व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अचूक भविष्यवाणीचा एक मूक साक्षीदार

अचूक भविष्यवाणीचा एक मूक साक्षीदार

मध्य रोममधल्या इटली शहरात विजय दर्शवणारी एक कमान आहे. जगभरातून अनेक लोक हे स्मारक पाहण्यासाठी येतात. ही कमान रोमचा एक लाडका सम्राट, टायटस याच्या स्मरणार्थ उभारण्यात आली होती.

आर्क ऑफ टायटस किंवा टायटसची कमान यावर प्रख्यात ऐतिहासिक घटनेचं सादरीकरण करणाऱ्‍या दोन मोठ्या शिल्पकृती आढळतात. पण अनेकांना माहीत नाही की या कमानीचा बायबलशी एक अनोखा संबंध आहे. बायबलमध्ये दिलेली एक भविष्यवाणी अचूक रीतीने पूर्ण झाली याचा आर्क ऑफ टायटस एक मूक साक्षीदार आहे.

एक शहर ज्याचा विनाश ठरला होता

इ.स. ३० पर्यंत रोमी साम्राज्य ब्रिटन आणि गॉल (आताचं फ्रान्स) ते इजिप्तपर्यंत विस्तारलेलं होतं. या साम्राज्यात पूर्वी कधी नव्हे इतकी भरभराट आणि स्थैर्य होतं. पण दूरवर असलेल्या एका प्रदेशामुळे रोमच्या नाकी नऊ आले होते. तो होता यहूदीयाचा प्रांत!

एन्सायक्लोपिडिया ऑफ एन्शियंट रोम यात म्हटलं आहे: “रोमच्या अधिकाराखाली असलेल्या काही क्षेत्रांत रोमचा द्वेष केला जायचा, तसंच रोमलाही ते नापसंत होते. त्यांपैकी एक होतं यहूदीया. आपल्या परंपरेचा अनादर करणाऱ्‍या विदेशी अधिकाऱ्‍यांचा यहुदी लोकांना राग यायचा. रोमी लोक यहुदी लोकांना गैरवागणूक द्यायचे व त्यांचा छळ करायचे.” अनेक यहुद्यांना वाटलं होतं, की एक नेता येईल आणि रोमी लोकांना तिथून हकलवून लावेल व इस्राएलला सुरुवातीचं वैभव परत मिळवून देईल. पण इ.स. ३३ मध्ये येशूने यरुशलेमवर येणाऱ्‍या महासंकटाविषयी सांगितलं.

येशूने म्हटलं: “कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा तुझे शत्रू तुझ्याभोवती टोकदार खांबांची भिंत उभारतील, तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला अडवतील. ते तुला जमीनदोस्त करतील व तुझ्या मुलाबाळांना चिरडून टाकतील आणि तुझ्यात एकाही दगडावर दगड राहणार नाही, कारण तुझा न्याय करण्याची वेळ तू ओळखली नाही.”लूक १९:४३, ४४.

येशूचे शब्द ऐकून त्याच्या शिष्यांना काहीच कळलं नाही. दोन दिवसांनंतर यरुशलेमचं मंदिर पाहून त्याच्या शिष्यांपैकी एकाने म्हटलं: “हे गुरू, पाहा! किती सुंदर दगड आणि इमारती!” असे उद्‌गार निघणं साहजिकच होतं! कारण मंदिराच्या काही दगडांची लांबी ३६ फूटापेक्षा जास्त (११ मीटर), रुंदी १६ फूटापेक्षा जास्त (५ मीटर) आणि उंची १० फूटापेक्षा जास्त (३ मीटर) असावी असा अहवाल आहे. पण येशूने त्यांना म्हटलं: “असे दिवस येत आहेत, जेव्हा तुम्ही पाहत असलेल्या या सर्व गोष्टी राहणार नाहीत आणि इथे एकाही दगडावर दगड राहणार नाही, प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”मार्क १३:१; लूक २१:६.

येशूने पुढे म्हटलं: “जेव्हा तुम्ही यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहाल, तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे हे ओळखा. तेव्हा, जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जाण्यास सुरुवात करावी आणि जे यरुशलेममध्ये आहेत त्यांनी बाहेर जावं व जे शेतांत आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.” (लूक २१:२०, २१) पण येशूचे शब्द खरे ठरले का?

शहराचा नाश

३३ वर्षं उलटल्यावरही यहूदीयातले लोक रोमच्या अधिकाराखालीच होते. आणि त्यांच्या मनात अजूनही रोमी लोकांबद्दल द्वेष होता. इ.स. ६६ मध्ये यहूदीया प्रांतावर असलेला रोमी अधिकारी गेशीयस फ्लॉरस याने मंदिराच्या भांडारातून रक्कम काढून घेतली आणि यामुळे यहुदी लोक खूप संतापले. त्यानंतर लगेच यहुदी बंडखोर यरुशलेममध्ये शिरले आणि त्यांनी तिथल्या रोमी सैनिकांना ठार मारलं. आपण रोमी शासनाच्या अधीन नाही अशी घोषणाही त्यांनी केली.

हे घडल्याच्या जवळजवळ तीन महिन्यांनंतर बंडखोरांचा नाश करण्यासाठी सेस्टियस गॅलसने ३०,००० पेक्षा जास्त सैनिक सोबत घेऊन यरुशलेमला वेढा घातला. हे रोमी सैनिक लगेच शहरात शिरले आणि त्यांनी मंदिराच्या बाहेर असलेली तटबंदीची भिंत पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर अचानक त्यांनी माघार घेतली आणि ते तिथून निघून गेले. हे पाहून आनंदी झालेल्या यहुदी बंडखोरांनी त्यांचा पाठलाग केला. इथे यरुशलेममध्ये ख्रिश्‍चनांना जेव्हा कळलं की रोमी सैनिक आणि यहुदी बंडखोर शहर सोडून निघून गेले आहेत तेव्हा येशूने दिलेल्या सूचनेनुसार ते पळून यार्देन नदी पलीकडे असलेल्या डोंगरांवर गेले.—मत्तय २४:१५, १६.

पुढच्या वर्षी रोमने यहूदीयावर पुन्हा चढाई करण्याचं ठरवलं. या वेळी सैन्याचं नेतृत्व सेनापती व्हेस्पासियन आणि त्याचा मुलगा टायटस हे करत होते. पण त्यानंतर इ.स. ६८ मध्ये सम्राट नीरो याचा मृत्यू झाला आणि सेनापती व्हेस्पासियनला सम्राट बनण्यासाठी रोमला परतावं लागलं. म्हणून मग त्याने टायटसला जवळजवळ ६०,००० सैनिक सोबत देऊन यहूदीयाची कामगिरी सोपवली.

इ.स. ७० च्या जून महिन्यात टायटसने त्याच्या सैनिकांना यहूदीया शहराबाहेर असलेली झाडं कापायला सांगितली. त्या झाडांचा वापर करून सैनिकांनी ७ कि.मी. लांबीची (४.५ मैल) टोकदार खांबांची भिंत यरुशलेमभोवती बांधली. याच्या जवळपास तीन महिन्यांनंतर रोमी सैनिकांनी शहर व मंदिर लुटून ते जाळून टाकलं. येशूने भविष्यवाणी केल्यानुसार मंदिराचा एकही दगड जागच्या जागी राहिला नाही; रोमी लोकांनी मंदिराचा पूर्णपणे नाश केला! (लूक १९:४३, ४४) एका अहवालानुसार यरुशलेम आणि इतर भागात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जवळजवळ ५,००,००० इतकी होती.

भव्य विजय

इ.स. ७१ मध्ये टायटस इटलीला परतला तेव्हा त्याच्या भव्य स्वागतासाठी संपूर्ण शहर लोटलं होतं. रोमच्या राजधानीत म्हणजे इटलीमध्ये पूर्वी कधी काढली नव्हती अशी भव्य मिरवणूक या विजयानिमित्त काढण्यात आली.

रोमच्या रस्त्यावरून जेव्हा लुटून आणलेल्या संपत्तीची मिरवणूक काढण्यात आली, तेव्हा ती पाहून लोक अगदी थक्क झाले. लुटून आणलेल्या बोटी, युद्धात घडलेल्या घटनांचं सादरीकरण आणि यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या वस्तूंकडे पाहून लोकांना खूप नवल वाटलं.

व्हेस्पासियनच्या मृत्यूनंतर टायटसला इ.स. ७९ मध्ये सम्राट बनवण्यात आलं. पण दोन वर्षांतच टायटसचा अकाली मृत्यू झाला. त्याचा लहान भाऊ डमिशन हा त्यानंतर सम्राट बनला. टायटसने मिळवलेल्या विजयाच्या आठवणीत त्याने लगेचच एक कमान उभारली.

आज प्रसिद्ध असलेली कमान

रोममधलं आर्क ऑफ टायटस

दरवर्षी लाखो लोक रोमला येतात तेव्हा ते आर्क ऑफ टायटस पाहून त्याचं फार कौतुक करतात. काहींना ते कलेची भव्य प्रतिकृती वाटतं, तर इतरांना ते रोमी साम्राज्याच्या शक्‍तीचं सन्मानीय प्रतीक वाटतं. तसंच, असेही लोक आहेत ज्यांना ते यरुशलेम आणि त्याच्या मंदिराच्या नाशाची आठवण करून देतं.

पण बायबलचा खोलवर अभ्यास करणाऱ्‍यांसाठी मात्र आर्क ऑफ टायटसचं महत्त्व याहीपेक्षा जास्त आहे. बायबलच्या भविष्यवाण्या भरवशालायक आहेत आणि त्या अचूक रीतीने पूर्ण झाल्या याची ही कमान मूक साक्षीदार आहे. तसंच, यामुळे हेही सिद्ध होतं की त्या भविष्यवाण्या देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या आहेत.—२ पेत्र १:१९-२१.