व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या गोष्टींचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल

या गोष्टींचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल

“ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेनुसार करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं हेच माझं अन्‍न आहे.”—योहा. ४:३४.

गीत क्रमांक: १, ४२

१. जगातल्या स्वार्थी मनोवृत्तीचा आपल्या नम्रतेवर कसा परिणाम होऊ शकतो?

देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करणं आपल्याला कठीण का वाटतं? त्याचं एक कारण म्हणजे, योग्य गोष्टी करण्यासाठी आपल्याला नम्र बनण्याची गरज असते. या “शेवटच्या दिवसांत” नम्र राहणं कठीण आहे कारण अनेक लोक “केवळ स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ” आणि “संयम नसलेले” आहेत. (२ तीम. ३:१-३) आपण देवाचे सेवक आहोत. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारची वागणूक चुकीची आहे. पण आपल्याला वाटू शकतं, की अशा प्रकारे वागणारे लोक यशस्वी आहेत आणि ते आपल्या जीवनात खरोखर आनंदी आहेत. (स्तो. ३७:१; ७३:३) आपल्याला कदाचित असंही वाटेल: ‘स्वतःचा विचार करण्याआधी इतरांबद्दल विचार करण्याचा काही फायदा आहे का? “मी स्वतःला इतरांपेक्षा लहान समजून” वागलो तरीही लोक माझा आदर करतील का?’ (लूक ९:४८) जर आपण जगातल्या स्वार्थी मनोवृत्तीला आपल्यावर हावी होऊ दिलं, तर आपल्या बांधवांसोबत असलेल्या चांगल्या नातेसंबंधावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसंच, इतरांना आपण ख्रिस्ती आहोत अशी ओळख पटायलाही कठीण जाऊ शकतं. पण आपण जेव्हा देवाच्या नम्र सेवकांच्या उदाहरणांचा अभ्यास करून त्यांचं अनुकरण करतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम होतात.

२. प्राचीन काळातल्या देवाच्या विश्‍वासू सेवकांकडून आपण काय शिकू शकतो?

प्राचीन काळातल्या देवाच्या विश्‍वासू सेवकांना त्याच्याशी मैत्री करण्यासाठी कशामुळे मदत झाली? त्यांनी देवाचं मन कसं आनंदित केलं? योग्य ते करण्यासाठी त्यांना कुठून ताकद मिळाली? बायबलमधून त्यांच्याबद्दल वाचल्यामुळे आणि त्यावर मनन केल्यामुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल. तसंच, आपला विश्‍वासही मजबूत होईल.

विश्‍वास मजबूत करण्यासाठी आध्यात्मिक प्रबंध

३, ४. (क) यहोवा आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी शिकवतो? (ख) आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी फक्‍त ज्ञान असणंच पुरेसं का नाही?

आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी लागणाऱ्‍या गोष्टी यहोवा पुरवतो. आपल्याला बायबल, बायबल आधारित साहित्यं, jw.org वेबसाईट, JW ब्रॉडकास्टिंग, सभा आणि संमेलन यांद्वारे चांगले सल्ले व प्रशिक्षण मिळतं. पण येशूने सांगितलं की फक्‍त ज्ञान असणंच पुरेसं नाही. त्याने म्हटलं: “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेनुसार करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं हेच माझं अन्‍न आहे.”—योहा. ४:३४.

देवाची इच्छा पूर्ण करणं हे येशूसाठी अन्‍नासारखं होतं. ज्या प्रकारे, पौष्टिक अन्‍न सेवन केल्यामुळे आपण मानसिक आणि शारीरिक रीत्या सुदृढ राहतो, त्याच प्रकारे देवाची इच्छा पूर्ण केल्याने आपल्याला बरं वाटतं आणि आपला विश्‍वास मजबूत होतो. उदाहरणार्थ, क्षेत्रसेवेच्या सभेला जाण्याआधी तुम्हाला कधी थकवा जाणवला का? पण मग सेवाकार्य करून घरी परतल्यावर तुम्हाला कसं वाटलं होतं? तुम्हाला आनंदी आणि ताजंतवानं झाल्याचा अनुभव नक्की आला असेल.

५. सुज्ञ बनल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?

आपण जेव्हा यहोवाच्या म्हणण्यानुसार वागतो तेव्हा आपण सुज्ञ बनतो. (स्तो. १०७:४२ख) जे सुज्ञपणे वागतात त्यांना बरेच फायदे होतात. “ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही. . . . ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.” (नीति. ३:१३-१८, ईझी-टू-रीड व्हर्शन) येशूने म्हटलं: “तुम्हाला जर या गोष्टी कळत असतील, तर त्यांचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल.” (योहा. १३:१७) येशूच्या म्हणण्यानुसार जर शिष्य त्याच्या आज्ञांचं पालन करत राहिले असते तर ते आनंदी राहिले असते. येशूच्या शिष्यांनी तसं केलंही. ते त्याच्या उदाहरणानुसार आणि शिकवणींनुसार जीवन जगले.

६. शिकलेल्या गोष्टी लागू करत राहणं का गरजेचं आहे?

आज आपल्यालाही शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करत राहणं गरजेचं आहे. हे समजण्यासाठी एका मेकॅनिकचा विचार करा. त्याच्याकडे साधनं आणि ज्ञान असतं. जर त्याने त्यांचा उपयोग केला तरच तो एक चांगला मेकॅनिक बनू शकतो. त्याला कदाचित बऱ्‍याच वर्षांचा अनुभव असेल, पण आपलं काम चांगल्या प्रकारे करत राहण्यासाठी त्याने शिकलेल्या गोष्टी सतत उपयोगात आणणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे, जेव्हा आपल्याला सत्य माहीत झालं तेव्हा बायबलमधून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू केल्यामुळे आपल्याला आनंद झाला. पण जर आपल्याला तो आनंद टिकवून ठेवायचा असेल तर यहोवा शिकवत असलेल्या गोष्टी दररोज लागू करत राहणं गरजेचं आहे.

७. बायबलमध्ये दिलेल्या उदाहरणांवरून शिकण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे?

आपल्या जीवनात कधीकधी अशा परिस्थिती उद्‌भवतात ज्यांत आपल्याला नम्र राहणं कठीण जाऊ शकतं. या लेखात आपण शिकणार आहोत की प्राचीन काळातले विश्‍वासू सेवक नम्र कसे बनून राहिले. तसंच, आपण कोणत्या काही मार्गांनी नम्रता दाखवू शकतो हेही आपण पाहणार आहोत. पण आपण ही माहिती फक्‍त वाचून काढणं पुरेसं नाही. आपण त्यावर मनन करणं आणि ती आपल्या जीवनात लागू करणंही गरजेचं आहे.

इतरांना समान लेखा

८, ९. प्रेषितांची कार्ये १४:८-१५ या वचनांतून आपण पौलच्या नम्रतेबद्दल काय शिकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

देवाची इच्छा आहे की “सर्व प्रकारच्या लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे अचूक ज्ञान मिळावे.” (१ तीम. २:४) ज्यांना सत्य माहीत नाही अशांबद्दल आपण काय विचार करतो? प्रेषित पौलने अशा यहुदी लोकांना प्रचार केला ज्यांना यहोवाबद्दल माहीत होतं. पण त्याने अशा लोकांनाही संदेश सांगितला जे खोट्या दैवतांची उपासना करायचे. पण यामुळे पौलच्या नम्रतेची परीक्षा होणार होती. ती कशी?

पौलच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान तो आणि बर्णबा लुस्त्र शहरात गेले. तिथल्या स्थानिक लोकांनी पौल आणि बर्णबा यांना खूप विशेष वागणूक दिली. त्यांनी या दोघांना त्यांच्या खोट्या दैवतांच्या म्हणजे, झ्यूस आणि हर्मेस या नावांनी संबोधलं. पण यामुळे पौल आणि बर्णबा यांना आपण सर्वांपेक्षा खूप श्रेष्ठ आहोत असं वाटलं का? इथे येण्याआधी इतर दोन शहरांत त्यांचा छळ झाला, त्याच्या तुलनेत या शहरात मिळालेली वागणूक त्यांना आवडली का? इतकी लोकप्रियता मिळाल्यामुळे अनेक जण आनंदाचा संदेश ऐकतील असा त्यांनी विचार केला का? नाही. याउलट, त्यांना हे सर्व मुळीच आवडलं नाही. ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “लोकांनो, तुम्ही हे सर्व का करत आहात? आम्हीही तुमच्यासारख्याच दुर्बलता असलेली माणसं आहोत.”—प्रे. कार्ये १४:८-१५.

१०. लुस्त्रमध्ये राहणाऱ्‍यांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असं पौल आणि बर्णबा यांनी विचार का केला नाही?

१० आम्हीही तुमच्यासारखीच माणसं आहोत असं जेव्हा पौल आणि बर्णबा यांनी म्हटलं, तेव्हा ते अपरिपूर्ण आहेत असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. त्यांची आणि लुस्त्रमधल्या लोकांची उपासना करण्याची पद्धत सारखी आहे, असं त्यांना मुळीच म्हणायचं नव्हतं. देवाने पौल आणि बर्णबा यांना मिशनरी म्हणून पाठवलं होतं. (प्रे. कार्ये १३:२) त्यांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त करण्यात आलं होतं आणि त्यांच्याजवळ एक सुंदर आशा होती. पण यामुळे त्यांनी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं चुकीचं ठरलं असतं. त्यांना जाणीव होती की जर लुस्त्रमध्ये राहणाऱ्‍या लोकांनी आनंदाचा संदेश स्वीकारला तर त्यांनाही स्वर्गीय जीवनाची आशा मिळू शकते.

११. प्रचार करताना आपण पौलसारखी नम्रता कशी दाखवू शकतो?

११ आपण नम्र आहोत हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे पौलसारखं नेहमी नम्र बनून राहणं. यहोवा त्याची सेवा करण्यासाठी पुरवत असलेल्या मदतीमुळे आपण स्वतःला श्रेष्ठ समजू नये. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘माझ्या प्रचाराच्या क्षेत्रात असलेल्या लोकांबद्दल मला काय वाटतं? समाजातल्या काही विशिष्ट लोकांबद्दल माझ्या मनात भेदभावाची भावना आहे का?’ जगभरात यहोवाचे साक्षीदार भेदभाव न करता, जो कोणी आनंदाच्या संदेशाबद्दल आस्था दाखवतो त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. काही साक्षीदार, अशा लोकांची भाषा किंवा त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धती शिकण्याचाही प्रयत्न करतात ज्यांना समाजात कमी लेखलं जातं. पण ते कधीच असा विचार करत नाही की आपण ज्यांना प्रचार करत आहोत त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. याउलट, जास्तीत जास्त लोकांना राज्याचा संदेश स्वीकारण्यासाठी मदत व्हावी म्हणून ते प्रत्येक व्यक्‍तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

इतरांचं नाव घेऊन प्रार्थना करा

१२. एपफ्रासने कसं दाखवलं की त्याला खरंच इतरांची काळजी होती?

१२ आपण नम्र आहोत हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे अशा बंधुभगिनींसाठी प्रार्थना करणं ज्यांनी आपल्यासारखा “मौल्यवान विश्‍वास प्राप्त केला आहे.” (२ पेत्र १:१) हीच गोष्ट एपफ्रास यानेदेखील केली. बायबलमध्ये त्याचा उल्लेख फक्‍त तीन वेळा आढळतो. रोममध्ये एका घरात कैदेत असताना कलस्सैमधल्या ख्रिश्‍चनांना पौलने एपफ्रासबद्दल लिहिलं: “तो नेहमी तुमच्यासाठी जीव तोडून प्रार्थना करत असतो.” (कलस्सै. ४:१२) एपफ्रास बांधवांना जवळून ओळखायचा आणि त्याला त्यांची खूप काळजी होती. पौलने त्याला “माझा सोबतीचा कैदी” असं म्हटलं. याचा अर्थ एपफ्रासच्या जीवनातही काही समस्या होत्या. (फिले. २३) पण अशा परिस्थितीतही एपफ्रासने इतरांचा विचार केला आणि मग त्यांना मदत करण्याचाही प्रयत्न केला. एपफ्रासने आपल्या बंधुभगिनींचं नाव घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आपणही तसंच करू शकतो. आणि अशा प्रार्थना खूप परिणामकारक असतात.—२ करिंथ. १:११; याको. ५:१६.

१३. आपण प्रार्थना करण्याच्या बाबतीत एपफ्रासचं अनुकरण कसं करू शकतो?

१३ तुम्ही एखाद्याचं वैयक्‍तिक नाव घेऊन प्रार्थना करू शकता का? समस्यांचा सामना करावा लागत असणाऱ्‍या तुमच्या मंडळीतल्या मित्रांसाठी किंवा कुटुंबांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. त्यांना कदाचित एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल किंवा एखाद्या मोहाचा सामना करावा लागत असेल. तुम्ही तुरुंगात असलेल्या अशा बंधुभगिनींसाठीही प्रार्थना करू शकता. त्यांची नावं आपल्याला “जेहोवाज विटनेसेस इमप्रिसन्ड फॉर देअर फेथ” या jw.org वरील लेखात दिली आहेत. (NEWSROOM > LEGAL DEVELOPMENTS इथे पाहा.) यासोबतच आपण इतर जणांसाठीही प्रार्थना करू शकतो. जसं की, आपल्या प्रियजनांना मृत्यूत गमावलेल्यांसाठी, युद्धातून किंवा नैसर्गिक विपत्तीतून बचाव झालेल्यांसाठी आणि आर्थिक समस्येचा सामना करणाऱ्‍यांसाठी. जगभरात असे बरेच बंधुभगिनी आहेत ज्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. आपण जेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण दाखवून देतो, की आपण फक्‍त स्वतःच्याच नाही तर इतरांच्या गरजांचाही विचार करत आहोत. (फिलिप्पै. २:४) यहोवा अशा प्रार्थना ऐकतो याची आपण खातरी बाळगू शकतो.

“ऐकण्यास उत्सुक”

१४. ऐकण्याच्या बाबतीत यहोवा सर्वोत्तम उदाहरण का आहे?

१४ आपण नम्र आहोत हे दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे इतरांचं लक्षपूर्वक ऐकणं. याकोब १:१९ मध्ये म्हटलं आहे, की आपण “ऐकण्यास उत्सुक” असलं पाहिजे. याबाबतीत यहोवा एक सर्वोत्तम उदाहरण आहे. (उत्प. १८:३२; यहो. १०:१४) हे आपल्याला निर्गम ३२:११-१४ मध्ये दिलेल्या संवादावरून कळतं. (वाचा.) यहोवाला मोशेचं सर्वकाही ऐकून घेण्याची गरज नव्हती तरी त्याने मोशेला आपल्या भावना व्यक्‍त करण्याची संधी दिली. तुम्ही कधी अशा व्यक्‍तीचं लक्षपूर्वक ऐकाल का, जिच्या हातून चूक झाली आहे? आणि मग तिने दिलेले सल्ले तुम्ही लागू कराल का? आपण कदाचित असं करणार नाही. पण विश्‍वासाने प्रार्थना करणाऱ्‍या सर्वांचं यहोवा धीराने ऐकतो!

१५. इतरांना आदर देण्याबाबतीत आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?

१५ स्वतःला विचारा: ‘यहोवाने अब्राहाम, राहेल, मोशे, यहोशवा, मानोहा, एलीया आणि हिज्कीया यांचं ऐकलं. जर तो इतका नम्र होऊन लोकांचं ऐकतो, तर मीही तसं करण्याचा प्रयत्न करू नये का? शक्य असेल तेव्हा बांधवांनी दिलेले सल्ले ऐकण्याद्वारे आणि ते लागू करण्याद्वारे मी त्यांना आणखी आदर देऊ शकतो का? माझ्या मंडळीत किंवा कुटुंबात कोणी अशी व्यक्‍ती आहे का, जिला माझ्या मदतीची गरज आहे? तिला मदत करण्यासाठी मी काय करू शकतो?’—उत्प. ३०:६; शास्ते १३:९; १ राजे १७:२२; २ इति. ३०:२०.

माझ्यावर होत असलेला अन्याय कदाचित यहोवा पाहील

दावीद म्हणाला: ‘जाऊ द्या त्याला!’ तुम्ही काय केलं असतं? (परिच्छेद १६, १७ पाहा)

१६. शिमीने जेव्हा दावीदला गैरवागणूक दिली तेव्हा दावीदने काय केलं?

१६ आपल्याला गैरवागणूक दिली जाते तेव्हा नम्रतेमुळे आपल्याला संयम बाळगायला मदत होते. (इफिस. ४:२) याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला २ शमुवेल १६:५-१३ या वचनांत वाचायला मिळतं. (वाचा.) शिमी हा शौल राजाचा नातेवाईक होता. त्याने दावीद आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक केली आणि त्यांचा अपमान केला. दावीद त्याला थांबवू शकला असता. पण त्याने धीर धरला आणि शिमीने केलेला अपमान सहन केला. अशा प्रकारचा संयम बाळगायला दावीदला कशामुळे मदत झाली? हे जाणून घेण्यासाठी आपण तिसऱ्‍या स्तोत्राचं परीक्षण करू या.

१७. दावीदला संयम बाळगायला कशामुळे मदत मिळाली आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो?

१७ दावीदचा मुलगा अबशालोम जेव्हा त्याच्या जीवावर उठला होता तेव्हा दावीदने तिसरे स्तोत्र रचले. या काळातच शिमीने दावीदवर हल्ला केला. पण अशा वेळी शांत राहण्यासाठी दावीदला कशामुळे मदत मिळाली? स्तोत्र ३:४ मध्ये दावीद म्हणतो: “मी मोठ्याने परमेश्‍वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो.” आपल्याला जेव्हा गैरवागणूक दिली जाते तेव्हा आपणही दावीदसारखं यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. असं केल्यामुळे यहोवा आपल्याला धीर धरण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा देईल. जेव्हा तुम्हाला कोणी वाईट वागणूक देतं तेव्हा तुम्ही संयम आणि क्षमाशील वृत्ती दाखवू शकता का? तुम्हाला होत असलेला त्रास यहोवा जाणतो आणि तो तुम्हाला मदत करेल व आशीर्वाद देईल असा तुम्हाला भरवसा आहे का?

बुद्धी सर्वात महत्त्वाची आहे

१८. यहोवा देत असलेल्या निर्देशनांचं पालन केल्याने आपल्याला कसा फायदा होईल?

१८ आपण यहोवाच्या नजरेत योग्य असलेल्या गोष्टी करू तेव्हा आपण सुज्ञ बनू. आणि यासाठी तो आपल्याला आशीर्वाद देईल. नीतिसूत्रे ४:७ मध्ये म्हटलं आहे की, “ज्ञान [“बुद्धी,” NW] ही श्रेष्ठ चीज आहे.” हे खरं आहे, की बुद्धी ज्ञानावर आधारित असते, तरी यात माहिती समजून घेण्यासोबत बरंचकाही गोवलेलं आहे. आपण जे निर्णय घेतो त्यात बुद्धीचा समावेश होतो. मुंग्यांमध्येही बुद्धी असते. ते हिवाळ्यासाठी अन्‍न गोळा करून ठेवतात. (नीति. ३०:२४, २५) “बुद्धीचा पुरावा” असणारा ख्रिस्त नेहमी यहोवाचं मन आनंदित करतो. (१ करिंथ. १:२४; योहा. ८:२९) जर आपणही नम्र राहिलो आणि सुज्ञपणे योग्य त्या गोष्टी करण्याची निवड केली तर देव आपल्याला आशीर्वाद देईल. (मत्तय ७:२१-२३ वाचा.) त्यामुळे मंडळीत असं वातावरण असू द्या जिथे सर्व यहोवाची सेवा नम्रपणे करू शकतील. योग्य ते करण्यासाठी वेळ आणि धीर लागतो खरा, पण असं केल्याने आपण नम्र आहोत हे दिसून येईल. तसंच, नम्र राहिल्यामुळे आपण आज आणि सर्वकाळासाठी आनंदी राहू!