व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २

मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा

मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा

“मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन.”​—स्तो. २२:२२.

गीत ९ यहोवाचा जयजयकार करा!

सारांश *

१. दावीदला यहोवाबद्दल काय वाटलं आणि यामुळे तो काय करण्यासाठी प्रेरित झाला?

दावीद राजाने लिहिलं: “परमेश्‍वर थोर व परमस्तुत्य आहे; त्याची थोरवी अगम्य आहे.” (स्तो. १४५:३) त्याचं यहोवावर प्रेम होतं आणि त्या प्रेमामुळे प्रेरित होऊन त्याने “मंडळीत” त्याची स्तुती केली. (स्तो. २२:२२; ४०:५) यात दुमत नाही की तुमचंही यहोवावर प्रेम आहे आणि यामुळे तुम्हालाही कदाचित दावीदसारखंच वाटेल. त्याने म्हटलं: “हे परमेश्‍वरा, आमचा पिता इस्राएल याच्या देवा, तू सदासर्वकाळ धन्य आहेस.”​—१ इति. २९:१०-१३

२. (क) आपण यहोवाची स्तुती कशी करू शकतो? (ख) आपल्यापैकी काहींना कोणती गोष्ट कठीण वाटते आणि आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आज यहोवाची स्तुती करण्याचा एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती सभांमध्ये उत्तरं देणं. पण बऱ्‍याच बंधुभगिनींना हे कठीण वाटतं. त्यांना सभेत उत्तरं द्यायची तर असतात, पण भीतीमुळे ते उत्तरं देत नाहीत. मग ते या भीतीवर कशी मात करू शकतात? कोणत्या काही व्यावहारिक सल्ल्यांमुळे आपल्याला प्रोत्साहनदायक उत्तरं देण्यासाठी मदत होईल? या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्याआधी, आपण हे पाहू की सभेत उत्तरं देण्याची आपल्याकडे कोणती चार महत्त्वपूर्ण कारणं आहेत.

आपण सभेत उत्तर का देतो?

३-५. (क) इब्री लोकांना १३:१५ या वचनानुसार आपण सभेत उत्तरं का दिली पाहिजेत? (ख) आपण सर्वांनी एकाच प्रकारची उत्तरं दिली पाहिजेत हे गरजेचं आहे का? स्पष्ट करा.

यहोवाची स्तुती करण्याचा बहुमान त्याने आपल्या सर्वांना दिला आहे. (स्तो. ११९:१०८) सभेत आपण जी उत्तरं देतो ती ‘स्तुतीच्या बलिदानाचा’ एक भाग आहे आणि कोणी दुसरं आपल्या वतीने हे देऊ शकत नाही. (इब्री लोकांना १३:१५ वाचा.) मग यहोवा आपल्या प्रत्येकाकडून एकाच प्रकारच्या बलिदानाची किंवा उत्तराची अपेक्षा करतो का? मुळीच नाही!

यहोवाला माहीत आहे की आपली क्षमता आणि परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने दिलेल्या बलिदानाला तो खूप मौल्यवान लेखतो. इस्राएली लोकांनी दिलेली कोणकोणती बलिदानं त्याने स्वीकारली याचा जरा विचार करा. काही इस्राएली लोक मेंढी किंवा बकरी अर्पण करायचे. पण सर्वांचीच तशी ऐपत नव्हती. अशा वेळी गरीब इस्राएली लोक कदाचित “दोन होले अथवा पारव्याची दोन पिले” अर्पण करायचे. आणि जर त्यांना दोन पक्षी अर्पण करणं शक्य नसलं तर यहोवा “एक दशमांश एफा सपीठ” हेदेखील स्वीकारायचा. (लेवी. ५:७, ११) पीठ स्वस्त असलं तरी यहोवा या बलिदानालाही मौल्यवान लेखायचा! अट फक्‍त हीच होती की ते “सपीठ” किंवा ‘चांगलं पीठ’ असावं.

आपल्या दयाळू देवाला आपल्याबद्दलही असंच वाटतं. आपण जेव्हा उत्तरं देतो तेव्हा आपण सर्वांनीच अपुल्लोसारखं प्रभावी वक्‍ता किंवा पौलसारखं खात्री पटवून देणारे असायला हवं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (प्रे. कार्ये १८:२४; २६:२८) आपल्या परीने आपण जितकी चांगली उत्तरं देऊ शकतो तितकीच तो आपल्याकडून अपेक्षा करतो. दानपत्रांत दोन छोटी नाणी टाकणाऱ्‍या विधवेच्या उदाहरणाचा विचार करा. तिने आपलं सर्वोत्तम दिलं यासाठी ती यहोवाच्या नजरेत मौल्यवान होती.​—लूक २१:१-४.

उत्तर दिल्यामुळे आपल्याला आणि इतरांनाही फायदा होतो (परिच्छेद ६-७ पाहा) *

६. (क) इब्री लोकांना १०:२४, २५ या वचनांनुसार उत्तरं ऐकल्यावर त्यांचा आपल्यावर कसा प्रभाव पडू शकतो? (ख) प्रोत्साहनदायक उत्तरांबद्दल आपण कदर कशी व्यक्‍त करू शकतो?

उत्तरं देण्याद्वारे आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो. (इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.) सभेत आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं ऐकायला मिळतात तेव्हा आपल्याला प्रोत्साहन मिळतं. लहान मुलांची सोपी, प्रामाणिक उत्तरं ऐकून आपल्याला आनंद होतो. एका व्यक्‍तीला एखाद्या बायबलमध्ये दिलेल्या सत्याबद्दल पहिल्यांदाच समजतं आणि ती उत्साहाने त्याबद्दल उत्तर देते तेव्हा आपल्याला उत्तेजन मिळतं. तसंच, आपल्याला अशांची उत्तरं ऐकूनही कौतुक वाटतं ज्यांना उत्तर द्यायला खूप “धैर्य” लागतं. त्यांचा स्वभाव कदाचित खूप लाजाळू असेल किंवा त्यांनी अलीकडेच आपली भाषा शिकायला सुरू केली असेल. (१ थेस्सलनी. २:२) त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी आपण त्यांना कदर कशी दाखवू शकतो? त्यांच्या प्रोत्साहनदायक उत्तरासाठी आपण सभेनंतर त्यांचे आभार व्यक्‍त करू शकतो. आभार व्यक्‍त करण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे स्वतः उत्तर देणं. यामुळे फक्‍त आपल्यालाच नाही तर इतरांनाही प्रोत्साहन मिळतं.​—रोम. १:११, १२.

७. उत्तरं दिल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

उत्तर दिल्यामुळे आपल्याला फायदा होतो. (यश. ४८:१७) ते कसं? पहिला फायदा म्हणजे, जर आपण एखादं उत्तर देण्याचं ठरवलं असेल, तर खासकरून आपल्याला सभेची चांगली तयारी करण्यासाठी प्रेरणा मिळते. चांगली तयारी केल्यामुळे देवाच्या वचनांची आपल्याला सखोल समज मिळते. जितकी जास्त आपली समज सखोल असेल, तितकं जास्त आपण शिकलेल्या गोष्टी चांगल्या रीतीने लागू करू. दुसरा म्हणजे, आपण चर्चेत सहभाग घेतो तेव्हा आपल्याला सभांमध्ये जास्त आनंद होऊ शकतो. तिसरा म्हणजे, उत्तरासाठी मेहनत घेतल्यामुळे तो मुद्दा आपल्याला सहसा सभेनंतरही बऱ्‍याच काळापर्यंत लक्षात राहतो.

८-९. (क) मलाखी ३:१६ या वचनानुसार यहोवाला आपल्या उत्तरांबद्दल काय वाटतं? (ख) काही जणांना आणखी कशाची भीती वाटत असेल?

विश्‍वास उत्तरांद्वारे व्यक्‍त केल्याने यहोवाला आनंद होतो. आपण पक्की खात्री बाळगू शकतो की मेहनत घेऊन सभेत दिलेली उत्तरं यहोवा ऐकतो आणि त्यांना मौल्यवान लेखतो. (मलाखी ३:१६ वाचा.) त्याचं मन आनंदित करण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देऊन कदर व्यक्‍त करतो.​—मला. ३:१०.

यावरून स्पष्टच आहे की आपल्याकडे सभेत उत्तरं देण्याची बरीच चांगली कारणं आहेत. पण असं असलं तरी काहींना हात वर करायला भीती वाटू शकते. जर तुम्हालाही तसं वाटत असेल तर निराश होऊ नका. सभेत आपल्या सर्वांना आणखीन उत्तरं द्यायला मदत होईल अशा काही बायबल तत्त्वांवर, उदाहरणांवर आणि व्यावहारिक सल्ल्यांवर आता आपण चर्चा करू या.

भीतीवर मात करणं

१०. (क) आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना कशाची भीती वाटते? (ख) तुम्हाला उत्तर देण्याची भीती वाटत असेल तर हे कोणत्या चांगल्या गोष्टीचं लक्षण आहे?

१० प्रत्येक वेळी उत्तर देण्यासाठी हात वर करण्याच्या नुसत्या विचारानेच तुमच्या पोटात गोळा येतो का? असं फक्‍त तुमच्याबाबतीतच घडतं असा विचार करून निराश होऊ नका. खरंतर आपल्यापैकी बहुतेक जणांना उत्तर देताना काही प्रमाणात तरी भीती वाटतेच. यावर मात करण्यासाठी तुम्हाला आधी भीतीचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही उत्तर विसराल किंवा चुकीचं उत्तर द्याल अशी तुम्हाला भीती वाटते का? किंवा तुमची उत्तरं दुसऱ्‍यांइतकी चांगली नसतील म्हणून तुम्हाला चिंता वाटते का? खरंतर, अशी भीती बाळगणं एका चांगल्या गोष्टीचं लक्षण आहे. ती म्हणजे, तुम्ही नम्र आहात आणि इतरांना तुम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ समजता. आणि यहोवाला नम्रतेचा गुण आवडतो. (स्तो. १३८:६; फिलिप्पै. २:३) पण यहोवाची हीदेखील इच्छा आहे, की तुम्ही त्याची स्तुती करावी आणि सभेदरम्यान बंधुभगिनींना प्रोत्साहन द्यावं. (१ थेस्सलनी. ५:११) त्याचं तुमच्यावर प्रेम आहे आणि उत्तर देण्यासाठी लागणारं धैर्य तो तुम्हाला देईल.

११. बायबलमध्ये दिलेली कोणती वचनं लक्षात ठेवल्याने आपल्याला मदत होईल?

११ बायबलमध्ये काय सांगितलं आहे त्यावर विचार करा. त्यात म्हटलं आहे की आपण सर्वच जण जे बोलतो आणि ज्या प्रकारे बोलतो त्यात चुकतो. (याको. ३:२) यहोवा आणि आपले बंधुभगिनी आपल्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. (स्तो. १०३:१२-१४) एका अर्थी, आपण सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत आणि त्यांचं आपल्यावर प्रेम आहे. (मार्क १०:२९, ३०; योहा. १३:३५) कधीकधी ठरवल्याप्रमाणे आपल्याला उत्तर देणं जमत नाही, पण ही गोष्टी ते समजून घेतात.

१२-१३. नहेम्या आणि योना यांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो?

१२ बायबलमध्ये अशी काही उदाहरणं आहेत, ज्यांमुळे तुम्हाला तुमच्या भीतीवर मात करायला मदत होईल. नहेम्याच्या उदाहरणाचा विचार करा. तो एका शक्‍तिशाली राजाच्या दरबारात काम करायचा. यरुशलेमची फाटकं आणि भिंती पडल्या आहेत हे ऐकून तो खूप दुःखी झाला. (नहे. १:१-४) त्याचा चेहरा का उतरलेला आहे हे राजाने विचारलं, तेव्हा त्याला किती भीती वाटली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? नहेम्याने पटकन प्रार्थना केली आणि मग राजाला उत्तर दिलं. यावर राजाने म्हटलं की तो देवाच्या लोकांची मदत करेल. (नहे. २:१-८) आता जरा योनाचा विचार करा. यहोवाने त्याला निनवेच्या लोकांना त्याचा संदेश सांगण्याची कामगिरी सोपवली, तेव्हा योना इतका घाबरला की तो उलट दिशेला पळून गेला. (योना १:१-३) पण यहोवाच्या मदतीने योना आपली नेमणूक पूर्ण करू शकला. योनाच्या शब्दांमुळे निनवेच्या लोकांना खूप मदत झाली. (योना ३:५-१०) नहेम्याच्या उदाहरणावरून आपण शिकतो की उत्तर देण्याआधी प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच, योनाकडून आपण शिकतो की आपली भीती कितीही मोठी असली तरी यहोवा आपल्याला तिच्यावर मात करायला मदत करेल. आणि खरं पाहिलं तर निनवेला जाऊन न्यायाचा संदेश सांगणं जितकं भीतिदायक होतं तितकं सभेत उत्तर देणं भीतिदायक आहे का? नक्कीच नाही!

१३ प्रोत्साहनदायक उत्तरं देण्यासाठी कोणते व्यावहारिक सल्ले तुम्हाला मदतीचे ठरू शकतात? आपण त्यांपैकी काही सल्ल्यांवर आता चर्चा करू या.

१४. आपण सभेची चांगली तयारी का केली पाहिजे आणि हे आपण कधी करू शकतो?

१४ प्रत्येक सभेची तयारी करा. सभेची आधी आणि चांगली तयारी केल्यामुळे तुम्ही आणखीन जास्त आत्मविश्‍वासाने उत्तर देऊ शकाल. (नीति. २१:५) हे खरं आहे, की आपल्या सर्वांचा नित्यक्रम वेगवेगळा असतो आणि त्यामुळे आपण सर्व एकाच वेळेला सभेची तयारी करू शकत नाही. एलोईस नावाची बहीण ८० वर्षांची आहे. त्या टेहळणी बुरूजच्या अभ्यासाची तयारी आठवड्याच्या सुरुवातीला करतात. त्या म्हणतात: “सभेसाठी आधीच तयारी केल्यामुळे मला सभेत जास्त आनंद मिळतो.” जॉय नावाची बहीण पूर्णवेळेची नोकरी करत आहे. ती शनिवारी टेहळणी बुरूजच्या अभ्यासाची तयारी करते. ती म्हणते: “सभेची तयारी एका दिवसाआधी केल्यामुळे मला ती माहिती लक्षात ठेवायला सोपं जातं.” आएक नावाचे वडील मंडळीत बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या सांभाळतात आणि पायनियरींगसुद्धा करतात. ते म्हणतात: “एकाच वेळी सभेची सर्व तयारी करण्यापेक्षा, रोज थोडी-थोडी तयारी करणं मला सोयीस्कर वाटतं.”

१५. तुम्ही सभेची चांगली तयारी कशी करू शकता?

१५ सभेची चांगली तयारी करण्यात काय सामील आहे? प्रत्येक वेळी तुम्ही सभेच्या तयारीसाठी बसता तेव्हा यहोवाकडे पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. (लूक ११:१३; १ योहा. ५:१४) मग तुम्ही शीर्षक, उपशीर्षक, चित्रं आणि चौकटी यांवर एक नजर टाका आणि त्यांचं परीक्षण करा. त्यानंतर प्रत्येक परिच्छेदाची तयारी करताना जी वचनं दिली आहेत, शक्य असल्यास ती सर्व वाचण्याचा प्रयत्न करा. दिलेल्या माहितीवर मनन करा आणि तुम्ही जी उत्तरं देण्याची ठरवली असतील खासकरून त्या मुद्द्‌यांवर विचार करा. तुम्ही जितकी जास्त चांगली तयारी कराल तितका जास्त तुम्हाला फायदा होईल आणि उत्तर द्यायलाही सोपं जाईल.​—२ करिंथ. ९:६.

१६. तुम्हाला कोणती साधनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि तुम्ही त्यांचा कसा वापर करत आहात?

१६ शक्य असल्यास इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करा. यहोवाने आपल्या संघटनेद्वारे अशी अनेक साधनं उपलब्ध करून दिली आहेत ज्यामुळे आपल्याला सभांची तयारी करायला मदत होते. JW लायब्ररी  ॲपमुळे आपल्याला अभ्यासाची साहित्यं आपल्या फोनवर डाउनलोड करता येतात. मग आपण त्यातून अभ्यास करू शकतो. पण आपल्याला अभ्यास करणं जमलं नाही तरी कमीतकमी आपण तो भाग कुठेही आणि कधीही वाचू किंवा ऐकू शकतो. काही जण शाळेत किंवा कामावर असताना जेवणाच्या सुट्टीत या साधनाचा वापर करून अभ्यास करतात, तर इतर जण प्रवास करताना याचा वापर करतात. वॉचटॉवर लायब्ररी  आणि वॉचटॉवर ऑनलाईन लायब्ररी  यांमुळे आपल्याला लेखातल्या ज्या मुद्द्‌यांवर खोलवर अभ्यास करायचा आहे त्यावर संशोधन करायला खूपच सोपं जातं.

तुम्ही सभांच्या तयारीसाठी कोणती वेळ ठरवली आहे? (परिच्छेद १४-१६ पाहा) *

१७. (क) एकापेक्षा जास्त उत्तरांची तयारी करणं का चांगलं राहील? (ख) यहोवाचे मित्र बना​—उत्तर तयार करा  या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१७ शक्य असल्यास अनेक उत्तरांची तयारी करा. पण असं का? कारण तुम्ही उत्तर देण्यासाठी हात वर केला तर प्रत्येक वेळी तुम्हाला संधी मिळेलच असं नाही. कदाचित त्याच प्रश्‍नाला दुसरेही हात वर करतील. अभ्यास घेणारे बांधव कदाचित उत्तर देण्याची संधी त्यांपैकी एकाला देतील. सभा वेळेवर संपावी म्हणून बांधव कदाचित एखाद्या मुद्द्‌यावर उत्तर देण्याची संधी कमी लोकांना देतील. यामुळे तुम्हाला उत्तर देण्याची संधी सुरुवातीला मिळाली नाही तर वाईट वाटून घेऊ नका किंवा निराश होऊ नका. जर तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तरांची तयारी केली असेल तर तुम्हाला चर्चेदरम्यान उत्तरं देण्याच्या जास्त संधी मिळतील. वचन वाचणं हेदेखील तुम्ही तयारी केलेल्या उत्तरांपैकी एक असू शकतं. पण जर शक्य असेल तर तुम्ही स्वतःच्या शब्दांत उत्तर देण्याचीही तयारी करू शकता. *

१८. थोडक्यात उत्तरं का द्यावी?

१८ थोडक्यात उत्तरं द्या. सर्वात प्रोत्साहन देणारी उत्तरं ही सहसा छोटी आणि समजायला सोपी असतात. म्हणून कमी शब्दात उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे, ३० सेकंदात देण्याचा प्रयत्न करा. (नीति. १०:१९; १५:२३) जर तुम्ही बऱ्‍याच वर्षांपासून सभेत उत्तरं देत असाल तर थोडक्यात उत्तरं देण्याबाबतीत तुमची एक महत्त्वाची भूमिका आहे. जर तुमची उत्तरं कठीण आणि काही सेकंदांची नसून काही मिनिटांची असतील तर यामुळे इतरांवर दडपण येऊ शकतं. तसंच त्यांना वाटू शकतं की ते तुमच्यासारखी चांगली उत्तरं देऊ शकत नाहीत. तसंच, थोडक्यात उत्तरं दिल्यामुळे सभेत बरेच जण सहभाग घेऊ शकतात. खासकरून तुम्हाला जर उत्तर देण्याची पहिली संधी मिळाली तर तुम्ही प्रश्‍नाचं सोपं आणि थेट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. परिच्छेदातले सर्व मुद्दे सांगण्याचं टाळा. मुख्य मुद्द्‌यावर चर्चा झाल्यानंतर तुम्ही इतर मुद्द्‌यांवर टिप्पणी करू शकता.​—“ मी कोणतं उत्तर देऊ शकतो?” ही चौकट पाहा.

१९. अभ्यास घेणारे बांधव तुम्हाला कशी मदत करू शकतात पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?

१९ तुम्ही विशिष्ट परिच्छेदासाठी उत्तर देणार आहात हे अभ्यास घेणाऱ्‍या बांधवाला आधीच सांगू शकता. तुम्ही जर असं करण्याचं ठरवलं असेल, तर अभ्यास घेणाऱ्‍या बांधवाला त्याबद्दल सभा सुरू होण्याआधीच सांगा. मग जेव्हा परिच्छेदावर चर्चा केली जाईल, तेव्हा तुम्ही लवकर आणि बांधवाला दिसेल असा हात वर करू शकता.

२०. सभा म्हणजे मित्रांसोबत एकत्र मिळून जेवणं असं आपण का म्हणू शकतो?

२० मंडळीतली सभा ही जणू जिवलग मित्र एकत्र जेवतात त्यासारखी आहे. कल्पना करा, तुमच्या मंडळीतल्या काही मित्रांनी एकत्र जेवणाचा बेत ठरवला आहे आणि त्यांनी तुम्हाला एखादा साधा पदार्थ बनवून आणायला सांगितलं आहे. मग यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? अशा वेळी तुम्हाला कदाचित थोडी चिंता वाटेल, पण सर्वांना आवडेल असं काहीतरी बनवण्यासाठी तुम्ही नक्कीच मेहनत घ्याल. त्याच प्रकारे, यहोवा देव आपल्याला सभांद्वारे भरपूर चांगल्या गोष्टी पुरवतो. (स्तो. २३:५; मत्त. २४:४५) अशा वेळी आपण आपल्या परीने एखादी सर्वोत्तम भेटवस्तू देतो तेव्हा तो आनंदित होतो; मग ती साधी असली तरीही. म्हणूनच चांगली तयारी करा आणि जितकी जास्त उत्तरं देता येतील तितकी देण्याचा प्रयत्न करा. असं केल्यामुळे तुम्ही यहोवाच्या मेजावरून मिळालेल्या अन्‍नाचं सेवन तर करालच, पण त्यासोबतच तुम्ही मंडळीतल्या सर्व बंधुभगिनींसाठी काही भेटवस्तूही आणाल.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 स्तोत्रकर्ता दावीदप्रमाणेच आपलं यहोवावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याची स्तुती करायला आवडतं. मंडळीमध्ये त्याची उपासना करण्यासाठी आपण जेव्हा एकत्र भेटतो, तेव्हा यहोवावर असलेलं आपलं प्रेम व्यक्‍त करण्याची एक विशेष संधी आपल्याकडे असते. ती म्हणजे सभेत उत्तरं देणं. पण आपल्यापैकी काहींना उत्तरं द्यायला कठीण जातं किंवा भीती वाटते. तुम्हालाही असंच वाटतं का? असं असल्यास या लेखामुळे तुम्हाला भीती का वाटते हे समजायला आणि त्यावर मात करायला मदत मिळू शकते.

^ परि. 17 jw.org वर यहोवाचे मित्र बना​—उत्तर तयार करा  हा व्हिडिओ पाहा. प्रकाशने > व्हिडिओ > चिमुकल्यांसाठी इथे पाहा.

^ परि. 63 चित्राचं वर्णन: मंडळीतले बंधुभगिनी टेहळणी बुरूज  अभ्यासादरम्यान आनंदाने भाग घेत आहेत.

^ परि. 65 चित्राचं वर्णन: आधीच्या चित्रात दाखवलेले असे काही सदस्य ज्यांनी टेहळणी बुरूज  अभ्यासाच्या चर्चेत भाग घेतला आहे. त्यांची परिस्थिती जरी वेगवेगळी असली तरी अभ्यास लेखाची तयारी करण्यासाठी ते सर्व जण काही वेळ बाजूला काढतात.