व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचं लक्ष कोणावर केंद्रित आहे?

तुमचं लक्ष कोणावर केंद्रित आहे?

“हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्‍या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो.”—स्तो. १२३:१.

गीत क्रमांक: ३२, १८

१, २. यहोवावर लक्ष केंद्रित करण्याचा काय अर्थ होतो?

आज आपण “अतिशय कठीण” काळात जगत आहोत. (२ तीम. ३:१) आणि यहोवा या दुष्ट जगाचा नाश करून पृथ्वीवर खरी शांती आणेपर्यंत परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत जाणार आहे. यामुळे आपण सर्वांनीच स्वतःला पुढील प्रश्‍न विचारणं गरजेचं आहे: ‘मी मार्गदर्शन आणि मदतीसाठी कोणाकडे बघतो?’ ‘यहोवाकडे’ असं आपण लगेच उत्तर देऊ आणि ही खूप चांगली गोष्ट आहे.

पण यहोवावर लक्ष केंद्रित करण्याचा काय अर्थ होतो? तसंच, समस्या असतानाही आपलं लक्ष यहोवावरच केंद्रित आहे याची आपण खातरी कशी करू शकतो? बऱ्‍याच वर्षांआधी बायबलच्या एका लेखकाने, मदतीसाठी यहोवावर लक्ष केंद्रित करणं किती गरजेचं आहे याबद्दल सांगितलं. (स्तोत्र १२३:१-४ वाचा.) त्याने म्हटलं की आपण जेव्हा यहोवावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण मालकावर लक्ष केंद्रित करणाऱ्‍या एका दासासारखे असतो. कोणत्या अर्थाने? एक दास आपल्या मालकावर अन्‍नासाठी, त्याच्या गरजांसाठी आणि संरक्षणासाठी अवलंबून राहतो. या गोष्टींसाठी त्याचं लक्ष मालकावर केंद्रित असतं. पण यासोबतच त्याने आपल्या मालकाची इच्छा समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार कार्य करण्यासाठीही त्याच्यावर नेहमी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच प्रकारे आपणही यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेण्यासाठी दररोज त्याच्या वचनाचा खोलवर अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यानुसार कार्य केलं पाहिजे. आपण असं केलं तर आपण खातरी बाळगू शकतो की गरजेच्या वेळी यहोवा आपल्याला नक्की मदत करेल.—इफिस. ५:१७.

३. कशामुळे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं?

आपलं लक्ष नेहमी यहोवावर केंद्रित असलं पाहिजे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण तरीदेखील कधीकधी आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. लाजरची बहीण मार्था हिच्यासोबतही हेच घडलं. मार्था एक विश्‍वासू स्त्री होती आणि येशू तिच्यासमोर होता तरीदेखील तिचं लक्ष विचलित झालं. बायबल सांगतं की ती “बरीच कामे करण्यात व्यस्त होती.” (लूक १०:४०-४२) यावरून कळतं की आपण सावध नसलो तर आपलंही लक्ष विचलित होऊ शकतं. कोणत्या गोष्टीमुळे असं घडू शकतं? इतर लोकांच्या वागण्यामुळे आपलं लक्ष कसं विचलित होऊ शकतं, याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आपण नेहमी यहोवावर आपलं लक्ष कसं केंद्रित करू शकतो याबद्दलही आपण शिकू.

एक विश्‍वासू पुरुष बहुमान गमावतो

४. मोशेला वचनयुक्‍त देशात जाता आलं नाही याचं काहींना आश्‍चर्य का वाटू शकतं?

मोशे मार्गदर्शनासाठी नेहमी यहोवावर अवलंबून राहिला. बायबल त्याच्याबद्दल सांगतं की “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांना ११:२४-२७ वाचा.) बायबल हेदेखील सांगतं की “परमेश्‍वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्राएलात आजवर झाला नाही.” (अनु. ३४:१०) मोशे यहोवाचा जवळचा मित्र असला तरी त्याने वचनयुक्‍त देशात जाण्याचा बहुमान गमावला. (गण. २०:१२) असं कशामुळे झालं?

५-७. इजिप्तमधून निघाल्यानंतर काय घडलं आणि मोशेने काय केलं?

इजिप्त देशातून निघाल्याच्या दोन महिन्याच्या आतच एक गंभीर परिस्थिती उद्‌भवली. इस्राएली लोक अजून सीनाय पर्वताजवळ पोचले नव्हते. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे इस्राएली लोक मोशेविरुद्ध कुरकुर करू लागले. लोक मोशेवर इतके जास्त रागावले की “मोशेने परमेश्‍वराचा धावा करून म्हटले, या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत.” (निर्ग. १७:४) यावर यहोवाने मोशेला काही स्पष्ट सूचना दिल्या. यहोवाने सांगितलं की त्याने आपली काठी होरेबमधील खडकावर मारावी. या घटनेबद्दल बायबल सांगतं: “इस्राएलांच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले.” मग खडकातून पाणी वाहू लागलं आणि इस्राएली लोकांना पिण्यासाठी भरपूर पाणी मिळालं. अशा प्रकारे यहोवाने ती समस्या सोडवली.—निर्ग. १७:५, ६.

बायबल सांगतं की मोशेने त्या ठिकाणाचं नाव मस्सा, म्हणजेच “परीक्षा” आणि मरीबा, म्हणजेच “कलह” असं ठेवलं. त्याने अशी नावं का दिली? “कारण इस्राएल लोकांनी तिथे कलह केला आणि ‘परमेश्‍वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही’ असे म्हणून परमेश्‍वराची परीक्षा पाहिली.”—निर्ग. १७:७.

मरीबामध्ये जे झालं त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं? इस्राएली लोकांनी फक्‍त मोशेविरुद्ध नाही, तर आपल्याविरुद्ध आणि आपल्या अधिकाराविरुद्ध बंड केलं आहे असं यहोवाला वाटलं. (स्तोत्र ९५:८, ९ वाचा.) इस्राएली लोकांनी खूप मोठी चूक केली. पण मोशेने मात्र योग्य ते केलं. त्याने मदतीसाठी यहोवाकडे पाहिलं आणि दिलेल्या सूचनांचं पालन केलं.

८. वचनयुक्‍त देशाच्या जवळ असताना काय घडलं?

पण ४० वर्षांनंतर अशीच एक परिस्थिती उद्‌भवली तेव्हा काय घडलं? त्या वेळी इस्राएली लोक वचनयुक्‍त देशाच्या अगदी जवळ पोचले होते. ते कादेश नावाच्या ठिकाणाजवळ पोचले होते. हे ठिकाण वचनयुक्‍त देशाच्या सीमेवर होतं. या ठिकाणाचंही नाव मरीबा असं ठेवण्यात आलं. * असं का? कारण इस्राएली लोक पुन्हा पाण्यासाठी कुरकुर करू लागले. (गण. २०:१-५) पण या वेळी मोशेच्या हातून एक गंभीर चूक घडली.

९. यहोवाने मोशेला कोणती सूचना दिली, पण मोशेने काय केलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

लोकांनी बंड केल्यावर मोशेने काय केलं? त्याने मार्गदर्शनासाठी पुन्हा यहोवाकडे पाहिलं. पण या वेळी यहोवाने मोशेला खडकावर काठी मारायला सांगितलं नाही. यहोवाने त्याला सांगितलं की लोकांना खडकाजवळ जमव आणि मग खडकासोबत बोल. (गण. २०:६-८) मोशेने यहोवाची आज्ञा पाळली का? नाही. इस्राएली लोकांच्या वागण्यामुळे मोशेला इतका राग आला की तो लोकांना ओरडून म्हणाला: “बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय?” मग त्याने त्या खडकावर एकदा नाही तर दोनदा काठी मारली.—गण. २०:१०, ११.

१०. मोशेने जे केलं त्यामुळे यहोवाला कसं वाटलं?

१० यहोवा मोशेवर खूप रागावला. (अनु. १:३७; ३:२६) याचं कारण काय होतं? याचं एक कारण हे असू शकतं की यहोवाने दिलेल्या नवीन सूचना मोशेने पाळल्या नाहीत.

११. खडकावर काठी मारल्यामुळे हा चमत्कार नाही असं वाटण्याची शक्यता का होती?

११ यहोवाला राग येण्याचं आणखी एक कारण असू शकतं. सुरुवातीच्या मरीबामध्ये असलेले खडक हे ग्रॅनाईटचे होते. खूप कडक असलेल्या या खडकांवर कितीही जोराने मारलं तरी त्यातून पाणी निघणं अशक्य आहे. पण वचनयुक्‍त देशाजवळ असलेल्या मरीबामध्ये जे खडक होते ते खूप वेगळे होते. त्या ठिकाणी बरेचसे चुनखडक होते. चुनखडक हे कडक नसतात, त्याला छिद्रं असतात आणि पाणी झिरपून त्यात ते साठतं. यामुळे ते खडक फोडून किंवा त्यात छिद्र करून लोक पाणी काढू शकतात. मोशेने खडकाशी बोलण्याऐवजी जेव्हा त्यावर काठी मारली, तेव्हा इस्राएली लोकांना कदाचित वाटलं असेल की हा यहोवाने केलेला चमत्कार नाही. खडकात पाणी असल्यामुळे ते वाहू लागलं. * अर्थात तिथे नेमकं काय घडलं असेल हे आपण खातरीने सांगू शकत नाही.

यहोवाच्या नजरेत बंड

१२. यहोवाला राग येण्याचं आणखी एक कारण काय असू शकतं?

१२ यहोवाला मोशे आणि अहरोन यांचा राग येण्याचं आणखी एक कारण असू शकतं. मोशे लोकांना म्हणाला: “तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय?” मोशेने जेव्हा “आम्ही” असं म्हटलं तेव्हा तो त्यात स्वतःचा आणि अहरोनचा समावेश करत होता. असं बोलण्याद्वारे त्याने यहोवाचा अनादर केला. यहोवाने नाही तर त्याने हा चमत्कार केला आहे असं मोशेने दर्शवलं. स्तो. १०६:३२, ३३ म्हणतं: “मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले; कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले.” * (गण. २७:१४) जो आदर यहोवाला द्यायचा होता तो मोशेने दिला नाही. यहोवाने मोशे आणि अहरोनला म्हटलं की तुम्ही “माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.” (गण. २०:२४) यहोवाच्या नजरेत ही खूप गंभीर चूक होती.

१३. यहोवाने मोशेला जी शिक्षा दिली ती रास्त आणि योग्य होती असं का म्हणता येईल?

१३ मोशे आणि अहरोन यहोवाच्या लोकांचं नेतृत्व करत होते त्यामुळे यहोवाच्या नजरेत ते जबाबदार होते. (लूक १२:४८) याआधी यहोवाने एका संपूर्ण पिढीला वचनयुक्‍त देशात जाऊ दिलं नाही कारण त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं होतं. (गण. १४:२६-३०, ३४) यामुळे जेव्हा मोशेने यहोवाविरुद्ध बंड केलं तेव्हा त्यालाही त्याच प्रकारे शिक्षा देणं हे रास्त आणि योग्य होतं. इतर बंडखोरांसारखंच मोशेलाही यहोवाने वचनयुक्‍त देशात जाऊ दिलं नाही.

बंड करण्याचं कारण

१४, १५. मोशेने यहोवाविरुद्ध बंड करण्यामागचं कारण काय असू शकतं?

१४ मोशेने यहोवाविरुद्ध बंड का केलं? स्तोत्र १०६:३२, ३३ मध्ये म्हटलं आहे: “मरीबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळे मोशेवर अरिष्ट आले; कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला, आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढले.” इस्राएली लोकांनी मोशेविरुद्ध नाही तर यहोवाविरुद्ध बंड केलं होतं. पण तरी राग मात्र मोशेने व्यक्‍त केला. त्याने आत्मसंयम दाखवला नाही आणि तो अविचारीपणे बोलला.

१५ मोशेने यहोवावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं, पण इतरांच्या वागण्यामुळे त्याचं लक्ष विचलित झालं. इस्राएली लोकांनी जेव्हा पहिल्यांदा पाण्याबद्दल कुरकुर केली, तेव्हा मोशेने योग्य ते केलं होतं. (निर्ग. ७:६) पण नंतर अनेक वर्षं इस्राएली लोक करत असलेल्या बंडामुळे कदाचित मोशे वैतागला असेल. आपण यहोवाचा गौरव कसा करू शकतो यावर विचार करण्याऐवजी तो कदाचित आता फक्‍त स्वतःच्या भावनांबद्दल विचार करत होता.

१६. मोशेच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल विचार करणं गरजेचं का आहे?

१६ मोशेसारख्या विश्‍वासू संदेष्ट्याचं जर लक्ष विचलित होऊन त्याच्या हातून पाप घडू शकतं, तर आपल्या बाबतीतही हे घडू शकतं. मोशे वचनयुक्‍त देशाच्या उंबरठ्यावर होता, आणि आपणही नवीन जगाच्या अगदी दारात येऊन पोचलो आहोत. (२ पेत्र ३:१३) हा विशेष बहुमान गमावण्याची आपल्यापैकी कोणाचीच इच्छा नाही. पण नवीन जगात जाण्यासाठी आपल्याला यहोवावर नेहमी लक्ष केंद्रित करण्याची आणि त्याच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे. (१ योहा. २:१७) मोशेने जी चूक केली त्यातून आपण कोणते धडे शिकू शकतो?

इतरांमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका

१७. रागात असतानाही आपण आपला आत्मसंयम कसा टिकवून ठेवू शकतो?

१७ रागात असताना आपला आत्मसंयम गमावू नका. कधीकधी आपल्या जीवनात एकच समस्या वारंवार येते. बायबल आपल्याला सल्ला देतं: “आपण हिंमत हारून चांगले ते करत राहण्याचे सोडू नये; कारण जर आपण खचून गेलो नाही, तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलती. ६:९; २ थेस्सलनी. ३:१३) जेव्हा एखादी व्यक्‍ती किंवा गोष्ट आपल्याला सारखीसारखी चीड आणते, तेव्हा आपण अविचारीपणे बोलतो का? आपण आपल्या रागावर ताबा ठेवतो का? (नीति. १०:१९; १७:२७; मत्त. ५:२२) इतर जण आपल्याला चीड आणतात, तेव्हा आपण “क्रोध व्यक्‍त करणे देवावर सोडून” दिलं पाहिजे. (रोमकर १२:१७-२१ वाचा.) याचा काय अर्थ होतो? रागावण्याऐवजी आपण धीराने यहोवावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यहोवाला योग्य वाटेल तेव्हा तो आपली समस्या सोडवेल असा भरवसा आपण बाळगला पाहिजे. यहोवावर भरवसा न ठेवता जर आपण बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर आपण यहोवाचा अनादर करत असू.

१८. सूचनांचं पालन करण्याबाबतीत आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१८ दिलेल्या सूचना तंतोतंत पाळा. यहोवा आपल्याला वेळोवेळी ज्या काही सूचना देतो त्या आपण पूर्णपणे पाळतो का? आपण आधीपासून करत आलो आहोत म्हणून एखादी गोष्ट तशीच केली पाहिजे असा आपण विचार करू नये. याऐवजी यहोवा त्याच्या संघटनेद्वारे देत असलेल्या कोणत्याही नवीन सूचनांचं आपण लगेच पालन केलं पाहिजे. (इब्री १३:१७) तसंच, “ज्या लिहिण्यात आल्या आहेत, त्या गोष्टींच्या पलीकडे” आपण कधीही जाऊ नये. (१ करिंथ. ४:६) आपण जेव्हा यहोवाने दिलेल्या सूचना पूर्णपणे पाळतो तेव्हा आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असतो.

इतरांच्या चुकांवर मोशेने जशी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण कोणता धडा शिकतो? (परिच्छेद १९ पाहा)

१९. इतरांच्या चुकांचा यहोवासोबत असलेल्या आपल्या मैत्रीवर परिणाम होणार नाही, याची काळजी आपण कशी घेऊ शकतो?

१९ यहोवासोबत असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर इतरांच्या चुकांचा परिणाम होऊ देऊ नका. आपण नेहमी यहोवाकडे पाहत राहिलो तर इतरांच्या चुकांमुळे आपण कधीही मनात कटू भावना येऊ देणार नाही किंवा यहोवासोबतची आपली मैत्री तोडणार नाही. मोशेसारखी आपल्याला जर संघटनेत जबाबदारी मिळाली असेल तर खासकरून तेव्हा याबद्दल खबरदार राहणं खूप गरजेचं आहे. हे खरं आहे की तारण मिळवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकालाच मेहनत करण्याची आणि यहोवाच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे. (फिलिप्पै. २:१२) पण आपल्याला जर संघटनेत जास्त जबाबदाऱ्‍या देण्यात आल्या असतील, तर यहोवा आपल्याकडून जास्त अपेक्षादेखील करतो हे आपण कधीही विसरू नये. (लूक १२:४८) आपण जर नेहमी यहोवावर विसंबून राहिलो तर मग कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अडखळण बनणार नाही किंवा आपल्याला त्याच्या प्रेमापासून दूर करणार नाही.—स्तो. ११९:१६५; रोम. ८:३७-३९.

२०. आपला निर्धार काय असला पाहिजे?

२० आज आपण कठीण काळात जगत आहोत. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की “स्वर्गात राजासनारूढ” असलेल्या यहोवा देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण इतरांच्या वागण्याचा परिणाम यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कधीही होऊ देऊ नये. मोशेच्या बाबतीत जे घडलं त्यातून आपण एक मोलाचा धडा शिकतो. इतर जण चुका करतात तेव्हा अविचारीपणे वागण्याऐवजी, यहोवा आपल्यावर “कृपा करेपर्यंत त्याच्याकडे” पाहत राहण्याचा आपण निर्धार करू या.—स्तो. १२३:१, २.

^ परि. 8 मरीबा नावाचं हे ठिकाण रफीदीम जवळ असलेल्या मरीबा, ज्याला मस्साही म्हटलं जायचं त्यापेक्षा वेगळं होतं. पण या दोन्ही ठिकाणांना मरीबा हे नाव देण्यात आलं कारण इस्राएली लोकांनी तिथे कुरकुर केली होती.—अभ्यास मार्गदर्शिका भाग ७ मध्ये असलेला नकाशा पाहा.

^ परि. 11 या अहवालाबद्दल प्राध्यापक जॉन ए. बेक असं म्हणतात की यहुदी लोकांच्या एका कथेनुसार बंडखोरांनी असा दावा केला होता की त्या खडकात पाणी आहे हे मोशेला माहीत होतं म्हणून याला चमत्कार म्हणता येणार नाही. यामुळे बंडखोरांनी मोशेला म्हटलं की जर हा चमत्कार असेल तर त्याने तो दुसऱ्‍या खडकावरही करून दाखवावा. पण ही यहुदी लोकांमध्ये सांगितली जाणारी एक कथा आहे.

^ परि. 12 टेहळणी बुरूज८७-E १०/१५ “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.