व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उदारतेने देणारे नेहमी आनंदी असतात

उदारतेने देणारे नेहमी आनंदी असतात

“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रे. कार्ये २०:३५.

गीत क्रमांक: १६, १४

१. यहोवा उदार देव आहे हे कशावरून दिसून येतं?

सृष्टी बनवण्याआधी यहोवा स्वर्गात एकटा होता. मग त्याने इतरांना जीवन भेट म्हणून द्यायचं ठरवलं. यासाठी त्याने बुद्धिमान स्वर्गदूतांची आणि मानवांची निर्मिती केली. आपल्या आनंदी देवाला, यहोवाला इतरांना चांगल्या गोष्टी देण्यात खूप आनंद होतो. (१ तीम. १:११; याको. १:१७) यहोवाची इच्छा आहे की आपणही आनंदी असावं, म्हणून तो आपल्याला उदार बनण्यास शिकवतो.—रोम. १:२०.

२, ३. (क) उदार असल्यामुळे आपण आनंदी कसे होतो? (ख) आपण या लेखातून काय शिकणार आहोत?

देवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवलं. (उत्प. १:२७) याचा अर्थ यहोवामध्ये जे गुण आहेत ते गुण त्याने आपल्याला दिले आहेत. जीवनात खऱ्‍या अर्थाने आनंदी होण्यासाठी आणि यहोवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला त्याचं अनुकरण करण्याची गरज आहे. आपण इतरांमध्ये आस्था घेतली पाहिजे आणि त्यांना उदार मनाने मदत करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. (फिलिप्पै. २:३, ४; याको. १:५) असं करणं का गरजेचं आहे? कारण यहोवाने आपली रचना तशी केली आहे. आज आपण अपरिपूर्ण असलो तरीही यहोवाचं अनुकरण करू शकतो आणि त्याच्यासारखी उदारता दाखवू शकतो.

बायबल आपल्याला उदार असण्याबद्दल जे शिकवतं त्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. उदारता दाखवल्यामुळे यहोवाला का आनंद होतो हे आपण पाहू या. तसंच, यहोवाने दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी उदारता आपल्याला कशी मदत करते हेदेखील आपण शिकू या. यासोबतच उदार असल्यामुळे आपण आनंदी कसे होऊ शकतो आणि आपण हा गुण नेहमी दाखवत राहणं गरजेचं का आहे, हेदेखील आपण या लेखातून शिकू या.

आपली उदार वृत्ती पाहून यहोवाला खूप आनंद होतो

४, ५. यहोवा आणि येशू यांनी उदारता कशी दाखवली आहे आणि आपण त्यांचं अनुकरण का केलं पाहिजे?

यहोवाची इच्छा आहे की मानवांनी त्याचं अनुकरण करावं. त्यामुळे आपण जेव्हा उदारता दाखवतो तेव्हा त्याला आनंद होतो. (इफिस. ५:१) आपण आनंदी असावं असंही यहोवाला वाटतं. आपली आणि आपल्या पृथ्वीची रचना ज्या सुंदर प्रकारे करण्यात आली आहे त्यावरून आपण असं म्हणू शकतो. आपल्याला आनंद मिळावा म्हणूनच त्याने पृथ्वीवर या सर्व गोष्टी बनवल्या आहेत. (स्तो. १०४:२४; १३९:१३-१६) त्यामुळे आपण जेव्हा इतरांना आनंद होईल असं काहीतरी करतो तेव्हा खरंतर आपण यहोवाला आदर देत असतो.

आपण उदारता कशी दाखवू शकतो याबद्दल येशूने एक खूप चांगलं उदाहरण मांडलं आहे. त्याने म्हटलं: “मनुष्याचा पुत्रदेखील सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आणि अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.” (मत्त. २०:२८) प्रेषित पौलने ख्रिश्‍चनांना असं प्रोत्साहन दिलं: “ख्रिस्त येशूमध्ये असलेली ही मनोवृत्ती नेहमी आपल्यामध्ये असू द्या. . . . त्याने आपल्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींचा त्याग केला आणि एखाद्या दासासारखा होऊन तो मानव बनला.” (फिलिप्पै. २:५, ७) म्हणून आपण स्वतःला विचारू शकतो की, ‘येशूच्या उदाहरणाचं मी आणखी जवळून अनुकरण कसं करू शकतो?’—१ पेत्र २:२१ वाचा.

६. येशूने चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यातून काय शिकवलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवा आणि येशू यांनी उदार असण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं आहे. आपण जेव्हा त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. यात लोकांमध्ये मनापासून आस्था घेणं आणि त्यांना मदत करण्यासाठी मार्ग शोधणं सामील आहे. उदार असणं किती महत्त्वाचं आहे हे येशूने चांगल्या शोमरोन्याचा दाखला देण्याद्वारे सांगितलं. (लूक १०:२९-३७ वाचा.) येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं की त्यांनी इतरांना मदत केली पाहिजे, मग ते कोणत्याही ठिकाणाचे किंवा पार्श्‍वभूमीचे असले तरीही. येशूने हा दाखला का सांगितला हे तुम्हाला आठवतं का? एका यहुदी माणसाने येशूला विचारलं होतं: “मुळात माझा शेजारी कोण?” येशूने उत्तर देताना जो दाखला सांगितला त्यावरून दिसून येतं की आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल, तर आपल्याला त्या शोमरोनी माणसासारखं इतरांना उदारता दाखवणं गरजेचं आहे.

७. यहोवाचीच कार्य करण्याची पद्धत योग्य आहे हे आपण कसं दाखवू शकतो? स्पष्ट करा.

उदार असण्याचं आणखी एक कारण आपल्याला एदेन बागेत जे घडलं त्यावरून कळतं. सैतानाने दावा केला की जर आदाम-हव्वाने यहोवाची आज्ञा मोडली आणि फक्‍त स्वतःचा विचार केला तर ते आनंदी राहतील. हव्वा स्वार्थी होती आणि तिला देवासारखं बनण्याची इच्छा होती. आदामदेखील स्वार्थी होता कारण त्याला देवापेक्षा हव्वा जास्त प्रिय होती. (उत्प. ३:४-६) पण याचे परिणाम भयानक झाले. यावरून दिसून येतं की मनात स्वार्थ बाळगल्यामुळे एक व्यक्‍ती कधीच आनंदी होऊ शकत नाही. पण जेव्हा आपण निःस्वार्थ वृत्ती आणि उदारता दाखवतो, तेव्हा आपण यहोवाचीच कार्य करण्याची पद्धत योग्य आहे हे दाखवत असतो.

देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करा

८. आदाम-हव्वाने इतरांचा विचार करण्याची गरज का होती?

आदाम आणि हव्वा यांच्याशिवाय एदेन बागेत इतर कोणीही मानव नव्हता. पण तरीदेखील त्यांनी येणाऱ्‍या पिढीचा विचार करण्याची गरज होती. असं का? कारण यहोवाने त्यांना मुलांना जन्म देण्याची आणि संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवण्याची जबाबदारी दिली होती. (उत्प. १:२८) मानवांनी पृथ्वीवर आनंदी राहावं अशी यहोवाची इच्छा होती. यहोवासारखाच आदाम-हव्वानेही पुढे येणाऱ्‍या त्यांच्या पिढीचा विचार करायला हवा होता. यहोवाची इच्छा होती की पृथ्वीला नंदनवन बनवण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मिळून काम करावं. ही एक खूप मोठी कामगिरी होती!

९. पृथ्वीला नंदनवन बनवण्यात मानवांना आनंद का मिळाला असता?

आदाम-हव्वाने पाप केलं नसतं, तर संपूर्ण पृथ्वीवर परिपूर्ण मानव असते. दिलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण मानवांना यहोवासोबत मिळून काम करणं गरजेचं होतं. यामुळे ते पृथ्वीला नंदनवन बनवू शकले असते आणि यहोवाचा उद्देश पूर्ण करू शकले असते. असं करण्याद्वारे ते देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकले असते. (इब्री ४:११) संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवण्याचं काम किती रोमांचक असतं याची कल्पना करा. निःस्वार्थ वृत्ती आणि इतरांची काळजी घेतल्यामुळे यहोवाने त्यांना भरभरून आशीर्वाद दिले असते.

१०, ११. प्रचार करणं आणि शिष्य बनवणं आपल्याला कशामुळे शक्य होईल?

१० आज यहोवाने आपल्यालाही एक खास कामगिरी दिली आहे. आपण प्रचार करून शिष्य बनवावं अशी त्याची इच्छा आहे. पण हे काम करण्यासाठी आपल्या मनात लोकांबद्दल काळजी असणं गरजेचं आहे. खरंतर, यहोवाबद्दल आणि लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे जर आपण हे काम केलं, तरच आपण यात टिकून राहू शकतो.

११ पौलने म्हटलं की तो आणि इतर ख्रिश्‍चन “देवाचे सहकारी” आहेत, कारण ते लोकांना प्रचार करायचे आणि त्यांना सत्य शिकवायचे. (१ करिंथ. ३:६, ९) आज आपणही उदारतेने आपला वेळ, शक्‍ती आणि भौतिक गोष्टी यांचा उपयोग प्रचार करण्यासाठी करू शकतो. असं करण्याद्वारे आपणही “देवाचे सहकारी” बनू. हा खरंच किती मोठा बहुमान आहे!

सत्य शिकण्यासाठी एखाद्याला मदत केल्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल (परिच्छेद १२ पाहा)

१२, १३. शिष्य बनवल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?

१२ उदारपणे आपल्या वेळेचा आणि शक्‍तीचा वापर इतरांना शिकवण्यासाठी केल्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. बायबल अभ्यास चालवणाऱ्‍या बऱ्‍याच बंधुभगिनींनी हा आनंद अनुभवला आहे. आपला विद्यार्थी एखादी बायबलची शिकवण समजल्यावर उत्साहित होतो, त्याचा विश्‍वास वाढतो, तो जीवनात बदल करतो आणि मग शिकलेल्या गोष्टी इतरांनाही सांगू लागतो, तेव्हा हे सर्व पाहून आपल्याला मनापासून आनंद होतो. येशूचे ७० शिष्य जेव्हा चांगले अनुभव मिळाल्यामुळे “आनंदाने परत आले” तेव्हा त्यांना पाहून येशूलाही खूप आनंद झाला.—लूक १०:१७-२१.

१३ बायबलच्या संदेशामुळे जगभरातील लोकांना आपलं जीवन सुधारण्यास मदत मिळत आहे, हे पाहून आपल्या सर्वांनाच खूप आनंद होतो. उदाहरणार्थ, अॅना नावाच्या एका तरुण बहिणीला आपली सेवा वाढवायची होती. * यामुळे ती उत्तर युरोपमध्ये प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी गेली. तिने म्हटलं: “इथे बायबल अभ्यास सहज मिळतात आणि हे पाहून मला खूप आनंद होतो. मी करत असलेल्या सेवेमुळे मला खूप समाधान मिळतं. मी घरी येते तेव्हा मला स्वतःबद्दल विचार करायला वेळच नसतो. माझ्या बायबल विद्यार्थ्यांना कोणत्या समस्यांचा, चिंतांचा सामना करावा लागतो याचाच विचार मी करत असते. त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल याचा मी विचार करते आणि त्यांना व्यावहारिक मार्गाने मदत करण्याचाही प्रयत्न करते. मला खात्री पटली आहे की ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.’”—प्रे. कार्ये २०:३५.

आपण क्षेत्रातल्या प्रत्येक घरात जातो, तेव्हा आपण प्रत्येकाला राज्याचा संदेश ऐकण्याची संधी देत असतो (परिच्छेद १४ पाहा)

१४. लोक आपलं ऐकत नसले तरी आपण प्रचारकार्यात आनंद कसा मिळवू शकतो?

१४ प्रचार करताना लोकांनी आपलं ऐकलं नाही तरी आपण आनंद मिळवू शकतो. कारण असं करण्याद्वारे आपण प्रत्येकाला आनंदाचा संदेश ऐकण्याची संधी देत असतो. यहोवाने यहेज्केलकडून जी अपेक्षा केली तीच अपेक्षा तो आपल्याकडूनही करतो. त्याने म्हटलं: “ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांस सांग.” (यहे. २:७; यश. ४३:१०) यामुळे लोकांची प्रतिक्रिया कशीही असली तरी आपण घेत असलेल्या प्रयत्नांची यहोवा कदर करतो. (इब्री लोकांना ६:१० वाचा.) एका बांधवाने तो करत असलेल्या सेवेबद्दल असं म्हटलं: “आम्ही बी पेरलं, पाणी घातलं, आणि प्रार्थना केली की यहोवाने सत्याबद्दल लोकांची आस्था वाढवावी.”—१ करिंथ. ३:६.

आपण आनंदी कसं होऊ शकतो?

१५. आपण दाखवत असलेल्या उदारतेबद्दल कदर बाळगणाऱ्‍या लोकांनाच आपण उदारता दाखवली पाहिजे का? स्पष्ट करा.

१५ येशूची इच्छा आहे की आपण उदार असावं कारण त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपण उदारता दाखवली तर इतर लोकांनाही उदार बनण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे तो आपल्याला उत्तेजन देतो: “इतरांना देत राहा म्हणजे तेही तुम्हाला देतील. ते तुमच्या पदरात भरपूर माप, हलवून, दाबून व ओसंडून वाहेपर्यंत ओततील. कारण ज्या मापाने तुम्ही इतरांना मापून देत आहात, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील.” (लूक ६:३८) हे खरं आहे की आपण उदारता दाखवतो तेव्हा सर्वच लोक त्याबद्दल कदर दाखवत नाहीत. पण नेहमी उदारता दाखवत राहा, लोक त्याबद्दल कदर दाखवत नसले तरीही. कारण उदारतेच्या एका कृत्यामुळे एखाद्याच्या मनावर कसा परिणाम होईल हे आपण सांगू शकत नाही.

१६. आपण कोणाला उदारता दाखवली पाहिजे आणि का?

१६ मनापासून उदार असलेले लोक इतरांकडून परतफेडीची कधीच अपेक्षा करत नाही. येशूने म्हटलं: “तू मेजवानी देशील तेव्हा जे गरीब, लंगडेलुळे व आंधळे आहेत त्यांना आमंत्रण दे. म्हणजे तू आनंदी होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नाही.” (लूक १४:१३, १४) बायबल आपल्याला हेदेखील सांगतं: “ज्याची दृष्टि उदार त्याचे कल्याण होते,” आणि “जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य!” (नीति. २२:९; स्तो. ४१:१) आपल्याला इतरांना मदत करायची इच्छा आहे म्हणून आपण नेहमी उदार असलं पाहिजे.

१७. आपण कोणत्या मार्गाने उदारता दाखवू शकतो?

१७ पौलने आपल्या पत्रात जेव्हा “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे” या येशूच्या शब्दांचा उल्लेख केला, तेव्हा तो फक्‍त भौतिक गोष्टी देण्याबद्दल बोलत नव्हता. भौतिक गोष्टींसोबतच आपण इतरांना उत्तेजन व बायबलमधून चांगले सल्ले देऊ शकतो. तसंच, आपण त्यांना व्यावहारिक मार्गानेही मदत करू शकतो. (प्रे. कार्ये २०:३१-३५) पौलने आपल्या शब्दांतून आणि कार्यांतून आपल्याला शिकवलं की आपला वेळ, शक्‍ती आणि प्रेम हे इतरांना उदारपणे देणं खूप महत्त्वाचं आहे.

१८. अभ्यासक उदार असण्याच्या फायद्यांबद्दल काय सांगतात?

१८ मानवी स्वभावाचा अभ्यास करणाऱ्‍यांनाही हे दिसून आलं आहे की उदारतेने इतरांना मदत केल्यामुळे एक व्यक्‍ती आनंदी होते. एका लेखात सांगितलं होतं की इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्यामुळे लोकांना मनापासून आनंद होतो. अभ्यासकांचं म्हणणं आहे की आपण जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या जीवनाला अर्थ आणि उद्देश लाभतो. यामुळेच काही तज्ज्ञ, लोकांना आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचं सुचवतात. यांबद्दल ऐकून आपल्याला नक्कीच आश्‍चर्य होत नाही, कारण आपला प्रेमळ पिता, यहोवा नेहमीच आपल्याला उदार बनण्यास शिकवत आला आहे.—२ तीम. ३:१६, १७.

उदारता दाखवत राहा

१९, २०. तुमची उदार बनण्याची इच्छा का आहे?

१९ आपण आज ज्या समाजात राहतो तिथे सहसा लोक फक्‍त स्वतःचाच विचार करतात. यामुळे अशा वातावरणात इतरांना उदारता दाखवत राहणं सोपं नाही. पण येशूने आपल्याला सर्वात महत्त्वाच्या दोन आज्ञांची आठवण करून दिली. एक म्हणजे, यहोवा देवावर पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्‍तीने प्रेम करणं आणि दुसरी म्हणजे आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखं प्रेम करणं. (मार्क १२:२८-३१) आपण या लेखात शिकलो आहोत की जे लोक यहोवावर प्रेम करतात ते त्याचं अनुकरण करतात. यहोवा आणि येशू ही दोघंही उदार आहेत आणि आपण त्यांचं अनुकरण करावं असं उत्तेजन ते आपल्याला देतात. यामुळे आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ. आपण जर यहोवाने दिलेलं काम उदारपणे केलं आणि लोकांना उदारता दाखवली तर आपण यहोवाचा आदर करत असू. तसंच यामुळे आपल्याला आणि इतरांनाही फायदा होईल.

२० तुम्ही सर्व जण इतरांना, खासकरून आपल्या बंधुभगिनींना उदारता दाखवण्यात आणि मदत करण्यात खूप मेहनत घेत आहात. (गलती. ६:१०) तुम्ही अशीच मेहनत घेत राहिलात तर लोक तुमची कदर करतील आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतील. यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. बायबल म्हणतं: “उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.” (नीति. ११:२५) आपल्या जीवनात आणि सेवाकार्यात अशा बऱ्‍याच संधी असतात जिथे आपण वेगवेगळ्या मार्गांनी निःस्वार्थ वृत्ती, दयाळूपणा आणि उदारता दाखवू शकतो. यांपैकी काही मार्गांबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.

^ परि. 13 नाव बदलण्यात आलं आहे.