व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका

वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका

“वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींच्या आधारावर न्याय करण्याचं सोडून द्या, तर खरेपणाने न्याय करा.”—योहा. ७:२४.

गीत क्रमांक: ५४, ४३

१. यशयाने येशूबद्दल कोणती भविष्यवाणी केली आणि यामुळे आपल्याला आशा का मिळते?

येशू ख्रिस्ताबद्दल यशयाने जी भविष्यवाणी केली त्यामुळे आपल्याला आशा आणि प्रोत्साहन मिळतं. यशयाने सांगितलं होतं की येशू “डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करेल.” (यश. ११:३, ४) हे शब्द आपल्याला खूप प्रोत्साहन देतात कारण आज आपण अशा जगात राहात आहोत जिथे लोक भेदभाव करतात. तसंच, लोक वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवतात. आपल्या सर्वांनाच परिपूर्ण न्यायाधीश, येशू याची गरज आहे. तो कधीच बाह्‍यस्वरूप पाहून आपला न्याय करणार नाही!

२. येशूने आपल्याला कोणती ताकीद दिली आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आपण दररोज लोकांबद्दल मत बनवत असतो. पण येशूसारखं परिपूर्ण नसल्यामुळे आपलं मत नेहमीच योग्य असेल असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला जे दिसतं त्याचा प्रभाव आपल्या मतांवर होतो. असं असलं तरी येशूने आपल्याला ताकीद दिली: “वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींच्या आधारावर न्याय करण्याचं सोडून द्या, तर खरेपणाने न्याय करा.” (योहा. ७:२४) यावरून आपल्याला येशूची इच्छा काय आहे ते कळतं. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं बनावं आणि स्वरूप पाहून इतरांचा न्याय करू नये. या लेखात आपण अशा तीन गोष्टींवर चर्चा करणार आहोत ज्यांचा प्रभाव आपल्या मतांवर होतो. या गोष्टी आहेत: एका व्यक्‍तीचा देश किंवा समाज, तिच्याजवळ असलेली संपत्ती किंवा पैसा, आणि तिचं वय. यांपैकी प्रत्येक बाबतीत आपण येशूने दिलेल्या आज्ञेचं पालन कसं करू शकतो आणि इतरांचं बाह्‍यस्वरूप पाहून न्याय करण्याचं कसं टाळू शकतो हे शिकू या.

इतरांचा देश, वंश पाहून मत बनवू नका

३, ४. (क) पेत्रने विदेशांबद्दल आपलं मत का बदललं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) पेत्रला कोणती नवीन समज मिळाली?

पेत्रला जेव्हा सांगण्यात आलं की त्याने कैसरीयामध्ये कर्नेल्य नावाच्या विदेशाच्या घरी जावं, तेव्हा त्याला कसं वाटलं असेल याची कल्पना करा. (प्रे. कार्ये १०:१७-२९) पेत्रला लहानपणापासूनच शिकवण्यात आलं होतं की परराष्ट्रीय लोक अशुद्ध असतात. पण कर्नेल्यच्या घरी जाण्याची आज्ञा मिळण्याच्या थोड्या वेळाआधीच अशा काही घटना घडल्या ज्यांमुळे पेत्रचं मत बदललं. त्याला देवाकडून एक दृष्टान्त देण्यात आला. (प्रे. कार्ये १०:९-१६) या दृष्टान्तात त्याला स्वर्गातून चादरीसारखं काहीतरी खाली येताना दिसलं. त्यात अशुद्ध समजले जाणारे सर्व प्रकारचे प्राणी होते. मग त्याला एक आवाज ऐकू आला: “पेत्र, ऊठ यांना कापून खा!” पेत्रने तसं करण्यास ठामपणे नकार दिला. मग त्याला सांगण्यात आलं: “देवाने ज्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत त्यांना तू दूषित म्हणायचं सोडून दे.” दृष्टान्त पाहिल्यानंतरही पेत्रला काय सांगण्यात येत आहे हे त्याला पूर्णपणे समजलं नाही. पण त्याच वेळी कर्नेल्यने पाठवलेली काही माणसं तिथे आली. पवित्र आत्म्याने पेत्रला कर्नेल्यच्या घरी जायला प्रेरीत केलं. यामुळे पेत्र त्या लोकांसोबत कर्नेल्यच्या घरी गेला.

पेत्रने “वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींच्या आधारावर न्याय” केला असता, तर तो कर्नेल्यच्या घरी कधीच गेला नसता. यहुदी लोक कधीच विदेशी लोकांच्या घरी जात नव्हते. मग पेत्र तिथे का गेला? हे खरं आहे की पेत्रच्या मनात विदेशी लोकांबद्दल पूर्वग्रह होता. पण त्याने जो दृष्टान्त पाहिला आणि पवित्र आत्म्याने त्याला जे सांगितलं, त्यामुळे त्याचं मत बदललं. कर्नेल्यचं ऐकून घेतल्यानंतर पेत्रने म्हटलं: “आता खरोखर मला याची जाणीव झाली आहे, की देव भेदभाव करत नाही, तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.” (प्रे. कार्ये १०:३४, ३५) ही नवीन समज मिळाल्यामुळे पेत्र खूप उत्साहित होता आणि याचा परिणाम इतर ख्रिश्‍चनांवरही होणार होता. ते कशा प्रकारे?

५. (क) सर्व ख्रिश्‍चनांनी काय समजून घ्यावं अशी यहोवाची इच्छा आहे? (ख) आपल्याला सत्य माहीत असलं तरी आजही आपल्या मनात कोणत्या भावना असू शकतात?

यहोवाने पेत्रचा उपयोग करून सर्व ख्रिश्‍चनांना शिकवलं की तो भेदभाव करत नाही. यहोवा वंश, देश, जात, किंवा भाषा यांमुळे लोकांमध्ये भेदभाव करत नाही. आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की आपण जर त्याचं भय बाळगलं आणि त्याच्या नजरेत जे योग्य ते केलं, तर आपल्याला त्याची स्वीकृती मिळेल. (गलती. ३:२६-२८; प्रकटी. ७:९, १०) पण समजा तुम्ही अशा देशात किंवा कुटुंबात लहानाचे मोठे झाला आहात जिथे सहसा भेदभाव केला जायचा तेव्हा काय? तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही भेदभाव करत नाही. पण असं होऊ शकतं का, की तुमच्या मनात काही अंशी भेदभावाची भावना अजूनही घर करून आहे? देव भेदभाव करत नाही हे शिकण्यासाठी पेत्रने इतरांना मदत केली. तरीदेखील नंतर त्याने भेदभाव केला. (गलती. २:११-१४) तर मग आपण येशूची आज्ञा पाळून इतरांबद्दल मत बनवण्याचं किंवा त्यांचा न्याय करण्याचं कसं टाळू शकतो?

६. (क) आपल्या मनातून पूर्वग्रह काढून टाकण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? (ख) एका वडिलाने जो अहवाल दिला त्यातून त्याच्या मनातील कोणत्या भावना दिसून आल्या?

आपल्या मनात पूर्वग्रह आहेत का, हे ओळखण्यासाठी स्वतःचं परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. आपण देवाच्या वचनातून जे शिकतो त्यासोबत आपण आपल्या विचारांचं परीक्षण केलं पाहिजे. (स्तो. ११९:१०५) तसंच, आपण आपल्या मित्राची मदतही घेऊ शकतो. आपण त्याला विचारू शकतो की त्याने आपल्यामध्ये कधी भेदभावाची वृत्ती पाहिली आहे का, जी कदाचित आपल्या लक्षात आली नसेल. (गलती. २:११, १४) आपल्याला सामान्य वाटणाऱ्‍या भावना कदाचित भेदभावाच्या असू शकतात. एका वडिलांच्या बाबतीत हेच घडलं. पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्या एका मेहनती जोडप्याबद्दल त्यांनी शाखा कार्यालयाला एक अहवाल पाठवला. पूर्णवेळेच्या सेवेतील बांधव हा एका अशा समाजातून होता, ज्याला बरेच लोक कमी लेखायचे. या बांधवाबद्दल त्या वडिलांनी अहवालात बऱ्‍याच चांगल्या गोष्टी लिहिल्या, पण शेवटी त्यांनी म्हटलं: “हा बांधव [अमुक] देशाचा असला, तरी त्याच्या पद्धती, त्याचं राहणीमान यामुळे इतरांना एक गोष्ट समजायला मदत झाली आहे. ती म्हणजे या देशातल्या [अमुक] समाजाचे बरेच लोक गबाळे, खालच्या दर्जाची जीवनशैली ठेवणारे असले, तरी प्रत्येक व्यक्‍ती तशी नसते.” या वडिलांच्या मनात त्या समाजाबद्दल पूर्वग्रह असल्यामुळे त्यांनी असा उल्लेख केला. त्यांनी जसा विचार केला त्यातून आपण काय शिकू शकतो? यहोवाच्या संघटनेत आपल्याजवळ कितीही जबाबदाऱ्‍या असल्या, तरी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे. तसंच, आपण आपल्यामध्ये काही अंशी असलेल्या अशा चुकीच्या भावना ओळखण्यासाठी इतरांची मदतदेखील स्वीकारली पाहिजे. आपण आणखी काय करू शकतो?

७. आपण आपले “मन मोठे केले” आहे हे कसं दाखवू शकतो?

आपण आपले “मन मोठे केले” असेल, तर आपण भेदभावाची वृत्ती काढून टाकून इतरांबद्दल प्रेम उत्पन्‍न करू. (२ करिंथ. ६:११-१३) तुम्हाला सहसा तुमच्याच देशाच्या, भागाच्या किंवा भाषेच्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडतं का? असं असेल, तर इतरांसोबतही वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या बंधुभगिनींसोबत तुम्ही प्रचारकार्य करू शकता. तसंच, तुम्ही त्यांना तुमच्या घरी जेवायला बोलवू शकता. (प्रे. कार्ये १६:१४, १५) तुम्ही असं करत राहिलात तर एक वेळ अशी येईल जेव्हा तुमच्या मनातून भेदभावाची भावना पूर्णपणे निघून गेलेली असेल. आता आपण आणखी एक क्षेत्र पाहू ज्यात आपण “वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींच्या आधारावर न्याय” करण्याची चूक करू शकतो.

पैसा किंवा संपत्ती पाहून मत बनवू नका

८. पैसा किंवा संपत्ती पाहून मत बनवण्याच्या बाबतीत आपण लेवीय १९:१५ मधून काय शिकतो?

आपल्या बंधुभगिनींच्या श्रीमंती किंवा गरिबीवरून कदाचित आपण त्यांच्याबद्दल मत बनवू शकतो. लेवीय १९:१५ मध्ये सांगितलं आहे: “न्यायनिवाडा करताना अन्याय करू नको; गरिबाच्या गरिबीकडे पाहू नको आणि समर्थापुढे [श्रीमंतापुढे] नमू नको; तर आपल्या शेजाऱ्‍याचा न्याय निस्पृहपणे [न्यायीपणे] कर.” एखाद्याकडे किती पैसा आहे हे पाहून नकळतपणे त्यांच्याबद्दल मत बनवण्याची चूक आपल्याकडून कशी घडू शकते?

९. शलमोनने कोणतं कटू सत्य सांगितलं आणि त्यातून आपण काय शिकतो?

शलमोनला एका कटू सत्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्याने म्हटलं: “गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.” (नीति. १४:२०) यातून आपल्याला काय कळतं? आपण सावध नसलो, तर आपण फक्‍त श्रीमंत बांधवांसोबतच मैत्री करण्याची चूक करू शकतो. इतरांकडे किती संपत्ती आहे या आधारावर त्यांच्याबद्दल मत बनवणं घातक का ठरू शकतं?

१०. याकोबने ख्रिश्‍चनांना कोणत्या समस्येबद्दल सावध केलं?

१० आपले बांधव श्रीमंत आहेत की गरीब या आधारावर आपण त्यांच्याबद्दल मत बनवलं तर यामुळे मंडळीत फूट पडू शकते. पहिल्या शतकातील काही मंडळ्यांमध्ये हेच घडलं. त्यामुळे याकोबने मंडळ्यांना याबद्दल सतर्क केलं. (याकोब २:१-४ वाचा.) मंडळीमध्ये अशा प्रकारची फूट निर्माण होऊ नये यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजेत. मग इतरांकडे ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या आधारावर त्यांच्याबद्दल मत बनवण्याचं आपण कसं टाळू शकतो?

११. एका व्यक्‍तीच्या यहोवासोबतच्या नातेसंबंधावर त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीचा काही प्रभाव पडतो का? स्पष्ट करा.

११ आपल्या बंधुभगिनींप्रती यहोवाचा जो दृष्टिकोन आहे तोच दृष्टिकोन आपलाही असला पाहिजे. एक व्यक्‍ती श्रीमंत असल्यामुळे ती यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान ठरते असं नाही. यहोवासोबतचं आपलं नातं आपल्याजवळ किती पैसा किंवा संपत्ती आहे त्यावर आधारलेलं नाही. हे खरं आहे की येशूने म्हटलं होतं: “श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं कठीण जाईल.” पण येशूने असं कधीच म्हटलं नाही की त्या माणसाला ते अशक्य असेल. (मत्त. १९:२३) येशूने हेदेखील म्हटलं: “तुम्ही जे गरीब आहात, ते तुम्ही सुखी! कारण देवाचं राज्य तुमचं आहे.” (लूक ६:२०) पण याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक गरीब व्यक्‍ती येशूचं ऐकेलच आणि तिला खास आशीर्वाद मिळतीलच. येशूच्या काळातील बऱ्‍याच गरीब लोकांनी त्याचं ऐकलं नाही. सत्य हेच आहे की एका व्यक्‍तीजवळ असलेल्या संपत्तीवरून तिचं यहोवासोबतचं नातं किती घनिष्ठ आहे, हे आपण ठरवू शकत नाही.

१२. बायबल श्रीमंत आणि गरीब दोघांनाही काय शिकवतं?

१२ यहोवाच्या संघटनेत श्रीमंत बंधुभगिनीही आहेत आणि गरीबही. पण हे सर्व यहोवावर मनापासून प्रेम करतात आणि त्याची पूर्ण मनाने सेवा करतात. बायबल श्रीमंत लोकांना सांगतं की त्यांनी “नाशवंत धनावर नाही, तर . . . देवावर आशा ठेवावी.” (१ तीमथ्य ६:१७-१९ वाचा.) देवाच्या वचनात सर्वांनाच, मग आपण श्रीमंत असो किंवा गरीब, अशीही ताकीद देण्यात आली आहे की पैशावर प्रेम केल्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतात. (१ तीम. ६:९, १०) आपण जर आपल्या बंधुभगिनींबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन बाळगला, तर आपण कधीच त्यांची संपत्ती पाहून त्यांच्याबद्दल मत बनवणार नाही. पण एखाद्याचं वय पाहून त्याच्याबद्दल मत बनवणं योग्य आहे का?

वय पाहून मत बनवू नका

१३. वृद्ध लोकांना आदर दाखवण्याच्या बाबतीत बायबल आपल्याला काय सांगतं?

१३ बायबल आपल्याला शिकवतं की आपण वृद्ध लोकांचा आदर केला पाहिजे. लेवीय १९:३२ म्हणतं: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृध्दाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग.” नीतिसूत्रे १६:३१ आपल्याला सांगतं: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” पौलने तीमथ्यला सांगितलं की त्याने कधीच वयस्कर बांधवांची टीका करू नये. याउलट त्याने नेहमी त्यांना वडिलांसारखा आदर द्यावा. (१ तीम. ५:१, २) तीमथ्यला वृद्ध बांधवांवर काही प्रमाणात अधिकार असला, तरी त्याला त्यांच्यासोबत वागताना नेहमी दया आणि आदर दाखवणं गरजेचं होतं.

१४. कोणत्या परिस्थितीत आपल्याला एखाद्या वृद्ध बांधवाला सल्ला देण्याची गरज पडू शकते?

१४ पण एखाद्या वृद्ध बांधवाने जाणूनबुजून चूक केली किंवा यहोवाला पसंत नसलेली गोष्ट करण्यासाठी इतरांना प्रवृत्त केलं तेव्हा काय? जाणूनबुजून पाप करणारी व्यक्‍ती कधीच यहोवाच्या नजरेतून सुटत नाही, मग ती वृद्ध आणि इतरांच्या नजरेत खूप आदरणीय असली तरीही. यशया ६५:२० (ईझी-टू-रीड व्हर्शन) मध्ये एक तत्त्व दिलं आहे: “पापी माणूस जरी शंभर वर्षे जगला तरी त्याच्यावर खूप संकटे येतील.” यहेज्केलच्या दृष्टान्तातही आपल्याला यासारखंच एक तत्त्व सापडतं. (यहे. ९:५-७) सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपण अगणित वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या यहोवा देवाचा आदर केला पाहिजे. (दानी. ७:९, १०, १३, १४) यहोवाबद्दल असलेल्या आदरामुळे आपल्याला एखाद्या वृद्ध बांधवाची चूक सुधारण्यासाठी लागणारं धैर्य मिळेल.—गलती. ६:१.

तुम्ही तरुण बांधवांना आदर देता का? (परिच्छेद १५ पाहा)

१५. तरुण बांधवांना आदर दाखवण्याच्या बाबतीत आपण पौलकडून काय शिकतो?

१५ तरुण बांधवांबद्दल काय? त्यांचं वय कमी आहे म्हणून त्यांना आदर देण्याची गरज नाही असा विचार करणं योग्य आहे का? मुळीच नाही. पौलने तीमथ्यला असं म्हटलं: “तुझ्या तरुण वयामुळे कोणीही तुला तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे. त्याऐवजी, बोलण्यात व वागण्यात, तसेच प्रेम, विश्‍वास व शुद्धता या बाबतींत विश्‍वासू जनांसाठी एक चांगले उदाहरण हो.” (१ तीम. ४:१२) पौलने तीमथ्यला हे शब्द लिहिले तेव्हा तीमथ्यचं वय ३० च्या जवळपास होतं. असं असलं तरी पौलने त्याच्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्‍या सोपवल्या होत्या. यावरून आपण काय शिकतो? आपण बांधवांचं वय पाहून त्यांच्याबद्दल मत बनवू नये. ३३ वर्षांचा होईपर्यंत येशूने सेवेत किती काही केलं होतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे!

१६, १७. (क) एक बांधव सहायक सेवक किंवा वडील बनण्यास पात्र आहे हे वडिलांनी कशाच्या आधारावर ठरवलं पाहिजे? (ख) वैयक्‍तिक मत किंवा स्थानिक संस्कृती बायबल तत्त्वांच्या विरोधात कसे असू शकतात?

१६ काही संस्कृतींमध्ये तरुणांना सहसा आदर दिला जात नाही. या प्रभावामुळे काही मंडळ्यांमध्ये वडील तरुणांची सहायक सेवक किंवा वडील बनण्यासाठी शिफारस करत नाही. मग ते तरुण त्यासाठी लागणाऱ्‍या योग्यता पूर्ण करत असले तरीही. पण एखाद्या बांधवाचं अमुक वय झाल्यानंतरच त्याला सहायक सेवक किंवा वडील म्हणून नियुक्‍त केलं जावं असं बायबल कुठेही सांगत नाही. (१ तीम. ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९) जर एखाद्या वडिलाने तिथल्या संस्कृतीमुळे वयाच्या बाबतीत नियम बनवला, तर मग तो बायबलचं पालन करत नाही असा याचा अर्थ होईल. वडिलांनी आपल्या स्वतःच्या मतांनुसार किंवा स्थानिक संस्कृतीनुसार तरुण बांधवांबद्दल मत बनवू नये. तर त्यांनी देवाच्या वचनाच्या आधारावर त्यांची पारख करावी.—२ तीम. ३:१६, १७.

१७ वडिलांनी बायबलमध्ये दिलेल्या पद्धतीनुसारच विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी असं केलं नाही तर जबाबदारीसाठी पात्र असलेल्या बांधवांना सहायक सेवक किंवा वडील बनण्यापासून रोखण्याची चूक ते करत असतील. एका देशातील मंडळीमध्ये एक सहायक सेवक चांगल्या प्रकारे आपल्या जबाबदाऱ्‍या हाताळत होता. सर्व वडिलांनी हे मान्य केलं की हा बांधव बायबलमध्ये वडील बनण्यासाठी दिलेल्या पात्रताही पूर्ण करत आहे. पण काही वयस्कर वडिलांना वाटलं की तो खूप लहान दिसतो. म्हणून त्यांनी मंडळीमध्ये वडील बनण्यासाठी त्याची शिफारस केली नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे फक्‍त त्याच्या स्वरूपामुळे त्याला नेमण्यात आलं नाही. अशी वृत्ती बऱ्‍याच देशांमध्ये सामान्य असल्याचं दिसून आलं आहे. आपण आपल्या मतांवर किंवा स्थानिक संस्कृतीवर नाही, तर बायबलवर अवलंबून राहणं खूप गरजेचं आहे. असं केल्याने आपण स्वरूप पाहून त्यांच्याबद्दल मत बनवण्याचं टाळू आणि येशूने दिलेल्या आज्ञेचं पालन करू.

“खरेपणाने न्याय करा”

१८, १९. बांधवांबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन बाळगायला आपल्याला कशामुळे मदत होईल?

१८ आपण अपरिपूर्ण असलो, तरी मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता इतरांबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन बाळगू शकतो. (प्रे. कार्ये १०:३४, ३५) आपण नेहमी देवाच्या वचनात दिलेल्या सल्ल्यांवर मनन केलं पाहिजे. आपण ते सल्ले लागू केले तर “वरवर दिसणाऱ्‍या गोष्टींच्या आधारावर न्याय करण्याचं सोडून द्या,” या येशूच्या आज्ञेचं आपण पालन करत असू.—योहा. ७:२४.

१९ लवकरच आपला राजा येशू ख्रिस्त सर्वांचा न्याय करेल. तो पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींवर नाही, तर यहोवाच्या नीतिमान स्तरांच्या आधारावर न्याय करेल. (यश. ११:३, ४) त्या काळाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत!