व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या शत्रूला ओळखा

तुमच्या शत्रूला ओळखा

“आपल्याला [सैतानाच्या] कुयुक्त्या माहीत नाहीत, असे नाही.”—२ करिंथ. २:११, तळटीप.

गीत क्रमांक: ४९, २७

१. आदाम-हव्वाने पाप केल्यानंतर यहोवाने आपल्या शत्रूबद्दल कोणती माहिती द्यायला सुरुवात केली?

साप बोलू शकत नाही हे आदामला माहीत होतं. त्यामुळे साप हव्वाशी बोलल्याचं जेव्हा आदामला कळलं, तेव्हा एखादी आत्मिक व्यक्‍ती तिच्याशी बोलली हे त्याच्या लक्षात आलं असावं. (उत्प. ३:१-६) या आत्मिक व्यक्‍तीबद्दल आदाम-हव्वाला माहीत नव्हतं. पण तरी एका अनोळखी व्यक्‍तीला साथ देण्याचा आणि स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या प्रेमळ पित्याशी बंड करण्याचा आदामने निर्णय घेतला. (१ तीम. २:१४) त्यानंतर लगेच यहोवाने त्या दुष्ट शत्रूबद्दल जास्त माहिती द्यायला सुरुवात केली. तसंच, सैतानाचा पुढे जाऊन नाश केला जाईल हेदेखील त्याने सांगितलं. पण यासोबतच यहोवाने हासुद्धा इशारा दिला की सापाच्या माध्यमाने जी आत्मिक व्यक्‍ती हव्वाशी बोलली ती देवावर प्रेम करणाऱ्‍यांचा विरोध करेल.—उत्प. ३:१५.

२, ३. मसीहा प्रकट होण्याआधी यहोवाने सैतानाबद्दल एवढी कमी माहिती का दिली असावी?

बंड करणाऱ्‍या देवदूताचं वैयक्‍तिक नाव यहोवाने आपल्याला सांगितलं नाही. * एदेन बागेत बंडाळी झाल्याच्या २,५०० वर्षांनंतर यहोवाने बंड करणाऱ्‍याबद्दल सांगितलं. (ईयो. १:६) त्याला “सैतान” या पदवीने ओळखलं जातं. त्या पदवीचा अर्थ “विरोध करणारा” असा होतो. हिब्रू शास्त्रवचनांतल्या १ इतिहास, ईयोब आणि जखऱ्‍या या पुस्तकांमध्येच सैतानाचा उल्लेख आढळतो. पण मसीहा येण्याआधी या शत्रूबद्दल एवढी कमी माहिती का देण्यात आली होती?

हिब्रू शास्त्रवचनांत यहोवाने सैतानाबद्दल किंवा त्याच्या कार्यांबद्दल जास्त माहिती दिली नाही. कारण हिब्रू शास्त्रवचनाचा उद्देश मसीहाची ओळख आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी लोकांना मदत करणं हा होता. (लूक २४:४४; गलती. ३:२४) जेव्हा मसीहा प्रकट झाला तेव्हा यहोवाने सैतानाबद्दल आणि त्याला साथ देणाऱ्‍या देवदूतांबद्दल माहिती पुरवण्यासाठी, येशूचा आणि त्याच्या शिष्यांचा वापर केला. * त्यांचा वापर करणं योग्यच होतं, कारण सैतान आणि त्याला साथ देणाऱ्‍यांचा नाश करण्यासाठी यहोवा, येशू आणि अभिषिक्‍त जणांना वापरणार आहे.—रोम. १६:२०; प्रकटी. १७:१४; २०:१०.

४. आपण दियाबलाला का घाबरू नये?

दियाबल सैतान हा “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा” आहे असं प्रेषित पेत्रने म्हटलं. तर योहानने त्याला ‘अजगर’ आणि ‘साप’ म्हटलं. (१ पेत्र ५:८; प्रकटी. १२:९) पण आपण दियाबलाला घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण त्याची शक्‍ती मर्यादित आहे. (याकोब ४:७ वाचा.) तसंच यहोवा, येशू आणि विश्‍वासू देवदूतही आपलं संरक्षण करतात. त्यांच्या मदतीने आपण आपल्या शत्रूचा सामना करू शकतो. पण असं असलं तरी, आपण पुढे दिलेल्या तीन प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेतली पाहिजेत: सैतानाचा प्रभाव किती प्रमाणात आहे? तो लोकांना कशा प्रकारे भुलवण्याचा प्रयत्न करत आहे? आणि त्याला कोणत्या गोष्टी अशक्य आहेत? आता आपण या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेऊ या आणि यातून आपण कोणते धडे शिकू शकतो, हेही जाणून घेऊ या.

सैतानाचा प्रभाव किती प्रमाणात आहे?

५, ६. मानवी सरकार सर्वात जास्त अपेक्षित असलेले बदल घडवून का आणू शकत नाही?

देवाविरुद्ध बंड करण्यात बऱ्‍याच देवदूतांनी सैतानाची साथ दिली. जलप्रलय येण्याआधी सैतानाने त्यांपैकी काहींना स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या मोहात पाडलं. बायबलमध्ये याला लाक्षणिक रीतीने समजवण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे, की स्वर्गातून खाली पडलेल्या अजगराने त्याच्यासोबत एकतृतीयांश तारे ओढले. (उत्प. ६:१-४; यहू. ६; प्रकटी. १२:३, ४) या देवदूतांनी देवाच्या कुटुंबाचा त्याग केला तेव्हा ते सैतानाच्या अधिकाराच्या अधीन झाले. आपण असा विचार करू नये की बंड केलेले देवदूत संघटित नाहीत. अदृश्‍य आत्मिक जगात सैतानाने देवाच्या राज्यासारखंच स्वतःचं एक राज्य तयार केलं आहे. त्याने स्वतःला राजा बनवून दुरात्म्यांना संघटित केलं आहे. त्याने त्यांना शक्‍ती देऊन जगातले शासक बनवलं आहे.—इफिस. ६:१२.

सर्व मानवी सरकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैतान त्याच्या संघटनेचा वापर करतो. हे आपण खात्रीने का म्हणू शकतो? कारण जेव्हा सैतानाने येशूला “जगातली सर्व राज्ये दाखवली” तेव्हा तो येशूला म्हणाला: “या सर्वांवरचा अधिकार आणि यांचं वैभव मी तुला देईन, कारण हे सर्व माझ्याकडे सोपवण्यात आलं आहे आणि मला वाटेल त्याला मी ते देतो.” (लूक ४:५, ६) सैतान या जगाचा अधिकारी असला तरी बरीच सरकारं नागरिकांसाठी चांगल्या गोष्टी करतात आणि काही शासकांना तर खरोखर लोकांना मदत करायची असते. पण आपल्याला सर्वात जास्त अपेक्षित असलेले बदल कोणताही मानवी शासक घडवून आणू शकत नाही.—स्तो. १४६:३, ४; प्रकटी. १२:१२.

७. सरकारांचा वापर करण्यासोबत सैतान खोट्या धर्माचा आणि व्यापारजगताचासुद्धा कसा वापर करतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

“सबंध पृथ्वीवरील लोकांना” किंवा सर्व मानवजातीला फसवण्यासाठी सैतान आणि त्याचे दुरात्मे खोट्या धर्माचा आणि व्यापारजगताचा वापर करतात. (प्रकटी. १२:९) सैतान खोट्या धर्माचा वापर करून यहोवाबद्दल खोट्या गोष्टी पसरवतो. इतकंच काय तर त्याने लोकांपासून देवाचं नाव लपवण्याचाही प्रयत्न केला आहे. (यिर्म. २३:२६, २७) यामुळे प्रामाणिक मनाच्या लोकांना वाटतं की ते देवाची उपासना करत आहेत, पण खरंतर ते दुरात्म्यांना पुजत असतात. (१ करिंथ. १०:२०; २ करिंथ. ११:१३-१५) खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी सैतान व्यापारजगताचाही वापर करतो. जसं की, पैसा आणि वस्तू यांमुळे मानव आनंदी होऊ शकतो हा विचार. (नीति. १८:११) जे अशा खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवतात ते आपलं संपूर्ण आयुष्य देवाऐवजी “धनाची” सेवा करण्यात घालवतात. (मत्त. ६:२४) त्यांचं भौतिक गोष्टींबद्दल प्रेम इतकं वाढतं, की एके काळी देवावर असलेलं त्यांचं प्रेम जवळजवळ नाहीसं होतं.—मत्त. १३:२२; १ योहा. २:१५, १६.

८, ९. (क) आदाम-हव्वा आणि बंडखोर देवदूतांनी जे केलं त्यावरून आपण कोणते दोन महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतो? (ख) सैतानाचं या जगावर नियंत्रण आहे हे आपल्याला का माहीत असलं पाहिजे?

आदाम-हव्वा आणि बंडखोर देवदूतांनी जे केलं त्यावरून आपण दोन महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतो. पहिला हा, की आपल्याकडे फक्‍त दोनच पर्याय आहेत आणि आपण एकाचीच निवड करू शकतो. एकतर आपण यहोवाची बाजू निवडू शकतो किंवा सैतानाची. (मत्त. ७:१३) दुसरा हा, की सैतानाची बाजू निवडणाऱ्‍यांना मिळणारे फायदे मर्यादित असतात. आदाम आणि हव्वा यांना स्वतःसाठी योग्य व अयोग्य काय ते निवडण्याची संधी मिळाली. तसंच, दुरात्म्यांना मानवी सरकारांवर काही प्रमाणात अधिकार मिळाला. (उत्प. ३:२२) पण सैतानाची बाजू निवडल्याचे नेहमीच वाईट परिणाम घडून येतात. खरंतर यात कोणताच फायदा नसतो!—ईयो. २१:७-१७; गलती. ६:७, ८.

सैतानाचं या जगावर नियंत्रण आहे हे आपल्याला का माहीत असलं पाहिजे? कारण यामुळे आपल्याला सरकारांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवण्यासाठी मदत होते आणि आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी प्रेरणा मिळते. आपण सरकारांना आदर द्यावा अशी यहोवाची इच्छा आहे हे आपल्याला माहीत आहे. (१ पेत्र २:१७) सरकारांचे नियम आपल्याला देवाचे स्तर मोडायला जोपर्यंत भाग पाडत नाहीत, तोपर्यंत आपण त्या नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (रोम. १३:१-४) त्यासोबतच आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की आपण नेहमी तटस्थ भूमिका घेतली पाहिजे आणि कोणत्याही मानवी नेत्याला किंवा राजकीय पक्षाला समर्थन देण्याचं टाळलं पाहिजे. (योहा. १७:१५, १६; १८:३६) सैतान देवाचं नाव लपवत आहे आणि त्याच्या नावाला कलंक लावत आहे म्हणून आपण लोकांना देवाबद्दलचं सत्य सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. यहोवाचे साक्षीदार असण्याचा आणि देवाच्या नावाचा वापर करण्याचा आपल्याला अभिमान आहे. पैशांवरच्या किंवा भौतिक गोष्टींवरच्या प्रेमापेक्षा देवावर असलेलं आपलं प्रेम खूप-खूप मौल्यवान आहे.—यश. ४३:१०; १ तीम. ६:६-१०.

सैतान इतरांना कशा प्रकारे भुलवण्याचा प्रयत्न करतो?

१०-१२. (क) काही देवदूतांना फसवण्यासाठी सैतानाने कशा प्रकारे गळाचा वापर केला असावा? (ख) त्या देवदूतांनी जे केलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१० सैतान इतरांना भुलवण्यासाठी प्रभावी पद्धतींचा वापर करतो. मानवांनी त्याच्या इच्छेनुसार वागावं यासाठी तो कधी गळ घालून फसवतो तर कधी त्यांना त्रास देतो.

११ सैतानाने अनेक देवदूतांना मोहात पाडण्यासाठी गळ घातला. कोणत्या गोष्टीचा त्यांना मोह होऊ शकतो, हे जाणण्यासाठी त्याने खूप काळ त्यांचं निरीक्षण केलं असावं. काही देवदूत त्या गळाला अडकले आणि त्यांनी स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवले. त्यांना झालेली मुलं हिंसक असून लोकांशी खूप क्रूरपणे वागायची. (उत्प. ६:१-४) अनैतिक लैंगिक संबंध ठेवण्याचा गळ घालण्यासोबत, कदाचित त्याने असंदेखील वचन दिलं असेल की त्यांना मानवांवर अधिकार मिळेल. यहोवाने ‘स्त्रीच्या संततीबद्दल’ दिलेल्या अभिवचनाच्या पूर्णतेत अडथळा आणण्यासाठी सैतानाने हे केलं असावं. (उत्प. ३:१५) पण यहोवाने त्याला यशस्वी होऊ दिलं नाही. त्याने जलप्रलय आणला आणि यामुळे सैतान व दुरात्म्यांचे जे काही बेत होते ते फसले.

सैतान आपल्याला अडकवण्यासाठी अनैतिकता, गर्व आणि अलौकिक शक्‍तींबद्दलची उत्सुकता या गळांचा वापर करतो (परिच्छेद १२, १३ पाहा)

१२ आपण यातून काय शिकू शकतो? अनैतिकता आणि गर्व हे खूप प्रभावशाली गळ आहेत. ज्या देवदूतांनी सैतानाची बाजू निवडली ते देवासोबत बरीच वर्षं राहात होते. असं असलं तरी अनेकांनी आपल्या मनात चुकीच्या इच्छा निर्माण होऊ दिल्या आणि त्या इच्छा नंतर खूप प्रबळ झाल्या. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जरी अनेक वर्षं यहोवाची सेवा करत असलो, तरी वाईट इच्छा आपल्या मनात मुळावू शकतात. (१ करिंथ. १०:१२) आपल्या मनात येणारे कोणतेही अनैतिक विचार किंवा गर्विष्ठ वृत्ती आपण काढून टाकली पाहिजे. यासाठी आपण स्वतःचं सतत परीक्षण करत राहिलं पाहिजे.—गलती. ५:२६; कलस्सैकर ३:५ वाचा.

१३. सैतान आणखी कोणत्या गळाचा वापर करतो आणि आपण त्यापासून स्वतःचं रक्षण कसं करू शकतो?

१३ सैतान वापरत असलेला आणखी एक गळ म्हणजे अलौकिक शक्‍तींबद्दलची उत्सुकता. आज तो खोट्या धर्माचा आणि मनोरंजनाचा वापर करून लोकांमध्ये दुरात्म्यांबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. भूतविद्या खूप रोमांचक आहे असं चित्रपट, इलेक्ट्रॉनिक गेम्स किंवा मनोरंजनाची इतर माध्यमं भासवतात. अशा प्रकारच्या गळात अडकण्यापासून आपण स्वतःचं रक्षण कसं करू शकतो? चांगलं मनोरंजन कोणतं आणि वाईट कोणतं अशी सूची देवाच्या संघटनेने द्यावी अशी आपण अपेक्षा करू नये. यहोवाच्या स्तरांनुसार चांगल्या गोष्टी निवडण्यासाठी आपल्या विवेकाला आपण प्रशिक्षित केलं पाहिजे. (इब्री ५:१४) आपलं देवावरचं “प्रेम निष्कपट” असेल तर आपण सुज्ञपणे निवड करू. (रोम. १२:९) कपटी व्यक्‍ती बोलते एक आणि करते एक, त्यामुळे मनोरंजन निवडताना आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी इतरांना ज्या तत्त्वांबद्दल सांगतो त्या तत्त्वांचं मीदेखील पालन करतो का? मी ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करत आहे किंवा ज्यांची पुनर्भेट घेत आहे त्यांनी मी निवडलेले मनोरंजन पाहिलं तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील?’ जेव्हा आपण इतरांना सांगत असलेल्या तत्त्वांचं स्वतःदेखील पालन करतो, तेव्हा सैतान टाकत असलेल्या गळापासून वाचणं आपल्याला सोपं जातं.—१ योहा. ३:१८.

प्रचारकार्यावर सरकार आणत असलेली बंदी, वर्गसोबत्यांकडून येणारा दबाव आणि अविश्‍वासू नातेवाइकांकडून येणारा विरोध यांचा वापर करून सैतान आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो (परिच्छेद १४ पाहा)

१४. सैतान आपल्याला त्रास देण्याचा कसा प्रयत्न करतो आणि आपण त्याचा खंबीरपणे सामना कसा करू शकतो?

१४ आपण यहोवाला एकनिष्ठ राहू नये म्हणून सैतान आपल्याला त्रास देण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, तो कदाचित सरकाराला आपल्या प्रचार कार्यावर बंदी घालायला लावेल. तसंच, आपण बायबलच्या स्तरांनुसार जगतो म्हणून तो कामावरच्या सोबत्यांना किंवा वर्गसोबत्यांना आपली थट्टा करायला लावेल. (१ पेत्र ४:४) आपले अविश्‍वासू नातेवाईकही सैतानाच्या प्रभावाखाली येऊ शकतात. त्यांचे हेतू चांगले असावेत; पण ते आपल्याला सभेला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील. (मत्त. १०:३६) सैतानाच्या अशा प्रकारच्या विरोधाचा आपण खंबीरपणे सामना कसा करू शकतो? सैतान आपल्यावर अशा प्रकारचे हल्ले करेल याचं आपल्याला आश्‍चर्य वाटू नये. कारण त्याचं युद्ध आपल्याशी आहे. (प्रकटी. २:१०; १२:१७) शिवाय, जो मुख्य वादविषय आहे तो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. तो म्हणजे, आपल्याला सोयीस्कर असतं तेव्हाच आपण यहोवाची सेवा करू आणि परिस्थिती कठीण झाली की आपण देवाला नाकारू हा सैतानाचा दावा. (ईयो. १:९-११; २:४, ५) त्यासोबतच, आपल्याला बळ देण्यासाठी आपण नेहमी यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे कारण तो आपल्याला कधीच सोडणार नाही.—इब्री १३:५.

सैतानाला कोणत्या गोष्टी अशक्य आहेत?

१५. आपल्या इच्छेविरुद्ध वागण्याची सैतान आपल्यावर जबरदस्ती करू शकतो का? समजावून सांगा.

१५ लोकांची इच्छा नसलेल्या गोष्टी करायला सैतान त्यांना भाग पाडू शकत नाही. (याको. १:१४) आपण सैतानाच्या बाजूने आहोत याची जगातल्या बऱ्‍याच लोकांना जराही कल्पना नाही. पण सत्य शिकल्यावर एका व्यक्‍तीला निर्णय घ्यावाच लागतो की ती सैतानाची बाजू घेईल की यहोवाची. (प्रे. कार्ये ३:१७; १७:३०) आपण जर यहोवाची आज्ञा पाळण्याचा निर्धार केला, तर सैतान आपली एकनिष्ठा तोडू शकणार नाही.—ईयो. २:३; २७:५.

१६, १७. (क) सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना आणखी कोणत्या गोष्टी करणं अशक्य आहे? (ख) आपण यहोवाला मोठ्याने प्रार्थना करण्यापासून का घाबरू नये?

१६ सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना अशक्य असणाऱ्‍या अशा इतर गोष्टीही आहेत. उदाहरणार्थ, बायबल म्हणतं की तो आपल्या मनातल्या गोष्टी ओळखू शकत नाही. या गोष्टी फक्‍त यहोवा आणि येशूच ओळखू शकतात. (१ शमु. १६:७; मार्क २:८) मग आपण मोठ्याने बोललो किंवा प्रार्थना केली तर दियाबल आणि त्याचे दुरात्मे ऐकतील आणि आपल्या विरोधात त्या माहितीचा वापर करतील, म्हणून आपण घाबरून जावं का? मुळीच नाही. जरा विचार करा: दियाबल आपल्याला पाहील म्हणून आपण यहोवाच्या सेवेत चांगल्या गोष्टी करायला घाबरत नाही. मग त्याला ऐकू जाईल म्हणून मोठ्याने प्रार्थना करायला आपण घाबरावं का? तसंच, बायबलमध्ये अशा बऱ्‍याच सेवकांची उदाहरणं आहेत ज्यांनी मोठ्याने प्रार्थना केली. दियाबल ऐकेल म्हणून ते घाबरले असं बायबलमध्ये लिहिलेलं नाही. (१ राजे ८:२२, २३; योहा. ११:४१, ४२; प्रे. कार्ये ४:२३, २४) जर देवाच्या इच्छेनुसार बोलण्याचा आणि कार्य करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला, तर आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा दियाबलापासून आपलं रक्षण करेल. सैतान आपली अशी कोणतीही हानी करू शकत नाही, जी यहोवाला भरून काढणं अशक्य आहे.—स्तोत्र ३४:७ वाचा.

१७ आपल्या शत्रूला आपण ओळखण्याची गरज आहे, घाबरण्याची नाही. जरी आपण अपरिपूर्ण असलो तरी यहोवाच्या मदतीने आपण सैतानावर विजय मिळवू शकतो! (१ योहान २:१४) आपण त्याचा विरोध केला तर तो आपल्यापासून दूर जाईल. (याकोब ४:७; १ पेत्र ५:९) असं दिसून येतं की आज सैतान खासकरून तरुण लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. मग ते सैतानाच्या हल्ल्यापासून स्वतःला कसं वाचवू शकतात? हे आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.

^ परि. 2 काही देवदूतांना नावं असल्याचं बायबल सांगतं. (शास्ते १३:१८; दानी. ८:१६; लूक १:१९; प्रकटी. १२:७) तसंच यहोवाने प्रत्येक ताऱ्‍याला नाव दिलं आहे हेही बायबल सांगतं. (स्तो. १४७:४) यावरून आपल्याला समजतं, की यहोवाने प्रत्येक देवदूतालाही नाव दिलं असावं. सैतान बनलेल्या देवदूताचाही त्यात समावेश होतो.

^ परि. 3 “सैतान” या पदवीचा उल्लेख हिब्रू शास्त्रवचनात फक्‍त १८ वेळा तर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात ३० पेक्षा जास्त वेळा आढळतो.