व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण “भरपूर फळ” का उत्पन्‍न करत राहावं

आपण “भरपूर फळ” का उत्पन्‍न करत राहावं

“तुम्ही भरपूर फळ देता आणि माझे शिष्य असल्याचं सिद्ध करता, तेव्हा माझ्या पित्याचा गौरव होतो.”—योहा. १५:८.

गीत क्रमांक: ४५, १०

१, २. (क) मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने आपल्या शिष्यांसोबत कशावर चर्चा केली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) प्रचार करण्यामागचं कारण नेहमी लक्षात ठेवणं का गरजेचं आहे? (ग) आपण आता कशावर चर्चा करणार आहोत?

आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशू बराच वेळ आपल्या प्रेषितांसोबत बोलला आणि त्यांच्यावर आपलं खूप प्रेम असल्याची त्याने खात्री दिली. मागच्या लेखात आपण द्राक्षवेलीच्या दृष्टान्तावर चर्चा केली, तो दृष्टान्तदेखील येशूने आपल्या शिष्यांना त्या वेळी सांगितला. शिष्यांनी “भरपूर फळ” उत्पन्‍न करत राहावं यासाठी येशूला त्यांना प्रोत्साहन द्यायचं होतं. हे फळ म्हणजेच राज्याचा संदेश धीराने सांगत राहणं.—योहा. १५:८.

पण येशूने आपल्या शिष्यांना काय करावं इतकंच सांगितलं नाही, तर ते का करावं हेदेखील त्याने सांगितलं. त्यांनी प्रचार का करत राहिलं पाहिजे याची कारणं त्याने त्यांना सांगितली. नेहमी प्रचार करत राहण्यासाठी आपण ही कारणं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यावर मनन केल्यामुळे आपल्याला “सर्व जगात” धीराने सुवार्ता सांगत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. (मत्त. २४:१३, १४) आपण प्रचार का करत राहावा याची वचनांवर आधारित चार कारणं आपण या लेखात पाहू या. तसंच, फळ उत्पन्‍न करत राहण्यासाठी यहोवाने दिलेल्या चार देणग्यांबद्दलही आपण चर्चा करू या.

आपण यहोवाचा गौरव करतो

३. (क) योहान १५:८ नुसार प्रचार करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे? (ख) दृष्टान्तात द्राक्ष कशाला सूचित करतात आणि ही तुलना योग्य आहे असं का म्हणता येईल?

आपल्याला यहोवाचा गौरव करायचा आहे आणि त्याच्या नावावरचा कलंक मिटवायचा आहे, हे प्रचारकार्य करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. (योहान १५:१,  वाचा.) द्राक्षवेलीचा दृष्टान्त सांगताना येशूने यहोवाला द्राक्षांची शेती करणारा माळी असं संबोधलं. येशूने पुढे म्हटलं की तो स्वतः ती द्राक्षवेल आहे आणि त्याचे शिष्य त्या वेलीच्या फांद्या आहेत. (योहा. १५:५) म्हणून मग या दृष्टान्तात द्राक्ष हे येशूचे शिष्य उत्पन्‍न करत असलेल्या फळांना सूचित करतात. म्हणजेच ते करत असलेल्या प्रचारकार्याला. येशूने आपल्या प्रेषितांना सांगितलं: “तुम्ही भरपूर फळ देता . . . तेव्हा माझ्या पित्याचा गौरव होतो.” द्राक्षवेलीला चांगली द्राक्षं लागतात तेव्हा तिची मशागत करणाऱ्‍या माळ्याचा गौरव होतो. त्याच प्रकारे आपण जेव्हा राज्याचा संदेश सांगण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो तेव्हा आपणही यहोवाला गौरव आणि आदर देत असतो.—मत्त. २५:२०-२३.

४. (क) आपण यहोवाच्या नावावर लागलेला कलंक कसा मिटवतो? (ख) यहोवाच्या नावावरचा कलंक मिटवण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?

देवाचं नाव आधीपासूनच पवित्र आहे. आपण त्याला आणखी पवित्र करू शकत नाही. तर मग प्रचारकार्य करण्याद्वारे आपण त्याच्या नावावर लागलेला कलंक कसा मिटवू शकतो? यशया संदेष्ट्याने म्हटलं: “सैन्यांचा यहोवा यालाच तुम्ही पवित्र माना.” (यश. ८:१३, पं.र.भा.) आपण जेव्हा या नावाला सर्वात जास्त महत्त्व देतो आणि ते किती पवित्र आहे हे समजायला इतरांना मदत करतो, तेव्हा आपण त्याच्या नावावरचा कलंक मिटवत असतो. (मत्त. ६:९) उदाहरणार्थ, आपण इतरांना यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल आणि मानवांना नंदनवनात सदासर्वकाळ ठेवण्याच्या त्याच्या उद्देशाबद्दल शिकवतो. असं करण्याद्वारे आपण त्यांना सांगत असतो की सैतान यहोवाबद्दल जे काही वाईट बोलला ते साफ खोटं होतं. (उत्प. ३:१-५) “गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळण्यास” फक्‍त यहोवाच पात्र आहे ही गोष्ट आपण इतरांना शिकवतो, तेव्हा आपण त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवत असतो. (प्रकटी. ४:११) रून नावाचा बांधव १६ वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. तो म्हणतो: “या विश्‍वाच्या सृष्टिकर्त्याबद्दल साक्ष देण्याची संधी मला मिळाली आहे ही जाणीवच खूप समाधान देते. यामुळे मला प्रचार करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं.”

आपण यहोवावर आणि त्याच्या पुत्रावर प्रेम करतो

५. (क) योहान १५:९, १० या वचनांत प्रचार करत राहण्याचं कोणतं कारण सांगितलं आहे? (ख) शिष्यांना धीराची गरज असेल हे येशूने त्यांना कसं समजवलं?

योहान १५:९, १० वाचा. प्रचार करत राहण्याचं दुसरं कारण म्हणजे आपलं यहोवावर आणि येशूवर खूप प्रेम आहे. (मार्क १२:३०; योहा. १४:१५) येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की “माझ्या प्रेमात टिकून राहा.” येशूने असं का म्हटलं? कारण आपल्या शिष्यांना खरे ख्रिस्ती या नात्याने जीवन जगताना धीराची गरज भासेल हे येशूला माहीत होतं. योहान १५:४-१० या वचनांमध्ये येशूने ‘टिकून राहा,’ ‘ऐक्यात राहा’ आणि अशा अर्थाचे इतर शब्द बऱ्‍याच वेळा वापरले. याचं मुख्य कारण म्हणजे येशूला त्यांना शिकवायचं होतं की त्यांनी धीर उत्पन्‍न करण्याची गरज आहे.

६. आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमात टिकून राहायचं आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमात टिकून राहायचं आहे आणि त्याची पसंती मिळवायची आहे हे आपण कसं दाखवू शकतो? त्याच्या आज्ञांचं नेहमी पालन करण्याद्वारे. येशूने म्हटलं: “मी पित्याच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे त्याच्या प्रेमात टिकून राहिलो.” त्यामुळे त्याने स्वतः जे केलं तेच करण्याची अपेक्षा तो आपल्याकडूनही करतो. खरंच येशूने आपल्या सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण मांडलं आहे!—योहा. १३:१५.

७. आज्ञा पाळणं आणि प्रेम करणं कसं संबंधित आहे?

आज्ञा पाळणं आणि प्रेम करणं या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत हे येशूने स्पष्ट केलं. त्याने म्हटलं: “जो कोणी माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो त्याचं माझ्यावर प्रेम आहे.” (योहा. १४:२१) येशूने दिलेली आज्ञा खरंतर यहोवाकडून येते, त्यामुळे आपण जेव्हा येशूने दिलेली प्रचार करण्याची आज्ञा पाळतो, तेव्हा आपण यहोवावरही प्रेम करत असतो. (मत्त. १७:५; योहा. ८:२८) आपण आज्ञा पाळून यहोवावर आणि येशूवर असलेलं आपलं प्रेम दाखवतो, तेव्हा तेही आपल्याला त्यांच्या प्रेमात टिकून राहायला मदत करतात.

आपण लोकांना सावध करतो

८, ९. (क) प्रचार करण्याचं आणखी एक कारण काय आहे? (ख) यहेज्केल ३:१८, १९ आणि १८:२३ या वचनांतील यहोवाच्या शब्दांमुळे आपल्याला प्रचार करत राहण्याचं प्रोत्साहन कसं मिळतं?

प्रचार करण्याचं तिसरं कारण म्हणजे यहोवाच्या येणाऱ्‍या दिवसाबद्दल आपल्याला इतरांना सावध करायचं आहे. बायबलमध्ये नोहाला “प्रचारक” म्हटलं आहे. (२ पेत्र २:५ वाचा.) जलप्रलय येण्याआधी नोहाने जो संदेश सांगितला त्यात येणाऱ्‍या नाशाबद्दल सावधगिरीचा इशारादेखील नक्कीच असेल. आपण हे कोणत्या आधारावर म्हणू शकतो? येशूने त्या काळाबद्दल म्हटलं: “जलप्रलय येण्याआधीच्या काळात, नोहा जहाजात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुषांची लग्न होत होती आणि जलप्रलय येऊन ते सर्व त्यात वाहून जाईपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही. तसंच मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या काळातही घडेल.” (मत्त. २४:३८, ३९) जवळपास सर्वांनीच नोहाचा संदेश नाकारला, पण तरी तो यहोवाने दिलेला संदेश सांगत राहिला.

देव भविष्यात मानवांसाठी काय करणार आहे हे जाणून घेण्याची संधी इतरांना मिळावी म्हणून आपण राज्याचा संदेश सांगतो. यहोवासारखीच आपलीही इच्छा आहे की लोकांनी हा संदेश ऐकून आपला जीव ‘वाचवावा.’ (यहे. १८:२३) आपण घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी प्रचारकार्य करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांना देवाचं राज्य येणार आहे आणि ते या जगाच्या दुष्ट व्यवस्थेचा नाश करणार आहे यांबद्दल सावध करतो.—यहे. ३:१८, १९; दानी. २:४४; प्रकटी. १४:६, ७.

आपण शेजाऱ्‍यांवर प्रेम करतो

१०. (क) मत्तय २२:३९ या वचनात प्रचार करत राहण्याचं कोणतं कारण सांगितलं आहे? (ख) फिलिप्पैमध्ये पौल आणि सीलाने तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याला मदत कशी केली?

१० प्रचार करत राहण्याचं चौथं कारण म्हणजे आपलं लोकांवर असलेलं प्रेम. (मत्त. २२:३९) या प्रेमामुळे आपल्याला प्रचार करत राहण्याची प्रेरणा मिळते. परिस्थिती बदलल्यामुळे एखाद्या व्यक्‍तीचं मन बदलू शकतं याची जाणीव आपल्याला आहे. उदाहरणार्थ, फिलिप्पै शहरात विरोधकांनी पौल आणि सीला यांना तुरुंगात टाकलं. पण मध्यरात्री तिथे एक भूकंप झाला आणि त्यामुळे तुरुंगाचे दरवाजे उघडले. सर्व कैदी पळून गेले असतील या विचाराने तुरुंगाचा अधिकारी खूप घाबरला आणि तो स्वतःचा जीव घेणार होता. पण पौलने त्याला थांबवलं आणि म्हटलं: “आपला जीव घेऊ नकोस.” यावर तो अधिकारी म्हणाला: “तारण होण्यासाठी मी काय करू?” पौल आणि सीला यांनी त्याला म्हटलं: “प्रभू येशूवर विश्‍वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल.”—प्रे. कार्ये १६:२५-३४.

यहोवावर, येशूवर आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम असल्यामुळे आपण प्रचार करतो (परिच्छेद ५, १० पाहा)

११, १२. (क) तुरुंगाचा अधिकारी याच्या अहवालावरून आपण प्रचारकार्याबद्दल काय शिकतो? (ख) आपली प्रचार करत राहण्याची इच्छा का आहे?

११ तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याच्या अहवालावरून आपण प्रचारकार्याबद्दल कोणती महत्त्वाची गोष्ट शिकतो? अहवाल वाचल्यावर आपल्याला कळतं की भूकंप झाल्यानंतर त्या अधिकाऱ्‍याची मनोवृत्ती बदलली आणि त्याने मदत मागितली. त्याच प्रकारे आज जे लोक आपला संदेश नाकारतात, त्यांच्या जीवनात कदाचित काही प्रसंग घडल्यावर ते आपल्या संदेशात आवड दाखवू शकतात. कदाचित एखाद्याची नोकरी गेल्यामुळे किंवा घटस्फोट झाल्यामुळे त्याला धक्का बसला असेल. इतर काही लोक गंभीर आजारामुळे किंवा जवळच्या व्यक्‍तीला मृत्यूमध्ये गमावल्यामुळे दुःखात असतील. जीवनात असे प्रसंग येतात तेव्हा सहसा लोक जीवनाबद्दल प्रश्‍न विचारू लागतात. असे प्रश्‍न ज्यांवर कदाचित त्यांनी आधी कधीच विचार केला नसावा. त्यांच्या मनात प्रश्‍न येऊ शकतो की ‘माझा बचाव होण्यासाठी मी काय केलं पाहिजे?’ अशी मनःस्थिती असल्यामुळे आधी जरी त्यांनी संदेश नाकारला असला, तरी या वेळी मात्र ते आपला आशेचा संदेश ऐकायला तयार होतील.

१२ म्हणून मग आपण विश्‍वासूपणे आपलं प्रचारकार्य सुरू ठेवलं, तर लोकांची मनोवृत्ती बदलल्यावर त्यांना सांत्वन देण्यासाठी आपण तयार असू. (यश. ६१:१) शारलेट नावाची बहीण ३८ वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. ती म्हणते: “लोकांच्या जीवनाला आज काहीच दिशा नाहीये. त्यांना आनंदाचा संदेश ऐकण्याची संधी मिळायलाच हवी.” एवॉर नावाची बहीण ३४ वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. ती म्हणते: “आधीच्या तुलनेत आज बरेच लोक भावनिक रीत्या खचून गेले आहेत. त्यांना मदत करायची माझी मनापासून इच्छा आहे आणि यामुळे मला प्रचार करायची प्रेरणा मिळते.” खरंच, लोकांबद्दल प्रेम हे प्रचार करण्याचं किती चांगलं कारण आहे!

धीर धरायला मदत करणाऱ्‍या देणग्या

१३, १४. (क) योहान १५:११ मध्ये कोणत्या देणगीबद्दल सांगितलं आहे? (ख) येशूसारखाच आनंद आपल्याला कसा मिळू शकतो? (ग) आनंद या गुणामुळे आपल्याला सेवाकार्यात कशी मदत होते?

१३ आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने काही देणग्यांबद्दलही सांगितलं. यामुळे प्रेषितांना फळ उत्पन्‍न करायला मदत होणार होती. या देणग्या कोणत्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आज कशी मदत होऊ शकते?

१४ आनंदाची देणगी. प्रचार करणं आपल्याला ओझ्यासारखं वाटतं का? मुळीच नाही. येशूने द्राक्षवेलीचा दृष्टान्त दिल्यावर सांगितलं की प्रचार केल्यामुळे आपल्याला त्याच्यासारखा आनंद मिळेल. (योहान १५:११ वाचा.) असं आपण का म्हणू शकतो? हे लक्षात घ्या की दृष्टान्तात येशूने स्वतःची तुलना वेलीशी आणि शिष्यांची तुलना फांद्यांशी केली. ज्या प्रकारे, वेलीला जडून राहिल्यामुळे फांद्यांना पाणी आणि आवश्‍यक पोषण मिळतं. त्याच प्रकारे, येशूसोबत ऐक्यात राहिल्याने आणि त्याचं जवळून अनुकरण केल्याने आपण आनंदी होऊ. आणि हा आनंद येशूने अनुभवलेल्या आनंदासारखाच असेल जो देवाची इच्छा केल्याने मिळतो. (योहा. ४:३४; १७:१३; १ पेत्र २:२१) हॅने नावाची बहीण ४० पेक्षा जास्त वर्षं पायनियरींग करत आहे. ती म्हणते: “सेवाकार्य करून आल्यावर मला जो आनंद मिळतो, त्यामुळे यहोवाची सेवा करत राहण्यासाठी मला प्रेरणा मिळते.” लोक आपल्या संदेशाला प्रतिसाद देत नाहीत तेव्हाही आनंदी राहिल्यामुळे आपल्याला प्रचार करत राहण्याची शक्‍ती मिळते.—मत्त. ५:१०-१२.

१५. (क) योहान १४:२७ मध्ये कोणत्या देणगीबद्दल सांगितलं आहे? (ख) शांतीमुळे फळ उत्पन्‍न करत राहायला कशी मदत होते?

१५ शांतीची देणगी. (योहान १४:२७ वाचा.) ज्या संध्याकाळी येशूचा मृत्यू झाला त्याआधी त्याने आपल्या प्रेषितांना म्हटलं: “मी माझी शांती तुम्हाला देतो.” प्रचार करत राहण्यासाठी येशूने दिलेल्या शांतीमुळे आपल्याला कशी मदत होते? जेव्हा आपण प्रचार करत राहतो तेव्हा आपण यहोवाचं आणि येशूचं मन आनंदित करत असतो ही गोष्ट माहीत असल्यामुळे आपण शांती अनुभवतो. (स्तो. १४९:४; रोम. ५:३, ४; कलस्सै. ३:१५) उल्फ नावाचे बांधव ४५ वर्षांपासून पायनियरींग करत आहेत. ते म्हणतात: “प्रचारकार्य केल्यामुळे मला थकवा येतो, पण त्यामुळे मी खरं समाधान अनुभवतो आणि माझं जीवन अर्थभरीत असल्याचं मला वाटतं.” आपल्याला कायम टिकणारी शांती मिळाली आहे यासाठी आपण देवाचे आभारी आहोत!

१६. (क) योहान १५:१५ मध्ये कोणत्या देणगीबद्दल सांगितलं आहे? (ख) येशूसोबत प्रेषितांची मैत्री कशी टिकून राहणार होती?

१६ मैत्रीची देणगी. प्रेषितांनी आनंदी असावं अशी आपली इच्छा आहे हे येशूने त्यांना सांगितलं. यानंतर, प्रेषितांनी नि:स्वार्थ प्रेम दाखवणं का महत्त्वाचं आहे हे त्याने समजावलं. (योहा. १५:११-१३) मग त्याने म्हटलं: “मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे.” खरंच येशूचा मित्र असणं किती मोठा बहुमान आहे. पण ही मैत्री कशी टिकून राहणार होती? येशूने याबद्दल समजावलं: “तुम्ही जावं आणि फळ देत राहावं.” (योहान १५:१४-१६ वाचा.) दुसऱ्‍या शब्दांत, त्यांनी प्रचार करत राहावं. याच्या जवळपास दोन वर्षांआधी येशूने आपल्या प्रेषितांना म्हटलं: “जात असताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.’” (मत्त. १०:७) म्हणूनच, आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशूने त्याच्या शिष्यांना धीराने प्रचार करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं. (मत्त. २४:१३; मार्क ३:१४) अर्थात येशूला हे माहीत होतं की त्याच्या या आज्ञेचं पालन करणं सोपं नसणार. पण तरीही ही आज्ञा पाळणं त्यांना शक्य होतं आणि त्यामुळे त्यांची येशूसोबतची मैत्री टिकून राहणार होती. पण हे कसं शक्य होणार होतं? आणखी एका देणगीमुळे.

१७, १८. (क) योहान १५:७ या वचनात कोणत्या देणगीबद्दल सांगितलं आहे? (ख) या देणगीमुळे येशूच्या शिष्यांना कशी मदत मिळाली? (ग) कोणत्या देणग्यांमुळे आपल्याला मदत होते?

१७ आपल्या प्रार्थना ऐकल्या जातील ही देणगी. येशूने म्हटलं: “तुम्हाला जे काही हवं आहे त्याविषयी विनंती करा म्हणजे तुम्हाला ते दिलं जाईल.” (योहा. १५:७, १६) येशूने दिलेल्या अभिवचनामुळे प्रेषितांना किती प्रोत्साहन मिळालं असेल! * येशूचा लवकरच मृत्यू होणार होता ही गोष्ट प्रेषितांना पूर्णपणे समजली नाही. पण याचा असा अर्थ होता का, की त्याच्या मृत्यूनंतर त्यांना काहीच मदत मिळणार नव्हती? नाही. यहोवा त्यांची प्रार्थना ऐकणार होता आणि प्रचारकार्यादरम्यान त्यांची मदतही करणार होता. आणि त्याने तसं केलंही. येशूचा मृत्यू झाल्याच्या काही काळानंतर प्रेषितांनी जेव्हा यहोवाकडे धैर्यासाठी विनवणी केली, तेव्हा यहोवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं.—प्रे. कार्ये ४:२९, ३१.

मदतीसाठी केलेल्या प्रार्थना यहोवा ऐकतो ही खात्री आपण बाळगू शकतो (परिच्छेद १८ पाहा)

१८ ही गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. जेव्हा आपण धीराने प्रचारकार्य करतो तेव्हा आपली येशूसोबत मैत्री टिकून राहते. तसंच, प्रचार करायला कठीण वाटतं तेव्हा यहोवा आपली प्रार्थना ऐकायला तयार असतो याची आपण खात्री बाळगू शकतो. (फिलिप्पै. ४:१३) यहोवा आपली प्रार्थना ऐकतो आणि येशू आपला मित्र आहे यासाठी आपण खरंच खूप आभारी आहोत. यहोवा देत असलेल्या या सर्व देणग्यांमुळे आपल्याला फळ उत्पन्‍न करत राहण्यासाठी शक्‍ती मिळते.—याको. १:१७.

१९. (क) आपण प्रचारकार्य का करत राहिलं पाहिजे? (ख) देवाने दिलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पुरवल्या आहेत?

१९ या लेखात आपण प्रचार करत राहण्याची चार कारणं पाहिली. ती म्हणजे: यहोवाच्या नावाचा गौरव करणं व त्याच्या नावावर लागलेला कलंक मिटवणं, यहोवावर व येशूवर प्रेम दाखवणं, लोकांना सावध करणं आणि आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करणं. आपण या लेखात चार देणग्यांबद्दलही शिकलो: आनंद, शांती, मैत्री आणि आपल्या प्रार्थनांची उत्तरं. या देणग्यांमुळे देवाने दिलेली कामगिरी पार पाडण्यासाठी आपल्याला शक्‍ती मिळते. आपण “भरपूर फळ” उत्पन्‍न करत राहण्यासाठी मेहनत घेत आहोत हे पाहून यहोवाला खरंच खूप आनंद होतो!

^ परि. 17 येशूने प्रेषितांना अनेकदा सांगितलं की यहोवा त्यांच्या प्रार्थना ऐकेल.—योहा. १४:१३; १५:७, १६; १६:२३.