व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ज्योतिषशास्त्र आणि भविष्य पाहणं—हे भविष्य जाणण्याचे मार्ग आहेत का?

ज्योतिषशास्त्र आणि भविष्य पाहणं—हे भविष्य जाणण्याचे मार्ग आहेत का?

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्र हा भविष्य सांगण्याचा एक असा प्रकार आहे ज्यात असं मानलं जातं की तारे, चंद्र आणि ग्रहांच्या प्रभावामुळे पृथ्वीवर राहणाऱ्‍या मानवांच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषी असा दावा करतात की एखाद्याच्या जन्माच्या वेळी ग्रहांची जी स्थिती असते तिच्यावरून त्या व्यक्‍तीमध्ये कोणते गुण असतील आणि तिचं भविष्य काय असेल हे ठरतं.

ज्योतिषशास्त्राचा उगम जरी प्राचीन बाबेलमधून असला, तरी आज जगभरात हा प्रकार प्रसिद्ध आहे. असं पाहण्यात आलं आहे की भारतातील एकूण ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक, ज्यात वैज्ञानिकांचाही समावेश होतो, ज्योतिषशास्त्रावर विश्‍वास ठेवतात. पण खरंच ज्योतिषशास्त्राला वैज्ञानिक आधार आहे का? नाही. असं का म्हणता येईल याची काही कारणं पाहा.

  • ज्योतिषी जसा दावा करतात त्याप्रमाणे कोणत्याच ग्रहात किंवा ताऱ्‍यात मानवांवर परिणाम करणारी शक्‍ती नाही.

  • त्यांनी केलेली भाकितं अगदीच सर्वसामान्य असतात, ती कोणावरही पूर्ण होऊ शकतात.

  • पृथ्वीभोवती सर्व ग्रह फिरतात या प्राचीन समजुतीवर ज्योतिषशास्त्रात आज अनुमान लावले जातात. पण खरंतर सर्व ग्रह पृथ्वीभोवती नाही, तर सूर्याभोवती फिरतात.

  • एकाच व्यक्‍तीचं भविष्य दोन वेगळ्या ज्योतिष्यांनी सांगितलं, तर ते सारखं असण्याऐवजी वेगवेगळं असतं.

  • असं म्हणतात की एखाद्याच्या राशीवरून त्याचा स्वभाव कसा असेल याचा अनुमान लावता येतो. पण खरंतर एकाच दिवशी जन्मलेल्या दोन व्यक्‍तींचा स्वभाव सारखा नसतो. एखाद्याच्या जन्मतारखेवरून तिचा किंवा त्याचा स्वभाव कसा असेल हे कळू शकत नाही. एक व्यक्‍ती मुळात कशी आहे हे न पाहता ज्योतिषी एखाद्याचा स्वभाव किंवा व्यक्‍तिमत्त्वाबद्दल आधीच काही समजुती मनात बाळगतात. पण मग हा पूर्वग्रह बाळगण्याचाच एक प्रकार नाही का?

भविष्य पाहणं

फार पूर्वीपासून लोक भविष्य पाहणाऱ्‍यांकडे जातात. काही भविष्य पाहणाऱ्‍यांनी मृत प्राण्यांचे किंवा माणसांचे अंतर्गंत अवयव पाहून किंवा कोंबडा ज्या प्रकारे दाणे टिपतो ते पाहून भविष्य सांगितलं होतं. इतर काहींनी चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर कपात उरलेली चहापत्ती किंवा कॉफीच्या कणांवरून भविष्य वर्तवलं होतं. आजकाल हे भविष्य पाहणारे टॅरट कार्ड, क्रिस्टल बॉल, फासे किंवा पोपट जे कार्ड उचलतो त्याचा आणि इतर माध्यमांचा वापर करून माणसांचं भविष्य ‘वाचतात.’ भविष्य जाणून घेण्याचा हा मार्ग भरवशालायक आहे का? नाही. असं का म्हणता येईल, यावर आपण थोडा विचार करूयात.

या प्रकारात किती सातत्य असतं त्याचा जरा विचार करा. भविष्य पाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींनी सांगितलेले भविष्य कधीच सारखं नसतं. एकाच पद्धतीचा वापर करून जरी दुसऱ्‍यांदा भविष्य सांगितलं तरीही ते वेगळं असतं. उदाहरणार्थ, जर एका व्यक्‍तीने दोन भविष्य पाहणाऱ्‍यांना भविष्याबद्दल एक प्रश्‍न विचारला आणि एकाच कार्डचा वापर करून त्यांना उत्तर द्यायला सांगितलं तर ते सारखं असायला हवं, पण सहसा असं होत नाही. त्यांची उत्तरं वेगवेगळी असतात.

भविष्य सांगणाऱ्‍यांच्या पद्धती किंवा हेतू लक्षात घेता ते संशयास्पद आहेत असं वाटतं. काही टीकाकार असं म्हणतात की भविष्य सांगणाऱ्‍यांसाठी कार्ड किंवा क्रिस्टल बॉल केवळ नावापुरत्या वस्तू आहेत. खरंतर ते त्यांच्याकडे भविष्य पाहायला येणाऱ्‍या व्यक्‍तींच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून भविष्य सांगतात. जसं की भविष्य सांगण्यात निपुण असणारा, त्याच्याकडे आलेल्या व्यक्‍तीला काही सर्वसाधारण प्रश्‍न विचारतो. मग उत्तर ऐकताना तो तिचं बारीक निरीक्षण करतो आणि त्या व्यक्‍तीबद्दल अंदाज बांधायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे भविष्य पाहण्यासाठी आलेली व्यक्‍ती नकळत स्वतःबद्दल सगळी माहिती सांगून जाते. पण भविष्य सांगणारा मात्र असं दाखवतो, की त्याला समोरच्या व्यक्‍तीची परिस्थिती आणि तिच्याबद्दलची सगळी माहिती आहे. भविष्य पाहायला आलेल्या व्यक्‍तींचा भरवसा मिळवून काही भविष्य पाहणाऱ्‍यांनी त्यांच्याकडून खूप पैसे उकळले आहेत.

बायबल याविषयी काय म्हणतं?

ज्योतिषशास्त्र आणि भविष्य पाहणं या गोष्टी असं सुचवतात की आपलं भविष्य आधीच ठरलेलं आहे. पण हे खरं आहे का? बायबल सांगतं की आपण कशावर विश्‍वास ठेवावा किंवा काय करावं याची निवड करण्याची क्षमता आपल्यात आहे आणि आपण जी निवड करू तिचा परिणाम आपल्या भविष्यावर होतो.—यहोशवा २४:१५.

देवाच्या सेवकांकडे ज्योतिषशास्त्र आणि भविष्य पाहणं या गोष्टी नाकारण्यासाठी एक खास कारण आहे. ते म्हणजे, कोणत्याही प्रकारचं भविष्यकथन देवाला वीट आणणारं आहे. बायबल म्हणतं: “शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” aअनुवाद १८:१०-१२.

a बायबल ज्या मूळ भाषेत लिहिण्यात आलं होतं त्यात परमेश्‍वराचं नाव यहोवा असं दिलं आहे.