व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जखऱ्‍याला झालेले दृष्टान्त—आपल्याला काय शिकायला मिळतं?

जखऱ्‍याला झालेले दृष्टान्त—आपल्याला काय शिकायला मिळतं?

“मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.”—जख. १:३.

गीत क्रमांक: ६, २०

१-३. (क) जखऱ्‍याने यहोवाचा संदेश इस्राएली लोकांना सांगण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची परिस्थिती कशी होती? (ख) इस्राएली लोकांनी आपल्याकडे पुन्हा वळावं असं यहोवाने त्याच्या लोकांना का सांगितलं?

एक उडत असलेला पट, एफामध्ये बसलेली एक स्त्री आणि करकोचा पक्ष्याच्या पंखांसारखे पंख असलेल्या व आकाशात उडत असलेल्या दोन स्त्रिया. जखऱ्‍याने पाहिलेल्या दृष्टान्तांपैकी हे काही रोमांचित करणारे दृष्टान्त आहेत. (जख. ५:१, ७-९) पण, यहोवाने आपल्या संदेष्ट्याला असे अद्‌भुत दृष्टान्त का दाखवले? तसंच, इस्राएली लोक त्या वेळी कोणत्या परिस्थितीत होते? आणि या दृष्टान्तांवरून आज आपण काय शिकू शकतो?

इ.स.पू. ५३७ हे वर्ष यहोवाच्या लोकांसाठी मोठ्या आनंदाचं वर्ष होतं. याआधी इस्राएली लोक ७० वर्षं बाबेलच्या बंदिवासात होते. पण आता त्यांची सुटका करण्यात आली होती! यरुशलेममध्ये जाऊन यहोवाचं मंदिर पुन्हा बांधायला व त्याची उपासना करायला ते खूप उत्सुक होते. एका वर्षानंतर, म्हणजे इ.स.पू. ५३६ मध्ये इस्राएली लोकांनी मंदिराचा पाया घातला. त्या वेळी लोक इतक्या मोठ्याने जयजयकार करत होते, की त्यांचा आवाज फार “दूरवर” ऐकू जात होता. (एज्रा ३:१०-१३) पण या कामाला होत असलेला विरोधही दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे लोक इतके निराश झाले, की त्यांनी मंदिर बांधायचं काम थांबवलं. त्याऐवजी ते स्वतःची घरं बांधण्याकडे आणि शेतीवाडी करण्याकडेच लक्ष देऊ लागले. इस्राएली लोकांची बाबेलच्या बंदिवासातून सुटका होऊन सोळा वर्षं उलटली होती, तरीसुद्धा यहोवाच्या मंदिराचं काम अजूनही पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे, इस्राएली लोकांना याची आठवण करून देण्याची गरज होती, की त्यांनी स्वतःचा विचार करण्याचं सोडून देऊन पुन्हा यहोवाकडे वळावं. लोकांनी आवेशानं आणि धैर्यानं आपली उपासना करावी अशी यहोवाची इच्छा होती.

आपण इस्राएली लोकांना बाबेलच्या बंदिवासातून सोडवून का आणलं, याची यहोवाला त्यांना आठवण करून द्यायची होती. त्यासाठी त्याने इ.स.पू. ५२० मध्ये जखऱ्‍या संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवलं. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, जखऱ्‍या या नावाचा अर्थ “यहोवाने आठवण केली” असा होतो. यहोवाने इस्राएली लोकांसाठी ज्या गोष्टी केल्या होत्या त्या गोष्टी ते विसरून गेले होते. पण यहोवा मात्र त्यांना विसरला नव्हता. (जखऱ्‍या १:३, ४ वाचा.) इस्राएली लोकांना पुन्हा खरी उपासना करता यावी म्हणून यहोवाने त्यांना मदत केली. पण, यासोबतच त्याने त्यांना हेसुद्धा बजावून सांगितलं, की जर त्यांनी पूर्ण मनाने त्याची उपासना केली नाही तर तो मुळीच ती स्वीकारणार नाही. या लेखात आपण जखऱ्‍याने पाहिलेल्या सहाव्या आणि सातव्या दृष्टान्तांचं परीक्षण करू. तसंच, यहोवाने इस्राएली लोकांना कार्य करण्यास कसं प्रवृत्त केलं, आणि या दोन दृष्टान्तांतून आपल्याला काय शिकायला मिळतं हे पाहू.

चोरी करणाऱ्‍यांवर येणारा देवाचा न्यायदंड

४. (क) जखऱ्‍याने त्याला झालेल्या सहाव्या दृष्टान्तात काय पाहिलं? (ख) आणि पटाच्या दोन्ही बाजूंवर संदेश का लिहिण्यात आला होता? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं पहिलं चित्र पाहा.)

जखऱ्‍या पुस्तकाचा ५ वा अध्याय हा एका विलक्षण दृष्टान्ताने सुरू होतो. (जखऱ्‍या ५:१, २ वाचा.) जखऱ्‍या संदेष्ट्याला एक उडत असलेला पट (गुंडाळी) दिसतो. त्याची लांबी जवळपास वीस हात (३० फूट) व रुंदी दहा हात (१५ फूट) होती. तो पट उघडलेला होता आणि त्याच्यावर एक संदेश लिहिलेला होता. (जख. ५:३) तो न्यायदंडाचा संदेश होता! प्राचीन काळात लोक सहसा पटाच्या फक्‍त एका बाजूवर लिहायचे. पण तो संदेश इतका महत्त्वाचा होता, की तो पटाच्या दोन्ही बाजूंवर लिहिलेला होता.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये कोणत्याही प्रकारच्या चोरीला स्थान नाही (परिच्छेद ५-७ पाहा)

५, ६. कोणत्याही प्रकारच्या चोरीकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

जखऱ्‍या ५:३, ४ वाचा. सर्व मानव आपापल्या कृत्यांसाठी यहोवासमोर जबाबदार आहेत, आणि ही गोष्ट यहोवाच्या लोकांना प्रामुख्याने लागू होते. कारण, ते त्याच्या नावाने ओळखले जातात. यहोवाचे लोक त्याच्यावर प्रेम करतात आणि त्यांना या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे, की चोरी केल्याने “देवाच्या नामाची निंदा” होते. (नीति. ३०:८, ९) काही लोक कदाचित असा विचार करतील, की चांगल्या कारणांसाठी चोरी करणं यात काहीच गैर नाही. पण, कारण कितीही चांगलं असलं, तरी चोरी करणारी व्यक्‍ती हेच दाखवून देते, की तिला यहोवाच्या नावापेक्षा आणि त्याच्या नीतिनियमांपेक्षा स्वतःची लोभी इच्छा जास्त प्रिय आहे.

जखऱ्‍या ५:३, ४ या वचनांतल्या शब्दांकडे तुम्ही लक्ष दिलं का? त्यात म्हटलं आहे, की न्यायदंडाचा पट म्हणजे शाप “चोराच्या घरात . . . शिरेल.” आणि “तो त्याच्या घरात बिऱ्‍हाड करून राहील आणि त्याच्या तुळ्यांचे व चिऱ्‍यांचे भस्म करील.” याचा अर्थ, आपल्या लोकांमध्ये काही चुकीचं घडत असेल, तर यहोवा ते उघडकीस आणू शकतो आणि ते करणाऱ्‍या व्यक्‍तीचा न्याय करू शकतो. चोरी करणारी व्यक्‍ती कदाचित आपली कृत्यं पोलिसांपासून, मालकापासून, मंडळीतल्या वडिलांपासून किंवा आपल्या आईवडिलांपासून लपवून ठेवू शकते. पण, यहोवापासून मात्र ती ते लपवून ठेवू शकत नाही. चोरी कोणत्याही प्रकारची असो, यहोवा ती नक्कीच उघडकीस आणेल. (इब्री ४:१३) खरंच, “सर्व गोष्टींत” प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या लोकांसोबत संगती करणं किती चांगलं आहे!—इब्री १३:१८.

७. उडत्या पटाच्या शापापासून आपण कसं बचावू शकतो?

यहोवाला कोणत्याही प्रकारची चोरी आवडत नाही. यहोवाच्या नीतीनियमांनुसार जीवन जगणं, म्हणजेच त्याच्या नावाला कलंक लागणार नाही याची खबरदारी बाळगणं हा आपल्यासाठी एक मोठा सन्मान आहे. अशा प्रकारे जीवन जगल्याने, दुष्ट लोकांवर येणाऱ्‍या यहोवाच्या न्यायदंडापासून आपण बचावू शकतो.

दिलेला शब्द नेहमी पाळा

८-१०. (क) शपथ घेणं म्हणजे काय? (ख) सिदकीयाने कोणती शपथ मोडली?

उडणाऱ्‍या पटावर पुढे देवाच्या नावाची “खोटी शपथ” वाहणाऱ्‍यांना इशारा देण्यात आला होता. (जख. ५:४) शपथ घेणं म्हणजे, एखादी गोष्ट खरी आहे हे प्रतिज्ञापूर्वक सांगणं किंवा एखादी गोष्ट करण्याचं किंवा न करण्याचं वचन देणं.

यहोवाच्या नावाने शपथ घेणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. हे आपल्याला सिदकीया राजाच्या उदाहरणावरून दिसून येतं. सिदकीया हा यरुशलेमवर राज्य करणारा शेवटचा राजा होता. त्याने यहोवाच्या नावाने शपथ घेतली होती, की तो बाबेलच्या राजाला शरण जाईल. पण, सिदकीयाने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे यहोवा देव म्हणाला, की “ज्याने त्याला राजा केले, ज्याशी केलेली आणभाक त्याने तुच्छ मानली, ज्याचा करार त्याने मोडला. त्या राजाच्या निवासस्थानी, बाबेलात तो मरेल.”—यहे. १७:१६.

१० सिदकीयाने यहोवाच्या नावाने शपथ घेतली होती आणि त्याने ती पाळावी अशी यहोवाची अपेक्षा होती. (२ इति. ३६:१३) पण सिदकीयाने आपलं वचन पाळलं नाही आणि बाबेलच्या राजापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी इजिप्तच्या राजाकडे मदत मागितली. पण इजिप्तचा राजाही त्याला मदत करू शकला नाही.—यहे. १७:११-१५, १७, १८.

११, १२. (क) कोणतं वचन सर्वात महत्त्वाचं वचन आहे? (ख) यहोवाला केलेल्या समर्पणाचा आपल्या दररोजच्या जीवनावर कोणता परिणाम झाला पाहिजे?

११ सिदकीया राजाच्या बाबतीत जे घडलं त्यावरून दिसून येतं, की आपण जो शब्द किंवा वचन देतो ते यहोवा गांभीर्याने घेतो. त्यामुळे यहोवाचं मन आनंदी करण्यासाठी आपण आपला शब्द पाळला पाहिजे. (स्तो. ७६:११) जीवनात आपण बरीच वचनं देत असलो, तरी समर्पणाच्या वेळी आपण यहोवाला जे वचन देतो ते सर्वात महत्त्वाचं वचन आहे. आपण जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करतो, तेव्हा खरंतर असं वचन देत असतो, की जीवनात कोणत्याही प्रकारची परिस्थिती आली तरी आपण त्याची सेवा करणं थांबवणार नाही.

१२ यहोवाला दिलेलं समर्पणाचं वचन आपण कसं पाळू शकतो? दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक लहान-मोठ्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं. या परीक्षांचा आपण ज्या प्रकारे सामना करतो त्यावरून यहोवासोबत आपला नातेसंबंध किती घनिष्ठ आहे हे दिसून येईल. (स्तो. ६१:८) उदाहरणार्थ, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी जर कोणी तुमच्याशी इश्‍कबाजी (फ्लर्टिंग) करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही काय कराल? त्याकडे दुर्लक्ष करून यहोवाच्या मार्गाने चालण्याची तुमची इच्छा आहे हे दाखवून द्याल का? (नीति. २३:२६) किंवा, तुमच्या कुटुंबात यहोवाची उपासना करणारे तुम्ही एकटेच असाल, तर काय? अशा वेळी, नेहमी ख्रिस्ती गुण दाखवता यावेत यासाठी तुम्ही यहोवाकडे प्रार्थना कराल का? तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असला, तरी यहोवा तुमच्यावर करत असलेल्या प्रेमासाठी आणि देत असलेल्या मार्गदर्शनासाठी तुम्ही त्याचे आभार मानता का? तुम्ही दररोज बायबल वाचण्यासाठी वेळ काढता का? आपण यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं होतं, तेव्हा या सर्व गोष्टी करण्याचं एका अर्थी त्याला वचनच दिलं होतं. आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो आणि त्याची पूर्ण मनाने सेवा करतो, तेव्हा हेच दाखवतो, की आपलं त्याच्यावर खरं प्रेम आहे. यहोवाची सेवा करणं हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आणि यहोवाला दिलेलं वचन पाळल्यामुळे आपला फायदाच होतो; आपल्या विश्‍वासामुळे पुढे आपल्याला चांगलं भविष्य मिळेल.—अनु. १०:१२, १३.

१३. जखऱ्‍याच्या सहाव्या दृष्टान्तातून आपण काय शिकतो?

१३ जखऱ्‍याला झालेला सहावा दृष्टान्त आपल्याला हे समजण्यास मदत करतो, की यहोवावर जर आपलं खरं प्रेम असेल, तर आपण चोरी करणार नाही आणि दिलेलं वचन मोडणार नाही. आपण हेसुद्धा शिकलो, की इस्राएली लोकांनी अनेक चुका केल्या असल्या, तरी यहोवाने नेहमीच त्याचं वचन पाळलं. त्याने कधीही त्यांचा त्याग केला नाही. त्याने समजून घेतलं, की सभोवतालच्या शत्रू राष्ट्रांमुळे इस्राएली लोकांना बऱ्‍याच दबावांचा सामना करावा लागत आहे. खरंच, दिलेलं वचन पाळण्याच्या बाबतीत यहोवाने आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण मांडलं आहे. तसंच, आपल्यालाही आपलं वचन पाळता यावं म्हणून तो अनेक मार्गांनी मदत करतो. त्यांपैकी एक मार्ग म्हणजे, भविष्यासाठी तो आपल्याला आशा देतो. लवकरच तो या पृथ्वीवरून सर्व दुष्टता काढून टाकेल. जखऱ्‍याला झालेला सातवा दृष्टान्त आपल्याला या गोष्टीची आशा देतो.

यहोवा दुष्टता काढून टाकतो

१४, १५. (क) सातव्या दृष्टान्तात जखऱ्‍याने काय पाहिलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं दुसरं चित्र पाहा.) (ख) टोपलीमध्ये असलेली स्त्री कोण होती? आणि देवदूताने टोपलीला झाकण का लावलं?

१४ जखऱ्‍याने दृष्टान्तात उडणारा पट पाहिल्यानंतर, एक देवदूत त्याला म्हणतो: ‘वर पाहा.’ जखऱ्‍याला या सातव्या दृष्टान्तात काय दिसतं? त्याला “एफा” म्हटलेली एक मोठी टोपली दिसते. (जखऱ्‍या ५:५-८ वाचा.) त्या टोपलीवर शिशाचं एक गोल झाकण होतं. टोपलीवरचं झाकण काढण्यात आलं, तेव्हा त्यात “एक स्त्री बसलेली” जखऱ्‍याला दिसली. ती कोण होती? ती स्त्री “दुष्टता” असल्याचं देवदूताने जखऱ्‍याला सांगितलं. ती टोपलीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा जखऱ्‍याला किती भीती वाटली असेल याची कल्पना करा. पण देवदूताने त्या स्त्रीला पुन्हा टोपलीत आत ढकललं आणि शिशाचं जड झाकण टोपलीवर पुन्हा लावलं. या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ होता?

१५ ती स्त्री टोपलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना देवदूताने लगेच टोपलीला झाकण लावलं. ही गोष्ट दाखवून देते, की आपल्या लोकांमध्ये काही चुकीचं घडत असल्याचं यहोवाला दिसलं, तर ते काढून टाकण्यासाठी तो लगेच पाऊल उचलेल. (१ करिंथ. ५:१३) या दृष्टान्तामुळे आपल्याला खातरी मिळते, की यहोवा देव त्याच्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची दुष्टता खपवून घेणार नाही.

खरी उपासना शुद्ध ठेवण्यासाठी यहोवाने नेहमीच पाऊल उचललं आहे (परिच्छेद १६-१८ पाहा)

१६. (क) त्या दोन स्त्रियांनी टोपलीचं काय केलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं तिसरं चित्र पाहा.) (ख) पंख असलेल्या त्या स्त्रियांनी टोपली कुठं नेली?

१६ जखऱ्‍याने नंतर आणखी दोन स्त्रिया पाहिल्या. त्यांचे पंख मजबूत असून करकोचा पक्ष्याच्या पंखांसारखे होते. (जखऱ्‍या ५:९-११ वाचा.) पण या स्त्रिया टोपलीतल्या त्या दुष्ट स्त्रीपेक्षा फार वेगळ्या होत्या. या दोन स्त्रियांनी आपल्या मजबूत पंखांच्या साहाय्याने “दुष्टता” भरलेल्या त्या टोपलीवर झडप घातली आणि ती उचलून नेली. त्यांनी ती “शिनार देशात” म्हणजेच बाबेलला नेली. ती टोपली त्यांनी बाबेलला का नेली?

१७, १८. (क) “दुष्टता” बाबेलमध्ये घेऊन जाणं योग्य का होतं? (ख) संघटनेला शुद्ध ठेवण्याच्या बाबतीत तुमचा काय निश्‍चय आहे?

१७ जखऱ्‍याच्या दिवसांत इस्राएलमध्ये राहणाऱ्‍या लोकांना नक्कीच समजलं असेल, की “दुष्टता” भरलेली ती टोपली बाबेल शहरात का नेण्यात आली. कारण, बाबेल हे दुष्टतेनं भरलेलं शहर होतं आणि त्यात मोठ्या प्रमाणात अनैतिक कृत्यं आणि खोटी उपासना होत होती. जखऱ्‍या आणि इतर यहुदी लोक पूर्वी त्या शहरात राहत होते आणि त्या शहरातल्या वाईट प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. या दृष्टान्तामुळे त्यांना या गोष्टीची खातरी मिळाली, की खरी उपासना शुद्ध ठेवण्याची यहोवा नेहमी काळजी घेईल.

१८ या दृष्टान्ताने यहुद्यांना याचीही आठवण करून दिली, की उपासना शुद्ध ठेवण्याची जबाबदारी ही त्यांचीसुद्धा आहे. देवाच्या लोकांमध्ये दुष्टता कधीच खपवून घेतली जाणार नाही. आज यहोवाने आपल्याला त्याच्या शुद्ध संघटनेत आणलं आहे. या संघटनेत आपण त्याचं प्रेम आणि संरक्षण अनुभवतो. तेव्हा संघटनेला शुद्ध ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. यहोवाच्या लोकांमध्ये दुष्टतेला कोणतंच स्थान असू नये.

शुद्ध उपासना करणारे यहोवाचा सन्मान करतात

१९. जखऱ्‍याने पाहिलेल्या दृष्टान्तांचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो?

१९ जखऱ्‍याने पाहिलेला सहावा आणि सातवा दृष्टान्त हा वाईट गोष्टी करणाऱ्‍यांसाठी एक इशारा आहे. यहोवा त्याच्या संघटनेत कोणत्याही प्रकारची दुष्टता खपवून घेणार नाही. आणि त्याचे सेवक या नात्यानं आपणही दुष्टतेचा तिरस्कार केला पाहिजे. या दोन दृष्टान्तांमुळे आपल्याला आणखी एका गोष्टीची खातरी मिळते. ती म्हणजे, आपल्या प्रेमळ पित्याचं मन आनंदी करण्याचा प्रयत्न केल्यास तो आपल्याला शाप नाही, तर आशीर्वाद देईल आणि आपलं संरक्षण करेल. सध्याच्या दुष्ट जगात राहत असताना वाइटापासून दूर राहणं अवघड असलं, तरी यहोवाच्या मदतीनं आपण नक्कीच यशस्वी होऊ. पण, या दुष्ट जगात शुद्ध उपासना टिकून राहील आणि मोठं संकट जवळ येत असताना यहोवा त्याच्या संघटनेचं संरक्षण करेल, याची आपण खातरी कशी बाळगू शकतो? या प्रश्‍नाचं उत्तर आपण पुढच्या लेखात पाहू.