नेलं होतं; आणि तिथे घाईघाईत त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. तसंच, त्यांचे कपडे फाडण्यात आले आणि त्यांना सोट्यांनी मार देण्यात आला. (प्रे. कार्ये १६:१६-२२) त्यांच्यावर झालेला हा खरंच किती मोठा अन्याय होता! खरंतर, पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे योग्य प्रकारे खटला चालवल्यानंतरच त्यांनी त्याला दोषी ठरवायला हवं होतं. *

तुरुंगात असताना पौलने कदाचित त्या दिवशी घडलेल्या घटनांचा आणि फिलिप्पैमध्ये राहणाऱ्या लोकांचा विचार केला असेल. पौलने अनेक शहरांना भेटी दिल्या होत्या आणि त्या शहरांमध्ये यहुदी लोकांना उपासनेसाठी जशी सभास्थानं होती, तसं एकही सभास्थान फिलिप्पैमध्ये नव्हतं. त्यामुळे तिथल्या यहुदी लोकांना शहराच्या फाटकांबाहेर जाऊन एका नदीच्या किनाऱ्यावर उपासनेसाठी एकत्र जमावं लागायचं. (प्रे. कार्ये १६:१३, १४) यामागचं कारण काय होतं? सभास्थान असण्यासाठी कमीतकमी दहा यहुदी पुरुष असण्याची गरज होती. मग या शहरात दहा यहुदीसुद्धा राहत नव्हते का? फिलिप्पैमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या रोमी नागरिकत्वाचा खूप गर्व होता. (प्रे. कार्ये १६:२१) त्यामुळेच, यहुदी असलेले पौल आणि सीला हे रोमी नागरिक असावेत असा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नसेल. आपण हे खातरीने म्हणू शकत नसलो, तरी एक गोष्ट मात्र खरी; ती म्हणजे, पौल आणि सीला यांची काही एक चूक नसताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं.

३. तुरुंगात असताना पौलच्या मनात कोणते विचार व प्रश्न आले असतील? (ख) पण त्याने कशी मनोवृत्ती राखली?

तुरुंगात असताना पौलने कदाचित हासुद्धा विचार केला असेल, की आपण फिलिप्पैमध्ये आलो कसे. काही महिन्यांआधी पौल एजियन समुद्राच्या दुसऱ्या बाजूला आशिया मायनरमध्ये होता. तिथे असताना पवित्र आत्म्याने त्याला बऱ्याचदा काही क्षेत्रांत प्रचार करण्यापासून रोखलं होतं. असं वाटत होतं, जणू पवित्र आत्मा त्याला दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मार्गदर्शित करत होता. (प्रे. कार्ये १६:६, ७) पण नेमकं कोणत्या ठिकाणी? त्रोवसमध्ये असताना पौलला एक दृष्टान्त झाला होता. त्यात त्याला मासेदोनियात जाण्यास सांगण्यात आलं होतं. यहोवाची इच्छा स्पष्ट होती! त्यामुळे पौल लगेचच मासेदोनियाला जाण्यास निघाला. (प्रेषितांची कार्ये १६:८-१० वाचा.) पण मासेदोनिया प्रांतातल्या फिलिप्पैमध्ये आल्यानंतर काय झालं? काही काळातच पौलला तुरुंगात जावं लागलं! त्यामुळे पौलच्या मनात कदाचित असे प्रश्न आले असतील, की यहोवाने असं का घडू दिलं? आणि तुरुंगात आपल्याला किती काळ राहावं लागेल? असे प्रश्न पौलच्या मनात आले असले तरी त्याने आपला विश्वास आणि आनंद टिकवून ठेवला. पौल आणि सीला तुरुंगात “प्रार्थना करत होते व गीत गाऊन देवाची स्तुती करत होते.” (प्रे. कार्ये १६:२५) खरोखर, देवाकडून मिळणारी शांती त्यांच्या मनाचं आणि विचारांचं रक्षण करत होती.

४, ५. (क) एखाद्या प्रसंगी आपल्यालाही पौलसारखं का वाटू शकतं? (ख) पौलची परिस्थिती कशी बदलली?

एखाद्या प्रसंगी तुम्हालाही कदाचित पौलसारखं वाटलं असेल. एखादा निर्णय घेण्यासाठी तुम्ही यहोवाकडे मदत मागितली असेल आणि यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला मार्गदर्शन देत असल्याचं तुम्हाला जाणवलंही असेल. पण नंतर मात्र तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असेल किंवा जीवनात अनेक मोठे बदल करावे लागले असतील. (उप. ९:१२) आणि आता जेव्हा तुम्ही त्या प्रसंगाचा विचार करता, तेव्हा तुम्हालाही कदाचित असा प्रश्न पडत असेल, की यहोवाने असं का घडू दिलं? अशा वेळी कोणती गोष्ट तुम्हाला धीर धरण्यास आणि यहोवावर पूर्ण भरवसा ठेवण्यास मदत करेल? पौल आणि सीला यांच्यासोबत नंतर जे काही घडलं त्यावरून आपल्याला या प्रश्‍नाचं उत्तर मिळेल.

तुरुंगात पौल आणि सीला जेव्हा देवाची स्तुती करत गीत गात होते, तेव्हा त्यांनी अपेक्षाही केली नव्हती अशा घटना घडण्यास सुरुवात झाली. प्रथम, तिथं एक मोठा भूकंप झाला आणि तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले. त्यानंतर, सगळ्या कैद्यांचे साखळदंड गळून पडले. आणखी एक गोष्ट म्हणजे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुरुंगाधिकाऱ्याला पौलने तसं करण्यापासून थांबवलं. त्यानंतर त्या तुरुंगाधिकाऱ्याने आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटे, नगर-अधिकाऱ्यांनी पौल आणि सीला यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी काही शिपायांना पाठवलं आणि त्यांना शांतीने शहराबाहेर जाण्यासाठी सांगितलं. पण पौल आणि सीला हे रोमी नागरिक असल्याचं जेव्हा अधिकाऱ्यांना कळलं, तेव्हा आपण किती मोठी चूक केली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर ते स्वतः पौल आणि सीला यांना बाहेर घेऊन जाण्यासाठी आले. पण, शहराबाहेर जाण्यापूर्वी पौल आणि सीला हे नुकताच बाप्तिस्मा घेतलेल्या लुदिया या बहिणीचा निरोप घेण्यासाठी गेले. आणि याच संधीचा फायदा त्यांनी इतर बांधवांनाही प्रोत्साहन देण्यासाठी केला. (प्रे. कार्ये १६:२६-४०) खरंच, सगळं काही किती लवकर बदललं!

“सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती”

६. या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?

या घटनांवरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? हाच की, आपण अपेक्षाही करणार नाही अशा गोष्टी यहोवा घडवून आणू शकतो. त्यामुळे संकटांचा सामना करत असताना आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. हा धडा, पौलच्या मनात अगदी खोलवर रुजला होता. असं आपण का म्हणू शकतो? पौलने फिलिप्पैमधल्या बांधवांना, चिंता न करण्याबद्दल आणि देवाच्या शांतीबद्दल नंतर जे पत्र लिहिलं त्यावरून आपण असं म्हणू शकतो. या लेखात आपण फिलिप्पैकर ४:६, ७ (वाचा.) या वचनांतील पौलच्या शब्दांवर चर्चा करणार आहोत. त्यानंतर, प्राचीन काळातल्या विश्वासू सेवकांनी अपेक्षाही केल्या नव्हत्या अशा घटना यहोवाने कशा प्रकारे घडवून आणल्या, त्याची काही उदाहरणं आपण पाहू. आणि शेवटी, यहोवावर पूर्ण भरवसा ठेऊन संकटांचा धीराने सामना करण्यासाठी ‘देवाकडून मिळणारी शांती’ आपल्याला कशी मदत करू शकते यावर आपण या लेखात चर्चा करू.

७. फिलिप्पैमधल्या बांधवांना लिहिलेल्या पत्रात पौल कोणती गोष्ट शिकवत होता, आणि आपण त्यावरून काय शिकू शकतो?

फिलिप्पैमधल्या बांधवांनी पौलकडून आलेलं पत्र वाचलं, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांना पौलसोबत जे काही घडलं होतं त्याची आठवण झाली असेल. तसंच, यहोवाने अनपेक्षितपणे ज्या घटना घडवून आणल्या होत्या त्यांचीही त्यांना आठवण झाली असेल. पौल आपल्या पत्रातून बांधवांना काय शिकवत होता? तो त्यांना हे शिकवत होता, की त्यांनी कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये, तर प्रार्थना करावी; आणि मग देवाची शांती त्यांना मिळेल. पुढे तो म्हणाला, की देवाची शांती “सर्व समजशक्तीच्या पलीकडे” आहे. याचा काय अर्थ होतो? काही बायबल भाषांतरांनुसार, ही “सर्व स्वप्नांच्या पलीकडे” किंवा “सर्व मानवी योजनांच्या पलीकडे” असलेली शांती आहे. तर मग “सर्व समजशक्तीच्या पलीकडे” असं जे पौल म्हणाला त्याचा असा अर्थ होतो, की आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही इतकी अद्‌भुत “देवाची शांती” आहे. काही वेळा आपल्या समस्यांसाठी आपल्याकडे कोणताही उपाय नसतो, पण यहोवाकडे मात्र सर्व समस्यांवर उपाय आहे. आणि आपण अपेक्षाही करणार नाही अशा प्रकारे तो घटना घडवून आणू शकतो.—२ पेत्र २:९ वाचा.

८, ९. (क) पौल आणि सीला यांना अन्याय सहन करावा लागला, तरी त्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून आले? (ख) पौलने पत्रात लिहिलेल्या गोष्टींवर फिलिप्पैमधले बांधव विश्वास का ठेवू शकत होते?

पौल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, दहा वर्षांदरम्यान ज्या घटना घडल्या त्यांवर विचार केल्यामुळे फिलिप्पैमधल्या बांधवांना नक्कीच बळ मिळालं असेल. पौल आणि सीला यांना अन्याय सहन करावा लागला असला, तरी त्या वेळी झालेल्या घटनांमुळे नंतर “आनंदाच्या संदेशाचे समर्थन” करण्यास व त्या संदेशास “कायदेशीर मान्यता” मिळवून देण्यास मदत झाली होती. (फिलिप्पै. १:७) आता तिथले नगर-अधिकारी नव्याने तयार झालेल्या ख्रिस्ती मंडळीचा छळ करण्याचं धाडस करणार नव्हते. तसंच, पौलने आपण रोमी नागरिक असल्याचा उल्लेख केल्यामुळे कदाचित लूक हा, पौल आणि सीला फिलिप्पैमधून गेल्यानंतरही, तिथे राहिला असेल; आणि नव्याने तयार झालेल्या ख्रिस्ती मंडळीला त्याने आणखी साहाय्य केलं असेल.

फिलिप्पैमधल्या बांधवांनी जेव्हा पौलचं पत्र वाचलं, तेव्हा पत्रात लिहिलेल्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या मनाच्या नाहीत याची त्यांना खातरी होती. कारण, पौलने स्वतः तीव्र छळाचा आणि विरोधाचा सामना केला होता. खरंतर, त्याने फिलिप्पैमधल्या बांधवांना पत्र लिहिलं त्या वेळीही तो रोममध्ये एका घरात कैद होता. पण तरीसुद्धा त्याने दाखवून दिलं, की त्याच्याकडे “देवाची शांती” आहे.—फिलिप्पै. १:१२-१४; ४:७, ११, २२.

“कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका”

१०, ११. चिंतांच्या ओझ्याखाली दबलेले असताना आपण काय केलं पाहिजे? आणि आपण कोणत्या गोष्टीची अपेक्षा करू शकतो?

१० ‘कोणत्याही गोष्टीची चिंता न करण्यास’ आणि ‘देवाकडून मिळणारी शांती’ टिकवून ठेवण्यास आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? पौलने फिलिप्पैमधल्या बांधवांना पत्रात जे लिहिलं होतं त्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते. त्याने लिहिलं की चिंतांवर मात करण्याचा मार्ग म्हणजे प्रार्थना करणं. त्यामुळे आपण जेव्हा चिंतांच्या ओझ्याखाली दबलेले असतो, तेव्हा आपण आपल्या चिंता प्रार्थनेद्वारे यहोवाला कळवल्या पाहिजेत. (१ पेत्र ५:६, ७ वाचा.) प्रार्थना करत असताना पूर्ण खातरी बाळगा की यहोवाला तुमची काळजी आहे. मिळणाऱ्या प्रत्येक आशीर्वादासाठी त्याचे आभार माना. आणि कधीही विसरू नका, की यहोवा “आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रमाणात आपल्यासाठी करू शकतो.”—इफिस. ३:२०.

११ यहोवा आपल्याला मदत करण्यासाठी जे काही करतो, त्यामुळे पौल आणि सीला यांच्याप्रमाणे आपल्यालाही आश्चर्य वाटेल. यहोवा कदाचित एखाद्या अद्‌भुत मार्गाने आपल्याला मदत करणार नाही. पण आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे, ती गोष्ट तो नक्कीच पुरवेल. (१ करिंथ. १०:१३) पण याचा अर्थ, काहीही न करता आपण फक्त हातावर हात धरून बसून राहावं आणि समस्या सोडवण्यासाठी यहोवाची वाट पाहत राहावं असा होत नाही. आपल्या प्रार्थनेनुसार आपण कार्यसुद्धा केलं पाहिजे. (रोम. १२:११) असं केल्याने, आपण प्रामाणिक असल्याचं दाखवून देतो आणि आपल्याला आशीर्वाद देण्याची संधीही यहोवाला देतो. आपण जे मागतो किंवा अपेक्षा करतो, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त देण्यास यहोवा समर्थ आहे, ही गोष्ट आपण कधीही विसरू नये. कधीकधी तर, अनपेक्षित मार्गाने आपल्या प्रार्थनेचं उत्तर देऊन तो आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देतो! आपण अपेक्षाही न केलेल्या गोष्टी करण्यास यहोवा समर्थ आहे, याची काही उदाहरणं आता आपण पाहू. यामुळे त्याच्यावरचा आपला भरवसा आणखी पक्का होईल.

यहोवाने अनपेक्षित घटना घडवून आणल्याची उदाहरणं

१२. (क) सन्हेरीबने यरुशलेमवर चढाई केली तेव्हा हिज्कीयाने काय केलं? (ख) यहोवाने ज्या प्रकारे समस्या सोडवली त्यावरून आपण काय शिकतो?

१२ यहोवाने अनपेक्षित घटना घडवून आणल्याची अनेक उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, हिज्कीया यहूदाचा राजा होता, तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यरुशलेम सोडून यहूदाची सगळी नगरं काबीज केली. (२ राजे १८:१-३, १३) त्यानंतर तो यरुशलेमवर चढाई करण्यास आला. मग हिज्कीयाने काय केलं? प्रथम, हिज्कीयाने यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली आणि यहोवाचा संदेष्टा यशया याच्याकडे सल्ला मागितला. (२ राजे १९:५, १५-२०) तसंच, सन्हेरीबने त्याच्यावर लादलेली दंडाची रक्कमही त्याने चुकती केली; असं करण्याद्वारे हिज्कीयाने समंजसपणा दाखला. (२ राजे १८:१४, १५) यासोबतच, शहराभोवती असलेला शत्रूंचा वेढा जास्त काळ राहण्याची शक्यता ओळखून त्याने पुरेशी तयारी केली. (२ इति. ३२:२-४) मग, या परिस्थितीचा अंत कसा झाला? यहोवाने एका स्वर्गदूताला पाठवून सन्हेरीबचे १ लाख ८५ हजार सैनिक एका रात्रीत ठार मारले. खरंतर, असं काही होईल याची हिज्कीयाने कल्पनासुद्धा केली नव्हती!—२ राजे १९:३५.

उत्पत्ति ४१:४२ मध्ये सांगितल्याप्रमाणे योसेफसोबत घडलेल्या घटनांवरून आपण काय शिकतो? (परिच्छेद १३ पाहा)

१३. (क) योसेफसोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकतो? (ख) साराच्या बाबतीत कोणती अनपेक्षित गोष्ट घडली?

१३ तरुण योसेफच्या बाबतीत काय घडलं याकडेही लक्ष द्या. इजिप्तच्या तुरुंगात असताना त्याने कधी विचारही केला नसेल, की पुढे आपण राजाच्या खालोखाल असलेले सगळ्यात मोठे अधिकारी होऊ; किंवा दुष्काळापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी यहोवा आपला उपयोग करेल. (उत्प. ४०:१५; ४१:३९-४३; ५०:२०) योसेफने अपेक्षाही केली नव्हती अशा रीतीने यहोवाने कार्य केलं, यात काही शंका नाही. योसेफची पणजी (वडिलांची-आजी) सारा हिचासुद्धा विचार करा. यहोवा आपल्याला, दासीच्या पोटी जन्मलेला मुलगा नाही तर आपला स्वतःचा मुलगा देईल, अशी वयोवृद्ध साराने कधी अपेक्षासुद्धा केली नसेल. खरंतर इसहाकचा जन्म हा साराच्या अपेक्षा आणि कल्पना यांच्याही पलीकडचा होता.—उत्प. २१:१-३, ६, ७.

१४. आपण कोणती खातरी बाळगू शकतो?

१४ नवीन जग येण्याअगोदर, यहोवा आपल्या सगळ्या समस्या चमत्कारिक रीतीने काढून टाकेल अशी अपेक्षा आपण करत नाही. आणि यहोवाने आपल्या जीवनात विलक्षण किंवा अद्‌भुत असं काहीतरी करावं अशीही अपेक्षा आपण करत नाही. पण, प्राचीन काळात यहोवाने आपल्या सेवकांना किती जबरदस्त मार्गांनी मदत केली हे आपल्याला माहीत आहे; आणि यहोवा आजही बदललेला नाही. (यशया ४३:१०-१३ वाचा.) हे माहीत असल्यामुळेच त्याच्यावरचा आपला भरवसा आणखी पक्का होतो. यहोवाची इच्छा पूर्ण करता यावी यासाठी यहोवा आपल्याला बळ देईल याची खातरी आपण बाळगू शकतो. (२ करिंथ. ४:७-९) हिज्कीया, योसेफ आणि सारा यांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकतो? हेच, की आपण यहोवाला एकनिष्ठ राहतो, तेव्हा अगदी कठीण प्रसंगांतही तो आपल्याला मदत करतो.

आपण यहोवाला एकनिष्ठ राहतो, तेव्हा अगदी कठीण प्रसंगांतही तो आपल्याला मदत करतो

१५. कठीण प्रसंगांतही आपल्याला “देवाची शांती” कशी मिळू शकते? आणि हे कशामुळे शक्य आहे?

१५ कठीण प्रसंगांतही आपल्याला “देवाची शांती” कशी मिळू शकते? त्यासाठी यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आपण मजबूत ठेवला पाहिजे. असा नातेसंबंध येशू ख्रिस्ताने दिलेल्या खंडणी बलिदानामुळेच शक्य आहे. खरंतर, खंडणी बलिदान हे यहोवाच्या अनेक अद्‌भुत कार्यांपैकी एक आहे. त्याच्या आधारावर यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो. तसंच, आपण शुद्ध विवेक बाळगू शकतो आणि यहोवाच्या अधिक जवळ जाऊ शकतो.—योहा. १४:६; याको. ४:८; १ पेत्र ३:२१.

‘देवाची शांती तुमच्या मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल’

१६. आपल्याला “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” मिळते तेव्हा काय होतं? स्पष्ट करा.

१६ आपल्याला “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” मिळते तेव्हा काय होतं? बायबल सांगतं, की ही शांती आपल्या मनाचं आणि बुद्धीचं “रक्षण” करते. (फिलिप्पै. ४:७) या वचनात, “रक्षण” यासाठी मूळ भाषेत जो शब्द वापरला आहे, तो सैन्य दलातल्या अशा एका गटाला सूचित करतो ज्याला शहराचं रक्षण करण्यासाठी नेमलं जायचं. फिलिप्पैमध्ये राहणाऱ्या लोकांचं संरक्षण अशाच गटाद्वारे केलं जायचं. त्यामुळे या शहरातले लोक रात्री निश्चिंतपणे झोपू शकत होते. अगदी त्याच प्रकारे, जेव्हा आपल्याकडे “देवाची शांती” असते, तेव्हा आपल्याला कोणतीही चिंता सतावत नाही; आणि आपलं मन शांत राहते. आपल्याला माहीत आहे की यहोवाला आपली काळजी आहे. तसंच, आपण एक आनंदी जीवन जगावं अशीही त्याची इच्छा आहे. (१ पेत्र ५:१०) आणि हीच जाणीव आपल्याला, चिंतांखाली दबून न जाण्यास आणि खचून न जाण्यास मदत करते.

१७. मोठ्या संकटादरम्यान कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला यहोवावर भरवसा ठेवण्यास मदत मिळेल?

१७ लवकरच सर्व मानवजातीवर मोठं संकट येईल. (मत्त. २४:२१, २२) त्या वेळी, वैयक्तिक रीत्या आपल्यासोबत काय होईल हे आपण सांगू शकत नाही. पण त्याची अनावश्यक चिंता करण्याची गरज नाही. त्या वेळी यहोवा नेमकं काय करेल हे आपल्याला माहीत नाही, पण आपण यहोवाला अगदी जवळून ओळखतो. प्राचीन काळातल्या उदाहरणांवरून आपल्याला हे समजतं, की परिस्थिती कशीही असली तरी यहोवा आपला संकल्प नक्कीच पूर्ण करेल. आणि कदाचित आपण अपेक्षाही करणार नाही अशा मार्गांनी तो हे करेल! म्हणूनच, आज यहोवा आपल्यासाठी ज्या-ज्या वेळी काही करतो, त्या-त्या वेळी एका नवीन मार्गाने आपल्याला “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती” अनुभवायला मिळते.

^ परि. 1 अहवालावरून असं दिसतं की सीला हासुद्धा कदाचित रोमी नागरिक असावा.—प्रे. कार्ये १६:३७.