व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पूर्ण होणारी अभिवचनं

पूर्ण होणारी अभिवचनं

येशूने सांगितल्याप्रमाणे देवाच्या राज्याविषयी असलेला आनंदाचा संदेश जगभरात प्रचार केला जात आहे. (मत्तय २४:१४) हे राज्य देवाचं सरकार असल्याचं आपल्याला बायबलमधल्या दानीएलच्या पुस्तकातून समजतं. या पुस्तकाच्या दुसऱ्‍या अध्यायात बाबेलच्या साम्राज्यापासून आपल्या काळापर्यंत प्रभुत्व गाजवणारी कोणकोणती मानवी सरकारं किंवा राज्यं येतील हे सांगितलं आहे. पुढे काय होईल याबद्दल त्यातल्या ४४ व्या वचनामध्ये म्हटलं आहे:

“त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”

या आणि बायबलमध्ये दिलेल्या इतर भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं आहे, की देवाचं राज्य सर्व मानवी सरकारांची जागा घेईल आणि पृथ्वीवर शांती व सुरक्षा आणेल. या राज्यात मानव कोणकोणते आशीर्वाद अनुभवतील? याविषयी लवकरच पूर्ण होणारी काही अद्‌भुत अभिवचनं आता आपण पाहू.

  • युद्धं नसतील

    स्तोत्र ४६:९: “तो [देव] दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो.”

    लोकांचा जीव घेणारी शस्त्रं बनवण्यासाठी वापरला जाणारा सर्व पैसा आणि कौशल्यं जर त्यांच्या भल्यासाठी वापरला, तर या जगाचं चित्र किती वेगळं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? देवाच्या राज्यात हे अभिवचन नक्कीच पूर्ण होईल.

  • आजारपण नसेल

    यशया ३३:२४: “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”

    हृदयविकार, कॅन्सर, मलेरिया किंवा दुसरा कोणताही आजार नसेल तर हे जग कसं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? हॉस्पिटल किंवा औषधाची गरजच भासणार नाही. भविष्यात पृथ्वीवर सर्व मानवांना एक परिपूर्ण आरोग्य लाभेल.

  • अन्‍नटंचाई नसेल

    स्तोत्र ७२:१६: “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.”

    सर्वांना खायला पोटभर अन्‍न मिळेल एवढं पीक पृथ्वी देईल आणि ते सर्वांना मिळेलही. उपासमार आणि कुपोषण या गोष्टी नाहीशा होतील.

  • दुःख, शोक आणि मृत्यू नसेल

    प्रकटीकरण २१:४: “[देव] त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”

    याचा अर्थ आपण नंदनवन झालेल्या या पृथ्वीवर कायमस्वरूपी एक परिपूर्ण जीवन जगू. आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्या यहोवा देवाने हेच तर अभिवचन दिलं आहे!

“विफल होऊन परत येणार नाही”

पण या गोष्टींवर आपण विश्‍वास ठेवू शकतो का? बायबलमधल्या अभिवचनांमध्ये वर्णन केलेलं जीवन जगायला लोकांना आवडेल या गोष्टीशी बरेच जण सहमत असतील, पण माणूस कायमस्वरूपी जगू शकतो हे समजणं त्यांना कठीण जातं. आणि असं वाटणं साहजिकच आहे, कारण असं जीवन आजपर्यंत कधीच कोणी अनुभवलेलं नाही.

पाप आणि मृत्यूच्या गुलामीत असलेले मानव दुःखाच्या, कष्टाच्या व त्रासाच्या ओझ्याखाली पार दबून गेले आहेत. इतक्या वर्षांपासून या गोष्टी सोसत आल्यामुळे या सर्व गोष्टी जीवनाचाच एक भाग आहेत असं अनेकांना वाटतं. पण आपल्या निर्माणकर्त्याने, यहोवा देवाने मानवांसाठी हे उद्देशिलं नव्हतं.

देवाने दिलेली सर्व अभिवचनं नक्कीच पूर्ण होतील याबद्दल आपल्याला खातरी पटावी म्हणून देवाने त्याच्या वचनाबद्दल म्हटलं आहे: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.

बायबल देवाबद्दल म्हणतं की तो “कधीही खोटे बोलू शकत नाही.” (तीत १:२) देवाने दिलेली ही सर्व अभिवचनं भविष्यात पूर्ण होणार आहेत म्हणून आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांचं परीक्षण करणं सुज्ञपणाचं ठरेल: देवाच्या वचनानुसार पृथ्वी नंदनवन बनेल तेव्हा त्यात मानवांना सर्वकाळासाठी जगणं शक्य होईल का? देवाच्या अभिवचनाचा आपल्याला फायदा व्हावा, यासाठी आपण काय केलं पाहिजे? या नियतकालिकात पुढे दिलेल्या लेखांमुळे आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं मिळवायला मदत होईल.