व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न

भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न

तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य कसं असेल? तुम्ही श्रीमंत व्हाल की गरीब? तुम्हाला आयुष्यात प्रेम मिळेल की तुम्ही एकटेच राहाल? तुम्ही अनेक वर्षं जगाल की थोडे दिवस? अशा प्रश्‍नांबद्दल लोक हजारो वर्षांपासून अंदाज बांधत आहेत.

आज अनेक तज्ज्ञ जागतिक घडामोडींचा अभ्यास करून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे अनेक अंदाज खरे ठरले असले तरी बऱ्‍याच वेळा त्यांना अपयश आलं आहे. कधीकधी तर खूपच भयंकर रीत्या ते अपयशी झाले आहेत. उदाहरणार्थ, बिनतारी यंत्रणेचा शोध लावणारे गुलियेल्मो मार्कोनी, यांनी १९१२ मध्ये असं विधान केलं होतं: “जर बिनतारी युग आलं तर युद्धं होणारच नाहीत.” तसंच, डीक्का रेकॉर्ड कंपनीच्या प्रतिनिधीने १९६२ मध्ये बिटल्स या गिटार वाजवणाऱ्‍या ग्रूपला नाकारलं होतं आणि म्हटलं होतं की गिटार वाजवणारे जास्त काळ प्रसिद्ध राहणार नाहीत.

भविष्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे अनेक जण भूतविद्येकडे वळले आहेत. काही जण सल्ला घेण्यासाठी ज्योतिषांकडे जातात. तर काही जण भविष्य सांगणाऱ्‍यांकडे किंवा मनोवैज्ञानिकांकडे जातात. ही भविष्य सांगणारी माणसं टॅरट कार्ड, अंक किंवा हस्तरेषा पाहून भविष्य “वाचू” शकण्याचा दावा करतात. शिवाय आज राशीभविष्य हे अनेक मासिकांत व वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रकाशित होणारं सदर आहे.

भविष्याबद्दल जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी प्राचीन काळात काही जण देवाचा संदेश सांगण्याचा दावा करणाऱ्‍या पंडितांकडे गेले होते. उदाहरणार्थ, असं म्हटलं जातं की लिडियाचा राजा क्रोएसस याने ग्रीसमधल्या डेल्फी इथल्या देववाणी सांगणाऱ्‍यांना महागडे नजराणे पाठवले होते. पारसचा राजा कोरेश याच्याशी युद्ध केल्यावर आपण जिंकू की हरू हे त्या राजाला माहीत करून घ्यायचं होतं. देववाणी करणाऱ्‍या त्या लोकांनी असं भाकीत केलं की जर त्याने कोरेशवर चढाई केली तर त्याच्या हातून एका ‘महान साम्राज्याचा’ नाश होईल. यावर विश्‍वास ठेवून क्रोएसस राजा युद्धासाठी गेला आणि त्या वेळी एक मोठं साम्राज्य नष्ट झालं. पण ते त्याचं स्वतःचंच होतं!

अंदाजे केलेली ही देववाणी व्यर्थ होती. खरंतर कोणीही युद्ध जिंकलं असतं तरी ती भविष्यवाणी खरी असल्याचं भासलं असतं. पण क्रोएसस राजाला मात्र या चुकीच्या माहितीमुळे भारी किंमत मोजावी लागली. आज लोकप्रिय पद्धतींचा वापर करून भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना यश आलं आहे का?