व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करून कसं ठेवू शकतो?

आपण नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करून कसं ठेवू शकतो?

“नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करा.”—कलस्सै. ३:१०.

गीत क्रमांक: ४३, २७

१, २. (क) आपल्याला नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करणं शक्य आहे असं का म्हणता येईल? (ख) कलस्सैकर ३:१०-१४ या वचनांत, नवीन व्यक्तिमत्त्वाचा भाग असलेल्या कोणत्या गुणांचा उल्लेख करण्यात आला आहे?

पवित्र शास्त्राचे नवे जग भाषांतर यात ‘नवीन व्यक्तिमत्त्वाचा’ दोन वेळा उल्लेख करण्यात आला आहे. (इफिस. ४:२४; कलस्सै. ३:१०) नवीन व्यक्तिमत्त्व म्हणजे असे व्यक्तिमत्त्व जे “देवाच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेले” असते. पण, नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करणं आपल्याला शक्य आहे का? नक्कीच. यहोवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलं आहे; त्यामुळे, त्याच्या सुरेख गुणांचं अनुकरण करणं आपल्याला शक्य आहे.—उत्प. १:२६, २७; इफिस. ५:१.

हे खरं आहे, की वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे काही वेळा आपल्या सर्वांच्याच मनात चुकीच्या इच्छा निर्माण होऊ शकतात. शिवाय, सभोवतालच्या परिस्थितीचासुद्धा आपल्यावर परिणाम होत असतो. पण यहोवाच्या दयेमुळे व मदतीमुळे, त्याला आवडेल अशी व्यक्ती बनणं आपल्याला शक्य आहे. अशी व्यक्ती बनण्याचा पक्का निर्धार करण्यासाठी आपण नवीन व्यक्तिमत्त्वाचा भाग असलेल्या काही गुणांवर आता चर्चा करू. (कलस्सैकर ३:१०-१४ वाचा.) त्यानंतर, हे गुण आपण आपल्या सेवाकार्यात कसे दाखवू शकतो तेही आपण पाहू.

“तुम्ही सर्वजण एक आहात”

३. नवीन व्यक्तिमत्त्वाचा भाग असलेला एक गुण कोणता?

निःपक्षपातीपणा हा नवीन व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असं पौलने म्हटलं. तो म्हणाला: “ग्रीक किंवा यहुदी, सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, विदेशी किंवा स्कुथी, दास किंवा स्वतंत्र मनुष्य, असा भेदभाव नाही.” * आपल्या वंशामुळे, जातीमुळे, देशामुळे किंवा समाजातल्या स्थानामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असं मंडळीतल्या कोणालाही वाटू नये. का? कारण, ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे आपण ‘सर्वजण एक आहोत.’—कलस्सै. ३:११; गलती. ३:२८.

४. (क) यहोवाच्या सेवकांनी इतरांना कसं वागवलं पाहिजे? (ख) कोणत्या परिस्थितीमुळे ख्रिस्ती ऐक्य राखणं कठीण होऊ शकतं?

आपण नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करतो तेव्हा सर्व लोकांना आदराने आणि सन्मानाने वागवतो; मग ते कोणत्याही जातीचे, वंशाचे किंवा पार्श्‍वभूमीचे असोत. (रोम. २:११) पण, जगाच्या काही भागांमध्ये अशा प्रकारे वागणं खूप कठीण असू शकतं. उदाहरणार्थ, एके काळी दक्षिण आफ्रिकेत सरकारने वेगवेगळ्या वंशाच्या व वर्णाच्या लोकांना राहण्यासाठी वेगवेगळ्या जागा नेमून दिल्या होत्या. तिथले बहुतेक लोक, अगदी साक्षीदारसुद्धा आजही त्याच भागांमध्ये राहतात. त्यामुळे, तिथल्या बांधवांना आपली “मने मोठी” करण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी, नियमन मंडळाने ऑक्टोबर २०१३ मध्ये एका खास व्यवस्थेला मंजुरी दिली. या व्यवस्थेमुळे, निरनिराळ्या वंशाच्या व वर्णाच्या बांधवांना एकमेकांची चांगली ओळख करून घेण्यास मदत होणार होती.—२ करिंथ. ६:१३.

५, ६. (क) देवाच्या लोकांमध्ये आणखी ऐक्य निर्माण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत कोणती व्यवस्था करण्यात आली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) त्याचे कोणते चांगले परिणाम घडून आले?

या व्यवस्थेनुसार, दोन वेगवेगळ्या भाषेच्या किंवा वंशाच्या मंडळ्या महिन्यातले काही शनिवार-रविवार एकत्र येऊन वेळ घालवणार होते. त्या दिवसांत, दोन्ही मंडळ्यांमधल्या बंधुभगिनींनी सोबत प्रचारकार्य केलं, ते सोबत सभांना गेले आणि एकमेकांच्या घरीही गेले. या व्यवस्थेत, शेकडो मंडळ्यांनी सहभाग घेतला आणि त्याचे अनेक चांगले परिणाम तिथल्या शाखा कार्यालयाला पाहायला मिळाले. अगदी साक्षीदार नसलेल्या लोकांवरसुद्धा याचा चांगला प्रभाव पडला. उदाहरणार्थ, एका धर्मगुरूने म्हटलं: “मी काही साक्षीदार नाही; पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की तुमचं प्रचारकार्य खरंच खूप सुसंघटित आहे आणि वेगवेगळ्या वंशाचे असूनही तुमच्यात एकी आहे.” नियमन मंडळाने सुरू केलेल्या या व्यवस्थेबद्दल आपल्या बंधुभगिनींना कसं वाटलं?

नोमा नावाच्या आपल्या एका बहिणीचं उदाहरण विचारात घ्या. सुरुवातीला, झोसा भाषा बोलणाऱ्या या बहिणीला इंग्रजी भाषेच्या मंडळीतल्या बंधुभगिनींना आपल्या लहानशा घरी बोलवायला फार अवघडल्यासारखं वाटलं. पण, सेवाकार्यात गोऱ्या वर्णाच्या बंधुभगिनींसोबत काम केल्यामुळे आणि त्यांच्या घरी गेल्यामुळे तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं. ती म्हणाली: “ते तुमच्या-आमच्यासारखेच सामान्य लोक आहेत!” त्यामुळे, इंग्रजी भाषेच्या मंडळीतले बंधुभगिनी झोसा भाषेच्या मंडळीसोबत प्रचारकार्य करण्यासाठी एकत्र आले, तेव्हा नोमाने त्यांच्यापैकी काहींना आपल्या घरी जेवायला बोलावलं. तिच्या घरी आलेल्या या पाहुण्यांमध्ये गोऱ्या वर्णाचे एक ख्रिस्ती वडीलसुद्धा होते; त्यांना प्लास्टिकच्या एका छोट्याशा क्रेटवर बसण्यात काहीच कमीपणा वाटला नाही, याचं तिला खूप आश्चर्य वाटलं. आजही चालू असलेल्या या खास व्यवस्थेमुळे, अनेकांना नवीन मित्र जोडणं शक्य झालं आहे आणि पुढेही असंच करत राहण्याची त्यांची इच्छा आहे.

दयाळूपणा व प्रेमळपणा परिधान करा

७. आपल्याला नेहमी दयाळूपणा दाखवण्याची गरज का आहे?

सैतानाच्या जगाचा अंत होईपर्यंत यहोवाच्या लोकांना निरनिराळ्या संकटांचा सामना करावा लागेल. नोकरीची समस्या, छळ, नैसर्गिक आपत्ती, वाढत्या गुन्हेगारीमुळे मालमत्ता लुटली जाणं यांसारख्या संकटांचा किंवा इतर हालअपेष्टांचा आपल्या सर्वांनाच सामना करावा लागतो. अशा वेळी, एकमेकांना साहाय्य करण्यासाठी आपल्यामध्ये दयाळूपणा असण्याची गरज आहे. खरा दयाळूपणा असल्यास आपण इतरांना प्रेमळपणे वागवू. (इफिस. ४:३२) हे दोन्ही गुण नवीन व्यक्तिमत्त्वाचा भाग आहेत; आणि ते आपल्याला देवाचं अनुकरण करण्यास व इतरांचं सांत्वन करण्यास मदत करतात.—२ करिंथ. १:३, ४.

८. मंडळीतल्या सर्वांनाच आपण दयाळूपणा व प्रेमळपणा दाखवतो तेव्हा कोणते चांगले परिणाम घडू शकतात? याचं एक उदाहरण द्या.

मंडळीत, गरीब असलेल्यांना किंवा इतर देशांतून आलेल्यांना आपण आणखी प्रेमळपणा कसा दाखवू शकतो? त्यासाठी आपण त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे आणि मंडळीसाठी ते किती मौल्यवान आहेत याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. (१ करिंथ. १२:२२, २५) फिलिपाईन्समधून जपानमध्ये राहायला गेलेल्या डॅनीकार या व्यक्तीचं उदाहरण विचारात घ्या. परदेशी असल्यामुळे, त्याच्या कामाच्या ठिकाणी इतरांना जसं चांगलं वागवलं जायचं, तसं त्याला वागवलं जात नव्हतं. मग एकदा तो यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला गेला. डॅनीकार म्हणतो: “तिथं उपस्थित असलेले जवळजवळ सगळेच जपानी होते; पण, त्यांनी इतक्या आनंदाने माझं स्वागत केलं, की असं वाटलं ते जणू माझे जुने मित्रच आहेत.” बांधवांनी दाखवलेल्या प्रेमळपणामुळे डॅनीकारला यहोवाशी जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत झाली. काही काळानंतर, त्याने बाप्तिस्मा घेतला आणि आज तो मंडळीत एक वडील म्हणून सेवा करत आहे. तो आणि त्याची पत्नी, जेनिफर आपल्या मंडळीचा भाग आहेत या गोष्टीचा त्याच्या मंडळीतल्या इतर वडिलांना खूप आनंद वाटतो. ते म्हणतात: “हे दोघे पायनियर अगदी साधंसुधं जीवन जगतात. आणि, जीवनात देवाच्या राज्याला पहिलं स्थान देण्याच्या बाबतीत ते इतरांसाठी एक सुंदर उदाहरण आहेत.”—लूक १२:३१.

९, १०. सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांना दया व प्रेम दाखवल्यामुळे चांगले परिणाम कसे घडून येतात याची काही उदाहरणं द्या.

आपण राज्याविषयीचा आनंदाचा संदेश लोकांना सांगतो, तेव्हा “सगळ्यांचे भले” करण्याची संधी आपल्याला मिळते. (गलती. ६:१०) परदेशातून आलेल्या लोकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे व आपुलकीमुळे बरेच बंधुभगिनी त्यांची भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करतात. (१ करिंथ. ९:२३) त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक चांगले परिणाम घडून आले आहेत. ऑस्ट्रेलियातल्या टिफ्नी नावाच्या एका पायनियर बहिणीचंच उदाहरण घ्या. ब्रिस्बेन शहरातल्या स्वाहिली भाषेच्या मंडळीला मदत करता यावी म्हणून ती स्वाहिली भाषा शिकली. ही भाषा शिकणं काही सोपं नव्हतं. पण, एक नवीन भाषा शिकल्यामुळे तिचं आयुष्य आणखी अर्थपूर्ण बनलं आहे. टिफ्नी म्हणते: “तुम्हाला जर सेवाकार्यात काहीतरी नवीन आणि आनंददायक करायचं असेल, तर जरूर विदेशी भाषेच्या मंडळीत जाऊन सेवा करा. त्यासाठी तुम्हाला स्वतःचं शहर सोडून जाण्याचीसुद्धा गरज नाही. शिवाय यामुळे, तुम्हाला आपल्या जगव्याप्त बंधुसमाजाचा तसंच त्यातल्या अद्‌भुत ऐक्याचाही प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.”

परदेशातून आलेल्या लोकांना मदत करण्याची साक्षीदारांची इच्छा का आहे? (परिच्छेद १० पाहा)

१० जपानमधल्या एका कुटुंबानंसुद्धा काहीसं असंच केलं. त्या कुटुंबातली साकीको नावाची मुलगी म्हणते: “सेवाकार्य करत असताना आम्हाला ब्राझीलहून आलेले लोक नेहमी भेटायचे. आम्ही त्यांना त्यांच्याच पोर्तुगीज भाषेतल्या बायबलमधून, प्रकटीकरण २१:३, ४ किंवा स्तोत्र ३७:१०, ११ व २९ अशी वचनं वाचून दाखवायचो तेव्हा ते लक्ष देऊन ऐकायचे; आणि काही वेळा तर त्यांच्या डोळ्यांत अश्रूसुद्धा यायचे.” या कुटुंबाला, स्थलांतर केलेल्या लोकांबद्दल दया व प्रेम वाटत असल्यामुळे, त्यांना सत्य शिकवण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबच पोर्तुगीज भाषा शिकू लागलं. पुढे, या कुटुंबानं एक पोर्तुगीज भाषेची मंडळी सुरू करण्यासही मदत केली. आजवर या कुटुंबानं, स्थलांतर केलेल्या कितीतरी लोकांना यहोवाचे सेवक बनण्यास मदत केली आहे. साकीको म्हणते: “पोर्तुगीज भाषा शिकण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागली; पण, यामुळे आम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्यांच्यापुढे या मेहनतीचं काहीच वाटत नाही. आम्ही यहोवाचे खूप खूप आभारी आहोत.”—प्रेषितांची कार्ये १०:३४, ३५ वाचा.

नम्रतेचा गुण परिधान करा

११, १२. (क) नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करण्यामागचा आपला हेतू योग्य का असला पाहिजे? (ख) नेहमी नम्र राहण्यास आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

११ नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करण्यामागचा आपला हेतू, इतरांची प्रशंसा मिळवणं नाही, तर यहोवाचा गौरव करणं हा असावा. लक्षात घ्या, की एक परिपूर्ण देवदूतसुद्धा गर्विष्ठ झाला आणि त्याने पाप केलं. (यहेज्केल २८:१७ पडताळून पाहा.) आपण तर अपरिपूर्ण आहोत; त्यामुळे, गर्विष्ठपणा टाळण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. पण, तरीसुद्धा आपण नम्रतेचा गुण परिधान करू शकतो. त्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१२ एक गोष्ट आपल्याला नेहमी नम्र राहण्यास मदत करू शकते; ती म्हणजे, दररोज बायबलचं वाचन करणं आणि वाचलेल्या माहितीवर मनन करणं. (अनु. १७:१८-२०) खासकरून, येशूने आपल्याला जे काही शिकवलं त्यावर आणि नम्रतेच्या बाबतीत त्याने घालून दिलेल्या उत्तम उदाहरणावर आपण मनन केलं पाहिजे. (मत्त. २०:२८) येशू इतका नम्र होता, की त्याने आपल्या प्रेषितांचे पायसुद्धा धुतले. (योहा. १३:१२-१७) नेहमी नम्र राहण्यासाठी आपण आणखी एक गोष्ट केली पाहिजे. ती म्हणजे, आपण पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशी प्रवृत्ती जर आपल्यामध्ये असेल, तर त्यावर मात करण्यास देवाचा पवित्र आत्मा आपल्याला नक्कीच मदत करेल.—गलती. ६:३, ४; फिलिप्पै. २:३.

१३. नम्र असल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?

१३ नीतिसूत्रे २२:४ वाचा. आपण नम्र असावं अशी यहोवा अपेक्षा करतो. शिवाय, नम्रता दाखवल्यामुळे अनेक आशीर्वाद मिळतात. आपण नम्रतेचा गुण दाखवतो तेव्हा मंडळीतली शांती आणि ऐक्य आणखी वाढतं. तसंच, यहोवा आपल्यावर अपार कृपाही करतो. प्रेषित पेत्रने म्हटलं: “तुम्ही सर्वच जण एकमेकांशी नम्रतेने वागत जा, कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लोकांवर तो अपार कृपा करतो.”—१ पेत्र ५:५, तळटीप.

सौम्यता आणि सहनशीलता परिधान करा

१४. सौम्य व सहनशील असण्याच्या बाबतीत सगळ्यात उत्तम उदाहरण कोणाचं आहे?

१४ जगातले लोक असं मानतात, की सौम्य किंवा सहनशील असणं हे कमजोरीचं लक्षण आहे. पण, तसं मुळीच नाही. खरंतर, विश्वातल्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीचे, यहोवाचे हे गुण आहेत. सौम्य आणि सहनशील असण्याच्या बाबतीत त्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण आणखी कोणाचं असू शकतं? (२ पेत्र ३:९) उदाहरणार्थ, अब्राहाम आणि लोट यांना यहोवाने आपल्या स्वर्गदूताद्वारे धीराने कसं उत्तर दिलं त्याचा विचार करा. (उत्प. १८:२२-३३; १९:१८-२१) तसंच, वारंवार देवाच्या आज्ञा मोडणाऱ्या इस्राएल राष्ट्राच्या बाबतीतही यहोवाने १,५०० पेक्षा जास्त वर्षांपर्यंत कशी सहनशीलता दाखवली, त्याचासुद्धा विचार करा.—यहे. ३३:११.

१५. सौम्यता आणि सहनशीलता दाखवण्याच्या बाबतीत येशूने चांगलं उदाहरण कसं मांडलं?

१५ येशूसुद्धा “सौम्य मनाचा” होता. (मत्त. ११:२९) शिष्यांच्या कमतरतांच्या बाबतीत त्याने खूप सहनशीलता दाखवली. पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना लोकांनी त्याची निंदा केली आणि त्याच्यावर चुकीचे आरोप लावले. पण तरी, मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने सौम्यता व सहनशीलता दाखवली. वधस्तंभावर भयंकर वेदना सहन करत असतानाही त्याने आपल्या पित्याला प्रार्थना केली, की त्याला जिवे मारणाऱ्या लोकांना पित्याने क्षमा करावी. कारण, “ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही” असं तो म्हणाला. (लूक २३:३४) खरंच, तणावाखाली असताना व वेदना सहन करत असतानाही येशूने सौम्यता आणि सहनशीलता दाखवण्याच्या बाबतीत चांगलं उदाहरण मांडलं.—१ पेत्र २:२१-२३ वाचा.

१६. आपण सौम्यता आणि सहनशीलता कशी दाखवू शकतो?

१६ आपण सौम्यता आणि सहनशीलता कशी दाखवू शकतो? त्याचा एक मार्ग प्रेषित पौलने सांगितला. तो म्हणाला: “कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा. यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली आहे, तशी तुम्हीही केली पाहिजे.” (कलस्सै. ३:१३) इतरांना क्षमा करण्यासाठी सौम्य आणि सहनशील असणं खूप गरजेचं आहे. हे गुण दाखवल्यास, मंडळीतल्या ऐक्याला हातभार लागेल आणि ते टिकून राहील.

१७. सौम्यता आणि सहनशीलता हे गुण इतके महत्त्वाचे का आहेत?

१७ आपण सौम्य आणि सहनशील असावं अशी यहोवा अपेक्षा करतो. येणाऱ्या नवीन जगात राहण्यासाठी आपल्यामध्ये हे गुण असणं खूप महत्त्वाचं आहे. (मत्त. ५:५; याको. १:२१) आपण सौम्यता आणि सहनशीलता दाखवतो, तेव्हा यहोवाचा गौरव करतो आणि इतरांनाही तसंच करण्याचं प्रोत्साहन देतो.—गलती. ६:१; २ तीम. २:२४, २५.

प्रेमाचा गुण परिधान करा

१८. प्रेम आणि निःपक्षपातीपणा या गुणांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

१८ आपण आतापर्यंत चर्चा केलेले सर्व गुण प्रेम या गुणाशी जुळलेले आहेत. उदाहरणार्थ, शिष्य याकोबला आपल्या बांधवांना ताडन द्यावं लागलं, कारण ते श्रीमंत लोकांना गरीब लोकांपेक्षा चांगली वागणूक देत होते. अशा प्रकारचं वागणं देवाच्या आज्ञेच्या विरोधात आहे असं तो म्हणाला. कारण देवाने अशी आज्ञा दिली होती, की “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” म्हणूनच याकोब पुढे म्हणाला: “जर तुम्ही भेदभाव करत राहिलात तर तुम्ही पाप करत आहात.” (याको. २:८, ९) लोकांवर आपलं प्रेम असेल, तर ते किती शिकलेले आहेत, ते कोणत्या जातीचे व वंशाचे आहेत किंवा समाजात त्यांचं स्थान काय आहे या गोष्टींचा आपल्याला काहीही फरक पडणार नाही. आपण भेदभाव न करण्याचा किंवा निःपक्षपाती असण्याचा नुसता आव आणू नये, तर निःपक्षपातीपणा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भागच असला पाहिजे.

१९. प्रेमाचा गुण परिधान करणं का महत्त्वाचं आहे?

१९ “प्रेम सहनशील आणि दयाळू असते” आणि ते “गर्वाने फुगत नाही.” (१ करिंथ. १३:४) लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याचं काम करत राहण्यासाठी आपण सहनशील, प्रेमळ आणि नम्र असलं पाहिजे. (मत्त. २८:१९) हे गुण आपल्याला, मंडळीतल्या सर्व बंधुभगिनींसोबत चांगले नातेसंबंध राखण्यासही मदत करतात. सर्वांनीच अशा प्रकारचं प्रेम दाखवल्यास मंडळ्यांमधलं ऐक्य टिकून राहील आणि यहोवाचा गौरव होईल. शिवाय, आपल्यातलं ऐक्य पाहून इतर जण सत्याकडे आकर्षित होतील. म्हणूनच, नवीन व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करताना बायबलमध्ये जे म्हटलं आहे ते किती योग्य आहे. बायबल म्हणतं: “या सर्व गोष्टींशिवाय प्रेमाचे वस्त्र घाला, कारण हे ऐक्याचे परिपूर्ण बंधन आहे.”—कलस्सै. ३:१४.

“सतत नवीन होत” राहा

२०. (क) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? आणि का? (ख) आपण कोणत्या अद्‌भुत भविष्याची आतुरतेने वाट पाहात आहोत?

२० आपण सर्वांनीच स्वतःला विचारलं पाहिजे, की ‘जुनं व्यक्तिमत्त्व काढून टाकण्यासाठी आणि ते नेहमी दूर ठेवण्यासाठी मला स्वतःमध्ये आणखी कुठं सुधारणा करण्याची गरज आहे?’ त्यासाठी, आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि मदतीसाठी त्याला याचना केली पाहिजे. तसंच, मनातून चुकीचे विचार काढून टाकण्याचा आणि वाईट कामं सोडून देण्याचा आपण आटोकाट प्रयत्नही केला पाहिजे; असं केलं तरच, आपण “देवाच्या राज्याचे वारसदार होऊ.” (गलती. ५:१९-२१) यासोबतच, आपण स्वतःला असं विचारलं पाहिजे, की ‘यहोवाचं मन आनंदी करण्यासाठी मी सतत माझ्या विचारसरणीत बदल करत आहे का?’ (इफिस. ४:२३, २४) आपण अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे परिपूर्ण होईपर्यंत नवीन व्यक्तिमत्त्व परिधान करण्यासाठी आणि ते कायम परिधान करून ठेवण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. भविष्यात जेव्हा सर्वांनी नवीन व्यक्तिमत्त्व परिधान केलेलं असेल आणि ते यहोवाच्या सुरेख गुणांचं पूर्णपणे अनुकरण करत असतील, तेव्हा जीवन किती सुंदर असेल याची कल्पना करा!

^ परि. 3 बायबलच्या काळात, स्कुथी लोक सुसंस्कृत नाहीत असं मानलं जायचं आणि त्यामुळे त्यांना तुच्छ लेखलं जायचं.