व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

छळ होत असतानाही स्तेफन इतका शांत कसा राहू शकला?

स्तेफन क्रूर लोकांच्या एका गटासमोर उभा होता. इस्राएलचं उच्च न्यायालय, म्हणजे यहुदी न्यायसभा ७१ न्यायाधीशांनी मिळून बनलेली. यहुदी समाजात या न्यायाधीशांचा बराच दबदबा होता. ही सभा महायाजक कैफा याने भरवली होती. काही महिन्यांआधी जेव्हा न्यायसभेने येशूला मृत्युदंड सुनावला होता, तेव्हाही हाच कैफा न्यायसभेचा अध्यक्ष होता. (मत्त. २६:५७, ५९; प्रे. कार्ये ६:८-१२) जेव्हा न्यायाधीशांनी एका नंतर एक खोट्या साक्षीदारांना बोलवलं तेव्हा स्तेफनच्या चेहऱ्‍यावर त्यांना एक वेगळाच भाव दिसला. त्याचा चेहरा त्यांना “एखाद्या देवदूताच्या चेहऱ्‍यासारखा” दिसत होता.​—प्रे. कार्ये ६:१३-१५.

अशा भयानक परिस्थितीत स्तेफन इतका शांत कसा राहू शकला? यहुदी न्यायसभेत स्तेफनला आणण्यापूर्वी पवित्र आत्म्याच्या जबरदस्त प्रभावामुळे तो देवाच्या सेवेत पूर्णपणे व्यस्त होता. (प्रे. कार्ये ६:३-७) जेव्हा त्याच्यावर खटला चालला होता तेव्हा हाच पवित्र आत्मा त्याच्यावर कार्य करत होता. हा आत्मा सांत्वन करणारा व आठवण देणारा म्हणून कार्य करत होता. (योहा. १४:१६, तळटीप.) स्तेफनने निर्भयपणे साक्ष दिली तेव्हा पवित्र आत्म्याने त्याला हिब्रू शास्त्रवचनांतल्या जवळजवळ २० किंवा त्यापेक्षा जास्त अहवालांची आठवण करून दिली. याबद्दल प्रेषितांची कार्ये पुस्तकाच्या ७व्या अध्यायात सांगितलं आहे. (योहा. १४:२६) पण नंतर जेव्हा येशू देवाच्या उजव्या हाताला उभा असल्याचा दृष्टान्त स्तेफनला दिसला तेव्हा त्याचा विश्‍वास आणखीन मजबूत झाला.​—प्रे. कार्ये ७:५४-५६, ५९, ६०.

एक दिवस कदाचित आपल्यालाही छळाचा सामना करावा लागेल. (योहा. १५:२०) देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास करण्याद्वारे आणि सेवाकार्यात पूर्णपणे सहभाग घेण्याद्वारे आपण यहोवाच्या आत्म्याला आपल्यावर कार्य करू देत असतो. यामुळे विरोधाचा सामना करण्यासाठी लागणाऱ्‍या शक्‍तीसोबत, मनाची शांती टिकवून ठेवायलाही आपल्याला मदत होईल.​—१ पेत्र ४:१२-१४.