व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

सुरुवातीला गरीब पण शेवटी श्रीमंत!

सुरुवातीला गरीब पण शेवटी श्रीमंत!

अमेरिकेतील इंडियाना इथल्या लिबर्टी या छोट्याशा शहरात, लाकडाच्या एका लहान घरात माझा जन्म झाला. मला एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी होत्या. माझ्या जन्माच्या काही काळानंतर माझ्या दोन लहान भावांचा आणि छोट्या बहिणीचा जन्म झाला.

माझा जन्म ज्या ठिकाणी झाला ते हे लाकडाचं घर

मी शाळेत असताना आमच्या शहरात जास्त काही बदल झाला नव्हता. शाळेत पहिल्या इयत्तेत जी मुलं सोबत असायची, तीच शेवटच्या वर्षांतही सोबत असायची. खरंतर गावातल्या बहुतेकांची नावं एकमेकांना माहीत असायची.

आम्ही सात भावंडं होतो आणि लहान असताना मी शेतात काम करायला शिकलो

लिबर्टी शहराच्या आजूबाजूला छोटी छोटी शेतं होती. तिथे प्रामुख्याने मक्याची शेती केली जायची. माझा जन्म झाला तेव्हा माझे बाबा तिथल्याच एका शेतकऱ्‍याकडे कामाला होते. तरुण असताना मी ट्रॅक्टर चालवायला आणि शेतीची छोटी-मोठी कामं करायला शिकलो.

माझा जन्म झाला तेव्हा माझे बाबा ५६ वर्षांचे होते आणि आई ३५ वर्षांची होती. तरुणपणी बाबा कसे दिसायचे ते मला माहीत नाही, पण ते खूप सुदृढ आणि निरोगी होते. त्यांना कष्टाचं काम करायला आवडायचं आणि आम्हा मुलांमध्येही त्यांनी ती आवड निर्माण केली होती. त्यांनी कधीच जास्त पैसे कमवले नाहीत. आमच्या डोक्यावर छत असेल, घालायला कपडे असतील आणि खायला पुरेसं अन्‍न असेल याची काळजी मात्र त्यांनी नेहमी घेतली. ते नेहमी आमच्यासोबत असायचे. ९३ वर्षांचे असताना त्यांचा मृत्यू झाला. आणि माझी आई ८६ वर्षांची असताना मरण पावली. ते यहोवाचे साक्षीदार नव्हते. माझ्या भावंडांपैकी फक्‍त माझा एक लहान भाऊ सत्यात आहे. १९७२ पासून तो विश्‍वासूपणे वडील म्हणून सेवा करत आहे.

माझी सुरुवातीची वर्षं

माझी आई खूप धार्मिक होती. दर रविवारी ती आम्हाला बॅप्टिस्ट चर्चला घेऊन जायची. १२ वर्षांचा असताना मी त्रैक्याबद्दल ऐकलं. मी आईला विचारलं: “येशू एकाच वेळी पिता आणि पुत्र कसा काय असू शकतो?” तिने दिलेलं उत्तर मला आठवतं, ती म्हणाली होती: “बाळा, ते एक रहस्य आहे. आपल्याला ते समजणं शक्य नाही.” माझ्यासाठी तर ते खरंच एक रहस्य होतं. पण तरीही वयाच्या १४ व्या वर्षी जवळच्याच एका ओढ्यात माझा बाप्तिस्मा झाला; ते ही तीन वेळा पाण्यात बुडवून—पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने!

१९५२—१७ वर्षांचा असताना; सैन्यात भरती होण्याआधी

शाळेत असताना माझा एक मित्र बॉक्सर होता. मीही बॉक्सिंग शिकावं असं त्याने मला सांगितलं. त्याचं ऐकून मी बॉक्सिंग शिकू लागलो आणि गोल्डन ग्लव्ह्‌ज या बॉक्सिंग क्लबचा सदस्यही बनलो. पण मला बॉक्सिंग नीट जमत नव्हतं, म्हणून मग काही फाईट्‌स खेळल्यावर मी ते शिकायचं सोडून दिलं. नंतर मी अमेरिकेच्या सैन्यात भरती झालो आणि मला जर्मनीला पाठवण्यात आलं. तिथे असताना माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनी मला तिथल्या सैनिकी शाळेत पाठवलं. त्यांना वाटलं की मी एक चांगला नेता होऊ शकतो. मी सैन्यातच माझं करियर करावं असं त्यांना वाटत होतं. पण मला सैन्यात राहायचं नव्हतं. म्हणून मग दोन वर्षं तिथे काम केल्यानंतर मी १९५६ साली सैन्यातली नोकरी सोडली. त्यानंतर लगेचच मी एका वेगळ्या प्रकारच्या सैन्यात भरती झालो.

१९५४-१९५६—अमेरिकेच्या सैन्यात मी दोन वर्षं होतो

एका नवीन जीवनाची सुरुवात

सत्य शिकण्याआधी खरा मर्द कसा असला पाहिजे याबद्दल माझ्या चुकीच्या कल्पना होत्या. माझ्यावर चित्रपटांचा आणि सोबत्यांचा प्रभाव होता. मला असं वाटायचं की बायबलबद्दल बोलणं हे खऱ्‍या मर्दानगीचं लक्षण नाही. पण मी लवकरच असं काही शिकलो ज्यामुळे माझं जीवनच बदललं. एकदा मी माझ्या शानदार लाल कारमधून शहरात जात होतो, तेव्हा दोन तरुण स्त्रियांनी मला हात दाखवला आणि मला बोलवलं. मी त्यांना ओळखत होतो कारण त्यांच्या मोठ्या भावाशी माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं. त्या दोघी यहोवाच्या साक्षीदार होत्या. त्यांच्याकडून मी आधीही टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही नियतकालिकं वाचायला घेतली होती. त्यातलं टेहळणी बुरूज नियतकालिक मला थोडं समजायला कठीण वाटलं. पण, यावेळी मात्र त्यांनी मला त्यांच्या घरी चालवल्या जाणाऱ्‍या मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. या लहानशा सभेत बायबल अभ्यास आणि त्यावर चर्चा केली जायची. मी विचार करेन असं मी त्यांना बोललो. पण त्यांनी मला हसून विचारलं: “तुम्ही नक्की याल ना?” मग मी बोललो: “हो, नक्की येईन.”

ते बोलल्याचा खरंतर मला नंतर पस्तावा झाला; पण आता माघार घेणं शक्य नव्हतं कारण मी वचन दिलं होतं. त्यामुळे मग मी त्या रात्री सभेला गेलो. तिथल्या लहान मुलांचं बायबलबद्दलचं ज्ञान पाहून तर मला आश्‍चर्यच वाटलं! मी माझ्या आईसोबत दर रविवारी चर्चला जायचो पण तरीही माझं बायबलचं ज्ञान खूपच कमी होतं. आता मला आणखी शिकायचं होतं म्हणून मग मी बायबल अभ्यासासाठी तयार झालो. सर्वसमर्थ देवाचं वैयक्‍तिक नाव यहोवा आहे हे मी आधी शिकलो. खूप वर्षांआधी जेव्हा मी माझ्या आईला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल विचारलं होतं तेव्हा ती सहजपणे असं म्हणाली होती: “ते लोक कोणत्यातरी यहोवा नावाच्या वृद्ध माणसाची उपासना करतात.” पण आता माझे डोळे उघडले आहेत याची मला जाणीव झाली.

हेच सत्य आहे अशी खात्री पटल्यामुळे मी भरभर प्रगती केली. पहिल्यांदा सभेला गेल्यानंतर ९ महिन्यांच्या आतच म्हणजे १९५७ च्या मार्च महिन्यात मी बाप्तिस्मा घेतला. माझी मनोवृत्ती आता बदलली होती. बायबलचं ज्ञान घेतल्यामुळे खरी मर्दानगी म्हणजे काय हे आता मला कळलं होतं. येशू एक परिपूर्ण पुरुष होता. इतर कोणत्याही पुरुषापेक्षा तो जास्त शक्‍तिशाली आणि ताकदवान होता. पण त्याने कधीही कोणासोबत मारामारी केली नाही. उलट त्याच्याबद्दल केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे त्याने सर्वकाही ‘सोसले.’ (यश. ५३:२, ७) येशूच्या खऱ्‍या अनुयायांनी “सर्वांशी सौम्यतेने” वागलं पाहिजे हे मी शिकलो.—२ तीम. २:२४.

१९५८ साली म्हणजे पुढच्याच वर्षी मी पायनियरिंग सुरू केली. पण मग थोड्या वेळासाठी मी ती बंद केली. का? कारण मला ग्लोरियासोबत लग्न करायचं होतं. मला पुस्तक अभ्यासासाठी आमंत्रित करणाऱ्‍या दोघींपैकी ती एक होती. मी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मला कधीच पस्तावा झाला नाही. ग्लोरिया त्या वेळीही एका मौल्यवान रत्नासारखी होती आणि आजही ती तशीच आहे! खरंतर माझ्या नजरेत ती मौल्यवान हिऱ्‍यापेक्षाही खूप मोलाची आहे आणि तिच्याशी लग्न केल्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता ती तुम्हाला तिच्याबद्दल थोडं सांगेल:

“मला १६ भावंडं होती. माझी आई एक विश्‍वासू साक्षीदार होती. मी १४ वर्षांची असताना ती वारली. त्यानंतर माझ्या वडिलांनी बायबल अभ्यास सुरू केला. आई नसल्यामुळे बाबांनी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक विनंती केली. माझी मोठी बहीण त्या वेळी शाळेच्या शेवटच्या वर्षात होती. आम्हा दोघींना दिवसाआड शाळेत येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती माझ्या बाबांनी केली. कारण यामुळे आमच्या लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी निदान एकीला तरी घरी राहता आलं असतं. बाबा कामावरून घरी परत येण्याआधी आम्हाला स्वयंपाक करून ठेवावा लागायचा. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांची विनंती मान्य केली आणि माझ्या बहिणीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही असंच करत राहिलो. साक्षीदारांच्या दोन कुटुंबांनी आमच्यासोबत बायबल अभ्यास केला आणि आमच्यापैकी ११ जण यहोवाचे साक्षीदार बनले. माझा स्वभाव तसा थोडा लाजाळूच होता; पण मला प्रचारकार्य खूप आवडायचं. या काळादरम्यान सॅम यांनी मला खूप मदत केली.”

१९५९ च्या फेब्रुवारी महिन्यात माझं ग्लोरियासोबत लग्न झालं. आम्ही दोघांनी पायनियर सेवेचा आनंद घेतला. त्याच वर्षी जुलै महिन्यात आम्ही बेथेल सेवेसाठी अर्ज केला कारण जागतिक मुख्यालयात सेवा करण्याची आमची खूप इच्छा होती. आमचा अर्ज पाहिल्यावर बेथेलमध्ये सेवा करणारे बंधू सायमन क्रेकर आमच्याशी येऊन बोलले. आम्ही बेथेलमध्ये जाऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. कारण त्या वेळी विवाहित जोडप्यांना बेथेलमध्ये घेत नव्हते. पण बेथेलमध्ये सेवा करण्याची आशा आम्ही सोडली नाही आणि ती पूर्ण होण्यासाठी आम्हाला अनेक वर्षं थांबावं लागलं.

आम्ही जागतिक मुख्यालयाला पत्र लिहून कळवलं की आम्हाला जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी पाठवावं. त्यांनी आमच्यासमोर एकच पर्याय ठेवला: आर्कान्सो येथील पाइन ब्लफ हे ठिकाण. या ठिकाणी दोन मंडळ्या होत्या एक गोऱ्‍या बांधवांची, तर दुसरी काळ्या बांधवांची. आम्हाला फक्‍त १४ प्रचारक असलेल्या काळ्या बांधवांच्या मंडळीत पाठवण्यात आलं.

विभक्‍ती आणि जातीभेद यांचा सामना करताना

तुम्ही कदाचित विचार कराल की, यहोवाचे साक्षीदार काळ्या आणि गोऱ्‍या प्रचारकांना वेगळे का करायचे. कारण त्या दिवसांत असं करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आमच्याकडे नव्हता. दोन वेगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र येण्याला कायदेशीर बंदी होती आणि हिंसाचार होण्याचीही शक्यता होती. बऱ्‍याच ठिकाणी बांधवांना अशी भीती होती की जर दोन जातींचे बांधव उपासनेसाठी एकत्र आले तर राज्य सभागृह नष्ट होण्याची शक्यता आहे. असं आधी घडलंही होतं. जर प्रचारकार्य करताना काळे साक्षीदार गोऱ्‍या घरमालकाच्या घरी गेले तर त्यांना अटक केली जायची आणि कदाचित मारहाणही केली जायची. त्यामुळे प्रचारकार्य पूर्ण करता यावं म्हणून आम्ही कायद्याचं पालन केलं आणि या गोष्टी बदलतील अशी आशा बाळगली.

प्रचारकार्य करणं आम्हाला नेहमीच सोपं नव्हतं. काळ्या लोकांच्या क्षेत्रात प्रचारकार्य करताना आम्ही चुकून काही वेळा गोऱ्‍या लोकांच्या घराचा दरवाजा वाजवायचो. तेव्हा आम्हाला लगेचच ठरवावं लागायचं की आम्ही बायबलची छोटीशी प्रस्तावना द्यावी की माफी मागून पुढच्या घरी जावं? खरंतर, तेव्हा परिस्थितीच तशी होती.

आमची पायनियरिंग चालू ठेवण्यासाठी आम्हाला काम करावं लागायचं. आम्हाला दर दिवसाला तीन डॉलर मिळायचे. ग्लोरिया काही घरांत साफसफाईचं काम करायची. एका ठिकाणी तिला मदत करण्याची मला परवानगी होती. त्यामुळे तिचं काम लवकर संपायला मदत व्हायची. तिथे आम्हाला दुपारचं जेवण दिलं जायचं. ग्लोरिया आणि मी काम संपल्यावर ते खायचो. दर आठवडी ग्लोरिया एका कुटुंबाचे कपडे इस्त्री करायची. मी बागेत काम करायचो, खिडक्या पुसायचो आणि घराबाहेरची छोटी-छोटी कामं करायचो. एकदा एका गोऱ्‍या कुटुंबाच्या घरी आम्ही खिडकी साफ करण्याचं काम करत होतो. ग्लोरिया आतून खिडक्या पुसत होती आणि मी बाहेरून. आम्ही दिवसभर तिथे काम केलं, म्हणून मग त्यांनी आम्हाला दुपारचं जेवण दिलं. ग्लोरियाला आत कुटुंबापासून वेगळं बसून जेवावं लागलं, तर मला बाहेर गॅरेजमध्ये. पण मला त्याचं काहीच वाटलं नाही कारण जेवण मस्त होतं! ते कुटुंब खूप चांगलं होतं, त्यांच्यावर फक्‍त आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव होता. मला आठवतं, एकदा आम्ही पेट्रोलपंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेलो होतो. तिथे काम करणाऱ्‍या गोऱ्‍या कर्मचाऱ्‍याला मी विचारलं की ग्लोरिया स्वच्छतागृहाचा वापर करू शकते का? तर माझ्याकडे रागाने पाहून तो म्हणाला, “कुलूप आहे त्याला.”

अविस्मरणीय दयेची कृत्यं

पण आपल्या बांधवांच्या सोबत घालवलेला काळ खूप आनंददायी होता आणि प्रचारकार्याचा आम्ही मनसोक्‍त आनंद घेतला! पाइन ब्लफ इथे आल्यावर आम्ही एका बांधवाच्या घरी राहिलो होतो. आज वडील वर्गाचे संयोजक मंडळीत जी कामं हाताळतात ती तो हाताळायचा. त्याची पत्नी अजून सत्यात आली नव्हती. म्हणून मग ग्लोरियाने तिचा बायबल अभ्यास सुरू केला. त्याच वेळी त्यांची मुलगी आणि जावई यांच्यासोबत मीही बायबल अभ्यास सुरू केला. त्या घरातल्या आई आणि मुलीने यहोवाची सेवा करण्याचं ठरवलं आणि बाप्तिस्मा घेतला.

गोऱ्‍या बांधवांच्या मंडळीतही आमचे काही प्रेमळ मित्र होते. ते आम्हाला घरी जेवायला बोलवायचे, पण आम्हाला कोणी एकत्र पाहायला नको म्हणून आम्ही रात्री त्यांच्या घरी जायचो. त्या वेळी जातीवाद आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी कू क्लक्स क्लॅन नावाची संघटना खूप कार्यशील होती. मला आठवतं की हॅलोवीन सणाच्या रात्री एक माणूस त्या संघटनेचे पांढऱ्‍या रंगाचे कपडे घालून आपल्या अंगणात ऐटीत बसला होता. पण या गोष्टींमुळे बांधवांनी दया दाखवण्याचं थांबवलं नाही. एकदा आम्हाला अधिवेशनाला जायचं होतं आणि त्यासाठी आम्हाला पैशांची गरज होती. म्हणून मग एका बांधवाने आमची कार विकत घेतली. त्या गोष्टीला एक महिना झाला. त्यानंतर एकदा घरोघरचं प्रचारकार्य आणि अनेक बायबल अभ्यास चालवून आम्ही घरी पायी चालत येत होतो. आम्ही खूप थकून गेलो होतो. घराजवळ आल्यावर आम्हाला आश्‍चर्याचा एक धक्काच बसला. आमच्या घरासमोर चक्क आमची कार उभी होती! तिच्या काचेवर एक चिठ्ठी होती, ज्यात लिहिलं होतं: “माझ्याकडून भेट म्हणून तुम्हाला तुमची कार परत देत आहे, तुमचा भाऊ.”

आणखी एक दयाळूपणाचं कृत्य मी कधीच विसरू शकत नाही. १९६२ साली न्यूयॉर्कमधील साऊथ लॅन्सींग इथे राज्य सेवा प्रशालेला उपस्थित राहण्याचं मला आमंत्रण मिळालं. एक महिना चालणाऱ्‍या या प्रशालेत मंडळी, विभाग आणि प्रांताची देखरेख करणाऱ्‍या बांधवांना प्रशिक्षण दिलं जायचं. त्या वेळी माझ्याकडे नोकरी नव्हती आणि पैसेही थोडेच उरले होते. मी पाइन ब्लफमधल्या एका टेलिफोन कंपनीत नोकरीसाठी अर्ज दिला होता. जर त्यांनी मला नोकरी दिली असती तर त्या कंपनीत काम करणारा मी पहिला काळ्या वर्णाचा कामगार ठरलो असतो. त्यांनी मला कळवलं की ते मला नोकरी देत आहेत. आता काय करायचं हा प्रश्‍न माझ्यापुढे होता. न्यूयॉर्कला जायला माझ्याकडे पैसे नव्हते. प्रशालेचं आमंत्रण नाकारून नोकरी स्वीकारण्याबद्दल मी विचार करू लागलो. मी बेथेलला पत्र लिहून माझा निर्णय कळवणारच होतो, पण तेव्हाच असं काही घडलं जे मी कधीच विसरू शकत नाही.

आमच्या मंडळीत एक बहीण होती. तिचे पती सत्यात नव्हते. एके दिवशी पहाटेच ती आमच्या घरी आली आणि तिने माझ्या हातात एक पाकीट ठेवलं. त्यात पैसे होते. ती आणि तिची मुलं पहाटे उठून शेतात कापूस गोळा करण्याच्या आणि पिकांच्या मधे येणारं गवत उपटण्याच्या कामासाठी जायची. का? मला न्यूयॉर्कला जाण्यासाठी पैसे देता यावेत म्हणून! ती म्हणाली: “तुम्ही प्रशालेला जा, खूप शिका आणि परत आल्यावर आम्हालाही शिकवा.” नंतर मी त्या टेलिफोन कंपनीला विचारलं की मी पाच आठवड्यानंतर कामाला आलं तर चालेल का. पण त्यांनी साफ नकार दिला. मला यामुळे जास्त काही फरक पडणार नव्हता कारण मी माझा निर्णय घेतला होता. ती नोकरी गमावण्याचा मला कधीच पस्तावा झाला नाही.

पाइन ब्लफमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल ग्लोरिया सांगते: “मी तर त्या क्षेत्राच्या प्रेमातच पडले! मी तिथे १५ ते २० बायबल अभ्यास चालवायचे. त्यामुळे आम्ही सकाळी घरोघरच्या प्रचाराला जायचो आणि मग दिवसभर बायबल अभ्यास करायचो. कधीकधी तर घरी यायला रात्रीचे ११ वाजायचे. प्रचार करताना खूप मजा यायची. खरंतर, मला ते ठिकाण सोडून विभागीय कार्यात यायचं नव्हतं. मी तिथेच आनंदाने राहिले असते. पण, यहोवाने आमच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं.” हो, आणि त्याने त्याप्रमाणेच केलं.

प्रवासी कार्य करताना

पाइन ब्लफमध्ये असताना आम्ही खास पायनियर बनण्यासाठी अर्ज दिला होता, आणि आम्ही खास पायनियर बनू अशी आशाही आम्हाला होती. कारण आम्ही टेक्ससमधल्या मंडळीला मदत करावी आणि तिथे खास पायनियर म्हणून सेवा करावी असं प्रोत्साहन आमच्या प्रांतीय पर्यवेक्षकांनी आम्हाला दिलं होतं. आम्हालाही ही कल्पना आवडली होती. त्यामुळे मग आम्ही वाट पाहात राहिलो आणि उत्तराची वाट पाहातच राहिलो. पण पत्र काही आलं नाही. शेवटी एकदाचं पत्र आलं! आम्हाला प्रवासी कार्याची नेमणूक मिळाली होती. तो १९६५ चा जानेवारी महिना होता. याच काळात बंधू लिऑन विवर यांना विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं. ते सध्या अमेरिकेच्या शाखा समितीचे संयोजक आहेत.

विभागीय पर्यवेक्षक बनण्याबद्दल माझ्या मनात धाकधूक होती. साधारण वर्षभर आमचे प्रांतीय पर्यवेक्षक जेम्स ए. थॉम्पसन यांनी माझ्या पात्रतेचं निरीक्षण केलं. मी कुठे सुधार केला पाहिजे आणि एक चांगला विभागीय पर्यवेक्षक बनण्यासाठी कोणत्या गुणांची गरज आहे हे त्यांनी प्रेमाने मला समजावलं. त्यानंतर थोड्या दिवसांनी मी जेव्हा विभागीय कार्याला सुरुवात केली तेव्हा त्यांचा सल्ला किती मोलाचा आहे हे माझ्या लक्षात आलं. मला नेमणूक मिळाल्यानंतर बंधू थॉम्पसन हे पहिले प्रांतीय पर्यवेक्षक होते ज्यांच्यासोबत मी विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम केलं. या विश्‍वासू बांधवाकडून मला खूपकाही शिकायला मिळालं.

अनुभवी बांधवांकडून मिळालेल्या मदतीबद्दल मला कदर आहे

त्या दिवसांत विभागीय पर्यवेक्षकांना खूप कमी प्रशिक्षण दिलं जायचं. एकदा विभागीय पर्यवेक्षक एका मंडळीला भेट देत होते तेव्हा त्यांच्यापासून शिकण्यासाठी मीही त्याच्यांसोबत गेलो. मग पुढच्या आठवड्यात मी विभागीय पर्यवेक्षक म्हणून दुसऱ्‍या मंडळीला भेट देताना माझ्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी ते माझ्यासोबत आले. त्यांनी मला काही सूचना आणि मार्गदर्शन दिलं. पण त्यानंतर आमच्यासोबत कोणीच नव्हतं. मला आठवतं मी ग्लोरियाला म्हणालो होतो: “त्यांना खरंच आता जायची गरज आहे का?” कालांतराने एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. आपली मदत करण्यासाठी चांगले बांधव नेहमी तयार असतात फक्‍त आपण त्यांना मदत करू दिली पाहिजे. त्या वेळी प्रवासी पर्यवेक्षक असलेले बंधू जे. आर. ब्राऊन आणि बेथेलचे बंधू फ्रेड रस्क या अशा अनुभवी बांधवांकडून मला जी मदत मिळाली त्याची मी आजही खूप कदर करतो.

त्या काळात जातीवाद सगळीकडे पाहायला मिळायचा. एकदा आम्ही टेनिसीला भेट देत होतो तेव्हा कू क्लक्स क्लॅन यांनी त्या शहरात फेरी काढली होती. मला आठवतं एकदा आमचा प्रचारगट चहा-पाण्यासाठी एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये गेला होता. मी जेव्हा स्वच्छतागृहात गेलो तेव्हा रागीट चेहऱ्‍याचा एक माणूस माझ्या मागोमाग तिथे आला. त्याच्या अंगावर जातीवादाचं समर्थन करणारा टॅटू होता. पण मग लगेचच आम्हा दोघांपेक्षाही धिप्पाड अंगकाठी असलेला एक गोरा बांधव तिथे आला. त्याने मला विचारलं: “सर्व काही ठीक आहे ना ब्रदर हर्ड्‌?” तेव्हा तो माणूस लगेच तिथून निघून गेला. या अनेक वर्षांत एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की जातीवादाचं खरं कारण, माणसाचा वर्ण नसतो तर त्याच्यात असलेलं पाप असतं. आणि आपला बंधू हा कोणत्याही वर्णाचा असला तरी तो आपला बंधूच असतो आणि वेळ आली तर आपल्यासाठी जीव द्यायलाही तो तयार असतो.

अखेरीस आध्यात्मिक भरभराट

आम्ही विभागीय कार्यात १२ वर्षं आणि प्रांतीय कार्यात २१ वर्षं सेवा केली. या सर्व वर्षांत आम्हाला खूपकाही मिळालं आणि प्रोत्साहन देणारे खूप अनुभव आम्हाला आले. पण एक मोठा आशीर्वाद १९९७ च्या ऑगस्ट महिन्यात आम्हाला मिळाला. याची खूप वर्षांपासून आम्ही वाट पाहात होतो. आम्हाला अमेरिकेतल्या बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं! आम्ही पहिल्यांदा बेथेलसाठी अर्ज केला होता त्याला ३८ वर्षं झाली होती. नंतरच्या महिन्यात आम्ही आमची बेथेल सेवा सुरू केली. मला वाटलं की बेथेलमधल्या जबाबदार बांधवांना फक्‍त काही काळासाठी माझी मदत हवी आहे. पण तसं काही घडलं नाही.

मी ग्लोरियाशी लग्न केलं तेव्हा ती एका मौल्यवान रत्नासारखी होती आणि आजही तशीच आहे

बेथेलमध्ये माझी पहिली नेमणूक सेवा विभागात होती. मला तिथे खूप काही शिकायला मिळालं. तिथल्या बांधवांना त्या देशातील विभागीय पर्यवेक्षक आणि वडील वर्गाकडून येणाऱ्‍या अनेक नाजूक आणि कठीण समस्या हाताळाव्या लागायच्या. मला प्रशिक्षण देताना बांधवांनी जो धीर दाखवला आणि जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. जर मला त्या विभागात पुन्हा नेमण्यात आलं तर त्यांच्यापासून शिकण्यासारखं अजून भरपूर काही असेल.

ग्लोरिया आणि मला बेथेलचं जीवन खूप आवडतं. आम्हा दोघांनाही सकाळी लवकर उठायची सवय आहे आणि या सवयीचा बेथेलमध्ये खूप फायदा झाला. त्यानंतर साधारण एक वर्षभराने मी यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या सेवा समितीचा साहाय्यक म्हणून काम करू लागलो. मग १९९९ मध्ये मी नियमन मंडळाचा सदस्य म्हणून काम पाहू लागलो. ही जबाबदारी पार पाडताना मी अनेक गोष्टी शिकलो. पण एक सर्वात महत्त्वाचा धडा मी शिकलो, तो म्हणजे ख्रिस्ती मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त आहे, कोणी मनुष्य नाही.

१९९९ पासून नियमन मंडळात सेवा करण्याचा सुहक्क मला मिळाला आहे

माझ्या आयुष्याबद्दल मी विचार करतो तेव्हा कधीकधी मी आमोस संदेष्ट्यासारखाच आहे असं मला वाटतं. तो गरीब मेंढपाळ अंजिराच्या फळांची निगा राखण्याचं काम करायचा. अंजीर गरीब लोकांचं अन्‍न होतं. पण यहोवाने त्याला संदेष्ट्याचं काम सोपवलं आणि त्याची कामगिरी पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक आशीर्वाद दिले. (आमो. ७:१४, १५) माझ्यासारख्या लिबर्टी इंडियानामधील एका गरीब शेतकऱ्‍याच्या मुलाकडे यहोवाचं लक्ष गेलं आणि त्याने मला मोजताही येणार नाहीत इतके भरभरून आशीर्वाद दिले! (नीति. १०:२२) जीवनाच्या सुरुवातीला माझ्याकडे कदाचित खूप काही नव्हतं, पण मी खात्रीने म्हणू शकतो की माझ्या अपेक्षेपलीकडे असलेली आध्यात्मिक श्रीमंती मला शेवटी मिळाली आहे.