व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या!

यहोवा आणि येशूसारखं आपणही एकतेत राहू या!

“मी विनंती करतो यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावं.”—योहा. १७:२०, २१.

गीत क्रमांक: १६, ३१

१, २. (क) आपल्या प्रेषितांसोबत केलेल्या शेवटल्या प्रार्थनेत येशूने काय मागितलं? (ख) येशूला शिष्यांमधील एकतेबद्दल चिंता का वाटत असावी?

आपल्या शिष्यांसोबत शेवटचं भोजन करताना येशूला त्यांच्यामधील एकतेबद्दल चिंता होती. त्यांच्यासोबत प्रार्थना करताना त्याने म्हटलं की जसं तो आणि पिता एकतेत आहेत, तसंच शिष्यांनीही एकतेत राहावं. (योहान १७:२०, २१ वाचा.) शिष्य एकतेत राहिल्यामुळे इतरांना याची खातरी पटली असती की यहोवानेच येशूला पृथ्वीवर पाठवलं आहे. शिष्यांचं आपसांत असलेलं प्रेम पाहून लोकांनी ओळखलं असतं की ते येशूचे खरे शिष्य आहेत. या प्रेमामुळे शिष्यांमधील एकता आणखी मजबूत झाली असती.—योहा. १३:३४, ३५.

आपल्या शिष्यांमध्ये पूर्णपणे ऐक्य नाही हे येशूला जाणवलं होतं. म्हणून मग त्या रात्री येशू त्यांच्यासोबत एकतेबद्दल का बोलला असावा हे आपण समजू शकतो. “आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणाला मानले” जावे यावर प्रेषित वाद घालत होते. या गोष्टीवर त्यांनी आधीही वाद घातला होता. (लूक २२:२४-२७; मार्क ९:३३, ३४) दुसऱ्‍या एका प्रसंगी याकोब आणि योहानने येशूला त्याच्या स्वर्गीय राज्यात महत्त्वाच्या, म्हणजे त्याच्या बाजूच्या जागा देण्यासाठी विनंती केली होती.—मार्क १०:३५-४०.

३. कोणत्या गोष्टींमुळे शिष्यांना एकतेत राहायला कठीण गेलं असेल, आणि आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

शिष्यांमधल्या एकतेला धोका निर्माण करणाऱ्‍या गोष्टींमध्ये अधिकार मिळवण्याच्या इच्छेसोबतच इतर गोष्टींचाही समावेश होता. येशूच्या काळातील लोकांच्या मनात ईर्ष्या आणि भेदभाव असल्यामुळे त्यांच्यात एकता नव्हती. शिष्यांना या नकारात्मक भावनांवर मात करण्याची गरज होती. या लेखात आपण तीन प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: लोक करत असलेल्या पक्षपाताबद्दल येशूने काय केलं? इतरांसोबत भेदभाव न करण्यासाठी आणि एकतेत राहण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना कशी मदत केली? येशूने शिकवलेल्या गोष्टींमुळे आणि त्याच्या उदाहरणामुळे आपल्याला आज एकतेत राहायला कशी मदत होते?

येशू आणि त्याच्या शिष्यांसोबत पक्षपात

४. येशूने अनुभवलेल्या भेदभावाबद्दल सांगा.

येशूसोबतही भेदभाव झाला. फिलिप्पने नथनेलला जेव्हा सांगितलं की त्याला मसीहा सापडला आहे तेव्हा नथनेलने म्हटलं: “नासरेथमधून कधी काही चांगलं येऊ शकतं का?” (योहा. १:४६) मीखा ५:२ मध्ये सांगितल्यानुसार, नथनेलला कदाचित माहीत असावं की मसीहाचा जन्म बेथलेहेममध्ये होणार आहे. त्याला कदाचित वाटलं असावं की नासरेथ शहर इतकं महत्त्वाचं नाही की त्यात मसीहाचा जन्म व्हावा. यहुदी धर्मातील काही प्रमुखांनीही येशूला तुच्छ समजलं कारण तो गालील प्रांतातून आला होता. (योहा. ७:५२) बऱ्‍याच यहुदी लोकांना वाटायचं की गालीलमधील लोक खालच्या दर्जाचे आहेत. इतर काही यहुद्यांनी येशूला ‘शोमरोनी’ बोलून त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. (योहा. ८:४८) शोमरोनी लोक दुसऱ्‍या राष्ट्राचे होते आणि त्यांचा धर्मही वेगळा होता. शोमरोनी लोकांबद्दल यहुदी व गालीली लोकांच्या मनात जराही आदर नव्हता आणि ते सहसा त्यांना टाळायचे.—योहा. ४:९.

५. येशूच्या शिष्यांसोबत कसा भेदभाव झाला?

यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनीही येशूच्या शिष्यांचा अपमान केला. परूशी लोकांनी शिष्यांना “शापित लोक” असं म्हटलं. (योहा. ७:४७-४९) परूशी लोक, यहुदी धार्मिक शाळांमधून न शिकलेल्या आणि त्यांच्या प्रथा न पाळणाऱ्‍या लोकांना खूप तुच्छ लेखायचे. (प्रे. कार्ये ४:१३, तळटीप.) येशूच्या काळातील लोकांना आपल्या धर्माबद्दल, समाजातील त्यांच्या स्थानाबद्दल आणि आपल्या जातीबद्दल खूप गर्व होता. यामुळे येशू आणि त्याच्या शिष्यांसोबत भेदभाव झाला. या भेदभावामुळे शिष्यांवर आणि इतरांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनावरही परिणाम झाला. पण एकतेत राहण्यासाठी त्यांना मनातून हे नकारात्मक विचार काढून टाकण्याची गरज होती.

६. भेदभावाचा आपल्यावरही परिणाम होऊ शकतो हे उदाहरणं देऊन स्पष्ट करा.

आजच्या काळातही मोठ्या प्रमाणावर भेदभाव केला जातो. लोक आपल्यासोबत पक्षपात करत असतील किंवा कदाचित आपल्या मनात इतरांबद्दल भेदभावाची भावना असेल. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी एक पायनियर बहीण म्हणते: “आदिवासी लोकांवर आतापर्यंत होत आलेल्या अन्यायाबद्दल सतत विचार केल्यामुळे, माझ्या मनात गोऱ्‍या वर्णाच्या लोकांबद्दल द्वेष वाढत गेला.” काही लोकांकडून चुकीची वागणूक मिळाल्यामुळेही तिचा द्वेष आणखी वाढला. कॅनडामध्ये राहणारा एक फ्रेंच बांधव त्याचा अनुभव सांगताना म्हणतो: “मला वाटायचं की फ्रेंच भाषा बोलणारे लोकच श्रेष्ठ आहेत.” यामुळे त्याला इंग्रजी बोलणारे लोक आवडत नव्हते.

७. लोक करत असलेल्या भेदभावाबद्दल येशूने काय केलं?

येशूच्या काळासारखंच आजही पक्षपाताची भावना लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे आणि तिला काढणं इतकं सोपं नाही. अशा भावनांबद्दल येशूने काय केलं? पहिलं म्हणजे, त्याने स्वतः कधीही भेदभाव केला नाही. तो नेहमी निःपक्ष राहिला. त्याने सर्वांना प्रचार केला, मग ते श्रीमंत असो वा गरीब. त्याने परूशांना, शोमरोनी लोकांना, कर वसूल करणाऱ्‍यांना आणि पापी लोकांनाही प्रचार केला. दुसरं म्हणजे, येशूने आपल्या शब्दांतून आणि उदाहरणातून शिष्यांना शिकवलं की त्यांनी इतरांवर संशय घेऊ नये किंवा त्यांच्यासोबत भेदभाव करू नये.

प्रेम आणि नम्रता या गुणांनी पक्षपातावर मात

८. कोणत्या महत्त्वाच्या तत्त्वावर एकता आधारलेली आहे? स्पष्ट करा.

एकता ज्यावर आधारलेली आहे असं एक महत्त्वाचं तत्त्व येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं. त्याने शिष्यांना म्हटलं: “तुम्ही सर्व जण भाऊ आहात.” (मत्तय २३:८, ९ वाचा.) आदामची मुलं असल्यामुळे एका अर्थी आपण सर्वच जण बांधव आहोत. (प्रे. कार्ये १७:२६) येशूने समजावून सांगितलं की त्याच्या शिष्यांनी यहोवाला त्यांचा पिता मानल्यामुळेही ते एकमेकांचे बांधव आहेत. (मत्त. १२:५०) यामुळे ते सर्व देवाच्या कुटुंबाचे भाग बनले होते आणि प्रेम व विश्‍वासात एकतेत होते. म्हणूनच प्रेषितांनी मंडळ्यांना लिहिलेल्या आपल्या पत्रांत ख्रिश्‍चनांना बंधुभगिनी असं म्हटलं.—रोम. १:१३; १ पेत्र २:१७; १ योहा. ३:१३. *

९, १०. (क) यहुदी लोकांना आपल्या जातीबद्दल विशेष अभिमान बाळगण्याची गरज का नव्हती? (ख) दुसऱ्‍या जातीच्या लोकांना तुच्छ लेखणं चुकीचं आहे हे येशूने कसं दाखवलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

शिष्यांनी एकमेकांना बंधुभगिनी समजलं पाहिजे हे सांगितल्यानंतर, नम्र राहणं किती गरजेचं आहे हे येशूने त्यांना सांगितलं. (मत्तय २३:११, १२ वाचा.) आपण सुरुवातीलाच पाहिलं की गर्वामुळे कधीकधी शिष्यांमध्ये वाद व्हायचा. येशूच्या काळातील लोकांना आपल्या जातीबद्दल खूप अभिमान होता. बऱ्‍याच यहुदी लोकांना वाटायचं की ते अब्राहामची मुलं असल्यामुळे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने त्यांना म्हटलं: “देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्‍न करू शकतो.”—लूक ३:८.

१० आपल्या जातीबद्दल अभिमान बाळगणं चुकीचं आहे असं येशूने शिकवलं. एका नियमशास्त्राच्या जाणकाराला येशूने जे उत्तर दिलं त्यावरून हे स्पष्ट झालं. त्या व्यक्‍तीने येशूला विचारलं: “मुळात माझा शेजारी कोण?” या प्रश्‍नाचं उत्तर देण्यासाठी येशूने एक गोष्ट सांगितली. एका यहुद्याला लुटारूंनी लुटलं आणि मारहाण करून त्याला रस्त्यावरच सोडून दिलं. काही यहुदी लोक त्याच्या जवळून गेले पण त्यांनी त्याला मदत केली नाही. मग एका शोमरोनी माणसाला त्याच्यावर दया आली आणि त्याने त्याला मदत केली. येशूने या गोष्टीच्या शेवटी नियमशास्त्राच्या जाणकाराला सांगितलं की त्याने शोमरोनी माणसासारखं बनलं पाहिजे. (लूक १०:२५-३७) शेजाऱ्‍यावर प्रेम करण्याबद्दल एक शोमरोनी यहुदी लोकांना शिकवू शकतो हे येशूला सांगायचं होतं.

११. येशूच्या शिष्यांना मनातून भेदभाव काढून टाकणं गरजेचं का होतं? ही गोष्ट समजण्यासाठी येशूने त्यांना कशी मदत केली?

११ स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की ते “सबंध यहूदीयात आणि शोमरोनात, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत” साक्ष देतील. (प्रे. कार्ये १:८) पण ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी शिष्यांना गर्व आणि भेदभाव यांसारख्या भावनांवर मात करणं गरजेचं होतं. येशूने बऱ्‍याच वेळा विदेशी लोकांच्या चांगल्या गुणांचा उल्लेख केला आणि यामुळे विदेशी लोकांना प्रचार करण्यासाठी शिष्यांचं मन तयार झालं. उदाहरणार्थ, येशूने विदेशी असलेल्या सैन्यातील एका अधिकाराच्या विश्‍वासाची प्रशंसा केली होती. (मत्त. ८:५-१०) नासरेथमध्ये असताना येशूने सांगितलं की यहोवाने अनेक विदेशी लोकांना मदत केली आहे. जसं की सीदोन देशातील सारफथची विधवा आणि सूरिया देशातील नामान. (लूक ४:२५-२७) येशूने एका शोमरोनी स्त्रीलाही प्रचार केला. तसंच, एका शोमरोनी गावातल्या लोकांनी येशूच्या संदेशात आवड दाखवल्यामुळे तो तिथे दोन दिवस थांबला.—योहा. ४:२१-२४, ४०.

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना पक्षपाताच्या भावनेशी लढावं लागलं

१२, १३. (क) येशू शोमरोनी स्त्रीला शिकवत आहे हे पाहून शिष्यांनी कशी प्रतिक्रिया दिली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) येशूला जे शिकवायचं होतं ते याकोब आणि योहानला पूर्णपणे समजलं नव्हतं हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१२ पक्षपाताची भावना मनातून काढून टाकणं प्रेषितांसाठी इतकं सोपं नव्हतं. येशू एका शोमरोनी स्त्रीला शिकवत आहे हे पाहून त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. (योहा. ४:९, २७) असं का? कदाचित त्या काळात यहुदी धर्मगुरू स्त्रियांशी सार्वजनिक ठिकाणी बोलत नसावेत. आणि समाजात चांगलं नाव नसलेल्या शोमरोनी स्त्रीशी तर ते कधीच बोलले नसते. त्या वेळी प्रेषितांनी येशूला काही खायला सांगितलं, पण येशू त्या स्त्रीला संदेश सांगण्यात इतका गुंतला होता की अन्‍नाकडे त्याने लक्षच दिलं नाही. देवाची इच्छा पूर्ण करणं त्याच्यासाठी अन्‍नासारखंच होतं. यात शोमरोनी स्त्रीला प्रचार करण्याचाही समावेश होता.—योहा. ४:३१-३४.

१३ याकोब आणि योहान मात्र हा महत्त्वाचा धडा शिकले नाहीत. येशूसोबत इतर शिष्य जेव्हा शोमरोनातून प्रवास करत होते तेव्हा एका गावात थांबण्यासाठी ते जागा शोधू लागले. पण शोमरोनी लोकांनी त्यांना जागा दिली नाही. यामुळे याकोब आणि योहान यांना इतका राग आला की त्या संपूर्ण गावाचा अग्नीने नाश करण्यासाठी येशूने त्यांना आज्ञा करावी असं ते म्हणाले. पण येशूने त्यांची कानउघडणी केली. (लूक ९:५१-५६) याकोब आणि योहान जर गालील प्रांतात असते तर कदाचित त्यांना इतका राग आला नसता, कारण ते त्या प्रांताचेच होते. त्यांच्या मनात शोमरोनी लोकांबद्दल भेदभावाची भावना असल्यामुळे त्यांना खूप राग आला होता. काही काळानंतर जेव्हा योहान शोमरोनात प्रचार करत होता तेव्हा बऱ्‍याच लोकांनी संदेश ऐकला. हे पाहून त्याला आपल्या आधीच्या वागण्याचा पस्तावा झाला असावा.—प्रे. कार्ये ८:१४, २५.

१४. भेदभावामुळे उद्‌भवलेली समस्या कशी सोडवण्यात आली?

१४ पेन्टेकॉस्ट ३३ च्या काही काळानंतरच मंडळीमध्ये भेदभावाची एक समस्या उद्‌भवली. गरजू विधवांना जेवण देताना, बांधवांनी ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या विधवांकडे दुर्लक्ष केलं होतं. (प्रे. कार्ये ६:१) या बांधवांच्या मनात ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या लोकांबद्दल भेदभाव असल्यामुळे कदाचित हे घडलं असावं. पण प्रेषितांनी लगेच या समस्येवर तोडगा काढला. सर्वांना योग्य प्रकारे अन्‍न मिळावं यासाठी त्यांनी सात कुशल बांधवांना या कामावर नेमलं. या सर्व बांधवांची नावं ग्रीक होती, त्यामुळे ज्या विधवांचं मन दुखावलं होतं त्यांना या व्यवस्थेमुळे नक्कीच सांत्वन मिळालं असेल.

१५. सर्वांना समान वागणूक द्यायला पेत्र कसा शिकला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१५ येशूच्या शिष्यांनी इ.स. ३६ मध्ये विदेशी लोकांना प्रचार करायला सुरुवात केली. याआधी पेत्रने आपला बहुतेक वेळ यहुदी लोकांना प्रचार करण्यातच घालवला होता. त्या वर्षी देवाने स्पष्ट केलं की ख्रिश्‍चनांनी पक्षपात करणं चुकीचं आहे. यामुळे मग पेत्रने एक रोमी सैनिक, कर्नेल्य याला प्रचार केला. (प्रेषितांची कार्ये १०:२८, ३४, ३५ वाचा.) यानंतर पेत्र यहुदी नसलेल्या ख्रिश्‍चनांसोबत खाऊ-पिऊ लागला. पण याच्या काही वर्षांनंतर अंत्युखियामध्ये असताना त्याने यहुदी नसलेल्या लोकांसोबत खाण्याचं सोडून दिलं. (गलती. २:११-१४) यामुळे पौलने पेत्रची चूक दाखवून दिली आणि पेत्रनेही तो सल्ला स्वीकारला. हे आपण कशावरून म्हणू शकतो? त्याने आशिया मायनरमध्ये असलेल्या यहुदी आणि विदेशी ख्रिश्‍चनांना आपल्या पहिल्या पत्रात सांगितलं की सर्व बांधवांवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे.—१ पेत्र १:१; २:१७.

१६. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लोक कोणत्या गोष्टीमुळे ओळखायचे?

१६ येशूने मांडलेल्या चांगल्या उदाहरणामुळेच शिष्य “सर्व प्रकारच्या” लोकांवर प्रेम करायला शिकले. (योहा. १२:३२; १ तीम. ४:१०) लोकांबद्दल आपले विचार बदलण्यासाठी त्यांना वेळ लागला, पण तरी त्यांनी आपली विचारसरणी बदलली. खरंतर पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लोक त्यांच्यात असलेल्या प्रेमामुळेच ओळखायचे. इ.स. २०० च्या जवळपास, टर्टुलियन नावाच्या एका लेखकाने इतरांचं ख्रिश्‍चनांबद्दल काय मत आहे ते सांगितलं. ख्रिश्‍चनांबद्दल इतरांनी म्हटलं: “त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे,” आणि “एकमेकांसाठी ते जीव द्यायलाही तयार आहेत.” या ख्रिश्‍चनांनी “नवीन व्यक्‍तिमत्त्व” परिधान केल्यामुळे ते सर्व लोकांकडे देवासारखंच समानतेच्या नजरेने पाहायला शिकले.—कलस्सै. ३:१०, ११.

१७. मनातून भेदभावाची भावना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आपण काय करू शकतो? उदाहरणं द्या.

१७ आज आपल्यालादेखील मनातून भेदभावाची भावना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी वेळ लागू शकतो. फ्रान्स देशातील एका बहिणीला हे किती कठीण गेलं याबद्दल सांगताना ती म्हणते: “प्रेम करण्याचा, आपल्याजवळ असलेल्या गोष्टी इतरांसोबत वाटण्याचा, आणि सर्व प्रकारच्या लोकांशी आपुलकीने वागण्याचा काय अर्थ होतो हे यहोवाने मला शिकवलं आहे. असं असलं तरी मी अजूनही भेदभावाची भावना मनातून काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. म्हणूनच मी याबद्दल सारखी प्रार्थना करत राहते.” स्पेनमध्ये राहणारी आपली एक बहीण म्हणते की तिला अजूनही काही लोकांबद्दल पक्षपाताच्या भावनेशी लढावं लागतं. ती म्हणते: “बऱ्‍याच वेळेस त्या भावनांवर मला मात करता येते, पण मला माहितीये की मला नेहमी लढत राहावं लागणार आहे. एकतेने राहणाऱ्‍या यहोवाच्या कुटुंबाचा मी एक भाग आहे आणि यासाठी मी त्याची खूप आभारी आहे.” याबद्दल आपणही गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. आपल्याही मनात इतरांबद्दल भेदभावाची भावना आहे का?

प्रेम वाढवल्यामुळे पक्षपाताची भावना नाहीशी होते

१८, १९. (क) सर्वांचा स्वीकार करण्यासाठी आपल्याजवळ कोणती कारणं आहेत? (ख) आपण हे कसं करू शकतो?

१८ आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक वेळ अशी होती जेव्हा आपण सर्वच देवापासून फार दूर होतो. (इफिस. २:१२) पण आपल्यावर असलेल्या प्रेमामुळे यहोवाने आपल्याला त्याच्या जवळ आणलं. (होशे. ११:४; योहा. ६:४४) ख्रिस्तानेही आपला आनंदाने स्वीकार केला. त्याच्यामुळेच आपल्याला देवाच्या कुटुंबाचा भाग बनणं शक्य झालं. (रोमकर १५:७ वाचा.) आपण अपरिपूर्ण आहोत तरीही येशूने प्रेमळपणे आपला स्वीकार केला आहे. त्यामुळे कोणाला नाकारण्याचा आपण कधी विचारही करू नये.

“वरून येणारी बुद्धी” मिळवल्यामुळे आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि एकतेत राहतो (परिच्छेद १९ पाहा)

१९ या दुष्ट जगाचा अंत जवळ येत असताना लोक दिवसेंदिवस पक्षपाती, विचारांमध्ये विभागलेले आणि द्वेष करणारे बनत चालले आहेत. (गलती. ५:१९-२१; २ तीम. ३:१३) पण यहोवाचे लोक या नात्याने आपण “वरून येणारी बुद्धी” मिळवतो. यामुळे आपल्याला सर्वांशी समानतेने वागायला आणि शांती टिकवून ठेवायला मदत होते. (याको. ३:१७, १८) इतर देशांतील लोकांशी मैत्री करायला आणि त्यांच्या पद्धती स्वीकारायला आपण आनंदाने तयार असलं पाहिजे. तसंच, शक्य असल्यास आपण त्यांची भाषादेखील शिकू शकतो. या गोष्टी केल्यामुळे आपण “समुद्राच्या लाटांसारखी” धार्मिकता आणि “नदीसारखी” शांती अनुभवू शकतो.—यश. ४८:१७, १८.

२०. आपले विचार आणि भावना प्रेमामुळे बदलतात तेव्हा काय परिणाम होतो?

२० लेखाच्या सुरुवातीला उल्लेख करण्यात आलेली ऑस्ट्रेलियाची बहीण जेव्हा बायबलमधून सत्य शिकू लागली, तेव्हा तिच्या मनातून भेदभावाची आणि द्वेषाची तीव्र भावना हळूहळू निघून गेली. तिच्या भावना आणि विचार प्रेमामुळे बदलले. कॅनडामधील फ्रेंच भाषा बोलणारा बांधव म्हणतो की सहसा लोक एकमेकांना जवळून ओळखत नसल्यामुळे एकमेकांचा द्वेष करतात. तो म्हणतो की “एका व्यक्‍तीमध्ये कोणते गुण असतील हे तिच्या जन्माच्या ठिकाणावरून ठरत नाही.” या बांधवाने नंतर एका इंग्रजी बोलणाऱ्‍या बहिणीशी लग्न केलं. या उदाहरणांवरून दिसून येतं की प्रेमामुळे पक्षपातावर मात करता येते. प्रेम आपल्याला कधीही न तुटणाऱ्‍या बंधनात एकमेकांशी जोडतं.—कलस्सै. ३:१४.

^ परि. 8 “भाऊ” या शब्दात मंडळीमधील बहिणींचाही समावेश होऊ शकतो. पौलने रोममधील ‘बांधवांना’ आपलं पत्र लिहिलं, पण ते पत्र बहिणींसाठीही होतं कारण त्यात त्याने काही बहिणींचा नावाने उल्लेख केला. (रोम. १६:३, ६, १२) बऱ्‍याच वर्षांपासून टेहळणी बुरूज मध्येही मंडळीतील ख्रिश्‍चनांना संबोधण्यासाठी बंधुभगिनी असा शब्द वापरण्यात आला आहे.