व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रथ आणि मुकुट तुमचं संरक्षण करतात

रथ आणि मुकुट तुमचं संरक्षण करतात

“परमेश्‍वर तुमचा देव याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”—जख. ६:१५.

गीत क्रमांक: १७, १६

१, २. जखऱ्‍याने सातवा दृष्टान्त पाहिला तेव्हा यरुशलेममध्ये परिस्थिती कशी होती?

जखऱ्‍याने नुकताच सातवा दृष्टान्त पाहिला होता. त्यामुळे विचार करण्यासाठी त्याच्याकडे बरंच काही होतं. त्या दृष्टान्तात यहोवाने अभिवचन दिलं होतं, की तो अप्रामाणिक लोकांना शिक्षा करेल. यहोवाच्या त्या अभिवचनामुळे जखऱ्‍याला नक्कीच खूप बळ मिळालं असेल. पण खरं पाहता परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता. कित्येक लोक अजूनही अप्रमाणिकपणे वागत होते आणि दुष्ट कृत्यं करत होते. तसंच, यरुशलेमेतलं मंदिर बांधण्याचं कामसुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं. पण, यहुदी लोकांनी यहोवाने सांगितलेलं काम करण्याचं इतक्या लवकर का सोडून दिलं? ते स्वतःच्या स्वार्थासाठी यरुशलेमेत आले होते का?

यरुशलेममध्ये परत आलेले यहुदी मुळात यहोवाचे विश्‍वासू सेवक आहेत हे जखऱ्‍याला माहीत होतं. बाबेलमधलं आपलं घरदार आणि शेतीवाडी सोडून येण्यास “देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली” होती ते हेच लोक होते. (एज्रा १:२, ३, ५) यरुशलेममध्ये येण्यासाठी ते आपला ओळखीचा परिसर सोडून आले होते. आणि त्यांच्यापैकी बहुतेकांनी तर पूर्वी कधीही यरुशलेम पाहिलं नव्हतं. यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याचं काम त्यांच्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं, की डोंगराळ प्रदेशातून सुमारे १,६०० किलोमीटरचा खडतर व धोकादायक प्रवास करण्यासही ते तयार झाले होते.

३, ४. यरुशलेममध्ये परत आलेल्या यहुद्यांसमोर कोणते अडथळे होते?

यहुदी लोक बाबेलहून यरुशलेमला आले त्या प्रवासाची कल्पना करा. यरुशलेममध्ये आपलं जीवन कसं असेल यावर विचार करण्यासाठी आणि त्याबद्दल बोलण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळाला असेल. यरुशलेम आणि तिथलं मंदिर किती भव्य होतं हे त्यांच्यातल्या वयस्कर लोकांनी त्यांना सांगितलं असेल. (एज्रा ३:१२) तुम्ही जर त्यांच्यासोबत प्रवास करत असता, तर यरुशलेमला पोचल्यावर ते शहर पाहताच तुम्हाला कसं वाटलं असतं? जंगली झाडंझुडपं वाढलेल्या पडक्या इमारती, तटाच्या कोसळलेल्या भिंती आणि एकेकाळी शहराची फाटके व बुरुज होते ती ठिकाणं ओसाड झालेली पाहून तुम्हाला वाईट वाटलं असतं का? ते पडलेले तट पाहून बाबेलचे तट किती मोठे व भक्कम होते याची आठवण तुम्हाला झाली असती का? यहुदी लोक मात्र यरुशलेमची अशी स्थिती पाहून निराश झाले नाहीत. कारण, लांबच्या खडतर प्रवासादरम्यान यहोवाने त्यांना कसं सांभाळलं आणि त्यांचं कसं संरक्षण केलं हे त्यांनी स्वतः अनुभवलं होतं. त्यामुळे यरुशलेमेत आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी, पूर्वी मंदिर उभं होतं त्या ठिकाणी एक वेदी बांधली आणि त्यावर ते दररोज यहोवाला अर्पणं वाहू लागले. (एज्रा ३:१, २) त्यांच्यात विलक्षण उत्साह संचारला होता आणि यहोवाने सांगितलेलं काम करण्यासाठी ते अगदी तयार होते. असं वाटत होतं, जणू त्यांचा हा उत्साह आता कोणत्याच गोष्टीमुळे कमी होणार नव्हता.

मंदिर पुन्हा बांधण्यासोबतच यहुदी लोकांना आपली शहरं आणि घरंसुद्धा पुन्हा बांधावी लागणार होती. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना शेतीवाडीही करावी लागणार होती. (एज्रा २:७०) त्यांच्या दृष्टीनं हे काम नक्कीच खूप मोठं होतं! पण, काही काळातच त्यांचे शत्रू आले आणि त्यांनी बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला. शत्रूंकडून होणारा हा विरोध १५ वर्षांपर्यंत चालू राहिला. त्यामुळे यहुदी लोकांचा उत्साह कमी होत गेला. (एज्रा ४:१-४) याशिवाय, इ.स.पू. ५२२ मध्ये या कामात आणखी एक मोठा अडथळा निर्माण झाला. त्या वर्षी, पर्शियाच्या राजाने असं फरमान काढलं, की यरुशलेमेतली सर्व बांधकामं थांबवण्यात यावीत. आता मात्र असं वाटू लागलं, जणू यरुशलेम शहराचं कधीही पुनर्वसन होणार नाही.—एज्रा ४:२१-२४.

५. लोकांनी मंदिराचं बांधकाम थांबवलं तेव्हा यहोवाने त्यांना कशी मदत केली?

आपल्या लोकांना बळाची आणि प्रोत्साहनाची किती गरज आहे हे यहोवाला माहीत होतं. त्यामुळे, त्याने जखऱ्‍याला एक शेवटचा दृष्टान्त दाखवला. यहुदी लोकांवर आपलं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रयत्नांची आपण कदर करतो, याची त्यांना खातरी देण्यासाठी यहोवाने जखऱ्‍याला हा दृष्टान्त दाखवला होता. यहुद्यांनी जर बांधकाम करण्यास पुन्हा सुरुवात केली, तर आपण त्यांचं संरक्षण करू असं अभिवचन यहोवाने त्यांना दिलं. मंदिर पुन्हा बांधण्याच्या बाबतीत यहोवा म्हणाला: “परमेश्‍वर तुमचा देव याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”—जख. ६:१५.

देवदूतांचं सैन्य

६. (क) जखऱ्‍याने पाहिलेल्या आठव्या दृष्टान्ताची सुरुवात कशी झाली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) दृष्टान्तातले घोडे वेगवेगळ्या रंगांचे का होते?

जखऱ्‍याने पाहिलेल्या दृष्टान्तांपैकी आठवा आणि शेवटचा दृष्टान्त सगळ्यात जास्त विश्‍वास वाढवणारा असावा. (जखऱ्‍या ६:१-३ वाचा.) त्यात जखऱ्‍याला काय दिसलं त्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा. तांब्याच्या “दोन पर्वतांमधून” चार रथ येत असल्याचे त्याला दिसले. * रथ ओढणारे घोडे वेगवेगळ्या रंगांचे असल्यामुळे रथांच्या स्वारांमध्ये फरक करणं शक्य झालं. हे पाहिल्यावर जखऱ्‍याने विचारलं: “हे काय आहेत?” (जख. ६:४) आज आपणसुद्धा ते जाणून घेण्यास उत्सुक आहोत. कारण, त्या दृष्टान्ताचा थेट आपल्याशी संबंध आहे.

आजही यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी त्याच्या दूतांचा उपयोग करतो

७, ८. (क) दृष्टान्तातले दोन पर्वत कोणत्या गोष्टीला सूचित करतात? (ख) जखऱ्‍याला दिसलेले पर्वत तांब्याचे का होते?

बायबलमध्ये बऱ्‍याचदा ‘पर्वत’ हे राज्य किंवा सरकार यांना सूचित करतात. जखऱ्‍याला दृष्टान्तात दिसलेले पर्वत, हे दानीएलच्या भविष्यवाणीत उल्लेख केलेल्या पर्वतांसारखेच आहेत. जखऱ्‍याला दिसलेल्या दोन पर्वतांपैकी एक पर्वत यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला आणि त्याच्या सर्वकाळ टिकणाऱ्‍या शासनाला सूचित करतो; तर दुसरा पर्वत मसीहाच्या राज्याला सूचित करतो. (दानी. २:३५, ४५) येशू १९१४ मध्ये राजा बनला तेव्हापासून हे दोन्ही पर्वत अस्तित्वात आहेत. आणि, पृथ्वीसंबंधी असलेला देवाचा संकल्प पूर्ण करण्यात ते खास भूमिका बजावत आहेत.

जखऱ्‍याला दिसलेले पर्वत तांब्याचे का आहेत? तांबं हा मौल्यवान आणि चकाकणारा धातू असतो. खरंतर, इस्राएली लोकांनी निवासमंडप आणि पुढे यरुशलेमेत मंदिर बांधताना तांब्याचा उपयोग करावा असं यहोवाने सांगितलं होतं. (निर्ग. २७:१-३; १ राजे ७:१३-१६) * त्यामुळे, दृष्टान्तात दिसलेले पर्वत तांब्याचे का आहेत हे आपल्याला समजतं. हे पर्वत हेच दाखवून देतात, की यहोवाचा सर्वोच्च अधिकार आणि मसीहाचं राज्य हे सर्वोत्तम आहेत; आणि हे राज्य मानवांना सुरक्षा आणि अनेक आशीर्वाद देईल.

९. रथाचे स्वार कोण आहेत, आणि त्यांच्यावर कोणती कामगिरी सोपवण्यात आली?

दृष्टान्तात दिसलेले रथ आणि स्वार कशाला सूचित करतात? दृष्टान्तातले स्वार देवदूतांना, बहुधा देवदूतांच्या वेगवेगळ्या गटांना सूचित करतात. (जखऱ्‍या ६:५-८ वाचा.) “अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास” असलेले हे देवदूत एक खास कामगिरी बजावण्यासाठी निघतात. त्यांना देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी पाठवलं जातं; खासकरून “उत्तर” देशापासून, म्हणजेच बाबेलपासून देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना पाठवलं जातं. हा दृष्टान्त देऊन यहोवाने हेच दाखवून दिलं, की त्याचे लोक पुन्हा कधीच बाबेलच्या गुलामगिरीत जाणार नाहीत. यहोवाकडून मिळालेल्या या खातरीमुळे, जखऱ्‍याच्या दिवसांत मंदिर बांधणाऱ्‍यांना खरंच किती दिलासा मिळाला असेल! शत्रू आपल्या कामात अडथळा आणतील अशी भीती बाळगण्याची आता त्यांना गरज नव्हती.

१०. रथ आणि त्यांचे स्वार यांबद्दल असलेल्या जखऱ्‍याच्या भविष्यवाणीतून आज आपल्याला कोणती खातरी मिळते?

१० आजही यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी त्याच्या दूतांचा उपयोग करतो. (मला. ३:६; इब्री १:७, १४) लाक्षणिक अर्थाने मोठ्या बाबेलच्या बंदिवासात असलेल्या यहोवाच्या लोकांना १९१९ मध्ये मुक्‍त करण्यात आलं; तेव्हापासून त्यांच्या शत्रूंनी खऱ्‍या उपासनेच्या वाढीत अडथळा आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. (प्रकटी. १८:४) पण, यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. यहोवाचे दूत त्याच्या संघटनेचं संरक्षण करत असल्यामुळे, यहोवाचे लोक पुन्हा खोट्या धर्माच्या गुलामगिरीत जातील अशी भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. (स्तो. ३४:७) उलट, आनंदाने यहोवाची उपासना करण्यात आपण स्वतःला नेहमी व्यस्त ठेवू. जखऱ्‍याच्या भविष्यवाणीतून आपल्याला याची खातरी मिळते, की त्या दोन पर्वतांमुळे आपण अगदी सुरक्षित आहोत.

११. देवाच्या लोकांवर होणाऱ्‍या हल्ल्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज का नाही?

११ लवकरच, सैतानाच्या जगातल्या राजकीय शक्‍ती यहोवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी एकत्र येतील. (यहे. ३८:२, १०-१२; दानी. ११:४०, ४४, ४५; प्रकटी. १९:१९) यहेज्केलच्या भविष्यवाणीत सांगितल्यानुसार, या राजकीय शक्‍ती ‘अभ्राप्रमाणे,’ म्हणजेच ढगांप्रमाणे पृथ्वीला झाकतात. तसंच, देवाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी त्या मोठ्या त्वेषाने घोड्यांवर स्वार होऊन येतात. (यहे. ३८:१५, १६) * यामुळे आपण घाबरून जावं का? मुळीच नाही. कारण, यहोवाचं सैन्य आपल्या बाजूने आहे. मोठ्या संकटादरम्यान, यहोवाचे दूत त्याच्या लोकांचं संरक्षण करतील आणि यहोवाच्या शासनाविरुद्ध उभं राहणाऱ्‍यांचा नाश करतील. (२ थेस्सलनी. १:७, ८) खरंच, किती विलक्षण दिवस असेल तो! पण, यहोवाच्या या स्वर्गीय सैन्याचं नेतृत्व कोण करेल?

राजा व याजक असलेल्या व्यक्‍तीला यहोवा मुकुट घालतो

१२, १३. (क) यहोवाने जखऱ्‍याला काय करायला सांगितलं? (ख) “कोंब” असं जे म्हटलं आहे ते येशू ख्रिस्ताला सूचित करतं हे कशावरून म्हणता येईल?

१२ यहोवाने दाखवलेले ते आठ दृष्टान्त केवळ जखऱ्‍याने पाहिले होते. पण, नंतर जखऱ्‍याने असं काहीतरी केलं जे इतर जणही पाहू शकतील आणि त्यामुळे मंदिराचं बांधकाम करणाऱ्‍यांना प्रोत्साहन मिळू शकेल. (जखऱ्‍या ६:९-१२ वाचा.) बाबेलहून हेल्दय, तोबीया आणि यदया हे तीन पुरुष आले होते. यहोवाने जखऱ्‍याला त्यांच्याकडून सोनं आणि चांदी घेऊन त्यांपासून एक सुंदर “मुकुट” तयार करायला सांगितला. (जख. ६:११) हा मुकुट, यहुदाच्या कुळातला व दावीदचा वंशज असलेला राज्यपाल जरुब्बाबेल यासाठी होता का? नाही. यहोवाने जखऱ्‍याला तो मुकुट महायाजक, यहोशवाच्या डोक्यावर ठेवायला सांगितला. हे पाहून अनेकांना नक्कीच खूप आश्‍चर्य वाटलं असेल.

१३ महायाजक यहोशवा याच्या डोक्यावर मुकुट ठेवण्यात आला म्हणून तो राजा बनला का? नाही. यहोशवा हा दावीदचा वंशज नव्हता; त्यामुळे तो राजा बनू शकत नव्हता. पण, त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवण्याचा एक भविष्यसूचक अर्थ होता. यावरून हे सूचित करण्यात आलं, की भविष्यात असा एक जण येईल जो सर्वकाळाचा राजा व याजक असेल. त्याला “कोंब” किंवा “मुळांतून फुटलेली शाखा” असं म्हटलं आहे. बायबल आपल्याला सांगतं, की तो कोंब येशू ख्रिस्त आहे.—यश. ११:१; मत्त. २:२३, तळटीप.

१४. राजा व महायाजक या नात्याने येशू काय करतो?

१४ येशू हा राजा व महायाजक या नात्यानं कार्य करतो. तो यहोवाच्या स्वर्गीय सैन्याचं नेतृत्व करतो आणि या हिंसक जगात देवाच्या लोकांना सुरक्षित वाटावं म्हणून खूप मेहनत घेतो. (यिर्म. २३:५, ६) आपण देवाच्या सर्वोच्च अधिकाराला पाठिंबा देतो व त्याच्या लोकांचं रक्षण करतो हे दाखवण्यासाठी लवकरच ख्रिस्त राष्ट्रांवर विजय मिळवेल. (प्रकटी. १७:१२-१४; १९:११, १४, १५) पण तो दिवस येण्याआधी, “कोंब” म्हणजेच येशू याला एक अतिशय मोठं कार्य पूर्ण करावं लागणार आहे.

तो मंदिर बांधेल

१५, १६. (क) १९१९ मध्ये कोणत्या कार्याला सुरुवात झाली आणि ते कार्य कोणी केलं? (ख) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीनंतर पृथ्वीवर स्थिती कशी असेल?

१५ राजा व महायाजक या नात्यानं कार्य करण्यासोबतच, यहोवाचं “मंदिर” बांधण्याचं कामही येशूवर सोपवण्यात आलं आहे. (जखऱ्‍या ६:१३ वाचा.) त्यासाठी येशूने १९१९ मध्ये, देवाच्या लोकांना मोठ्या बाबेलच्या, म्हणजेच खोट्या धर्माच्या प्रभावातून मुक्‍त केलं आणि मंडळीची पुन्हा स्थापना केली. तसंच, त्याने “विश्‍वासू आणि बुद्धिमान” दासालाही नियुक्‍त केलं. अभिषिक्‍त बांधवांचा हा गट सध्या एका महत्त्वपूर्ण कार्याचं मार्गदर्शन करत आहे. हे कार्य महान आध्यात्मिक मंदिराच्या पृथ्वीवरील भागात केलं जात आहे. (मत्त. २४:४५) यासोबतच, देवाच्या लोकांना एका शुद्ध मार्गाने उपासना करण्यास मदत करण्याद्वारे येशू त्यांचं शुद्धिकरणही करत आहे.—मला. ३:१-३.

१६ येशू आणि त्याच्यासोबतचे १,४४,००० राजे व याजक एक हजार वर्षं राज्य करतील. या काळादरम्यान, ते विश्‍वासू मानवांना परिपूर्ण होण्यास मदत करतील. हे कार्य पूर्ण झाल्यावर पृथ्वीवर केवळ यहोवाचे खरे उपासक राहतील. शेवटी, खरी उपासना पूर्णार्थाने स्थापन होईल.

मंदिराच्या बांधकामात हातभार लावा

१७. यहोवाने यहुद्यांना कोणती खातरी दिली? आणि त्याच्या संदेशाचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला?

१७ जखऱ्‍याने सांगितलेल्या संदेशाचा यहुद्यांवर काय परिणाम झाला? लोकांना मंदिराचं बांधकाम पूर्ण करता यावं, म्हणून यहोवाने त्यांना मदत करण्याचं आणि त्यांचं संरक्षण करण्याचं अभिवचन दिलं होतं. या अभिवचनामुळे त्यांना आशा मिळाली. पण, आपली संख्या इतकी कमी असताना एवढं मोठं कार्य आपल्याला कसं पूर्ण करता येईल, असा प्रश्‍न कदाचित त्यांना पडला असावा. त्यामुळे त्यांच्या मनातली भीती व शंका दूर करण्यासाठी यहोवाने जखऱ्‍याद्वारे त्यांना काहीतरी सांगितलं. त्याने सांगितलं, की मदत करायला आलेले हेल्दय, तोबीया आणि यदया यांच्याप्रमाणेच इतर अनेक जणही “मंदिर बांधण्यास हातभार लावतील.” (जखऱ्‍या ६:१५ वाचा.) यामुळे यहुद्यांना खातरी पटली, की त्यांच्या कार्याला यहोवाचा पाठिंबा आहे. म्हणूनच, पर्शियाच्या राजाने बांधकामावर अधिकृतपणे बंदी घातली असतानाही, यहुद्यांनी मोठ्या धैर्यानं मंदिर बांधण्याचं काम पुन्हा सुरू केलं. ही बंदी त्यांच्या मार्गात जणू एका मोठ्या डोंगरासारखी होती. पण लवकरच यहोवाने तो मोठा अडथळा नाहीसा केला. शेवटी, इ.स.पू. ५१५ मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. (एज्रा ६:२२; जख. ४:६, ७) अर्थात, यहोवाचे ते शब्द आज चालू असलेल्या एका अतिशय मोठ्या कार्याचंही वर्णन करतात.

आपण यहोवावर करत असलेलं प्रेम तो कधीही विसरणार नाही (परिच्छेद १८, १९ पाहा)

१८. जखऱ्‍या ६:१५ हे वचन आज कशा रीतीने पूर्ण होत आहे?

१८ आज लाखो लोक यहोवाची उपासना करत आहेत. त्याची उपासना करण्यासाठी ते आनंदाने आपल्या मौल्यवान गोष्टी, म्हणजेच आपला वेळ, शक्‍ती आणि भौतिक साधनं खर्च करण्यास तयार असतात. असं करण्याद्वारे, ते यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराला हातभार लावतात. (नीति. ३:९) ते विश्‍वासूपणे देत असलेल्या योगदानाची यहोवा मनापासून कदर करतो याची ते खातरी बाळगू शकतात. आपण आधी पाहिल्याप्रमाणे हेल्दय, तोबीया आणि यदया यांनी सोनं व चांदी आणलं आणि जखऱ्‍याने त्यांपासून मुकुट बनवला. तो मुकुट त्या पुरुषांनी खऱ्‍या उपासनेसाठी दिलेल्या अनुदानाचं एक “स्मारक” किंवा “आठवण” होती. (जख. ६:१४) खरंच, आपण यहोवावर करत असलेलं प्रेम आणि त्याची सेवा तो कधीही विसरणार नाही.—इब्री. ६:१०.

१९. जखऱ्‍याने पाहिलेल्या दृष्टान्तांचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

१९ या शेवटल्या दिवसांत, यहोवाचे लोक खूप मोठं काम साध्य करू शकले आहेत. यहोवाच्या आशीर्वादामुळे आणि ख्रिस्ताच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झालं आहे. एका स्थिर, सुरक्षित आणि सर्वकाळ टिकणाऱ्‍या संघटनेचा भाग असल्याचा आपल्याला खरंच किती आनंद आहे! शिवाय, शुद्ध उपासनेबाबत असलेला यहोवाचा संकल्प पूर्ण होण्याचीही आपल्याला खातरी आहे. त्यामुळे, यहोवाच्या लोकांमध्ये आपल्याला स्थान आहे याची नेहमी कदर बाळगा आणि आपला देव यहोवा याचं ‘लक्ष देऊन ऐका.’ असं केल्यास, राजा व महायाजक, तसंच देवदूत तुमचं संरक्षण करतील. खऱ्‍या उपासनेला होता होईल तितका हातभार लावा. यहोवा नक्कीच तुम्हाला या दुष्ट व्यवस्थेच्या उरलेल्या काळात आणि त्यानंतरही सदासर्वकाळ सुरक्षित ठेवेल.

^ परि. 6 द होली बायबल मराठी आर.व्ही. भाषांतरात, जखऱ्‍या ६:१ मध्ये उल्लेख केलेले पर्वत पितळेचे आहेत असं म्हटलं आहे. पण, बायबलच्या मूळ भाषेत ते पर्वत तांब्याचे असल्याचा उल्लेख आढळतो.

^ परि. 8 बायबलच्या मूळ भाषेत निर्गम २७:१-३ आणि १ राजे ७:१३-१६ या वचनांत पितळेचा नाही, तर तांब्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

^ परि. 11 अधिक माहितीसाठी १५ मे २०१५ टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठं २९-३० वरील, “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.