व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकमेकांना प्रोत्साहन द्या—खासकरून आता

एकमेकांना प्रोत्साहन द्या—खासकरून आता

“एकमेकांबद्दल विचारशील राहून . . . प्रोत्साहन देत राहावे आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त करावे.”—इब्री १०:२४, २५.

गीत क्रमांक: ५३, २०

१. प्रेषित पौलने इब्री ख्रिश्‍चनांना एकमेकांना आणखी जास्त प्रोत्साहन देण्यासाठी उत्तेजन का दिलं?

पहिल्या शतकात प्रेषित पौलने इब्री ख्रिश्‍चनांना पुढील सल्ला दिला: “एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या, आणि जशी काहींची रीत आहे, त्याप्रमाणे आपण आपले एकत्र येणे सोडू नये, तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावे आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त करावे.” (इब्री १०:२४, २५) पौलने आणखी जास्त प्रोत्साहन देण्याबद्दल का सांगितलं, असा विचार कदाचित तिथल्या बांधवांच्या मनात आला असेल. हे सांगितल्याच्या पाच वर्षांच्या आतच याचं एक कारण स्पष्ट झालं. यरुशलेमसाठी यहोवाच्या न्यायदंडाचा दिवस जवळ आला आहे हे त्यांना समजलं. येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना शहर सोडून जाण्याची गरज आहे हे त्यांनी ओळखलं. (लूक २१:२०-२२; प्रे. कार्ये २:१९, २०) रोमी लोकांनी यरुशलेमचा इ.स. ७० मध्ये नाश केला तेव्हा तो न्यायदंडाचा दिवस आला.

२. आज आपण एकमेकांना प्रोत्साहन देण्याबद्दल जास्त विचार करणं गरजेचं का आहे?

आज आपणही अशाच परिस्थितीत आहोत. यहोवाचा “दिवस मोठा व फार भयंकर आहे,” आणि तो खूप जवळ आला आहे. (योए. २:११) सफन्याच्या भविष्यवाणीचे शब्द आपल्या काळातही लागू होतात. त्याने म्हटलं: “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.” (सफ. १:१४) यामुळे “एकमेकांबद्दल काळजी करून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या.” (इब्री १०:२४, तळटीप) बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आपला त्यांच्यासोबत जवळचा नातेसंबंध असला पाहिजे. तेव्हाच गरजेच्या वेळी आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकू.

प्रोत्साहनाची गरज कोणाला?

३. प्रेषित पौलने प्रोत्साहन देण्याबद्दल काय सांगितलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

“मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.” (नीति. १२:२५) आपल्या सर्वांनाच जीवनात कधी ना कधी प्रोत्साहनाची गरज पडते. पौलने स्पष्ट केलं की जे बांधव इतरांना प्रोत्साहन देतात त्यांनादेखील प्रोत्साहनाची गरज असते. त्याने रोममधील बांधवांना म्हटलं: “तुम्हाला भेटण्याची माझी फार इच्छा आहे; यासाठी, की तुम्हाला काही आध्यात्मिक देणगी देऊन मला तुमचा विश्‍वास मजबूत करता यावा. किंवा त्यापेक्षा, एकमेकांच्या विश्‍वासामुळे म्हणजेच माझ्या व तुमच्या विश्‍वासामुळे आपल्याला एकमेकांना प्रोत्साहन देता यावे.” (रोम. १:११, १२) यावरून कळतं की प्रेषित पौललाही प्रोत्साहनाची गरज होती.—रोमकर १५:३०-३२ वाचा.

४, ५. आपण कोणाकोणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे? आपण त्यांना प्रोत्साहन का दिलं पाहिजे?

यहोवाची पूर्णवेळ सेवा करणाऱ्‍या बंधुभगिनींना आपण प्रोत्साहन देऊ शकतो. यात यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणारे पायनियर बंधुभगिनीही सामील आहेत. यांपैकी बऱ्‍याच जणांनी पायनियर सेवा करता यावी म्हणून जीवनात अनेक आवडीच्या गोष्टींचा त्याग केला आहे. हीच गोष्ट मिशनरी सेवा करणाऱ्‍या, शाखा कार्यालय किंवा भाषांतर कार्यालयांमध्ये सेवा करणाऱ्‍या बंधुभगिनींनाही लागू होते. तसंच, विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीनेही बरेच त्याग केलेले असतात. हे सर्व बंधुभगिनी यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करण्यासाठी आपल्या जीवनात अनेक त्याग करतात. म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मंडळीत असेदेखील बंधुभगिनी असू शकतात ज्यांनी आधी पूर्णवेळची सेवा केली होती, पण आता परिस्थितीमुळे त्यांना ती करणं शक्य नाही. अशा बांधवांनाही आपण प्रोत्साहन देतो तेव्हा ते त्याची कदर करतात.

आणखी कोणाला प्रोत्साहनाची गरज असते? “केवळ प्रभूमध्ये” लग्न करा, ही यहोवाने दिलेली आज्ञा पाळण्यासाठी आज बरेच बंधुभगिनी अविवाहित आहेत. अशांनाही प्रोत्साहनाची गरज असते. (१ करिंथ. ७:३९) आपल्या पत्नीवर आपलं किती प्रेम आहे आणि ती करत असलेल्या कामांची आपण किती कदर करतो, हे जेव्हा एक पती पत्नीला सांगतो तेव्हा तिलाही प्रोत्साहन मिळतं. (नीति. ३१:२८, ३१) आज काही बंधुभगिनींचा विश्‍वासामुळे छळ होतो किंवा मग ते आजारपणाचा सामना करत असतात. अशा बंधुभगिनींना प्रोत्साहनाची खूप गरज असते. (२ थेस्सलनी. १:३-५) विश्‍वासात टिकून राहणाऱ्‍या या सर्व बंधुभगिनींना यहोवा आणि येशू प्रोत्साहन देतात.—२ थेस्सलनीकाकर २:१६, १७ वाचा.

वडील प्रोत्साहन देण्यासाठी मेहनत घेतात

६. यशया ३२:१, २ या वचनांतून आपण वडिलांच्या जबाबदारीबद्दल काय शिकतो?

यशया ३२:१, २ वाचा. आज आपण कठीण काळात जगत असल्यामुळे निराश होण्याची शक्यता जास्त आहे. येशू ख्रिस्त त्याच्या अभिषिक्‍त बांधवांचा आणि मोठ्या कळपातील ‘सरदार’ म्हणजेच वडिलांचा उपयोग करून आपल्याला प्रोत्साहन देतो. मंडळीतील वडील आपल्या विश्‍वासावर “सत्ता गाजवणारे” नसून, आपल्या आनंदात “सहकारी” आहेत. आपण आनंदी आणि यहोवाला विश्‍वासू राहावं यासाठी ते आपल्याला मदत करतात.—२ करिंथ. १:२४.

७, ८. वडील इतरांना आपल्या शब्दांनी आणि कार्यांनी प्रोत्साहन कसं देऊ शकतात?

वडील प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. त्याने जसं बांधवांना प्रोत्साहन दिलं तसं तेही देऊ शकतात. थेस्सलनीकामधल्या ख्रिस्ती बांधवांचा छळ झाला तेव्हा त्याने त्यांना पत्र लिहिलं. त्यात त्याने म्हटलं: “तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाविषयीचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही देण्यास तयार होतो, कारण तुम्ही आमच्यासाठी अतिशय प्रिय बनला होता.”—१ थेस्सलनी. २:८.

वडिलांच्या शब्दांमुळे खूप प्रोत्साहन मिळू शकतं. पण फक्‍त तितकं करणंच पुरेसं आहे का? पौलने इफिसच्या वडिलांना म्हटलं: “तुम्हीही अशा प्रकारे कष्ट करून दुर्बलांना मदत करावी आणि प्रभू येशूचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवावे की, ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.’” (प्रे. कार्ये २०:३५) पौल बांधवांसाठी आपलं सर्व काही द्यायला तयार होता. बांधवांच्या हितासाठी तो त्याचं सर्वोत्तम द्यायला तयार आहे हे त्याने आपल्या कार्यांद्वारे दाखवलं. (२ करिंथ. १२:१५) त्याच प्रकारे, वडिलांनी फक्‍त आपल्या शब्दांनी नव्हे तर आपल्या कार्यांनीसुद्धा इतरांना प्रोत्साहन आणि सांत्वन दिलं पाहिजे. यावरून हे दिसून येईल की त्यांना इतरांबद्दल मनापासून काळजी आहे.—१ करिंथ. १४:३.

९. बांधवांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे वडील सल्ला कसा देऊ शकतात?

बांधवांना मदत करण्यासाठी कधीकधी वडील त्यांना सल्ला देतात. प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे सल्ला कसा देता येईल हे वडील बायबलमधून शिकू शकतात. सल्ला देण्याच्या बाबतीत येशूने उत्तम उदाहरण मांडलं. पुनरुत्थानानंतर आशिया मायनरमधील मंडळ्यांना दिलेल्या संदेशात येशूने त्यांना सल्ला दिला. इफिस, पर्गम आणि थुवतीरा इथल्या मंडळ्यांना त्याने कडक शब्दांत ताकीद दिली. पण हे करण्याआधी येशूने ते करत असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांची प्रशंसा केली. (प्रकटी. २:१-५, १२, १३, १८, १९) लावदिकीया मंडळीला येशूने म्हटलं: “ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे त्या सर्वांना मी सुधारतो आणि त्यांचं ताडन करतो. म्हणून आवेशी हो आणि पश्‍चात्ताप कर.” (प्रकटी. ३:१९) येशूच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करून वडील बांधवांना सल्ला देऊ शकतात.

इतरांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी फक्‍त वडिलांची नाही

पालकांनो तुम्ही आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं प्रशिक्षण देत आहात का? (परिच्छेद १० पाहा)

१०. आपण एकमेकांना विश्‍वासात मजबूत होण्यासाठी मदत कशी करू शकतो?

१० प्रोत्साहन देण्याची जबाबदारी फक्‍त वडिलांनाच देण्यात आलेली नाही. “गरजेप्रमाणे इतरांना प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी तुम्ही बोलाव्यात,” असं पौलने ख्रिश्‍चनांना सांगितलं. (इफिस. ४:२९) इतरांना कशाची गरज आहे याकडे आपल्या प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे. पौलने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलं: “गळून गेलेले हात आणि कमजोर झालेले गुडघे बळकट करा, आणि आपल्या पायांसाठी सरळ मार्ग तयार करत राहा, यासाठी की लंगड्या पायाचा सांधा निखळू नये, तर तो बरा व्हावा.” (इब्री १२:१२, १३) आपण तरुण असो वा वृद्ध, आपल्यापैकी प्रत्येक जण इतरांना प्रोत्साहन देऊन त्यांना विश्‍वासात मजबूत करू शकतो.

११. निराश असताना मारथाला कशामुळे मदत झाली?

११ मारथा * नावाची बहीण काही काळापासून खूप निराश होती. तिने लिहिलं: “प्रोत्साहन मिळावं म्हणून एकदा प्रार्थना करत असताना, मला एक वृद्ध बहीण भेटली. मला त्या बहिणीने आपुलकी दाखवली आणि ती माझ्यासोबत खूप धीराने वागली. त्या वेळी मला या गोष्टींचीच खूप गरज होती. तिने मला तिचा अनुभव सांगितला आणि मीसुद्धा तशाच परिस्थितीतून जात होते. तिने केलेल्या मदतीमुळे मला वाटलं की मला समजून घेणारं कोणीतरी आहे.” आपल्या शब्दांमुळे मारथाला किती मदत झाली याची जाणीवही कदाचित त्या बहिणीला नसेल.

१२, १३. फिलिप्पै २:१-४ या वचनांत दिलेला सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

१२ फिलिप्पैमधल्या मंडळीला पौलने लिहिलं: “ख्रिस्तासोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही इतरांना प्रेमाने प्रोत्साहन देता व त्यांचे सांत्वन करता, तसेच, त्यांच्याबद्दल काळजी, जिव्हाळा व करुणा व्यक्‍त करता. तेव्हा, पुढेही अशाच प्रकारे वागत राहा. अर्थात, एक मनाचे होऊन व एकमेकांवर सारखेच प्रेम करून, पूर्ण एकतेत राहून व एकच ध्येय मनात ठेवून चाला, म्हणजे माझा आनंद परिपूर्ण होईल. भांडखोर वृत्तीने किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका, तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा, आणि फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पै. २:१-४.

१३ एकमेकांना मदत करण्यासाठी आपण नेहमी संधी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण “काळजी,” “जिव्हाळा व करुणा” व्यक्‍त करून आपल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देऊ शकतो.

प्रोत्साहन देण्याचे काही मार्ग

१४. प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग कोणता आहे?

१४ आपण ज्या बंधुभगिनींना मदत केली ते अजूनही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत हे पाहून आपल्याला आनंद होतो. प्रेषित योहानने लिहिलं: “माझी मुले सत्याच्या मार्गात चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो, तितका दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीने होत नाही.” (३ योहा. ४) पायनियर बऱ्‍याच लोकांना सत्य शिकायला मदत करतात. खूप वर्षांनी त्यांना जेव्हा कळतं की त्यांचा एखादा विद्यार्थी अजूनही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहे, कदाचित तो पायनियर बनला आहे, तेव्हा त्यांना किती आनंद होत असेल याचा विचार करा. म्हणून जर पायनियर कधी निराश झाले, तर आपण त्यांना याची आठवण करून देऊ शकतो की त्यांनी इतरांना मदत करण्यासाठी किती काही केलं आहे.

१५. यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व काय करू शकतो?

१५ बऱ्‍याच विभागीय पर्यवेक्षकांनी म्हटलं आहे की आभार व्यक्‍त करण्यासाठी बांधवांनी लिहिलेल्या पत्रांमुळे, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला खूप प्रोत्साहन मिळालं आहे. ही गोष्ट मंडळीतील वडील, मिशनरी, पायनियर आणि बेथेलमध्ये सेवा करणारे बंधुभगिनी या सर्वांच्या बाबतीतही खरी आहे. हे सर्व लोक यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत. म्हणून ते करत असलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार मानण्याद्वारे आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो.

आपण सर्व जण प्रोत्साहन देऊ शकतो

१६. आपण इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करू शकतो?

१६ इतरांबद्दल असलेल्या भावना व्यक्‍त करणं तुम्हाला कठीण जातं का? खरं पाहिलं तर इतरांना प्रोत्साहन देणं खूप अवघड नाही. यासाठी सुरुवात म्हणून तुम्ही इतरांना पाहून स्मितहास्य करू शकता. जर इतरांनी तुम्हाला प्रतिक्रिया दिली नाही, तर याचा अर्थ कदाचित ते एखाद्या समस्येतून जात आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. अशा प्रसंगी तुम्ही त्यांचं धीराने ऐकून त्यांना सांत्वन देऊ शकता.—याको. १:१९.

१७. एका तरुण बांधवाला कशामुळे प्रोत्साहन मिळालं?

१७ हेनरी नावाचा तरुण बांधव खूप निराश होता. त्याच्या बऱ्‍याच जवळच्या नातेवाइकांनी यहोवाची सेवा करणं सोडून दिलं होतं. यात त्याचे बाबादेखील होते, जे मंडळीत वडील म्हणून सेवा करायचे. एकदा विभागीय पर्यवेक्षकाने पाहिलं की हेनरी खूप निराश आहे. म्हणून मग ते त्याला बाहेर कॉफी प्यायला घेऊन गेले. हेनरीने त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं आणि त्यांनीही त्याचं शांतपणे ऐकून घेतलं. हेनरीला जाणीव झाली की आपल्या कुटुंबाला सत्यात परत येण्यासाठी मदत करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वतः यहोवाला विश्‍वासू राहणं. स्तोत्र ४६, सफन्या ३:१७ आणि मार्क १०:२९, ३० ही वचनं वाचल्यामुळे हेनरीला खूप सांत्वन मिळालं.

सर्व जण एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतात (परिच्छेद १८ पाहा)

१८. (क) प्रोत्साहन देण्याबद्दल शलमोन राजाने काय म्हटलं? (ख) प्रेषित पौलने काय करण्याचं प्रोत्साहन दिलं?

१८ मारथा आणि हेनरी यांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो? आपल्यापैकी प्रत्येक जण गरज असलेल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देऊ शकतो. शलमोन राजाने म्हटलं: “समयोचित बोल किती उत्तम! नेत्रांचे तेज अंतःकरणाला उल्लासवते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.” (नीति. १५:२३, ३०) मंडळीत अशी एखादी व्यक्‍ती आहे का जी निराश आहे? तिला मदत करण्यासाठी तुम्ही टेहळणी बुरूज मधला किंवा मग आपल्या वेबसाईटवरचा एखादा लेख वाचून दाखवू शकता का? अशा गोष्टी कदाचित आपल्याला फार छोट्या वाटतील, पण त्या करूनही आपण एखाद्याला प्रोत्साहन देऊ शकतो. तसंच, पौलने आपल्याला सांगितलं आहे की सोबत मिळून राज्य गीत गायल्यामुळेही आपण इतरांना प्रोत्साहन देऊ शकतो. त्याने म्हटलं: “स्तुतिगीते गाऊन, देवाचे गुणगान करून आणि कृतज्ञ अंतःकरणाने उपासनेची गीते गाऊन एकमेकांना शिकवत राहा व प्रोत्साहन देत राहा आणि आपल्या हृदयात यहोवासाठी गीते गा.”—कलस्सै. ३:१६; प्रे. कार्ये १६:२५.

१९. प्रोत्साहन देणं दिवसेंदिवस महत्त्वाचं का होत चाललं आहे? आपण काय करणं गरजेचं आहे?

१९ यहोवाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसं एकमेकांना प्रोत्साहन देणं जास्त गरजेचं बनत चाललं आहे. (इब्री १०:२५) पौलने दिलेला सल्ला पाळला तर आपण आनंदी होऊ. त्याने म्हटलं: “जसे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्‍नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.”—१ थेस्सलनी. ५:११.

^ परि. 11 नावं बदलण्यात आली आहेत.