व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बदलत्या परिस्थितींत मनाची शांती टिकवून ठेवा

बदलत्या परिस्थितींत मनाची शांती टिकवून ठेवा

“मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे.”​—स्तो. १३१:२.

गीत क्रमांक: २४, ५१

१, २. (क) अनपेक्षित बदलांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) स्तोत्र १३१ नुसार मनाची शांती टिकवून ठेवायला कशामुळे मदत होईल?

लॉएड आणि अलेक्झांड्रा यांनी २५ पेक्षा जास्त वर्षं बेथेल सेवा केल्यानंतर त्यांना पायनियर म्हणून नेमणूक मिळाली. हे कळल्यावर सुरुवातीला त्यांना वाईट वाटलं. लॉएड म्हणतो: “माझ्यासाठी बेथेल आणि माझं काम माझी ओळखच बनली होती. आमची नेमणूक का बदलण्यात आली याची कारणं मी त्या वेळी स्वीकारली खरी, पण काही आठवड्यांनंतर आणि महिन्यांनंतर अनेकदा माझ्या मनात नाकारल्याची भावना यायची.” एका क्षणाला लॉएडला तो बदल योग्य वाटायचा तर दुसऱ्‍या क्षणी तो निराश व्हायचा.

आपण अपेक्षाही केली नसेल असे बदल आपल्या जीवनात वेळोवेळी होत राहतील. यामुळे कदाचित आपल्याला खूप चिंता वाटू शकते आणि नैराश्‍य येऊ शकतं. (नीति. १२:२५) बदल स्वीकारणं किंवा त्यांच्याशी जुळवून घेणं आपल्याला जेव्हा कठीण जातं, तेव्हा कोणती गोष्ट आपल्या मनाची शांती टिकवून ठेवायला मदत करू शकते? (स्तोत्र १३१:१-३ वाचा.) प्राचीन काळातल्या आणि आजच्या काही यहोवाच्या सेवकांना बदलत्या परिस्थितीतही मनाची शांती टिकवून ठेवणं कशामुळे शक्य झालं ते आपण पाहू या.

“देवाची शांती” आपल्याला मदत कशी करू शकते?

३. योसेफची परिस्थिती अचानक कशी बदलली?

योसेफच्या उदाहरणाचा विचार करा. सर्व मुलांमध्ये तो याकोबचा लाडका होता. यामुळे त्याची भावंडं त्याच्यावर जळायची. योसेफ १७ वर्षांचा असताना त्यांनी त्याला दास म्हणून विकलं. (उत्प. ३७:२-४, २३-२८) मग जवळपास १३ वर्षं मिसर देशात त्याला एक दास आणि नंतर एक कैदी म्हणून खूप त्रास सहन करावा लागला. योसेफचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं पण तो त्यांच्यापासून फार दूर होता. अशा बदलेल्या परिस्थितीत त्याला राग येऊ शकला असता आणि आशाहीन वाटू शकलं असतं. पण असं झालं नाही. मग कोणत्या गोष्टीमुळे त्याला मदत मिळाली?

४. (क) तुरुंगात असताना योसेफने काय केलं? (ख) यहोवाने योसेफच्या प्रार्थनांचं कसं उत्तर दिलं?

तुरुंगात त्रास सहन करत असताना यहोवा आपली कशी मदत करत आहे यावर योसेफने नक्कीच लक्ष केंद्रित केलं असेल. (उत्प. ३९:२१; स्तो. १०५:१७-१९) लहान असताना त्याला जी भविष्यसूचक स्वप्नं पडली होती त्यांचाही कदाचित त्याने विचार केला असेल. यामुळे त्याला आश्‍वासन मिळालं की यहोवा त्याच्यासोबत आहे. (उत्प. ३७:५-११) त्याने अनेकदा प्रार्थना करून यहोवाला आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्या असतील. (स्तो. १४५:१८) काहीही झालं तरी “देव त्याच्यासोबत” राहील असा भरवसा देवाकडून त्याला मिळाला. अशा प्रकारे यहोवाने योसेफच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं.​—प्रे. कार्ये ७:९, १०. *

५. ‘देवाच्या शांतीमुळे’ यहोवाची सेवा करण्याचा आपला निर्धार आणखीन पक्का कसा होतो?

आपली परिस्थिती कितीही कठीण असली तरी “देवाची शांती” आपल्या “बुद्धीचे रक्षण करेल” आणि आपल्याला मनाची शांती लाभेल. (फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.) जेव्हा आपल्याला चिंतेचा किंवा नैराश्‍याचा सामना करावा लागतो, तेव्हा “देवाची शांती” आपल्याला त्याची सेवा करत राहायला ताकद देते आणि धीर धरायला मदत करते. आता आपण अशा काही भाऊ-बहिणींची उदाहरणं पाहू ज्यांनी हे अनुभवलं आहे.

मनाची शांती पुन्हा मिळवण्यासाठी यहोवाकडे मदत मागा

६, ७. प्रार्थना केल्यामुळे आपण मनाची शांती पुन्हा कशी मिळवू शकतो? उदाहरण द्या.

तात्पुरते खास पायनियर म्हणून असलेली आपली नेमणूक आता बदलण्यात आली आहे, हे जेव्हा रायन आणि जुलिएट यांना कळलं तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. रायन म्हणतो: “हा विषय आम्ही सरळ यहोवासमोर मांडला. आम्हाला माहीत होतं की यहोवावर भरवसा दाखवण्याची आमच्याकडे ही खास संधी होती. आमच्या मंडळीत बरेच जण नवीन होते. म्हणून विश्‍वासाच्या बाबतीत आम्हाला त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडता यावं यासाठी आम्ही यहोवाकडे मदत मागितली.”

यहोवाने त्यांच्या प्रार्थनेचं कसं उत्तर दिलं? रायन म्हणतो: “सुरुवातीला आमच्या मनात ज्या नकारात्मक भावना आणि चिंता होत्या त्या प्रार्थना केल्या-केल्या लगेच नाहीशा झाल्या. देवाची शांती आमच्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करत होती. आम्हाला जाणवलं की जर आम्ही योग्य मनोवृत्ती बाळगली तर यहोवाच्या सेवेत आमचा उपयोग होत राहील.”

८-१०. (क) चिंता असताना पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करू शकतो? (ख) सेवाकार्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे यहोवा आपल्याला कशी मदत करू शकतो?

देवाच्या आत्म्यामुळे आपल्याला शांती तर मिळते, पण त्यासोबत तो आपल्याला बायबलची वचनंही लक्षात आणून द्यायला मदत करू शकतो. यामुळे आपल्याला समजेल की आपल्या जीवनात कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. (योहान १४:२६, २७ वाचा.) फिलिप्प आणि मेरी यांच्या उदाहरणाचा विचार करा. त्यांनी जवळपास २५ वर्षं बेथेल सेवा केली होती. चार महिन्यांत दोघांची आई आणि त्यांचा एक नातेवाईक मरण पावला. तसंच, मेरीच्या वडिलांना एक प्रकारचा मानसिक रोग झाल्यामुळे आता त्या दोघांना त्यांची काळजी घ्यावी लागते.

फिलिप्प म्हणतो: “मला वाटलं की मी धीर दाखवत आहे. पण कशाची तरी कमी मला भासत होती. एकदा टेहळणी बुरूजच्या एका अभ्यास लेखात मी कलस्सैकर १:११ हे वचन वाचलं. तेव्हा मला जाणवलं की मी धीर दाखवत होतो पण तो पूर्णपणे दाखवत नव्हतो. खरंतर मला ‘सहनशक्‍ती दाखवून आनंदाने पूर्णपणे धीर धरण्याची’ गरज होती. या वचनामुळे माझ्या लक्षात आलं की माझा आनंद माझ्या परिस्थितींवर नाही, तर पवित्र आत्म्याचा माझ्या जीवनावर जो परिणाम होतो त्यावर अवलंबून आहे.”

१० यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे फिलिप्प आणि मेरीला अनेक आशीर्वाद मिळाले. बेथेलमधून निघाल्यावर लवकरच त्यांना असे बायबल विद्यार्थी भेटले ज्यांनी चांगली प्रगती केली आणि ज्यांना आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा अभ्यास करायचा होता. मेरी म्हणते: “त्यांच्यामुळे आम्ही आनंदित होतो आणि त्या मार्गाने जणू यहोवा आम्हाला सांगत होता की सर्वकाही ठीक होईल.”

यहोवा आशीर्वाद देईल असं कार्य करा

आपली परिस्थिती कशीही असली तरी आपण योसेफच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? (परिच्छेद ११-१३ पाहा)

११, १२. (क) योसेफने अशी कोणती गोष्ट केली ज्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला? (ख) यहोवाने योसेफला कसं आशीर्वादित केलं?

११ जेव्हा जीवनात अचानक बदल होतात तेव्हा आपण कदाचित एवढे चिंताग्रस्त होऊ की आपल्या मनात समस्यांशिवाय दुसरा कोणताच विचार येणार नाही. हीच गोष्ट योसेफच्या बाबतीतही घडली असती. पण आहे त्या परिस्थितीत त्याने आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. योसेफने पोटीफरसाठी जशी भरपूर मेहनत केली तशीच मेहनत त्याने तुरुंगात असतानाही केली. तुरुंगाचा अधिकारी त्याला जे काही काम द्यायचा ते तो करायला तयार असायचा.​—उत्प. ३९:२१-२३.

१२ फारोच्या दरबारात आधी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्‍या हाताळणारे दोन जण तुरुंगात होते आणि त्यांची सेवा करण्याची जबाबदारी योसेफला देण्यात आली होती. योसेफ त्यांच्याशी दयाळूपणे वागला. यामुळे त्या दोघांना इतकं बरं वाटलं की त्यांनी आपल्या चिंता आणि आदल्या रात्री पडलेली विचित्र स्वप्नं योसेफला सांगितली. (उत्प. ४०:५-८) त्या दोघांसोबत झालेल्या संभाषणामुळे पुढे जाऊन आपली सुटका होईल ही गोष्ट योसेफला तेव्हा माहीत नव्हती. मग दोन वर्षांनी त्याची सुटका झाली आणि तो मिसर देशाचा मोठा अधिकारी बनला. फारोनंतर जर मिसरमध्ये कोणाकडे जास्त अधिकार होता तर तो योसेफकडे होता!​—उत्प. ४१:१, १४-१६, ३९-४१.

१३. आपली परिस्थिती कशीही असली तरी यहोवा आशीर्वाद देईल अशी कोणती गोष्ट आपण करू शकतो?

१३ योसेफसारखं आपणही कदाचित अशा परिस्थितीत असू जी आपल्या नियंत्रणापलीकडे असेल. पण आहे त्या परिस्थितीत जर आपण धीर दाखवला आणि आपल्या परीने होईल तितकी मेहनत घेतली तर यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल. (स्तो. ३७:५) हे खरं आहे की आपण कधीकधी ‘गोंधळून’ जाऊ, पण प्रेषित पौल म्हणतो की आपल्याला कधीच “आशाहीन स्थितीत सोडण्यात” येणार नाही. (२ करिंथ. ४:८; तळटीप) पौलचे हे शब्द आपल्याबाबतीत तेव्हा खरे ठरतील जेव्हा आपलं लक्ष सेवाकार्यावर केंद्रित असेल.

आपल्या सेवाकार्यावर लक्ष केंद्रित ठेवा

१४-१६. प्रचारक फिलिप्पच्या जीवनात बदल झाले तरी त्याने आपलं लक्ष सेवाकार्यावर कसं केंद्रित ठेवलं?

१४ बदलत्या परिस्थितींत सेवाकार्यावर लक्ष केंद्रित ठेवण्याच्या बाबतीत प्रचारक फिलिप्पने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं. त्याला यरुशलेममध्ये नवीन नेमणूक मिळाली होती. (प्रे. कार्ये ६:१-६) पण मग सर्वकाही बदललं. स्तेफनला * मारून टाकण्यात आलं. त्यानंतर तिथल्या ख्रिश्‍चनांना खूप छळ सहन करावा लागला. त्यामुळे ख्रिस्ती यरुशलेममधून पळून गेले. पण फिलिप्पला मात्र यहोवाच्या सेवेत व्यस्त राहायचं होतं आणि म्हणून आनंदाचा संदेश सांगण्यासाठी तो शोमरोन शहरात गेला. याआधी तिथल्या लोकांना कधीच प्रचार करण्यात आला नव्हता.​—मत्त. १०:५; प्रे. कार्ये ८:१, ५.

१५ देवाच्या आत्म्याने फिलिप्पला जिथे कुठे जाण्याचं निर्देशन दिलं, तिथे तो जाण्यासाठी तयार होता. यामुळे यहोवाने त्याला अशा ठिकाणी पाठवलं जिथे लोकांनी कधीच आनंदाचा संदेश ऐकला नव्हता. बरेच यहुदी, शोमरोनी लोकांना तुच्छ लेखायचे आणि त्यांना वाईट वागणूक द्यायचे. पण फिलिप्प तसा वागला नाही. मनात कोणताही भेदभाव न बाळगता त्याने तिथल्या लोकांना मोठ्या उत्सुकतेने आनंदाचा संदेश सांगितला. याचा परिणाम म्हणजे, शोमरोनी लोकांनी “त्याचे बोलणे मन लावून” ऐकले.​—प्रे. कार्ये ८:६-८.

१६ त्यानंतर देवाच्या आत्म्याने फिलिप्पला अश्‍दोद आणि कैसरीया शहरांत प्रचार करण्याचं निर्देशन दिलं. त्या शहरांत बरेच विदेशी लोक राहत होते. (प्रे. कार्ये ८:३९, ४०) पण त्याची परिस्थिती परत बदलली. त्याचं आता एक कुटुंब होतं आणि तो तिथेच स्थायिक झाला होता. फिलिप्पच्या जीवनात बरेच बदल झाले असले तरी तो सेवाकार्यात व्यस्त राहिला. यामुळे यहोवा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देत राहिला.​—प्रे. कार्ये २१:८, ९.

१७, १८. जीवनात काही बदल होतात तेव्हा सेवाकार्यावर लक्ष केंद्रित केल्याने आपल्याला कशी मदत होते?

१७ पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या अनेकांचं म्हणणं आहे, की सेवाकार्यावर लक्ष केंद्रित ठेवल्याने त्यांना बदलत्या परिस्थितींतही आनंदी राहायला आणि सकारात्मक मनोवृत्ती बाळगायला मदत होते. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेत राहणारं एक जोडपं, ऑसबॉर्न आणि पोलाइट यांनी जेव्हा बेथेल सोडलं, तेव्हा त्यांना वाटलं की त्यांना लगेच पार्ट-टाईम नोकरी आणि घर मिळेल. पण ऑसबॉर्न म्हणतो: “दुःखाची गोष्ट म्हणजे आम्ही जशी अपेक्षा केली होती तसं काही घडलं नाही. नोकरी मिळायला खूप वेळ लागला.” पोलाइट म्हणते: “तीन महिन्यांपर्यंत आम्हाला काम मिळालं नाही. आम्ही पैसेही साठवले नव्हते. आमच्यासमोर ही एक मोठी समस्या होती.”

१८ ऑसबॉर्न आणि पोलाइटला या चिंताजनक स्थितीत कशामुळे मदत झाली? ऑसबॉर्न म्हणतो: “मंडळीसोबत प्रचार केल्यामुळे आम्हाला आमचं मन स्थिर ठेवायला आणि सकारात्मक मनोवृत्ती बाळगायला मदत झाली.” घरात चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी सेवाकार्यात व्यस्त राहायचं ठरवलं. असं केल्याने त्यांना खूप आनंद झाला. ऑसबॉर्न पुढे म्हणतो: “आम्ही सर्व ठिकाणी नोकरी शोधली आणि काही दिवसांनी आम्हाला नोकरी मिळाली.”

यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवा

१९-२१. (क) मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होते? (ख) अनपेक्षित बदलांशी जुळवून घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

१९ या उदाहरणांवरून आपल्याला समजतं, की जर आपण आहे त्या परिस्थितीत आपलं सर्वोत्तम दिलं आणि यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवला, तर कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या मनाची शांती टिकवून ठेवू शकतो. (मीखा ७:७ वाचा.) मग कालांतराने आपल्याला कदाचित जाणवेल की आपण ज्या प्रकारे बदलांशी जुळवून घेतलं त्यामुळे खरंतर यहोवासोबत आपली मैत्री घनिष्ठ झाली आहे. पोलाइट म्हणते: “नेमणूक बदलल्यामुळे मला शिकायला मिळालं, की खासकरून कठीण परिस्थितींत असताना यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवणं गरजेचं आहे. आता यहोवासोबत माझं नातं आणखीन घनिष्ठ झालं आहे.”

२० आधी उल्लेख करण्यात आलेली मेरी आजही आपल्या वयस्क वडिलांची काळजी घेते आणि पायनियरींगसुद्धा करते. ती म्हणते: “मी शिकले की जेव्हा मला चिंता वाटते, तेव्हा मला थोडं थांबून प्रार्थना केली पाहिजे आणि त्या गोष्टीची चिंता करणं सोडून दिलं पाहिजे. तसंच, आपल्या सर्व चिंता आपण यहोवाच्या हाती सोपवल्या पाहिजेत; आणि हा कदाचित माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण धडा होता. हा धडा मला भविष्यातही खूप कामी येणार आहे.”

२१ लॉएड आणि अलेक्झांड्रा यांनी म्हटलं की बदलांमुळे त्यांच्या विश्‍वासाची परीक्षा झाली. आणि ती अशा मार्गांनी झाली ज्याची त्यांनी कधी अपेक्षाही केली नव्हती. पण ते पाहू शकतात की या परीक्षांमुळे त्यांना खरंतर मदत झाली आहे. आता त्यांना आपला विश्‍वास मजबूत झाल्यासारखा वाटतो. इतका की समस्या आल्यावरही त्यांना त्यामुळे सांत्वन मिळू शकतं. तसंच, त्यांना वाटतं की यामुळे ते चांगले व्यक्‍ती बनले आहेत.

अनपेक्षित बदलांमुळे अनपेक्षित आशीर्वाद मिळू शकतात! (परिच्छेद १९-२१ पाहा)

२२. आहे त्या परिस्थितीत आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण कोणती खात्री बाळगू शकतो?

२२ या व्यवस्थेत आपल्या जीवनात अनपेक्षित बदल घडू शकतात. यहोवाच्या सेवेत आपली नेमणूक बदलू शकते, शारीरिक समस्या उद्‌भवू शकतात किंवा कुटुंबाशी संबंधित असलेली एखादी नवीन जबाबदारी आपल्यावर येऊ शकते. पण कोणतेही बदल झाले तरी यहोवाला तुमची काळजी आहे आणि योग्य वेळी तो तुम्हाला मदत करेल याची खात्री बाळगा. (इब्री ४:१६; १ पेत्र ५:६, ७) तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. आपल्या पित्याला, यहोवाला प्रार्थना करा आणि त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवा. असं करण्याद्वारे तुमची परिस्थिती बदलली तरीही तुम्ही मनाची शांती टिकवून ठेवू शकाल.

^ परि. 4 अनेक वर्षांनंतर योसेफने आपल्या पहिल्या मुलाचं नाव मनश्‍शे (विसर पाडणारा) असं ठेवलं. कारण तो म्हणाला: “देवाने माझ्या सर्व क्लेशांचा . . . मला विसर पाडला आहे.” यावरून त्याला कळलं की देवाने त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याला मुलगा भेट म्हणून दिला होता.​—उत्प. ४१:५१.

^ परि. 14 या अंकातला “तुम्हाला माहीत होतं का?” हा लेख पाहा.