व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्यामुळे “शांती” आणली जात नाही, तर “तलवार” चालवली जाते

सत्यामुळे “शांती” आणली जात नाही, तर “तलवार” चालवली जाते

“मी पृथ्वीवर शांती आणण्यासाठी आलो असं समजू नका; मी शांती आणण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यासाठी आलो आहे.”—मत्त. १०:३४.

गीत क्रमांक: ४३, २४

१, २. (क) आज आपण कोणत्या प्रकारची शांती अनुभवू शकतो? (ख) आज पूर्णार्थाने शांती अनुभवणं का शक्य नाही? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

आपल्या सर्वांनाच शांतिपूर्ण आणि निश्‍चिंत जीवन जगण्याची इच्छा आहे. यहोवा आपल्याला ‘त्याची शांती’ देतो याबद्दल आपण खरंच किती आभारी आहोत! मनाची ही शांती, अस्वस्थ करणाऱ्‍या विचारांपासून आणि भावनांपासून आपलं संरक्षण करते. (फिलिप्पै. ४:६, ७) शिवाय, आपण यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे. त्यामुळे ‘त्याच्यासोबत शांतीचा संबंध,’ म्हणजेच चांगला नातेसंबंध टिकवून ठेवणंही आपल्याला शक्य होतं.—रोम. ५:१.

पण, संपूर्ण जगात पूर्णार्थाने शांती आणण्याची देवाची वेळ अजून आलेली नाही. सध्याच्या या शेवटल्या दिवसांत आपण अनेक गोष्टींमुळे चिंतित होतो. उदाहरणार्थ, आपल्या अवतीभोवती आपण हिंसक प्रवृत्तीचे लोक पाहतो. (२ तीम. ३:१-४) तसंच, सैतानाच्या आणि त्याच्या खोट्या शिकवणींचाही आपल्याला प्रतिकार करावा लागतो. (२ करिंथ. १०:४, ५) पण, यहोवाची उपासना न करणाऱ्‍या नातेवाइकांच्या विरोधामुळे आपण सगळ्यात जास्त चिंतित होऊ शकतो. आपले नातेवाईक कदाचित आपल्या विश्‍वासाची थट्टा करतील किंवा आपण कुटुंबात फूट पाडत असल्याचा दोष आपल्यावर लावतील. ते कदाचित असंही म्हणतील, की आपण जर यहोवाची उपासना सोडून दिली नाही, तर आपल्यासोबतचे सर्व संबंध ते तोडून टाकतील. मग, कुटुंबातून होणाऱ्‍या अशा विरोधाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? आणि कुटुंबातून विरोध होतो तेव्हा आपण आपल्या मनाची शांती कशी टिकवून ठेवू शकतो?

कुटुंबातून होणाऱ्‍या विरोधाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं?

३, ४. (क) येशूच्या शिकवणींमुळे काय घडणार होतं? (ख) येशूचं अनुसरण करणं खासकरून केव्हा कठीण असणार होतं?

येशूला माहीत होतं, की सगळेच लोक त्याच्या शिकवणी स्वीकारणार नाहीत. त्याला हेही माहीत होतं, की काही जण आपल्या शिष्यांना विरोध करतील आणि त्यामुळे त्यांना धैर्य दाखवण्याची गरज पडेल. या विरोधामुळे, कुटुंबातील शांतिपूर्ण नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो हे येशूला चांगलं माहीत होतं. म्हणूनच येशू म्हणाला: “मी पृथ्वीवर शांती आणण्यासाठी आलो असं समजू नका; मी शांती आणण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यासाठी आलो आहे. कारण मुलाविरुद्ध बाप, आईविरुद्ध मुलगी आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पाडण्यासाठी मी आलो आहे. खरोखर, मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे शत्रू होतील.”—मत्त. १०:३४-३६.

“मी पृथ्वीवर शांती आणण्यासाठी आलो असं समजू नका,” असं जे येशू म्हणाला त्यावरून त्याला हेच म्हणायचं होतं, की त्याचे शिष्य झाल्यामुळे होणाऱ्‍या परिणामांचा लोकांनी विचार करण्याची गरज आहे. अर्थात येशूचा उद्देश, कुटुंबांत फूट पाडणं नाही, तर लोकांना देवाबद्दलचं सत्य शिकवणं हा होता. (योहा. १८:३७) पण, येशूचं अनुसरण करणं नेहमीच सोपं असणार नव्हतं; खासकरून, जवळचे मित्र किंवा कौटुंबिक सदस्य सत्य स्वीकारणार नव्हते तेव्हा. आणि ही गोष्ट शिष्यांनी समजून घेणं गरजेचं होतं.

५. येशूच्या अनुयायांनी काय अनुभवलं आहे?

येशूने म्हटलं, की त्याच्या अनुयायांनी इतर अनेक गोष्टींसोबतच कुटुंबातून होणाऱ्‍या विरोधाचाही धीराने सामना करण्यास तयार असलं पाहिजे. (मत्त. १०:३८) येशूचं मन आनंदित करण्यासाठी त्याच्या अनुयायांनी कौटुंबिक सदस्यांच्या थट्टेचा, इतकंच नाही तर नाकारले जाण्याचाही धीराने सामना केला आहे. पण, सत्यासाठी त्यांनी जे काही गमावलं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमावलं आहे.—मार्क १०:२९, ३० वाचा.

६. नातेवाईक आपल्याला विरोध करतात तेव्हा आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

आपण यहोवाची उपासना करत असल्यामुळे नातेवाईक आपल्याला विरोध करत असले, तरी आपण त्यांच्यावर प्रेम करतो. पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, इतर कोणत्याही व्यक्‍तीपेक्षा देवावर आणि ख्रिस्तावर आपलं सगळ्यात जास्त प्रेम असलं पाहिजे. (मत्त. १०:३७) आपण हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवाप्रती असलेली आपली एकनिष्ठा मोडण्यासाठी, सैतान कौटुंबिक सदस्यांवर असलेल्या आपल्या प्रेमाचा उपयोग करू शकतो. अशाच काही प्रसंगांची आता आपण चर्चा करू आणि त्यांचा धीराने सामना कसा करता येईल ते पाहू.

सत्यात नसलेला विवाहसोबती

७. विवाहसोबती यहोवाची उपासना करत नसल्यास तुम्ही परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे?

बायबल असा इशारा देतं, की जो लग्न करतो त्याला “दुःखे सहन करावी लागतील.” (१ करिंथ. ७:२८) तुमचं लग्न जर यहोवाची उपासना न करणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत झालं असेल, तर वैवाहिक जीवनात तुम्हाला अधिकच ताणतणावांचा आणि चिंतांचा सामना करावा लागू शकतो. असं असलं, तरी आपल्या परिस्थितीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आपला विवाहसोबती यहोवाची उपासना करत नाही, निव्वळ या कारणावरून त्याच्यापासून विभक्‍त होणं किंवा घटस्फोट घेणं योग्य ठरणार नाही. (१ करिंथ. ७:१२-१६) तुमचा पती यहोवाची सेवा करत नसला आणि खऱ्‍या उपासनेत पुढाकार घेत नसला, तरीसुद्धा तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे; कारण, तो कुटुंबाचं मस्तक आहे. किंवा मग, तुमची पत्नी यहोवाची सेवा करत नसली, तरीसुद्धा तुम्ही तिच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि तिची कोमलतेनं काळजी घेतली पाहिजे.—इफिस. ५:२२, २३, २८, २९.

८. विवाहसोबती तुमच्या उपासनेवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

विवाहसोबती तुमच्या उपासनेवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? उदाहरणार्थ, एका बहिणीच्या पतीनं तिला सांगितलं, की ती आठवड्यातले काही दिवसच सेवाकार्यात जाऊ शकते. तुमचीही परिस्थिती अशीच असल्यास, स्वतःला विचारा: ‘माझा विवाहसोबती मला यहोवाची उपासना पूर्णपणे सोडून देण्यास सांगत आहे का? तसं नसल्यास, विवाहसोबत्याच्या म्हणण्याप्रमाणे मला करता येईल का?’ अशा वेळी, समजूदारपणा दाखवल्यास, वैवाहिक जीवनातल्या बऱ्‍याच समस्या तुम्ही टाळू शकता.—फिलिप्पै. ४:५.

९. एक ख्रिस्ती व्यक्‍ती आपल्या मुलांना सत्यात नसलेल्या विवाहसोबत्याचा आदर करण्यास कसं शिकवू शकते?

विवाहसोबती यहोवाची उपासना करणारा नसतो, तेव्हा मुलांना आध्यात्मिक प्रशिक्षण देणं कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलांना बायबलमध्ये दिलेल्या पुढील आज्ञेचं पालन करण्यास शिकवलं पाहिजे: “आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर.” (इफिस. ६:१-३) पण, तुमचा विवाहसोबती बायबलच्या स्तरांचं पालन करणारा नसल्यास काय? अशा वेळी, विवाहसोबत्याचा आदर करण्याद्वारे तुम्ही स्वतः मुलांसमोर एक चांगलं उदाहरण मांडू शकता. त्यासाठी, आपल्या विवाहसोबत्याच्या चांगल्या गुणांचा विचार करा आणि तो किंवा ती करत असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटते ते सांगा. आपल्या मुलांसमोर विवाहसोबत्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नका. त्याऐवजी, यहोवाची सेवा करायची की नाही हे प्रत्येकाने स्वतः ठरवलं पाहिजे, हे आपल्या मुलांना समजावून सांगा. तुम्ही मुलांना सत्यात नसलेल्या विवाहसोबत्याचा आदर करण्यास शिकवलं, तर कदाचित मुलांचं चांगलं उदाहरण पाहून तुमच्या विवाहसोबत्याला यहोवाबद्दल शिकून घ्यावंसं वाटेल.

मुलांना बायबलमधून शिकवण्यासाठी मिळेल त्या संधीचा उपयोग करा (परिच्छेद १० पाहा)

१०. ख्रिस्ती पालक मुलांना यहोवावर प्रेम करण्यास कसं शिकवू शकतात?

१० सत्यात नसलेल्या काही विवाहसोबत्यांना कदाचित असं वाटत असेल, की मुलांनी आपले सणवार पाळावेत किंवा आपल्या धार्मिक शिकवणींचं शिक्षण घ्यावं. आपल्या पत्नीने मुलांना बायबलचं शिक्षण देऊ नये असंही काही पतींना वाटेल. पण, अशा परिस्थितींतसुद्धा एक ख्रिस्ती पत्नी मुलांना सत्य शिकवण्यासाठी तिच्याकडून होईल तितकं करण्याचा प्रयत्न करेल. (प्रे. कार्ये १६:१; २ तीम. ३:१४, १५) उदाहरणार्थ, आपल्या पत्नीने मुलांसोबत बायबलचा अभ्यास करू नये किंवा त्यांना सभांना घेऊन जाऊ नये, असं सत्यात नसलेल्या एखाद्या पतीचं म्हणणं असेल. त्याच्या या निर्णयाचा आदर करत असतानाच, एक ख्रिस्ती पत्नी संधी मिळेल तेव्हा आपल्या विश्‍वासांबद्दल मुलांशी बोलू शकते. यामुळे मुलांना यहोवाबद्दल आणि त्याच्या नैतिक स्तरांबद्दल शिकता येईल. (प्रे. कार्ये ४:१९, २०) अर्थात, यहोवाची उपासना करायची की नाही हा निर्णय शेवटी मुलांनाच घ्यावा लागेल.—अनु. ३०:१९, २०. *

खऱ्‍या उपासनेला विरोध करणारे नातेवाईक

११. कोणत्या गोष्टीमुळे आपल्यात आणि यहोवाची सेवा न करणाऱ्‍या नातेवाइकांत समस्या निर्माण होऊ शकतात?

११ आपण बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा कदाचित आपण आपल्या कुटुंबाला त्याची कल्पना दिली नसेल. पण, आपला विश्‍वास वाढत गेला तशी आपल्याला जाणीव झाली, की यहोवाची उपासना करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल आपण कुटुंबाला सांगितलं पाहिजे. (मार्क ८:३८) देवाला एकनिष्ठ राहण्याच्या तुमच्या निर्णयामुळे, कदाचित तुमच्यात आणि तुमच्या कुटुंबात समस्या निर्माण झाल्या असतील. त्यामुळे, आता आपण अशा काही गोष्टींवर चर्चा करू ज्यांमुळे तुम्हाला कुटुंबासोबत शांतिपूर्ण नातेसंबंध राखण्यास आणि त्याच वेळी यहोवाला विश्‍वासू राहण्यास मदत होईल.

१२. (क) कोणत्या कारणांमुळे नातेवाईक कदाचित आपल्याला विरोध करत असतील? (ख) आपण त्यांच्या भावना समजू शकतो हे आपल्याला कसं दाखवता येईल?

१२ सत्यात नसलेल्या नातेवाइकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला बायबलमधलं सत्य समजलं आहे याबद्दल आपण खरंच किती कृतज्ञ आहोत! पण, आपल्या नातेवाइकांना मात्र आपल्याबद्दल वेगळंच वाटत असेल. त्यांना कदाचित वाटत असेल, की आपण कुठल्यातरी भलत्याच धार्मिक गटाचे सदस्य बनलो आहोत आणि आपली फसवणूक करण्यात आली आहे. आपण त्यांच्यासोबत मिळून सणवार साजरे करत नसल्यामुळे त्यांना असंही वाटत असेल, की आता आपलं त्यांच्यावर प्रेम राहिलेलं नाही. किंवा मग, मृत्यूनंतर आपलं काय होईल याचीही त्यांना भीती वाटत असेल. आपल्या नातेवाइकांना आपली इतकी काळजी का वाटते, हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. २०:५) प्रेषित पौलनेसुद्धा, “सर्व” लोकांना आनंदाचा संदेश सांगता यावा म्हणून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण जर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यामुळे त्यांना सत्य कसं शिकवता येईल हे आपल्याला समजेल.—१ करिंथ. ९:१९-२३.

१३. सत्यात नसलेल्या नातेवाइकांशी आपण कसं बोललं पाहिजे?

१३ सौम्यपणे बोला. “तुमचे बोलणे नेहमी प्रेमळ . . . असावे,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (कलस्सै. ४:६) पण, असं करणं नेहमीच सोपं नाही. नातेवाइकांशी सौम्यपणे व प्रेमळपणे बोलता यावं म्हणून आपण पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकतो. नातेवाइकांच्या खोट्या धार्मिक विश्‍वासांवर आपण वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे आपलं मन दुखावलं गेल्यास आपण प्रेषितांच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. पौल म्हणाला: “आमचा अपमान केला जातो तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो; आमचा छळ होतो, तेव्हा आम्ही धीराने तो सहन करतो; आमच्यावर खोटे आरोप केले जातात, तेव्हा आम्ही सौम्यपणे उत्तर देतो.”—१ करिंथ. ४:१२, १३.

१४. चांगलं आचरण ठेवण्याचे फायदे काय आहेत?

१४ चांगलं आचरण ठेवा. हे इतकं महत्त्वाचं का आहे? आपल्या सौम्य बोलण्यामुळे नातेवाइकांसोबत शांती राखण्यास नक्कीच मदत होते. पण, त्यापेक्षा कितीतरी जास्त आपल्या चांगल्या आचरणाचा त्यांच्यावर प्रभाव पडू शकतो. (१ पेत्र ३:१, २, १६ वाचा.) यहोवाचे साक्षीदार आनंदी वैवाहिक जीवन जगतात, आपल्या मुलांची चांगली काळजी घेतात, बायबलच्या स्तरांनुसार जगतात आणि त्यांचं जीवन उद्देशपूर्ण असतं हे तुमच्या चांगल्या उदाहरणावरून नातेवाइकांना दिसून येऊ द्या. आपल्या नातेवाइकांनी जरी कधी सत्य स्वीकारलं नाही, तरी आपल्या चांगल्या आचरणामुळे आपण यहोवाचं मन आनंदित करत आहोत, या गोष्टीचं समाधान आपल्याला नक्कीच असेल.

१५. नातेवाइकांसोबत वाद टाळण्यासाठी आपण आधीच कशी तयारी करू शकतो?

१५ पुरेशी तयारी करा. कोणकोणत्या परिस्थितींमध्ये नातेवाइकांशी वाद होण्याची शक्यता आहे याचा विचार करा. मग, असे प्रसंग कसे हाताळता येतील ते आधीच ठरवा. (नीति. २९:११) ऑस्ट्रेलियातल्या एका बहिणीनं हेच केलं. तिच्या सासऱ्‍यांचा सत्याला खूप विरोध होता आणि त्यावरून काही वेळा त्यांना भयंकर रागही यायचा. त्यामुळे, त्यांना व्हिडिओ कॉल करण्याआधी ती आणि तिचे पती यहोवाला प्रार्थना करायचे आणि सासऱ्‍यांचा राग भडकला तरी नेहमी सौम्यपणे बोलता यावं म्हणून यहोवाला मदतीची विनंती करायचे. त्यांच्याशी दुसऱ्‍या कोणत्या चांगल्या विषयांवर बोलता येईल, याचाही ते आधीच विचार करायचे. आणि धार्मिक विषयांवर वादविवाद होतील अशी लांबलचक संभाषणं टाळता यावीत, म्हणून किती वेळ बोलायचं हेसुद्धा ते आधीच ठरवायचे.

१६. नातेवाइकांचं मन दुखावल्याबद्दल वाईट वाटत असल्यास तुम्ही काय करू शकता?

१६ अर्थात, सत्यात नसलेल्या नातेवाइकांसोबत होणारे वादविवाद नेहमीच टाळता येतील असं नाही. वाद होतात तेव्हा तुम्हाला फार वाईट वाटू शकतं. कारण, तुमचं तुमच्या नातेवाइकांवर प्रेम असतं आणि त्यांना आनंदित करण्याची तुमची इच्छा असते. पण नेहमी लक्षात ठेवा, की यहोवाप्रती असलेली तुमची एकनिष्ठा ही कुटुंबावरील तुमच्या प्रेमापेक्षा अधिक दृढ असली पाहिजे. तुमची एकनिष्ठा पाहून, यहोवाची उपासना करणं किती महत्त्वाचं आहे हे कदाचित त्यांना समजेल. खरंतर, तुम्ही कोणालाही सत्य स्वीकारण्याची बळजबरी करू शकत नाही. पण, एक गोष्ट मात्र तुम्ही नक्कीच करू शकता. ती म्हणजे, यहोवाच्या मार्गांचं अनुसरण केल्यामुळे तुम्हाला स्वतःला किती फायदा झाला आहे हे इतरांना दाखवू शकता. आपला प्रेमळ देव, यहोवा तुमच्याप्रमाणेच त्यांनाही त्याची उपासना करायची की नाही हे ठरवण्याची संधी देतो.—यश. ४८:१७, १८.

कुटुंबातला एखादा सदस्य यहोवाला सोडून देतो तेव्हा

१७, १८. कुटुंबातल्या सदस्याने यहोवाला सोडून दिल्यामुळे होणाऱ्‍या दुःखाचा सामना करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?

१७ आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला बहिष्कृत करण्यात येतं किंवा तो स्वतःहून यहोवाच्या संघटनेशी संबंध तोडून टाकतो, तेव्हा अतिशय वाईट वाटू शकतं. ते दुःख इतकं तीव्र असू शकतं, की कोणीतरी आपल्यावर तलवारीने घाव करत आहे असं आपल्याला वाटू शकतं. मग, या दुःखाचा सामना तुम्हाला कसा करता येईल?

१८ यहोवाच्या सेवेवर आपलं लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारच्या दुःखाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्हाला तुमचा विश्‍वास अधिक वाढवण्याची गरज आहे. दररोज बायबलचं वाचन करा, सभांची तयारी करा, सभांना उपस्थित राहा, प्रचारकार्य करत राहा आणि या दुःखाचा धीराने सामना करण्यासाठी यहोवाकडे बळ मागा. (यहू. २०, २१) पण, हे सगळं करूनसुद्धा तुमचं दुःख नाहीसं होत नाही तेव्हा काय? अशा वेळी, धीर सोडू नका! यहोवाच्या सेवेवर आपलं लक्ष केंद्रित करा. त्यामुळे, काही काळानंतर तुमच्या विचारांवर आणि भावनांवर ताबा मिळवणं तुम्हाला शक्य होईल. स्तोत्र ७३ च्या लेखकाने नेमकं हेच अनुभवलं. एका प्रसंगी, त्यालासुद्धा आपल्या विचारांवर आणि भावनांवर ताबा ठेवणं अतिशय कठीण वाटत होतं. पण, यहोवाची उपासना करत राहिल्यामुळे त्याला आपली विचारसरणी बदलण्यास मदत मिळाली. (स्तो. ७३:१६, १७) तुम्हालाही अशा प्रकारे मदत होऊ शकते.

१९. यहोवाने दिलेल्या ताडनाचा आपण आदर करतो हे आपण कसं दाखवू शकतो?

१९ यहोवाने दिलेल्या ताडनाचा आदर करा. यहोवाला माहीत आहे, की तो देत असलेल्या ताडनाचा सर्वांनाच, अगदी बहिष्कृत केलेल्या व्यक्‍तीलासुद्धा फायदा होतो. आपल्या जवळच्या व्यक्‍तीला ताडन दिलं जातं तेव्हा दुःख होणं साहजिक आहे. पण, दिलेल्या ताडनामुळे त्या व्यक्‍तीला यहोवाकडे परत येण्यास मदत होऊ शकते. (इब्री लोकांना १२:११ वाचा.) त्यामुळे ती व्यक्‍ती पुन्हा यहोवाकडे येईपर्यंत, तिची “संगत” सोडून देण्याचा जो सल्ला यहोवाने दिला आहे त्याचा आपण आदर केला पाहिजे. (१ करिंथ. ५:११-१३) असं करणं सोपं नाही. तरीसुद्धा फोन, मेसेज, पत्र, ई-मेल किंवा सोशल मिडिया अशा कोणत्याही मार्गांनी बहिष्कृत व्यक्‍तीशी संपर्क करण्याचं आपण टाळलं पाहिजे.

२०. आपण नेहमी कोणती आशा करू शकतो?

२० कधीही आशा सोडू नका! “प्रेम . . . सर्व गोष्टींची आशा धरते.” त्यामुळे, आपली प्रिय व्यक्‍ती कधी ना कधी यहोवाकडे परत येईल अशी आपण नेहमी आशा करू शकतो. (१ करिंथ. १३:७) आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं मन बदलत आहे किंवा तो आपली वागणूक सुधारत आहे असं दिसत असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू शकता. त्याला बायबलमधून बळ मिळावं आणि ‘माझ्याकडे परत या’ असा जो आर्जव यहोवा करत आहे, त्याला त्याने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी तुम्ही प्रार्थनेत विनंती करू शकता.—यश. ४४:२२.

२१. येशूचं अनुसरण करत असल्यामुळे तुम्हाला कुटुंबातून विरोध होत असला, तर तुम्ही काय केलं पाहिजे?

२१ येशूने म्हटलं, की कोणत्याही मानवापेक्षा आपण त्याच्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे. येशूला आपल्या शिष्यांबद्दल खातरी होती, की कुटुंबातून विरोध होत असला तरी त्याचे शिष्य त्याला एकनिष्ठ राहण्याचं धैर्य दाखवतील. येशूचं अनुसरण करत असल्यामुळे तुम्हाला कुटुंबातून विरोध होत असेल, तर यहोवावर विसंबून राहा. विरोधाचा धीराने सामना करता यावा यासाठी त्याच्याकडे मदतीसाठी विनंती करा. (यश. ४१:१०, १३) आणि या गोष्टीची खातरी बाळगा, की तुमच्या एकनिष्ठेमुळे यहोवाला आणि येशूला आनंद होतो आणि तुमच्या विश्‍वासूपणाचं प्रतिफळ ते नक्कीच तुम्हाला देतील.

^ परि. 10 विवाहसोबती सत्यात नसल्यास, मुलांना आध्यात्मिक प्रशिक्षण कसं द्यावं याविषयी अधिक माहितीसाठी १५ ऑगस्ट २००२ च्या टेहळणी बुरूज अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.