व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्य शिकवा

सत्य शिकवा

“हे परमेश्‍वरा, . . . तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे.”​—स्तो. ११९:१५९, १६०.

गीत क्रमांक: ३४, ४५

१, २. (क) येशूच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं काम कोणतं होतं आणि का? (ख) “देवाचे सहकारी” या नात्याने यशस्वी होण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे?

येशू ख्रिस्त सुतारकाम करणारा होता आणि नंतर तो एक शिक्षक बनला. (मार्क ६:३; योहा. १३:१३) त्याने ही दोन्ही कामं खूप कुशलतेने केली. सुतार म्हणून काम करत असताना त्याने साधनांचा चांगला उपयोग करून लाकडाच्या वस्तू बनवल्या. आणि एक शिक्षक म्हणून त्याने त्याच्याजवळ वचनांचं जे सखोल ज्ञान होतं त्याचा उपयोग सामान्य लोकांना देवाच्या वचनातलं सत्य समजवण्यासाठी केला. (मत्त. ७:२८; लूक २४:३२, ४५) येशूने ३० वर्षांचा असताना सुतारकाम सोडलं आणि तो एक शिक्षक बनला. त्याला जाणीव होती की त्याच्यासाठी हेच सर्वात महत्त्वाचं काम आहे. देवाच्या राज्याबद्दल प्रचार करणं हे त्याचं पृथ्वीवर येण्यामागचं एक कारण होतं असं येशूने सांगितलं. (मत्त. २०:२८; लूक ३:२३; ४:४३) येशूने आपल्या जीवनात आनंदाची बातमी सांगण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि इतरांनीदेखील ते करावं अशी त्याची अपेक्षा होती.​—मत्त. ९:३५-३८.

आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना सुतारकाम येत नाही, पण आपण सर्वच जण शिक्षक आहोत आणि देवाच्या राज्याबद्दल इतरांना शिकवतो. हे कार्य इतकं महत्त्वाचं आहे की देव स्वतः या कामात सामील आहे. म्हणूनच आपल्याला “देवाचे सहकारी” असं म्हटलं जातं. (१ करिंथ. ३:९; २ करिंथ. ६:४) आपल्या सर्वांच्या भावनाही स्तोत्रकर्त्यासारख्याच आहेत. त्याने म्हटलं: “तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे.” (स्तो. ११९:१५९, १६०) यहोवाचं वचन सत्य आहे. यामुळे आपल्याला याची खात्री करणं गरजेचं आहे की आपण सेवाकार्यात “वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग” करत आहोत की नाही. (२ तीमथ्य २:१५ वाचा.) म्हणून आपण बायबलचा आणखी कुशलतेने वापर करण्याचं शिकत राहतो. बायबल हे यहोवा, येशू आणि देवाचं राज्य यांबद्दल इतरांना शिकवण्याचं मुख्य साधन आहे. प्रचार कार्यात यशस्वी होण्यासाठी यहोवाच्या संघटनेने आपल्याला इतर अनेक साधनं दिली आहेत. ती म्हणजे आपली शिकवण्याची साधनं. त्यांचा चांगला वापर कसा करता येईल हे आपण शिकणं गरजेचं आहे.

३. आपण सेवाकार्यात कशावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि असं करायला प्रेषितांची कार्ये १३:४८ कशी आपली मदत करतं?

तुम्ही कदाचित असा विचार कराल की याला प्रचाराची साधनं न म्हणता शिकवण्याची साधनं का म्हणतात? कारण ‘प्रचार करणं’ म्हणजे संदेशाची घोषणा करणं. पण ‘शिकवणं’ म्हणजे संदेशाला अशा प्रकारे समजावून सांगणं ज्यामुळे समोरचा व्यक्‍ती तो संदेश समजून त्यानुसार कार्य करण्यासाठी प्रेरित होईल. या व्यवस्थेत आपल्याकडे फार थोडा काळ उरला आहे. त्यामुळे आपण बायबल अभ्यास सुरू करण्यावर आणि लोकांना सत्य शिकवण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यामुळे ते ख्रिस्ताचे शिष्य बनू शकतील. यासाठी आपण “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना आवेशाने शोधलं पाहिजे आणि त्यांना यहोवाचे सेवक बनण्यासाठी मदत केली पाहिजे.​—प्रेषितांची कार्ये १३:४४-४८ वाचा.

४. “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना आपण कसं शोधू शकतो?

“सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” लोकांना आपण कसं शोधू शकतो? पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांजवळ अशा लोकांना शोधण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे प्रचार करणं. येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं: “कोणत्याही शहरात किंवा गावात गेल्यावर तिथे कोण योग्य आहे हे शोधून काढा.” (मत्त. १०:११) आज आपल्यालाही तेच करणं गरजेचं आहे. पण जर लोक अप्रामाणिक, गर्विष्ठ किंवा देवाबद्दल कदर बाळगणारे नसले, तर अशा लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा ही अपेक्षा आपण करू नये. आपण प्रचारात अशा लोकांना शोधत आहोत जे प्रामाणिक, नम्र आणि सत्य जाणून घेण्याची इच्छा बाळगणारे आहेत. आपण आज अशा लोकांना शोधण्याचं जे काम करत आहोत त्याची तुलना आपण येशूच्या सुतारकामाशी करू शकतो. लाकडापासून एखादं दार, शेतीसाठी जू किंवा इतर काही वस्तू बनवण्याआधी येशूला योग्य प्रकारचं लाकूड शोधणं गरजेचं होतं. त्यानंतर तो साधनांचा आणि त्याच्या कौशल्याचा उपयोग करून ती वस्तू बनवू शकत होता. त्याच प्रकारे, आज आपल्याला आधी प्रामाणिक मनाच्या लोकांना शोधावं लागेल. मग आपण आपल्याजवळ असलेली साधनं आणि कौशल्य यांचा उपयोग करून त्या लोकांना शिष्य बनण्यासाठी मदत करू शकतो.​—मत्त. २८:१९, २०.

५. आपल्या शिकवण्याच्या साधनांमध्ये असलेल्या साधनांबद्दल आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा. (लेखाच्या सुरुवातीला दिलेली चित्रं पाहा.)

सुतारकाम करताना प्रत्येक साधन एका विशिष्ट कामासाठी वापरलं जातं. उदाहरणार्थ, येशूला सुतारकाम करताना लाकडाचं मोजमाप घेणं, त्यावर खूण करणं, ते कापणं, त्यात छिद्र करणं, त्याला आकार देणं, त्याच्या तुकड्यांना समतल करणं आणि एकत्र जोडणं या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळी साधनं वापरावी लागली असतील. * त्याच प्रकारे आपल्या शिकवण्याच्या साधनांमध्ये असलेल्या प्रत्येक साधनाचा एक विशिष्ट उद्देश आहे. ही साधनं आपण कशी वापरू शकतो त्याबद्दल आता आपण शिकू या.

आपली ओळख करून देणारी साधनं

६, ७. (क) तुम्ही संपर्क कार्डचा उपयोग कसा केला आहे? (ख) आपण सभेच्या आमंत्रणपत्रिकेचा उपयोग कशासाठी करतो?

संपर्क कार्ड. हे लहान पण अगदी उपयोगी साधन आहे. या कार्डचा उपयोग करून आपण यहोवाचे साक्षीदार म्हणून आपली ओळख करून देऊ शकतो आणि jw.org वेबसाईटबद्दल सांगू शकतो. आपल्या वेबसाईटवर लोक आपल्याबद्दल जास्त जाणून घेऊ शकतात आणि बायबल अभ्यासासाठी विनंतीही करू शकतात. आपल्या वेबसाईटवर आतापर्यंत ४ लाखापेक्षा जास्त लोकांनी बायबल अभ्यासासाठी विनंती केली आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे! आपण आपल्याजवळ काही संपर्क कार्ड ठेवू शकतो आणि दिवसभरात आपण ज्या लोकांना भेटतो त्यांच्याशी बोलून त्यांना ते देऊ शकतो.

आमंत्रणपत्रिका. आपल्या सभेच्या आमंत्रणपत्रिकेत असं म्हटलं आहे: “यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यासाठी तुमचे हार्दिक स्वागत.” त्यानंतर त्यात म्हटलं आहे की तुम्ही हा बायबल अभ्यास “आमच्या सभांमध्ये किंवा एखाद्या शिक्षकाबरोबर” करू शकता. ही आमंत्रणपत्रिका आपली ओळख करून देते आणि “जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात” अशा लोकांना बायबल शिकण्यासाठीही उत्तेजन देते. (मत्त. ५:३) लोक आपल्या सभांना उपस्थित राहू शकतात, पण यासाठी त्यांनी बायबल अभ्यास केलाच पाहिजे अशी काही अट नाही. आपल्या सभेला आल्यावर त्यांना समजेल की ते बायबलबद्दल बरंच काही शिकू शकतात.

८. लोकांनी एकदा तरी आपल्या सभेला उपस्थित राहणं गरजेचं का आहे? उदाहरण द्या.

लोकांनी आपल्या सभेला एकदा तरी उपस्थित राहावं यासाठी आपण त्यांना आमंत्रण देत राहणं खूप गरजेचं आहे. असं का? कारण जेव्हा ते सभेला येतील तेव्हा त्यांना समजेल की यहोवाचे साक्षीदार बायबलमधून सत्य शिकवतात. तसंच, ते लोकांना देवाबद्दल जाणून घ्यायला मदत करतात. खोट्या धर्मात असं मुळीच केलं जात नाही. (यश. ६५:१३) उदाहरणार्थ, अमेरिकेत राहणाऱ्‍या रे आणि लिन्डा या जोडप्याला हा फरक काही वर्षांआधी दिसून आला. त्यांचा देवावर विश्‍वास होता आणि त्यांना त्याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. यामुळे त्यांनी शहरातल्या प्रत्येक चर्चला भेट देऊन दोन गोष्टी पाहण्याचं ठरवलं. या दोन गोष्टी असल्यावरच ते त्या चर्चचे सभासद बनणार होते. पहिली म्हणजे, त्यांना चर्चमधून देवाबद्दल शिकायला मिळायला हवं आणि दुसरी म्हणजे, चर्चचे लोक देवाच्या उपासकांना शोभेल असे शालीन कपडे घालणारे असावेत. त्या शहरात बरेच चर्च होते त्यामुळे त्यांना बरीच वर्षं शोध घ्यावा लागला. पण त्यांच्या हाती शेवटी निराशाच आली. त्यांना देवाबद्दल काही शिकायला मिळालं नव्हतं आणि चर्चचे लोक खूप असभ्य कपडे घालणारे होते. त्यांच्या यादीत असलेल्या शेवटल्या चर्चला भेट दिल्यानंतर, लिन्डा आपल्या कामावर निघून गेली आणि रे घरी आले. घरी परत येताना ते एका राज्य सभागृहासमोरून गेले. त्यांनी विचार केला, ‘आतमध्ये काय चालतं हे एकदा जाऊन बघायला हवं.’ त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला! मंडळीतील प्रत्येक व्यक्‍ती त्यांच्याशी प्रेमळपणे वागली आणि प्रत्येकाने शालीन पेहराव केला होता. ते पहिल्या रांगेत जाऊन बसले आणि सभेत शिकलेल्या गोष्टी त्यांना खूप आवडल्या. त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला पौलचे शब्द आठवतात. त्याने पहिल्यांदा सभेला येणारी व्यक्‍ती काय म्हणेल त्याबद्दल सांगितलं होतं. ती व्यक्‍ती सभेला येऊन म्हणेल: “देव खरोखर तुमच्यामध्ये आहे.” (१ करिंथ. १४:२३-२५) त्या दिवसानंतर रे प्रत्येक रविवारी न चुकता सभेला आले. नंतर मग ते आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेलाही येऊ लागले. त्यांची पत्नी लिन्डाही आपल्या सभांना उपस्थित राहू लागली. ही दोघं आपल्या सत्तरीत होती तरीदेखील त्यांनी बायबल अभ्यास केला आणि बाप्तिस्मा घेतला.

चर्चा सुरू करण्यासाठी साधनं

९, १०. (क) पत्रिका वापरायला सोप्या का आहेत? (ख) देवाचे राज्य काय आहे? या पत्रिकेचं सादरीकरण कसं करावं ते समजवा.

पत्रिका. आपल्याकडे एकूण आठ पत्रिका आहेत. या वापरायला खूप सोप्या आहेत आणि त्यामुळे सहज संभाषण सुरू करता येतं. २०१३ मध्ये पहिली पत्रिका प्रकाशित झाली आणि आतापर्यंत यांच्या जवळपास ५०० कोटी प्रती छापण्यात आल्या आहेत. या सर्व पत्रिकांचं स्वरूप सारखंच आहे. त्यामुळे तुम्ही जर यांतली एखादी पत्रिका वापरायला शिकलात तर तुम्ही सर्व वापरायला शिकाल! पण पत्रिका वापरून तुम्ही संभाषण कसं सुरू करू शकता?

१० समजा तुम्हाला देवाचे राज्य काय आहे? ही पत्रिका घरमालकाला द्यायची असेल, तेव्हा ती तुम्ही कशी द्याल? सुरुवातीला, पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेला प्रश्‍न दाखवा आणि विचारा: “देवाचं राज्य काय आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणाल . . . ” मग दिलेल्या तीन पर्यायांपैकी घरमालकाला एक निवडायला सांगा. त्याने दिलेलं उत्तर बरोबर आहे की चूक, हे सांगण्याऐवजी पत्रिका उघडून “बायबल असे शिकवते” हा भाग दाखवा आणि दानीएल २:४४ व यशया ९:६ ही वचनं वाचा. चर्चेच्या शेवटी, मागच्या पानावर “थोडा विचार करा” यात दिलेला “देवाच्या राज्यात जीवन कसे असेल?” हा प्रश्‍न विचारा. या प्रश्‍नाचं उत्तर तुम्ही पुढच्या वेळी देऊ शकता. मग पुढच्या भेटीत तुम्ही देवाकडून आनंदाची बातमी! याच्या पाठ ७ वर चर्चा करू शकता. हे माहितीपत्रक बायबल अभ्यास सुरू करण्याच्या साधनांपैकी एक आहे.

बायबलबद्दल आवड वाढवणारी साधनं

११. आपल्या नियतकालिकांचा काय उद्देश आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल कोणती गोष्ट माहीत असली पाहिजे?

११ नियतकालिकं. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही जगभरात सर्वात जास्त प्रकाशित आणि भाषांतरीत होणारी नियतकालिकं आहेत. बऱ्‍याच देशांमध्ये ही नियतकालिकं वाचली जातात. त्यामुळे जगभरातल्या लोकांची आवड लक्षात ठेवून त्यांच्या मुख्य विषयांची रचना करण्यात येते. आज जीवनात सर्वात महत्त्वाचं काय आहे यावर लोकांनी आपलं लक्ष केंद्रित करावं, यासाठी या नियतकालिकांचा आपण वापर केला पाहिजे. पण आपण आधी हे जाणून घेतलं पाहिजे, की ही दोन्ही नियतकालिकं कोणत्या प्रकारच्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहेत.

१२. (क) सावध राहा! हे कोणत्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आलं आहे आणि याचा उद्देश काय आहे? (ख) या साधनाचा वापर केल्यामुळे तुम्हाला अलीकडे कोणते चांगले अनुभव आले आहेत?

१२ सावध राहा! हे नियतकालिक अशा लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आलं आहे ज्यांना बायबलबद्दल थोडी किंवा काहीच माहिती नाही. त्यांना कदाचित ख्रिस्ती शिकवणींबद्दल काहीच माहीत नसेल, धर्मावर त्यांचा विश्‍वास नसेल किंवा बायबल त्यांना वैयक्‍तिक जीवनात मदत करू शकतं याची त्यांना जाणीव नसेल. सावध राहा! याचा एक मुख्य उद्देश म्हणजे देव अस्तित्वात आहे हे वाचकाला पटवून देणं. (रोम. १:२०; इब्री ११:६) यामुळे त्याला बायबल हे “खरोखर देवाचेच वचन आहे” यावर विश्‍वास ठेवायलाही मदत होते. (१ थेस्सलनी. २:१३) २०१८ सालच्या तीन अंकांचे विषय आहेत: “खुशी की राह,” “आनंदी कुटुंबाचं गुपित काय?” आणि “शोक करणाऱ्‍यांसाठी मदत.”

१३. (क) टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती कोणाला लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे? (ख) या साधनाचा वापर केल्यामुळे तुम्हाला अलीकडे कोणते चांगले अनुभव आले आहेत?

१३ टेहळणी बुरूज याच्या सार्वजनिक आवृत्तीचा मुख्य उद्देश, देवाबद्दल आणि बायबलबद्दल थोडीफार आस्था असणाऱ्‍या लोकांना बायबल शिकवणींबद्दल समजवणं हा आहे. अशा लोकांना बायबलमधली थोडीफार माहिती असेल पण त्याची त्यांना अचूक समज नसेल. (रोम. १०:२; १ तीम. २:३, ४) २०१८ सालचे तीन अंक या प्रश्‍नांची उत्तरं देतात: “क्या आज के ज़माने में बाइबल पढ़ने से फायदा होगा?,” “कसं असेल आपलं भविष्य?” आणि “देवाला तुमची काळजी आहे का?

प्रोत्साहन देणारी साधनं

१४. (क) शिकवण्याच्या साधनांमध्ये असलेल्या चार व्हिडिओचा काय उद्देश आहे? (ख) हे व्हिडिओ दाखवल्यामुळे तुम्हाला कोणते चांगले अनुभव आले आहेत?

१४ व्हिडिओ. येशूच्या दिवसांत सुतारांकडे आजच्या सारखी विजेवर चालणारी आधुनिक साधनं नव्हती. जसं की करवत, ड्रील किंवा रंधा. आज आपल्याकडे प्रकाशनांसोबत लोकांना दाखवायला सुंदर व्हिडिओही आहेत. यांतले चार व्हिडिओ आपल्या शिकवण्याच्या साधनांमध्ये आहेत. ते म्हणजे: बायबलचा अभ्यास का करावा?, बायबल अभ्यास कसा चालवला जातो?, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? आणि यहोवाचे साक्षीदार-आम्ही कोण आहोत? जे व्हिडिओ लहान म्हणजे दोन पेक्षा कमी मिनिटांचे आहेत ते आपण पहिल्या भेटीत दाखवू शकतो. तसंच, मोठे व्हिडिओ पुनर्भेटीदरम्यान किंवा ज्यांच्याकडे जास्त वेळ आहे त्यांना दाखवू शकतो. या उपयुक्‍त साधनांमुळे आवड दाखवणाऱ्‍यांना बायबल अभ्यास सुरू करण्याची आणि सभेला येण्याची प्रेरणा मिळू शकते.

१५. आपल्या भाषेत व्हिडिओ पाहिल्याने लोकांवर कोणते परिणाम होऊ शकतात? उदाहरणं द्या.

१५ उदाहरणार्थ, यापीझ मातृभाषा असणारी माइक्रोनीशिया इथली एक स्त्री दुसरीकडे राहायला गेली. तेव्हा तिची भेट एका यहोवाच्या साक्षीदाराशी झाली. आपल्या बहिणीने तिला बायबलचा अभ्यास का करावा? हा यापीझ भाषेतला व्हिडिओ दाखवला. जेव्हा तो व्हिडिओ सुरू झाला तेव्हा त्या स्त्रीने अगदी उत्साहाने म्हटलं: “ही तर माझीच भाषा आहे. मला तर विश्‍वासच बसत नाही! याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मी सांगू शकते हा माझ्याच बेटावरचा आहे. हा माझीच भाषा बोलतो!” मग तिने म्हटलं, की ती jw.org वर असलेले तिच्या भाषेतले सर्व लेख आणि व्हिडिओ पाहील. (प्रेषितांची कार्ये २:८, ११ पडताळून पाहा.) दुसरं उदाहरण अमेरिकेत राहणाऱ्‍या एका बहिणीचं आहे. तिचा भाचा दुसऱ्‍या देशात राहतो. तिने त्याच्या भाषेत असलेल्या याच व्हिडिओची लींक त्याला पाठवली. त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि तिला इ-मेल पाठवला. त्यात त्याने म्हटलं: “हे जग एक दुष्टाच्या नियंत्रणात आहे या भागाने खासकरून माझं लक्ष वेधलं. मी बायबल अभ्यास सुरू करण्याचा अर्ज भरला आहे.” आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तो अशा देशात राहत आहे जिथे आपल्या कामावर बंदी आहे!

सत्य शिकवणारी साधनं

१६. पुढे दिलेल्या माहितीपत्रकांचा विशिष्ट उद्देश सांगा: (क) देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! (ख) देवाकडून आनंदाची बातमी! (ग) यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?

१६ माहितीपत्रकं. समजा एखाद्याला जास्त वाचता येत नसलं आणि त्याच्या भाषेत कोणतंच बायबल आधारित साहित्य नसलं तर काय? तेव्हा आपण देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा! हे माहितीपत्रक वापरू शकतो. * तसंच, बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी देवाकडून आनंदाची बातमी! हे माहितीपत्रक एक उत्कृष्ट साधन आहे. तुम्ही याच्या मागच्या पानावर असलेले १४ विषय घरमालकाला दाखवू शकता आणि विचारू शकता की त्याला कोणता विषय जास्त आवडला. मग तुम्ही त्या पाठातून अभ्यास सुरू करू शकता. तुम्ही पुनर्भेटीदरम्यान हे माहितीपत्रक वापरून पाहिलं आहे का? आपल्या शिकवण्याच्या साधनांपैकी तिसरं साधन म्हणजे, यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? हे माहितीपत्रक. बायबल विद्यार्थ्याला आपल्या संघटनेबद्दल माहिती मिळावी यासाठी या माहितीपत्रकाची रचना करण्यात आली आहे. हे माहितीपत्रक प्रत्येक बायबल अभ्यासादरम्यान कसं वापरावं यासाठी आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य​सभेसाठी कार्यपुस्तिका याचा मार्च २०१७ चा अंक पाहा.

१७. (क) प्रत्येक बायबल अभ्यासाच्या पुस्तकाचा विशिष्ट उद्देश काय आहे? (ख) ज्यांचा बाप्तिस्मा झाला आहे त्यांनी काय करणं गरजेचं आहे आणि का?

१७ पुस्तकं. एखाद्या माहितीपत्रकातून बायबल अभ्यास सुरू केल्यानंतर तुम्ही केव्हाही बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या पुस्तकातून अभ्यास सुरू करू शकता. या साधनामुळे लोकांना बायबलच्या मूलभूत शिकवणी समजण्यासाठी मदत होऊ शकते. जर विद्यार्थी प्रगती करत असेल आणि हे पुस्तक संपलं, तर तुम्ही देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातून अभ्यास सुरू ठेवू शकता. * या साधनामुळे विद्यार्थ्याला आपल्या जीवनात बायबलची तत्त्वं लागू करायला मदत होईल. हे लक्षात असू द्या, की बाप्तिस्मा झाल्यानंतरही एका नवीन व्यक्‍तीने तोपर्यंत बायबल अभ्यास करणं गरजेचं आहे जोपर्यंत या दोन्ही पुस्तकातून त्याचा अभ्यास पूर्ण होत नाही. असं केल्यामुळे त्याचा यहोवावरचा विश्‍वास मजबूत होईल आणि त्याला एकनिष्ठ राहण्यासाठी मदत होईल.​—कलस्सैकर २:६, ७ वाचा.

१८. (क) १ तीमथ्य ४:१६ हे वचन आपल्याला सत्याचे शिक्षक या नात्याने कोणती गोष्ट करण्याचं प्रोत्साहन देतं आणि याचे काय परिणाम होतात? (ख) शिकवण्याच्या साधनांचा वापर करत असताना आपलं काय ध्येय असलं पाहिजे?

१८ यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्यावर लोकांना “आनंदाच्या संदेशाविषयीचे सत्यवचन” सांगण्याची जबाबदारी आहे. यामुळे त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं. (कलस्सै. १:५; १ तीमथ्य ४:१६ वाचा.) असं करण्यासाठी आपल्याकडे शिकवण्याची साधनं आहेत. (“ शिकवण्याची साधनं” ही चौकट पाहा.) म्हणून आपण या साधनांचा कुशलतेने उपयोग करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू या. कोणतं साधन कधी वापरायचं हे प्रत्येक जण स्वतः ठरवू शकतो. पण लक्षात असू द्या, की आपलं ध्येय फक्‍त साहित्यांचं वाटप करणं नाही. तसंच, आपल्या संदेशात आवड नसणाऱ्‍यांना आपण साहित्य देत नाही. खरंतर जे प्रामाणिक, नम्र आणि सत्य जाणून घेण्याची इच्छा बाळगणारे व “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असणारे आहेत अशांना शिष्य बनवण्याचं आपलं ध्येयं आहे.​—प्रे. कार्ये १३:४८; मत्त. २८:१९, २०.

^ परि. 5 १ ऑगस्ट, २०१० टेहळणी बुरूज मधला “द कारपेंटर” हा लेख आणि “द कारपेंटर्स टुलबॉक्स” ही चौकट पाहा.

^ परि. 16 जर एका व्यक्‍तीला वाचता येत नसेल तर तुम्ही देवाचे ऐका या माहितीपत्रकातून त्याच्याशी चर्चा करू शकता. यात अनेक चित्रं आहेत.

^ परि. 17 देवाच्या प्रेमात कसं टिकून राहावं? हे पुस्तक पुढे मराठीत उपलब्ध झाल्यावर ते देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकाऐवजी वापरावं.