व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ६

खरेपणा टिकवून ठेवा!

खरेपणा टिकवून ठेवा!

“माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन [खरेपणा, NW] सोडणार नाही.”​—ईयो. २७:५.

गीत २९ खरेपणाने चालणे

सारांश *

१. परिच्छेदात उल्लेख केलेले तीन साक्षीदार यहोवाला विश्‍वासू कसे राहिले?

कल्पना करा की यहोवाचे साक्षीदार पुढे दिलेल्या तीन परिस्थितींत आहेत. (१) शाळेत टिचर सर्व मुलांना एका उत्सवात भाग घ्यायला सांगते तेव्हा एक तरुण मुलगी आदरपूर्वक त्यात भाग घेण्यासाठी नाकार देते. कारण तिला माहीत आहे की हा उत्सव देवाला नापसंत आहे. (२) लाजाळू स्वभावाचा एक तरुण मुलगा घरोघरचं प्रचारकार्य करत आहे. प्रचार करत असताना त्याला जाणवतं की पुढच्या घरी त्याच्या शाळेतला एक मुलगा राहतो. आणि या मुलाने आधी यहोवाच्या साक्षीदारांची थट्टा केली होती. पण तरी हा तरुण मुलगा त्याचं दार वाजवतो. (३) एक बांधव आपल्या कुटुंबासाठी खूप मेहनत घेत आहे. एक दिवस त्याचा बॉस त्याला एक अप्रामाणिक किंवा बेकायदेशीर काम करायला सांगतो. त्याने ते काम केलं नाही तर त्याची नोकरी जाऊ शकते. पण तो ते काम करण्यास नकार देतो आणि बॉसला समजावतो की तो प्रामाणिकपणेच वागणार व नियमांचं पालन करणार, कारण देव आपल्या सेवकांकडून तशी अपेक्षा करतो.​—रोम. १३:१-४; इब्री १३:१८.

२. आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत आणि का?

या तिघांमध्ये तुम्हाला कोणता गुण दिसला? कदाचित अनेक गुण तुमच्या लक्षात आले असतील. जसं की धैर्य आणि प्रामाणिकपणा. पण एक मौल्यवान गुण खूपच ठळकपणे दिसून येतो, तो म्हणजे खरेपणा. तिघंही यहोवाला विश्‍वासू आहेत हे त्यांनी दाखवलं. प्रत्येकाने यहोवाच्या स्तरांशी तडजोड करण्यासाठी नकार दिला. खरेपणा या गुणामुळे त्यांना तसं वागण्याची प्रेरणा मिळाली. हा गुण दाखवल्यामुळे यहोवाला या तिघांचा नक्कीच अभिमान वाटला असेल. आणि यहोवाला आपल्याबद्दलही अभिमान वाटावा अशी आपलीही इच्छा आहे. म्हणून आपण पुढील प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: खरेपणा म्हणजे काय? आपल्याला खरेपणाची गरज का आहे? आणि या कठीण काळात आपण खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आणखी पक्का कसा करू शकतो?

खरेपणा म्हणजे काय?

३. (क) देवाचे सेवक खरेपणा कसा दाखवतात? (ख) कोणत्या उदाहरणावरून आपल्याला खरेपणाचा अर्थ समजायला मदत होईल?

देवाचे सेवक खरेपणा कसा दाखवतात? देवावर अतूट आणि पूर्ण मनाने प्रेम करण्याद्वारे ते खरेपणा दाखवतात. आणि यामुळे ते नेहमी अशी कार्य करतात ज्यामुळे देवाचं मन आनंदित होईल. ‘खरेपणा’ या शब्दासाठी असलेल्या हिब्रू शब्दाचा अर्थ संपूर्ण, निर्दोष किंवा चांगल्या स्थितीत असणं असा होतो. उदाहरणार्थ, इस्राएली लोक यहोवाला प्राणी अर्पण करायचे. नियमानुसार त्यांना असा प्राणी अर्पण करायचा होता ज्यात कोणताच दोष नव्हता. * (लेवी. २२:२१, २२) आंधळे, लंगडे किंवा एखाद्या प्राण्याला कान नसेल, तर असे प्राणी त्यांनी अर्पण करू नये अशी त्यांना आज्ञा देण्यात आली होती. तो प्राणी संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असणं यहोवासाठी खूप महत्त्वाचं होतं. (मला. १:६-९) संपूर्ण आणि निर्दोष हे पैलू यहोवासाठी इतके महत्त्वाचे का आहेत हे आपण एका उदाहरणावरून समजू शकतो. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेता, जसं की फळ, पुस्तक किंवा एखादं साधन, आणि जर ते फळ सडलेलं असलं, त्या पुस्तकात काही पानं नसले, किंवा त्या साधनात काही भाग नसले, तर तुम्ही ते घेणार का? नक्कीच नाही! आपल्याला ती वस्तू अगदी पूर्ण, काहीही दोष नसलेली आणि चांगली हवी असते. त्याच प्रकारे, यहोवाला वाटतं की त्याच्यासाठी असलेलं आपलं प्रेम आणि खरेपणा संपूर्ण, निर्दोष आणि चांगल्या स्थितीत असायला हवा.

४. (क) एका अपरिपूर्ण व्यक्‍तीला खरेपणा बाळगणं शक्य का आहे? (ख) स्तोत्र १०३:१२-१४ या वचनांनुसार यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो?

मग खरेपणा बाळगण्यासाठी आपण परिपूर्ण असलं पाहिजे असा याचा अर्थ होतो का? आपल्यात खूप दोष आहेत आणि आपल्या हातून बऱ्‍याच चुका होतात असं आपल्याला वाटू शकतं. पण खरेपणा बाळगण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही. आपण याची दोन कारणं पाहू या. पहिलं, यहोवा आपल्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करत नाही. बायबल सांगतं: “हे परमेश्‍वरा, तू अधर्म लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तो. १३०:३) आपण अपरिपूर्ण, पापी मानव आहोत हे त्याला माहीत आहे आणि तो आपल्याला उदार मनाने क्षमा करतो. (स्तो. ८६:५) दुसरं, यहोवा आपल्या मर्यादा जाणतो आणि आपण जितकं करू शकतो त्यापलीकडे तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही. (स्तोत्र १०३:१२-१४ वाचा.) मग आपण कोणत्या अर्थाने त्याच्या नजरेत संपूर्ण आणि निर्दोष आहोत?

५. यहोवाच्या सेवकांसाठी प्रेम ही खरेपणाची गुरुकिल्ली का आहे?

यहोवाच्या सेवकांसाठी प्रेम ही खरेपणाची गुरुकिल्ली आहे. देवासाठी असलेलं आपलं प्रेम आणि स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्यासाठी असलेली आपली एकनिष्ठ भक्‍ती ही संपूर्ण आणि निर्दोष असायला हवी. परीक्षेतही जेव्हा हे प्रेम बदलत नाही, अटळ राहतं तेव्हा आपण खऱ्‍या अर्थाने म्हणू शकतो की आपल्यात खरेपणा आहे. (१ इति. २८:९; मत्त. २२:३७) लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या तीन साक्षीदारांचा पुन्हा एकदा विचार करा. त्या परिस्थितींत ते तसं का वागले? त्या तरुण मुलीला शाळेत मजा करायला आवडत नव्हतं का किंवा प्रचारात असलेल्या त्या तरुणाला स्वतःची थट्टा करून घ्यायची होती का? किंवा त्या कुटुंबप्रमुखाला आपली नोकरी गमवायची होती म्हणून तो तसा वागला का? मुळीच नाही! याउलट, यहोवाचे स्तर नीतिमान आहेत हे त्यांना माहीत आहे. तसंच, स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या पित्याचं मन आनंदित करण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे. त्यांचं यहोवावर प्रेम असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी ते त्याचा विचार करतात. असं करण्याद्वारे ते आपला खरेपणा दाखवतात.

आपल्याला खरेपणाची गरज का आहे?

६. (क) आपल्याला खरेपणाची गरज का आहे? (ख) खरेपणा दाखवण्यात आदाम आणि हव्वा कसे कमी पडले?

आपल्या सर्वांना खरेपणाची गरज का आहे? कारण सैतानाने फक्‍त यहोवाच्या बाबतीतच प्रश्‍नं उपस्थित केला नाही, तर तुमच्याबाबतीतही केला आहे. त्या बंडखोर स्वर्गदूताने एदेन बागेत स्वतःला सैतान किंवा “विरोध करणारा” बनवून घेतलं. देव अप्रामाणिक, स्वार्थी आणि वाईट शासक आहे, असा आरोप लावून त्याने देवाच्या नावाला कलंक लावला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे आदाम आणि हव्वा यांनी बंड करून सैतानाची बाजू घेतली. (उत्प. ३:१-६) एदेन बागेत असताना यहोवावरचं प्रेम वाढवण्याच्या बऱ्‍याच संधी त्यांच्याजवळ होत्या. पण सैतानाने जेव्हा दावा केला तेव्हा आदाम-हव्वाचं प्रेम संपूर्ण आणि निर्दोष नव्हतं. मग त्यानंतर आणखी एक प्रश्‍नं उभा राहिला: कोणताही मनुष्य यहोवाला प्रेमापोटी एकनिष्ठ राहील का? दुसऱ्‍या शब्दांत सांगायचं तर मानव खरेपणा दाखवू शकतात का? आणि हाच प्रश्‍नं ईयोबच्या बाबतीतही उभा राहिला.

७. ईयोब १:८-११ या वचनांनुसार यहोवाला आणि सैतानाला ईयोबच्या खरेपणाबद्दल कसं वाटलं?

इस्राएली लोक इजिप्तमध्ये होते, त्या काळातला ईयोबसुद्धा होता. त्या काळात त्याच्यासारखा खरेपणाने चालणारा दुसरा कोणीच नव्हता. आपल्यासारखाच तोदेखील अपरिपूर्ण होता. त्याच्या हातूनही चुका झाल्या. पण ईयोबच्या खरेपणामुळे यहोवाचं त्याच्यावर प्रेम होतं. असं दिसून येतं की सैतानाने मानवाच्या खरेपणाबद्दल आधीच यहोवाची निंदा केली होती. म्हणून यहोवाने सैतानाला ईयोबकडे लक्ष द्यायला सांगितलं. ईयोबच्या जीवनावरून सैतान खोटा असल्याचं सिद्ध झालं. ईयोबच्या खरेपणाची परीक्षा घेतली जावी अशी सैतानाने मागणी केली. यहोवाला आपल्या मित्रावर, ईयोबवर भरवसा होता आणि म्हणून त्याने सैतानाला त्याची परीक्षा घेण्याची अनुमती दिली.​—ईयोब १:८-११ वाचा.

८. सैतानाने ईयोबवर कसा हल्ला केला?

सैतान क्रूर आणि हत्यारा आहे. त्याने ईयोबच्या मालमत्तेची नासधूस केली, त्याची संपत्ती, त्याचे सेवक आणि समाजातलं त्याचं नाव, या सर्व गोष्टी त्याने हिरावून घेतल्या. त्याने ईयोबच्या कुटुंबावर हल्ला केला आणि त्याच्या १० मुलांचा जीव घेतला. मग त्याने ईयोबला शारीरिक रीत्या पीडित केलं. त्याने त्याला डोक्यापासून ते पायापर्यंत खूप वेदनादायक व भयंकर फोडांनी पीडित केलं. ईयोबची बायको निराशेमुळे खूप दुःखी झाली आणि तिने ईयोबला म्हटलं, की त्याने आपला खरेपणा सोडून द्यावा व देवाची निंदा करून मरून जावं. ईयोबला आपला जीव नकोसा झाला होता पण तरी त्याने आपला खरेपणा सोडला नाही. मग सैतानाने दुसऱ्‍या मार्गाने त्याच्यावर हल्ला केला. त्याने ईयोबच्या तीन सोबत्यांचा उपयोग केला. ते बरेच दिवस ईयोबला भेटायला गेले. पण त्यांनी त्याचं सांत्वन केलं नाही. याउलट, त्यांनी खूप निर्दयीपणे त्याला सुनावलं आणि त्याची निंदा केली. त्यांनी असंसुद्धा म्हटलं, की ईयोब दुष्ट व्यक्‍ती आहे आणि म्हणून त्याच्यासोबत सर्व वाईट गोष्टी घडत आहेत.​—ईयो. १:१३-२२; २:७-११; १५:४, ५; २२:३-६; २५:४-६.

९. परीक्षेचा सामना करत असताना ईयोबने कोणती गोष्ट करण्याचं टाळलं?

ईयोबने या सर्व समस्यांना कसं तोंड दिलं? तो परिपूर्ण नव्हता. खोटं सांत्वन देणाऱ्‍यांवर तो रागावला आणि विचार न करता खूपकाही बोलला. पण नंतर त्याने कबूल केलं तो अविचारीपणे बोलला होता. देवाच्या नीतिमत्तेपेक्षा स्वतःची नीतिमत्ता सिद्ध करण्याकडे त्याचं लक्ष होतं. (ईयो. ६:३; १३:४, ५; ३२:२; ३४:५) असं असलं तरी खूप कठीण परिस्थितीतही तो यहोवा देवाविरुद्ध गेला नाही. त्याचे मित्र खोटं बोलत होते, म्हणून त्याने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला नाही. त्याने म्हटलं: “तुमचा वाद खरा आहे असे मी कदापि मान्य करणार नाही; माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन [खरेपणा, NW] सोडणार नाही.” (ईयो. २७:५) या शब्दांवरून सिद्ध होतं की परिस्थिती कशीही असो ईयोब आपला खरेपणा सोडणार नव्हता. ईयोबने हार मानली नाही आणि आपणही तसंच करू शकतो.

१०. सैतानाने ईयोबच्या बाबतीत उपस्थित केलेल्या वादविषयात तुम्ही कसे सामील आहात?

१० सैतान आपल्या प्रत्येकावर रोज हेच आरोप लावतो. सैतानाने ईयोबच्या बाबतीत उपस्थित केलेल्या वादविषयात तुम्ही कसे सामील आहात? त्याचं म्हणणं आहे की तुमचं यहोवावर खरं प्रेम नाही, तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी त्याची सेवा करण्याचं सोडून द्याल आणि तुम्ही खरेपणा टिकवून ठेवणार नाही. (ईयो. २:४, ५; प्रकटी. १२:१०) हे ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल! पण जरा याचा विचार करा: यहोवाचा तुमच्यावर इतका भरवसा आहे की त्याने तुम्हाला एक उत्कृष्ट संधी दिली आहे. यहोवाने सैतानाला तुमची परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. पण तुम्ही आपला खरेपणा टिकवून ठेवाल आणि सैतान खोटं असल्याचं सिद्ध कराल असा पूर्ण भरवसा यहोवाला आहे. तसंच, यहोवा वचन देतो की असं करण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. (इब्री १३:६) संपूर्ण विश्‍वाच्या सर्वोच्च अधिकाऱ्‍याचा तुमच्यावर भरवसा आहे, हा खरंच किती मोठा बहुमान आहे! यावरून आपल्याला समजतं की खरेपणा इतका महत्त्वपूर्ण का आहे. खरेपणा बाळगल्यामुळे आपण सैतानाच्या खोट्या आरोपांना फेटाळून लावू शकतो, आपल्या पित्याचं नाव उंचावू शकतो आणि त्याच्या अधिकाराचं समर्थन करू शकतो. आपला खरेपणा टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?

आज आपण खरेपणा कसा टिकवून ठेवू शकतो?

११. आपण ईयोबकडून काय शिकू शकतो?

११ सैतानाने या “शेवटच्या दिवसांत” देवाच्या सेवकांवर हल्ला वाढवला आहे. (२ तीम. ३:१) या कठीण काळात आपला खरेपणा टिकवून ठेवण्याचा निर्धार आपण कसा पक्का करू शकतो? आपण ईयोबकडून आणखी एक गोष्ट शिकू शकतो. त्याच्यावर परीक्षा येण्याच्या खूप आधीपासूनच त्याने यहोवाप्रती आपला खरेपणा टिकवून ठेवला होता. खरेपणा टिकवून ठेवण्याचा निर्धार मजबूत करण्याविषयी आपण ईयोबकडून तीन धडे शिकू या.

खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार पक्का करण्याचे आपल्याकडे कोणते काही मार्ग आहेत? (परिच्छेद १२ पाहा) *

१२. (क) ईयोब २६:७, ८, १४ या वचनांमध्ये सांगितल्यानुसार ईयोबला यहोवाविषयी विस्मयाची भावना आणि आदर विकसित करण्याची प्रेरणा कशी मिळाली? (ख) आपणही आपलं मन विस्मयाच्या भावनेने कसं भरू शकतो?

१२ यहोवाविषयी विस्मयाची भावना विकसित केल्यामुळे ईयोबचं यहोवावरचं प्रेम वाढलं. ईयोबने यहोवाच्या विस्मयकारक सृष्टीवर मनन केलं. (ईयोब २६:७, ८, १४ वाचा.) पृथ्वी, आकाश, ढग, गर्जना यांच्या विचाराने तो अगदी थक्क झाला. त्याने मान्य केलं की यहोवाच्या अफाट सृष्टीबद्दल त्याला खूप कमी माहीत आहे. तसंच, यहोवाच्या वचनांनाही त्याने खूप मौल्यवान लेखलं. ईयोबने देवाच्या शब्दांविषयी म्हटलं: “मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.” (ईयो. २३:१२) यहोवाबद्दल असलेल्या विस्मयाच्या भावनेमुळे त्याच्या मनात यहोवाबद्दल गाढ आदर होता. तसंच, त्याचं यहोवावर प्रेम होतं आणि त्याचं मन आनंदित करण्याची त्याची इच्छा होती. आणि याचा परिणाम म्हणजे, खरेपणा टिकवून ठेवण्याचा त्याचा निर्धार आणखी पक्का झाला. ईयोबचं अनुकरण करण्याची आपलीही इच्छा आहे. ईयोबच्या काळात लोकांना यहोवाच्या विस्मयकारक सृष्टीबद्दल जितकं माहीत होतं, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने आज आपल्याला माहीत आहे. तसंच, आपल्याकडे देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं संपूर्ण बायबलही आहे. यामुळे आपल्याला यहोवा कसा आहे हे जाणून घ्यायला मदत होते. आपण जे काही शिकू त्यामुळे आपल्या मनात देवाबद्दल विस्मयाची भावना वाढेल. यहोवाबद्दल असलेली विस्मयाची भावना आणि आदर यांमुळे आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करायला, त्याच्यावर प्रेम करायला आणि त्याची आज्ञा पाळायला मदत होईल. तसंच, खरेपणा टिकवून ठेवण्याची मनापासून असलेली आपली इच्छा बळकट करायलाही मदत होईल.​—ईयो. २८:२८.

पोर्नोग्राफी बघण्याचं टाळल्याने आपण खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार पक्का करू शकतो (परिच्छेद १३ पाहा) *

१३-१४. (क) ईयोब ३१:१ या वचनात सांगितल्याप्रमाणे ईयोबने आज्ञाधारकता कशी दाखवली? (ख) आपण ईयोबचं अनुकरण कसं करू शकतो?

१३ सर्व बाबतीत आज्ञाधारक राहिल्याने ईयोबला आपला खरेपणा टिकवून ठेवायला मदत झाली. खरेपणा यात यहोवाच्या आज्ञांचं पालन करणं सामील आहे हे ईयोबला माहीत होतं. खरंतर, प्रत्येक आज्ञेचं पालन केल्यामुळे खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. प्रत्येक दिवशी ईयोबने देवाची आज्ञा पाळण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. उदाहरणार्थ, स्त्रियांसोबत आपला व्यवहार कसा असावा याबाबतीत तो खूप काळजीपूर्वक वागला. (ईयोब ३१:१ वाचा.) तो विवाहित असल्यामुळे त्याला जाणीव होती, की दुसऱ्‍या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणं चुकीचं आहे. आज आपण अशा जगात राहत आहोत ज्यात आपल्यावर रोजच लैंगिक अनैतिकतेचा दबाव टाकला जातो. ईयोबप्रमाणेच आपणही दुसऱ्‍या स्त्रीला किंवा पुरुषाला वाईट नजरेने पाहण्याचं टाळू का? आपण असभ्य किंवा अश्‍लील चित्रं पाहण्याचं टाळू का, मग ते कोणत्याही माध्यमाद्वारे आपल्यासमोर आले तरीही? (मत्त. ५:२८) आपण जर रोज आत्मसंयम बाळगला तर खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होऊ शकतो.

भौतिक गोष्टींबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगल्याने आपण खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार पक्का करू शकतो (परिच्छेद १४ पाहा) *

१४ भौतिक गोष्टींबाबत आपण कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे याबद्दलही ईयोबने यहोवाची आज्ञा पाळली. भौतिक गोष्टींवर भरवसा ठेवणं हे शिक्षेस पात्र असलेल्या गंभीर पापासारखं आहे ही गोष्ट ईयोबला समजली. (ईयो. ३१:२४, २५, २८) आज आपण अशा जगात राहत आहोत ज्यात जास्त करून लोक भौतिक गोष्टींच्या मागे लागले आहेत. पण आपण पैसा आणि भौतिक गोष्टी यांबद्दल संतुलित दृष्टिकोन ठेवला, तर बायबलच्या सल्ल्यानुसार खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आपण पक्का करू शकतो.​—नीति. ३०:८, ९; मत्त. ६:१९-२१.

आपली आशा जिवंत ठेवल्याने आपण खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार पक्का करू शकतो (परिच्छेद १५ पाहा) *

१५. (क) कोणत्या प्रतिफळावर आशा ठेवल्याने ईयोबला आपला खरेपणा टिकवून ठेवायला मदत झाली? (ख) यहोवाने दिलेली आशा नेहमी लक्षात ठेवल्याने आपल्याला मदत का होऊ शकते?

१५ देव आपल्याला आशीर्वाद देईल या आशेकडे लक्ष केंद्रित करण्याद्वारे ईयोब आपला खरेपणा टिकवून ठेवू शकला. ईयोबला विश्‍वास होता की देव त्याच्या खरेपणाची दखल घेत आहे. (ईयो. ३१:६) त्याच्यावर अनेक समस्या आल्या खऱ्‍या, पण त्याला पूर्ण भरवसा होता की यहोवा शेवटी त्याला नक्की प्रतिफळ देईल. यामुळे त्याला आपला खरेपणा टिकवून ठेवायला मदत झाली. आणि ईयोबने दाखवलेल्या खरेपणामुळे यहोवाचं मन इतकं आनंदित झालं की तो अपरिपूर्ण असतानाही यहोवाने त्याला भरभरून आशीर्वाद दिले. (ईयो. ४२:१२-१७; याको. ५:११) इतकंच काय तर त्याला भविष्यातही आणखी चांगले आशीर्वाद मिळणार आहेत! तुमच्या खरेपणाबद्दल यहोवा तुम्हाला आशीर्वाद देईल याबद्दल तुम्हाला पक्की आशा आहे का? आपला देव बदललेला नाही. (मला. ३:६) यहोवा आपल्या खरेपणाला मौल्यवान लेखतो हे जर आपण लक्षात ठेवलं, तर आपल्याकडे असलेली सुंदर भविष्याची आशा नेहमी जिवंत राहील.​—१ थेस्सलनी. ५:८, ९.

१६. आपण कोणता पक्का निर्धार केला पाहिजे?

१६ आपण आपला खरेपणा कधीच सोडणार नाही असा पक्का निर्धार आपण करू या! कधीकधी आपल्याला वाटेल की फक्‍त आपणच खरेपणा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण लक्षात असू द्या की तुम्ही एकटे नाहीत. खरंतर, जगभरात तुमच्यासारखे असे लाखो विश्‍वासू जण आहेत जे खरेपणाने चालत आहेत. तुम्हीदेखील गत काळातल्या अशा विश्‍वासू स्त्री-पुरुषांमध्ये गणले जाल ज्यांनी आपला खरेपणा टिकवून ठेवताना आपल्या जिवाचीही पर्वा केली नाही. (इब्री ११:३६-३८; १२:१) तेव्हा, आपण सर्व जण ईयोबच्या म्हणण्यानुसार जगण्याचा प्रयत्न करू या. त्याने म्हटलं: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन [खरेपणा, NW] सोडणार नाही.” आणि आपली हीच इच्छा आहे की आपल्या खरेपणामुळे नेहमी यहोवाचा गौरव होवो!

गीत १८ देवाचे खरे प्रेम

^ परि. 5 खरेपणा म्हणजे काय? यहोवा आपल्या उपासकांमध्ये असलेल्या या गुणाला मौल्यवान का लेखतो? आपल्यापैकी प्रत्येकाने खरेपणाने चालणं का महत्त्वाचं आहे? बायबलमध्ये या प्रश्‍नांची काय उत्तरं दिली आहेत हे या लेखातून आपल्याला समजायला मदत होईल. तसंच, खरेपणा टिकवून ठेवण्याचा आपला निर्धार आपण प्रत्येक दिवशी आणखी पक्का कसा करू शकतो, हेही आपल्याला समजायला मदत होईल. आणि असं केल्यामुळे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतील.

^ परि. 3 प्राण्याच्या बाबतीत वापरलेला हिब्रू शब्द “दोषहीन” याचा संबंध मानवांबाबतीत वापरलेल्या ‘खरेपणा’ या शब्दाशी आहे.

^ परि. 50 चित्राचं वर्णन: ईयोबची मुलं लहान असताना तो त्यांना यहोवाच्या विस्मयकारक सृष्टीबद्दल शिकवत आहे.

^ परि. 52 चित्राचं वर्णन: कामावरचे सोबती एका बांधवाला पोर्नोग्राफी बघायला बोलवतात तेव्हा तो त्यांना नकार देतो.

^ परि. 54 चित्राचं वर्णन: एक मोठा आणि महाग टिव्ही घेण्याच्या मोहाला एक बांधव नाकारतो कारण त्याला त्याची गरज नाही आणि ते घेण्यासाठी त्याच्याकडे पैसेही नाहीत.

^ परि. 56 चित्राचं वर्णन: एक बांधव नंदनवनाच्या आशेवर प्रार्थनापूर्वक मनन करण्यासाठी वेळ काढतो.